भस्मबीज - भाग १
पूर्वभाग
अभिजितचा संसार वरून सुखी आणि सामान्य दिसत असला तरी त्याच्या आणि स्वातीच्या नात्यात भावनिक दुरावा निर्माण झालेला असतो. एका रात्री झालेल्या कटू संवादानंतर अभिजितला एका गूढ जंगल, काळ्या गुहे आणि अज्ञात स्त्रीस्वराचे भयानक स्वप्न पडते. दुसऱ्या दिवशी त्याला बातमीत दिसलेले उलटा अर्धचंद्र आणि ‘१३’ हे चिन्ह त्याच स्वप्नाशी जोडलेले वाटते. पुढील रात्री स्वप्न अधिक स्पष्ट होत जाते आणि एका रहस्यमय आकृतीचा सामना होण्याआधीच त्याची झोप उडते. मात्र यावेळी तेच चिन्ह त्याच्या बेडरूमच्या खिडकीवर वास्तवात उमटलेले दिसते आणि त्याच्या आयुष्यातील अलौकिक रहस्याची खरी सुरुवात होते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २ - चिन्हाच्या शोधात
दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित बराच वेळ खिडकीसमोर शांतपणे उभा राहिला होता. त्याचे डोळे काचेवर खिळले होते. काल रात्री ज्या ठिकाणी ते गूढ चिन्ह दिसले होते, तिथे आता फक्त नितळ काच होती. रात्रीचा तो थरार जणू हवेत विरून गेला होता.
बाहेर सूर्य उगवला होता आणि त्याचे कोवळे ऊन घरात पडले होते. नेहमीप्रमाणे घरामध्ये सकाळची लगबग सुरू झाली होती. स्वयंपाकघरातून स्वातीचा नाश्ता बनवण्याचा आणि भांड्यांचा आवाज येत होता. हॉलमध्ये अथर्व नेहमीप्रमाणे ऐनवेळी त्याची हरवलेली शाळेची बॅग शोधण्यासाठी धावपळ करत होता. सोफ्यावर बसलेली अनन्या एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन स्वतःच्याच विश्वात हरवली होती.
वरवर पाहता सगळं काही अगदी नेहमीसारखं सुरू होतं. पण अभिजितच्या मनातील अस्वस्थता काही कमी होत नव्हती. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न सतत फिरत होता…काल रात्री नक्की काय घडलं होतं? तो केवळ एक भास होता की त्यामागे काहीतरी भयंकर सत्य दडलं होतं?
ऑफिसमध्ये पोहोचल्यावर अभिजितने कसलाही विचार न करता स्वतःला कामात झोकून दिले. रोजच्या फाईल्स आणि ईमेलच्या चक्रात त्याने मन गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे लक्ष लागत नव्हते.
दारावर टकटक असा हलकासा आवाज झाला, आणि अभिजितने वर पाहण्याआधीच केबिनच्या उघड्या दारातून परफ्यूमचा एक गोड, मंद सुवास आत आला.
"सर?"
अभिजितने दचकून डोळे स्क्रीनवरून हटवले.
नेहा कुलकर्णी दारात उभी होती. नेहमीपेक्षा ती जरा वेगळी दिसत होती. आज तिचा पेहराव नेहमीपेक्षा किंचित निवांत आणि सुटसुटीत होता. तिने केस मोकळे सोडले होते. तिच्या चालण्या-बोलण्यात एक सहज, बिनधास्त ऐट होती, जी ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांमध्ये फारशी पाहायला मिळत नसे.
"मी आत येऊ?" तिने हसून विचारले.
"हो... हो. या ना." अभिजितने स्वतःला सावरत म्हटले.
ती आत आली आणि त्याच्या टेबलाच्या समोर असलेल्या खुर्चीत जरा जास्तच सहजतेने बसली.
