खरडवही:- भाग ३. पेन ड्राईव्ह, सांगड, स्त्री पुरुष मैत्री

Submitted by अतरंगी on 23 June, 2019 - 11:08

1. पेन ड्राईव्ह

चलते चलते, चलते चलते
यूँही कोई मिल गया था, यूँही कोई मिल गया था
सरे राह चलते चलते, सरे राह चलते चलते.....

नक्की कुठे जात होतो आठवत नाही पण गाडीत मी आणि माझा मित्र, कोणतातरी घाट, आणि लताचा स्वर्गिय आवाज मात्र चांगलाच लक्षात आहे......

“बदलू का?” मधेच मित्राने तंद्री मोडली.....

“ थांब जरा”

जो कही गई ना मुझसे, जो कही गई ना मुझसे
वो ज़माना कह रहा है, वो ज़माना कह रहा है
के फ़साना
के फ़साना बन गई है, के फ़साना बन गई है
मेरी बात चलते चलते, मेरी बात चलते चलते....

“ बदल आता”

कोण्या तिसऱ्याला कळलं नसतं की मी गाणं लगेच लगेच न बदलता ते कडवं होईपर्यंत का थांबलो. पण मित्राला माझ्या सवयी माहीत असल्याने तो शांत बसला. मला काहीकाही गाणी आवडतात ते त्यातल्या एखाद्या वाक्यामुळे किंवा एखाद्या कडव्यामुळे. काही काही गाणी तर माझ्या पेन ड्राईव्ह मधे अशी आहेत की ती फक्त मला एखाद्या विशिष्ठ काळाची आठवण करुन देतात म्हणून ती माझ्याकडे आहेत. “ पुरानी जिन्स और वो गिटार, दिल ले गयी कुडी गुजरात की, ऐका दाजिबा, युफोरीया, सोनू निगमचा दिवाना अल्बम, जुन्या गाण्यांचे आलेले रिमिक्स....” ही आणि अशी मागचं सहस्रक संपताना हिट् असलेली अनेक गाणी, ही सगळी गाणी ज्या चॅनल वर लागायची तो itv... मित्र मैत्रिणींसोबत वाॅकमनचा एक हेडफोन दोघात एक वापरुन ऐकलेली ती गाणी, टिनेज मधला तो एक धुंदपणा, कॉलेजलाईफ या सगळ्याची आठवण करून देणारं ते फोल्डर अजुन माझ्या पेन ड्राईव्ह मधे आहे.

अशाच काही ना काही कारणांनी माझ्या पेन ड्राईव्ह मधे अगदी भरपूर गाणी आणि फोल्डर आहेत. हिंदी, मराठी, नवी, जुनी, 90’s superhits, शोधुन शोधुन डाऊनलोड केलेल्या गझल्स, कोक स्टुडीओ, unplugged, पुलंचं कथाकथन, आयुष्यावर बोलू काही, लग्नात वाजणारी मराठी रिमिक्स, आग्री, कोळी भरपूर सारी फोल्डर्स.... हरेक फोल्डरमधे मला त्याच्याशी बांधून ठेवणारं काहीतरी.

प्रत्येक फोल्डर ऐकण्याची गंमत निराळी फिलींग्स निराळी... त्यात ते ऐकताना सोबत कोण आहे त्यावर पण त्याची लज्जत वाढते किंवा कमी होते. एखाद्याला एखादं फोल्डर किंवा गाणं आवडतं तर अजुन कोणाला तेच बोअरींग किंवा असह्य वाटतं. “ऊगाच काही पण गाणी भरून ठेवलीत तू....” असे म्हणत म्हणत बऱ्याच जणांनी पेन ड्राईव्ह नेऊन त्यातले एक दोन फोल्डर काॅपी केलेच. मला मात्र या ना त्या कारणाने त्यातली सगळीच गाणी आवडतात... प्रत्येक फोल्डरची ऐकायची एक विशिष्ठ काळवेळ आणि गंमत आहे.

