ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २३
पूर्वभाग
आरव देशमुख आणि त्याची टीम एलेनाने पाठवलेल्या गुप्त डेटाचा अभ्यास करताना Black Ember च्या खऱ्या ताकदीचा शोध लावते. त्यांना समजतं की ही संघटना संकट निर्माण करत नाही, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या भीतीचा आणि अनिश्चिततेचा अचूक वेळी आर्थिक फायदा करून घेते.
डेटामध्ये सापडलेला रहस्यमय “EV-17” कोड आणि “Archival Guardian” संदर्भ कबीरलाही अस्वस्थ करून सोडतात, ज्यामुळे Black Ember च्या ज्ञात संरचनेपलीकडे अजून एक गुप्त स्तर अस्तित्वात असल्याचा संकेत मिळतो.
दरम्यान डॅनियल क्रॉस जेएनपीटीच्या पाण्याने भरत चाललेल्या रिले चेंबरमध्ये अडकलेला असतानाही जुन्या फ्रेट नेटवर्कचा वापर करून हजारो निरर्थक सिग्नल्स निर्माण करतो आणि Black Ember च्या शोधयंत्रणेचा तालच बिघडवून टाकतो.
यानंतर आरवला डॅनियलकडून शेवटचा रिले संदेश मिळतो. त्या संवादातून दुष्यंत देशमुखने काही महत्त्वाचं सत्य जाणूनबुजून आरवपासून लपवून ठेवल्याचं सूचित होतं, पण त्याचा उलगडा होण्याआधीच संपर्क कायमचा तुटतो.
शेवटी डॅनियलचा त्याग फळाला येतो. Black Ember चं अचूक टायमिंग, समन्वय आणि शोधयंत्रणा विस्कळीत होते, तर आरवसमोर आता दोन आव्हानं उभी राहतात: संघटनेचं गुपित उघड करणं आणि वडिलांनी लपवलेलं सत्य शोधणं.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २४ - Collapse Window
मुंबईत पहाट जवळ येत चालली होती. शहरावरचा पाऊस अजूनही थांबला नव्हता. काल रात्रीपर्यंत संपूर्ण वातावरणात तीव्र भीती पसरली होती, तिथे आता एक अस्वस्थ करणारी अनिश्चितता दाटून आली होती. आणि 'ब्लॅक एम्बर'साठी ही वाढती अनिश्चितता त्या भीतीइतकीच, किंबहुना त्याहूनही अधिक धोकादायक होती.
इस्टर्न फ्रेट सर्व्हिस यार्डचा हा परिसर एरवीही निर्जन असायचा. तिथल्या एका पडक्या, जुन्या मेंटेनन्स शेडमध्ये माया तिच्या लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या स्क्रीनसमोर बसली होती. शेडच्या कोपऱ्यात जमा झालेल्या पावसाच्या पाण्याचा आणि गंजलेल्या लोखंडाचा एक संमिश्र वास हवेत रेंगाळत होता. मायाचे डोळे स्क्रीनवर खिळले होते. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण हातामध्ये खूप वेग होता. तिने शेवटचे कोरिलेशन पॅकेट व्हेरीफाय केले आणि एंटरचे बटण दाबले.
टॅब्लेटच्या स्क्रीनवर डेटा ट्रान्सफरचे प्रोग्रेस बार वेगाने पुढे जाऊ लागले. एकापाठोपाठ एक अनेक डेस्टिनेशन्स स्क्रीनवर फ्लॅश झाली. यामध्ये ग्लोबल मॅरीटाईम ऑथॉरिटीज, International Insurance Audit Units, सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेगुलेटरी रिव्ह्यू डेस्क आणि देशातील सर्वात मोठे इन्व्हेस्टिगेटिव्ह फायनान्शियल डेस्क समाविष्ट होते. हजारो पानांचे गोपनीय दस्तऐवज आणि आर्थिक घोटाळ्यांचे पुरावे डिजिटल मार्गाने वेगवेगळ्या सर्व्हर्सकडे रवाना होत होते.
