खरडवही.....भाग २ आमरस, नाचणीचे पापड, अर्थ

Submitted by अतरंगी on 10 June, 2019 - 10:27

रोजच्या जगण्यात अनेक छोटे मोठे प्रसंग घडत असतात. त्यातले काही प्रसंग, तेव्हा मनात आलेली भावना कुठे तरी खोलवर रुतुन बसते. तसं बघायला गेलं तर त्यात फार काही विशेष नसते, पण त्यावर लिहावेसे वाटते. अगदी महत्वाचे नाही, फार काही उदात्त किंवा थोर नाही. तरी पण असेच आयुष्यात लक्षात राहिलेल्या छोट्या मोठ्या प्रसंगांची नोंद...... असंच, उगीचंच.....

१. आमरस

हा उन्हाळा जरा जास्तच बिझी गेला. दर आठवड्याला घरी गावावरून कोणी ना कोणी पाहुणे, मुलाचा समर कँप, त्याची ने-आण, घरची आणि बाहेरची भरपुर कामं......

असाच एकदा दुपारी घरी आलो तर मुलगा आणि एक चुलत पुतण्या आमरस करायचा म्हणून हौसेने आंबे सोलत आणि पिळत बसलेले. मी पण हात पाय धुवून त्यांच्या सोबत बसलो. त्यांच्यासोबत मस्ती करत आंबे पिळून घेऊन ऊठलो. पटकन मिक्सर लावून आमरस करावा म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं तर मधेच आई म्हणाली " मिक्सरला लावू नकोस, घुसळून घे" तिने असं का सांगितलं मला कळलंच नाही, आम्ही आमरस कायम मिक्सरलाच लावून करतो. प्रश्नार्थक चेहर्‍याने मला तसंच किचनच्या मधे उभं राहिलेलं पाहून आई हॉल मधे आवाज जाऊ नये म्हणून हळूच म्हणाली "गावाला तसाच करतात."
तेव्हा कुठे माझी ट्युब पेटली. काका, काकू, चुलत मामा सगळ्यांकडे आंबे पिळून घेवून जरासा गुळ घालून रवीने वगैरे घुसळून आमरस करतात. सर्वांना वाढुन झाल्यावर मी पण एका वाटीत आमरस घेऊन खायला बसलो आणि त्या चवीने मला अगदी वीस पंचवीस वर्षे मागे नेलं, दर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं, गावतली तीन काकांची जोडून जोडून असलेली घरं, सगळे चुलत भाऊ बहीण, दिवसरात्र त्यांच्या सोबत घातलेला दंगा अगदी सगळं डोळ्यासमोरून गेलं.
आईने सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी वाढायला सांगितल्यावर मला भान आलं. सगळ्यांना चटणी वाढून काकाकडे आलो तर काका मानेनेच नको म्हणत माझ्याकडे बघून "चावत नाही" एवढेच म्हणाला.
मला त्या क्षणी त्याच्याकडे बघून एकदम तरुण वयातला काका आठवला, अमिताभसारखी हेअरस्टाइल ठेवलेला, कोपर्‍यावरच्या न्हाव्याकडे जाऊन चकचकीत दाढी करुन येणारा, लांब कॉलरचे शर्ट आणि बेल बॉटमची पँट वापरणारा, कायम ईस्त्रीचे कपडे घालणारा, आम्हाला त्याच्या स्कूटर वर फिरवून आणणारा, दर शुक्रवारी पगार मिळाला की आठवड्याच्या बाजारातून आमच्यासाठी आंब्याची पेटी आणणारा, आम्हाला रात्री दुकानात नेऊन आईसक्रीम खिलवणारा, राणीच्या बागेत नेणारा, येताजाता जो भेटेल त्याला " पुण्याहुन पुतणे आलेत सुट्टीसाठी" असे अभिमानाने सांगणारा......
बालपणीचे सगळे उन्हाळे सुसह्य झाले ते या काकांमुळे, प्रत्येक उन्हाळ्यात गावाला जायची ओढ लागायची ती स्वतःच्या तुटपुंज्या कमाईत आमची शक्य तेवढी हौसमौज करणार्‍या काका काकूंमुळे..... त्यांच्या आपुलकी मुळे, लाडामुळे....
आता कधी तरी दोन चार वर्षातून एकदा पुण्याला येणार्‍या माझ्या चुलत पुतण्यांना- भाच्यांना दर वर्षी माझ्याकडे यावेसे वाटत असेल का? त्यांना ईथे अगदी भरपुर दिवस रहावे, परत गावी जाऊच नये असे वाटत असेल का? अजून एक पाच पंचवीस वर्षांनी त्यांना मी आठवेन का? आठवलो तर कसा आठवेन?