नेहा कंपनीच्या स्ट्रॅटेजी टीममध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. गेल्या सहा महिन्यांपासून ती अभिजितच्या प्रोजेक्टवर त्याच्यासोबत जोडली गेली होती. ती प्रचंड हुशार आणि महत्त्वाकांक्षी तर होतीच, पण स्वतःच्या आत्मविश्वासाबद्दल तिला कोणताही संकोच नव्हता. ऑफिसमधल्या इतर सहकाऱ्यांपेक्षा तिची वागण्याची पद्धत वेगळी होती. ती अतिशय मोकळेपणाने बोलायची, संवाद साधताना तिच्या डोळ्यांत एक खोडकर चमक असायची, आणि पुरुष सहकाऱ्यांशी वागताना कोणतीही औपचारिकता किंवा अंतर ठेवण्याची तिला फारशी गरज वाटत नसे.
"हे क्लायंट प्रेझेंटेशन."
तिने फाईल त्याच्या दिशेने पुढे केली. पण ती देताना तिचा हात क्षणभर अभिजितच्या हातावर टेकला. तो केवळ एक अपघाती स्पर्श होता की मुद्दाम केलेला सहज प्रयत्न, हे अभिजितला तातडीने ठरवता आले नाही.
"संध्याकाळच्या मीटिंगपूर्वी एकदा बघून घ्याल का?" तिने विचारले.
"ठेवा इथे." तो फाईल स्वतःकडे घेत म्हणाला.
अभिजितने फाईलची पाने चाळायला सुरुवात केली खरी, पण त्याचे पूर्ण लक्ष त्या कागदपत्रांवर नव्हते. काल रात्रीचे ते भयानक स्वप्न अजूनही त्याच्या डोक्यातून जत नव्हते.
नेहाच्या तीक्ष्ण नजरेने त्याची ही चलबिचल ओळखली असावी. काही मिनिटांची शांतता सरल्यावर ती खुर्चीत जरा पुढे झुकली आणि अत्यंत संथ आवाजात म्हणाली, "सर, सगळं ठीक आहे ना?"
अभिजितने फाईलवरून नजर हटवून वर पाहिले. "का? काय झालं?"
"आज तुम्ही थोडे वेगळे दिसताय."
"म्हणजे?" त्याने प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.
"माहित नाही." ती किंचित हसली आणि तिने तिच्या केसांची एक मोकळी बट अलगदपणे कानामागे सारली. "असं वाटतंय जणू तुम्ही शरीराने इथे आहात... पण मनाने मात्र कुठेतरी लांब निघून गेला आहात."
तिचे हे अनपेक्षित वाक्य ऐकून अभिजितच्या चेहऱ्यावर नकळत एक उपरोधिक हसू उमटले. "खूप बारीक निरीक्षण करता तुम्ही."
"फक्त तुमच्याबाबतीत जरा जास्त." ती डोळे मिचकावत, थेट त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हणाली.
तिच्या या अनपेक्षित उत्तरावर काय बोलावे, हे क्षणभर अभिजितला सुचलेच नाही. तो निरुत्तर झाला. नेहाने त्याची ती अस्वस्थता बरोबर हेरली आणि ती मनातल्या मनात खट्याळपणे हसली. त्याला असे गोंधळलेल्या आणि अस्वस्थ स्थितीत बघण्यातच जणू तिला एक वेगळी मजा येत होती.
केबिनमध्ये काही क्षण कमालीची शांतता पसरली. अभिजितने समोर असलेली फाईल हळूच बंद केली.
"नेहा..."
"हं?" ती टेबलाकडे आणखी जरा जास्त झुकली. अभिजितचे पुढचे वाक्य काहीतरी विशेष किंवा वैयक्तिक असेल, अशी उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
"तुम्हाला कधी असं वाटतं का, की एखादं स्वप्न हे केवळ स्वप्न नसून खूप खरं असतं?"
नेहा त्याच्याकडे रोखून पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचे ते मघाचे खोडकर हसू एकाएकी मावळले आणि त्याची जागा एका वेगळ्याच, गंभीर उत्सुकतेने घेतली.