या संपूर्ण सिस्टीमची रचना अत्यंत गुंतागुंतीची पण अचूक होती. जगातील कोणत्याही एका तपास संस्थेला किंवा देशाला हा संपूर्ण आर्काइव्ह कधीच एका वेळी मिळणार नव्हता. त्यामुळे कोणा एकालाही 'ब्लॅक एम्बर'च्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कटाचे मोठे चित्र एकदम स्पष्ट दिसणार नव्हते. पण या रचनेचे वैशिष्ट्य असे होते की, जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसलेल्या प्रत्येक विभागाला त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी पुरेसा, अचूक आणि कोर्टात टिकणारा पुरावा मिळणार होता. कस्टम्सला तस्करीचे धागेदोरे मिळणार होते, तर फायनान्शियल डेस्कला मनी लाँड्रिंगचे अकाऊंट नंबर्स.
ही दुष्यंतची मूळ पद्धत होती. तो कधीच सत्याचा एकाच वेळी मोठा ढीग कोणासमोर उपडा करत नसे. संपूर्ण सत्य एकाच ठिकाणी आले की ते दाबणे किंवा नष्ट करणे शक्तीशाली लोकांना सोपे जाते, हे तो जाणून होता. म्हणूनच तो सत्याचे तुकडे करायचा, ते वेगवेगळ्या दिशांना विभाजित करायचा आणि योग्य त्या कायदेशीर मार्गाने संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवायचा. एका बाजूने तपास थांबला, तरी दुसऱ्या बाजूने 'ब्लॅक एम्बर'चा गळफास घट्ट होणार होता.
आरव समोरच्या मोठ्या स्क्रीनकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोर आता जगभरातील रिएक्शन विंडोज उघड्या झाल्या होत्या. सिंगापूर, लंडन, झुरिच आणि मुंबई अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय शहरांतील बँकिंग आणि तपास यंत्रणांच्या सिस्टीम्स तिथे दिसत होत्या.
या प्रत्येक सिस्टीमचा काम करण्याचा टायमिंग पूर्णपणे वेगळा होता. प्रत्येक ऑथॉरिटी आपापल्या स्थानिक वेळेनुसार वेगवेगळ्या वेळी जागी होणार होती. जर ही डेटा पॅकेट्स थोड्या जरी चुकीच्या वेळी किंवा घाईगडबडीत पाठवली गेली असती, तर ती त्या त्या सिस्टीममधील इतर निरर्थक डेटाच्या गोंधळात आणि डिजिटल नॉईजमध्ये कायमची हरवून गेली असती. त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नसता.
आरवने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि अत्यंत शांतपणे म्हणाला, "आता सेंड कर."
मायाने काहीशा चमत्कृत होऊन त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात शंका होती. तिने खात्री करून घेण्यासाठी विचारले, "नक्की?"
आरवने अत्यंत ठामपणे मान डोलावली आणि म्हणाला, "पहिली ऑडिट वेव्ह सुरू झाली आहे. हीच योग्य वेळ आहे."
विनायकराव हे ऐकताच लगेच स्क्रीनच्या दिशेने थोडे झुकले. त्यांनी रेगुलेटरी डॅशबोर्डवरचे टाईमस्टॅम्प्स खूप बारकाईने तपासले. काही क्षण मनातल्या मनात आकडेमोड केल्यानंतर ते म्हणाले, "तो बरोबर बोलतोय."
विनायकरावांच्या त्या आवाजात पहिल्यांदाच एक स्पष्ट विश्वास जाणवला. ते पुढे म्हणाले, "जर आत्ता या क्षणाला ही डेटा पॅकेट्स गेली, तर प्रत्येक ऑथॉरिटीला इंडिपेंडंट कन्फर्मेशन मिळेल. कोणत्याही एका यंत्रणेला दुसऱ्याच्या परवानगीची गरज पडणार नाही."
हेच दुष्यंतचे ते हिडन आर्किटेक्चर होते, ज्याचा शोध ते दोघे खूप वेळापासून घेत होते. तिथे कोणताही एक मोठा आणि अचानक गौप्यस्फोट करायचा नव्हता, तर फक्त वेगवेगळ्या यंत्रणांचा योग्य कोरिलेशन लावून द्यायचा होता. दुष्यंतने यंत्रणांच्या वेळेची अशी काही अचूक सांगड घातली होती, ज्यामुळे ब्लॅक एम्बरला पळायला कुठेही जागा उरणार नव्हती.
