खरडवही भाग ४; मृत्यु, ईच्छामरण, 'ईच्छा' मरण

Submitted by अतरंगी on 28 July, 2019 - 04:25


१. मृत्यु

मी काॅलेजला होतो तेव्हा आमचं एक प्लायवूडचं दुकान होतं. मी काॅलेज सुटल्यावर बरेचदा बाबांना मदत म्हणून दुकानावर जाऊन बसत असे. एकदा असेच संध्याकाळच्या सुमारास एक काका आले. त्यांना हव्या असलेल्या मटेरियलची यादी पाहून बाबांनी त्यांना कोटेशन लिहून दिले. त्यांनी थोडंफार भाव करून, दहा की पंधरा टक्के रक्कम आगाऊ देऊन ते पुढच्या आठवड्यात मटेरीयल घ्यायला येतो म्हणून निघून गेले. शक्यतो प्लायवूड आणि हार्डवेअरच्या धंद्यात कोणी आगाऊ रक्कम देत नाही आणि दुकानदार पण मागत नाहीत. पण त्यांनी तो स्वत:हून दिला. आम्ही त्यांनी सांगितलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी त्यांना लागणारं मटेरियल एका बाजूला काढून ठेवलं. पण काका काही मटेरीयल न्यायला आले नाहीत. त्यानंतर जवळपास दोन आठवडे होऊन गेले तरीही ते काही आले नाहीत. त्यांनी फोन नंबर पण दिला नसल्याने आम्हाला सुद्धा संपर्क करायला मार्ग नव्हता. वाट पाहून आम्हीच जरा नावावरुन, दिसण्यावरुन ईकडे तिकडे चौकशी करायला सुरुवात केली. आमचे दुकान काही होलसेल मार्केट मधे नसल्याने ते काका फार लांबून आले असायची शक्यता कमीच होती. तीन चार दिवसांनी एका परिचितांकडून लिंक लागली. काका आम्हाला अ‍ॅडव्हान्स देऊन गेल्यावर दोन तीन दिवसातच वारले होते. बाबा त्यांचा पत्ता विचारुन ती रक्कम परत करायला त्यांच्या घरी गेले. परत आल्यावर त्यांच्याकडूनच सगळी हकिकत कळाली.

काका काही महिन्यांपुर्वीच निवृत्त झाले होते. तीस पस्तीस वर्षे ईमाने एतबारी केलेली सरकारी नोकरी. निवृत्तीतून आलेल्या पैशातून त्यांना घरात खूप दिवस प्रलंबित असलेले फर्निचर करायचे होते. त्यांना हवा असलेला सुतार व्यग्र असल्याने काम सुरु झालं नव्हतं. पण ते फर्निचर झालेलं बघणं बहुतेक त्यांच्या नशिबी नव्हतंच. काका माळकरी, वारकरी, विठ्ठलाचे भक्त. रोज सकाळी कुठेही जाण्याआधी त्यांचा देवळात जायचा नियम. एके दिवशी आन्हिके उरकून ते नेहमीप्रमाने सकाळी देवळात दर्शन करायला गेले. दर्शन घेऊन देवळातून बाहेर पडल्यावर पायर्‍यांवरच चप्पल घालताना काकांना जोरदार हार्ट अ‍ॅटॅक आला आणि हॉस्पिटल मधे न्यायच्या आतच त्यांचं देहावसन झालं.

मी त्या वेळेस कितीही नास्तिक म्हणून मिरवत असलो, पुजाअर्चा करणार्‍यांची खिल्ली उडवत असलो तरी माझ्या तोंडून पटकन निघून गेलंच " सालं काही म्हणा मरण यावं तर असं !!!"

२. ईच्छामरण

कधी पासून आठवत नाही पण मी ईच्छामरणाचा खंदा समर्थक राहीलो आहे. साठाव्या पासष्ठाव्या वर्षी हातीपायी धड असताना शांतपणे मरण यावं नाहीतर आपण ईच्छामरणाचा मार्ग स्वीकारून हे जग आपल्या मर्जीने आणि सोयीने सोडून जावे या मताचा मी. पण सारखा प्रश्न पडतो की हे बोलणं जितकं सोप्पं आहे तितकं करणं पण असेल का?

