भस्मबीज - भाग २
पूर्वभाग
अभिजितला स्वप्नात दिसलेले गूढ चिन्ह आणि राखेचा वास प्रत्यक्ष आयुष्यातही जाणवू लागल्याने तो मानसिक द्वंद्वात अडकतो. ऑफिसमध्ये नेहाच्या आकर्षणाला तो ठामपणे नकार देत आपल्या वैवाहिक नात्याशी प्रामाणिक राहतो, पण यानाशी संबंधित गूढ चिन्हाचा शोध घेताना त्याला त्याच्या स्वप्नातील भैरवेश्वर आणि मोहिनी शिखरे प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे धक्कादायक सत्य समजते. दरम्यान, १९९३ मध्ये यानाच्या जंगलात मल्ली सूडाच्या प्रतिज्ञेसह एका भयावह तांत्रिक विधीची सुरुवात करतो, ज्यातून एका अंधाऱ्या शक्तीचा जन्म होण्याची चाहूल लागते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग ३ - शापित तिथी
रात्रीचे बरोबर ३:१३ वाजले होते. अभिजित अचानक जागा झाला. त्याचा श्वास अजूनही विस्कळीत होता. छातीत धडधड सुरू होती. ते स्वप्न पुन्हा पडले होते... पण यावेळी ते आधीच्या स्वप्नांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.
जणू तो स्वतःच्या शरीरात नव्हताच. शरीर दुसऱ्याच कोणाचे तरी होते आणि अभिजित त्याच्या डोळ्यांतून सगळं अनुभवत होता.
पायाखाली बर्फासारखे थंड दगड होते. हवेत राखेचा उग्र वास दाटून राहिला होता. समोर संपूर्ण अंगावर राख फासलेला एक माणूस पद्मासनात निश्चल बसला होता. त्याचे ओठ संथ लयीत मंत्रोच्चार करत होते. त्या मंत्रांमध्ये एक विलक्षण कंपन होतं; जणू प्रत्येक अक्षर हवेत तरंगत त्याच्या भोवती घुमत होतं. शब्द स्पष्ट ऐकू येत होते, पण त्यांचा अर्थ मात्र त्याच्या आकलनाच्या पलीकडे होता.
अभिजितची नजर त्या माणसाच्या चेहऱ्यावर स्थिरावली. त्या चेहऱ्यावर अमर्याद दुःख होते... आणि त्याच दुःखाच्या तळाशी धगधगणारा संताप.
तो चेहरा स्पष्ट दिसणार इतक्यात दृश्य अचानक तुटलं.
अभिजित दचकून उठून बसला. त्याचा श्वास अजूनही वेगाने चालला होता. कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या आणि अंग पूर्ण भिजलं होतं. काही क्षण तो नुसताच आजूबाजूला पाहत बसला. खोलीत अजब शांतता होती. भिंतीवरील घड्याळाची टिकटिकही त्या शांततेत अस्वस्थपणे घुमत होती.
तेवढ्यात त्याची नजर बेडच्या शेजारच्या फरशीवर गेली. आणि त्याच्या अंगातून थंडगार शिरशिरी गेली. फरशीवर राखेची एक बारीक रेघ उमटली होती. जणू कोणीतरी राख लागलेल्या ओल्या बोटाने फरशीवरून अलगद हात फिरवत तिथून पुढे गेलं होतं.
अभिजित हळूहळू खाली वाकला. क्षणभर त्याला वाटलं, अजूनही स्वप्नाचा परिणाम असेल. त्याने डोळे चोळले. पुन्हा पाहिलं. रेघ तिथेच होती.
तो बराच वेळ निःशब्द तिच्याकडे पाहत राहिला.
आता त्याच्या मनात कोणतीही शंका उरली नव्हती. हे केवळ स्वप्न नव्हतं. कोणीतरी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.
************************************************************************************************************************
पुढचे दोन दिवस अभिजितने ई-मेलचा इनबॉक्स कितीतरी वेळा उघडून पाहिला. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर... दुपारच्या जेवणाच्या सुटीत... घरी आल्यावर... अगदी झोपण्यापूर्वीही. देवप्पाकडून कोणतंच उत्तर नव्हतं. एकदा तर त्याच्या मनात स्वतःच्याच अपेक्षेची कीव आली.
