वाचनाची आणि त्यासाठी ग्रंथालयातून पुस्तके आणून त्यावर लिहिण्याची मला आवड आहे. पण या वाचनाच्या आणि लेखनाच्या प्रवासात एका शब्दाने मला नेहमीच अडकवून ठेवले, तो शब्द म्हणजे 'Issue' (इश्यू) करणे. 'मी ग्रंथालयातून पुस्तक इश्यू केले', हे वाक्य सहजपणे वापरल्या जाते, खटकतही नाही. पण सातत्याने मराठीत लिहिताना, 'इश्यू' हा इंग्रजी शब्द वारंवार वापरणे मला खटकत होते. मला असा एक शब्द किंवा शब्दसमूह हवा होता, जो वाचकाला सहज कळेल आणि मराठीत सध्या फार वापरात नसला तरी अर्थवहन करेल. इथूनच सुरू झाला माझा एका समर्पक मराठी पर्यायाचा शोध!
.
सुरुवातीला नेहमीच्या वापरातले "पुस्तक काढले" किंवा "घेतले" हे पर्याय डोळ्यांसमोर आले. पण त्यात 'ठराविक मुदतीसाठी रीतसर नोंद करून मिळवणे' हा तांत्रिक अर्थ मिळत नव्हता. मग ग्रंथालय शास्त्रातील 'निर्गमित करणे' किंवा 'आदान-प्रदान' या शब्दांचा विचार केला, पण ते रोजच्या वापरासाठी खूपच जड आणि औपचारिक वाटले.
.
मग काही नवे पर्याय पाहण्याचा प्रयत्न केला.
.
पुस्तक-उचल = सुरुवातीला हा शब्द थोडा वेगळा आणि आकर्षक वाटला. पण अधिक विचार केल्यावर जाणवले की, 'उचल' हा शब्द कुठेतरी 'उचलेगिरी'ची (चोरीची) नकारात्मक आठवण करून देतो. त्यामुळे हा पर्याय बाद केला.
.
वाचन-नोंद = हा शब्द सुटसुटीत होता. यात 'नोंद' (Registration) हा इश्यू प्रक्रियेचा मूळ अर्थ अचूक आला, पण पुस्तक प्रत्यक्षात हातात 'आणले' जाण्याची कृती यातून व्यक्त होत नव्हती.
.
नोंदवून आणले = वरील दोन्ही अर्थ एकत्र यावेत म्हणून हा पर्याय समोर आला. अर्थाच्या दृष्टीने तो परिपूर्ण होता, पण भाषेच्या प्रवाहात 'नोंदवून' हा शब्द उच्चारताना थोडा जड आणि रटाळ वाटत होता.
.
मग या पर्यायांचा विचार केल्यानंतर आणि भाषेच्या प्रवाहीपणाचा विचार केल्यानंतर मी एका शब्दसमूहावर येऊन थांबलो, तो म्हणजे 'नोंदून आणले'.
.
"मी आज वाचनालयातून हे पुस्तक नोंदून आणले."
.
या शब्दसमूहात 'नोंद' करण्याची अधिकृत प्रक्रियाही आहे आणि पुस्तक सोबत 'आणण्याची' कृतीही आहे. शिवाय, 'नोंदवून' ऐवजी 'नोंदून' असा उच्चार मला अधिक प्रवाही वाटतोय. यात कोणताही कृत्रिम जडपणा नाही आणि ऐकणाऱ्याला त्याचा अर्थ समजायला वेळ लागत नाही.
.
त्यामुळे माझ्या पुढील लेखनात मी 'इश्यू'साठी 'नोंदून आणले' हाच शब्दसमूह वापरण्याचे निश्चित केले आहे.
.
अर्थात, हे माझे आत्ताचे मत आहे. भाषेचा प्रवाह सतत बदलत असतो आणि नवनवीन शब्दांची भर त्यात पडत असते.
.
तुम्ही ग्रंथालयातून पुस्तक आणताना नेमका कोणता शब्द वापरता? तुमच्या माहितीत यासाठी एखादा वेगळा, अधिक सोपा किंवा तुमच्या नेहमीच्या वापरातला दुसरा एखादा शब्द आहे का? तुमचे पर्याय नक्की शेअर करा, मला ते जाणून घ्यायला नक्कीच आवडतील.
ग्रंथालयातून पुस्तक 'इश्यू' करणे
Submitted by तुष्कीनागपुरी on 26 July, 2026 - 12:35
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ग्रंथालयातून/ वाचनालयातून
ग्रंथालयातून/ वाचनालयातून पुस्तक आणले.
ग्रंथालयातून पुस्तक आणले.
ग्रंथालयातून पुस्तक आणले.
