ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ९

Submitted by नितनवे on 18 May, 2026 - 13:21

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ८
पूर्वभाग
आरव देशमुख, समीर नायर आणि विनायक राऊत यांना “TIDE WINDOW - 10:17” मागचं खरं रहस्य समजायला लागतं लक्ष्य बंदर नव्हे, तर योग्य वेळ साधून निर्माण केलेली घबराट आहे.
JNPT नेव्हिगेशन अ‍ॅडव्हायझरी आणि समुद्राच्या खोलीतील तफावतीमुळे जहाजांची हालचाल मंदावते, आणि Black Ember ने आखलेली विलंबाची साखळी प्रत्यक्षात सुरू झाल्याचं स्पष्ट होतं.
रहस्यमय राखाडी स्कोडा आणि “TW-17” हा संकेत दाखवतो की आता शत्रू फक्त सावलीतून पाहत नाही, तर थेट संदेश देऊ लागला आहे.
जर्मनीत एलिना व्होल्कोव्हा जागतिक बाजारपेठेतील भीती आणि प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून Black Ember च्या पुढच्या टप्प्याचं निरीक्षण करत असते.
सिंगापूरमध्ये माया सेन आणि कबीर यांना त्यांच्या ठिकाणाचा माग काढला गेल्याची जाणीव होते, आणि सेफहाऊसवर संकट येऊन ठेपतं.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ९ - धुराच्या मागचं गणित
खोलीत पूर्ण अंधार पसरला. इमारतीच्या कुठल्यातरी दूरच्या भागात जुना जनरेटर सुरू करण्याचा एक निष्फळ, खडखडाटयुक्त प्रयत्न झाल्यासारखा आवाज आला... आणि पुन्हा एकदा भीषण शांतता पसरली.

कबीर तिथेच पूर्णपणे स्थिर उभा होता. त्याची नजर अंधारातही अचूकपणे दारावर खिळलेली होती.

तो अतिशय मंद, खोल आवाजात म्हणाला, “जर ते सरळ आत घुसणार असते... तर त्यांनी दारावर नॉक केलं नसतं.”

माया कुजबुजली, “मग ते नक्की काय करतायत?”

कबीरने काही उत्तर दिलं नाही. तो चोरपावलांनी खिडकीपाशी गेला आणि पडद्याच्या त्या बारीक फटीतून त्याने पुन्हा एकदा खाली रस्त्यावर नजर टाकली. रस्त्यावर उभी असलेली ती पांढरी व्हॅन अजूनही तिथेच होती. पण आता ती एकटी नव्हती. रस्त्याच्या अगदी दुसऱ्या बाजूला एक डिलिव्हरी स्कूटर उभी होती. त्यावर बसलेला रायडर डोक्यावर हेल्मेट घालून शांतपणे फोनकडे पाहत असल्यासारखा दिसत होता.

मायाने आता एक सेकंदही वाया घालवला नाही. तिने तातडीने टेबलावरचा लॅपटॉप बंद केला. हार्ड ड्राईव्ह बाहेर काढली. बर्नर हँडसेटमधील सिम कार्ड सटकन वेगळं करून तिने खिडकीबाहेर असलेल्या ड्रेनेज लाईनच्या अंधाऱ्या पाईपमध्ये फेकून दिलं. कबीरने अंधारातच तिच्याकडे वळून पाहिलं. पहिल्यांदाच त्याच्या नजरेत मायासाठी एक हलकी कौतुकाची भावना दिसली.

तेवढ्यात बाहेर कॉरिडॉरमध्ये पुन्हा एक हलकासा आवाज झाला. या वेळी तो आवाज पायऱ्यांवर किंवा जमिनीवर नव्हता तो थेट दाराच्या हँडलवर झाला होता.

एक मंद, मेटॅलिक क्लिक.

मायाचा श्वास अडकला. कबीर शांतपणे किचन काउंटरकडे गेला. त्याने तिथलं ड्रॉवर उघडलं आणि आतून एक छोटा, धारदार फोल्डिंग नाईफ बाहेर काढला. अंधारात त्या सुरीची चमक पाहून मायाने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. “सिरियसली? कबीर... या सुरीने?”

“हा शेवटचा पर्याय आहे.” कबीरचा आवाज पूर्णपणे शांत आणि सपाट होता.

