ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ६

Submitted by नितनवे on 8 May, 2026 - 13:47

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ५
पूर्वभाग
समीर आणि आरव एसयूव्हीच्या तावडीतून निसटण्यासाठी जीवघेणा स्टंट करतात आणि आपली टॅक्सी सोडून एका जुन्या, अंधाऱ्या गोदामात आश्रय घेतात. आरव त्याच्या वडिलांनी दिलेल्या पासवर्डचा वापर करून गुप्त फाईल्स उघडतो, जिथे त्यांना 'एम्बर आर्काइव्ह' नावाचे महाकाय षड्यंत्र आणि समीरचे नाव 'कॉम्प्रमाईज्ड' यादीत असल्याचे समजते. दुसरीकडे, सिंगापूरमध्ये माया सेन कबीर नावाच्या एका रहस्यमय व्यक्तीच्या मदतीने जीवघेण्या हल्ल्यातून वाचते; कबीर हा त्याच सिस्टीमचा भाग होता ज्याच्या विरोधात माया लढा देत आहे. समीरला स्वतःच्या निष्ठेबद्दल शंका निर्माण झाली असली तरी, आरव त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि दोघे मिळून या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात, पण तितक्यात शत्रू गोदामाच्या दाराशी येऊन ठेपतो.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ६ - रिकव्हरी चेन

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ - भव्य काचेच्या भिंती, लख्ख चकाकणारे 'पॉलिश्ड' फ्लोअर्स आणि पापणी लवते न लवते तोच सतत बदलणारे फ्लाईट बोर्ड्स. इथली प्रत्येक गोष्ट अगदी अचूक, कमालीची सुसंगत आणि तितकीच निर्विकार होती.

इथे वेळ कधीच थमत नाही, तो फक्त एखाद्या यंत्रासारखा अखंडपणे पुढे सरकत राहतो.

डॅनिअल क्रॉस नेहमीच्या चालीत चालत होता गर्दीत वाहत असल्यासारखा न थांबता, त्याने हेतुपूर्वक गर्दीत मिसळणं निवडलं होतं. तो थेट पुढच्या फ्लाइटकडे धावला नाही. कारण तसं करणं म्हणजे घाई दाखवणं आणि लक्ष वेधून घेणं. तो समोरून जाणाऱ्या लोकांचे पॅटर्नचे निरीक्षण करत बसला. कोण थांबतंय. कोण परत फिरतंय. कोण स्क्रीनकडे जास्त वेळ टक लावून पाहतंय.

काचांच्या त्या विस्तीर्ण भिंतीपलीकडे विमानांच्या रांगा उभ्या होत्या. त्यांच्या शेपट्यांवर विविध देशांचे झेंडे आणि एअरलाईन्सचे रंग एखाद्या जागतिक नकाशासारखे चमकत होते. जणू काही ते रूट्सचे गूढ संकेतच होते. मध्येच स्क्रीनवर “फायनल कॉल” चं लाल निशाण चमकत होतं. बॅगा ओढत, एकमेकांना हाका मारत आणि आवाज वाढवत लोकांची झुंबड गेटच्या दिशेने धावत होती. पण डॅनियल मात्र हलला नाही; जणू त्या कोलाहलाशी त्याचा काही संबंधच नव्हता. तो तेव्हाच उठला, जेव्हा तो आरडाओरडा थांबला आणि गेटवर एक निवांत शांतता पसरली.
तो अगदी संथ पावलांनी पुढे चालत गेला. रांगेच्या अगदी मध्यभागी जिथे कोणाचं लक्ष जात नाही आणि जिथे कोणाची नजर ठरत नाही. त्याने गेट बदललं, रांग बदलली आणि चालण्याचा आपला संपूर्ण 'पॅटर्न'च बदलून टाकला.

