ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ९
पूर्वभाग
माया सेन आणि कबीर सिंगापूरमधील सेफहाऊसमधून पळण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना वरून आणि खाली दोन्ही बाजूंनी घेरलं गेल्याचं लक्षात येतं.
कबीरच्या अनुभवामुळे ते सापळ्यातून निसटतात आणि एअर डक्ट्स व ब्लाइंड स्पॉट्स वापरत कंटेनर यार्डपर्यंत पोहोचतात.
लपलेल्या ऑफिसमध्ये कबीर मायाला Black Ember च्या खऱ्या खेळाचं गणित दाखवतो, वेगवेगळ्या देशांतील “अपघात” प्रत्यक्षात बाजारात भीती आणि प्रचंड नफा निर्माण करण्यासाठी आखलेली साखळी होती.
मायाला समजतं की JNPT मधील विलंब हा अंतिम उद्देश नसून, लोकांच्या मनात मोठी घबराट निर्माण करण्यासाठी अजून मोठा “visible disaster” घडवण्याची तयारी सुरू आहे.
शेवटी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एका ब्लिंक करणाऱ्या मार्करकडे पाहत कबीर भीतीने सांगतो की पुढचं लक्ष्य अशी रिफायनरी आहे, जिचा विध्वंसही जगाला फक्त एक अपघात वाटेल.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर – भाग १० - VISUAL EVENT
मुंबई.
दुपार जवळ येत होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर उष्णतेची एक जड, गुदमरवून टाकणारी लाट पसरली होती. टॅक्सींचे हॉर्न, शटल बसेसचे हायड्रॉलिक ब्रेक्स, ट्रॉलीच्या चाकांचा सिमेंटवर घासणारा आवाज आणि लाऊडस्पीकरवर होणाऱ्या सुरक्षेच्या घोषणा बाहेर सगळं काही रोजच्यासारखं, नेहमीच्याच गतीने चालू होतं.
तो टर्मिनलमधून शांतपणे बाहेर आला. लांबच्या प्रवासाने थकलेल्या एखाद्या सामान्य प्रवाशासारखा तो दिसत होता. त्याच्या हातात फक्त एक साधी, काळ्या रंगाची बॅग होती.
कित्येक वर्षांनंतर तो पुन्हा एकदा मुंबईच्या भूमीवर उभा होता. शहर बदललं होतं. काचेचे उंच टॉवर्स, नवनवीन उड्डाणपूल, विमानतळाचे आधुनिक कॉरिडोअर्स; पण येथील हवा मात्र तशीच होती... ओलसर, जड आणि कुठेतरी आत खोल लपलेल्या गंजाच्या वासाने भरलेली.
डॅनियलने टॅक्सीच्या मुख्य रांगेकडे न जाता, टर्मिनलच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस लेनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. चालताना त्याची नजर आजूबाजूच्या काचांवर आणि रिफ्लेक्शन्सवर फिरत होती; पार्क केलेल्या गाड्या, बसेसच्या खिडक्या आणि इमारतींचे ग्लास पॅनेल्स. तो थेट मागे वळून पाहत नव्हता, तर काचेतील हलत्या सावल्यांचा अंदाज घेत होता.
त्याला कुठेही उघड पाळत ठेवली असल्याचं दिसत नव्हतं. पण त्याला एक जुना नियम माहिती होता व्यावसायिक पाळत ठेवणारी माणसं कधीच दिसत नाहीत; त्यांचे फक्त 'पॅटर्न्स' जाणवतात.
तो विमानतळाच्या जुन्या पार्किंग ब्लॉकजवळ येऊन थांबला. काँक्रीटच्या पांढऱ्या भिंतींवर पावसाचे काळे, जुने डाग उतरले होते. वरच्या मजल्यावर कुठेतरी एक्झॉस्ट फॅनचा एक मंद, एकसुरी आवाज घुमत होता.