आम्ही पाच सात वर्षापुर्वी ज्या घरी रहात होतो त्या सोसायटीच्या मध्यभागी एक मैदान होतं. मैदानाच्या कडेने वीस पंचवीस वर्षे जुनी झाडे होती आणि त्यांच्या आजुबाजूने ब्लॉक्स टाकून त्यावर छान बाकडी टाकली होती. मी माझ्या धावपळीच्या आणि फिरतीच्या नोकरीत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ग्राऊंडवर चालायला, पळायला जात असे आणि घरी यायच्या आधी एका कडूनिंबाच्या झाडाखाली थोडावेळ कोवळ्या उन्हात बसत असे. ती बाकडी खूप मोक्याच्या ठिकाणी होती. बरोबर काटकोनात ठेवलेली, नेमका तिथेच कोवळा सुर्यप्रकाश येत असे आणि पुर्ण ग्राऊंडपण दृष्टीक्षेपात रहात असे. त्यामुळे ती बाकडी क्वचितच रिकामी असत.

एके दिवशी मी जॉगिंग करत असताना तिथे दोन वृद्ध जोडपी बसली होती. थोड्यावेळाने त्यातलं एक जोडपं उठून गेल्यावर मी पटकन रिकाम्या बाकड्यावर जाऊन बसलो. तिथे बसल्या बसल्या ग्राऊंडवर आलेल्या लोकांचे निरिक्षण करणे हा माझा आवडता छंद. नियमित एकत्र चालायला येणारे लोक, काही जोडीने काही एकटे, श्वानांना फिरायला आणणारे काही जण. रस्त्यावर मोजकी वहाने, लवकर बाहेर पडणारे नोकरदार, स्कूलबस साठी ताटकळलेली गणवेशातली मुले, बस/ कॅब ची वाट बघत उभे आयटी, बीपीओ मधले टापटीप कर्मचारी, ह्या सगळ्यांना न्याहाळत दहा पंधरा मिनिटे कशी जायची ते पण कळायचे नाही.
त्यादिवशी पण असाच एक जण दिसत होता. कपड्यांवरून आजूबाजूला राहणार्‍यातला वाटत नव्हता. पण त्याचा पळायचा स्टॅमिना खूपच होता. मी आल्यापासून तो नॉन स्टॉप पळत होता आणि ते पण पायात सँडल्स घालून! शेजारी बसलेल्या आजी आजोबांच्या जाताना कुठली भाजी न्यायची, परदेशी राहणार्‍या मुलाला किती वाजता फोन करावा वगैरे मोजक्या गप्पा चालू होत्या. मला त्या मुलाचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. नुस्त्या सँडल्स वर तो किती छान आणि किती वेळ पळत होता. मधेच थोडावेळ शांततेत गेला आणि शेजारच्या बाकड्यावर बसलेल्या आज्जी एकदम म्हणाल्या " आपण ना आपले हातपाय चालायचे थांबले की ना स्वतःला संपवून टाकू" मी एकदम चरकलो. समोरचं सगळं दृष्य निरर्थक झालं. माझी नजर शून्यात गेली. आजोबांनी प्रत्युत्तर म्हणून फक्त हुंकार दिला. दोघे एकदम शांत बसून राहीले. मला कळेचना त्यांच्या कडे बघावं की बघून नये, "का आज्जी असं बोलता? काय झालं" असं काही विचारावं की विचारू नये? मी नुस्ताच समोर बघत राहीलो. मी तरी त्यांची काय समजूत काढणार? मी ज्या गोष्टीचं ईतकी वर्षे समर्थन करतोय, वकीली करतोय, त्याचविषयी तर आज्जी बोलत होत्या. त्यांच्याशी बोलणार तरी कुठल्या तोंडाने ? तेच ऐकुन मी ईतका चरकलो. फेसबूक, मायबोलीवर नुस्ता किबोर्ड बडवून ईच्छामरणाचं समर्थन करणं वेगळं आणि आपल्याच शेजारी बसून कोणीतरी हताश होउन ईच्छामरणाविषयी बोलणं वेगळं. त्यावेळी मला जे वाटत होतं ते शब्दात मांडणं निव्वळ अशक्य आहे. पाच दहा मिनिटांत ते आज्जी आजोबा एकमेकांच्या आणि काठीच्या आधाराने हळूहळू पावलं टाकत निघून गेलं, मी पण घरी आलो. संपुर्ण दिवस आज्जींचे ते वाक्य कानात घुमत राहीले. तो विषय काही केल्या डोक्यातून जाता जाईना.