"काय झालं सर? काय पाहिलं तुम्ही?" तिने विचारले.
तिचा तो बदललेला रोख पाहून अभिजितने लगेच स्वतःला मागे ओढले. "काही नाही... काही विशेष नाही." तो खुर्चीला मागे टेकून म्हणाला, "सोडून द्या तो विषय."
************************************************************************************************************************
दुपारच्या जेवणानंतर अभिजितला स्वतःचाच तीव्र राग आला. आपण नेहाला हे सगळे का विचारत होतो, याचे त्यालाच नवल वाटले. ती त्याची केवळ एक कार्यालयीन सहकारी होती, कोणतीही जवळची मैत्रीण नव्हती. मग तिच्यासमोर आपल्या मनातील अस्वस्थता उघड करण्याची काय गरज होती?
तरीही, स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहताना त्याला एक गोष्ट मान्य करावीच लागत होती. गेल्या काही महिन्यांत अनेकदा असे प्रसंग घडले होते, जेव्हा नेहा आजूबाजूला असली की त्याच्या मनात एक वेगळीच जाणीव तरळून जायची. ती बोलताना मुद्दाम जवळ येऊन उभी राहते, संभाषण चालू असताना आपली नजर रोखून धरते, हे त्याला स्पष्टपणे जाणवत असे. आणि नेमकी हीच जाणीव त्याला आतून अस्वस्थ करून सोडायची. ती निव्वळ एक अनामिक ओढ होती, जिच्याकडे दुर्लक्ष करणे त्याला दिवसेंदिवस कठीण जात होते आणि नेमकी हीच गोष्ट त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अत्यंत धोकादायक होती.
संध्याकाळ होता होता ऑफिस रिकामे व्हायला लागले. बाहेर आभाळात पावसाचे काळे ढग दाटून आले होते, त्यामुळे केबिनमध्ये लवकरच अंधारल्यासारखे झाले. नेहा निघताना नेहमीप्रमाणे त्याच्या केबिनजवळ येऊन थांबली. आज तिने तिचा फॉर्मल ब्लेझर काढून हातावर घेतला होता. दारात उभी राहून तिने एका हाताने दरवाजाची `चौकट पकडली आणि स्वतःच्या शरीराचा तोल किंचित पुढे झुकवला.
"सर, मी निघते आता," तिने निरोप घेतला.
"ठीक आहे," अभिजितने फाईलवरून नजर न हटवता उत्तर दिले.
ती दोन पावले पुढे निघून गेली. पण पुन्हा काहीतरी आठवल्यासारखी मागे वळली. तिच्या ओठांवर तेच नेहमीचे खट्याळ हसू होते.
"एक सांगू?"
"हं, सांगा," अभिजितने तिच्याकडे पाहिले.
"तुम्ही स्वतःची फारशी काळजी घेत नाही," ती क्षणभर थांबली. तिची तीक्ष्ण नजर त्याच्या चेहऱ्यावरून अजिबात हलली नाही. "तुमची काळजी घेणारं कुणीतरी असायला हवं, नाही का?"
तिचा तो थेट रोख पाहून अभिजितच्या ओठांवर एक हसू उमटले, पण त्या हसण्यामागे त्याचे अवघडलेपण स्पष्ट लपलेले होते. "हे आता तुमचं काही नवीन HR निरीक्षण आहे का?" त्याने वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला.
"नाही," तीही हसली. तिच्या आवाजात एक मुरब्बी सूर होता. "हे फक्त माझं वैयक्तिक निरीक्षण आहे."
एवढे बोलून ती मागे वळली आणि चालू लागली. जाता जाता तिने पुन्हा एकदा मान वळवून त्याच्याकडे पाहिले आणि ती कॉरिडॉरच्या वळणावर अंधारात गडप झाली.