मित्रांसोबत कुठे ट्रिपला निघाल्यावर मागच्याच सिटवर खंबा फोडून पेग भरणारे मित्र आणि त्यांचा लावण्या, मराठी/आग्री रिमिक्स गाण्यांवरचा धिंगाणा, नव्वदीतल्या गाण्यांसोबत निघणाऱ्या शाळा कॅालेज मधल्या ‘मैत्रिणींच्या’ आठवणी.... घरच्या ट्रिप्स मधे नवी गाणी लावून त्यावर ठुमकणारी चिल्ली पिल्ली, ते सगळे झोपल्यावर रफी लताची गाणी चालू असताना मधुनंच एखाद दुसरी ओळ गुणगुणणारे ज्येष्ठ नागरीक, त्यांच्या काॅलेजमधल्या, चित्रपटांच्या, जुन्या रेडीओच्या आठवणी, त्यांचं ते “आमच्या काळातली गाणी” वरून चालू होणारं पुराण.... गायकी किंवा शायरीची खास आवड आणि समज असणाऱ्या दर्दी मित्रांसोबत जाताना गुलाम अली, मेहदी हसन यांच्या गझल्स चालू असताना मधुनच येणारी दिल खुलास दाद, त्याच्यावरून अजुन दुसरं काही तरी आठवून “अरे हे ऐकलंयस का” विचारत एखादी मस्त गझल, ठुमरी ऐकवणं.... सगळंच मला प्रिय....

प्रत्येक फोल्डर माझ्या एक एक भावनेचा, आठवणींचा संच आहे. कदाचित माझ्या विचित्र स्वभावाचे मिश्रण असल्यासारखा तो पेन ड्राईव्ह पण तसाच झाला आहे. म्हणूनच प्रत्येक गाण्याला आणि फोल्डरला खास जागा आहे, पेन ड्राईव्ह मधे आणि माझ्या मनामध्ये सुद्धा.

२. सांगड :- भावनेची आणि कृतीची.....

काही काही जणांना ना वरदान असतं, त्यांना कोणत्याही प्रसंगी, महत्वाच्या क्षणी कसं वागावं याचं उपजत ज्ञान असतं. मला तर एखादा प्रसंग घडल्यावर काही दिवसांनी, वर्षांनी कळतं, अरे यार त्या वेळेस आपण असं वागायला हवं होतं. किंवा अमक्या तमक्याने त्या वेळेस केलं तेच बरोबर होतं. मनमोकळेपणाने म्हणा, अंगभूत शहाणजोगतेपणाने म्हणा ते पटकन असं काही तरी करुन जातात, जे माझ्यासारख्या कायम संभ्रमात असलेल्याला कळायला पण किती काळ जाईल देव जाणे...

लग्नानंतर काही महिन्यांनी आम्ही दोघे आणि सोबत सपत्नीक मित्र फिरायला म्हणून राजस्थानला गेलो होतो. तेव्हाचा असाच एक प्रसंग कायमचा मनात कोरला गेलेला आहे.