त्यांच्यासोबत बसून आंबे सोलणारा, त्यांच्यासाठी एका वेळी दोन दोन तीन तीन कलिंगड आणणारा, मे च्या रणरणत्या उन्हात पुण्याच्या ट्राफीकमधे घरून वाकड -वाकड वरुन धनकवडी- धनकवडी वरुन घरी एबढं फिरुन परत त्यांना पार्क मधे नेउन पकडापकडी खेळणारा, झोपायच्या आधी गाद्या घालून त्यांच्या सोबत मनसोक्त मस्ती करणारा, एवढ्याश्या त्या हॉलमधे त्यांच्यासोबत कबड्डी खेळणारा, रात्री रिकाम्या रस्त्यांवर भन्नाट स्पीड मधे कार चालवत फुल्ल आवाजात हाय रेटेड गबरू लावून नॅच्युरल्सचे आईसक्रीम खायला नेणारा, मन आणि पोट भरे पर्यंत समोर बसवून कल्याणची पाणीपुरी खिलवणारा, हा मामा त्यांना आठवेल का ?

वेलदोडे, दुध आणि गुळ घालून मिक्सर मधे केलेला आमरस आवडणारा हा शहरी मामा त्यांना आठवेल का ??????

२ नाचणीचे पापड
आजकाल या ना त्या निमित्ताने जवळ जवळ रोजच डेअरी मधे जाणं होतं, कधी लस्सी आणायला, कधी सोल कढी, कधी पनीर, तर कधी देशी गायीचे दुध.....

असाच कधी तरी अचानक डेअरीत काऊंटर समोरच्या मोकळ्या जागेत एक टेबल आणि त्यावर मांडलेले काही पदार्थ दिसले. त्यात विशेष असं काही नव्हतं. तरी माझं लक्ष विचलित झालं. कारण त्या टेबलच्या मागे उभ्या असलेल्या काकू. त्यांच्या चेहर्‍यात, चेहर्‍यावरच्या हावभावात, उभं राहण्याच्या पोश्चर मधे काहीतरी वेगळेपण होतं. काय ते नक्की सांगता येणार नाही. शब्दात मांडता येणार नाही. मी त्यांच्याकडे बघत असतानाच त्यांनी माझ्याकडे पाहीलं आणि त्यांचं बघणं मला एक दोन क्षण अस्वस्थ करुन गेलं. मी नाकासमोर बघत हातातली पिशवी सावरत तिथून निघून गेलो.

नंतर काही दिवस मी बिझी असल्याने घरातली वरची कामं बाबाच करत होते. एक दोन आठवड्यांनी परत त्या डेअरी मधे जाणं झालं. या वेळेस मात्र मी त्यांच्या टेबल पाशी गेलो. तिथे ठेवलेले पदार्थ पाहू लागलो. " घरगुती आहेत का?" उगीचंच विचारायचं म्हणून विचारलं. काकूंनी लगेच पुढे येत अगदी नम्रतेने हो वगैरे म्हणत, गोड बोलत थोडी जास्तीची माहिती दिली. मी वडीलांना आवडतात म्हणून तळायच्या मिरच्या, मुलाला आवडतात म्हणून नाचनीचे पापड घेतले आणि बाहेर पडलो.

घरी गेल्यावर बायकोने पिशवीतलं सामान काढता काढता विचारलंच " नाचणीचे पापड कशाला आणले, आधीचंच पाकिट फोडलं नाही अजून"

मला मी तरी पापड आणल्याचे आठवत नव्हते.
" कोणी आणले?"