डॅनियलने खिशातून एक छोटा, घडी केलेला कागदाचा तुकडा बाहेर काढला. दुष्यंतने पाठवलेला निरोप. त्यावर फक्त काही मोजके शब्द लिहिलेले होते:
LOCKER 317
TIDE WINDOW
D. DOESN’T TRUST POLICE
डॅनियल काही क्षण त्या शब्दांकडे पाहत राहिला. दुष्यंतची ही जुनी सवय होती; तो आपली माहिती नेहमी अशा तुकड्या-तुकड्यांमध्ये ठेवायचा. पूर्ण चित्र नेहमी धोकादायक असतं, पण हे छोटे तुकडे माणसाला जिवंत ठेवतात. त्याने तो कागद पुन्हा खिशात सुरक्षित ठेवला.
तेवढ्यात, त्याच्या तीक्ष्ण नजरेला पार्किंगच्या प्रवेशद्वारापाशी काहीतरी अस्वाभाविक जाणवलं. एक काळ्या रंगाची एअरपोर्ट शटल बस तिथे येऊन थांबली. त्यातून दोन मेंटेनन्स वर्कर्स खाली उतरले.
दिसताना ते अतिशय सामान्य दृश्य होतं. पण त्यांच्या हालचाली मात्र सामान्य नव्हत्या. त्यांनी एकमेकांकडे पाहिले नाही, की ते परस्परांशी एक शब्दही बोलले नाहीत. पण ते दोन वेगवेगळ्या दिशांना जात असतानाही, त्यांच्या चालण्यामध्ये एक सूक्ष्म आणि अचूक समन्वय होता.
डॅनियल तिथेच पूर्णपणे स्थिर उभा राहिला. त्याची नजर त्यांच्या बुटांवर गेली. इंडस्ट्रियल-ग्रेड सोल्स, एकदम नवे आणि गरजेपेक्षा जास्त स्वच्छ.
विमानतळाचा नियमित मेंटेनन्स स्टाफ कधीच इतका शिस्तबद्ध आणि कोऑर्डिनेट्स दिसत नाही.
तो शांतपणे पार्किंग ब्लॉकच्या आत शिरला. पण त्याने लिफ्टकडे न जाता, थेट सर्व्हिस स्टेअरकेसचा रस्ता पकडला. जुन्या सवयी. जुन्या चुका टाळण्यासाठी. तो दोन मजले वेगाने वर चढला आणि जिन्याच्या वळणावर थांबून त्याने खाली पाहिले. त्या दोन मेंटेनन्स वर्कर्सपैकी एक जण जिन्याच्या प्रवेशद्वाराजवळून अत्यंत शांतपणे पुढे निघून गेला. पण चालताना त्याची नजर संपूर्ण कॉरिडॉर स्कॅन करत होती. काही सेकंदांनी, दुसरा वर्कर दुसऱ्या कोनातून समोरच्या रस्त्यावर दिसला. क्रॉस-अँगल कव्हरेज. त्या लोकांनी डॅनियल मागचा जिना वापरण्याची शक्यता आधीच गृहीत धरली होती.
डॅनियलच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक हलकी रिअॅक्शन उमटली. आदराची भावना. हे कोणी नवखे नव्हते.
तो वरच्या मजल्यावरच्या अर्धवट उघड्या सर्व्हिस कॉरिडॉरमध्ये शिरला. तिथे अंधुक, पिवळा प्रकाश होता. एका बाजूला क्लीनिंग सप्लाइजचे मोठे डबे होते आणि दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकल कॅबिनेटच्या बंद लोखंडी पेट्या.
तो कॉरिडॉरच्या शेवटच्या काचेच्या खिडकीपाशी जाऊन थांबला. तिथून खालचा संपूर्ण विमानतळ परिसर त्याला स्पष्ट दिसत होता; धावणाऱ्या गाड्या, शटल बसेस आणि प्रवाशांचा संथ प्रवाह. आणि नेमकी त्याच वेळी, त्याच्या नजरेला ती गाडी दिसली.
टर्मिनलच्या बाहेर असलेल्या सर्व्हिस रोडवरून एक गडद राखाडी रंगाची स्कोडा हळूहळू पुढे सरकत होती. डॅनियलने डोळे निमुळते करून तिची नंबर प्लेट पाहण्याचा प्रयत्न केला, पण या अंतरावरून ते शक्य नव्हतं.