दुसऱ्या बाजूला माया मीडिया राऊटिंगच्या कामात व्यस्त होती. तिने गेल्या काही तासांत सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर लोकांमध्ये भीती वाढवणारे पॅटर्न्स ओळखून ते वेगळे केले होते. आता त्याच खोट्या नॅरेटिव्हला खोडून काढणारे काउंटर-नॅरेटिव्ह्ज वेगवेगळ्या पत्रकारांपर्यंत पोहोचवले जाणार होते. माहितीचे हे विभाजन खूप विचारपूर्वक केले होते. एका पत्रकाराला शिपिंगमधील मोठ्या त्रुटींची कागदपत्रे, दुसऱ्याला इन्शुरन्स टायमिंग चेनचा तपशील, तर तिसऱ्याला शेल कंपन्यांच्या मूळ मालकीचा शोध घेणारा मार्ग दिला जाणार होता. कोणा एका पत्रकाराकडे संपूर्ण कहाणी नसेल, पण यामुळे सगळ्यांना एकाच वेळी सारखेच प्रश्न पडणार होते. जेव्हा हे सगळे प्रश्न सार्वजनिक होतील, तेव्हा मुख्य गुन्हेगारांचे खोटे दावे टिकणे शक्य नव्हते.
कबीर त्याच वेळी लॉजिस्टिक प्रूफ चेन व्हेरीफाय करण्याचे काम करत होता. कंटेनर राऊटिंग, फ्रेट डायव्हर्शन आणि कार्गो टायमिंग रेकॉर्ड्स अशा एकामागून एक अनेक डिजिटल स्वाक्षऱ्या त्याने संगणकावर व्हॅलिडेट केल्या. प्रत्येक एंट्री कायदेशीररीत्या अचूक आहे याची त्याने खात्री करून घेतली.
तो स्क्रीनवरून नजर न हटवता शांतपणे म्हणाला, "झालं. प्रूफ चेन एकदम क्लीन आहे. यात कुठेही तांत्रिक चूक नाही."
समीर या दरम्यान पूर्णपणे वेगळे काम करत होता. त्याच्यासमोर कोणताही स्क्रीन नव्हता आणि तो कोणत्याही प्रकारच्या डिजिटल अॅनालिसिसमध्ये अडकला नव्हता. तो थेट फिजिकल डिलिव्हरी रूट्स तपासत होता. डिजिटल यंत्रणांवर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही, हे तो जाणून होता. जर एखादा डेटा पॅकेट डिजिटल राऊटिंगमध्ये अपयशी ठरला किंवा हॅक झाला, तर त्याच्या फिजिकल बॅकअप कॉपीज कुठे सुरक्षित राहतील, त्या योग्य वेळी कोण घेऊन जाईल आणि त्या नेमक्या कोणत्या ऑथॉरिटीकडे पोहोचतील, याची चोख व्यवस्था त्याने करून ठेवली होती.
या संपूर्ण ऑपरेशनचे हेच सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. यात कोणीही मुख्य नेता किंवा दुय्यम कार्यकर्ता नव्हता. टीममधील प्रत्येक सदस्य पहिल्यांदाच स्वतंत्रपणे काम करत होता आणि प्रत्येकाची भूमिका तितकीच महत्त्वाची होती. एकाचाही दुवा निखळला, तर संपूर्ण योजना कोलमडून पडली असती.
************************************************************************************************************************
हजारो किलोमीटर दूर, फ्रँकफर्टमध्ये एलेना समोरच्या टर्मिनलकडे एकटक पाहत बसली होती. तिच्या खोलीत फक्त मॉनिटरचा निळसर प्रकाश पसरला होता. इंटरनल ऑथरायझेशन लेअर अजूनही तिच्यासाठी खुली होती, ज्याचा वापर करून तिने सिस्टीममधील सर्वात सुरक्षित आणि गोपनीय मार्ग खुले करण्यास सुरुवात केली होती. तिने एकामागून एक महत्त्वाचे अप्रूव्हल्स लीक करायला सुरुवात केली. यामध्ये इमर्जन्सी रिव्ह्यू ओव्हरराईड्स, मॅरीटाईम एस्केलेशन अप्रूव्हल्स आणि क्रॉस-बॉर्डर ऑथरायझेशन चेन्सचा समावेश होता. हे तेच परवाने होते, ज्यांच्याशिवाय मायाने पाठवलेला डेटा कोणत्याही आंतरराष्ट्रीय यंत्रणेला कायदेशीररीत्या वापरता आला नसला.
