ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २१
पूर्वभाग
आरव देशमुख, कबीर, माया सेन आणि समीर नायर पाण्याने भरत चाललेल्या भूमिगत बायपास कॉरिडॉरमधून जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना Black Ember त्यांचे सर्व बाहेरचे मार्ग एकामागून एक बंद करत असल्याचं स्पष्ट होतं.
दुष्यंत देशमुखने वर्षांपूर्वी चिन्हांकित केलेला गुप्त “ब्लाइंड रूट” हा त्यांचा एकमेव आशेचा किरण ठरतो, तर शत्रूचे कमांडोज त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचतात.
दरम्यान मुंबईत इंधनटंचाई नसतानाही भीती, अफवा आणि माध्यमांतील सूचक चर्चांमुळे लोकांमध्ये साठेबाजी सुरू होते. माया शोधून काढते की मानवी प्रतिक्रियांना अल्गोरिदमच्या मदतीने अनेक पटींनी वाढवलं जात आहे.
फ्रँकफर्टमध्ये एलेना व्होल्कोव्हा यांना धक्कादायक सत्य समजतं. Black Ember चेच काही आर्थिक गट स्वतःच्या नफ्यासाठी मूळ योजनेच्या बाहेर जाऊन परिस्थिती अधिक चिघळवत आहेत आणि संपूर्ण यंत्रणेचं नियंत्रण सुटू लागलं आहे.
शेवटी “Maritime Cascade” हा केवळ बाजारातील खेळ नसून जागतिक पुरवठा साखळी कोलमडवू शकणारी सक्तीची संकटसाखळी असल्याचं उघड होतं, आणि Black Ember पहिल्यांदाच स्वतःच्याच लोभ आणि विस्कळीतपणामुळे आतून तडे जाऊ लागलेलं दिसतं.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २२ - Point of No Return
एलेनाने थरथरत्या बोटांनी एक अत्यंत संवेदनशील इंटरनल रिले उघडलं ZURICH PRIORITY POSITION STATUS.
तिच्या समोरच्या मुख्य स्क्रीनवर निळे आणि पांढरे नंबर्स वेगाने बदलत होते, जणू एखादा हाय-स्पीड डिजिटल काउंटडाऊन सुरू असावा.
Exposure सातत्याने वाढत होतं, Profit windows अधिकच वाईड होत होती ..पण त्याच वेळी, संपूर्ण सिस्टीमला सुरक्षित ठेवणारे stabilization buffers वेगाने कमी होत होते.
आता तिला सत्य दिसत होतं. हे आता कोणतंही प्लॅन केलेलं, नियंत्रित ऑपरेशन राहिलेलं नव्हतं. हे आता एक Momentum बनलं होतं. 'ब्लॅक एम्बर'ने सुरू केलेली ही विनाशाची गाडी आता त्यांच्या स्वतःच्या ब्रेकच्या आणि नियंत्रणाच्या पलीकडे गेली होती.
कॉन्फरन्स रूमचा जड दरवाजा पुन्हा एकदा उघडला. तोच ग्रे सूट घातलेला अनॅलिस्ट घाईघाईने आत आला. यावेळी मात्र त्याच्या चेहऱ्यावर भीती व टेन्शन स्पष्ट दिसत होतं. तो जवळ आला आणि म्हणाला, “London desks want extension.”
एलेनाने स्क्रीनवरून आपली नजर हटवली नाही, तिची बोटे कीबोर्डवर चालतच होती. तिने अत्यंत कोरड्या आवाजात विचारलं, “Containment?”
तो अत्यंत हळू, दबलेल्या आवाजात म्हणाला, “Deferred.”
एलेनाने खेळ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच स्क्रीनवरून आपली नजर पूर्णपणे हटवली आणि सरळ मान वर करून त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिलं, “Deferred?”
त्या अनॅलिस्टने अत्यंत अस्वस्थपणे आपली हलकी मान डोलावली आणि त्यामागचं सत्य सांगितलं, “Zurich thinks Mumbai panic hasn’t peaked yet.”
झुरिचच्या त्या अदृश्य मास्टरमाइंड्सना वाटत होतं की, मुंबई अजून पुरेशी होरपळलेली नाही. त्यांचा अब्जावधी डॉलर्सचा नफा अधिक वाढवण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रक्त सांडणं, तिथली पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडणं आणि लोकांमध्ये आणखी हाहाकार माजणं गरजेचं होतं.
एलेना काही सेकंद त्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे पाहत म्हणाली, “They’re late.”