पण... गाडीच्या मागच्या काचेच्या कोपऱ्यात एक छोटासा मार्किंग त्याला स्पष्ट दिसला: TW-17
डॅनियलचे शरीर क्षणात गोठले. त्याच्या डोक्यात कित्येक वर्षांपूर्वीची एक जुनी आठवण विजेसारखी चमकून गेली. ती रात्र... तो ओलसर, दमट बंदराचा किनारा... दूर समुद्रात अंधारात उभं असलेलं ते महाकाय जहाज... आणि त्याच्या शेजारी उभा असलेला दुष्यंतचा तो गंभीर आवाज:
“डॅनियल, हे TW-markers कधीच नुसती वॉर्निंग नसतात... ते अचूक 'टायमिंग' असतं.”
डॅनियलचा श्वास मंद झाला. त्याने पुन्हा एकदा खाली रस्त्याकडे पाहिले. ती राखाडी स्कोडा आता विमानतळाच्या नेहमीच्या ट्रॅफिकमध्ये पूर्णपणे मिसळली होती. जणू ती गाडी तिथे कधी अस्तित्वातच नव्हती.
याचा अर्थ स्पष्ट होता, विलंबाची साखळी सुरू झाली होती. सुरक्षेचे आणि पाळत ठेवण्याचे लेअर्स सक्रिय झाले होते ...आणि कुठेतरी एका मोठ्या विनाशाची तयारी आधीच पूर्ण झाली होती.
नेमक्या त्याच क्षणी, त्याच्या जॅकेटच्या खिशात असलेला तो छोटा, जुना बर्नर फोन प्रचंड वेगाने व्हायब्रेट झाला.
फोनवर फक्त एकच एनक्रिप्टेड लाईन चमकत होती: WEST COAST RESPONSE INSUFFICIENT.
ते वाक्य वाचताच डॅनियलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण त्या कोड वर्डचा अंतिम अर्थ त्याला अचूक माहिती होता.
बंदरांवर निर्माण केलेला तो तांत्रिक उशीर त्यांच्या मोहिमेसाठी पुरेसा ठरला नव्हता. भारतीय share market कोसळले नव्हते.
याचा अर्थ... Black Ember आता त्यांचा पुढचा, अंतिम टप्पा अॅक्टिव्हेट करणार होतं.
आणि डॅनियलला ठाऊक होतं, की जेव्हा ब्लॅक एम्बरचा तो पुढचा टप्पा सुरू होतो... तेव्हा तांत्रिक उशीर किंवा कागदपत्रांचे खेळ संपतात.
त्या टप्प्यात... फक्त प्रत्यक्ष रक्त सांडतं.
मुंबई.
दुपारचे एक वाजून सतरा मिनिटे झाली होती.
बंदर परिसरावर उन्हाची एक पांढरट, कडक झळ उतरली होती. कंटेनर यार्ड्समधल्या अजस्र धातूच्या भिंतींवरून उष्णतेच्या लाटा वर उठताना दिसत होत्या. ट्रकांच्या अखंड, न संपणाऱ्या रांगांमधून हॉर्नचे कर्कश आवाज घुमत होते.
आरव देशमुखला आता हे बाहेरचे जग खूप दूर वाटत होते. गाडीच्या आत पसरलेली ती सुन्न शांतता बाहेरच्या गोंगाटापेक्षा जास्त धोकादायक होती.
समीर नायर स्टिअरिंग व्हील घट्ट पकडून बसला होता. त्याची तीक्ष्ण नजर सतत हायड्रॉलिक हालचालींसारखी फिरत होती: गाड्यांचे साईड मिरर्स, ब्लॉक झालेल्या ट्रॅफिक लेन्स, इमर्जन्सी वाहनांचे मार्ग, बंदराचे मुख्य अॅक्सेस रूट्स ...आणि विनायकराव. ते नेहमीप्रमाणे खिडकीबाहेर पाहत शांत बसले होते. पण त्यांच्या त्या नेहमीच्या शांततेत आज एक अनाकलनीय अस्वस्थता दडली होती.
तेवढ्यात समीरचा फोन पुन्हा एकदा जड आवाजात व्हायब्रेट झाला. त्याने स्क्रीनवर नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग हळूहळू उडून गेला.
“आता काय झालं?” आरवने तातडीने विचारले.
समीरने एक खोल श्वास घेतला, “वेस्टर्न कॉरिडोअर फ्युएल फ्युचर्सवर अचानक अनपेक्षित आणि संशयास्पद मूव्हमेंट सुरू झालीये.”
