भस्मबीज - भाग ३
पूर्वभाग
अभिजितला पुन्हा एक भयावह स्वप्न पडते आणि जाग आल्यावर घरात राखेची रेघ दिसल्याने त्याची खात्री पटते की ही केवळ स्वप्ने नसून कोणीतरी त्याच्याशी संपर्क साधत आहे. याना परिसरातील जुन्या नोंदींचा शोध घेताना त्याला ३१ वर्षांत प्रत्येक अधिक मास अमावस्येला एक स्त्री रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याचा धक्कादायक पॅटर्न सापडतो. निशिकांत त्याला हा केवळ confirmation bias असू शकतो असे समजावण्याचा प्रयत्न करतो, पण अभिजितच्या मनातील शंका अधिकच दृढ होते. पुढील अधिक मास अमावस्या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याचे समजताच, एखाद्या नव्या बळीची वेळ जवळ आल्याची भीती त्याच्या मनात घर करते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग ४ - देवप्पा
तीन दिवसांनी, ऑफिसमधून घरी परतत असताना अभिजितच्या फोनवर एक ई-मेल नोटिफिकेशन चमकलं.
From: Devappa
तोच ई-मेल होता.
प्रेषकाचा पत्ता पाहताच त्याचं हृदय अक्षरशः धडधडू लागलं. devappa.yaana@...
मजकूर अगदी थोडकाच होता. जुन्या पद्धतीच्या, मोडक्यातोडक्या इंग्रजीत लिहिलेला.
What you are asking cannot be told over phone or email. If you are truly seeing those dreams, then very little time is left. Come to Yana. Meet me. Come alone.
खाली नाव होतं.
- Devappa
अभिजित बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिला. मग त्याने पुन्हा ई-मेल वाचला. प्रत्येक वेळी त्याची नजर त्याच एका वाक्यावर जाऊन थांबत होती.
"Very little time is left."
देवप्पाला त्याच्या स्वप्नांबद्दल कसं माहीत होतं? आणि त्याहूनही महत्त्वाचं...वेळ कोणासाठी संपत चालला होता?
पुढच्याच शुक्रवारी त्याने ऑफिसमध्ये तीन दिवसांची रजा टाकली. पण रजेचा अर्ज भरता भरता त्याच्या मनात एक नवाच प्रश्न उभा राहिला; तिथे पोहोचल्यावर करायचं काय? कन्नड त्याला अजिबात येत नव्हती, आणि दुर्गम खेड्यांत हिंदी किंवा इंग्रजी किती जणांना समजेल, याचीही शाश्वती नव्हती.
हा विचार डोक्यात घोळत असतानाच केबिनबाहेरून जाणारी नेहा त्याला दिसली. त्याने जवळजवळ नकळत तिला हाक मारली.
"नेहा, एक मिनिट."
ती आत आली. "बोला सर."
"तुम्हाला कन्नड येते ना? मागे एकदा बोलला होतात, बंगळुरूला मोठं झालात म्हणून."
"हो सर, अगदी अस्खलित बोलता येते, बऱ्यापैकी लिहिता-वाचता सुद्धा येते. का?"
अभिजित काही क्षण शब्द शोधत राहिला.
"मला एका वैयक्तिक कामासाठी उत्तर कन्नडमध्ये जावं लागणार आहे. याना गावाजवळचा भाग आहे. तिथे भाषेची थोडी अडचण येईल असं वाटतंय."
नेहाच्या भुवया किंचित उंचावल्या. "अचानक? काय काम आहे असं?"
"वैयक्तिक आहे थोडं." तो टाळाटाळ करत म्हणाला. “कोणी ओळखीचे असेल तर सांगा ज्याला कन्नड आणि मराठी किंवा इंग्लिश येते.”
ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली, " तसं कुणी ओळखीचं नाही." मग खांदे उडवत हसली. "पण , मग मीच येऊ का सोबत?"
"नाही नाही, तशी गरज नाही..."