तो अनॅलिस्ट पूर्णपणे गोंधळला. त्याने स्वतःचा चष्मा नीट केला , “Sorry?”
एलेनाचा आवाज आता पूर्णपणे थंड, निर्विकार झाला होता. जणू तिने एका मोठ्या विनाशाची शक्यता स्वीकारली होती.
“Containment phase. “They missed it.”
आता हा पॅनिक, हा जागतिक बाजारातला आणि मुंबईच्या रस्त्यांवरचा गोंधळ कोणाच्याही बापाच्या नियंत्रणात राहिला नव्हता. तो आता कोणत्याही आदेशाने किंवा अल्गोरिदमने कमी होणार नव्हता. तो आता: स्वतःच्याच ओझ्याने, स्वतःच वाढणार होता.
तिच्या एन्क्रिप्टेड टर्मिनलवर एक नवीन लाल रंगाची रिक्वेस्ट चमकली. सिस्टीम एका अंतिम मंजुरीची वाट पाहत होती: MUMBAI CASCADE PRESSURE - EXPAND? [Confirmation Required]
अनॅलिस्टने त्या ब्लिंक होणाऱ्या स्क्रीनकडे पाहिलं, मग अत्यंत अस्वस्थ नजरेने एलेनाकडे. त्याचा हात कीबोर्डवर थरथरत होता. “Should I authorize?”
एलेना काही सेकंद काहीच बोलली नाही. तिची नजर त्या 'CONFIRMATION' च्या लाल इंडिकेटरवर स्थिर झाली होती. त्या लाल रंगाच्या लकाकण्यात तिला अचानक समोरचा डेटा दिसणं बंद झालं... तिला तिथे दुसरंच काहीतरी दिसायला लागलं.
जुना इतिहास, जुन्या जखमा आणि या सिस्टीमने घेतलेले बळी तिच्या डोळ्यांसमोरून एखाद्या फिल्मसारखे वेगाने गेले: नोवोरोसिस्क बंदरातील तो घातपात, भूमध्य समुद्रात कृत्रिमरित्या गोठवलेले जहाजांचे मार्ग, दुष्यंत... ज्याला या सिस्टीमने संपवलं, डॅनियल... जो आता मुंबईच्या भुयारात मृत्यूशी झुंज देत होता ...आणि मग अचानक, तिच्या डोळ्यांसमोर एक चेहरा आला - आरव. तिने लगेच आपली नजर स्क्रीनवरून बाजूला घेतली.
अनॅलिस्टने तिची ही शांतता पाहून पुन्हा विचारलं, “Elena?”
ती काही न बोलता अत्यंत शांतपणे आपल्या जागेवरून उठली. खुर्ची मागे सरकली. ती कॉन्फरन्स रूमच्या त्या महाकाय, काळ्या काचेच्या खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. काचेवर पडलेल्या तिच्या स्वतःच्याच रिफ्लेक्शनमध्ये अनेक रात्रींच्या जागरणाचा आणि या सिस्टीमच्या क्रूरतेचा थकवा स्पष्ट दिसत होता.
तिने बाहेरच्या अंधाराकडे पाहत अतिशय मंद आवाजात विचारलं, “Do you know what the original model was?”
अनॅलिस्ट काहीच बोलला नाही, तो फक्त तिच्या पाठीकडे पाहत राहिला.
एलेनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती स्वतःच पुढे म्हणाली, “Create instability.”
“Control reactions.”
“Profit from correction.”
अंधारात केवळ सर्व्हरच्या निळ्या दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. अनॅलिस्टचा घाबरलेला, अस्वस्थ आवाज पुन्हा खोलीत घुमला, “Elena…?”
ती काचेच्या खिडकीपासून दूर झाली आणि हळूहळू, अगदी संथ पावलांनी मुख्य टर्मिनल जवळ आली. समोर स्क्रीनवर तीच रिक्वेस्ट ब्लिंक होत होती: MUMBAI CASCADE PRESSURE - EXPAND?
जर याला मंजुरी दिली असती, तर मुंबईचा उरलासुरला श्वासही कोंडला गेला असता. एलेनाचं बोट कीबोर्डवर काही सेकंद हवेतच थांबलं. खोलीतला काळोख, बाहेरचा पाऊस आणि डोक्यावर घोंघावणारा विनाशाचा मोमेंटम... सगळं काही जणू गोठलं. आणि मग, तिने कीबोर्डवर एक कमांड टाईप केली: HOLD FOR REVIEW.