"मी तरी काय अपेक्षा करत होतो? तीस वर्षांपूर्वी संशोधन करणाऱ्या एका माणसाला ई-मेल पाठवला... आणि तो लगेच उत्तर देईल?"
बहुधा तो ई-मेल आयडी आता अस्तित्वातही नसेल किंवा देवप्पा या जगातच नसेल. तरीही त्याच्या मनातून एक गोष्ट काही केल्या जात नव्हती. ई-मेलमधले ते दोन शब्द "मोहिनीची सावली."
ते शब्द जितके साधे वाटत होते, तितकेच गूढ होते. तो पुन्हा पुन्हा त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता.
मोहिनी... म्हणजे विष्णूचा मोहिनी अवतार? एखादी स्त्री? की एखाद्या गुप्त पंथाचं सांकेतिक नाव?
प्रत्येक शक्यतेमागे नवे प्रश्न उभे राहत होते. उत्तर मात्र मिळत नव्हतं. शेवटी त्याने लॅपटॉप बंद केला. उत्तराची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता.
"उत्तरं मिळाली नाहीत... तर ती शोधावी लागतील." तो स्वतःशीच म्हणाला.
************************************************************************************************************************
रविवारची सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली होती.
अथर्वने हॉलमध्ये फुटबॉल आणून ठेवला होता. भिंतीवर दोन उशा टेकवून त्याने गोलपोस्ट तयार केला होता. तो कधी ड्रिबलिंग करत होता, तर कधी भिंतीवर चेंडू मारून स्वतःच पास घेत होता.
"अथर्व! घरात फुटबॉल नको!" स्वातीने स्वयंपाकघरातून आवाज दिला.
"फक्त पाच मिनिटं!"
तेवढ्यात जोरात मारलेला चेंडू अनन्याच्या खोलीत जाऊन आदळला. क्षणभरात अनन्या दारात उभी राहिली. एका हातात फुटबॉल, दुसऱ्या हातात छोटा ब्लूटूथ स्पीकर.
"तुला किती वेळा सांगितलंय माझ्या खोलीत बॉल मारू नको म्हणून?"
"अगं, चुकून गेला."
"कालही चुकून... परवाही चुकून... तुझ्या आयुष्यात सगळंच चुकून होतं का?"
"अगं दीदी दे ना बॉल."
"नाही."
"दीदीSSS!"
"आधी सॉरी म्हण."
"कशाला? मुद्दाम नाही मारला."
"म्हणूनच तर म्हण. मुद्दाम असतं तर मी बॉलचे दोन तुकडे केले असते."
अथर्वने त्रासिक चेहऱ्याने आईकडे पाहिलं.
"आई... बघ ना!"
स्वाती बाहेर आली.
"अनन्या, दे त्याला बॉल."
"आधी याला सांग घरात फुटबॉल खेळायचा नाही."
"तुम्ही दोघं रविवारची सुरुवात भांडणानेच करणार का?" स्वाती म्हणाली.
तेवढ्यात अभिजितने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. "अथर्व, खाली मैदानात जा. आणि अनन्या, त्याला बॉल दे."
अनन्याने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग नाखुशीने फुटबॉल त्याच्याकडे फेकला.
"सॉरी," अथर्व पुटपुटला.
"ऐकू आलं नाही."
"सॉरी!"
अनन्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. "चल... यावेळी माफ केलं."
अथर्व बॉल उचलून बाहेर पळाला. अनन्याही डोकं हलवत आपल्या खोलीत परत गेली.
घरात पुन्हा नेहमीची शांतता पसरली.
स्वाती स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत होती. अनन्याच्या खोलीतून पुन्हा मंद संगीत ऐकू येत होतं. अथर्वच्या पायाने जिन्यात फुटबॉल उडवल्याचा आवाज दूर जात होता.
सगळं काही नेहमीसारखंच होतं. फक्त अभिजितच्या मनात मात्र काल रात्रीचं स्वप्न अजूनही जिवंत होतं.
यावेळी गुहा पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट दिसली होती. भिंतीवर कोरलेली चिन्हं...राखेचा उग्र वास...आणि काळोखातून उमटलेला तोच स्त्रीस्वर.
"तो जागा होतोय..."
आता त्या आवाजापेक्षा एकच प्रश्न त्याला जास्त अस्वस्थ करत होता. "तो... म्हणजे कोण?"