"सर, प्रामाणिकपणे सांगायचं तर गेल्या काही आठवड्यांपासून तुम्ही विचित्र वागताय. झोप कमी झाली आहे, सतत कसल्यातरी विचारात हरवलेले असता, त्या विचित्र स्वप्नांमुळेही तुम्ही अस्वस्थ आहात... मला खरंच तुमची काळजी वाटतेय आणि माझं आजोळ कुमठ्याचं आहे, यानापासून जवळच. निमित्तही होईल आजीकडे जाऊन यायला." ती म्हणाली, आवाजात यावेळी खट्याळपणापेक्षा काळजी अधिक होती.
अभिजित काही क्षण गप्प राहिला. तिच्या डोळ्यांत जी काळजी दिसत होती, ती निव्वळ सहकाऱ्याची नव्हती हे त्याला जाणवत होतं, आणि तेच त्याला सर्वांत जास्त अस्वस्थ करत होतं. पण भाषेचा प्रश्न खरा होता.
"ठीक आहे," तो शेवटी म्हणाला. "पण फक्त भाषांतरासाठी."
"मान्य आहे, सर." ती हसली.
************************************************************************************************************************
रात्री घरी परतल्यावर जेवण आटोपल्यावर अभिजितने सहजच विषय काढला. "पुढच्या आठवड्यात तीन दिवसांसाठी कर्नाटकला जावं लागणार आहे."
स्वातीने सिंकमध्ये ठेवलेलं ताट धुवायचं थांबवलं, "असं एकदम अचानक?"
"ऑफिसचं काम आहे थोडं, पण ऑफिसमधली एक सहकारी सोबत येणार आहे. तिला कन्नड चांगलं येतं. तिकडे भाषेची खूप मदत होईल."
स्वाती काही क्षण शांत राहिली.
" ऑफिसमधली सहकारी... म्हणजे बाई?"
"बाई आहे. नेहा नाव आहे तिचं. काळजी करण्यासारखं काही नाही; तिचं आजोळ तिकडेच आहे, ती आजीकडे जाणारे, मी माझं काम बघेन."
स्वातीने त्याच्याकडे काही क्षण निरखून पाहिलं. इतक्या वर्षांच्या संसारात अभिजितच्या स्वभावाबद्दल तिच्या मनात कधीच शंका आली नव्हती. तरीही, एका अनोळखी स्त्रीसोबत तो काही दिवस बाहेर जाणार होता. मनाच्या एखाद्या कोपऱ्यात स्त्रीसुलभ अस्वस्थता उमटणं स्वाभाविकच होतं. तिने ती भावना चेहऱ्यावर येऊ दिली नाही.
"ठीक आहे," ती शांतपणे म्हणाली. "पण रोज फोन कर. आणि कुठे पोहोचलास, काय चाललंय, ते कळवत जा."
"नक्की."
त्या रात्री दिवे बंद झाल्यावर दोघेही बराच वेळ शांत पडून राहिले. काही वेळाने त्याला स्वाती हलकेच त्याच्याकडे सरकल्याची जाणीव झाली. तिने अलगद त्याच्या छातीवर हात ठेवला आणि डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. अभिजित क्षणभर स्तब्ध झाला, त्या स्पर्शावर विश्वासच बसेना. त्याने हळूच तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि घट्ट धरला जणू हा क्षण कुठेतरी निसटून जाईल अशी भीती वाटत होती.
"काळजी घे," ती हळू आवाजात पुटपुटली, झोपेच्या धुंदीत जवळजवळ.
"घेईन." तो म्हणाला, आवाज दाटून आला होता.
बराच वेळ तो तसाच जागा राहिला, तिच्या श्वासांची लय जाणवत, तिच्या हाताची ऊब अंगावर घेत. इतक्या महिन्यांच्या अंतरानंतर हा एक साधा स्पर्शही त्याला किती मोलाचा वाटत होता, हे त्याच्या मनाला चटका लावून गेलं आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या अनिश्चित प्रवासाला सामोरं जाण्याचं बळ त्या स्पर्शाने त्याला दिलं.
************************************************************************************************************************
शुक्रवारी पहाटे अभिजितने नेहाला तिच्या सोसायटीमधून पिकअप केले. नेहा साध्या, प्रवासाला साजेशा कपड्यांत होती. निळी जीन्स, फिकट राखाडी टी-शर्ट, पायात स्पोर्ट्स शूज आणि केस पोनीटेलमध्ये बांधलेले. पहाटेचा अंधुक प्रकाश असूनही तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह लपून राहत नव्हता.