या प्रत्येक लीकसोबत सिस्टीमच्या मुख्य सर्व्हरमध्ये तिच्या डिजिटल पावलांचे ठसे उमटत होते. तिची खरी ओळख उघड होणे आणि ती पकडली जाणे आता पूर्णपणे निश्चित झाले होते. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला तिच्यावरचा धोका खूप वाढत चालला होता. सायबर सिक्युरिटी टीम कोणत्याही क्षणी तिच्यापर्यंत पोहोचू शकत होती, पण ती अजिबात थांबली नाही. तिची बोटे कीबोर्डवर वेगाने चालत राहिली.
************************************************************************************************************************
इस्टर्न फ्रेट यार्डमधील त्या जुन्या शेडमध्ये माया काही क्षण स्क्रीनकडे एकटक पाहत राहिली. जर्मनीतून येणारा हा डेटा फ्लो आणि त्यासोबत येणारे गंभीर इशारे ती पाहत होती. शेवटी तिने तिथली शांतता भंग करत विचारले, "मला एक गोष्ट समजत नाहीये."
तिने फ्रँकफर्ट ऑथरायझेशन लॉग्सकडे बोट दाखवले, जिथे एलेनाचा युझर आयडी वारंवार फ्लॅश होत होता. तिने पुढे विचारले, "एलेना स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढा मोठा धोका का पत्करतेय? तिला माहीत आहे की यानंतर ती वाचू शकत नाही."
आरवने यावर कोणतेही उत्तर दिले नाही, तो समोरच्या डेटा पॅकेट्सच्या टायमिंगमध्ये व्यस्त राहिला. विनायकरावही गप्प राहिले, त्यांच्या चेहऱ्यावर केवळ चिंतेच्या रेषा गडद झाल्या. शेवटी मायाने कबीरकडे पाहिले आणि विचारले, "तुला काही माहिती आहे का? तुम्ही दोघांनी एकत्र काम केले आहे."
कबीर काही क्षण काहीच बोलला नाही. त्याची नजर स्क्रीनवर स्थिर झाली होती. तो समोर दिसणाऱ्या डेटाकडे पाहत राहिला. एलेनाचा ऑथरायझेशन ट्रेल, गार्डियन ओव्हरराईड विसंगती आणि तो ईव्ही-१७ हॅश कोड... या सगळ्या तांत्रिक गोष्टींकडे तो पाहत राहिला, ज्या एलेनाच्या शेवटच्या प्रयत्नांची साक्ष देत होत्या. मग त्याने खूप हळूच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, "नाही."
तो खोटे बोलत नव्हता, कारण त्यालाही या प्रश्नाचे पूर्ण आणि स्पष्ट उत्तर माहीत नव्हते. तो पुढे म्हणाला, "मी एलेनाला ओळखतो, पण आत्ता ती जे करतेय, हे तिच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे..."
तो आपले वाक्य पूर्ण करू शकला नाही. त्याने यापूर्वी एलेनाला अनेक कठोर निर्णय घेताना पाहिले होते. ती अत्यंत थंड डोक्याने नफ्या-तोट्याची गणिते मांडायची आणि मिशन यशस्वी करण्यासाठी प्रसंगी सहकाऱ्यांचा ऑपरेशनल बळी द्यायलाही मागेपुढे पाहत नव्हती. तिची ओळख एक भावनाशून्य आणि व्यावसायिक एजंट म्हणून होती. पण आत्ता जे चालले होते ते पूर्णपणे वेगळे होते. हा निर्णय व्यावसायिक नसून पूर्णपणे वैयक्तिक वाटत होता. कबीरलाही त्यामागचे नेमके कारण आणि जुनी पार्श्वभूमी समजत नव्हती, ज्यामुळे एलेना स्वतःचा बळी द्यायला तयार झाली होती.
त्याच क्षणी मायाने शेवटचा डेटा पॅकेट मुख्य क्यूमध्ये लावला. आरवने त्याच्या घड्याळाकडे पाहिले. लंडनची विंडो, झुरिचचा रिव्ह्यू गॅप आणि सिंगापूरचे ऑडिट कन्फर्मेशन... हे सगळेच्या सगळे पहिल्यांदाच एका अचूक रेषेत अलाईन होत होते. जगभरातील वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये अशी अचूक सांगड घालणे केवळ असंभव मानले जायचे.