स्क्रीनचा तो लाल, आक्रमकपणे ब्लिंक होणारा रंग क्षणात बदलला आणि तिथे एक शांत, करडा रंग पसरला. रिक्वेस्ट तात्पुरती गोठवली गेली होती.
पण एलेना एवढ्यावरच थांबली नाही. तिचे डोळे आता एका वेगळ्याच निश्चयाने चमकत होते. तिने तातडीने टर्मिनलच्या आत खोलवर जाऊन मूळ यंत्रणेचा मुख्य पाया असलेला Hidden relay layer उघडला. 'ब्लॅक एम्बर'ने जगापासून लपवून ठेवलेला गुप्त डेटा फाईल्सचा खजिना तिच्या समोर उघडला गेला.
विमा कंपन्यांना वेठीस धरणाऱ्या छुप्या टाईम लाईन्स, जगभर कृत्रिम अराजकता माजवण्याचा मुख्य आराखडा, डायरेक्टर आणि झुरिच डेस्कचे मूळ डिजिटल सिग्नल्स अशी खूप गुप्त माहिती त्यात होती.
तिची बोटे कीबोर्डवर विजेच्या वेगाने धावू लागली. ती या सर्व डेटाचे छोटे छोटे एन्क्रिप्टेड पैकेट्स तयार करत राहिली. प्रत्येक पॅकेट तयार होताना तिचा श्वास अधिकच जड, अधिकच खोल होत गेला. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. कारण, तिला कळून चुकलं होतं की ती आता केवळ माहिती लीक करत नव्हती तर ती थेट सिस्टीम विरुद्ध अंतिम आणि बंडखोर निर्णय घेत होती.
तिच्या समोर टर्मिनलवर Destination field उघडलं. डेटा पॅकेट्स कुठल्या पत्त्यावर पाठवायचे, तिथे ती अक्षरे टाईप झाली:
A.D. recovery relay.
ती काही सेकंद त्या स्क्रीनकडे पाहत राहिली. त्या निळ्या बॅकलाईटच्या प्रकाशात, इतका वेळ पूर्णपणे निर्विकार असलेल्या तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक स्पष्ट भाव चमकला. पण ती भीती नव्हती. त्यात कोणताही गुन्हा केल्याची भावना, म्हणजेच गिल्टही नव्हतं. तो भाव अत्यंत जुना आणि खोल होता ज्यामध्ये भूतकाळातील वेदना, हरवलेला विश्वास आणि या सिस्टीमने तिच्याकडून हिरावून घेतलेल्या माणसांची प्रखर आठवण होती.
तिने क्षणाचाही विचार न करता लगेच आपली नजर स्क्रीनवरून वळवली जणू काही जास्त विचार केला, तर हात थांबेल. आणि तिने SEND दाबलं.
कॉन्फरन्स रूममध्ये तोच सर्व्हरचा यांत्रिक आवाज अखंडपणे घुमत राहिला. दूरवर पसरलेल्या फ्रँकफर्टच्या स्कायलाईनवर अचानक एक तीव्र वीज कडकडली, जिच्या पांढऱ्या प्रकाशाने संपूर्ण काचेची खिडकी काही सेकंदांसाठी उजळून निघाली.
आणि त्याच क्षणी, एलेना व्होल्कोव्हला अंतर्मनातून कळून चुकलं...आता तिला परतीचा मार्ग उरलेला नाही.
************************************************************************************************************************
मुंबई. रात्र.
बाहेर कोसळणारा पाऊस आता अक्राळविक्राळ रूप घेऊन कोसळत होता. फ्रेट मेन्टेनन्स ग्रीडच्या खालच्या त्या जुन्या कार्गो रिले रूममध्ये पाणी वेगाने भरत होतं. डॅनियल तिथल्या गंजलेल्या, लोखंडी सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर एकटाच उभा होता. त्याच्या गुडघ्याखाली काळं, गढूळ पाणी सतत वाढत होतं आणि त्याचा थंडगार स्पर्श डॅनियलच्या पायाला जाणवत होता.
समोरच्या रग्गेड टर्मिनलवर (rugged terminal) वेगवेगळ्या रिलेच्या सिग्नेचर्स अजूनही लाल-निळ्या रंगात ब्लिंक होत होत्या.
WEST-3
EAST-7
CARGO-11
PHANTOM-4
PHANTOM-9
त्याने आपल्या थकलेल्या, लाल झालेल्या नजरेने स्क्रीनकडे पाहिलं. डोळ्यांवर झोप आणि शरीरात प्रचंड वेदना होत्या, पण हाताची बोटे थांबत नव्हती. डॅनियलने कीबोर्डवर शेवटचा कमांड एक्झिक्युट केला. क्षणार्धात एक नवीन सिग्नल ट्रेल जिवंत झाला आणि मुंबईच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत, वेगवेगळ्या सर्व्हर्सवर डॅनियलच्या व्हर्च्युअल फूटप्रिंट्स पसरल्या.