दोघांना + १
दोघांना + १
इश्युचा इश्यु न करता ग्रंथालयातून पुस्तक आणले/ग्रंथालयाला परत केले म्हणावे. यात त्यासाठी होणारी जी काय प्रक्रिया ती अध्याहृत आहे.
"मी आज वाचनालयातून हे पुस्तक नोंदून आणले." असे म्हटले तर "इन्हे क्या किये की क्या की!" वाटेल. यांच्याकडे एक पुस्तक होतं ते त्यांनी ग्रंथालयात जाऊन ते नोंदलं. त्यांना ते ग्रंथालयाला भेट द्यायचे असावे वाचुन झाले की. वगैरे वाटेल.
To issue हे क्रियापद इतर संदर्भात वापरले असताना त्यासाठी जारी करणे/बजावणे वगैरे क्रियापद वापरता येईल नेमक्या संदर्भानुसार.
नोंदून चुकीचे वाटत आहे !
नोंदून चुकीचे वाटत आहे !
नोंदणी करून आणले...! हे ठीक वाटते.
पुस्तक बदलून आणलं.
पुस्तक बदलून आणलं.
मला वाटतं, ग्रंथालयातून आपण
मला वाटतं, ग्रंथालयातून आपण आपल्याला हवं तें पुस्तक निवडून/ शोधून / मागून घेतो व ग्रंथपाल तें आपल्याला ' इश्यू ' करतो. त्यामुळे, वाचकाने तें ' नोंदणी करून ( किंवा ' इश्यू ' साठी इतर मराठी शब्दप्रयोग वापरून ) आणले ' म्हणण्याची गरजच नसावी.
आम्ही लहानपणापासून पुस्तक
आम्ही लहानपणापासून पुस्तक वाचनालयातून (माझ्या किंवा अन्य कुणाच्या) नावावर आणले असं म्हणत आलो. Issue नंतर आलं.
एव्हढा विचार कधी केलाच नाही.
वाचनालय पण आता. पूर्वी "पुस्तक लायब्ररीतून नावावर आणले" हेच म्हणत आलो.
वाचनालय पण आता. पूर्वी
वाचनालय पण आता. पूर्वी "पुस्तक लायब्ररीतून नावावर आणले" हेच म्हणत आलो. > खरंय. लहान असल्यापासून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची मेंबर आहे पण उल्लेख कायम लायब्ररीतून पुस्तक आणले असाच केले गेला.
ग्रंथालयात दोनच पद्धतीने
वाचनालय आणि ग्रंथालय एकच का वेगवेगळे ?
मुळात 'बुक issue केले' ही
मुळात 'बुक issue केले' ही टर्म ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी वापरायची आहे. ग्रंथालयात याला 'देवाण घेवाण' सेवा म्हणतात. त्यात ग्रंथालय कर्मचारी 'देवाण' करतात तर वाचकांच्या बाजूने ती 'घेवाण' असते. त्यामुळे वाचक हे कोणतेही पुस्तक 'Borrow' करतात 'Issue' नाही.
बरोबर सारेग.
बरोबर सारेग.
जन्म मृत्यू नोंदणी करतात तसं
जन्म मृत्यू नोंदणी करतात तसं मी पुस्तक विकत घेतलं किंवा रद्दीत दिलं किंवा कोणाला भेट म्हणून दिलं, मला भेट आलं तर त्याची कुठेतरी जाऊन नोंद करावी लागते तसं वाटलं.
वाचनालयातून आणलं ते नोंद करून आणणं गृहीत आहे. काही लोक नोंद न करता आणतात. त्यांच्यासाठी इथे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे, अशी सूचना पाहिली आहे.
माझ्या वडलांनी संग्रहालय
माझ्या वडलांनी संग्रहालय शास्त्राची पदव्युत्तर पदवी बडोदा इथे घेतली होती. तिथेच लायब्ररी सायन्स पण शिकवत होते. कारण भारतात आधुनिक ग्रंथालय सर्वात पहिल्यांदा सयाजीराव गायकवाड यांनी उभारले. त्याआधी भारतात ग्रंथ issue करणे ही पद्धत नव्हती.
ग्रंथालयातून पुस्तक बदलून
ग्रंथालयातून पुस्तक बदलून आणले .. मी तर असंच म्हणते.
माझ्या या विचारप्रक्रियेला
माझ्या या विचारप्रक्रियेला अभिप्राय लिहून पुढे नेण्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार.
येणाऱ्या अभिप्रायांचा प्रमुख कल असा आहे की ‘इश्यू’साठी नवा स्वतंत्र मराठी शब्द शोधण्याची गरजच कदाचित नाही. अनेकांच्या मते साधे ‘ग्रंथालयातून पुस्तक आणले’ हे वाक्य पुरेसे आहे, कारण पुस्तकाची नोंद, मुदत, सभासदत्व आणि परत करण्याची प्रक्रिया ही त्या संदर्भात आपोआप अध्याहृत मानली जाते.