आरव अत्यंत शांतपणे म्हणाला, "सेंड."
त्याच्या या शब्दावर शेडमधील कोणीही जागेवरून हलले नाही. एक सेकंद... दोन सेकंद... आणि मग मायाने फायनल कमांड एक्झिक्युट केली. टॅब्लेटच्या स्क्रीनवर प्रोग्रेस बार शंभर टक्क्यांवर पोहोचला आणि ते पॅकेट्स एकामागून एक सिस्टीममधून बाहेर पडू लागले. रेग्युलेटर्स, इन्शुरर्स, इन्वेस्टीगेटिव्ह डेस्क आणि मॅरीटाईम ऑथॉरिटीज... या सगळ्यांना एकाच वेळी आणि एकाच पूर्वनियोजित पॅटर्नमध्ये तो डेटा पाठवला गेला. दुष्यंतचे ते हिडन आर्किटेक्चर आता पूर्ण ताकदीने कार्यरत झाले होते.
पुढचे काही सेकंद तिथे पूर्ण शांतता होती. स्क्रीनवर कोणतीही हालचाल झाली नाही, काहीच घडले नाही. पण मग अचानक स्क्रीनवर पहिला निळा अलर्ट चमकला - इमर्जन्सी ऑडिट रिक्व्हेस्टेड.
त्यानंतर लगेच दुसरा अलर्ट आला - इन्शुरन्स रिव्ह्यू एस्केलेटेड.
मग एकामागून एक सिस्टीम्स जागी होऊ लागल्या. तिसरा अलर्ट स्क्रीनवर आला - मॅरीटाईम कॉम्पायन्स इन्क्वायरी ओपंड.
आणि पाठोपाठ चौथा - क्रॉस-बॉर्डर रेग्युलेटरी रिव्ह्यू इनिशिएटेड.
एका आंतरराष्ट्रीय यंत्रणेचा डेटा दुसऱ्या यंत्रणेच्या पुराव्याशी आपोआप मॅच होत होता. पण शेडमध्ये कोणीही आनंद व्यक्त केला नाही, की कोणाच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव आले नाहीत. कबीर आणि समीर शांत उभे होते. कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते की हा त्यांचा अंतिम विजय नव्हता; तो केवळ एका मोठ्या वादळाचा ट्रिगर होता. त्यांनी फक्त डोमिनो इफेक्ट सुरू केला होता. ब्लॅक एम्बरचा गळफास आत्ता कुठे आवळायला सुरुवात झाली होती, पण त्याचा प्रतिहल्ला तितकाच तीव्र असणार होता.
आणि ठीक त्याच क्षणी, जगभर विखुरलेल्या वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये... पहिल्यांदाच... पडद्यामागून कोणीतरी याच पॅटर्नकडे अतिशय बारकाईने पाहायला सुरुवात केली होती.
काल रात्रीपर्यंत सामान्य लोक रस्त्यावर इंधन शोधत फिरत होते. आज मोठमोठ्या यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत होत्या. हा बदल ब्लॅक एम्बरसाठी अधिक धोकादायक होता. कारण सामान्य लोकांची भीती दडपून टाकणे सोपे होते, पण या जाग्या झालेल्या यंत्रणांना रोखणे त्यांच्या हाताबाहेरचे होते.
मायाच्या स्क्रीनवर आता अलर्ट्सचा वर्षाव सुरू झाला होता. नवीन ऑडिट, नवीन चौकशी आणि नवीन रिव्ह्यूज एकामागून एक स्क्रीनवर उमटत होते. प्रत्येक अलर्ट हा वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या ऑथॉरिटीकडून आणि वेगवेगळ्या सिस्टीममधून येत होता. आता त्या सगळ्या यंत्रणा एकाच पॅटर्नचा अभ्यास करत होत्या. दुष्यंतने रचलेल्या जाळ्यात ब्लॅक एम्बरचे आर्थिक व्यवहार अडकले होते.
माया अत्यंत मंद आवाजात म्हणाली, "पहिला इन्शुरर गेला."