दाराबाहेरून पुन्हा एकदा तोच मंद, सुशिक्षित आवाज आला, “We only want to talk.”

कबीरच्या चेहऱ्यावर कोणतीही रिअ‍ॅक्शन उमटली नाही. तो मायाच्या अगदी जवळ आला. माया काही क्षण श्वास रोखून उभी राहिली, आणि मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला. बाहेर उभे असलेले लोक दार तोडण्याचा कोणताही प्रयत्न करत नव्हते. जणू ना अचूक ठाऊक होतं की आत अडकलेले लोक शेवटी याच दारातून बाहेर पडणार आहेत.

कबीरने पुन्हा एकदा विचारलं, “सर्व्हिस कॉरिडॉर कुठे आहे?”

माया थरथरत्या आवाजात कुजबुजली, “किचनच्या मागे... बहुतेक.”

“बहुतेक?” कबीरच्या आवाजात थोडी नाराजी होती. पण मग त्याला आठवलं हा फ्लॅट मायाने एका पत्रकाराच्या ओळखीने घाईघाईत अरेंज केला होता.

त्याने स्वतःवर ताबा मिळवत शांतपणे विचारलं, “तिथे सर्व्हिस स्टेअर्स दिसल्या होत्या का? सेफहाऊसमध्ये लोकेशनपेक्षा 'एक्झिट्स' जास्त महत्त्वाचे असतात.”

तेवढ्यात कॉरिडॉरमधल्या लाईट्स एका सेकंदासाठी फ्लिकर झाल्या. दाराखालच्या बारीक फटीतून पिवळसर प्रकाशाची एक रेघ आत चमकली... आणि पुढच्याच क्षणी पुन्हा गडद अंधार झाला.

कबीरचा चेहरा अचानक बदलला. त्याने खिडकीकडे नाही, तर थेट छताकडे पाहिलं.

मायाने घाबरून विचारलं, “काय झालं?”

“त्यांना पूर्ण माहिती आहे की आपण अजूनही आतच आहोत.”

मायाचा घसा पूर्णपणे कोरडा पडला. तेवढ्यात दाराबाहेरून हलक्या पावलांचा आवाज दूर जाताना ऐकू आला. तो आवाज एका माणसाचा नव्हता. दोन... तीन लोक होते. तो जुना कॉरिडॉर त्यांच्या वजनाने किरकिर करत होता.

कबीरने वेळ न घालवता किचनच्या मागचं ते अरुंद दार उघडलं. आत काळोखात बुडालेला एक जुना, अरुंद सर्व्हिस पॅसेज दिसत होता. ओलसर भिंती, गंजलेले लोखंडी पाईप्स आणि खाली उतरणारा अंधारा जिना. खाली कुठेतरी जमिनीखालच्या पाण्याचा संथ आवाज येत होता.

मायाने एक क्षण मागे वळून त्या फ्लॅटकडे पाहिलं. काही तासांपूर्वीपर्यंत अत्यंत सुरक्षित आणि नॉर्मल वाटणारं ते जग... आता अचानक तिच्यापासून मैलोनमैल दूर गेल्यासारखं वाटत होतं.

कबीर आधीच त्या पॅसेजमध्ये वेगाने उतरायला लागला होता. माया त्याच्या मागे चालू लागली. पण... काही पायऱ्या उतरताच कबीर अचानक थांबला. पूर्णपणे स्तब्ध.

त्याच्या अशा अचानक थांबण्याने मायाचं हृदय अक्षरशः थांबल्यासारखं झालं. “काय झालं कबीर?”

कबीरने वर पाहिले नाही. खाली त्या अथांग काळोखाकडे पाहतच तो अत्यंत मंद, थरथरत्या आवाजात म्हणाला, “आपण निघायला उशीर केला, माया.”

माया सेनच्या अंगावर सरसरून काटा आला.

कारण खाली... त्या संपूर्ण अंधाऱ्या सर्व्हिस स्टेअरकेसमधून... कोणाच्या तरी जड आणि सावध पावलांचा आवाज हळूहळू वरच्या दिशेने येत होता.
त्या अंधाऱ्या सर्व्हिस स्टेअरकेसमधून वर येणाऱ्या पावलांचा आवाज आता अगदी स्पष्ट ऐकू येत होता.