"तयार सर?" ती सीटबेल्ट लावत हसत म्हणाली.
"हो." अभिजितने इंजिन सुरू केलं.
मुंबई मागे पडत गेली आणि महामार्गावर गाडी वेगाने धावू लागली. सुरुवातीचे काही तास दोघेही फारसं बोलले नाहीत. रेडिओवर मंद गाणी सुरू होती. अभिजितचं लक्ष रस्त्यावर होतं, तर नेहा खिडकीबाहेर सरकणारा निसर्ग पाहत बसली होती.
दुपार जवळ येताच वातावरण थोडं मोकळं झालं. सकाळी चहासाठी ते शिरवळला थांबले होते त्यानंतर जेवणासाठी ते थेट बेळगावलाच थांबले.
जेवताना नेहा तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगू लागली. कुमठ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुट्ट्या, आजीच्या अंगणातलं फणसाचं झाड, आंब्याच्या बागा, आणि आजीच्या हातच्या आंबे सुक्केची चव.
अभिजित तिचं बोलणं ऐकत होता, पण त्याचं मन वारंवार देवप्पाच्या ई-मेलकडे आणि त्या एका वाक्याकडे परत जात होतं, "Very little time is left."
"सर..."
नेहाच्या आवाजाने तो भानावर आला.
"आज रात्री कुठे थांबायचं ठरवलंय?"
अभिजितने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. "खरं सांगायचं तर... विचारच केला नाही."
"एक पर्याय आहे."
"कोणता?"
"माझ्या आजीचं घर कुमठ्याला आहे. यानापासून साधारण तासाभराच्या अंतरावर. आज तिथे मुक्काम करू. उद्या सकाळी निवांत देवप्पांना भेटायला जाऊ."
अभिजितने काही उत्तर दिलं नाही.
नेहाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या मनातला संकोच तिला लगेच जाणवला.
"सर, विश्वास ठेवा. आजीचं घर मोठं आहे. पाहुण्यांसाठी वेगळी खोली आहे. तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र राहाल." ती खट्याळपणे हसली.
तिच्यासोबत तिच्या घरी मुक्काम करणं त्याला सहज वाटत नव्हतं. अभिजितच्या मनात एक क्षणभर संकोच दाटून आला. तिच्यासोबत, तिच्या घरी, रात्र काढणं हे त्याच्या मनातल्या त्या काटेकोर सीमारेषेच्या अगदी जवळ जाणारं वाटलं. पण नकार द्यायला सबळ कारणही सापडेना.
"ठीक आहे," तो म्हणाला, आवाजात संकोच स्पष्ट जाणवत होता.
************************************************************************************************************************
सूर्य मावळतीकडे झुकत असताना त्यांची गाडी कुमठ्यात शिरली.
हवेत समुद्राचा खारट गंध दरवळत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेले नारळ आणि सुपारीचे उंच वृक्ष संध्याकाळच्या वाऱ्यावर हलकेच डोलत होते.
नेहाच्या सांगण्याप्रमाणे गाडी एका शांत गल्लीत जुन्या प्रशस्त, नारळाच्या झाडांनी वेढलेल्या घरासमोर थांबली. मुख्य दरवाज्याजवळ पितळी अक्षरांत कानडी आणि त्याखाली इंग्लिश अशी एक पाटी लावलेली होती 'भागवत निवास'.
लाल कौलारू छप्पर, रुंद ओटा, अंगणात तुळशीवृंदावन आणि आजूबाजूला नारळाच्या झाडांनी वेढलेलं ते घर जुन्या कोकणातील श्रीमंतीची साक्ष देत उभं होतं.
दार उघडताच एक कृश, पण चैतन्याने भरलेली वृद्धा बाहेर आली. वय ऐंशीच्या आसपास असावं; केस पूर्ण पांढरे झाले होते, चालण्यात अजूनही चपळाई होती. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, मात्र डोळ्यांतील तेज अजूनही तसंच होतं. नेहाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलला.
"अगं नेहा!"
तिने पुढे येत नातीला घट्ट मिठी मारली. "किती वर्षांनी आलीस गं! एक फोन तरी करायचा होता."