तिच्या स्क्रीनवर सिंगापूर रिव्ह्यू बोर्डचा नवीन अपडेट चमकू लागला होता, ज्यावर लिहिले होते - फास्ट-क्लिअरन्स सस्पेंडेड, इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड. पुढच्या काही सेकंदांतच दुसरा अलर्ट झुरिचमधून आला - अॅडिशनल एक्स्पोजर रिव्ह्यू रिक्व्हेस्टेड. पाठोपाठ लंडनचा तिसरा अलर्ट फ्लॅश झाला - इमर्जन्सी कॉम्प्लायन्स होल्ड. ब्लॅक एम्बरला मिळणारे आंतरराष्ट्रीय विमा संरक्षण धोक्यात आले होते.
काल रात्रीपर्यंत हे सगळे इन्शुरर्स एकमेकांच्या सिग्नल्सवर आणि अहवालांवर अवलंबून चालत होते. एकमेकांच्या सोयीनुसार ते संशयास्पद व्यवहारांकडे दुर्लक्ष करत होते. आज या एका ट्रिगरमुळे प्रत्येक जण स्वतःची फाईल स्वतंत्रपणे उघडून तपासत होता. कायदेशीर कचाट्यात आपण अडकू नये म्हणून प्रत्येकाची धडपड सुरू झाली होती.
ब्लॅक एम्बरची सर्वात मोठी ताकद त्यांची गुप्त साखळी हीच होती. आता ती साखळी एकामागून एक करत निखळू लागली होती.
************************************************************************************************************************
झुरिचमधील एका सिक्युअर ट्रेडिंग फ्लोअरवर अचानक वातावरण खूप तंग झाले होते. समोरील चारही स्क्रीन्स लाल रंगाच्या गंभीर अलर्ट्सनी भरून गेल्या होत्या. स्क्रीनवर लिक्विडिटी रिव्ह्यू पेंडिंग, कोलॅटरल रीअसेसमेंट रिक्वायर्ड आणि फंडिंग एक्सटेंशन डिनाईड अशा तातडीच्या चेतावण्या चमकत होत्या. ते पाहून एका अॅनालिस्टने खुर्चीतून ताडकन उठत रागाने शिवी दिली. तो चिडून म्हणाला, "याला काहीच अर्थ नाहीये. ही तांत्रिक चूक असली पाहिजे."
त्याच्या अगदी बाजूला बसलेला दुसरा अॅनालिस्ट मात्र पूर्णपणे शांत होता. तो अत्यंत संथ आवाजात म्हणाला, "याला अगदी अचूक अर्थ आहे."
त्याने स्क्रीनवर आलेल्या मुख्य ऑडिट रेफरन्सकडे बोट दाखवले, जिथे सिंगापूर, लंडन आणि झुरिचच्या विमेशी संबंधित यंत्रणांचे आयडी फ्लॅश होत होते. तो फक्त तीनच शब्द बोलला, "इन्शुरर्स स्टॉप्ट सायनिंग."
त्याच्या या तीन शब्दांनी संपूर्ण खोलीतील हवा जणू गोठून गेली. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला या शब्दांचा अर्थ चांगलाच माहीत होता.
मुंबईत मायाने पाठवलेल्या डेटा पॅकेट्समुळे आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी ब्लॅक एम्बरच्या व्यवहारांवर सह्या करणे म्हणजेच त्यांना कायदेशीर संरक्षण देणे थांबवले होते. दोन मोठ्या हेज पोझिशन्स आता रोलओव्हर होणार नव्हत्या. त्यांच्या लिक्विडिटीचे चक्र आता पूर्णपणे तुटले होते. बॅकअप फंड्स मिळण्याचे सगळे मार्ग एकाच वेळी बंद झाले होते.
तिथल्या कोलाहलात कोणीतरी मोठ्याने ओरडले, "ते विकून टाका. आत्ताच्या आत्ता! जेवढे वाचवता येईल तेवढे वाचवा!"
पण आता खूप उशीर झाला होता. कारण बाजारपेठेतून खरेदीदार एकाएकी पूर्णपणे गायब झाले होते. ज्या सिस्टीमवर ब्लॅक एम्बरचे साम्राज्य उभे होते, ती सिस्टीमच आता त्यांना गिळायला उभी होती.