घरी परतताना अभिजितच्या डोक्यात नेहाचे ते शब्द आणि तिची ती नजर सतत फिरत होती. कारण हे पहिल्यांदाच घडत नव्हते. यापूर्वीही अनेकदा असे प्रसंग आले होते आणि प्रत्येक वेळी त्याला एका गोष्टीची जाणीव तीव्रतेने व्हायची. नेहाचे ते वागणे निव्वळ सहज किंवा आकस्मिक नव्हते. त्यामागे एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. एक अनामिक, हलकेसे आमंत्रण, जे तिने शब्दांत कधीच मांडले नव्हते; पण तिच्या नजरेत, फाईल देताना झालेल्या स्पर्शात आणि उभे राहताना अंतर कमी करण्याच्या तिच्या विशिष्ट पद्धतीत ते सतत जाणवत राहायचे.
आणि आज त्याला एका सत्याची जाणीव झाली; त्याला नेहाच्या त्या आमंत्रणाची मुळीच भुरळ पडत नव्हती, असे नव्हते. भुरळ पडत होती, शरीराच्या पातळीवर ती नक्कीच जाणवत होती. पण भुरळ पडणे आणि त्या आकर्षणाच्या आहारी जाऊन स्वतःला वाहू देणे, यात त्याने स्वतःसाठी एक अतिशय स्पष्ट सीमारेषा आखलेली होती. आजवर त्याने ती रेषा ओलांडली नव्हती आणि ती ओलांडण्याचा त्याचा विचारही नव्हता.
खरेतर, त्याला त्याच्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याही स्त्रीची गरज नव्हती. त्याला गरज होती ती केवळ त्याच्या स्वतःच्याच आयुष्यातून कुठेतरी हरवून गेलेल्या एका भावनेची.
ती भावना म्हणजे जवळीक. एकमेकांना पूर्णपणे समजून घेणे. त्याला केवळ शरीराचा स्पर्श नको होता... त्याला हवा होता मनाचा संपूर्ण स्वीकार.
************************************************************************************************************************
त्या रात्री घरी आल्यानंतर स्वातीने त्याला गरम चहा दिला. हॉलमध्ये बसल्यावर अथर्व त्याच्या शाळेच्या क्रिकेट टीममधील निवडीबद्दल अत्यंत उत्साहाने, न थांबता बोलत होता. बाजूला बसलेली अनन्या तिच्या नुकत्याच झालेल्या कॉलेजच्या टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांबद्दल सांगत होती. नेहमीप्रमाणे घर त्याच्याच नेहमीच्या लयीत होते.
पण आज अभिजितला आतून एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे जाणवली; दिवसभरात ऑफिसमध्ये नेहाच्या निमित्ताने मोहाचे जे काही क्षण समोर आले होते, त्यातून तो स्वतःवर नियंत्रण ठेवून सुखरूप बाहेर पडला होता. स्वतःच्या मर्यादा न ओलांडल्याचे एक विचित्र समाधान त्याला मनातल्या मनात वाटत होते.
रात्री जेवण आवरून खोलीत झोपायला जाताना स्वातीने त्याच्याकडे पाहत सहज विचारले, "काय विचार करतोयस?"
"काही नाही ग," अभिजितने नेहमीसारखे उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला.
"खोटं बोलू नकोस," ती किंचित हसली. "काहीतरी नक्की सुरू आहे डोक्यात, तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतंय."
तिला वाटले, त्या रात्री कदाचित ती जरा जास्तच बोलली होती. कारण तिला माहीत होतं, अभिजितचा प्रश्न केवळ शरीराचा नव्हता. गेल्या काही वर्षांत त्याने तक्रारी, भांडणं, मागण्या कमी केल्या होत्या. पण त्याच्या डोळ्यांत कधी कधी दिसणारा तो रिकामेपणा मात्र वाढत चालला होता. तिला त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं.
अभिजित त्यावर काहीतरी उत्तर देणार, इतक्यात अचानक घराचे दिवे गेले. संपूर्ण खोली एका क्षणात घनदाट अंधारात बुडाली. अचानक झालेल्या या अंधारामुळे काही क्षण दोघेही शांत राहिले.