"सरप्राईज द्यायचं होतं ना." नेहा हसत म्हणाली.
मग तिने अभिजितकडे वळून ओळख करून दिली.
"आजी, हे अभिजित सर. माझ्या ऑफिसमध्ये आहेत. एका कामासाठी इकडे आलेत. मी म्हटलं, आधी तुझ्याकडेच थांबू."
वृद्धेने हसतमुखाने हात जोडले. अभिजितनेही नमस्कार केला.
"तुम्हाला मराठी इतकी छान येते?"
आजी हसली, "आम्ही कर्हाडे ब्राह्मण. घरात आजही मराठीच बोलतो. बाहेर व्यवहारासाठी कन्नड लागतं, पण घरातली भाषा अजून बदलली नाही."
त्या घरात पाऊल टाकताच अभिजितला दिवसभराचा प्रवासाचा थकवा थोडा हलका झाल्यासारखा वाटला.
************************************************************************************************************************
रात्रीचं जेवण आटोपल्यावर आजी नेहमीप्रमाणे लवकर झोपायला गेली. घरात शांतता पसरली.
नेहा आणि अभिजित घराच्या मागच्या अंगणात आले. नारळाच्या झाडांच्या सावलीत ठेवलेल्या जुन्या लाकडी बाकावर दोघे बसले. आकाश निरभ्र होतं. असंख्य चांदण्या लखलखत होत्या, आणि दूरवरून समुद्राच्या लाटांची संथ गाज रात्रीच्या शांततेत मिसळत होती.
अभिजितने खोल श्वास घेतला. "किती विलक्षण शांतता आहे इथे."
"हो." नेहा हलकंसं हसली. "लहानपणी इथे आले की मला वाटायचं, जग इथूनच सुरू होतं... आणि इथेच संपतं."
काही क्षण दोघेही शांत बसून राहिले.
मग नेहा हळू आवाजात म्हणाली, "सर... एक विचारू?"
"विचारा."
"तुम्ही खरंच ठीक आहात ना?"
अभिजितने तिच्याकडे पाहिलं.
"म्हणजे... गेल्या काही दिवसांत जे काही घडतंय... ती स्वप्नं, हा अचानकचा प्रवास... तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घेताय असं वाटतं." तिच्या आवाजात काळजी होती.
क्षणभर अभिजितच्या मनात आलं तिला सगळं सांगावं. देवप्पाचा ई-मेल, बेपत्ता स्त्रियांचा नमुना, अधिक मासाच्या अमावस्या, आणि त्या स्वप्नांमधला राखेनं माखलेला माणूस...पण पुढच्याच क्षणी त्याने तो विचार झटकून टाकला.
"उद्या देवप्पांना भेटलो की कदाचित सगळ्याची उत्तरं मिळतील."
नेहाने त्याच्याकडे बराच वेळ बघितलं, अंधारातही तिच्या डोळ्यांतली आर्तता त्याला जाणवत होती. तिने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला.
"तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, सर. मी हे आधीही म्हटलंय."
तो स्पर्श साधा होता, पण अभिजितच्या शरीरात एक विचित्र उब पसरली. रात्रीचा एकांत, समुद्राची गाज, नेहाचा तो प्रामाणिक स्वर सगळं मिळून एक असं वातावरण तयार झालं होतं, ज्यात मन बहकणं अगदी सोपं झालं असतं.
काही क्षण तो तसाच बसून राहिला, तिच्या हाताच्या उबेची जाणीव ठेवत. मग क्षणभर त्याला काल रात्रीची स्वातीच्या हाताची ऊब आठवली. त्याने हळूच आपला हात मागे घेतला.
"थँक्स नेहा. पण मला वाटतं आता झोपायला हवं. उद्या महत्त्वाचा दिवस आहे."
नेहाच्या चेहऱ्यावर एक क्षणभर निराशेची छटा उमटली, पण तिने ती लगेच लपवली. "हो, बरोबर आहे. गुड नाईट सर."
"गुड नाईट."
