
पाऊस तर प्रतिवर्षी येतच राहतो,
विजांच्या कडकडाटात
आणि मेघांच्या गर्द छायेत
दिमाखात बरसून जातो.
पण त्या वर्षाचा पाऊस
हृदयस्पर्शी ठरला;
माझ्या अंगणासोबत
अंतरात्माही चिंब भिजवून गेला.
वाऱ्याच्या झंझावातासारखा
तू सामोरा ठाकलास;
लौकिक बंधनांच्या शृंखलांना
सहज छेद देऊन गेलास.
मनात साचलेले अनेक कढ
हळूहळू सुटू लागले,
आणि कधी नव्हे ते मी
स्वतःचा पुनर्शोध घेऊ लागले.
इतकी वर्षे
मी स्वतःच्याच गर्तेत हरवून गेले होते;
दुसऱ्यांच्या आनंदात
स्वतःचा आनंद धुंडाळत होते.
शुष्क या वाळवंटावर
स्मृतींची अनेक पाने उलटली,
आणि तुझ्या आगमनाने
मनात नव्या पालवीची स्पंदनं जागी झाली.
उशिरा का होईना,
अंतरात एक बाग बहरली;
आणि त्या सुमनांच्या परिमळात
एक निरागस मैत्री रुजली.
स्त्री-पुरुषाच्या पलीकडचे
तू निखळ माणूसपण जागवले;
कोलमडलेल्या माझ्या विचारांना
दिशा दाखवणारे 'कृष्णत्व' लाभले.
प्रत्येक नात्याला नाव असावं,
हा अट्टाहास कशाला?
भावनांना लौकिक चौकटीत
बंदिस्त करण्याचा हट्ट कशाला?
सोबत राहून काही जीव
मनाने मैलोन्-मैल दूर असतात,
जे निःशब्द जाणिवेत उरतात
तेच तर खरे मित्र असतात.
अधुऱ्या राहिलेल्या गोष्टीच
किती लोभस अन सुंदर भासतात;
राहून गेलेल्या चहाच्या निमित्ताने
आपले हितचिंतक सदैव आठवत राहतात.
सुंदर कविता..!
सुंदर कविता..!
धन्यवाद .
धन्यवाद .