सिक्युरिटी स्कॅनच्या दरम्यानही कोणाच्या नजरेत येणार नाही असंच त्याचं वागणं होतं.
बॅग साधी होती. आतलं सामान सगळं काळजीपूर्वक निवडलेलं. काहीही एक्स्ट्रा नाही. काहीही संशयास्पद नाही. कोणतीही अशी गोष्ट नाही जी नंतर कोणाच्या आठवणीत राहील.

त्याच्याकडे दोन पासपोर्ट होते. दोन्ही खरे. दोन्ही वेगवेगळ्या आयुष्यांचे. पहिला युरोपमधून बाहेर पडण्यासाठी वापरलेला आणि दुसरा इथून पुढे जाण्यासाठी.
त्याने दुसरा पासपोर्ट स्कॅन करण्यासाठी दिला. एक छोटासा बीप आवाज आला आणि तो मुंबईच्या दिशेने निघाला, त्याचे दुसरं आयुष्य सुरू झालं.
************************************************************************************************************************
बर्लिन
पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. बर्लिनवर हलका पाऊस नुकताच थांबला होता. दूरवरून ट्रामच्या धातूच्या चाकांचा किरकिर आवाज अधूनमधून हवेत पसरत होता. शहर जागं होत होतं. काही लोक कामासाठी बाहेर पडत होते. पण काही ठिकाणी रात्र अजून संपलेली नव्हती.

जुन्या औद्योगिक भागातल्या एका काचेच्या इमारतीत वरच्या मजल्यावर अजून दिवे लागलेले होते. इमारत बाहेरून पूर्ण सामान्य दिसत होती. बाहेरून ती साधी कन्सल्टन्सी फर्म वाटली असती.

त्या इमारतीच्या अठराव्या मजल्यावरच्या कॉन्फरन्स रूममध्ये अनेक स्क्रीन्सचा लख्ख प्रकाश पसरला होता. त्या भिंतींवर जागतिक हालचालींचे जिवंत नकाशे उलगडत होते; लाईव्ह शिपिंग फीड्स, विमा व्यवहारांमधील बदलांचे आलेख आणि कमोडिटी बाजारातील चढउतारांचे तांत्रिक चार्ट्स एकामागून एक सरकत होते. बंदरांमधील कोंडीचे अचूक मॉडेल्स आणि सेकंदासेकंदाला बदलणारे आकडे तिथे सातत्याने अपडेट होत होते. लाल आणि हिरव्या रेषांच्या जाळ्यातून भविष्याचा अंदाज वर्तवणाऱ्या वक्ररेषा आणि जोखमीचे स्तर दर्शवणारे ओव्हरले स्पष्टपणे दिसत होते. हा केवळ तांत्रिक डेटा नव्हता, तर जगाच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी ती एक अत्यंत सक्रिय यंत्रणा होती.

एका मोठ्या स्क्रीनवर भारताचा पश्चिम किनारा दिसत होता.
मुंबई
मुंद्रा बंदर
कांडला बंदर

काही नोडस् लाल रंगात चमकत होते.
वाहतुकीच्या घनतेतील अचानक वाढ. रांगांवरील ताण दर्शवणारे निर्देशक. क्लिअरन्स उशिरा होण्याच्या शक्यता. सगळं अजून नियंत्रणात होतं.

टेबलाच्या टोकाशी एलेना वोल्कोवा शांतपणे बसली होती.
राखाडी सूट. चेहऱ्यावर कडक रेषा. कुठलाही अनावश्यक दागिना नाही. समोर टॅबलेट होता आणि एका हातात ग्लास.
ती स्क्रीनवर बाजारातला चढउतार पाहत असली तरी हवामानाच्या अपडेट्स पाहत असल्यासारखा निर्विकारपणा तिच्या चेहऱ्यावर होता.

खोलीतले बाकी लोक मात्र स्पष्टपणे तणावाखाली दिसत होते.

दार उघडलं. एक अनॅलिस्ट आत आला. टॅबलेट पुढे केलं. “Mumbai node is active again.”