डॅनियलच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्या थकव्याच्या मागे एक वेगळंच समाधान होतं.
अचानक, त्याच्या मुख्य टर्मिनलवर एक नवीन इंटरसेप्ट चमकला. स्क्रीनवर अक्षरे उमटली:
MULTIPLE PHANTOM SIGNATURES DETECTED
RELAY AUTHENTICITY REVIEW ACTIVE
ते वाचून डॅनियल काही सेकंद जागच्या जागी स्थिर झाला. त्याचा श्वास थांबला. मग... मग तो अंधारातच हलकासा हसला. “शेवटी कळलं तुम्हाला...” तो स्वतःशीच कुजबुजला.
त्याने काही क्षणांसाठी डोळे मिटले. कारण त्याला आता पूर्णपणे समजलं होतं खेळ बदलला होता. 'ब्लॅक एम्बर'च्या लोकांना आता अखेर उमगलं होतं की, ते गेल्या काही तासांपासून मुंबईच्या ज्या सिग्नल्सचा पाठलाग करत होते, आरव आणि समीरची टीम तिथे असल्याचा जो त्यांना भास होत होता... त्यापैकी बहुतेक सिग्नल्स अस्तित्वातच नव्हते!
ते सगळे डॅनियलने तयार केलेले डिजिटल भास होते, 'फँटम सिग्नल्स' होते. त्याने शत्रूच्या संपूर्ण यंत्रणेला मुंबईच्या भुयारात एका मृगजळाच्या मागे पळत ठेवलं होतं.
पण त्याच वेळी... त्या समाधानाच्या क्षणापाठोपाठ त्याच्या टर्मिनलवर दुसरा अलर्ट चमकला:
PRIMARY RELAY SECTOR FLOODING
EXTRACTION ROUTE UNAVAILABLE
पाण्याच्या प्रवाहाचा वेग इतका वाढला होता की, काळं पाणी आता थेट तो उभा असलेल्या लोखंडी प्लॅटफॉर्मच्या कडेला, त्याच्या छातीपर्यंत पोहोचायला लागलं होतं. बाहेर पडण्याचा जो एकुलता एक आपत्कालीन मार्ग होता, तो पाण्याच्या प्रवाहाने पूर्णपणे गिळंकृत केला होता. आता तिथून जिवंत बाहेर पडणे अशक्य होते.
त्याने वरच्या बाजूला असलेल्या वेंटिलेशन शाफ्टच्या अंधाराकडे पाहिलं, जिथून पावसाच्या पाण्याचे लोट खाली कोसळत होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, आणि अत्यंत शांतपणे समोरचा टर्मिनल कायमचा बंद केला.
स्क्रीनचा प्रकाश विझला आणि खोलीत पुन्हा एकदा तोच रक्तासारखा लाल आणीबाणीचा प्रकाश पसरला.
डॅनियलने हवेतच हात उंचावला, आणि अत्यंत धीरगंभीर आवाजात म्हणाला, “चला...”
“...आता तुमची पाळी. "
************************************************************************************************************************
त्याच वेळी...
कुर्ला फ्रेट ग्रीडच्या खालच्या त्या अथांग, लाल रंगात न्हालेल्या भुयारात जणू वेळ थबकला.
आरवच्या जॅकेटच्या आतल्या खिशात ठेवलेल्या rugged relay unit अचानक एक तीव्र व्हायब्रेशन दिलं. त्या काळोखात तो थरथराट इतका स्पष्ट होता की, सगळे जण पाण्याच्या प्रवाहात जागच्या जागी खिळले.
कबीरचा चेहरा क्षणात बदलला, त्याच्या डोळ्यांतली चमक तीक्ष्ण झाली. तो दबलेल्या आवाजात म्हणाला, “A.D. recovery relay...”
आरवने तातडीने ते उपकरण बाहेर काढलं. पाण्याच्या थेंबांमुळे ओल्या झालेल्या त्या स्क्रीनवर एकच लाईल हिरव्या रंगात ब्लिंक होत होती: INBOUND LEGACY PACKET
मायाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पोर्टेबल युनिटवरून तो सिग्नल आयसोलेट केला. पण सॅटेलाईटच्या प्रवासातून आलेला तो पॅकेट पूर्णपणे उघडत नव्हता. पण त्या तुकड्यांमध्ये जे शब्द दिसत होते ते पाहून आरवचे डोळे विस्फारले.