नाश्ता करताना स्वातीने त्याच्याकडे पाहिलं. "बरं वाटतंय ना तुला?" त्याच्याकडे निरखून बघत विचारलं. "आजकाल खूप वेगळा दिसतोयस."
अभिजितने तिच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, "काही नाही गं... ऑफिसचं काम जरा वाढलंय. त्याचाच ताण असेल."
"फक्त कामाचा ताण असता, तर मी काही विचारलं नसतं." स्वातीचा आवाज अजूनही शांत होता. "तू रात्री नीट झोपत नाहीस. दोन-तीन वेळा दचकून उठतोस. सकाळीही कुठेतरी हरवलेला वाटतोस."
अभिजित काही बोलला नाही.
"काही प्रॉब्लेम असेल तर सांग. सगळं एकट्याने पेलायची गरज नाही."
त्याने फक्त मान हलवली. "खरंच काही नाही."
स्वातीने पुढे काही विचारलं नाही.
दुपारपर्यंत स्वाती मुलांना घेऊन तिच्या मावशीकडे गेली.
घरात शांतता पसरली. अभिजितने पडदे ओढले. टेबलावर लॅपटॉप ठेवला. कॉफीचा मग बाजूला ठेवत त्याने एक वही उघडली. पहिल्या पानावर त्याने लिहिलं "याना." खाली दुसरी ओळ "अर्धचंद्र + १३" तिसरी "मोहिनीची सावली" मग तो काही क्षण त्या तीन शब्दांकडे पाहत राहिला. हे तीन धागे एकमेकांशी जोडलेले आहेत, याची त्याला खात्री होती. पण कसे?
त्याने जिल्हा वृत्तपत्र कार्यालयाच्या डिजिटल आर्काइव्हमध्ये शिरण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला साइट नीट उघडेचना. जुनी, संथ वेबसाइट, सर्व्हर वारंवार टाइमआउट होत होता. अर्धा तास झगडल्यावर कुठेतरी लॉगिन मिळालं.
सुरुवातीला त्याने त्या बेपत्ता ट्रेकरबद्दल शोध घेतला. काही मिनिटांतच एक बातमी सापडली. स्थानिक पोलिसांच्या शोधमोहीमेनंतर ती ट्रेकर दुसऱ्या दिवशी जंगलाच्या आतील भागात बेशुद्धावस्थेत सापडल्याचं त्यात नमूद होतं. त्यापुढे काही विशेष नव्हतं.
अभिजित ती लिंक बंद करणार, इतक्यात खाली दिसणाऱ्या संबंधित बातम्यांच्या यादीत त्याचं लक्ष एका शीर्षकाकडे गेलं.
#उत्तर कन्नड बेपत्ता स्त्री
त्याने त्यावर क्लिक केलं.
स्क्रीनवर भरमसाठ निकाल दिसू लागले. चोऱ्या, अपघात, आत्महत्या, राजकीय घडामोडी... शोधशब्दांशी फारसा संबंध नसलेल्या असंख्य बातम्या.
तो संयमाने एकेक शीर्षक चाळत राहिला.
अचानक त्याची नजर एका छोट्याशा हेडलाईनवर स्थिरावली.
"Yana Woman Missing" ऑगस्ट २०२३.
बातमी अवघी पाच-सहा ओळींची होती.
याना गावाजवळच्या सिरसी येथील अठ्ठावीस वर्षीय एका महिलेच्या बेपत्ता होण्याची नोंद त्यात होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवल्याचा उल्लेख होता. काही आठवडे स्थानिक वर्तमानपत्रांत तिच्या शोधाबद्दल अधूनमधून बातम्या छापल्या गेल्या होत्या... आणि मग शांतता. पुढे मृतदेह, कुठलाही ठोस पुरावा यापैकी काहीच सापडलं नाही.
अभिजितने ती बातमी पुन्हा वाचली. नाव - सुजाता. गाव सिरसी. बेपत्ता झाल्याची तारीख नोंदवली होती, पण नेमकी कोणत्या दिवशी हे स्पष्ट नव्हतं.
त्याने सर्च बॉक्समध्ये आता नवे शब्द टाइप केले. "Yana missing woman", "Yana near missing", "Yana woman disappeared"
निकाल हळूहळू उघडू लागले.