एलेनाने नजर वर केली नाही. ती अजूनही स्क्रीनवरील डेटा फ्लो पाहत होती.

“सोर्स?”

“निर्बंधित लॉजिस्टिक्स क्वेरीज.”

अनॅलिस्टने पुढची स्क्रीन उघडली.

“निष्क्रिय रूटिंग संदर्भ पुन्हा सक्रिय झाले होते.”

“संबंधित ऍसेट्सची हालचाल आढळली.” आता तिने हळूच स्क्रीनकडे पाहिलं.

एका कोपऱ्यात नवीन ऍक्टिव्हिटी पॅटर्न चमकत होता.
MUMBAI PORT REGION
ANOMALOUS QUERY CLUSTER

लाल रंगात धडधडणारे बिंदू. अचानक वाढणाऱ्या क्वेरीज. रूटिंगचे उमटणारे प्रतिध्वनी यावर तिची नजर काही क्षण स्थिर राहिली.

तिच्या टॅबलेटची स्क्रीन एका नवीन नोटिफिकेशनने उजळली: 'India response below expected panic curve.'
त्यापाठोपाठ दुसरी ओळ झळकली 'Daniel Cross active.' या वेळी मात्र तिच्या नजरेत एक सूक्ष्म हालचाल झाली.ती काही क्षण स्तब्ध बसली. मग अगदी मंद, थंड आवाजात म्हणाली, “हा अजूनही तसाच मूर्ख राहिलाय...”
“After all these years…” ती पुटपुटली.

त्या आवाजात आश्चर्य नव्हतं. जुन्या कटकटींनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली, अशी भावना होती.

दुसरा अनॅलिस्ट सावधपणे म्हणाला, “योगायोग असू शकतो.”

ती उठली. ती खिडकीजवळ गेली. पहाटेच्या प्रकाशात शहर अजून करडं दिसत होतं. रस्ते चमकत होते. दूर ट्राम सरकत होती.

“Coincidences don’t repeat in patterns,” ती शांतपणे म्हणाली.

ती परत स्क्रीनकडे वळली. या वेळी दुसरं नाव चमकलं.
SAMIR NAIR
STATUS FLAG: OBSERVED CONTACT

खोलीतली हवा आणखी जड झाली.

एका अनॅलिस्ट ने विचारलं ,“ ऍसेटला संपवायचं का?

एलेनाची नजर त्या नावावर स्थिर राहिली. मग ती करड्या आवाजात म्हणाली, “नाही. जोपर्यंत तो सक्रिय आहे, तोपर्यंत तो आपल्यासाठी एक 'ट्रॅकर' आहे. तो आपल्याला कोणाकडे घेऊन जातोय त्याची वाट पाहूया.”

स्क्रीनवर मुंबईजवळचा एक बिंदू पुन्हा लाल झाला. आणि हजारो किलोमीटर दूर, एका अंधाऱ्या गोदामात दोन माणसं अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की खेळ किती मोठा आहे.

एलेना वोल्कोवाच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारची उत्सुकता होती, एखाद्या अनुभवी खेळाडूने बुद्धिबळाच्या पटावर अचानक हललेले एखादे प्यादे पाहिल्यावर जसा श्वास रोखून धरावा, तशी.

"सिस्टीमच्या आत तो अजूनही जिवंत आहे..." ती पुटपुटली.

खोलीतले अनॅलिस्ट्स गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले. कारण त्या एका वाक्याचा अर्थ असा होता की, जे काम संपलय असं ते समजत होते, ते अजूनही अपूर्ण होतं.

एका अनॅलिस्टने पुढे झुकत विचारलं, "याची माहिती वर कळवायची का?"

खोलीतला ताण क्षणात बदलला. आतापर्यंत चर्चा केवळ डेटाबद्दल होती, आता ती थेट सत्तेच्या उतरंडीपर्यंत पोहोचली होती. खोलीतली प्रत्येक हालचाल थांबली. कीबोर्डचे आवाज शांत झाले, पण स्क्रीनवरचे ग्राफ्स मात्र एखाद्या जिवंत नाडीसारखे थरथरत राहिले.