INSURER TIMING WINDOWS
CASCADE SEQUENCE MAP
SUPERVISORY AUTHORIZATION LAYER
कबीर काही क्षण स्तब्ध होऊन त्या स्क्रीनकडे पाहत अतिशय खात्रीशीर आवाजात म्हणाला, “हि एलेना आहे.”
“तुला खात्री आहे?” आरवने विचारले.
कबीरने स्क्रीनवर बोट फिरवत पुरावे दाखवले, “Zurich supervisory markers... Legacy contingency formatting... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे A.D. relay routing... हे तिच्याशिवाय दुसरं कुणीच पाठवू शकत नाही.”
एलेनाने सिस्टीमशी गद्दारी करून 'ब्लॅक एम्बर'चा सर्वात मोठा गुप्त आराखडा थेट त्यांच्या हातात सुपूर्द केला होता.
मायाने त्या पॅकेटमधून मिळालेला मुख्य 'सिक्वेन्स मॅप' उघडला. स्क्रीनवर एका महाकाय कोळ्याच्या जाळ्यासारखा नकाशा उभा राहिला. मुंबई. सिंगापूर. भूमध्य समुद्र. इन्शुरन्स रिव्ह्यूज. कमोडिटी अॅडव्हायझरीज. जे तीन वेगवेगळे प्रदेश आणि सिस्टीम्स एलेनाला फ्रँकफर्टमध्ये दिसत होत्या, त्या आता आरवच्या स्क्रीनवर एकाच साखळीत जोडलेल्या दिसत होत्या.
“Fear spreads in intervals. Not continuously.” कबीरला अचानक वर्षांपूर्वी दुष्यंतने सांगितलेलं एक वाक्य विजेसारखं चमकलं.
त्याच क्षणी मायाने बाजूला दुसरी एक इंटरसेप्ट विंडो उघडली. शत्रूच्या अंतर्गत नेटवर्कमधील नवीन चॅटर त्यांच्या स्क्रीनवर वेगाने स्क्रोल होत होता.
MULTIPLE PHANTOM SIGNATURES DETECTED
PREVIOUS SIGNAL TRAILS NON-AUTHENTIC
कबीरने हळूच आपले डोळे मिटले आणि एक जड श्वास घेतला, “झालं.”
आरवच्या काळजाचा ठोका चुकला. “काय?”
कबीरने अतिशय हळू, जड आवाजात उत्तर दिलं, “त्यांना समजलं. डॅनियलने तयार केलेले सगळे रिले ट्रेल्स... सगळे फेक होते हे त्यांना अखेर समजलंय.”
डॅनियलने निर्माण केलेलं ते डिजिटल मृगजळ आता विरघळलं होतं. मायाचा चेहरा पूर्णपणे उतरला, ती घाबरून म्हणाली, “मग आता?”
कबीर काही क्षण शांत राहिला. त्याच्या हातातील शस्त्राची पकड घट्ट झाली, “आता ते आर्काइव्ह शोधतील. जिथे मूळ डेटा लपवलाय, त्या मुख्य केंद्रावर ते आता हल्ला करतील.”
विनायकराव पुढे झुकले, त्यांच्या डोळ्यांत आता वेळ संपत आल्याची जाणीव होती, “मग आपल्याकडे किती वेळ आहे?”
कबीरने मान हलवली, “त्यांना सिग्नल्स खोटे आहेत हे समजलंय, पण आर्काइव्ह कुठे आहे हे अजून माहीत नाही.”
आरव गोंधळला, “का? एवढ्या मोठ्या नेटवर्कला कसं माहीत नाही?”
या वेळी कबीर उत्तर देण्याआधी मायाच बोलली. ती त्या फ्रॅगमेंटेड लेअरकडे बोट दाखवत म्हणाली, “कारण आर्काइव्ह एका जागी नाहीच आहे, आरव! डेटा वेगळा आहे, त्याची राउटिंग वेगळी आहे, आणि त्याचं इंटरप्रिटेशन पूर्णपणे वेगळं आहे.”
कबीर म्हणाला, “डॅनियलने लोकेशन लपवली नाही... त्याने त्यांची सर्टनटी डिस्ट्रॉय केली.”
भुयारात काही क्षण फक्त त्या गढूळ पाण्याचा छपछप आवाज आणि वरून जाणाऱ्या गाड्यांचा कंप पावणारा नाद घुमत राहिला.