आणि अगदी त्याच शांततेत... अभिजितच्या नाकाला एक मंद, सूक्ष्म वास आला.
तो वास जळलेल्या राखेचा होता. त्या वासाने अभिजितच्या अंगावर काटा आला आणि तो खाटेवर एकदम ताठ उठून बसला. त्याच्या शरीरातील प्रत्येक स्नायू ताणला गेला.
"काय झालं?" त्याच्या हालचालीने स्वातीने घाबरून विचारले.
"तुला... तुला काही वास येतोय का?" अभिजितचा आवाज किंचित कापला.
"नाही तर, कसला वास?"
"राखेसारखा... जळलेल्या राखेचा वास येतोय."
"अभिजित, तू ठीक आहेस ना? काय होतंय तुला?" स्वातीच्या आवाजात आता काळजी स्पष्ट जाणवू लागली होती.
तो तिच्या प्रश्नाला उत्तर देणार, इतक्यात खोलीच्या अगदी कोपऱ्यात दाटलेला अंधार क्षणभर हलल्यासारखा, सुळसुळल्यासारखा वाटला. ते केवळ एका नगण्य क्षणासाठी घडले.
पण नेमक्या त्याच एका क्षणात त्याला आतून अत्यंत तीव्रतेने जाणवले की तो त्या खोलीत एकटा नव्हता. खोलीच्या त्या कोपऱ्यातून कुणीतरी अंधाराच्या गर्भातून अतिशय शांतपणे आणि संयमाने केवळ त्याची वाट पाहत असल्यासारखं अत्यंत रोखून त्याच्याकडे पाहत होते.
रात्री उशिरापर्यंत अभिजितला झोप लागत नव्हती. तो अंथरुणावर पडून छताकडे पाहत राहिला. खोलीतला तो गर्द अंधार पुन्हा पुन्हा त्याला त्या भयानक क्षणाची आठवण करून देत होता.
तो जळलेल्या राखेचा मंद वास आणि त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून कोणीतरी आपल्याकडे रोखून पाहत असल्याची ती स्पष्ट, थरकाप उडवणारी जाणीव त्याच्या मनातून जात नव्हती.
सकाळी उठल्यावर त्याने आरशासमोर उभे राहून स्वतःला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ऑफिसचा सततचा ताण, कामाचे वाढलेले तास, लागोपाठ मिळणारी अपुरी झोप आणि त्या स्वप्नांचा हा एकत्रित मानसिक परिणाम असावा, असे त्याने मनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे अंतर्मन हे सगळे निव्वळ भास मानयाला अजिबात तयार नव्हते.
ऑफिसमध्ये पोहोचल्यावर, नेहमीच्या कामाला हात घालण्यापूर्वी त्याने एक गोष्ट करण्याचे पक्के ठरवले. काल रात्री काचेवर दिसलेल्या त्या गूढ चिन्हाचा शोध घ्यायचा.
त्या चिन्हाचा आकार, उलटा अर्धचंद्र आणि त्यापुढे १३ हा आकडा (☾ १३).
त्याने गूगलवर शोध सुरू केला. जुने वेब फोरम्स, पुरातत्त्वाशी संबंधित संकेतस्थळे, कर्नाटकातील लोककथांचे ब्लॉग्स... एक-एक करत त्याने अनेक पानांचा धांडोळा घेतला. काही तास उलटून गेले, पण सुरुवातीला त्याला ठोस असे काहीच सापडले नाही.
दुपारच्या सुमारास, शोध घेता घेता एका अगदी जुन्या ब्लॉगवजा पानावर त्याचे डोळे स्थिरावले. तिथे एक विचित्र, संक्षिप्त उल्लेख होता:
"याना परिसरातील दुर्गम भागातील काही स्थानिक लोक उलटा अर्धचंद्र आणि तेरा हा आकडा अत्यंत अशुभ मानतात. जुन्या जाणत्या लोकांच्या मते, या चिन्हाचा थेट संबंध 'मोहिनीच्या सावली'शी जोडला जातो."