तो उठून आपल्या खोलीकडे निघाला, पण मनात एक विचित्र संघर्ष घेऊन; तिच्या जवळिकीची ओढ नाकारता येत नव्हती, पण ती ओढ आणि त्याप्रती वाहवत जाणं यातली सीमारेषा त्याने कधीच ओलांडली नव्हती, आणि आजही तो ती ओलांडणार नव्हता.
खोलीत एकटा पडल्यावर तो बराच वेळ छताकडे बघत राहिला. स्वातीचा चेहरा आठवला, मुलं आठवली, आणि मनातला तो अपराधीपणाचा एक बारीक काटा त्याला बोचत राहिला. जरी त्याने काहीच "चुकीचं" केलं नव्हतं, तरी तिथवर पोहोचणं शक्य होतं, हे मान्य करणंच त्याला अस्वस्थ करत होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही लवकर उठले. आंघोळ, नाश्ता आटोपून त्यांनी निघायची तयारी केली. आजीने दोघांसाठी डब्यात थोडा नाश्ता बांधून दिला.
"परत यायला उशीर करू नका," ती म्हणाली. "काम झालं तर संध्याकाळपर्यंत परत या."
"हो आजी," नेहा हसत म्हणाली. "जास्त वेळ लागला तर फोन करते."
आजीने दोघांकडे आलटून-पालटून पाहिलं. "काळजी घ्या, दोघांनीही."
ते गाडीत बसले आणि यानाच्या दिशेने निघाले.
कुमठा मागे पडताच रस्ता हळूहळू समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाऊन पश्चिम घाटाच्या दिशेने वळू लागला. दोन्ही बाजूंनी दाट जंगल, उंच सुपारी आणि नारळाच्या बागा दिसू लागल्या. पुढे डोंगर चढायला सुरुवात होताच रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा झाला. अधूनमधून धुक्याचे हलके पडदे समोर येत होते, तर दरीतून पक्ष्यांचे आवाज घुमत होते. जसजसे ते यानाच्या जवळ पोहोचू लागले, तसतसे आजूबाजूचे उंच काळसर कातळ आणि दाट वनराई पाहून अभिजितला जाणवलं तो आता एका वेगळ्याच, गूढ जगात प्रवेश करत होता.
सुमारे तासाभराने ते याना गावात पोहोचले. रस्त्याच्या कडेला एक छोटी चहाची टपरी होती. अभिजितने गाडी तिथेच थांबवली.
नेहा टपरीजवळ गेली आणि कन्नडमध्ये विचारलं,"देवप्पा एल्लिरुत्तारे? (देवप्पा कुठे राहतात)?"
'देवप्पा' हे नाव ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात विरलं. त्याने दोघांकडे एकदा निरखून पाहिलं. मग मंद आवाजात कन्नडमध्ये काहीतरी म्हणाला. नेहाच्या चेहऱ्यावरचे भावही क्षणभर बदलले.
"काय म्हणतोय?" अभिजितने विचारलं.
नेहाने त्याच्याकडे पाहिलं.
"म्हणतोय... 'त्यांच्या नादी लागू नका.'"
"पुढे?"
नेहाने पुन्हा टपरीवाल्याकडे पाहिलं. तो हाताने गावाच्या टोकाकडे इशारा करत म्हणाला, "त्या वाटेने सरळ डोंगराकडे जा. जुन्या देवळाजवळ गावातलं शेवटचं घर आहे."
त्याच्या आवाजातला संकोच आणि डोळ्यांतली भीती अभिजितच्या नजरेतून सुटली नाही.
टपरीवाल्याने दाखवलेल्या दिशेने गाडी थोडं अंतर गेली. पुढे रस्ता संपला आणि अरुंद, दगडांनी भरलेली पायवाट सुरू झाली. गाडी तिथेच ठेवून अभिजित आणि नेहा पायी निघाले. काही मिनिटांच्या चढाईनंतर ते एका छोट्याशा, जुन्या शिवमंदिरापाशी पोहोचले. मंदिराच्या मागे कौलारू, साधंसं घर होतं.
घरासमोरच्या ओट्यावर एक वृद्ध माणूस लाकडी काठीच्या आधाराने बसला होता, अंगावर पांढरी शाल. दोघे जवळ येताच त्याने शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं.
अभिजित काही बोलणार, तोच वृद्ध म्हणाला, "बस."