ईच्छा मरणाचा खंदा समर्थक मी, नुस्ता शेजारी कोणीतरी बसून मरण्या विषयी बोलले तर चरकलो, बावचळलो.जगलो वाचलो तर साठाव्या पासष्ठाव्या वर्षी मरणाला कवटाळायचा प्लॅन करतोय तर मी ते खरंच करु शकेन का? मरणाच्या रोमँटिजमने कायम मला भुरळ घातली. पण ऐन वेळी हे सगळे मोह, पाश सोडून जायचे डेअरींग मी करु शकेन का? जर नाही करु शकलो तर आयुष्यभर ईच्छामरणाच्या समर्थनार्थ सोडलेले शाब्दिक बुडबुडे, आलेला गिल्ट मला शेवटच्या श्वासापर्यंत छळत राहील का?

३. ‘ईच्छा’ मरण

प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मरण एकदम सुखात यावं, हातीपायी धडधाकट असताना यावं, शरीराचे जास्त हाल होऊ नयेत, शेवटच्या दिवसात कोणावर आपलं ओझं नसावं. मी पण खुपदा विचार करतो. जर मरण्याच्या पद्धतीच्या मेन्यु कार्ड मधून मरण निवडायचंच असेल तर मला कसं मरायला आवडेल?

मरणाविषयी बोलणार्‍या बहुतांश लोकांना वाटतं की आपल्याला झोपेत अ‍ॅटॅक येउन मरण यावं. सगळ्यात सुखाचं मरण तेच. पण मला असं मरण नको वाटतं. मरणाविषयीच्या काव्यात्मक, फिल्मी कल्पनांमूळे म्हणा किंवा साहित्यातून मांडल्या जाणार्‍या मरणाच्या रोमँटिजम मुळे म्हणा, पण मला असं आलेलं मरण नको. मला पुर्ण जागृत राहुन, सामोरं आलेल्या मृत्युला कवटाळून मरायचं आहे. माझ्या आयुष्यात मी जे काही केलं ते अगदी मनापासून केलं. कोणतीही गोष्ट करायची ती उगीच करायची म्हणून न करता, पुर्ण मन लावून, संपुर्ण समरसतेने केली. मरायचं तर तसेच. उत्कटतेने, समरसतेने.

सगळ्या आप्त स्वकीयांना, मित्र मैत्रिणींना भेटून, ज्यांच्या बाबतीत मी चुकलो त्यांची माफी मागून, सर्वांचा निरोप घेऊन मग मला या जगातून जायचे आहे. यदाकादाचित साठ पासष्ठ वर्षाचा होईपर्यंत जगलो तर नक्कीच असे ईच्छामरणाचा मार्ग स्वीकारुन मरायचे आहे. पण त्याआधीच नंबर लागावा असे नियतीच्या मनात असेल तर कधी आणि कसे मरण मला येईल? एखादा असाध्य आजार होऊन त्याच्याशी अनेक वर्षे झुंज देताना? एखादा भयानक आजार होऊन दोन चार दिवसांत? हार्ट अ‍ॅटॅक नाहीतर स्ट्रोक येऊन? दिर्घ आजारात अवयव निकामी होऊन? अपघाती मृत्यु येऊन? कोणतं मरण माझ्या लेखी लिहिलं असेल?

माझ्या थोड्याफार पुण्याईने माझ्या ईच्छेप्रमाणे येणारंच असेल तर मला अपघाती मरण यावं आणि तो अपघात पण व्हावा, तर तो मला हवा तसा. घरापासून दहा पंधरा किमीवर कुठेतरी कॉलेजच्या मित्रांसोबत गेट टुगेदर असावं, भरपुर जुन्या आठवणी निघाव्या, सगळ्यांनी एकमेकांची खेचावी, हास्याचे फवारेच फवारे उडावे, नंतर नेहमीचे लवकर जाणारे मित्र निघून गेले की आपल्या जिवलग मित्रांसोबत अजून एक एक आग्रहाचा पेग व्हावा, निघुया निघुया म्हणत पान खाल्याशिवाय कसं निघणार, म्हणून टपरी जवळ गाड्या लावून पान खाता खाता अजुन एक तास जावा. सगळ्यांंना मिठया मारुन निरोप घेतल्यावर, जाता जाता गाडीवर खायला आणि बायकोला आवडतं म्हणून तिच्यासाठी एक मिठा पान पार्सल घ्यावं. जाताना आपली नेहमीची ड्रंक प्ले लिस्ट फुल्ल आवाजात लावावी आणि त्यावर भसाड्या आवाजात मोठमोठ्याने गाणी म्हणत भन्नाट स्पीडने बाईक पळवताना अपघात व्हावा.

मनात मित्रांच्या झालेल्या भेटीची आठवण, जिभेवर तृप्त जेवणानंतर खाल्लेल्या पानाची चव, कानात वाजणारी आवडती गाणी आणि खिशात एक पार्सल मिठा पान...

