ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २०
पूर्वभाग
आरव देशमुख, माया सेन, कबीर आणि समीर नायर यांना कळतं की Black Ember संपूर्ण भूमिगत टनेल प्रणाली पाण्याने भरून त्यांना जिवंत पुरण्याचा प्रयत्न करत आहे.
समीरला जुन्या ब्रिटिशकालीन इमर्जन्सी बायपासची चिन्हं सापडतात, तर आरवला दुष्यंत देशमुखने वर्षांपूर्वी गुप्तपणे मार्क केलेला असा “ब्लाइंड रूट” सापडतो, जो आधुनिक surveillance systems च्याही नजरेआड राहिलेला असतो.
दरम्यान मुंबईत कृत्रिम भीती वेगाने पसरते; टीव्ही चर्चा, सोशल मीडिया spikes आणि विमा कंपन्यांच्या advisories यांच्या अचूक timing मधून लोकांच्या अनिश्चिततेला मुद्दाम वाढवलं जात असल्याचं मायाच्या लक्षात येतं.
डॅनियल अजूनही शत्रूच्या systems ला गोंधळात टाकण्यासाठी खोटे relay signals चालू ठेवतो, पण “West relay lost” हा संदेश ऐकताच टीमला समजतं की त्याचा अंतिम चकवा संपला आहे आणि तो कदाचित पकडला गेला किंवा मारला गेला आहे.
शेवटी पाणी वेगाने वाढत असताना आणि शत्रू अगदी जवळ येत असताना समीर टीमला एका अरुंद bypass corridor मध्ये घेऊन जातो.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २१ - Forced cascade
कुर्ला यार्डाच्या खालच्या त्या अरुंद 'फ्रेट बायपास कॉरिडॉर'मध्ये हवा अत्यंत दमट झाली होती. श्वास घेताना फुफ्फुसांवर ताण जाणवत होता. खाली गढूळ पाणी आता थेट त्यांच्या गुडघ्यापर्यंत यायला लागलं होतं, ज्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना शरीराची प्रचंड ताकद खर्च होत होती. काँक्रीटच्या ओलसर भिंतींवरून ओघळणारं पाणी आणि वरून जाणाऱ्या मालगाड्यांचा तो भयानक, कानठळ्या बसवणारा धातूचा आवाज भुयारात एकत्र मिसळत होता. तो आवाज थेट अंगावर काटा आणणारा होता.
त्याच क्षणी त्यांच्या डोक्यावरच्या लोखंडी छतातून एक जड धातूचा आवाज भुयारात घुमला. तो आवाज इतका मोठा होता की, संपूर्ण काँक्रीटची भिंत काही सेकंदांसाठी थरथरली. कबीर अंधारातच क्षणात सावध झाला, त्याचे हात त्याच्या शस्त्रावर अधिक घट्ट झाले. तो अत्यंत थंड आवाजात म्हणाला, “They sealed another exit.”
'ब्लॅक एम्बर'चे कमांडोज आता या भुयाराचे एक-एक करून सर्व Exits वेगाने सील करत होते. ते त्यांना एका विशिष्ट कोपऱ्यात ढकलून त्यांचा गेम संपवण्याच्या तयारीत होते.
दरवाजा बंद झाल्यामुळे भुयारातील पाण्याचा प्रवाह आता आणखीनच वेगाने वाढायला लागला होता. गुडघ्यापर्यंत आलेलं पाणी आता हळूहळू वर सरकत होतं. समीरने आपल्या हातातील सॅटेलाईट फोनवर काहीतरी तातडीने चेक केलं आणि क्षणात फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर आता वेळेची मर्यादा स्पष्ट दिसत होती.
तो घाईघाईने पुढच्या स्प्लिट जंक्शनकडे गेला, जिथे भुयाराचे दोन वेगवेगळे रस्ते पुढे फुटत होते. एक मार्ग खालच्या दिशेने जात होता. दुसरा मार्ग थोडा उंचावर जात होता.