************************************************************************************************************************
जेएनपीटी फ्रेट मेन्टेनन्स ग्रीड
डॅनियल त्या लोखंडी प्लॅटफॉर्मवर काही क्षण पूर्णपणे स्थिर उभा राहिला. त्याच्या शरीरातली सगळी ताकद एकवटली होती. खाली गढूळ, काळं पाणी आता त्याच्या छातीवरून वर सरकत थेट प्लॅटफॉर्मच्या मुख्य इलेक्ट्रिकल जंक्शनपर्यंत पोहोचलं होतं. वायर्समधून निघणारे छोटे निळे ठिणग्यांचे आवाज पाण्यात मिसळत होते. मृत्यू अगदी काही इंचांवर होता.
त्याने समोरच्या बंद झालेल्या टर्मिनलकडे पाहिलं. आणि मग... पहिल्यांदाच त्याची नजर बाजूला असलेल्या आपत्कालीन एक्झिट लॅडरकडे गेली. ती लोखंडी शिडी वरच्या वेंटिलेशन शाफ्टकडे जात होती, जिथून उघड्या आकाशाचा एक छोटासा तुकडा आणि कोसळणारा पाऊस दिसत होता. तिथे जीवन होतं. तिथे सुटकेचा एक शेवटचा, अंधुक मार्ग होता.
काही सेकंद. फक्त काही सेकंद तो त्या शिडीकडे पाहत राहिला. मानवी स्वभावानुसार जगण्याची एक तीव्र ऊर्मी त्याच्या मनात दाटून आली.
पण दुसऱ्याच क्षणी, डॅनियलने एक दीर्घ, शांत श्वास घेतला. त्याच्या ओठांवर पुन्हा तेच हलकं हसू आलं. त्याने शिडीवरून आपली नजर कायमची हटवली आणि तो पुन्हा एकदा त्या पाण्याने वेढलेल्या टर्मिनलकडे वळला.
त्याला माहीत होतं की तो वर पोहोचण्याआधीच शत्रूचे कमांडोज त्याला टिपणार होते, किंवा सिस्टीम त्याला ट्रॅक करणार होती. पळून जाऊन काही मिनिटांचं आयुष्य मागण्यापेक्षा, या चक्रव्यूहाचा पायाच उखडून टाकणं जास्त महत्त्वाचं होतं.
त्याच्याकडे अजून एक काम बाकी होतं.
************************************************************************************************************************
त्याच वेळी... ईस्टर्न फ्रेट ग्रीड
आरव देशमुख, कबीर, माया सेन, समीर नायर आणि विनायकराव... अखेर त्या जुन्या, विसरल्या गेलेल्या मेन्टेनन्स गेटपर्यंत येऊन पोहोचले होते. समोर उभे असलेले ते प्रचंड लोखंडी गेट पूर्णपणे गंजलेले होते.
समीर नायरने एक पाऊल पुढे टाकले. त्याने आपल्या फ्लॅशलाईटचा पांढरा, तीक्ष्ण झोत त्या गेटच्या मुख्य लॉकिंग असेंब्लीवर टाकला. जसा दिव्याचा प्रकाश तिथे पडला, तसा समीरचा चेहरा तात्काळ बदलला. तो गंभीर झाला.
“हे मॅन्युअली सील केलंय.” समीरचा आवाज घुमला.
कबीरचा हात त्याच्या शस्त्रावर अधिक घट्ट झाला, तो म्हणाला, “उघडेल?”
समीरने काहीच उत्तर दिले नाही. तो पाण्यात खाली बसला. त्याचे अनुभवी हात आणि डोळे त्या गंजलेल्या लोखंडाचा अंदाज घेऊ लागले. त्याने लॉकिंग व्हील, प्रेशर हिंज आणि खालचा ड्रेनेज स्लॉट अत्यंत बारकाईने तपासला. वर कोसळणाऱ्या पावसाचे गढूळ पाणी त्या गेटच्या खालच्या फटीतून प्रचंड दाबाने आत झिरपत होते, ज्यामुळे तिथे एक वेगळाच तांत्रिक दाब निर्माण झाला होता.
काही सेकंदांच्या निरीक्षणानंतर समीरने मान वर केली आणि म्हणाला, “उघडेल...”
“...पण फोर्स करून नाही.”
जर त्यांनी त्यावर ताकद वापरली असती, तर ते गंजलेले लॉक कायमचे जाम झाले असते आणि ते तिथेच अडकले असते. समीरने शांत डोक्याने काम घ्यायचे ठरवले. त्याने ड्रेनेज स्लॉटमध्ये साचलेला जुना कचरा आणि ढिगारा आपल्या हाताने बाजूला करायला सुरुवात केली, जेणेकरून पाण्याचा दाब कमी होईल.
