खरडवही भाग ८:- मला भेटलेले कलाकार.

Submitted by अतरंगी on 13 May, 2026 - 07:43

ही एका सामान्य माणसाची डायरी आहे. साधं सुधं ममव, नोकरदार आयुष्य जगता जगता वाट्याला आलेले काही बरे वाईट क्षण, त्या क्षणी मनात आलेले विचार, उमटलेल्या भावना, त्या क्षणांच्या मनात कोरलेल्या आठवणी. तसे बघायला गेले तर त्याही काही जणांसाठी माझ्यासारख्याच सामान्य, पण माझ्यासाठी त्या अनमोल आहेत. अशाच क्षणांच्या, आठवणींच्या, भावनांच्या ह्या नोंदी…….

माझी डायरी, माझी खरडवही.

भाग १
https://www.maayboli.com/node/70054
भाग२
https://www.maayboli.com/node/70210
भाग ३
https://www.maayboli.com/node/70399
भाग ४
https://www.maayboli.com/node/70835
भाग ५
https://www.maayboli.com/node/72986
भाग ६
https://www.maayboli.com/node/80801
भाग ७
https://www.maayboli.com/node/88181

१.
२०१९ मधे गल्फ मधल्या एका Downstream Gas Plant मधे होतो. एप्रिल-मे मधे कडकडीत उन्हाळा सुरू व्हायच्या आधी सगळी मेंटेनन्स डिपार्टमेंट फेब मार्च मधे सगळी महात्वाची व मोठी कामे उकरून घेतात. वातावरण पण जरा आल्हाददायक वगैरे म्हणतात तसे असते. कडाक्याची थंडी गेलेली आणि उन्हाळा यायच्या वाटेवर. मेंटेनन्स ची हेवी कामे चालू झाली की आमच्यावर पण कामाचा प्रचंड लोड येतोच. प्रत्येक गोष्ट procedures प्रमाणे झाली की नाही चेक करून त्याचे documentation, certification करून ठेवावे लागते.
त्यात एखादा दिवस असा येतो की तो चांगलाच पळवतो. रात्र थोडी आणि सोंगे फार. भरमसाठ inspections आणि प्लॅंटमधले जिने व scaffolding monkey ladders वर चढ उतर. नाश्ता करून बाहेर पडलो की जेवायला पण परत येता येईल की नाही शाश्वती नसते. तोही असाच एक दिवस. ढगाळ वातावरण, उकाडा. सकाळ पासून माझी धावपळ चालूच. एक काम संपले की contractor चा माणूस पुढचे काम घेऊन तयार. सकाळी सकाळी साडे नऊ दहा पर्यंत मी पूर्ण घामाघूम झालो होतो. आज जेवायला तरी वेळ मिळेल की नाही अशी शंका वाटायला लागली होती. अकरा साडे अकराला जरा वातावरण बदलू लागले, हवेत पण गारवा आला. काम करताना जरा चिडचिड कमी झाली.

एक मोठे काम हातावेगळे करून जिना उतरत असताना हातावर एक टपोरा थेंब पडला. पटकन नजर वर केली तर पाऊस कोसळण्याच्या तयारीत होता. इकडचा पाऊस असाच. थोडाच वेळ पडणार पण जोरदार सरी येणार. पाऊस पडायच्या आत गाडीत पोचावे या विचाराने मी स्पीड वाढवला. आता पाऊस चालू झाला की आराम. सगळीच कामे बंद. ॲाफिसला जाऊन निवांत जेवावे व कॅाफीचा छान वाफाळता कप घेऊन पाऊस पहात बसावं. च्यायला या टिनेज मधे वाचलेल्या मराठी कादंबऱ्यांमधली वर्णनं नको तिथे डोक्यात येतात.

पण तो कॅाफीचा कप काही नशिबात नव्हता. मी जिना उतरून operator ला कळवून गाडी कडे निघालो खरा, पण मधेच पावसाने जोर पकडला. आता न भिजता ना control room ला परत जाणे शक्य, ना गाडी पर्यंत पोचणे. मी आजूबाजूला नजर फिरवली जवळच Temporary Rest Shelter होते. वर्कर्सना ब्रेक मधे बसायला scaffolding planks, tubes वापरून बनवलेले. मी पटकन तिकडे वळालो. आत काही मंडळी आधीच बसली होती. मी फार आत न जाता दरवाजा जवळच टेकलो. पाऊस जरा कमी झाला की निघायच्या तयारीतच बसलो होतो. वर्कर्सच्या कायबाय गप्पा, चेष्टा, हसणे खिदळणे background ला ऐकू येत होते. बसल्या बसल्या काय करणार म्हणून मी हातातील फाईल मधे कोणती कामे झाली, कोणती राहिली, जी झाली त्याचे details update करत होतो.