दोघे समोरच्या लाकडी पाटांवर बसले. त्याची नजर अभिजितवरून नेहाकडे सरकली. क्षणभर त्याचा चेहरा कठोर झाला.
"नानु ओंटिगे बा अंता हेळिद्दे..." तो तुटक्या मराठीत म्हणाला. "मी यकटाच ये म्हणलो."
अभिजित लगेच म्हणाला, "देवप्पा, ही माझी सहकारी आहे. नेहा. मला कन्नड येत नाही. भाषेची अडचण होईल म्हणून तिला सोबत आणलं."
देवप्पा बराच वेळ नेहाकडे एकटक पाहत राहिला. जणू तिला पारखत होता. शेवटी त्याने एक दीर्घ उसासा सोडला.
"सरी... जे व्हायचं असतंय ते व्हतंच. कुणी कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी."
मग तो नेहाकडे वळला.
"लक्षात ठेव. आज इथे जे काही ऐकशील... अदु इल्ले उळिबेकु. ते इथंच राहिलं पाहिजे. बाहेर कुणाशीही बोलायचं नाही. जवळच्या माणसाशीही."
"हो," नेहा शांतपणे म्हणाली. "मी वचन देते."
देवप्पाने मान हलवली. मग त्याने अभिजितकडे पाहत विचारलं, "किती दिसांपासून स्वप्नं पडतात?"
"साधारण महिनाभर."
"आणि प्रति येळी राखेचा वास यतो?"
अभिजित दचकला. "हो... पण तुम्हाला ते कसं माहीत?"
देवप्पाने डोळे मिटले. "कारण... मी त्याची वाट बघतो. गेली ३२ वर्षं."
अभिजित आणि नेहा दोघेही निःशब्द झाले.
"मला काहीच समजत नाहीये," अभिजित म्हणाला. "ही स्वप्नं... राख... चिन्हं... आणि त्या बेपत्ता स्त्रिया. कृपया सांगा, हे सगळं नेमकं काय आहे?"
देवप्पा काही क्षण दूरच्या डोंगरांकडे पाहत राहिला. मग तो शांत आवाजात बोलू लागला.
"तुला भस्मासुराची कथा माहीत?"
"लहानपणी ऐकली होती."
"पण लोकांना माहीत असलेली कथा तिथेच संपते." त्याने खाली पडलेली राखेची चिमूट उचलली.
“त्याची राख या डोंगरांत विखुरली गेली, आणि ती कधीच पूर्णपणे मृत झाली नाही. भस्मासुराची शेवटची लालसा, स्त्री-सुखाची, ती राखेतच जिवंत राहिली, वर्षानुवर्षं सुप्त होऊन." तो कानडीत म्हणाला.
नेहाने त्याचे भाषांतर करून सांगितले आणि ते ऐकून अभिजितच्या अंगावर काटा आला.
"आणि मग?"
"३२ वर्षांपूर्वी..." देवप्पाचा आवाज आणखी मंद झाला. "...कुणीतरी ती राख पुन्हा जागी केली."
"कोण?"
"मल्लिकार्जुन." त्याने ते नाव अत्यंत हळू उच्चारलं.
"एक तृतीयपंथी. ज्याच्यावर समाजाने आयुष्यभर अन्याय केला. ज्याची प्रेयसी... चंद्रिका... काही नराधमांच्या वासनेची शिकार झाली. तिच्यासाठी न्याय मागायला तो गेला, पण ना कायद्याने त्याचं ऐकलं... ना समाजाने."
नेहाचा श्वास जड झाला.
"आणि त्या बेपत्ता स्त्रिया?" अभिजितने विचारलं.
देवप्पा म्हणाला, "ती राख आता फक्त राख राहिली नाही. ती... भस्मबीज झाली."
हे नाव उच्चारताना त्याच्या आवाजात भीती होती. "पूर्ण देह धारण करण्यासाठी तिला तेरा आत्मे लागतात ,बारा आत्मे आधीच घेतले गेलेत."
"आणि हे सगळं एका विशिष्ट तिथीला घडतं"
"अधिक मासाच्या अमावस्येला..." अभिजित नकळत पुटपुटला.
क्षणभर शांतता पसरली.