काही अत्यंत तणावाची मिनिटे निघून गेली. भुयाराच्या आत पाण्याचा प्रवाह वाढत होता, आणि मागे शत्रूच्या कमांडोजच्या बुटांचे आवाज जवळ येत असल्याचा भास होत होता.
आणि अचानक... एक मोठा सुस्कारा सोडल्यासारखा, गेटच्या दुसऱ्या बाजूचा प्रचंड तांत्रिक प्रेशर रिलीज झाला. ते अवाढव्य, गंजलेले यंत्र एका कर्कश आवाजात कुरकुरले आणि ते अवजड लोखंडी गेट हळूहळू एका बाजूला सरकायला लागले.
गेट सरकले आणि भुयारात साचलेल्या त्या दमट, कुबट हवेला चिरत बाहेरची ताजी, थंड हवा थेट त्यांच्या चेहऱ्यावर आदळली. त्या हवेने त्यांच्या शरीरात पुन्हा एकदा जाणीव जिवंत केली. दूरवर असलेल्या कंटेनर यार्डमधील धूसर, पिवळे दिवे पावसाच्या पडद्याआड अंधुक चमकताना दिसू लागले.
समीर बाजूला झाला आणि म्हणाला, “चला.”
ते पाचही जण एकामागून एक त्या काळोख्या मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर आले. समोर अथांग पसरलेले Eastern freight service yard होते.
वर आकाश अजूनही फाटलेले होते आणि पाऊस कोसळतच होता. कपडे ओलेचिंब झाले होते, शरीराचा कण न् कण थकला होता, पण अनेक तासांच्या त्या गुदमरवून टाकणाऱ्या काळोख्या भुयारी नरकानंतर... ते आज पहिल्यांदा खुल्या जागेत, उघड्या आकाशाखाली उभे होते.
कोसळणाऱ्या पावसात आणि कंटेनर यार्डच्या पिवळ्या, धूसर प्रकाशात मायाच्या हातातील सॅटेलाइट टॅबलेट पुन्हा एकदा तीव्रतेने व्हायब्रेट झाला.
तिने घाईघाईने फ्रँकफर्टहून एलेनाने पाठवलेल्या पॅकेटमधील timing windows चा डेटा पुन्हा स्क्रीनवर उघडला. त्याच सेकंदाला, जागतिक विमा कंपन्यांचे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचे नवीन थेट अलर्ट्स एकामागून एक स्क्रीनवर फ्लॅश होऊ लागले.
PRIORITY CLEARANCE SUSPENDED
FAST-TRACK REVIEW PAUSED
EXPEDITED COVERAGE HOLD
माया काही क्षण स्तब्ध होऊन त्या वेगाने बदलणाऱ्या स्क्रीनकडे पाहत राहिली. मग तिने या नवीन सिग्नल्सची एलेनाने पाठवलेल्या मूळ 'टायमिंग मॅप'शी तुलना करायला सुरुवात केली. जशी जशी ती डेटाची जुळवाजुळव करत गेली, तसा तसा तिचा चेहरा हळूहळू बदलत गेला. तिच्या डोळ्यांत एक नवी जाणीव उमटली.
ती ओरडली, “हे बघा...”
आरव, कबीर, समीर आणि विनायकराव तातडीने तिच्याभोवती गोळा झाले. समीरने पाऊस टॅबलेटवर पडू नये म्हणून त्यावर आपला हात धरला. स्क्रीनवर आंतरराष्ट्रीय वस्तू बाजारातील प्रतिक्रियांची साखळी स्पष्ट दिसत होती.
कालपर्यंत जे पॅटर्न्स आणि अल्गोरिदम्स संपूर्ण जगात एकाच वेळी, अत्यंत अचूकपणे एकमेकांशी सुसंगत चालत होते, ते आता पूर्णपणे विखुरले होते.
काही प्रमुख इन्शुरर्स पूर्णपणे थांबले होते; त्यांनी नवीन ट्रान्झॅक्शन्स पूर्ण ब्लॉक केली होती. काही अजूनही केवळ 'रिव्ह्यू मोड' मध्ये अडकून पडले होते, म्हणजेच ते पुढे काय करावे या निर्णयाप्रत पोहोचू शकत नव्हते. काही अडव्हायझरी चेन्स आता तासन्तास उशिराने धावत होत्या.