बातमी २०२० सालची, ऑक्टोबर महिन्यातली. रोहिणी. वय बत्तीस. याच परिसरातून बेपत्ता
२०१८, जून महिन्यातली. एक शिक्षिका, स्थानिक शाळेत काम करणारी. नाव विजया. हिचीही बातमी जवळजवळ त्याच पद्धतीची संध्याकाळी घराबाहेर पडली, परत आलीच नाही.
अभिजितने प्रत्येक बातमी उघडून तारीख, नाव, वय एका कोऱ्या कागदावर उतरवून घेतलं. हाताने लिहिताना त्याला विचित्र समाधान वाटत होतं जणू स्क्रीनवरच्या अक्षरांपेक्षा कागदावरचे शब्द अधिक खरे, अधिक ठोस वाटत होते.
वर्षांमधले अंतर कधी दोन वर्षांचे, तर कधी तीन वर्षांचे होते. काही घटना काही महिन्यांनी पुढे-मागे घडल्या होत्या. त्यात कोणताही स्पष्ट किंवा नियमित क्रम दिसत नव्हता.
अभिजित बराच वेळ स्क्रीनकडे पाहत विचार करत बसला.
नक्की काय जुळतंय यात?
महिने वेगवेगळे होते; जून, ऑगस्ट, ऑक्टोबर. वर्षेही वेगवेगळी होती. तरीही या सर्व घटनांमध्ये काहीतरी समान धागा असल्याची त्याची खात्री अधिकाधिक दृढ होत चालली होती.
गेल्या काही वर्षांत याना परिसरात घडलेल्या या घटना कुणीही एकत्रितपणे पाहिल्या नव्हत्या. प्रत्येक प्रकरण स्वतंत्र मानले गेले, त्याचा तपास स्वतंत्रपणे झाला आणि पुरावे न मिळाल्याने ते बंद करण्यात आले. एका प्रकरणाचा दुसऱ्याशी काही संबंध असू शकतो, असा विचारही कोणाच्या मनात आला नव्हता. कुठे "जंगली प्राण्याचा हल्ला असावा," असे म्हटले होते; कुठे "वाट चुकून दरीत पडली असावी," असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; तर एका प्रकरणात "पुरेसे पुरावे न मिळाल्याने चौकशी बंद करण्यात आली," एवढ्यावरच तपास थांबला होता.
अभिजितच्या मनात मात्र वेगळीच शंका आकार घेत होती. या घटना खरोखरच असंबद्ध होत्या, की त्या असंबद्ध वाटाव्यात म्हणून त्यांना तशाच ठेवण्यात आले होते? त्याला क्षणभर वाटले, जणू कुणीतरी मुद्दाम या सगळ्या घटना एकमेकांपासून तोडून, वेगवेगळ्या फाईल्समध्ये बंद करून एकमेकांपासून तोडून, विखुरून ठेवल्या गेल्या होत्या.
************************************************************************************************************************
अभिजित जवळजवळ तासभर त्या नोंदींकडे पाहत बसला होता. प्रत्येक तारीख, प्रत्येक गाव, प्रत्येक बातमी तो पुन्हा पुन्हा तपासत होता. तरीही त्याला त्या घटनांना जोडणारा नेमका धागा सापडत नव्हता. तो विचारांच्या गर्तेत हरवला असतानाच अचानक त्याच्या मनात एक शक्यता चमकून गेली.
त्याने लगेच ब्राउझरमध्ये पंचांग उघडलं. सर्वप्रथम सुजाता बेपत्ता झाल्याची तारीख कॅलेंडरमध्ये टाकली.
स्क्रीनवर उत्तर दिसलं. अधिक मास अमावस्या.
त्याचा श्वास क्षणभर थांबला. त्याने घाईघाईने दुसरी नोंद उघडली. रोहिणी.
तिची बेपत्ता झाल्याची तारीख टाकली. पुन्हा तेच उत्तर. अधिक मास अमावस्या.
त्याने तिसरी नोंद उघडली. विजया. तिची तारीख तपासली. स्क्रीनवर पुन्हा तेच दोन शब्द उमटले. अधिक मास अमावस्या.