असेच जयपुरचा एका किल्ल्यावर आम्ही गेलो होतो तर तिथे राजघराण्यातल्या कोणाच्या तरी वाढदिवसाची तयारी म्हणून सजावट करणे, मांडव घालणे वगैरे चालू होते. आम्ही आपले असेच ईकडे तिकडे फिर, कुठे गृप फोटो काढ कुठे सेल्फी काढ असे करत फिरत होतो. नवीनच लग्न झालं असल्याने स्वत:च्याच धुंदीत, हसण्या-खिदळण्यात मग्न होतो. आम्ही निघायच्याच बेतात होतो तेव्हाच कुठून तरी अप्रतिम तान ऐकू आली आणि मागोमाग एक सुंदर राजस्थानी लोकगीत. सगळेच तिकडे ओढलो गेलो. दहा ते पंधरा वयोगटातली एक पाच सात मुलं एका तबलजी सोबत रियाज करत होती. ती मुले ईतकी सुंदर गात होती की आम्ही मंत्रमुग्ध होऊन तिथेच ऊभे राहीलो. एक पाच दहा मिनीटात तिथे एक मध्यमवयीन गृहस्थ आले आणि ती मुलं अजूनच मन लावून रियाज करू लागली.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी आजूबाजूला मांडव घातलेले, सजावट केलेली, खास गायकांसाठी तयार केलेली बैठक, त्या मुलांचे मन लावून गाणारे चेहरे, त्यांनी घेतलेल्या त्या ताना, मावळतीला आलेला दिवस, मला अजून जशाच्या तशा आठवतो. साधारण अर्धा पाऊण तास झाल्यावर त्यांनी ब्रेक घेतला. मधे आलेल्या त्या गृहस्थांनी त्यांना राजस्थानी मधेच काही सुचना द्यायला सुरुवात केली. त्यांचे बोलून झाले तसे आम्ही लगेच त्या गृहस्थांशी बोलायला पुढे झालो. मित्राची बायको गायिका आहे. चांगली गाते, कार्यक्रम वगैरे करते. तीच सर्वात पुढे होती. तिने अगदी मनापासून त्या मुलांचे कौतुक केले. बोलता बोलता त्यांनी सागितलं की ते सगळे त्यांचेच विद्यार्थी आहेत. ते त्या मुलांचे गुरुजी आहेत हे कळल्या कळल्या तिने चटकन वाकून त्यांना अगदी मनोभावे पायांना हात लावून नमस्कार केला. त्यांना पण ते अपेक्षित नव्हतं, परधर्मिय असल्याने असेल कदाचित पण ते जरा भांबावले, लगेच सावरून त्यांनी तिला व्यवस्थित आशिर्वाद दिला.

मी त्या क्षणी अचानक स्तब्ध झालो. किती चटकन मनमोकळेपणाने, नम्रतेने तिने तो नमस्कार केला. आपल्याला कधी पटकन असे वागताच येत नाही. त्या एका क्षणामागे मला असेच निसटून गेलेले अनेक क्षण आठवतात..... कधी कोणाचे मनापासून कौतुक करायचे होते, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायाची होती, कधी मित्राच्या बायकोला, मैत्रिणीला खिदळत असताना टाळी द्यायची होती, ती छान दिसत असताना, तिने छान स्वयंपाक केलेला असताना काॅंप्लीमेंट द्यायची होती, एखाद्या सुख-दुखा:च्या क्षणी आई-बाबांना, खुप दिवसांनी भेटलेल्या बहिणीला हलकीशी मिठी मारायची होती, एअरपोर्टवर सोडायला आलेल्या बायकोला जवळ घ्यायचे होते, एक हलकासा किस द्यायचा होता....

असेच एक ना अनेक कितीतरी क्षण अवघडलेपणामुळे, संकोचामुळे, त्या वेळेस ते न सुचल्यामुळे हातातून निसटून गेले. कित्येकदा असं वाटतं की ते लक्षात आल्यावर लगेच परत जाऊन जे सुचलं ते करायला हवं होतं. पण ते क्षण निसटून गेले की परत ते पकडायचा केलेला प्रयत्न कदाचित केविलवाणा दिसला असता. असे काही करायचे असेल तर ते spontaneously लगेच करायला हवे. मला कधी तरी ते जमेल का?

सगळे संकोच, अवघडलेपणा, अलिखित सामाजिक संकेत झुगारून मला त्या क्षणातला आनंद कधी तरी भावनेला कृतीची जोड देऊन द्विगुणित करता येईल का?

३. स्त्री-पुरूष मैत्री.

मला जर माझ्यापेक्षा लहानांबद्दल, आज कालच्या तरुण पिढीबद्दल कोणत्या गोष्टीत असूया वाटत असेल तर त्यात मुला- मुलींची मैत्री या बद्दल सर्वात जास्त. किती मनमोकळेपणाने भेटतात, एकमेकांच्या घरी जातात, गप्पा मारत बसतात, एकत्र ट्रिप्स, हॉटेलिंग, पार्ट्या करतात. आजकाल गावी लग्नांना गेल्यावर दिसणारे पुतण्या-भाच्यांचे मित्र मैत्रीणी, त्यांचे गृप फोटोज, सेल्फी बघून सुद्धा बरं वाटतं. भावा- बहिणींमधे जेवढं मित्रत्वाचं नातं तयार होईल आणि भिन्न लिंगी मैत्री जितकी जिवलग होईल तितकी आपल्या समाजातील स्त्री पुरुष विषमता कमी होत जाईल असं मला कायम वाटत राहतं. आम्ही काॅलेजला असताना शहरात मित्र मैत्रीणी असणं, आणि वरच्या सर्व गोष्टी बर्‍यापैकी काॅमन होत्या. पण आजकाल उप-नगरात, गावात वगैरे सुद्धा स्वीकारलं जातंय.