त्या अरुंद पॅसेजमध्ये ओलसर सिमेंट आणि गंजलेल्या लोखंडाचा वास भरून राहिला होता. वरच्या बंद फ्लॅटमधून अजूनही एसीची हलकी थंड हवा येत होती, पण खालून जिन्याकडून वर येणारा अंधार वेगळाच वाटत होता... जणू तो अंधार जिवंत होता आणि त्यांच्यावर झेप घ्यायला पुढे सरकत होता.

कबीर तिथेच पूर्णपणे गोठल्यासारखा उभा होता. त्याची भेदक नजर जिन्याच्या खालच्या गडद काळोखाचा वेध घेत होती. पावलांचा आवाज एक पायरी वर आला... मग दुसरी... लोखंडी रेलिंगवर कोणाचा तरी हात पडला आणि ते हलकंसं किरकिरलं.

मायाचा श्वास जणू छातीतच अडकला. कबीरने मागे न पाहताच आपल्या हाताने मायाला भिंतीलगत अगदी चिकटून उभं राहण्याचा इशारा केला. ती एका सेकंदात बाजूला सरकली.

तो पॅसेज इतका अरुंद होता की ते दोघं एकमेकांच्या शरीराला टेकून उभे होते. तेवढ्यात वरच्या मजल्यावर कुठेतरी कॉरिडॉरचं मुख्य दार जोरात बंद झाल्याचा आवाज घुमला. याचा अर्थ वरचे लोक अजून गेले नव्हते. ते आता दोन बाजूंनी सापळ्यात अडकले होते; वरूनही आणि खालूनही.

तिच्या छातीतली धडधड एवढी वाढली होती की दाराबाहेरच्या लोकांनाही ती सहज ऐकू जाईल, अशी भीती तिला वाटू लागली.

कबीरच्या चेहऱ्यावरचा ताण अचानक वाढला. त्याने आपल्या हातातील तो छोटा फोल्डिंग नाईफ उलटा पकडला. खाली कुठेतरी पाईपमधून पाण्याचा एक थेंब जमिनीवर पडला. टप. त्या आवाजानंतर पुन्हा एकदा शांतता पसरली.

मग अचानक, खालच्या अंधारातून एक मंद आवाज आला. इंग्रजीत. कमालीचा शांत आणि स्थिर: “Mr. Kabir…”

मायाच्या अंगातून एक थंड लहर आरपार निघून गेली. असाच आवाज होता, जो काही मिनिटांपूर्वी त्यांनी मुख्य दाराच्या पलीकडून ऐकला होता. पण आता तो थेट खाली जिन्यातून येत होता... खूप जवळून.

“तुम्ही अजूनही 'एक्झिट्स'वर विश्वास ठेवता...” तो आवाज पुन्हा घुमला, “...हीच तुमची जुनी सवय तुम्हाला आमच्यासाठी प्रेडिक्टेबल बनवते.”

कबीरने काही उत्तर दिलं नाही. त्याच्या डोळ्यांत आता भीती नव्हती, तर एक वेगळंच कॅल्क्युलेशन सुरू होतं.

मायाला अचानक एका गोष्टीची खात्री पटली खाली उभा असलेला माणूस त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत नव्हता. तो फक्त त्यांना ऑब्झर्व्ह करत होता, त्यांच्या प्रत्येक रिअ‍ॅक्शनची नोंद घेत होता.

तेवढ्यात खालच्या अंधारात एक हलकासा प्रकाश चमकला. ती फ्लॅशलाईट नव्हती, किंवा फोनचा उजेडही नव्हता. तो एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरचा छोटासा, लुकलुकणारा इंडिकेटर होता.

खालचा आवाज पुन्हा एकदा शांतपणे म्हणाला, “आम्ही तुमच्यासाठी आलेलो नाही, मिस्टर कबीर.”

काही सेकंदांची जीवघेणी शांतता पसरली.

“आम्ही तिच्यासाठी आलो आहोत.”

मायाचं हृदय जणू आता बंद पडायचंच बाकी होतं. कबीरने पहिल्यांदाच वळून थेट तिच्या डोळ्यांत पाहिलं. त्या नजरेत तीव्र इशारा होता... आणि त्याचबरोबर एखाद्या जुन्या ओळखीची अस्वस्थ जाणीवही.