समीरने आपल्या अनुभवाचा वापर केला आणि एक सेकंदही न दवडता, कोणतीही शंका न बाळगता त्याने थेट उंचावर जाणारा रस्ता निवडला.
आरवच्या मनात आलं की, खालचा रस्ता कदाचित मुख्य मार्गाला लवकर जोडत असेल, तो समीरला काही विचारणार इतक्यात समीरने अंधारात त्याच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत गंभीर शब्दात सांगितलं, “पाणी नॅचरली खाली जातं...आणि शत्रूने रचलेले ट्रॅप रूट्स पण!”
त्याच क्षणी त्या काळोख्या, अरुंद टनेलमध्ये दूरवरून एक तीक्ष्ण फ्लॅशलाईटचा पांढरा झोत चमकला. तो प्रकाश यावेळी खूपच जवळ होता, अगदी त्यांच्या दिशेनेच सरकत होता. मायाच्या छातीत धस्स झालं; शत्रूच्या कमांडोजचे बूट आता पाण्याच्या प्रवाहातून छपछप असा आवाज करत पुढे येत होते.
त्यांच्या डोक्यावरच्या वेंटिलेशन शाफ्टमधून शत्रूचा रेडिओ स्टॅटिक पुन्हा एकदा घुमला,
“Possible movement near lower bypass…”
“Thermal contact uncertain.”
कबीरच्या डोळ्यांत त्या अंधारातही एक चमक दिसली. तो म्हणाल, “डॅनियल अजूनही त्यांना गोंधळात टाकतोय…” जणू कबीरच्या त्या शब्दांना उत्तर द्यायलाच...दूरवरून, यार्डाच्या संपूर्ण पश्चिमेकडील भागातून अचानक एका महाकाय मालगाडीचा फ्रेट सायरन भयानक वेगाने घुमला. एक... आणि मग लागोपाठ दुसरा!
त्याच सेकंदाला, संपूर्ण वेस्टर्न मेन्टेनन्स ग्रीडमध्ये बसवलेले जुने, आणीबाणीचे दिवे एकापाठोपाठ एक तीव्र गतीने ब्लिंक व्हायला लागले, काँक्रीटच्या त्या ओल्या, गंजलेल्या भिंती आणि गुडघ्यापर्यंत साचलेलं पाणी आता त्या धोकादायक लाल प्रकाशाच्या परावर्तनाने चमकायला लागलं होतं. संपूर्ण भुयारात जणू रक्ताचा रंग पसरावा तसं वातावरण झालं होतं.
तो लाल प्रकाश पाहून विनायकराव थरथरत्या आवाजात उद्गारले, “देवा…”
आरवने विनायकरावांचा खांदा धरला, “काय? विनायकराव, काय झालं?”
विनायकराव काही सेकंद भिंतीवर पडणाऱ्या त्या लाल, अस्वस्थ करणाऱ्या ब्लिंकिंग रिफ्लेक्शन्सकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या चिंतेची जागा आता एका अवाक करणाऱ्या सत्याने घेतली होती. ते अत्यंत हळू, पण गंभीर आवाजात म्हणाले, “डॅनियल अजूनही जिवंत आहे.”
************************************************************************************************************************
फ्रँकफर्ट.
रात्र.
पाऊस सतत कोसळत होता. युरोपच्या या आर्थिक केंद्रातील काचेच्या उंच, महाकाय इमारतींवरून पाण्याचे प्रवाह वेगाने खाली वाहत होते. अठ्ठावीसाव्या मजल्यावरच्या त्या अत्यंत शांत, वातानुकूलित कॉन्फरन्स फ्लोअरवर... हवा वेगळीच, प्रचंड तणावाची झाली होती.