आरव गोंधळला, “म्हणजे नक्की काय?”
खिडकीबाहेर पाहत विनायकरावांनी अत्यंत थंडपणे उत्तर दिले “कोणीतरी बाजारात निर्माण होणाऱ्या संभाव्य 'पॅनिक'वर आधीपासूनच आपली पोझिशन्स बिल्ड करतंय, आरव.”
गाडीत काही क्षण एक सुन्न शांतता पसरली. समीर स्टिअरिंग वळवत अचानक म्हणाला, “सर, हे आता साधं मार्केट प्ले वाटत नाहीये.”
विनायकरावांनी होकारार्थी हलकीच मान डोलावली, “कारण हे मार्केट प्ले नाहीच आहे, समीर. ही 'स्टेज्ड इन्स्टॅबिलिटी' आहे... जाणीवपूर्वक घडवून आणलेली अस्थिरता.”
समीरने गाडी वेगाने पोर्ट अॅक्सेस रोडच्या दिशेने वळवली. समोर आता कोस्ट वाहनं दिसायला लागली होती. काही पोलिसांच्या जिप्स आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स व्हॅन्स तिथे तैनात होत्या. हे सगळं खूप गुपचूप पद्धतीने सुरू होतं, पण त्यांची संख्या सातत्याने वाढत होती.
याचा अर्थ शहर अजून पूर्णपणे पॅनिकमध्ये नव्हतं... पण सिस्टीम कुठेतरी आतून सावध व्हायला लागली होती.
आरवने अखेर न राहवून विचारले, “समीर, आपण नक्की कुठे चाललोय?”
समीरने थेट उत्तर दिले नाही. तो काही सेकंद समोरच्या रस्त्याकडे पाहत राहिला, मग म्हणाला, “हार्बर कंट्रोल साईड.”
“का? तिथे काय आहे?”
समीरचा आवाज आता खूपच मंद आणि गंभीर झाला होता, “कारण जर कोणीतरी सिस्टीममध्ये घुसून मॅरीटाईम अलर्ट्स मॅनिप्युलेट करत असेल... तर बंदराच्या आतून कोणीतरी त्यांना नक्कीच मदत करतंय.”
आरवच्या छातीतली धडधड आता वाढू लागली होती. तेवढ्यात समीरचा फोन एका विशिष्ट इमर्जन्सी टोनसह पुन्हा वाजला. समीरने एका सेकंदात कॉल उचलला.
“हो, बोला.”
दुसऱ्या बाजूने कोणीतरी कमालीच्या वेगाने बोलत होते. ते ऐकताना समीरचा चेहरा क्षणाक्षणाला बदलत गेला.
“कोणती फॅसिलिटी?... आणि कम्युनिकेशन लॉस नक्की किती वेळापासून आहे?” समीरने एकामागून एक प्रश्न विचारले. गाडीत पुन्हा भीतीदायक शांतता पसरली. आरव गाडीच्या सीटवर ताठ बसला.
दुसऱ्या बाजूने अजून काहीतरी महत्त्वाचे बोलले गेले. ते ऐकून समीर अतिशय मंद आवाजात म्हणाला, “इमर्जन्सी शटडाऊन ट्रिगर झालं का?”
त्याने हताशपणे डोळे बंद केले. कॉल कट झाला.
गाडीत काही सेकंद कोणीच एक शब्दही बोलले नाही. मग आरवने भीतीने विचारले, “काय झालंय? काही समजलं?”
समीरने विंडशील्डमधून दूर समुद्राच्या क्षितिजाकडे पाहिले, “ऑफशोर फ्युएल ट्रान्सफर युनिटचा मुख्य केंद्राशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलाय.”
आरवचा घसा कोरडा पडला, “म्हणजे रिफायनरी?”
“रिफायनरीशी लिंक असलेलं मरीन युनिट, तिथे Pressure fluctuation रिपोर्ट झालं होतं.”
विनायकरावांनी लगेच वळून विचारले, “अचूक fluctuation होतं, की ती केवळ एक 'फॉल्स टेलिमेट्री' आहे?”
समीरने विनायकरावांच्या दिशेने पाहिले. पहिल्यांदाच समीरच्या चेहऱ्यावर एकाच वेळी संशय आणि अनिश्चितता दिसत होती. “सर, अजून काहीच माहीत नाही.”