माझ्या ईच्छेनुसार येणार असेल तर असेच यावे.........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपघाती मरण नाही पटले. इच्छामरणाचा प्रत्येकाला हक्क असावा असं वाटतं. पण त्यात स्वार्थ नसावा. काही व्याधींमुळे जर शरीर साथ देत नसेल आणि आपल्या माणसांना आपले करण्यात आनंद वाटत असेल, भाग्याचे वाटत असेल तर त्यांच्यासाठी शारीरीक त्रास सहन करत जगायलाच हवे या मताचा मी आहे. जर आपल्याला अगदीच परावलंबित्व आले आणि आपली उठबस करताना आपल्याच माणसांना वैतागवाणे वाटत असेल तर कुणाविषयीही मनात आढी न ठेवता, आयुष्यात ज्या कुणी त्रास दिला असेल अशा सर्वांना माफ करुन आनंदाने निघून जावे हे उत्तम.

कुणाविषयीही मनात आढी न ठेवता, आयुष्यात ज्या कुणी त्रास दिला असेल अशा सर्वांना माफ करुन आनंदाने निघून जावे हे उत्तम. >>+१११

१) मृत्यू - यातील त्या काकांनी ठरवलेलं फर्निचरचं काम अपुर्ण राहून देवाच्या दारी मरण आले यावरून मला एक इंग्रजीत धडा होता त्याची आठवण झाली. मायकेल का हसला असे बहुतेक नाव होतं त्या धड्याचं, मायकेल नावाचा देवदूत शापामुळे पृथ्वीवर येतो. एका चांभाराकडे कामाला राहतो. तीन प्रसंगावेळी त्याला हसू येते. माणूस आपले मनसुबे करत राहतो पण मृत्यू डाव उधळून लावतो. खूप सुंदर धडा होता.
३) ईच्छा मरण यात तुम्ही जे लिहीलंय त्याला मी आत्महत्या म्हणेन. अपघाती मरण न येता कायमचं अपंगत्व आले तर?

मीही इच्छामरणाचा समर्थक झालो आहे. दुसऱा परिच्छेद वाचून, माझ्याही मनात तेच प्रश्न उभे ठाकले.

संपूर्ण लेख आवडला.
अपघाती मरणाचंही आकर्षण (?) असू शकतं, हे कळलं.

अनेक वेळा "मरण यावे तर.... असे... " हे वाक्य एकले आहे, म्हणजे कुणालाही / कुठला त्रास न होता जाणे पण हे आपल्या हातात नाही आहे.

मी इच्छा मरणाच्या विरुद्ध आहे. शेवटच्या काळात काहींना अतोनात त्रास / यातना होतात.... हे सर्व आयुष्याचा भाग आहे आणि त्या आव्हानांना पण तेव्हढ्याच आनंदाने सामोरे जायला हवे.

यावर भसाड्या आवाजात मोठमोठ्याने गाणी म्हणत भन्नाट स्पीडने बाईक पळवताना अपघात व्हावा. >>>>> हे प्रथम वाचताना , जिंदगी एक सफर है सुहाना"हे गाणे ऐकू येत असल्याचा भास होत होता.ट्रेनमधून येताना एका स्टेशनवर गाडी थंबली,कारण गाडीखाली एकाने जीव दिला होता..त्या व्यक्तीचा एक हात, आमच्या डब्याखाली पडला होता.बाकी शरीर ३-४ डबे ओलांडल्यावर पडले होते.म्हणजे किती फरफटून मृत्यू झाला होता.ही गोष्टही ,अपघाती मरणाची इच्छेवेळी आठवली.

इच्छामरण या विषयावर आंतरजालावर भरपूर चर्चा झाल्या आहेत. आता विषय निघालाच आहे म्हणून त्यापैकी काही खाली देत आहे.