तो ब्लॉग कित्येक वर्षे जुना होता आणि त्यावर लिहिणाऱ्या लेखकाचे नावही कुठे नमूद नव्हते. पाना च्या शेवटी संपर्क साधण्यासाठी फक्त एक जुना ईमेल आयडी दिला होता
devappa.yaana@...
तो आयडी वाचून अभिजितचा श्वास क्षणभर छातीतच अडकला. मनात एक अनामिक भीती आणि उत्सुकता एकाच वेळी दाटून आली. त्याने कसलाही विचार न करता लगेच स्वतःचा ईमेल इनबॉक्स उघडला आणि त्या पत्त्यावर एक संक्षिप्त मेल टाईप केला:
"मला याना आणि या चिन्हाबद्दल सविस्तर माहिती हवी आहे."
त्याने स्क्रीनवरील 'सेंड' बटण दाबले. ईमेल रवाना झाला. आता तात्पुरता हा विषय संपला आहे असे स्वतःला सांगत, त्याने लॅपटॉपवर ऑफिसच्या रोजच्या कामाची फाईल उघडली आणि तो कामाला लागला.
काही तासांनंतर, एका क्षणी त्याचा हात कीबोर्डवरून नकळत ब्राउझरच्या सर्च बारकडे वळला.
त्याने दोन शब्द टाईप केले "Yana Karnataka".
काही सेकंदांत स्क्रीनवर सर्च रिझल्ट्सची रांग लागली. अभिजितने एकामागून एक फोटो उघडायला सुरुवात केली. हिरव्यागार जंगलाच्या पार्श्वभूमीवर उभी असलेली ती अजस्त्र रूपे समोर येत गेली आणि अचानक त्याची बोटे माऊसवरच गोठली. तो जागच्या जागी थबकला.
स्क्रीनवर दिसणारे ते अवाढव्य काळे शिखर पाहून त्याच्या छातीत धडधड वाढली. हे तेच होते. हुबेहूब त्याच्या स्वप्नात आलेले तेच भयानक शिखर.
आकाशाकडे झेपावणारा तो प्रचंड, टोकदार काळा खडक आणि त्याच्या तळाशी अंधारात गडप झालेली ती गूढ गुहा.
त्याने फोटोखाली दिलेले नाव वाचले 'भैरवेश्वर शिखर'.
कापऱ्या हाताने त्याने बाजूचा दुसरा फोटो उघडला. त्या चित्रात भैरवेश्वरच्या शेजारी उभे असलेले दुसरे, थोडे लहान पण तितकेच गूढ शिखर दिसत होते. खाली नाव होते 'मोहिनी शिखर'.
अभिजित डोळे विस्फारून काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. तो कधीच कर्नाटकातील याना भागात गेला नव्हता. त्याने कधी या शिखरांचे फोटोही पाहिले नव्हते. जर या वास्तूशी त्याचा कधी संबंधच आला नव्हता, तर मग त्याच्या स्वप्नात ही दोन्ही शिखरे इतकी अचूक, जशीच्या तशी कशी दिसली?
************************************************************************************************************************
साधारण तेहत्तीस वर्षांपूर्वी, १६ सप्टेंबर १९९३. कर्नाटक. यानाचे घनदाट जंगल.
त्या रात्री आकाशात चंद्र नव्हता. संपूर्ण जंगल गडद काळोखात बुडाले होते. चंद्रहीन आकाशाखाली वाऱ्याच्या तीव्र झोतांमुळे काळीभोर, अवाढव्य झाडे एखाद्या भुताटकीसारखी इकडेतिकडे हलत होती. जंगलाच्या शांततेत पानांची सळसळ भीती वाढवत होती. या भयानक वातावरणात, यानाच्या त्या अवाढव्य भैरवेश्वर शिखराच्या पायथ्याशी एक अरुंद, लपलेली गुहा होती. त्या गुहेच्या आत काही दगडी समया लावलेल्या होत्या, ज्यांचा फिकट, पिवळसर प्रकाश आतल्या खडकांवर लुकलुकत होता.