मायाच्या डोक्यात अचानक काल रात्री तिने गोळा केलेले ते गुप्त डॉक्युमेंट्स विजेसारखे चमकून गेले; इन्शुरन्स चेन्स, मीडिया राउटिंग, नॅरेटिव्ह मॉडेलिंग. ती आता केवळ एक पत्रकार किंवा साक्षीदार राहिली नव्हती... तिने थेट तो 'पॅटर्न' पाहिला होता. आणि Black Ember च्या जगात, तो पॅटर्न पाहणारी माणसं जास्त काळ जिवंत किंवा मुक्त राहू शकत नव्हती.

खालचा आवाज पुन्हा आला, “मिस सेन... तुम्हाला अजूनही साधी कल्पना नाहीये की तुम्ही नक्की काय उघडलं आहे.”

मायाने नकळत मागे पाऊल टाकलं. तिच्या पाठीमागची ओलसर भिंत बर्फासारखी थंड वाटत होती.

तेवढ्यात वरच्या कॉरिडॉरमध्ये अचानक धावत येणाऱ्या पावलांचा प्रचंड आवाज घुमला. या वेळी तो आवाज लपून-छपून येत नव्हता. तो वेगाने, उघडपणे येत होता. बुटांचे जड तळवे आणि धातूच्या शस्त्रांचा भिंतींवर होणारा आघात स्पष्ट ऐकू येत होता.

कबीरचे डोळे क्षणात वरच्या दिशेने गेले. “मूव्ह!” तो अक्षरशः फुसफुसला.

आणि त्याच क्षणी वरच्या सर्व्हिस डोअरवर एक प्रचंड मोठा धक्का बसला. ते लोखंडी दार भयानक आवाजासह हादरलं. दुसरा धक्का... आधीपेक्षाही जोरात!

आता सगळी संदिग्धता संपली होती. वरचे लोक दार तोडून आत घुसणार होते... आणि खाली आधीपासूनच कोणीतरी त्यांची वाट पाहत उभा होता.
कबीरने एका अटीतटीच्या क्षणार्धात निर्णय घेतला. तो सुरी सज्ज ठेवून खाली जिन्याकडे वळला, त्याने मायाचा हात आपल्या हाताने घट्ट पकडला आणि त्या संपूर्ण अंधारात त्यांनी खाली जिन्याने वेगाने धावायला सुरुवात केली आणि त्याच क्षणी मागून वरचं ते लोखंडी दार अखेर तुटल्याचा एक प्रचंड, कर्णकर्कश आवाज संपूर्ण पॅसेजमध्ये घुमला.

अरुंद जिन्यात ओलसर सिमेंटचा आणि गंजलेल्या पाईप्सचा जड वास भरून राहिला होता. वर कुठेतरी लोखंडी दार भिंतीवर आदळल्याचे भयानक आवाज अजूनही संपूर्ण पॅसेजमध्ये प्रतिध्वनित होत होते.

कबीर तिचा हात आपल्या हाताने घट्ट पकडून तिला वेगाने खाली उतरवत होता. तिथे प्रचंड घाई होती, पण त्याच्या हालचालीत कुठेही 'पॅनिक' नव्हता. तो नुसताच जीवाच्या आकांताने पळत नव्हता; तो अत्यंत थंड डोक्याने पुढची दिशा निवडत होता. दुसऱ्या मजल्याच्या लँडिंगवर पोहोचताच कबीर अचानक थांबला. त्याचे पाय जणू जमिनीला खिळले.

मायाने घाबरून विचारले, "काय... काय झालं?"

कबीरने वर पाहिले नाही. तो कॉरिडॉरच्या दिशेने कान देऊन काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत होता. वरच्या मजल्यावरून आता धावत येणाऱ्या पाशवी पावलांचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होते... पण खाली जिन्यात मात्र एक गूढ शांतता पसरली होती.

कबीरचा चेहरा काही क्षण पूर्णपणे निर्विकार, भावशून्य राहिला. मग तो म्हणाला, “ते आपल्याला जाणीवपूर्वक खाली ढकलत आहेत.”

माया गोंधळली. "म्हणजे नक्की काय?"

“वरचे लोक हे 'ब्रीच टीम' आहेत,” तो पुढे समजावून सांगू लागला, “आणि खाली थांबलेले लोक फक्त 'ऑब्झर्व्हेशन' करत आहेत.”