एलेना व्होल्कोव्ह समोरच्या डझनभर मॉनिटर्सच्या लकाकणाऱ्या स्क्रीन्सकडे पाहत अगदी स्थिर बसली होती. स्क्रीन्सवर जागतिक बाजाराचे क्लिष्ट नकाशे थरथरत होते; कमोडिटी व्होलॅटिलिटी मॅप्स, इन्शुरन्स क्लिअरन्स डिलेज, पोर्ट रिव्ह्यू चेन्स ...आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावर संपूर्ण युरोपचा गुप्त आर्थिक कारभार चालतो - झुरिच पोझिशन रिपोर्ट्स.
तिची तीक्ष्ण नजर एका स्पेसिफिक कॉलमवर जाऊन स्थिर झाली, जिथले आकडे वेगाने बदलत होते:
PRIORITY EXPANSION WINDOWS - ACTIVE.
एलेनाने सेकंदाचाही विलंब न लावता कीबोर्डवर बोटे चालवत पटकन दुसरा टर्मिनल उघडला. मग लागलीच तिसरा. ती वेगवेगळ्या सिस्टीममधील डेटा क्रॉस-चेक करू लागली. वेगवेगळ्या अंतर्गत निधींची खाती, वेगवेगळे राउटिंग डेस्क... पण या सगळ्यात एक अत्यंत धक्कादायक साम्य होतं, आयडेंटिकल टाइमिंग क्लस्टर्स. सर्वांची वेळ सेकंदाला सेकंद जुळत होती.
ते पाहून एलेनाचा श्वास जणू अर्ध्यावरच थांबला. कारण हे सेंट्रली शेड्युल्ड नव्हतं. मुख्य प्रवाहातून किंवा अधिकृत यंत्रणेकडून हे आदेश सुटलेले नव्हते.
याचा सरळ अर्थ एकच होता: ब्लॅक एम्बरचे काही झुरिच-लिंक्ड फंड्स कोणत्याही कोऑर्डिनेटेड ऑथरायझेशनशिवाय, कोणत्याही स्टँडर्ड सिक्वेन्सिंगशिवाय, अंतर्गत माहितीचा वापर करून स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतंत्रपणे प्रॉफिट पोझिशन्स बिल्ड करत होते.
स्क्रीनवर Mumbai volatility indicators अचानक धोक्याच्या लाल रंगात ब्लिंक व्हायला लागले.
मुंबईचा डेटा वेगाने फ्लॅश होत होता: पूर्व उपनगरे, विमा कंपन्यांमधील संभ्रम आणि भीतीचा आलेख वाढला, पेट्रोल पंपाबाहेरील अभूतपूर्व गर्दी.
एलेनाने तातडीने Internal relay logs ओढायला सुरुवात केली. इमर्जन्सी मॅरिटाइम रिव्ह्यूज, कमोडिटी हेजेस, प्रायव्हेट इन्शुरर ॲडव्हायझरीज... एकामागून एक फाईल्स तिच्या डोळ्यांसमोरून जात होत्या आणि अचानक तिचा चेहरा पूर्णपणे बदलला. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
कारण, काही पोझिशन्स तर... मुंबईच्या मार्केटमध्ये प्रत्यक्ष रिॲक्शन दिसण्यापूर्वीच एक्स्पँड झाल्या होत्या! जणू काही...कुणीतरी मुंबईत प्रेशर वाढणार, तिथे अराजकता माजणार आणि पुरवठा साखळी तुटणार हे आधीच गृहीत धरून बसलं होतं.
त्याच क्षणी कॉन्फरन्स रूमचा जड, काचेचा दरवाजा उघडला. ग्रे सूट घातलेला सिनियर अनॅलिस्ट घाईघाईने आत आला. त्याच्या हातात एन्क्रिप्टेड टॅब्लेट होता. त्याचा चेहरा कोरा असला तरी, डोळ्यांतील अस्वस्थता लपण्यासारखी नव्हती.