आता पहिल्यांदाच विनायकरावांसारख्या माणसाकडेही या संकटाचे स्पष्ट उत्तर नव्हते.
समोरची वाहतूक अचानक ठप्प झाली. ब्रेक लाईट्सची एक लालभडक साखळी रस्त्यावर पसरली आणि पाठोपाठ कर्णकर्कश हॉर्नचे आवाज एकमेकांत मिसळू लागले. कारण अगदी समोर होतं, एक अजस्त्र टँकर ट्रक ऐन लेनमध्ये बंद पडला होता. त्याचा ड्रायव्हर खाली उतरून हताशपणे हातवारे करत होता, तर मागे अडकलेले वाहनचालक चिडून ओरडत होते. कुणीतरी शिवी हासडली, तर कुणीतरी संतापाने हॉर्नवर हात दाबून धरला.
मुंबईच्या बंद ररस्त्यांवर हे चित्र नवीन नव्हतं. या रोजच्या कटकटीकडे इथे कोणी दुसऱ्यांदा वळूनही पाहत नाही. पण... या वेळचं टाइमिंग अजिबात सामान्य नव्हतं.
समीर नायरच्या चेहऱ्यावरचा ताण एका क्षणात वाढला. त्याने सावधपणे रिअर-व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. पुढे टँकर... मागे वेगाने वाढणारी वाहनांची रांग... आणि दोन्ही बाजूंनी आकसणारी जागा.
“हे नैसर्गिक नाही,” समीर स्वतःशीच पुटपुटला. त्याने अत्यंत कौशल्याने स्टीअरिंग फिरवलं आणि गाडी बाजूच्या एका अरुंद जागेतून पुढे काढली. एका बंद कंटेनर यार्डच्या कंपाऊंड वॉलला घासून गाडी जेमतेम पुढे सरकली. दोन इंच जरी गणित चुकलं असतं, तर साईड मिरर जागेवरच तुटला असता. आणि नेमक्या त्याच क्षणी, त्याच्या हातातला फोन एका मोठ्या फ्लॅशने चमकला. स्क्रीनवर अचानक लाल उजेड पसरला:
FLASH PRIORITY ALERT
समीरने स्क्रीनवर नजर टाकली आणि त्याचं उरलं सुरलं अवसान गळालं.
आरव देशमुख नकळत पुढे झुकला. फोनच्या स्क्रीनवर लाल रंगात काही मोजकेच शब्द चमकत होते:
UNCONFIRMED FIRE
WEST COAST TRANSFER FACILITY
VISUAL VERIFICATION PENDING
“नाही…” त्याचा आवाज भीतीने कोरडा पडला, “हे... हे असं नाही होऊ शकत.”
समीरची नजर अजूनही त्या स्क्रीनवरच खिळलेली होती. त्याचा आवाज आता केवळ कुजबुजण्याइतका मंद, पण तितकाच गंभीर झाला होता, “खेळ पुढच्या टप्प्यात गेलाय.”
विनायक राऊतने कसलाही विचार न करता तातडीने खिडकीची काच खाली सरकवली. मुंबईची ओलसर, खारी हवा आत आली. तो डोळे फाडून बाहेर पाहू लागला.
दूर, अथांग समुद्राच्या पलिकडे आकाशात एक काळसर पट्टा हळूहळू वर चढताना दिसत होता. सुरुवातीला तो पावसाचा एखादा साधा ढग वाटत होता. पण पाहता पाहता त्याचा रंग बदलू लागला...
आधी करडा... मग गडद... आणि शेवटी भयानक, कोळशासारखा काळा!
तो वादळाचा ढग नव्हता, तर तो एक अवाढव्य धुराचा लोळ होता. कुठेतरी महाभयंकर आग लागली होती आणि त्या आगीच्या धुराची उंची सेकंदासेकंदाला आकाशाकडे झेपावत होती.