अभिजितच्या हातांना आता स्पष्टपणे कंप सुटला होता. त्याने लॅपटॉप बाजूला सरकवला, खुर्चीतून उठला आणि खोलीत येरझाऱ्या घालू लागला. काही क्षणांनी तो पुन्हा खुर्चीत येऊन बसला. त्याची नजर स्क्रीनवर खिळली होती.
हा योगायोग असूच शकत नव्हता.
तीन वेगवेगळ्या वर्षांत घडलेल्या तीन घटना...आणि तिन्ही वेळा तीच तिथी. अधिक मास अमावस्या.
इतक्या दुर्मिळ जुळणीकडे केवळ नशिबाचा खेळ म्हणून पाहणं अशक्य होतं.
यामागे कोणीतरी ठरवून काम करत होतं...की एखादी गोष्ट त्या विशिष्ट रात्रीच घडत होती?
अभिजितने शोध थांबवला नाही. आता तो अधिक पद्धतशीरपणे काम करू लागला. त्याने आधी गेल्या अनेक दशकांतील सर्व अधिक मास अमावस्यांच्या तारखा शोधून काढल्या आणि मग प्रत्येक तारखेच्या आसपासच्या स्थानिक वृत्तपत्रांच्या नोंदी तपासू लागला.
आणि हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं. प्रत्येक काही वर्षांनी, त्याच तिथीच्या आसपास, एका स्त्रीच्या बेपत्ता होण्याची नोंद सापडत होती.
२०१५ जुलै महिन्यात. अधिक मास अमावस्येच्या दिवशी एक स्त्री बेपत्ता.
२०१२ सप्टेंबर. पुन्हा तीच घटना.
२०१० मे. एक स्त्री बेपत्ता.
२००७ जून. आणखी एक बेपत्ता स्त्री.
२००४ ऑगस्ट. तीच पुनरावृत्ती.
२००१ ऑक्टोबर. एका जुन्या वृत्तपत्राच्या छोट्याशा रकान्यात एक वाक्य त्याच्या नजरेस पडलं , "पहिली संशयास्पद बेपत्ता घटना." म्हणजे त्या काळातही कोणाच्यातरी लक्षात हा विचित्र योग आला होता; पण पुढे त्याचा पाठपुरावा झाला नव्हता.
१९९९ जून.
१९९६ जुलै.
आणि सर्वांत जुनी नोंद...१९९३ सप्टेंबर. ही बातमी तर जवळजवळ काळाच्या पडद्याआड गेली होती. अवघ्या एका ओळीत नोंदवली गेली होती. नावही पूर्ण नव्हतं. फक्त इतकंच स्पष्ट होतं की त्या दिवशी आणखी एक स्त्री बेपत्ता झाली होती.
अभिजितने सर्व तारखा एका कागदावर उतरवल्या. १९९३ ते २०२३, एकतीस वर्षांचा कालपट.
बारा बेपत्ता स्त्रिया आणि प्रत्येक प्रकरणात एकच समान धागा...अधिक मास अमावस्या.
अभिजित खुर्चीत मागे रेलला. छतावरील पंखा नेहमीच्या वेगाने फिरत होता, तरी त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते.
त्याच्या मनात आता कोणतीही शंका उरली नव्हती. हा योगायोग नव्हता. कोणीतरी प्रत्येक अधिक मास अमावस्येला एका स्त्रीची निवड करत होतं.
बराच वेळ तो तसाच बसून राहिला, समोरच्या यादीकडे बघत. मग त्याने फोन उचलला आणि निशिकांतला फोन लावला.
"बोल अभिजित." निशिकांतचा आवाज नेहमीसारखा सहज होता, पण अभिजितच्या आवाजातला ताण त्याला लगेच जाणवला असावा.
"निशिकांत, जरा वेळ आहे का?"
"हो बोल, काय झालं? आवाज विचित्र वाटतोय."
अभिजितने दीर्घ श्वास घेतला आणि मग एकामागोमाग सगळं सांगायला सुरुवात केली; स्वप्नं, त्यातली गुहा, तो आवाज, अर्धचंद्र आणि तेराचं चिन्ह, आणि आता ही यादी बारा स्त्रिया, एकतीस वर्षं, आणि प्रत्येक वेळी तीच पंचांगीय तिथी.
पलीकडे बराच वेळ शांतता राहिली.