त्या लोकांनी कबीर आणि मायाचा पळून जाण्याचा मार्ग आधीपासूनच अचूक प्रेडिक्ट केला होता.
कबीरने एका अटीतटीच्या क्षणार्धात निर्णय घेतला. तो जिन्याने खाली न उतरता, तातडीने दुसऱ्या मजल्याच्या सर्व्हिस कॉरिडॉरमध्ये वळला.
तो एक अत्यंत अरुंद पॅसेज होता. भिंतीलगत जाड पाईप्सचे जाळे होते आणि इमर्जन्सी बल्बचा फिकट, पिवळसर प्रकाश त्या अंधारात मिणमिणत होता. दूर कुठेतरी व्हेंटिलेशन फॅन्सचा एक संथ, घुमणारा आवाज येत होता.

माया धापा टाकत कबीरच्या मागे वेगाने धावत होती. “कबीर, तुला बाहेर पडायचा मार्ग माहितीये का?”

“नाही.”

“मग”

“मला त्यांचा 'पॅटर्न' माहितीये.”

त्या उत्तरानंतर मायाने दुसरा कोणताही प्रश्न विचारला नाही. ते तो कॉरिडॉर वेगाने पार करून एका बंद लोखंडी दाराजवळ येऊन थांबले. कबीरने सटकन त्याचं हँडल हलवून तपासलं. ते लॉक होतं.

त्याने एका सेकंदात आजूबाजूला नजर फिरवली. मग बाजूलाच असलेल्या fire hose cabinet ची काच त्याने हाताने जोरात फोडली. त्या आवाजाने माया दचकली. कबीरने आतला जड लोखंडी कपलिंग बाहेर काढला आणि एकाच जोरदार फटक्यात दाराचं मुख्य लॉक फोडून टाकलं.
दार उघडलं. समोर इमारतीचं जुनं loading bay पसरलं होतं. तिथे अर्धवट अंधार, रिकामे पडलेले लाकडी पॅलेट्स आणि लोखंडी रॅक्स अस्ताव्यस्त पडले होते. आणि त्या पलीकडे बाहेर पावसाच्या पाण्याने चमकणारा सिमेंटचा सर्व्हिस रोड दिसत होता.

पण कबीर रस्त्याकडे पाहत अचानक थांबला. त्याची नजर लोडिंग बे च्या अगदी बाहेर स्थिरावली होती. रस्त्याच्या पलीकडे तीच पांढरी व्हॅन शांतपणे उभी होती. इंजिन बंद होतं, लाईट्सही बंद होत्या... पण ड्रायव्हर सीटवर कोणाची तरी अंधूक आकृती स्पष्ट जाणवत होती.

मायाचा घसा पूर्णपणे कोरडा पडला. "ते... त्यांनी आपल्याला पाहिलं का?"

कबीरने उत्तर दिलं नाही. तो काही सेकंद पूर्णपणे स्थिर उभा राहिला. मग अचानक तो उलट्या दिशेला वळला. "नाही. अजून नाही पाहिलं."

"मग आपण बाहेर का जात नाहीये? रस्ता समोरच आहे!"

कबीरचा आवाज आता खूपच शांत आणि गंभीर झाला होता, “कारण जर पळून जाण्याचा मार्ग अतिशय सोपा आणि स्पष्ट दिसत असेल... तर तो मार्ग समोरच्याने तुमच्यासाठी हेतुपूर्वक राखून ठेवलेला असतो, माया.”

मायाच्या छातीतली धडधड आता मर्यादा ओलांडत होती. वरच्या मजल्यावर कुठेतरी पुन्हा एकदा धावत येणाऱ्या पावलांचे जड आवाज घुमले. वेळ संपत चालली होती.

कबीरने लोडिंग बे च्या अगदी कोपऱ्यात असलेल्या एका अरुंद आणि जुन्या लोखंडी शिडीकडे बोट दाखवलं. “वर चल.”

“वर?” माया जवळजवळ ओरडलीच. “कबीर, आपण खाली जायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे!”

“तेच त्यांना अपेक्षित आहे,” असं म्हणत तो त्या शिडीवर वेगाने चढू लागला. मायाकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, ती त्याच्या मागे मागे वर गेली.