आरव गाडीच्या सीटवर पूर्णपणे खिळल्यासारखा स्थिर झाला. त्याच्या छातीतली धडधड एवढी वाढली होती की बाहेर पोलिसांचे आणि रुग्णवाहिकांचे सुरू झालेले सायरन्स त्याला क्षणभर ऐकूच आले नाहीत. मग अचानक... संपूर्ण परिसरात एकाच वेळी अनेक इमर्जन्सी सायरन्स भयानक आवाजात घुमायला लागले. एक नाही, दोन नाही, अनेक सायरन्सचा आवाज एकमेकांत मिसळत होता. आणि त्या भीषण क्षणी, आरवला पहिल्यांदाच ब्लॅक एम्बरचे ते संपूर्ण स्पष्टपणे दिसले.
बंदरांवर निर्माण केलेला तो विलंबाचा खेळ केवळ एक सुरुवात होती, संपूर्ण व्यवस्थेला आणि बाजारपेठेला या धक्क्यासाठी तयार करण्यासाठी.
खरी घबराट आता या आगीनंतर सुरू होणार होती.
मुंबई.
दुपारचे दोन वाजून नऊ मिनिटे झाली होती.
दक्षिण मुंबईच्या आकाशावर आता समुद्राकडून येणाऱ्या धुराचा एक करडा, विषारी पडदा पसरायला लागला होता. लोकांच्या फोनवर न्यूज अलर्ट्सचा अक्षरशः पाऊस पडत होता:
WEST COAST FIRE INCIDENT
MARITIME FUEL TRANSFER UNIT UNDER EMERGENCY
घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर अजून उघडपणे पॅनिक पसरलेलं नव्हतं, पण तिथली हवा मात्र पूर्णपणे बदलली होती. पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा वाढू लागल्या होत्या, लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून फोनवर ओरडून बोलत होते... आणि बाजार? शेअर बाजार आधीच या धक्क्याला अत्यंत हिंस्त्रपणे प्रतिक्रिया द्यायला लागला होता. आलेख कोसळत होते.
आरव देशमुख, समीर नायर आणि विनायकराव आता दक्षिण मुंबईतल्या एका जुन्या, बंद असलेल्या कमर्शियल बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर एकत्र आले होते.
समीर खिडकीच्या फटीतून खाली रस्त्यावरची हालचाल टिपत उभा होता. “पोर्ट्सवर प्रचंड प्रेशर वाढतंय,” तो अत्यंत मंद आवाजात म्हणाला, “त्यांच्या इंटरनल सिस्टीम मध्ये पूर्णपणे गोंधळ सुरू झालाय.”
विनायकराव शांतपणे एका जुन्या लाकडी टेबलाजवळ बसले होते. त्यांच्यासमोर तीन गोष्टी मांडलेल्या होत्या; एक पेन ड्राईव्ह, एक मायक्रो एसडी कार्ड आणि एक जुना, ऑफलाईन लॅपटॉप.
आरव त्यांच्या समोर उभा होता, पण त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही समुद्रात उठलेल्या त्या काळ्या धुराच्या स्तंभाचे भयानक चित्र सतत फिरत होते.
तेवढ्यात... बाहेरच्या शांत कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज घुमला. समीर एका सेकंदात ताठ झाला. त्याचा हात जॅकेटच्या आत लपवलेल्या शस्त्राकडे गेला. ती पावलं जिन्यावरून वर येत होती. मंद. कमालीची सावध. जपून टाकलेली. मग, त्या जुन्या लाकडी दारावर तीन हलक्या टकटक झाल्या. खोलीतली हवा एका क्षणात सुन्न झाली.
समीरने दाराच्या अगदी जवळ जाऊन अत्यंत हळू आवाजात विचारले, “कोण आहे तिथे?”
काही सेकंद पलीकडून कोणतेही उत्तर आले नाही. मग बाहेरून एक शांत, प्रगल्भ इंग्रजी आवाज ऐकू आला: “Dushyant never trusted primary exits.”
ते ऐकताच आरवचा श्वास तिथेच अडकला. विनायकरावांनी आपले झुकलेले डोळे चमकून वर केले. समीरने तातडीने दाराचे जुने लॉक फिरवले आणि दार सावधपणे थोडेच उघडले.
डॅनियल क्रॉस आत आला.