"अभिजित..." निशिकांत शेवटी म्हणाला, आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती. "हे थोडं जास्तच होतंय असं वाटत नाही का तुला? म्हणजे, स्वप्नं एक गोष्ट आहे. पण आता तू एकतीस वर्षांच्या पोलीस रेकॉर्ड्समधून पॅटर्न शोधतोयस?"
"मला माहित आहे हे कसं वाटतंय निशिकांत. पण बघ मी काही बनवत नाहीये हे. या खऱ्या बातम्या आहेत, खऱ्या तारखा आहेत. आणि त्या सगळ्या एका विशिष्ट दिवशीच जुळतायत. हे मी बनवलेलं नाही."
"ठीक आहे, मान्य, विचित्र आहे हे. पण याचा अर्थ काय होतो? की कुणीतरी, कसलातरी विधी करतंय? हे जरा... सिनेमॅटिक नाही का वाटत तुला?"
"वाटतं. मलाही वाटतं. पण मग हे स्वप्नं का पडतायत मला? आणि घरात राखेचा वास का येतो, जो फक्त मलाच जाणवतो?"
निशिकांत काही क्षण गप्प राहिला.
"डॉक्टरकडे परत जा एकदा. कदाचित न्यूरोलॉजिस्टला भेट. हे जे काही आहे, मानसिक ताणातून येणारे भास असू शकतात, त्याहून वेगळं काही असेलच असं नाही."
"आणि पॅटर्न? तो कसा समजावशील?"
"कदाचित तू तो पॅटर्न शोधतोयस म्हणून सापडतोय. मानवी मन असंच असतं अभिजित: आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागलो, की आपोआप त्याला पुष्टी देणारे पुरावे सापडायला लागतात. याला confirmation bias म्हणतात."
अभिजितने डोळे मिटले. निशिकांतचं म्हणणं चुकीचं नव्हतं तर्कशुद्ध होतं, वाजवी होतं. पण त्याच्या मनात एक खोल, अनाम खात्री होती की हे इतकं सोपं स्पष्टीकरण नाही.
"असेल कदाचित तसं," तो शेवटी म्हणाला, वाद घालण्याची इच्छा नव्हती त्याची. "बघतो."
"स्वातीला सांगितलंस का हे सगळं?"
"नाही अजून."
"सांग तिला. एकट्याने हे सगळं डोक्यात घेऊन फिरणं बरोबर नाही."
फोन ठेवल्यानंतर अभिजित बराच वेळ निःशब्द बसून राहिला. निशिकांतचे शब्द अजूनही त्याच्या डोक्यात घुमत होते; confirmation bias, मानसिक ताण, योगायोग, भास. त्याने मांडलेला प्रत्येक मुद्दा तर्कशुद्ध होता. कोणताही निष्कर्ष काढण्याआधी पुरावे तपासावेत, हेच तर अभिजित स्वतः आयुष्यभर मानत आला होता.
पण मग त्याची नजर पुन्हा त्या यादीवर गेली.बारा तारखा, बारा नावं आणि प्रत्येक वेळी तीच पंचांगातील तिथी.
त्याने एकेक तारीख पुन्हा तपासली. एकदाच नाही, तर दोनदा. कुठे काही चूक झाली आहे का, हे पाहण्यासाठी त्याने वेगवेगळ्या पंचांगांच्या नोंदी पडताळून पाहिल्या.
निष्कर्ष बदलला नाही. प्रत्येक वेळी तीच तिथी अधिक मास अमावस्या.
अभिजितने खुर्चीत मागे रेलत दीर्घ श्वास घेतला.
जर हा फक्त confirmation bias असता, तर इतक्या वेगवेगळ्या वर्षांतील प्रत्येक घटना इतक्या अचूकपणे त्याच तिथीशी जुळली नसती.
त्याने पुन्हा पंचांगाची वेबसाइट उघडली. यावेळी त्याचा शोध वेगळा होता. पुढचा अधिक मास कधी येणार?
तो पानं उलटत गेला. महिने तपासत गेला. काही क्षणांनी स्क्रीनवर उत्तर दिसलं. जून २०२६.
त्याची नजर त्या तारखेवरच खिळून राहिली. आजपासून त्यासाठी जेमतेम काहीच महिने उरले होते.
तो उठला. स्वयंपाकघरात जाऊन ग्लासभर पाणी प्यायला. थंड पाणी घशाखाली उतरलं, पण मनातली अस्वस्थता तशीच राहिली.