गुहेच्या मध्यभागी जमिनीवर जळलेल्या राखेचे एक विशाल, अचूक वर्तुळ काढलेले होते. त्या वर्तुळाच्या अगदी केंद्रस्थानी मल्ली डोळे मिटून संथपणे बसला होता. त्याच्या संपूर्ण अंगाला जळलेल्या राखेचा दाट थर माखलेला होता. त्याचे ओठ हलत होते आणि त्यातून एक मंद, अनामिक मंत्राचा उच्चार बाहेर पडत होता.
त्याच्या समोर जमिनीवर एक जुने, मातीचे भांडे ठेवले होते. त्या भांड्यात काळसर रंगाची राख भरलेली होती. पण ती सामान्य राख नव्हती; जणू काही ती राख जिवंत असल्यासारखी भांड्यामध्ये आतल्या आत हलत होती, थरथरत होती. मल्लीचा मंत्रोच्चार जसा वाढला, तसे अचानक त्या गुहेच्या आतील तापमान कमालीचे घसरले. आत गोठवणारी थंडी पसरली. समयांच्या जळणाऱ्या ज्योती कोणत्याही वाऱ्याविना एकाच वेळी एका बाजूला वाकल्या.
त्याच क्षणी मल्लीने आपले डोळे उघडले. त्याच्या समोरचा प्रकाश नाहीसा होऊन तिथे अचानक दाट अंधार गोळा होऊ लागला. जणू आजूबाजूच्या सगळ्या सावल्या एकत्र येऊन समोर एक गूढ आकार धारण करत होत्या.
त्या दाट सावलीतून एक अस्पष्ट, थरकाप उडवणारी कुजबुज त्याच्या कानात घुमली,
"आणखी बारा..."
तो आवाज ऐकून मल्लिकार्जुनचा चेहरा कमालीचा कठोर झाला. त्याच्या चेहऱ्यावरील रेषन् रेषा ताणली गेली. तो अत्यंत ठाम आवाजात म्हणाला, "मी माझे वचन नक्की पूर्ण करीन."
"सूड..."
अंधारातून तोच अनामिक आवाज पुन्हा एकदा गुहेच्या भिंतींवर आदळला. तो शब्द ऐकताच, क्षणार्धासाठी मल्लीच्या डोळ्यांसमोर चंद्रिकाचा चेहरा चमकून गेला. आधी तो चेहरा नेहमीसारखा हसरा, निर्मळ आणि निष्पाप दिसला... पण पुढच्याच क्षणात तो रक्ताने पूर्णपणे माखलेला, छिन्नविछिन्न झालेला दिसला.
त्या भयावह दृश्याने मल्लीच्या डोळ्यांत भयंकर संताप आणि सूडाचा डोंब उसळला. त्याने रागाच्या भरात आपली मूठ घट्ट आवळली. "त्या नराधमांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली नाही," तो दात ओठ खात म्हणाला.
त्याच्या या संतापावर त्या अंधारातून एक विकृत, अंगावर काटा आणणारे हास्य घुमले.
"मिळेल..."
तो आवाज विरतो न विरतो, तोच समोर ठेवलेल्या मातीच्या भांड्यातील त्या जिवंत राखेमधून धुराची एक काळी, गडद रेघ वर उठली. ती रेघ हवेत नागमोडी वळणे घेत सरळ पुढे आली आणि एका झटक्यात मल्लीच्या छातीत आत शिरली.
त्या काळ्या धुराचा शरीरात प्रवेश होताच, क्षणभर मल्लीचे संपूर्ण शरीर एखाद्या विजेचा धक्का बसावा तसे तीव्रतेने थरथरले. त्याच्या हातावरच्या आणि गळ्यावरच्या निळ्या शिरा एकाएकी गडद काळ्या रंगाच्या होऊन त्वचेवर स्पष्ट दिसू लागल्या. त्याची नखे काळी पडली.