ती शिडी एका जुन्या, गंजलेल्या व्हेंटिलेशन शाफ्टपाशी संपत होती. त्या अरुंद धातूच्या डक्टमधून गरम आणि कोंदट हवा बाहेर येत होती. कबीरने तिथली जाळी अत्यंत सावधपणे बाजूला काढली. आत पूर्ण काळाकुट्ट अंधार होता.

“सिरियसली?” माया अंधारात कुजबुजली.

ते ऐकून कबीरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक हलकंसं, थंड हसू उमटलं. “प्रोफेशनल बिल्डिंग्समध्ये राहताना दोन गोष्टी कधीच इग्नोर करायच्या नसतात, माया.”

“कोणत्या?”

“एअर डक्ट्स... आणि मेंटेनन्स मॅप्स.”

ते दोघेही त्या अरुंद डक्टच्या आत शिरले. धातूच्या त्या अरुंद पाईपमधून रांगत पुढे सरकताना, खाली लोडिंग बे मध्ये होणारे आवाज आता त्यांना अधिक स्पष्ट ऐकू येत होते.

खाली लोडिंग बे च्या भागात अखेर कोणीतरी प्रवेश केला होता. बुटांचे जड आवाज आणि धातूच्या आपटण्याचा प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू आला.

मग तिथे एका माणसाचा शांत, इंग्रजी आवाज घुमला: “They changed direction.”

त्यावर दुसऱ्या एका परिपक्व आवाजाने उत्तर दिलं: “Expected.”

ते ऐकून मायाच्या अंगातून अक्षरशः एक गार लहर निघून गेली. ते लोक कुठेही गोंधळलेले नव्हते. जणू हा संपूर्ण जीवघेणा खेळ त्यांनी आधीपासूनच ठरवल्याप्रमाणे चालला होता.

कबीर त्या डक्टमध्ये सातत्याने पुढे सरकत राहिला.

अखेर, ते एका दुसऱ्या इमारतीच्या मेंटेनन्स प्लॅटफॉर्मवरून बाहेर आले. खाली संपूर्ण 'कंटेनर यार्ड' पसरलेलं होतं. रंगीबेरंगी कंटेनर्सचे प्रचंड, पर्वतासारखे ढीग... महाकाय क्रेन, फिकट फ्रेट लाईट्स आणि पावसाचे धुकं. रात्रीच्या त्या ओलसर हवेत तो संपूर्ण औद्योगिक परिसर कमालीचा जिवंत वाटत होता.

कबीरने खाली पाहत एक खोल श्वास घेतला. मग तो मंद आवाजात म्हणाला, “आता ते आपल्याला इतक्या सहज शोधू शकणार नाहीत.”

माया अजूनही धापा टाकत होती, तिने विचारलं, “का? आपण अजूनही याच परिसरात आहोत ना?”

कबीरची नजर त्या विस्तीर्ण कंटेनर यार्डवर फिरत होती. “कारण आता आपण त्यांच्या वेढ्याच्या बाहेर पडलेलो नसलो, तरी आपण त्यांच्या सिस्टीमच्या गोंगाटात पूर्णपणे मिसळलो आहोत.”

त्या अथांग कंटेनर यार्डमधून बाहेर पडताना कबीरने कमालीच्या कौशल्याने मार्ग बदलले. त्याने अचूकपणे दोन सीसीटीव्ही ब्लाईंड स्पॉट्स वापरले, जिथे कॅमेऱ्याची नजर पोहोचत नव्हती. एक मुख्य डिलिव्हरी रूट कट करून मागचा रस्ता पकडला आणि शेवटी, एका कोपऱ्यात असलेलं जुनं, बंद शिपिंग डॉक्युमेंटेशन ऑफिस लपण्यासाठी निवडलं.

ते जेव्हा त्या जुन्या ऑफिसच्या बंद खोलीत पोहोचले, तेव्हा पहाट संपत आली होती आणि पूर्वेकडे हलकासा प्रकाश फुटू लागला होता.
आणि... ते तिथे पोहोचल्यापासून, कबीर एका सेकंदासाठीही त्या ऑफिसच्या खिडकीपासून पूर्णपणे दूर गेला नव्हता. तो बाहेरच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून उभा होता.