"तेरावा..."
देवप्पाने वाक्य अधुरंच सोडलं.
"तुम्हाला हे सगळं माहीत होतं, तरी तुम्ही थांबवलं नाही?" अभिजितचा आवाज आता तीव्र झाला होता.
"थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते आता माझ्या हातात नाही." देवप्पा शांतपणे म्हणाला.
"का?"
त्याने पुन्हा अभिजितकडे पाहिलं. "तुला सध्या एवढंच माहीत असणं पुरेसं आहे. पुढचं चक्र फार जवळ आलंय."
"कधी?"
देवप्पा कन्नडमध्ये काही बोलू लागला. "जून्नल्ली... जून तिंगळल्ली..."
शब्द अडकल्यासारखे झाले. नेहाने शांतपणे भाषांतर केलं. "ते म्हणतायत... जून महिन्यात."
अभिजितने मान हलवली. "मला माहीत आहे. मी ती तारीख आधीच शोधली आहे."
देवप्पाने त्याच्याकडे एकटक पाहिलं. "म्हणूनच तू इथे आलायस."
"तुला वाटतंय, तू उत्तरं शोधायला आलायस." तो मंद हसला.
"पण खरं म्हणजे... कुणीतरी तुला इथे खेचून आणलाय”
अभिजितच्या छातीत धडधड वाढली.
देवप्पा हळूहळू उठून उभा राहिला. "आजसाठी एवढंच. उद्या पुन्हा ये मी तुला गुहा दाखवेन."
तो नेहाकडे वळला. "पण उद्या... तू नको येऊ."
"गुहेपर्यंतचा रस्ता... फक्त त्याच्यासाठी."
उत्कंठावर्धक....
उत्कंठावर्धक....
पुढचा भाग जबरी असणार. नेहाच आहे का पुढच भस्मासुराचे भक्ष्य?
खूप भारी लिहिताय... पुढचा भाग टाका लवकर.
१३ चे गूढ उकलले.
हाही भाग मस्तच. छान पकड
हाही भाग मस्तच. छान पकड घेतलीय कथेने.
नितिन
नितिन
तुमची रेंज खरंच भारी आहे
तुमच्या तीन कथा ह्या आधी वाचल्यात
सवाल्यांच्या जाळ्यात - सत्य घटनेवर आधारित गुन्हेगारी कथा
लाल रेषा - नक्षलवादी
ब्लॅक एंबर - corporate crime in shipping business
आणि आता ही भय - रहस्य कथा
वेगवेगळ्या प्रकारच्या कथा तुम्ही दिल्यात.
तुमच्या लेखनात वाचकांना गुंतवून ठेवण्याची जादू आहे.
नवीन भाग तुम्ही नियमित पोस्ट करता.
पुढील लिखाणास शुभेच्छा !!
भारून टाकलय कथेने!
भारून टाकलय कथेने!
बाप रे!! काय मस्त फुलवता
बाप रे!! काय मस्त फुलवता तुम्ही कथा.
बाप रे!! काय मस्त फुलवता
बाप रे!! काय मस्त फुलवता तुम्ही कथा. >>> +१
धन्यवाद ऋतुराज. , माबो वाचक,
धन्यवाद ऋतुराज. , माबो वाचक, manya, केशवकूल, सामो आणि अनघा!
वाह
वाह
कमाल
नावीन्यपूर्ण आणि उत्कंठा वर्धक कथा
Manya बरोबर पूर्ण सहमत
Manya बरोबर पूर्ण सहमत
थोडी अज्ञातवासींची आठवण आली.
थोडी अज्ञातवासींची आठवण आली. त्यांची ही रेंज अफाट होती.
कथेच्या शीर्षकाचा या भागात
कथेच्या शीर्षकाचा या भागात उलगडा झाला.
नेहेमीप्रमाणे हा भाग पण कमाल!
सवाल्यांच्या जाळ्यात >>> शोधून वाचणे आलं आता
धन्यवाद किल्ली, धनवन्ती, सामो
धन्यवाद किल्ली, धनवन्ती, सामो आणि आबा.!
वाचतोय सुरू केलेय नुकतंच
वाचतोय
सुरू केलेय नुकतंच