पाच सात मिनिटे झाली असतील नसतील तेवढ्यात त्यातल्या एकाने बसल्या जागी लाकडी फळी वर ताल धरला, आणि अगदी सुरेल आवाजात गायला लागला, “सावन बरसे तरसे दिल…..” मी तिकडे मान वळवली, एक पंचवीस तीस वर्षांचा लांब कुरळ्या केसांचा मुलगा गात होता. क्षणात शेल्टर मधल्या बाकी गप्पा बंद झाल्या. सगळ्यांच्या माना तिकडे वळाल्या. त्याने पूर्ण पणे त्या शेल्टरच्या वातावरणाचा ताबाच घेतला, स्टेजवर perform करत असल्यासारखा अतिशय सुंदर आवाजात तो गायला लागला. त्याची ती body language, चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे सगळेच एखाद्या कसलेल्या कलाकारासारखे होते.
मी हातातली फाईल बंद केली, व्यवस्थित बसलो, व मस्तपैकी ती गाणी enjoy करू लागलो. एक गाणे संपले की माफक टाळ्या पडत होत्या व लगेच कोणी कोणी संधी साधून त्याला आपापले आवडते गाणे सुचवत होते. तो पण त्यातली छान निवडक गाणी गात होता. अगदी भरपूर गाणी त्याला तोंडपाठ होती. एवढ्याश्या त्या शेल्टर मधे आपल्या देशापासून हजारो किलोमीटर लांब पोटापाण्यासाठी कामधंदा शोधत आलेल्या आमच्यासारख्यांची एक मैफिल जमली होती, त्यावर राज्य करत होता तो आम्हाला सुरांनी मंत्रमुग्ध करणारा तो कलाकार. बाहेर पडत असलेला पाऊस, ओल्या मातीचा सुगंध व आतमध्ये कानावर पडत असेलेली सुरेल आठवणीतली गाणी….. काय अप्रतिम क्षण.

काही वेळाने पाऊस थांबला, एवढा वेळ बसून राहिलेले सगळे वर्कर पटापट उठले, त्यांना जेवायला न्यायला आलेली बस पार्किंग मधे उभी असणार. सगळे लगबगीने निघाले. फार वेळ झाला तर बसायला लवकर जागा मिळत नाही. मी पण शांतपणे चालत गाडी पर्यंत आलो. गाडी काढताना मला परत तो दिसला, बस मधे चढणाऱ्या वर्कर्सच्या रांगेत, शांतपणे, हसऱ्या चेहऱ्याने बसकडे एक एक पाऊल टाकत चाललेला…….

२.

मी पूर्ण वेळ जॅाब सोडून आता बरीच वर्षे झाली. गेली कित्येक वर्षे अधून मधून एक दिड महिन्याचे छोटे छोटे प्रोजेक्ट, assignments घ्यायच्या, त्या संपल्या की आराम करायचा असेच चालू आहे. २०२२ मधे अशीच एका दोन महिन्याच्या assignment ची enquiry आली. Client नवीन होता पण HR Agency नेहमीचीच होती. Resume, interview वगैरे सोपस्कार पार पडल्यावर काही दिवसातच confirmation आणि visa पण आला. दोन महिन्याची requirement होती म्हणल्यावर अडीच तीन महिने तरी काम चालतेच. या वेळेस लोकेशन व client नवीन होते, safety induction ला पोचल्यावर कोणी ओळखीचे दिसतेय का बघितले पण सगळेच चेहरे नवीन होते. गप्पा टप्पांमधे रमलेले तीन चार छोटे छोटे गृप दिसले, नेहमीप्रमाणे एकेका राज्याचा एकेक गृप…… हे चित्र गल्फमधे अनेकदा दिसते. साहजिकच आहे म्हणा. दिवसभर काम करताना सगळे एकत्र असतात पण जेवताना, प्रवासात, Tea breaks मधे बरोब्बर सगळेजण आपापल्या राज्यातल्या, प्रदेशातल्या लोकांसोबतच दिसतात. Induction सुरू व्हायला अजून वेळ होता. मी शांतपणे कॅाफी बनवून घेतली व फोन मध्ये मान खुपसून बसलो.

काही मिनिटांतच फोनमधील लक्ष विचलीत झाले, कानावर हास्याचा अक्षरशः धबधबा कोसळला. मान वर केली तर मगाशी वेगवेगळे असलेले दोन तीन गृप एकत्र झाले होते आणि अगदी खदखदून हसत होते. हे मला अगदीच नवीन होते, आताशा कोण professional ठिकाणी असे वागते? फोन लॅाक करून खिशात टाकला आणि त्यांच्याकडे बघत बसलो, it was so refreshing, काय जोक्स होत आहेत ते काही ऐकू नीट ऐकू येत नव्हते पण सगळे एंजॅाय करत होते हे नक्की.