एलेनाने त्याच्याकडे पाहिलं. तिची नजर सरळ होती आणि बर्फासारखी थंड. “Not yet.” त्या दोन शब्दांत केवळ नकार नव्हता, तर एक अढळ आदेश होता.

खोलीत काही सेकंद सुई पडली तरी आवाज होईल इतकी शांतता पसरली. मग ती सावकाश उठली आणि टेबलाभोवती फेऱ्या मारत म्हणाली, “जर मुंबई नोड खरंच रिअ‍ॅक्टिव्हेट झाला असेल...”

ती मध्येच थांबली. जणू तिने पुढचं वाक्य हवेत टांगून ठेवलं होतं, जेणेकरून त्याचा अर्थ सर्वांना उमजावा. “...तर याचा अर्थ रिकव्हरी चेन सुरू झाली आहे.”

एका स्क्रीनवर टाइमलाइन्स उघडल्या गेल्या आणि जागतिक उलथापालथीचा जणू एक नकाशाच समोर आला.
Port delays. Insurance spikes. Energy volatility.
स्क्रीनवर 'फेज मार्कर्स' शांतपणे चमकत होते. तिथे मोठ्या अक्षरांत उमटलं होतं PHASE TWO - SCHEDULED
त्या शब्दांमध्ये कोणतीही भीती नव्हती, ना कोणती घाई. ते केवळ एका सुनियोजित वेळापत्रकासारखे दिसत होते. जणू काही एखादा मोठा विध्वंस हा अपघाताने नाही, तर अगदी ठरवून घडवून आणला जात होता.

एलेनाने काही क्षण त्या स्क्रीनकडे स्थिर नजरेने पाहिलं. मग ती शांतपणे म्हणाली, “फेज टू बारा तास आधी सुरू करा.”

त्या खोलीत कोणीही उलट प्रश्न विचारला नाही. कारण त्या इमारतीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सत्तेची ती Hierarchy चांगलीच ठाऊक होती. ऑपरेटर्स, फायनान्शिअल को-ऑर्डिनेटर्स, राजकीय मध्यस्थ आणि मीडिया अ‍ॅसेट्स... प्रत्येक स्तर आपापलं काम चोख बजावत होतं. पण त्यातल्या बहुतेकांना हे माहीतच नव्हतं की ते नक्की कोणत्या महाकाय चित्राचा भाग आहेत. प्रत्येकाकडे फक्त एक तुकडा होता, पूर्ण चित्र कोणालाच दिसत नव्हतं.

पण वरच्या स्तरावरची परिस्थिती वेगळी होती, तिथे सूचना थेट कधीच येत नसत. त्या एकामागून एक स्तरांमधून झिरपत खाली उतरायच्या. जणू वरच्या बाजूला कोणीतरी अगदी हलकासा दाब दिला आहे आणि खाली संपूर्ण महाकाय यंत्रणा त्या दाबाने हालू लागली आहे.

आणि त्या सर्व स्तरांच्या पलीकडे फक्त एकाच नावाची कुजबुज ऐकू यायची.

डायरेक्टर.

त्याचं खरं नाव कोणीच वापरत नसे. त्याच्याशी थेट बोलण्याचं भाग्यही फार थोड्यांच्या नशिबी आलं होतं. बहुतेकांना फक्त त्याचे आदेश आणि त्यांचे परिणाम दिसायचे.

कधी एखादा आर्थिक फेरबदल, कधी प्रसारमाध्यमांचा नियोजित प्रचार, तर कधी धोरणांचा राजकीय दबाव. चेहरा कुठेच नव्हता, होते ते फक्त परिणाम आणि Black Ember मध्ये हे 'अदृश्य' असणंच सर्वात मोठं सामर्थ्य होतं.
************************************************************************************************************************
मुंबई.
समीरने भयाने एक पाऊल मागे घेतलं, तर आरवने आपल्या बॅगची पट्टी घट्ट आवळून धरली जणू त्या बॅगेत दडलेलं रहस्यच आता त्यांचा शेवट ठरणार होतं.