परमसखा मृत्यू : किती आळवावा....
http://www.mr.upakram.org/node/1386

http://www.misalpav.com/node/3015

सुखांत
http://www.mr.upakram.org/node/2168

https://www.maayboli.com/node/12105

पुन्हा एकदा सुखांत!
http://www.mr.upakram.org/node/2491

सन्मानाने मरण्याचा हक्क
http://www.aisiakshare.com/node/3317

अवयव दाना संबंधी - काही माहिती
http://www.maayboli.com/node/38727

फिरुनी नवी जन्मेन मी!!! (अर्थात महत्व अवयव प्रत्यारोपणाचे!)
http://www.maayboli.com/node/23686

इच्छा मरण कायदेशीर असावे का ?
http://www.maayboli.com/node/48623

जगण्याचीही सक्ती आहे..
http://www.maayboli.com/node/55417

सगळ्या आप्त स्वकीयांना, मित्र मैत्रिणींना भेटून, ज्यांच्या बाबतीत मी चुकलो त्यांची माफी मागून, सर्वांचा निरोप घेऊन मग मला या जगातून जायचे आहे>> +१
ईच्छामरणाविषयी फारसा विचार नाही केला कधी..
पण मला माझ्या जिवाभावाच्या आप्तस्वकीयांना, सुहृदांना वियोगाच्या मानसिक तयारीसाठी थोडासा तरी वेळ / काळ मिळावा असे वाटते. त्त्यामुळे अपघाती मृत्यू, झोपेत मृत्यू हे पर्याय (असलेच तर!!!) बाद Happy

छान लिहीलंय.. अपघाती मृत्यू इच्छा हे जरा वेगळं वाटलं ...
पण त्यातही तृप्तीचा आनंद घेऊन मृत्यू येणार असेल तर ती feeling भारी असेल Happy

> अपघाती मरणाची ईच्छा सोडून बाकी सगळे लिखाण आवडले > +१.

> मला एक इंग्रजीत धडा होता त्याची आठवण झाली. मायकेल का हसला असे बहुतेक नाव होतं त्या धड्याचं, मायकेल नावाचा देवदूत शापामुळे पृथ्वीवर येतो. एका चांभाराकडे कामाला राहतो. तीन प्रसंगावेळी त्याला हसू येते. माणूस आपले मनसुबे करत राहतो पण मृत्यू डाव उधळून लावतो. खूप सुंदर धडा होता. > खरंच मस्त होता तो धडा.

मृत्यूशय्येवर असताना माणसाच्या मनात नेमके काय विचार असतील?>>>>>जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे....प्रामाणिकपणे लिहितेय.

देवकी, ८९ साली माझे वडील मृत्युशय्येवर असताना त्यांना माझे लग्न होत आहे आणि त्यांना तिथे मंडपात कुणी जाऊ देत नाही असा भ्रम होत होता. तेव्हा माझे लग्न झाले नव्हते.बर्याचदा त्याला वातात बरळणे असे म्हटले जाते.शेवटची घरघर लागली तेव्हा नैनं छीनदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: असे पुटपुटत होते. आपल्या एकुलत्या एक मुलाच लग्न डोळ्यादेखत व्हाव अशी सुप्त इच्छा असणार.

लग्न डोळ्यादेखत व्हाव अशी सुप्त इच्छा असणार.>>>>>> कदाचित तसे असेलही.माफ करा,तरीही हा तर्कच म्हणावा लागेल.तुमच्या वडलांच्या मनात काय असेल हे त्यांच्याबरोबरच संपले.

बोलणं सोप्प असतं, खरोखरंच गाडी आली उडवायला तर त्या स्लिपर घालून धावणाऱ्या पोरासारखा धावत रस्ता पार करतील.

चैला!

चुकून मेलो अचानक, तर मोबाईल अन सगळे कॉम्प्युटर फॉर्मॅट करायला एका जिवलग मित्राला पासवर्ड देऊन ठेवलाय. तो काहीच न पाहता सगळे फॉर्मॅट करेल याची ग्यारंटी आहे Wink

बाकी मरायला किती वेळ आहे ते ठाऊक नाही. उद्याची सकाळ पहाण्याचं ग्यारंटी कार्ड माझ्यापाशी नाही, अन १०० वर्षे जगलोच तर तितका वेळ हाती पायी धड रहायला हवे इतकीच इच्छा आहे.

बाकी मरायला किती वेळ आहे ते ठाऊक नाही. उद्याची सकाळ पहाण्याचं ग्यारंटी कार्ड माझ्यापाशी नाही, अन १०० वर्षे जगलोच तर तितका वेळ हाती पायी धड रहायला हवे इतकीच इच्छा आहे.>>>>+११११११

चुकून मेलो अचानक, तर मोबाईल अन सगळे कॉम्प्युटर फॉर्मॅट करायला एका जिवलग मित्राला पासवर्ड देऊन ठेवलाय. तो काहीच न पाहता सगळे फॉर्मॅट करेल याची ग्यारंटी आहे Wink>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अगदि अगदि....अचानक मरण आले तर मोबाईल format मारायला वेळ मिळावा इतकेच मागणे Happy

खरडवहि वाचतोय आणि आवडतेय