त्या सगळ्यांमधे मगाशी न दिसलेला एक नवीन चेहरा आता दिसत होता. साधारण उंची, गुबगुबीत शरीर. या धबधब्यांचा मुळ स्त्रोत म्हणजे तोच, अली. यथावकाश साईटवर याच्याशी परिचय झाला. जबरदस्त sense of humour होता त्याचा. अली कुठे आहे असा कधी प्रश्न पडला तर फक्त कानाने अदमास घ्यावा, जिकडून जोरजोरात हसण्याचे खिदळण्याचे आवाज येत आहेत तिकडे बिनदिक्कत जावे, अली भेटणार याची खात्री. या माणसाला वरदान होते. कोणालाही offend न करता अनेक विषयांवर, situations वर तो अगदी लिलया विनोद करायचा. इतका Spontaneous, कधी मिश्किल हावभावांसोबत, कधी एकदम कोरा वा निरागस चेहरा ठेवून काय एक एक विनोद, कोट्या करायचा. कधी इतक्या साध्या साध्या पण त्याचे timing आणि पंचेस अगदी लाजवाब….. त्याचे विनोद observational असायचे, आजुबाजूच्यांच्या लकबी, स्वभाव, regional differences हे मुळ आणि आमच्याकडे oil and gas field मधे तर काय दूरदूर पर्यंत एकही स्त्री नसते, आणि non veg jokes करता येतील अशा situation फार, त्यामुळे ते जोक्स तर अगदीच low hanging fruits, याशिवाय त्याच्याकडे street jokes चा अगदी खजिना होता व ते सांगायची जबरदस्त हातोटीही होती. मला अजून एका बाबतीत त्याचे कौतुक वाटले ते म्हणजे की कधी कधी तो बरोबर जोक साठी premise तयार करायचा. त्याच्या डोक्यात punchline तयार असायची, मग आपल्याला हवा असणारा रिस्पॅान्स कोणाकडून मिळेल व त्यावर तो जोक टाकता येईल हे त्याला बरोबर माहिती असायचे. त्याचे ते रिडींग व जजमेंट अगदी योग्य असायचे.

अलीला तिथे एक वलय होते. तो जेवायला आला की त्याला जागा करून दिली जायची, बस मध्ये तो बसलेला असला की त्याच्या आजूबाजूच्या सीट्स आधी भरायच्या, तो कुठेही थांबला असला की त्याच्या भोवती सगळे जमा व्हायचे. त्या तीस पस्तीस engineers च्या टीमचा तो CG होता. मी नवखा असल्याने त्यांच्यात फार नसायचो. पण वेळोवेळी अली आजूबाजूला असताना त्याच्या विनोदांनी मला खूप हसवले.

अलीला भेटून आता कित्येक वर्षे झाली, परत कधी भेटीचा योग नाही आला. पण त्याला भेटल्यावर एक जाणवले होते की कित्येक वर्षे झाली, आपण खदखदून हसलो नाहीये. जसे कॅालेज सुटले, गाव सुटले, जुने मित्र सुटले, आपण डोळ्यातून पाणी येईपर्यंत, गाल व पोट दुखेपर्यंत हसलोच नाहीये. अलीने त्या दोन अडीच महिन्यात अनेकदा तेवढे हसवले. त्यासाठी त्याचे कधी आभार मानले नाही, त्याने त्यावर पण एखादा विनोद केला असता. पण एक मात्र खरे की ना तो भेटायच्या आधी कित्येक वर्षे मी तेवढा हसलो होतो, ना अजून परत तेवढा कधी हसलोय…….

३.

WhatsApp वर दिवसाभरात अनेक गृपमधून मेसेज, शुभेच्छा, images, quotes, videos, विनाकारण बदाबदा कोसळत असतात. ते पाठवणारे का पाठवतात, वाचणारे का वाचतात, त्यातून नक्की काय साध्य होते देव जाणे. जवळपास सगळेच मेसेज बघून, वाचून flash memory मधे राहून नाहीसेही होतात.
एके दिवशी अशाच एका गृपमधे आलेला नागेश सुर्वे यांच्याबद्दल चा मेसेज. आता हे नाव सांगून कदाचित कोणालाही पटकन आठवणार नाही पण हिंदी चित्रपटातील अनेक गाण्यांमधे त्यांनी शीळ वाजवली आहे. मला त्यांचे नाव माहिती नव्हते पण काम नक्कीच माहिती आहे, लक्षात आहे. त्यांच्याविषयीचा व्हिडीओ पाहून त्यांना पण मी कदाचित विसरून गेलो असतो. पण नाही विसरलो, त्याला कारण म्हणजे माझ्या टिनेज मधे मी अनेकदा ऐकलेली शीळ.