तो एलेनाच्या अगदी जवळ आला आणि अत्यंत मंद, सावध आवाजात म्हणाला, “झुरिच डेस्कवरून लेव्हरेज एक्स्पॅन्शनसाठी प्रचंड दबाव आणला जातोय.
त्यांनी बाजारात लावलेला सट्टा आणि पोझिशन्स आता दुप्पट-तिप्पट पटीने वाढवल्या जात होत्या.
एलेनाने स्क्रीनवरून आपली नजर हटवली आणि थेट त्याच्या डोळ्यांत पाहत विचारलं, “Authorized?”
तो अनॅलिस्ट आणखी पुढे झुकून अगदी हळू आवाजात म्हणाला, “Not through standard routing.”
यंत्रणेचे सर्व नियम, कायदे आणि प्रोटोकॉल्स बाजूला सारून बॅकडोअर एंट्री सुरू झाली होती. दूरवर असलेल्या सर्व्हर फ्लोअरचा तो यांत्रिक, अखंड गुंजन करणारा आवाज या शांततेत आता अधिकच स्पष्ट आणि भयानक ऐकू येत होता.
तेवढ्यात टेबलवर ठेवलेला तो एन्क्रिप्टेड फोन तीव्र लयीत व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर फक्त एकाच नावाचे कॅपिटल अक्षरे चमकत होती:
DIRECTOR.
एलेनाने काही सेकंद स्तब्ध होऊन त्या लकाकणाऱ्या स्क्रीनकडे पाहिलं. तिच्या कपाळावर घामाचे बारीक थेंब जमा झाले होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कॉल एक्सेप्ट केला.
त्यानंतर, तोच परिचित, थंड आणि भावनाशून्य आवाज खोलीत घुमला: “How unstable is Mumbai?”
एलेनाने तातडीने समोरच्या स्क्रीनवर इन्शुरर रिपोर्ट्स उघडले. तिथला डेटा सातत्याने बदलत होता. काही आंतरराष्ट्रीय कंपन्या क्लिअरन्स द्यायला उशीर करत होत्या, तर काही अजूनही 'वेट मोड'मध्ये शांत बसून होत्या. जमिनीवरची परिस्थिती आता पूर्णपणे विस्कळीत झाली होती, तिथे कोणतीही सुसूत्रता उरली नव्हती.
ती अत्यंत शांतपणे म्हणाली, “Regional synchronization slipping. काही इन्शुरर्स निर्णय घेण्यास उशीर करत आहेत, तर काही अजूनही वाट पाहत आहेत. कोणालाही पहिली चाल खेळायची घाई नाहीये.”
फोनवर काही सेकंद एक शांतता पसरली. पलीकडचा माणूस विचार करत होता. मग डायरेक्टरचा तोच कोरडा आवाज आला, “Then increase pressure.”
ते ऐकून एलेनाने धोक्याचा अंदाज लावला आणि म्हणाली, “करंट व्होलॅटिलिटी ऑलरेडी सफिशिएंट आहे. मुंबई आधीच हाताबाहेर चालली आहे.”
“Not for Zurich.”
त्या नंतर कॉन्फरन्स रूममधली हवा संपूर्ण बदलून गेली. एलेनाला समजलं होतं कि हा आता कोणताही कंट्रोल्ड एस्केलेशन राहिलेला नव्हता.
डायरेक्टरने पुढे आपला क्रूर आदेश दिला, “Advance the maritime review window. इन्शुरर टायमिंग आणखी कॉम्प्रेस करा.”
एलेना काही सेकंद पूर्णपणे शांत राहिली. तिची नजर समोरच्या व्होलॅटिलिटी चार्ट्सवर स्थिर झाली होती. मुंबईचे स्पाईक्स आता अनइव्हन, विखुरलेले आणि अस्ताव्यस्त दिसत होते. ते कोणत्याही सिस्टीमच्या कल्पनेनुसार प्रेडिक्टेबल नव्हते.