" बाबांनी आणले होते आणि त्यांनी पण हेच आणलेत"

मी बाबांना विचारलं तर म्हणाले अरे त्या डेअरीच्या समोर एक बाई बसली होती. तिच्याकडुन घेतले बब्बूला आवडतात म्हणून आणि त्या बाईला जरा मदत होईल म्हणून.....

३. अर्थ.

मेच्या उन्हाळ्यातली असह्य दुपार, नव्यानेच झालेल्या नाशिक फोर लेन हाय वे वर निवांत गाडी चालवणारा मी आणि सुरेल आवाजात मला कंपनी देणारा जगजित सिंग......

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो

आँखों में नमी, हंसी लबों पर
आँखों में नमी, हंसी लबों पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो

अर्थ मधलं मला एके काळी भयानक आवडणारं गाणं. हे गाणं पहिल्यांदा मी कधी ऐकलं ते नक्की आठवत नाही, पण पाठ कधी केलं ते मात्र अगदी व्यवस्थित आठवतं. दहावीच्या परिक्षा संपल्या होत्या आणि आम्ही आपले उगीच एका एका मित्राच्या घरी टाईम पास करत फिरत होतो. त्यातल्याच एका मित्राच्या घरी कॅसेटचं खूप कलेक्शन होतं. त्याचे वडील जुन्या गाण्यांचे खूप शौकीन आणि दर्दी. एक वेगळंच व्यक्तिमत्व. मी कधी त्यांना चिडलेलं पाहीलं नाही, मुलांना अभ्यास करा म्हणून ओरडताना ऐकलं नाही, त्यांनी कधी आम्हाला आमचे "आडनाव" किंवा मार्क विचारले नाही, आम्ही त्यांच्या घरी गेलो की छान हसून घरात घ्यायचे आणि शांतपणे गाणी ऐकत बसायचे........

त्या दिवशी त्यांच्या कॅसेटचं कलेक्शन चाळत असता ना मला त्यात अर्थ आणि साथ साथ या दोन चित्रपटांची एक कॅसेट सापडली. ती कॅसेट घरी आणून मी ती कॉपी केली, त्यातली सगळी गाणी अक्षरशः लिहून काढली आणि चक्क पाठ केली..... मला वेड लावलं होतं त्या गाण्यानी. आज पण कुठेही या दोन चित्रपटातली गाणी लागली की मला त्या मित्राचे वडील आणि सोफ्यावर निवांत बसून गाणी ऐकणारी त्यांची छबी डोळ्यासमोर येते.

त्यांची अजून एक खूप आवडती आठवण आमचे दहावीचे निकाल लागल्यानंतरची.....

मी आणि माझे मित्र फार काही अभ्यासू प्रकारात मोडणारे नव्हतोच. शाळेच्या तासांमधे वर्गात अतरंगीपणा करणे आणि शिक्षक करतील त्या शिक्षा आनंदाने, अभिमानाने भोगणे एवढेच काम. एका वर्गात दोन वेळा बसायचे नाही, एवढेच माफक ध्येय. शाळेतली बाकी वर्षे गेली तसेच दहावीचे पण गेले. निकालाची काळजी अशी नव्हतीच. काळजी करणारे विद्यार्थी दोन प्रकारातले असतात. ज्यांना आपण शाळेत/ बोर्डात कितवे येऊ किंवा मग आपण पास होऊ की नाही याची खात्री नसलेले. मी दोन्ही बाजूला नसायचो. काही न करता, शाळेत जे कानावर पडतं त्यात फर्स्ट क्लास मिळायचा आणि त्यात मी महासमाधानी होतो. दहावीचा निकाल पण फार काही वेगळा लागला नाही. पण तो दिवस कायम लक्षात राहीला. आमच्या शाळेत पहिली आलेली मुलगी तिचा बोर्डातला नंबर काही मार्कांनी हुकला म्हणून हमसून हमसून रडत होती आणि आम्ही आपल्या गृप मधले सगळे पास झाले म्हणून जल्लोश करत होतो.

निकालाच्या दिवशी घरी गेल्यावर संध्याकाळी त्या मित्राचा फोन आला. त्याच्या वडीलांनी सगळ्यांना दुसर्‍या दिवशी घरी बोलावलं आणि गृप मधले सगळे दहावी पास झाले या आनंदात झक्कास पैकी पार्टी दिली. आम्हाला मनापासून आग्रह करुन करुन जेवायला घातलं. त्या दिवशी रात्री मी आयुष्यातला एक खूप मोठा धडा घेऊन घरी गेलो.