************************************************************************************************************************
इस्टर्न फ्रेट यार्डमधील त्या जुन्या मेंटेनन्स शेडमध्ये आरव स्क्रीनकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोर कमोडिटी ग्राफ हळूहळू बदलत चालला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भीती अजूनही पूर्णपणे संपलेली नव्हती, पण त्या भीतीचा प्रवाह मात्र आता उलटा फिरू लागला होता. काल रात्रीपर्यंत ज्या घसरणीमुळे ब्लॅक एम्बर अब्जावधी रुपये कमावत होते, ती परिस्थिती आता नियंत्रणात येत होती.
तो अत्यंत मंद आवाजात स्वतःशीच पुटपुटल्यासारखा म्हणाला, "भीती अजूनही आहे..."
मायाने गंभीरपणे मान डोलावली आणि म्हणाली, "हो."
आरव पुढे म्हणाला, "पण आता त्या भीतीचा वापर करून जे पैशांचे बेकायदेशीर मार्ग तयार केले जात होते, ते रूट्स आता कायमचे बंद होतायत."
विनायकराव काही क्षण शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. दुष्यंतच्या योजनेची ताकद आणि या तरुणांची अचूक कामगिरी त्यांनी पाहिली होती. मग पहिल्यांदाच विनायकरावांच्या थकलेल्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले.
************************************************************************************************************************
फ्रँकफर्टमध्ये एलेना व्होल्कोव्ह समोरच्या टर्मिनलकडे पाहत शांत बसली होती. खोलीत केवळ कीबोर्डच्या कीजचा शेवटचा आवाज घुमून थांबला होता. तेवढ्यात स्क्रीनवर एक नवीन नोटिफिकेशन चमकले. स्क्रीनवर अॅक्सेस रिव्ह्यू इनिशिएटेड आणि इंटरनल ट्रेस अॅक्टिव्ह अशा धोक्याच्या सूचना लाल रंगात दिसू लागल्या. शत्रू तिच्या सिस्टीमचा माग काढत तिच्या डिजिटल पत्त्यापर्यंत पोहोचला होता.
ती काही सेकंद जागेवरच स्तब्ध बसून राहिली. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, केवळ एक थकल्यासारखे भाव होते. मग तिने बाजूला पडलेल्या आपल्या कंपनी बॅजकडे पाहिले, जो आता निरुपयोगी झाला होता. ठीक त्याच क्षणी स्क्रीनवर दुसरा अलर्ट आला - ऑथरायझेशन लेअर रिव्होक्ड.
त्या पाठोपाठ मॅरीटाईम रिव्ह्यू अॅक्सेस स्क्रीनवरून अचानक गायब झाला. काही सेकंदांनंतर इन्शुरन्स लेअर बंद झाली आणि मग अॅडव्हायझरी लेअरही नाहीशी झाली. एकामागून एक तिचे सगळे अधिकार मुख्य सिस्टीममधून काढून घेतले जात होते. तिने उघड केलेले डिजिटल दरवाजे आता कायमचे बंद होत होते.
खोलीचे जड दार हळूच उघडले गेले. राखाडी रंगाचा सूट घातलेला एक अॅनालिस्ट आत आला. त्याचा चेहरा खूप गंभीर होता आणि त्याच्या हातात काही कागदपत्रे होती.
तो अत्यंत संथ आवाजात म्हणाला, "त्यांना समजलंय."
एलेनाने त्याच्याकडे वर न पाहताच शांतपणे विचारले, "किती?"
"नक्कीच पुरेसं."
त्या उत्तराने खोलीत एक जड शांतता पसरली. एलेनाने शांतपणे आपले टर्मिनल बंद केले. मॉनिटरचा निळसर प्रकाश विझला आणि खोलीत अंधार दाटून आला. कारण आता तिच्या अटकेचा आणि तिच्या शेवटचा काउंटडाऊन अधिकृतपणे सुरू झाला होता.
************************************************************************************************************************
त्याच वेळी, युरोपच्या कुठल्यातरी अज्ञात शहरात एका सिक्युअर कॉन्फरन्स लाईनवर पहिल्यांदाच तो आवाज ऐकू आला.
"कन्टेन द रिव्ह्यूज."
शांत, थंड आणि प्रचंड अधिकारपूर्ण असलेला तो आवाज 'डायरेक्टर'चा होता.