ती म्हणाली, “कॉम्प्रेस्ड टायमिंगमुळे आपली व्हिजिबिलिटी वाढेल. आपण सर्वांच्या नजरेत येऊ.”
डायरेक्टर शांतपणे म्हणाला, “शॉर्ट-टर्म व्हिजिबिलिटी एक्सेप्टेबल आहे, पण आपल्याला आपली पोझिशन गमवायची नाही.”
एलेना हळूहळू आपल्या मुख्य टर्मिनलकडे वळली, जेणेकरून डायरेक्टरच्या आदेशानुसार सिस्टीममध्ये बदल करता येतील. पण ती कीबोर्डवर बोटे ठेवणार, त्याच क्षणी एक नवीन, अनऑथराईज्ड रिले तिच्या स्क्रीनवर लाल रंगात फ्लॅश झाला:
ZURICH PRIORITY POSITION EXPANSION - CONFIRMED
तिचे डोळे विस्फारले आणि श्वास जागीच थिजला.
कारण त्या अत्यंत संवेदनशील रिलेवर खुद्द डायरेक्टरचे ऑथरायझेशन कोड्स नव्हते. सिस्टीमच्या मुख्य प्रमुखाला डावलून झुरिच डेस्कने परस्पर ही पोझिशन कन्फर्म केली होती.
याचा अर्थ होता 'ब्लॅक एम्बर' हे जागतिक नेटवर्क आता आतून विस्कळीत व्हायला लागलं होतं.
जागतिक आर्थिक बाजाराला आणि डिजिटल यंत्रणांना आपल्या बोटांवर नाचवणाऱ्या त्या अवाढव्य साम्राज्यात पहिल्यांदाच अंतर्गत बंडाळी माजली होती. वेगवेगळे फंड्स आता स्वतःच्या फायद्यासाठी वेगवेगळी गृहीतके मांडत होते, तर वेगवेगळ्या देशांतील राउटिंग डेस्क आपापल्या सोयीनुसार वेगवेगळे पॅनिक मॉडेल्स फॉलो करत होते.
नियंत्रण सुटत चाललं होतं. ज्या सिस्टीमची ताकद तिच्या अचूक आणि एकसंध सिंक्रोनायझेशनमध्ये होती, तीच सिस्टीम आज पहिल्यांदाच विस्कळीत दिसत होती. 'ब्लॅक एम्बर' स्वतःच्याच अक्राळविक्राळ आकाराच्या ओझ्याखाली दबायला लागलं होतं.
त्याच तणावाच्या क्षणी, एलेनाच्या मुख्य स्क्रीनवर मुंबईचा लाईव्ह फीड पुन्हा एकदा चमकला.
स्क्रीनवर पूर्व उपनगरातील एका पेट्रोल पंपाबाहेरची भयंकर, गोंधळाने भरलेली रांग दिसत होती. गाड्या एकमेकांवर आदळत होत्या, लोक पंपाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते, आणि बॅकग्राउंडला पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजत होते.
त्या थरकाप उडवणाऱ्या दृश्यांवर न्यूज अँकरचा तोच पांढरपेशा, नियंत्रित आवाज अजूनही ऐकू येत होता, “Authorities continue to deny any immediate shortage…
पण चॅनेलवर दिसणारे व्हिज्युअल्स काहीतरी वेगळंच, अत्यंत भयानक सत्य सांगत होते. सरकारी दावे आणि जमिनीवरची परिस्थिती यातली दरी आता सामान्य माणसालाही उघड्या डोळ्यांनी दिसत होती. प्रशासनाचा प्रत्येक नकार लोकांची भीती अधिकच दृढ करत होता.
एलेना काही सेकंद स्तब्ध होऊन त्या स्क्रीनकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर मुंबईच्या रस्त्यांवरचा तो गोंधळ आणि तिच्या स्क्रीनवर झुरिच डेस्कवरून अनऑथराईज्डली बदलणारे आकडे एकत्र फिरत होते.