समीरने अचानक आरवचा हात पकडला आणि त्याला जोराने बाजूच्या रिकाम्या रॅकच्या मागे खेचले. हालचाल इतकी अचानक झाली, की आरवचा तोल जवळजवळ गेला असता.

समीरने लगेच त्याच्या तोंडाजवळ बोट नेलं. गप्प. एकही शब्द नाही.

दोघेही rack च्या सावलीत खाली वाकून बसले.

तेवढ्यात लोखंडी दरवाजा हलक्या आवाजात ढकलला गेला. चर्रर…

कोणीतरी आत आलं होतं. पावलांचा आवाज सावकाश पुढे सरकत होता. जणू आत आलेल्या माणसाला माहित होतं की शिकार अजून इथेच आहे.

आरवचा श्वास आता एखाद्या भात्यासारखा वरखाली होऊ लागला. त्याला स्वतःच्या छातीचा आवाजसुद्धा मोठा वाटत होता. त्याने नकळत बॅगची पट्टी अजून घट्ट पकडली. समीर मात्र पूर्ण स्थिर होता. त्याचे डोळे रॅकमधल्या फटीतून बाहेर खिळले होते.

आत आलेला माणूस काही पावलं पुढे आला. मग सावधपणे आजूबाजूला कानोसा घेऊ लागला.

पूर्ण शांतता. फक्त दूरवरून शहराचा मंद आवाज. आणि गोदामात फिरणारा ताण.

त्या माणसाची सावली रॅकवर हलत होती. क्षणभर आरवला वाटलं तो थेट त्यांच्या दिशेने वळणार. त्याच्या मानेमागे घाम जमा झाला. समीरने हलकासा हात पुढे करून त्याला अजून खाली बसण्याचा इशारा केला.

काही सेकंद. मग आणखी काही. वेळ मंदावल्यासारखा वाटत होता. आत आलेल्या माणसाने शेवटी एकदा मागे वळून पाहिलं. जणू त्याला काहीतरी जाणवलं होतं. पण खात्री नव्हती. तो काही क्षण तसाच उभा राहिला.

मग वळला. लोखंडी दरवाज्याकडे चालत गेला. आणि तो बाहेर गेला.

काही सेकंद दोघेही हलले नाहीत. समीर अजूनही ऐकत होता. बाहेर पावलांचा आवाज दूर गेला. मग शांतता. खरी शांतता.

तेव्हा समीरने अखेर मंद श्वास सोडला. आरवनेही सुटकेचा निश्वास टाकला. छातीतली धडधड अजून कमी झाली नव्हती.

“थोडावेळ आपण इथेच बसून राहूया,” समीर कुजबुजला. त्याचा आवाज अजूनही मंद होता. आरवने मानेनेच होकार दिला.

दोघेही सावलीत तस्सेच बसून राहिले.

पहाट अजून पूर्णपणे उजाडली नव्हती. समुद्रावर राखाडी प्रकाश उतरू लागला होता. दूरवरून लोकल ट्रेनचा आवाज हवेत पसरत होता. काही चहाचे स्टॉल उघडले होते. वर्तमानपत्रांच्या गाड्या रिकाम्या रस्त्यांवरून धावत होत्या. शहर हळूहळू जागं होत होतं.

पण आरव देशमुख आणि समीर नायर अजूनही त्या रात्रीतच अडकलेले होते. गोदामातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कधीच सरळ मार्ग पकडला नाही. वाटेत दोनदा वाहनं बदलली. एकदा तर मुद्दाम गर्दीच्या गल्लीतून चालत रस्ता ओलांडला. एका वळणावर ते पाच मिनिटं जाणूनबुजून उलट दिशेला चालत गेले आणि पुन्हा मागे फिरले, कोणी माग काढतंय का, हे ताडण्यासाठी.