या इमारतीचा वरचा पूर्ण मजला रिकामा होता. त्या अंधुक खोलीत फक्त काही इमर्जन्सी लाईट्स चालू होत्या. हवेत धूळ, जुन्या कागदांचा कुबट वास आणि थेट समुद्राकडून आलेली ओलसर हवा मिसळली होती.

मायाने मागचे जड दार लावून घेतले आणि ते लॉक केले. तिने कबीरकडे पाहत विचारले, “आता तरी सांगशील नक्की काय चाललंय? आपण कोणापासून पळतोय?”

कबीरने लगेच उत्तर दिले नाही. तो आधी शांतपणे खिडकीपाशी गेला, खाली रस्त्यावरची प्रत्येक हालचाल तपासली आणि मगच मागे वळला.

कबीर काही क्षण तिच्या चेहऱ्यावरील अगतिकता पाहत राहिला. मग त्याने टेबलावर आपला लॅपटॉप ठेवला. लॅपटॉपची बॅटरी आधीच वेगळी केलेली होती आणि वेबकॅमवर काळी टेप चिकटवलेली होती. तो एक जुना, ऑफलाईन मशीन होता.
त्याने एका सुरक्षित एनक्रिप्टेड ड्राईव्हमधून काही फाइल्स उघडल्या. स्क्रीनवर अचानक काही तारखा, रिफायनरी रिपोर्ट्स, इन्शुरन्सचे आलेख आणि शिपिंग मूव्हमेंटचे ओव्हरलेज दिसायला लागले.

मायाची नजर एका मोठ्या हेडलाईनवर जाऊन खिळली:
GEELONG REFINERY FIRE - AUSTRALIA
तिने दुसरी फाईल उघडली:
TUAPSE TERMINAL INCIDENT - BLACK SEA
आणि तिसरी:
PORT ARTHUR OUTPUT DISRUPTION

माया पूर्णपणे गोंधळली. “हे... हे सगळे तर अपघात होते. यात काय विशेष आहे?”

कबीरने थेट उत्तर न देता दुसरा एक आलेख स्क्रीनवर उघडला. त्या सर्व घटना घडल्यानंतरचे काही धक्कादायक आकडे तिथे मांडलेले होते.
हे सगळे आकडे एकाच टाईमलाईनमध्ये अचूकपणे जोडलेले होते. ते पाहताच मायाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण तिला आता तो अदृश्य 'पॅटर्न' स्पष्ट दिसायला लागला होता.

प्रत्येक अपघातानंतर: शिपिंगचे दर गगनाला भिडले होते. बाजारपेठेत अचानक पॅनिक बायिंग सुरू झाले होते. इंधनाचा व्यवसाय सांभाळणाऱ्या काही विशिष्ट फंड्सनी एका रात्रीत अब्जावधी रुपये कमावले होते ...आणि काही अज्ञात शेल कंपन्या प्रत्येक वेळी नफ्याच्या मुख्य केंद्रात दिसत होत्या.

मायाने श्वास रोखून कुजबुजत विचारले, “हे... हे सगळं केवळ एक योगायोग असू शकत नाही?”

कबीरचा चेहरा नेहमीसारखाच निर्विकार होता. “एकदा घडलं तर योगायोग...” तो पुढे म्हणाला, “...दोनदा घडलं तर संशयास्पद. आणि तीनदा?”

त्याने पुढचा आलेख उघडला. त्या तिन्ही मोठ्या घटना घडण्याच्या आधी, काही विशिष्ट मार्केट पोझिशन्स अत्यंत शांतपणे बाजारात उभ्या केल्या गेल्या होत्या. अगदी नेमक्या त्याच क्षेत्रात. अगदी त्याच प्रकारच्या करारांमध्ये.

माया आता स्क्रीनकडे नाही, तर कबीरच्या चेहऱ्याकडे पाहत होती. “तुला... तुला हे सगळं आधीपासून माहिती होतं?”

खोलीत काही क्षण एक भीषण शांतता पसरली. कबीर खिडकीबाहेर पसरलेल्या त्या करड्या आकाशाकडे पाहत राहिला. मग पहिल्यांदाच, त्याच्या नेहमीच्या कणखर आवाजात एक खोल थकवा जाणवला.

“कारण जोपर्यंत हा पॅटर्न अदृश्य असतो...” तो क्षणभर थांबला, “...तोपर्यंत हे जग त्याला केवळ एक 'कॉन्स्पिरसी थिअरी' समजतं.”