तिने कीबोर्डवरून आपले हात बाजूला घेतले. तिचा चेहरा पूर्णपणे निर्विकार झाला आणि ती अतिशय थरथरत्या आवाजात स्वतःशीच कुजबुजली, “Reaction has detached from control…”
तिला खेळाचा अंतिम आणि सर्वात धोकादायक टप्पा समजला होता. 'ब्लॅक एम्बर'ने ज्या मानवी भीतीचा वापर करून हा खेळ सुरू केला होता, ती मानवी प्रतिक्रिया आता मूळ प्लॅनपासून, त्यांच्या नियंत्रणापासून पूर्णपणे वेगळी झाली होती.
तिच्या मुख्य टर्मिनलवर एक नवीन प्रायोरिटी रिले एका तीक्ष्ण आवाजासह उघडलं. स्क्रीनवर निळ्या आणि लाल रंगाचे सिग्नल्स वेगाने धावू लागले:
MARITIME REVIEW ACCELERATION - ACTIVE
डायरेक्टरने केवळ तोंडी आदेश दिला नव्हता, तर यंत्रणेत त्याची अंमलबजावणीही सुरू झाली होती. तिने कीबोर्डवर बोटे चालवत पटकन ते रिले खोलात जाऊन उघडून पाहायला सुरुवात केली.
आत असलेला डेटा म्हणजे जागतिक व्यापार साखळीचा गळा घोटणारा प्लॅन होता,
मालवाहू जहाजांच्या अधिकृत मंजुरीची वेळ इतकी कमी केली गेली होती, की तांत्रिक तपासणी पूर्ण होणे अशक्य व्हावे.
जहाजांवरील मालाची तातडीची आणि संशयास्पद तपासणीचे आदेश.
विमा कंपन्यांना जहाजांचा विमा तात्पुरता रोखून धरण्याच्या गुप्त सूचना.
वेगवेगळ्या बंदरांवर जहाजांची कोंडी करण्यासाठी तपासणीच्या नियमांची कडक अंमलबजावणी.
हा संपूर्ण डेटा जसजसा एलेनाच्या डोळ्यांसमोरून जात होता, तसतसा तिचा चेहरा हळू हळू पूर्णपणे पांढरा पडत गेला.
हे केवळ बाजारावर किंवा प्रशासनावर आणलेलं नेहमीचं साधे प्रेशर नव्हतं. हे एक Forced cascade होतं!
फोर्स्ड कॅस्केड... म्हणजे डोमिनो इफेक्टसारखी एकामागून एक घडणाऱ्या दुर्घटनांची अशी साखळी, जी जाणीवपूर्वक आणि सक्तीने सिस्टीममध्ये सुरू केली जाते. एका बंदरावर माल अडकला, की त्याचा परिणाम दुसऱ्या बंदरावर होतो; तिथे विमा कंपन्या हात झटकतात, त्यामुळे जहाजे समुद्रातच थांबतात. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचा पुरवठा एका झटक्यात ठप्प होतो आणि जमिनीवर पेट्रोल पंपांवर सुरू असलेल्या हाणामारीचे रूपांतर संपूर्ण देशात एका भीषण अराजकतेत होते.
एलेनाची बोटे कीबोर्डवर नाचू लागली. तिचा श्वास रोखला गेला होता, पण डोळे अत्यंत तीक्ष्ण नजरेने स्क्रीनवरील डेटाचा वेध घेत होते. डायरेक्टरने सुरू केलेल्या त्या 'फोर्स्ड कॅस्केड'च्या मागे दडलेला मूळ आराखडा शोधण्यासाठी ती आता तातडीने Secondary logs उपसून एकमेकांशी कंपेअर करू लागली.
जागतिक व्यापाराचे तीन अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील मार्ग तिच्या स्क्रीनवर उघडले गेले:
भूमध्य समुद्रातील जहाजांचे मार्ग आणि त्यांच्या मंजुरीचे अहवाल.