अंगात काळे जॅकेट, चेहऱ्यावर लांबच्या प्रवासाचा थकवा, पण त्याचे डोळे अजूनही तितकेच तीक्ष्ण आणि धारदार होते. त्याची नजर एका सेकंदात संपूर्ण खोलीभर फिरली. एका लहानशा क्षणासाठी ती टेबलावरच्या पेन ड्राईव्हवर स्थिरावली... आणि मग थेट आरवच्या चेहऱ्यावर स्थिर झाली.
काही क्षण खोलीत कोणीच एक शब्दही बोलले नाही. कारण त्या जुन्या, अंधुक खोलीत आता दुष्यंत देशमुखच्या भूतकाळाचे दोन वेगवेगळे, विखुरलेले तुकडे समोरासमोर उभे होते.
दार उघडताच विनायक काही सेकंद पूर्ण स्थिर झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग हळूहळू उतरला.
“डॅनियल…? आम्हाला वाटलं तू गायब झालास.”
“तू आम्हाला शोधलंस कसं?”
“मी तीन ठिकाणी गेलो. तुम्ही तिसऱ्या ठिकाणी सापडलात.”
डॅनियल दोन पावले पुढे आला. त्याने आरवकडे पाहत थेट विचारले, “तुझ्या वडिलांनी तुला या सिस्टीमबद्दल नक्की किती सांगितलं होतं?”
आरवचा आवाज कमालीचा कठोर आणि कोरडा झाला, “काहीच नाही.”
डॅनियलच्या चेहऱ्यावर एक हलकी, अनाकलनीय रिअॅक्शन उमटली. तो स्वतःशीच पुटपुटला, “म्हणजे तो शेवटपर्यंत तसाच राहिला. स्वतःची माहिती कधीच कोणाला पूर्ण दिली नाही.”
समीरने सावधपणे विचारले, “पण तुम्ही नक्की कोण आहात?”
डॅनियलने त्याच्याकडे पाहिले, “एक असा माणूस... ज्याने आयुष्यात खूप उशिरा का होईना, पण आता योग्य बाजू निवडली.”
विनायकरावांनी टेबलावर असलेला लॅपटॉप शांतपणे डॅनियलच्या दिशेने सरकवला. त्यावर एका फाईलचे नाव दिसत होते: NAMES.enc
डॅनियलचा चेहरा ती फाईल पाहताच पहिल्यांदाच अत्यंत गंभीर झाला. “तुम्ही लोक अजूनही हे उघडू शकला नाही?”
“ती पूर्णपणे एनक्रिप्टेड आहे,” विनायकरावांनी सांगितले.
डॅनियल काही क्षण त्या फाईलच्या नावाकडे एकटक पाहत राहिला, मग तो शांतपणे म्हणाला, “दुष्यंत कधीच कोणाची पूर्ण यादी एका ठिकाणी ठेवत नव्हता. तो 'फ्रॅगमेंटेड इंडेक्सिंग' वापरायचा.”
असे म्हणत तो लॅपटॉप समोर बसला. आणि कीबोर्डवर वेगाने काही कमांड्स टाईप करायला सुरुवात केली. लॅपटॉपच्या स्क्रीनवर एकामागून एक एनक्रिप्टेड कोड ब्लॉक्स चमकायला लागले.
आरव त्याच्या मागे ताठ उभा राहिला. “तुम्हाला याचा पासवर्ड माहिती आहे?”
डॅनियलने टायपिंग न थांबवता उत्तर दिले, “मला पासवर्ड माहिती नाही, आरव...” तो मंद आवाजात म्हणाला, “...पण मला त्याचा 'पॅटर्न' अचूक माहिती आहे.”
पुढच्याच सेकंदाला स्क्रीनवर एक 'डिक्रिप्शन सिक्वेन्स' धावायला लागला आणि अचानक... ती एनक्रिप्टेड फाईल संपूर्ण उघडली.
हळूहळू एक एक पदर उलगडोय, मजा
हळूहळू एक एक पदर उलगडोय, मजा येते आहे वाचायला !
मस्त .....खरच मजा येतेय
मस्त .....खरच मजा येतेय वाचायला. पुढें काय याची उत्सुकता वाढलीय.
वेगवान घडामोडी आहेत
वेगवान घडामोडी आहेत
तुकडे जुळत आहेत असे वाटतेय
धन्यवाद जेम्स वांड, सामी आणि
धन्यवाद जेम्स वांड, सामी आणि झकासराव.