टिनेज मधे ना कोणत्याही गोष्टी आपल्याला उगीचच भारी वाटत असतात. ते वयच असतं असं, कोणत्याही गोष्टींनी impress होण्याचे, काहीही भारी वाटण्याचे. मग जसा जसा काळ सरतो तसे तसे हे impress होणे कमी होत जाते, कमी होत जाते की आपण या जगण्याच्या कुतरओढीत त्याची नोंद घेणे बंद करतो देव जाणे. आताशा कशाचेच फारसे कौतुक वाटत नाही.

मी अकरावी बारावी ला कॅालेजला जरी लांब जात असलो तरी क्लास घरा जवळच लावला होता. कॅालेजवरून घरी आलं की आवरायचो आणि सायकल वरून क्लासला जायचो. क्लास सुटला की रस्त्यात, चौकात कुठेतरी सायकली लावून मित्रांसोबत कोंडाळे करून गप्पा मारत बसायचो. अर्धा पाऊण तास फक्त बिनकामाच्या गप्पा. भरपूर खिदळायचो. त्याक्षणी आजूबाजूला कोण आहे, कोण बोलते आहे, काय होते आहे, घरी जायला किती उशीर होतो आहे याची काहीही कल्पना नसायची. गृप मधल्या गप्पा व मित्र सोडून बाकी जगाचे अस्तित्वच नसायचे जणू….. याला अपवाद एकच व्यक्ती. त्या व्यक्तीला मी कधी भेटलो नाही, त्याच्याशी कधी बोललो नाही. त्याला फक्त दुरून, कधी थोडे जवळून बघितले आहे. अतिशय लुकडा, बुटका वजनाने फारतर ३५-४० किलो भरेल, अंगावर कायम गरीब मजूर घालतात तसे कपडे… अशी माणसं अनेकदा दिसतात. आपल्या लेखी त्यांचे अस्तित्वच नसते. आपल्याला त्यांच्याकडे काम असल्याशिवाय मेंदू त्यांना पाहून पण त्यांची नोंदच घेत नाही. पण याची नोंद मात्र सगळेच घेत असत. आमच्या सारखे स्वतःच्या धुंदीत असलेले टिनेजर्स असो, दुकानात काम करणारे कर्मचारी असो, मालक असो, पायी चालणारे असो वा अजून कोणी. कारण एकच, त्याची शीळ. चालताना तो सतत शीळ वाजवत असे. अर्थातच हिंदी चित्रपटातील गाण्यांवर. एवढासा बुटका, लुकडा माणूस पण शीळ अगदी सुस्पष्ट, लांबवर ऐकू जाईल अशी आणि अतिशय सुंदर. त्याची शीळ लांबवरून ऐकू आली की आपोआपच आमच्या गप्पा पॅाज घेत, पायी चालणाऱ्यांच्या माना वळत, दुकानातले मालक, कामगार, ग्राहक सगळ्यांचाच काम करण्याचा स्पीड कमी होत असे, वर्कशॅाप्स मधले आवाज थांबत, अगदी तो लांब जाऊन ती शिळ ऐकू न येई पर्यंत…. तो दिसायची ना ठराविक वेळ होती ना जागा, जाता येता कुठेही कधीही अवचित तो दिसायचा, आमच्या आयुष्यातले काही क्षण सोबत घेऊन जायचा व आम्हाला त्या सुंदर शीळेचे गिफ्ट देऊन जायचा. त्याच्याकडे आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या आयुष्यातले अनेक सुंदर क्षण जमा आहेत.

अजूनही कुठेही सुंदर शीळ ऐकली मला तो माणूस हटकून आठवतोच, टिनेज मधल्या अनेक आठवणी पुसट झाल्या तरी त्या माणसाचा चेहरा मला आजही लख्ख आठवतो. कुठेही कधीही ओळखेन एवढा सुस्पष्ट. टिनेज सरून दशके लोटली तरी I am still impressed. माझ्यासाठी तो माणूस व त्याची शीळ ही कैक वर्षांची जिवंत आठवण आहे. त्या शिळीमधे मला परत टिनेज मधे, माझ्या येडपट मित्रांमधे घेऊन जायची ताकत आहे……

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी,
खूप छान लिहिलंय. पहिली नोंद तर अगदी चित्रदर्शी आली आहे.>>>> अगदी खरं