आणि मग, काही सेकंदांतच गुहेतली ती हालचाल थांबली. सगळं काही पूर्ववत, शांत झाले.
मल्लीच्या सूडाच्या प्रवासातील पहिली अमावस्या आज पूर्ण झाली होती.
दुसरा भागही एकदम छान, मस्त.
दुसरा भागही एकदम छान, मस्त.
पुढचा भाग लवकर येऊ दे. धीर धरवत नाही.
अमानवीय शक्तीची भन्नाट कथा,
अमानवीय शक्तीची भन्नाट कथा,
खतरनाक!
खतरनाक!
नेहाला पहिल्यांदा अरे तुरे, मग अहो जाहो !
पुढचा भाग लवकर येऊ दे. धीर धरवत नाही > +१
खरंच याना कर्नाटक मध्ये आहे.
खरंच याना कर्नाटक मध्ये आहे. मी गुगल करून बघितलं.
धन्यवाद माबो वाचक, केशवकूल,
धन्यवाद माबो वाचक, केशवकूल, आबा. आणि सोनाली ०४.
नेहाला पहिल्यांदा अरे तुरे, मग अहो जाहो ! >> बदल केला, आबा.
खरंच याना कर्नाटक मध्ये आहे. मी गुगल करून बघितलं.>>>
हो, खरंच याना कर्नाटक मध्ये आहे. भस्मासुराने शिवाकडून मिळालेल्या वराचा वापर करून स्वतः शिवाचाच अंत करण्याचा प्रयत्न केला. शिवाचा बचाव करण्यासाठी विष्णूंनी 'मोहिनी' रूप धारण केले आणि भस्मासुराला नृत्याचे आव्हान दिले. मोहिनीची हुबेहूब नक्कल करताना भस्मासुराने नकळत स्वतःचा हात स्वतःच्याच डोक्यावर ठेवला आणि तो तिथेच जळून भस्म झाला. या दहनाच्या प्रचंड उष्णतेमुळे येथील खडक काळे पडले, अशी मान्यता आहे. या गुहांमधील दोन मुख्य शिखरांना 'भैरवेश्वर' (शिव) आणि 'मोहिनी' शिखर अशी नावे याच कथेवरून मिळाली आहेत.
रोचक आहे
रोचक आहे
अमानवीय शक्तीची कथा आणि तुमची।लेखन शैली
चांगले कॉम्बो
मस्त झालेत दोन्ही भाग
मस्त झालेत दोन्ही भाग
पु भा प्र
हा भाग देखील जबरदस्त. पुढचा
हा भाग देखील जबरदस्त. पुढचा भाग लवकर टाका.
भन्नाट शैली आहे लिखाणाची.
छान लिहीताय. मी क्रमशः वाल्या
छान लिहीताय. मी क्रमशः वाल्या गोष्टी शक्यतो वाचत नाही, जेव्हा त्या पूर्ण होतात तेव्हा वाचायला सुरुवात करते. पण तुमची गोष्ट वाचतेय. आशा आहे की पूर्ण कराल,
(कारण मायबोली वर अशा अर्धवट राहिलेल्या गोष्टीं बऱ्याच आहेत. मग चिडचिड होते)
धन्यवाद झकासराव, किल्ली,
धन्यवाद झकासराव, किल्ली, ऋतुराज., धनुडी!
कारण मायबोली वर अशा अर्धवट
कारण मायबोली वर अशा अर्धवट राहिलेल्या गोष्टीं बऱ्याच आहेत. मग चिडचिड होते>>> @धनुडी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. याबाबतीत आपण समदुःखी आहोत. संघर्ष या कथेच्या पुढच्या भागाची मी ८ वर्षांपासून वाट बघतोय.
कोण लेखक आहे संघर्ष कथेचा?
कोण लेखक आहे संघर्ष कथेचा?
संघर्ष कथा
संघर्ष कथा
https://www.maayboli.com/node/67044