आम्ही काॅलेजला असतानाचा माझा एक मित्र पुण्याच्या उप-नगरातल्या काॅलेजला होता. शाळा, ज्युनिअर काॅलेज, सिनिअर काॅलेज एकाच प्रांगणात असा प्रकार होता. हा मित्र ईतका सज्जन होता की त्याला दोन मुलींनी प्रपोज करूनही तो त्या दोघींना नाही म्हणाला होता. गमतीत आम्ही त्याला मर्यादा पुरूषोत्तम म्हणायचो. त्या काॅलेजला असताना त्याची तिथल्याच शाळेत असलेल्या एका मुलीशी ओळख झाली. सुरुवातीला बोलणे मग नंतर गप्पा, अधेमधे डबा एकत्र खाणे वगैरे चालू झाले. मी पण मधे एकदा गेलो तेव्हा तिला भेटलो होतो. मुलगी खरंच गोड आणि लाघवी स्वभावाची. मित्र खूपदा तिच्याविषयी काही ना काही सांगायचा. दोघांच्याही मनात तसं काही नव्हतंच. एक निकोप मैत्री किंवा भावा बहिणीचं खेळीमेळीचं नातं म्हणता येईल फारतर. जवळ जवळ सहा सात महिने ती मला मित्रांच्या गप्पांमधून भेटत राहीली.

एके दिवशी मित्राचा अलमोस्ट रडवेल्या आवाजात फोन आला. त्याला जाऊन भेटलो तर भयानक अपसेट होता. त्या मुलीच्या एका शिक्षिकेने तिला रागावून, शिक्षा करून तंबी दिली होती. या मित्राशी किंवा काॅलेजमधल्या कोणत्याही मुलाशी न बोलण्याची... मित्र भयानक डिप्रेस झाला होता. कोणाच्याच मनात काही नसताना त्या शिक्षिकेने असे करणे त्याच्या मनाला लागले होते. त्याला स्वत:च्या आणि तिच्या निर्मळ मनाचा, वागण्याचा तो अपमान वाटत होता. मला पण प्रचंड राग आला होता. काय हा मुर्खपणा, मुला मुलींमधे कधी फक्त मैत्रीचं नातं असुच शकत नाही का? प्रत्येक नात्याला स्त्री पुरुष याच दृष्टीने का बघतात लोक? त्या शिक्षिकेला काही अक्कल वगैरे आहे की नाही? एवढ्या लहान मुलीवर अशी शंका घेतात? तिला असं बोलतात? त्या क्षणी डोक्यात आलेले हे विचार अजून विसरलो नाही मी.

टिनेज मधले आम्ही, अर्ध्याहळ कुंडाने पिवळे झालेले, जगात सर्व काही आपल्यालाच कळतं, जगात सगळे मुर्ख आणि आपणच काय ते एक शहाणे. आपण स्वतःला जितके शहाणे आणि हुशार समजतो त्याच्या १% सुद्धा आपण नाही हे कळायलाच निम्मं आयुष्य गेलं.

आज जेव्हा मला ते सर्व आठवतं, तेव्हा प्रश्न पडतोच की त्या शिक्षिकेचं खरंच काही चुकलं होतं का? त्या उपनगरात हे तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं असतं तर त्यांना हे सर्व समजून घेता आलं असतं का? पालकांनी शाळेत येऊन शाळेला आणि शिक्षकांना धारेवर धरलं असतं तर? आज काही निकोप असणाऱ्या नात्यात ऊद्या एखादी नाजुक भावना ऊमलली असती तर? काॅलेज मधल्या मुलाने ठरवून गोड बोलून असे काही केले असेल तर? नकळत्या वयात दोघांकडून एखादी नको ती चूक झाली असती तर?