आशिया खंडातील सर्वात मोठे वाहतूक केंद्र असलेल्या सिंगापूर बंदराचे तांत्रिक कालावधी.
पश्चिम भारताच्या सागरी हद्दीत, विशेषतः मुंबईच्या किनाऱ्याजवळ खोळंबलेल्या जहाजांचा विमा डेटा.
आणि अचानक... त्या विखुरलेल्या आकड्यांमधून एक भयानक पॅटर्न एलेनाच्या डोळ्यांसमोर लख्खपणे उभा राहिला.
तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वेगवेगळे प्रदेश होते. वेगवेगळ्या प्रशासकीय आणि डिजिटल यंत्रणा होत्या. भूमध्य समुद्र, सिंगापूर आणि मुंबई यांचा भौगोलिक दृष्ट्या एकमेकांशी थेट संबंध नव्हता. पण तरीही, या तिन्ही ठिकाणी एकाच सेकंदाला, एकाच लयीत 'टायमिंग कॉम्प्रेस्ड' Same timing compression केलं जात होतं. प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी निर्णय प्रक्रियेचा वेग जाणीवपूर्वक रोखला जात होता. हे केवळ मुंबईत प्रेशर वाढवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. कुणीतरी संपूर्ण जगभर, एकाच वेळी, एकाच सेकंदाला ती मानवी अस्वस्थता आणि अनिश्चितता कृत्रिमरित्या सिंक्रोनाईज करत होतं.
अचानक एलेनाच्या त्या एन्क्रिप्टेड टर्मिनलवर एकामागून एक नवीन अंतर्गत संदेश वेगाने फ्लॅश व्हायला लागले. सिस्टीमच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून येणारे ते मेसेज धोक्याची घंटा वाजवत होते:
“झुरिच डेस्क त्यांचे आर्थिक दावे आणि जोखीम अजून वाढवत आहे.”
“लंडन डेस्ककडून बाजारातील ही अस्थिरता आणखी काही काळ वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.”
“त्यांच्या मुख्य आणि अतिसंवेदनशील पोझिशन्स अजूनही पूर्णपणे सुरक्षित झालेल्या नाहीत.”
ते संदेश वाचून एलेनाचा हात कीबोर्डवरून बाजूला झाला आणि ती श्वास घ्यायचेही विसरली. कारण 'ब्लॅक एम्बर' आता या जागतिक आणीबाणीला नियंत्रित करत नव्हतं.
यंत्रणेचा मूळ मास्टरप्लॅन आणि त्याचा उद्देश आता कुठेतरी मागे सुटला होता. त्यांचेच अंतर्गत फंड्स आणि वेगवेगळ्या देशांतील राउटिंग डेस्क आता या भयंकर परिस्थितीला स्वतःहून पुढे ढकलत होते. केवळ आणि केवळ अब्जावधी डॉलर्सचा स्वतःचा नफा आणि लावलेला सट्टा सुरक्षित ठेवण्यासाठी.
तिच्या मुख्य टर्मिनलवरून दूरवर असलेल्या सिस्टीमच्या गाभ्यातून सर्व्हर अलार्मचा एक मंद, पण अत्यंत अस्वस्थ करणारा आवाज घुमला. एका मुख्य मॉनिटरवर अचानक जागतिक कमोडिटीजचा लाईव्ह चार्ट एखाद्या ईसीजी लाईन्ससारखा वेड्यावाकड्या क्रॅश-स्पाइक पॅटर्नमध्ये थरथरायला लागला. आकडे इतक्या वेगाने बदलत होते की डोळ्यांना ते टिपणेही कठीण झाले होते.
एलेना खुर्चीच्या टोकावर आली, तिचे डोळे विस्फारले आणि ती स्वतःशीच कुजबुजली, “This is too fast…”
हा वेग मानवी नियंत्रणाच्या पलीकडला होता.
परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून तिने तातडीने कीबोर्डवर बोटे चालवत मुख्य 'डायरेक्टर रिले' उघडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून या वेगाला ब्रेक लावता येईल. No response.
तिने पुन्हा एकदा कमांड टाईप करून सिस्टीमला ping केलं. पण काहीच नाही... संपूर्ण शांतता.
कॉन्फरन्स फ्लोअरवर आता एक जड आणि अतिशय विचित्र शांतता पसरली होती. बाहेरच्या विजांचा कडकडाट आणि पाऊस चालूच होता, पण या खोलीच्या आत जागतिक अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवू पाहणारं ते अवाढव्य डिजिटल नेटवर्क आता internally overload व्हायला लागलं होतं. सिस्टीमचेच वेगवेगळे राउटिंग डेस्क एकमेकांविरुद्ध अल्गोरिदम्स चालवत होते.
एका लोकल चॅनेलवर पूर्व उपनगरातील पेट्रोल पंपाबाहेरच्या प्रचंड गोंधळाचे तेच shaky mobile footage लाईव्ह चालू होते. न्यूज अँकर अजूनही वरच्या पातळीवरून आलेली स्क्रिप्ट वाचत अत्यंत नियंत्रित, पांढरपेशा आवाजात सांगत होता,
“Authorities continue to insist supply remains stable… There is no reason to panic.”
पण... अँकरच्या त्या खोट्या शब्दांच्या पार्श्वभूमीवर स्क्रीनवर थेट दिसणारे व्हिज्युअल्स काहीतरी वेगळंच दाखवत होते:
तासन्तास रांगेत उभे राहून धीर सुटलेले, हॉर्न वाजवून गोंधळ घालणारे आणि एकमेकांशी हुज्जत घालणारे वाहनचालक.
हायवेच्या नाक्यांवर आणि बंदरांच्या बाहेर अंतर्गत सिस्टीम ब्लॉक झाल्यामुळे अडकून पडलेल्या इंधन टँकर्सच्या लांबच लांब रांगा.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पंपांवरील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लावलेले तातडीचे बॅरिकेड्स.
यंत्रणेने तयार केलेला अधिकृत नॅरेटिव्ह आणि जमिनीवरची क्रूर रिॲलिटी आता दोन पूर्णपणे परस्परविरोधी दिशांना धावत होते. हा संभ्रम आता लोकांच्या मनातून उतरून थेट रस्त्यावरच्या हाणामारीत बदलला होता.
ते फुटेज पाहताना एलेनाचा श्वास जड झाला. तिच्या डोळ्यांत आता भीती स्पष्ट दिसत होती. कारण जे सत्य तिला आतापर्यंत केवळ सिस्टीमच्या आकड्यांमध्ये दिसत होतं, ते आता जगाच्या नकाशावर उघडं पडलं होतं.
जर हा सागरी वेढा, हा maritime cascade लंडन आणि झुरिचच्या डेस्कने स्वतःचा नफा वाचवण्यासाठी असाच आणखी आक्रमकपणे पुढे ढकलला... तर त्याचा परिणाम केवळ डिजिटल जगापुरता मर्यादित राहणार नव्हता.
आता आंतरराष्ट्रीय बाजारातील निव्वळ सट्टेबाजी संपली होती. हा आता केवळ डिजिटल स्क्रीनवर खेळला जाणारा आर्थिक नफा-तोट्याचा बाजारू खेळ उरला नव्हता.
आता खरोखरच्या पुरवठा साखळीचे तुकडे पडायला सुरुवात होणार होती.
वेगवान....
वेगवान....
मस्त चालली आहे कथा.... लवकर
मस्त चालली आहे कथा.... लवकर काहीतरी पॉसिटीव्ह घडू दे
लवकर काहीतरी पॉसिटीव्ह घडू दे
लवकर काहीतरी पॉसिटीव्ह घडू दे >>>> +१