तो पुन्हा टेबलापाशी येऊन बसला. त्याची नजर समोर पडलेल्या कागदावर गेली.
तो काही क्षण निर्विकारपणे त्या यादीकडे पाहत राहिला.
आणि नकळत, जवळजवळ स्वतःच्याही न कळत, त्याने त्या यादीखाली एक रिकामी रेष ओढली; जणू पुढच्या नावासाठी जागा राखून ठेवल्यासारखी. काही क्षण तो त्या रेषेकडे बघत राहिला. मग स्वतःच्याच त्या कृतीने तो दचकला. हे मी का केलं?
त्याने पटकन तो कागद बाजूला सारला, जणू तो कागद स्पर्श केल्यानेच काहीतरी अशुभ घडणार आहे. पण डोळे मिटले तरी ती रिकामी जागा त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हती. जणू ती जागा आधीच कुणासाठी तरी राखीव होती, आणि फक्त एक नाव लिहिलं जाण्याची वाट बघत होती.
************************************************************************************************************************
संध्याकाळी स्वाती मुलांना घेऊन घरी परतली, तेव्हा अभिजित हॉलमधल्या सोफ्यावर एकटाच बसला होता. त्याच्या हातात तोच कागद होता आणि त्याची नजर कुठेतरी शून्यात हरवली होती.
"अभिजित?"
स्वातीच्या आवाजाने तो दचकला. जणू तो खूप दूर कुठेतरी जाऊन परत आला होता.
"किती वेळ इथेच बसला आहेस?"
"काही नाही..." त्याने घाईघाईने उत्तर दिलं. "जरा काही नोंदी पाहत होतो."
स्वातीची नजर त्याच्या हातातल्या कागदावर गेली. ती तो वाचणार इतक्यात अभिजितने तो पटकन दुमडून बाजूला ठेवला.
स्वातीने ते पाहिलं.
"रविवारीसुद्धा ऑफिसचं काम?"
स्वाती त्याच्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिली. गेल्या काही दिवसांत त्याच्यात झालेला बदल तिच्या नजरेतून सुटला नव्हता. डोळ्यांखालची काळी वर्तुळं अधिक गडद झाली होती. चेहऱ्यावर सतत विचारांचं सावट होतं. तो घरात असूनही घरात नसल्यासारखा वागत होता.
तिने आणखी काही विचारलं नाही.
फक्त शांतपणे म्हणाली, "आज लवकर झोप. उद्या सोमवार आहे."
अभिजितने नुसतीच मान हलवली.
रात्र झाली. घरातले दिवे एकामागून एक बंद झाले. अथर्व आणि अनन्या झोपले. स्वातीही काही वेळात शांत झाली. पण अभिजितच्या डोळ्यांना झोप लागत नव्हती.
अंधारात छताकडे पाहत पडलेला असतानाही त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा तोच कागद येत होता.
शेवटच्या नावाखाली त्याने ओढलेली ती रिकामी रेघ...आणि तिच्याखाली उमटण्याची वाट पाहणारं एक अदृश्य नाव.
त्याच वेळी त्याच्या मनात आणखी एक गोष्ट अखंड घुमत होती.
जून २०२६.
ती तारीख आता फक्त कॅलेंडरवरची नोंद उरली नव्हती. ती उलट्या मोजणीची सुरुवात झाली होती.
थरारक..
थरारक..
खूप दिवस वाट पहावी लागली.
खूप दिवस वाट पहावी लागली.
मस्त चालू आहे.
जबरदस्त.....पुढचा भाग लवकर
जबरदस्त.....पुढचा भाग लवकर टाका.
नेहाचं काहीतरी कनेक्शन आहे का?
जबरदस्त
जबरदस्त
छान आहे हा भाग सुद्धा. पुढचा
छान आहे हा भाग सुद्धा. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
भारीच!
भारीच!
नेहाचं काहीतरी कनेक्शन आहे का?
>>>> मलाही असच वाटतय . फक्त ती काहीतरी मदत करेल हे गूढ सोडवायला, असं वाटतं आहे
आवडते आहे.
आवडते आहे.
धन्यवाद धनवन्ती, केशवकूल,
धन्यवाद धनवन्ती, केशवकूल, ऋतुराज., किल्ली, माबो वाचक, आबा. आणि सामो!