मायाने पुन्हा एकदा स्क्रीनवर नजर टाकली. ऑस्ट्रेलियन रिफायनरी. रशियन टर्मिनल. टेक्सासचे नुकसान. वेगवेगळे देश, वेगवेगळ्या घटना, पण त्यांचा अंतिम परिणाम मात्र एकच होता भीती, अस्थिरता आणि अफाट नफा.

तेव्हाच तिच्या डोक्यात अचानक काहीतरी विजेसारखं चमकलं. ती ताठ बसली. “JNPT…”

कबीर काहीच बोलला नाही, तो फक्त ऐकत राहिला.

माया वेगाने पुढे बोलू लागली, “पोर्टवर निर्माण केलेला हा केवळ तांत्रिक उशीर त्यांच्यासाठी पुरेसा नाहीये, कबीर!”

आता कबीरने वळून थेट तिच्या डोळ्यात पाहिले.

तिने वाक्य पूर्ण केले, “त्यांना निव्वळ उशीर नकोय... त्यांना डोळ्यांनी दिसणारा एक मोठा विध्वंस visible disaster हवा आहे!”

त्याच क्षणी त्या खोलीतली हवा जणू बर्फासारखी थंड झाली. कारण पहिल्यांदाच मायाने संपूर्ण चित्र पूर्णपणे पाहिले होते. बंदरांवर निर्माण केलेली ती भीती केवळ एक सुरुवात होती संपूर्ण बाजारपेठेला या धक्क्यासाठी संवेदनक्षम बनवण्यासाठी.

खरा पैसा हा केवळ उशिरामध्ये नव्हता, तो लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या 'पॅनिक'मध्ये होता. आणि बाजारात पॅनिक निर्माण करण्यासाठी... कुठेतरी आग लागावी लागणार होती.

कबीरने लगेच लॅपटॉपवर भारताचा मुख्य एनर्जी कॉरिडोअर मॅप उघडला. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर काही लाल मार्कर्स पल्ससारखे चमकत होते… रिफायनरीज, स्टोरेज हब्स आणि फ्युएल ट्रान्सफर कॉरिडोअर्स.

मायाचा श्वास संथ झाला. “नाही... हे नाही होऊ शकत.”

कबीरचा आवाज आता कमालीचा शांत झाला होता, “भारतीय बाजारपेठेने त्यांना अपेक्षित असलेली प्रतिक्रिया दिली नाही, माया. बाजार कोसळला नाही.”

त्याने मॅपवर झूम केले. मुंबईच्या अगदी उत्तरेला एक विशिष्ट मार्कर सतत ब्लिंक करत होता.

“ते... ते एका रिफायनरीला टार्गेट करणार आहेत?” मायाने भीतीने थरथरत विचारले.

मायाने अतिशय धीम्या, थरथरत्या आवाजात विचारले, “कबीर... ते कुठली रिफायनरी टार्गेट करतायत?”

कबीरचा चेहरा आता पूर्णपणे निर्विकार झाला होता. पण त्याच्या डोळ्यांत पहिल्यांदाच खरी भीती दिसत होती.

“अशी रिफायनरी... जी नष्ट झाल्यानंतरही जगाला केवळ एक 'अपघात' वाटेल.”

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंड छान लेखन, ओघ आणि डिटेलिंग आवडले. सकस काहीतर वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. बरेचसे technical details कळत नाहीत ह्यातले मला तरी, पण एकंदरीत चांगले वाटले वाचून. पुढील लेखनास शुभेच्छा.

वाचतोय नियमित 👍
आवडते आहे, नवीन कन्सेप्ट.

… वांड यांचे मत" याला वांडपणा म्हणावे का ???…

😂

बाकी जेम्स खूप दिवसांनी दिसलेत माबोवर.

आताच पुणे सकाळ मध्ये बातमी वाचली - जेएनपीटी मधे बरेच कंटेनर अडकले आहेत आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यांना उशीर होत आहे त्यामुळे दंड भरावा लागत आहे इ इ..
या कथेची आठवण यावी अशी परिस्थिती...

आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद जेम्स वांड, धनवन्ती, अनिंद्य, झकासराव आणि सामी.
… वांड यांचे मत" याला वांडपणा म्हणावे का ???…
Lol