भाषेतील तांत्रिक अचूकता आणि व्यवहारातील नैसर्गिकता यांच्यात या चर्चेत बहुतेकदा नैसर्गिकतेला प्राधान्य दिले गेले आहे जे मला पण पटते आहे.
प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधण्यापेक्षा संपूर्ण प्रसंग मराठीत कसा व्यक्त होतो, हे पाहणे अधिक योग्य. तांत्रिक अर्थाचा प्रत्येक सूक्ष्म भाग पकडणारा शब्द नेहमीच व्यवहारातील सर्वोत्तम शब्द असेल असे नाही.
‘नावावर आणले’ आणि ‘बदलून आणले’ हे शब्द शब्दकोशातून नव्हे, तर अनुभवातून आणि घरगुती व्यवहारातून आले आहेत हे आतापर्यंत आलेल्या अभिप्रायांतून समजले.
योग्य पर्याय शोधताना:
शब्दकोश,
तांत्रिक परिभाषा,
नवशब्दनिर्मिती
यांच्याइतकीच लोकांची प्रत्यक्ष बोलण्याची पद्धत महत्त्वाची आहे हे मान्य करावे लागेल.
‘ग्रंथालय’ आणि ‘वाचनालय’ यांतील भेद देखील या चर्चेतून समोर आला.
वाचनालय आणि ग्रंथालय एकच की वेगवेगळे? यावर विचार करता असे वाटते की पुस्तके आणली त्या जागेला ग्रंथालय म्हणायला हवे, काही ग्रंथालयांमधे वाचनायले देखील असतात पण ते दोन वेगळे विभाग आहेत हे पण लक्षात ठेवायला हवे.
सामान्य वापरात दोन्ही शब्द अनेकदा समानार्थी वापरले जातात; मात्र शब्दरचनेनुसार:
वाचनालय — वाचनासाठीची जागा.
ग्रंथालय — ग्रंथसंग्रह व त्याचे व्यवस्थापन.
चर्चेत समोर आलेले पर्याय:
ग्रंथालयातून पुस्तक आणले
वाचनालयातून पुस्तक आणले
ग्रंथालयातून पुस्तक घेतले
पुस्तक नावावर आणले
लायब्ररीतून नावावर आणले
माझ्या नावावर पुस्तक आणले
पुस्तक बदलून आणले
पुस्तक निवडून घेतले
पुस्तक शोधून घेतले
पुस्तक मागून घेतले
चर्चेचा माझ्यापुरता एक निष्कर्ष मी असा काढतोय की:
अभिप्रायांचे स्पष्ट बहुमत ‘नोंदून आणले’ या नव्या प्रयोगाच्या बाजूने नाही. बहुतेकांना तो अनावश्यकपणे प्रक्रियाकेंद्री, किंचित कृत्रिम आणि चुकीचा अर्थ सुचवू शकणारा वाटतो.
चर्चेतून समोर येणारे पर्याय:
मी आज ग्रंथालयातून एक पुस्तक आणले. (सर्वांत साधा आणि सार्वत्रिक पर्याय)
मी आज ग्रंथालयातून माझ्या नावावर एक पुस्तक आणले. (नोंदणीचा अर्थही हवा असल्यास )
आज वाचनात आलेली फेसबुक वरची
आज वाचनात आलेली फेसबुकवरची पोस्ट -
....book borrowed from an Australian public library nearly 150 years ago has finally been returned. The book, "Antiquities of Athens," published in 1858, was returned to the library in the seaside town of Kiama last week by a man who found it during home renovations, tucked inside a tea chest bricked into a sealed fireplace.
According to Kiama Library manager Michelle Hudson, the late return fine for the book would amount to approximately Rs 18.7 lakh (28,000 Australian dollars), accounting for inflation. The fine was calculated based on the British three-pence-a-week overdue fee printed inside the book's cover, along with the rules in place when the library opened in 1872.
पुढील पूर्ण बातमीमध्येही कुठेही ' इश्यू ' असा उल्लेख नाही, फक्त ' borrowed ' हाच शब्द वापरला आहे. ' इश्यू ' हा शब्द नंतर रूढ झाला असावा. पुस्तक ' borrow ' करण्याचे नियम त्या वेळीही स्पष्ट असत.
मी तरी कुणी ग्रंथालयातून
मी तरी कुणी ग्रंथालयातून पुस्तक आणणे यासाठी इंग्रजी बोलतानाही "issue" ही टर्म वापरल्याचे ऐकले/वाचले नाही.
वरती सारेग यांची पोस्ट आहे ती केव्हा टर्म केव्हा आणि कोण वापरू शकतं/वापरत असेल. ते मला पटले.