आजही कुठे अर्थ किंवा साथ साथ चित्रपटातली गाणी ऐकली की मला त्या कॅसेटचे कव्हर, दहावी ला आमच्या शाळेत पहिली येऊन हमसून हमसून रडणारी ती मुलगी आणि हसर्‍या चेहर्‍याने आम्हाला आग्रह करकरुन जेवायला घालणारे त्या मित्राचे वडील हमखास आठवतात.....

भाग ३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटले. आमच्या गावाकडे आंबरस असं म्हणतात. आंबरसाला एकमेकांकडे जाणे येणे होते. ते एक गटगच असते नातेवाईक सग्यासोयऱ्यांचं. आंबरस - पुरणपोळी, सार- भात, कुरडई भजे साजूक तूप असा बेत असतो. प्रेमाचा आग्रह करून पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ घालतात. मन अक्षरश: तृप्त होऊन जाते.

छान.!

मी हे सारखे खरवडही वाचतेय आणि त्यावरुन खरवसाची आठवण येतेय.

छान आहे.
मी हे सारखे खरवडही वाचतेय > >>>>> मी पण Happy आधी लवकर अर्थच लागला नाही.

मस्त लिहिलंय! शेवटची खरड तर एकदम खास! आपल्या भोवताली खूप सुंदर गोष्टी घडत असतात फक्त आपल्याला त्यांचा आनंद घेता आला पाहिजे. हे कळायला बरंच आयुष्य खर्ची पडतं.

थोडंस खटकलेलं:
राणीच्या बागेत नेणारा, येताजाता जो भेटेल त्याला " पुण्याहुन पुतणे आलेत सुट्टीसाठी" असे अभिमानाने सांगणारा......
बालपणीचे सगळे उन्हाळे सुसह्य झाले ते या काकांमुळे, प्रत्येक उन्हाळ्यात गावाला जायची ओढ लागायची

काका नक्की कुठे रहायचे? गावी की मुंबईला?

खरडणे आवडलं!

आवडतात म्हणून आणि त्या बाईला जरा मदत होईल म्हणून..... >>> हे खासच.माझी आई बरेचदा,याच कारणासाठी अशा गोष्टी विकत घ्यायची.म्हणायची आपल्याला नोकरी आहे,ते लोक वणवण करतात तर आपली थोडी मदतही.

छान आहे हा भागदेखील.
> दहावी ला आमच्या शाळेत पहिली येऊन हमसून हमसून रडणारी ती मुलगी > ज्याचे दुःख त्याला कळते. May be she was from a very dysfunctional family. अभ्यास आणि मार्क हाच एक आधार असेल. आपण बोर्डात आलो तर घरातली भांडणं कमी होतील अशी पौगंड वयातली भ्रामक समजूत असेल. किंवा बोर्डमधे येण्याबद्दल, मार्कंबद्दल पालकाकडून दबाव असेल.

बाकी ही जी शाळेतली मौजी लोकं असतात (किंवा आपण मौजी होतो या समजुतीतली जी लोकं असतात) ते पहिल्या येणाऱ्या मुलगा/गीवर एवढे लक्ष ठेऊन का असतात म्हणे? आणि इतक्या वर्षांनीही तिची हीच आठवण का यावी?

नवीन प्रतिसादांचे मनापासून आभार.

बाकी ही जी शाळेतली मौजी लोकं असतात (किंवा आपण मौजी होतो या समजुतीतली जी लोकं असतात) ते पहिल्या येणाऱ्या मुलगा/गीवर एवढे लक्ष ठेऊन का असतात म्हणे? >>>>>
पहिले येणारे पण सो काॅल्ड मौजी लोकांवर लक्ष ठेऊन असतात की.... Happy

आणि इतक्या वर्षांनीही तिची हीच आठवण का यावी?
>>>>>
ईतर आठवणी सुद्धा आहेत. ही त्या आठवणीचा भाग होती म्हणून लिहीली आहे.