...तर काही छोटे राउटिंग डेस्क अजूनही त्या जुन्या, 'ब्लॅक एम्बर'च्या मूळ पॅटर्नवरच आंधळेपणाने चालत होते.
आरव डोळे बारीक करून त्या विस्कळीत झालेल्या आकृत्यांकडे आणि डेटाच्या तुकड्यांकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे ताणलेले स्नायू थोडे सैल झाले. तो म्हणाला, “त्यांना डायरेक्शन मिळत नाहीये...”
मायाने पावसात ओले झालेले आपले केस मागे सारत अत्यंत उत्साहाने मान डोलावली, “हो! अगदी बरोबर.
“एलेनाच्या टायमिंग विंडोजशिवाय हा बदल आपल्याला कधीच दिसला नसता,” माया टॅबलेटच्या स्क्रीनवरून बोट फिरवत म्हणाली. “जागतिक बाजारातल्या या ज्या चेन रिॲक्शन्स एकामागून एक कोसळत होत्या, त्या आता एकाच वेळी होत नाहीयेत. त्या विस्कळीत झाल्यात.”
विनायकराव शांतपणे समोर येणारे रिपोर्ट्स पाहत राहिले. पावसाचे मोठे थेंब त्यांच्या चष्म्यावर आदळत होते, पण त्यांचं लक्ष तिथं नव्हतं. त्यांनी नजर वर केली आणि दूरवर पसरलेल्या, अंधारात बुडालेल्या अथांग फ्रेट यार्डाकडे पाहत ते अत्यंत धीरगंभीर आवाजात म्हणाले, “त्यांचा रिदम तुटतोय.”
'ब्लॅक एम्बर' अजूनही प्रचंड शक्तिशाली होतं, त्यांच्याकडे अजूनही अख्ख्या जगाला वेठीस धरण्याची ताकद होती... पण इतिहासात पहिल्यांदाच, त्यांची ती अभेद्य आणि अचूक असलेली 'सिंक्रोनाइझ्ड रिॲक्शन इंजिन' आतून विस्कळीत झाली होती. त्यांच्या चालींमधला ताळमेळ सुटला होता.
त्याच क्षणी मायाच्या टॅबलेटवर एक नवीन इंटरसेप्ट चमकलं. शत्रूच्या अंतर्गत कम्युनिषेशन नेटवर्कमधील संदेश स्क्रीनवर स्क्रोल झाला:
MULTIPLE SEARCH TEAMS REDIRECTED
ARCHIVE LOCATION UNKNOWN
कबीर काही क्षण त्या गडद स्क्रीनकडे पाहत राहिला. पावसाच्या अंधारात त्याचे डोळे अधिक तीक्ष्ण झाले होते. तो शांतपणे म्हणाला, “ते आर्काइव्ह शोधत नाहीयेत.”
आरव तात्काळ त्याच्याकडे वळला, “म्हणजे?”
कबीरने यार्डाच्या वेशीकडे पाहत पुढे स्पष्ट केलं, “ते आर्काइव्ह कॅरिअर शोधतायत. ते आपल्याला शोधतायत.”
डॅनियलने आर्काइव्हचं स्वरूपच पूर्णपणे बदलून टाकलं होतं! त्याने डेटाचे असे तुकडे करून ते वेगवेगळ्या सिग्नल्समध्ये विखरून दिले होते, की मूळ चावी असल्याशिवाय कोणालाही त्याचा सुगावा लागणं अशक्य होतं.
दूर समुद्राच्या दिशेने पुन्हा एकदा तीव्र वीज चमकली. आणि कुठेतरी... जेएनपीटीच्या पाण्याने वेगाने भरत चाललेल्या त्या अंधाऱ्या रिले चेंबरमध्ये, प्लॅटफॉर्मच्या इलेक्ट्रिकल वायर्सच्या ठिणग्यांमध्ये वेढलेला डॅनियल, आपल्या जीवाची बाजी लावून अजूनही आरव आणि समीरसाठी वेळेचा एक-एक सेकंद मिळावा यासाठी त्याचा शेवटचा लढा अजून सुरूच होता.
मस्त , छान चालली आहे गोष्ट .
मस्त , छान चालली आहे गोष्ट . डॅनियल आणि इतर सगळेच यातून सुखरूप बाहेर पडुदे.
मस्त चालली आहे गोष्ट..
मस्त चालली आहे गोष्ट..

पूर्ण झाली की मगच प्रतिसाद देणार होते पण आज रहावलं नाही
डॅनियल ला मारु नका प्लीज