लाईनवर काही सेकंद शांतता पसरली. मग दुसरा आवाज ऐकू आला, "इम्पॉसिबल."
डायरेक्टर यावर काही बोलला नाही. तो दुसरा अधिकारी पुढे म्हणाला, "ते आधीच सिस्टीममध्ये अॅक्नॉलेज झाले आहेत."
डायरेक्टरचा चेहरा दिसत नव्हता, पण लाईनवरची शांतता अबोलपणे बदलली होती. "त्यांना डिले करा," तो पुन्हा म्हणाला.
या वेळी उत्तर आणखी जलद आले, "रेग्युलेटरकडे ते आधीच पोहोचले आहेत."
डायरेक्टर काही सेकंद काही बोललाच नाही. पहिल्यांदाच त्याचा आदेश अंमलात येत नव्हता. त्याच्या शब्दांची गती रोखली गेली होती.
************************************************************************************************************************
आरवच्या स्क्रीनवर अचानक एक नवीन अलर्ट चमकला. स्क्रीनवर 'आर्काइव्हल एक्सेप्शन डिटेक्टेड' अशी ओळ दिसताच तो सावध झाला. माया लगेच त्याच्या बाजूला आली. "पुन्हा?" तिने विचारले.
आरवने तो अलर्ट उघडला. त्यात त्याच जुन्या लेअरचा रेफरन्स होता - गार्डियन ओव्हरराईड, अॅक्सेस रिस्ट्रिक्टेड. मात्र यावेळी तिथे एक नवीन एंट्री दिसत होती, ज्यावर 'सील्ड रेफरन्स कम्पार्टमेंट' असे लिहिले होते. ते पूर्णपणे लॉक होते आणि त्याचे क्लासिफिकेशन अज्ञात होते.
'डॅनियल...' आरवच्या मनात अचानक तो आवाज पुन्हा घुमला. काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या गेल्या.
तो काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याला नेमके कारण माहीत नव्हते, पण त्याला आतून जाणवत होते की डायरेक्टरचे रहस्य आणि हे सीलबंद कम्पार्टमेंट कुठेतरी एकमेकांशी जोडलेले होते.
झुरिचच्या त्या ट्रेडिंग फ्लोअरवर आणखी एक अलर्ट चमकला. स्क्रीनवर 'पोझिशन फ्रीझ इनिशिएटेड' असे उमटले. आता तिथे कोणीच काही बोलत नव्हते. आता ही मार्केटची समस्या उरली नव्हती, तर ती थेट ऑडिटची मोठी समस्या बनली होती.
मायाचा टॅब्लेट पुन्हा चमकला. त्यावर 'ग्लोबल रिव्ह्यू कॅस्केड डिटेक्टेड' असा मेसेज आला. विनायकराव स्क्रीनकडे पाहत राहिले आणि मग अतिशय शांत आवाजात म्हणाले, "ब्लॅक एम्बरची ताकद सिक्रसी नव्हती."
"आणि आता कुणीतरी ती त्यांची कॉम्पलेक्सिटी मॅप करायला सुरुवात केली आहे," विनायकरावांनी पूर्ण केले.
दूर कुठेतरी आभाळात वीज चमकली. तिथून हजारो किलोमीटर दूर, डायरेक्टर पहिल्यांदाच एका अशा संकटासमोर उभा होता, ज्याचे टायमिंग आता त्याच्या स्वतःच्या नियंत्रणात उरले नव्हते.
खूपसे टेक्निकल डिटेल्स कळत
खूपसे टेक्निकल डिटेल्स कळत नाही आहेत पण मजा येतेय वाचायला . उत्कंठा वाढली आहे . आताच्या काही भागांमध्ये तोचतोच पणा जाणवतोय किंवा मला पुरेसे कळत नाहीय .
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. उत्कंठा वाढलीय.
उत्कंठावर्धक आहे कथा. आधी
उत्कंठावर्धक आहे कथा. आधी काही जणांनी म्हटल्याप्रमाणे टेक्निकल डिटेल्स थोडे जास्त झालेत असे मला वाटले. आणि या व मागील काही भागात कथेचा वेग कमी झाला आहे असे जाणवले. कदाचित टेक्निकल डिटेल्स थोडे जास्त आटोपशीर केले तर कथा जास्त चांगली पकड घेऊ शकेल.