आजुबाजूला घडलेल्या आणि बातम्यांमधे वाचलेल्या एवढ्या घटना माहीत असल्यावर जर त्या शिक्षिकेच्या जागी मी असतो, तर काय केलं असतं????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाण्यांच्या बाबतीत माझं प्रेम असंच आहे. बऱ्याचदा गारंबीच्या बापूसारखी माझ्या वयाला न शोभणारी ( इतरांच्या नजरेतून) गाणी मी अगदी मोठ्यानं म्हणत असते. किशोर दा, मुकेश पासून दादा कोंडके यांच्या सिनेमातील गाणी मला निखळ आनंद देतात.

मस्तच!
पेन ड्राइव्हच्या बाबतीत अगदी सहमत.

मस्तच लिहिल आहेस.
मलाही पेन ड्राईव दे तुझा, काही फोल्डर कॉपी करण्यासाठी.

अशीच एक आठवण.
लग्न झाल्यावर आमच्याकडे जागरण गोंधळ असतो. पहाटे पहाटे लंगर तोडला, आरत्या झाल्या, गोंधळी लोकांना बिदागी दिली आणि सगळे चहाची वाट पाहत बसलो.
तेवढ्यात हार्मोनिअम वरील गोंधळ्याने सुर धरला आणि
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला हे गीत सुरू केल. लगेच इतरांनीही आपापली वाद्ये सरसावत त्याच्यामागे सूर लावला. काय माहीत पण त्यावेळी ते गाण ऐकताना अगदी भान हरपून गेलो होतो.
ती पहाटेची वेळ, तो सूर, ते गाणं अजूनही अजुनही मनाच्या एका कप्प्यात जसच्या तस आहे.

छान लिहलंय.

फक्त ते पाया पडणं वगैरे काही मला झेपत नाही. आणि तिसऱ्या घटनेत शिक्षिकेच वागणं बरोबर होतं.

मला काहीकाही गाणी आवडतात ते त्यातल्या एखाद्या वाक्यामुळे किंवा एखाद्या कडव्यामुळे. काही काही गाणी तर माझ्या पेन ड्राईव्ह मधे अशी आहेत की ती फक्त मला एखाद्या विशिष्ठ काळाची आठवण करुन देतात म्हणून ती माझ्याकडे आहेत. “ >>अगदी अगदी झाले,खरंतर मला पण अशीच सवय आहे किंवा माझी आवड सुद्धा अशीच आहे म्हणा,पण शक्यतो दुसऱ्या कोणाला ते पटलन आवडत नाही,चालू असलेले गाणे एका विशिष्ट ओळीनंतर बदलले तर आजूबाजूचे अगदी त्रासिक नजरेने बघतात

मस्तच!
पेन ड्राइव्हच्या बाबतीत अगदी सहमत.आणि तिसऱ्या घटनेत शिक्षिकेच वागणं बरोबर होतं.

सरजी, सुंदरच, तिन्ही भाग कदाचित मिळुन 'भावना, कृती आणि तारतम्य' ह्या व्यापक त्रैराशीकाला आवाहनच जमुन गेलय !! छान !

सुंदर लिहीले आहे. या सिरीज मधले तिन्ही लेख छान आहेत.

त्या "सांगड" मधल्या उल्लेखावरून 'रावसाहेब' मधे त्या गायकाने मैफिल गाजवल्यावर रात्री रावसाहेब त्याचे पाय चेपत बसल्याचा पुलंचा उल्लेख तसाच आहे. एखाद्या वेळी आपल्याला जे करावेसे वाटले, किंवा तेव्हा वेळेवर सुचले नाही ते कोणीतरी सरळ करून टाकल्याचा.

बाय द वे ते "सांगड" चा क्रमांक २ करा - तसा काही फरक पडत नाही पण संदर्भ द्यायला बघायला गेलो तेव्हा दिसले Happy क्रमांक ३ दोनदा आलाय.