कोणताही डिजिटल मागोवा मागे राहणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेत होते. फोन पूर्णपणे बंद होते, सीम कार्ड्स बदललेली होती आणि सीसीटीव्हीच्या नजरेतून वाचण्यासाठी ते शक्यतो अंधाऱ्या कोपऱ्यांतूनच सरकत होते.

शेवटी ते दक्षिण मुंबईतल्या जुन्या इमारतीसमोर थांबले. बाहेरून पाहिलं तर ती एक साधं 'अकाउंटिंग ऑफिस' वाटलं असतं.
तिथे एक फिकट झालेला बोर्ड होता, शटर अर्धेच ओढलेले होते आणि वरच्या मजल्यांवर पूर्णपणे काळोख पसरला होता. एका साध्या, दुर्लक्षित इमारतीसारखा तिचा चेहरा होता.

समीरने आजूबाजूला एकदा नजर फिरवली. रस्ता रिकामा होता. एक दूधवाला सायकलवरून जात होता. दूर एका चौकात कुत्री भुंकत होती.
मग तो अगदी दबक्या आवाजात म्हणाला, “इथे काय सुरू आहे, हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे.”

आरव काहीच बोलला नाही.

लिफ्ट बंद होती, त्यामुळे समीरने जिन्याचा मार्ग निवडला. त्या जुन्या इमारतीचा तो अरुंद जिना, सिमेंटच्या झिजलेल्या पायऱ्या आणि गंजलेलं लोखंडी रेलिंग... सगळं कसं भयाण वाटत होतं. वर कुठेतरी एक मंद ट्यूबलाईट आपल्याच नादात लुकलुकत होती.

तिसरा मजला आला. समोर एक लांबच लांब कॉरिडॉर होता आणि त्याच्या अगदी टोकाला तो शेवटचा दरवाजा. समीर तिथे पोहोचल्यावर थांबला. त्याने एका ठराविक लयीत दरवाजावर टकटक केली.
दोनदा... मग पुन्हा एकदा.

काही क्षण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही, सगळीकडे शांतता होती. मग अचानक आतून धातूचा एक सूक्ष्म आवाज झाला आणि कुलूप उघडलं. दार अर्धवट सरकलं.

आतून एका वृद्ध माणसाने बाहेर पाहिलं. पांढरे शुभ्र केस, डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा आणि कित्येक रात्रींची झोप न मिळाल्यासारखे थकलेले डोळे. पण त्या थकलेल्या डोळ्यांत सुस्तीचा लवलेशही नव्हता; तिथे होतं ते फक्त धारदार निरीक्षण. त्याची नजर आधी समीरवर गेली आणि मग आरववर स्थिरावली. तिथे ती क्षणभर जास्त काळ रेंगाळली, जणू तो आरवच्या चेहऱ्याची कोणाशी तरी तुलना करत असावा.

“हाच तो मुलगा?” त्याने धीरगंभीर स्वरात विचारलं.

समीरने फक्त होकारार्थी मान हलवली.

दार पूर्ण उघडलं गेलं. "आत या," तो मोजक्या शब्दांत म्हणाला.

खोली साधी नव्हती. भिंतीला लागून जुन्या सर्व्हर्स चे रॅक्स उभे होते; काही चालू होते, तर काही बंद. त्यातून एक संथ, घुमणारा हमिंग आवाज सतत येत होता. भिंतींवर कागदी नकाशे पसरलेले होते. Shipping routes वर लाल आणि निळ्या रंगाच्या खुणा केलेल्या होत्या आणि काही ठिकाणी हाताने लिहिलेल्या टिपण्या स्पष्ट दिसत होत्या. तिथे नेटवर्क डायग्राम्स आणि विखुरलेले दळणवळणाचे संच पडलेले होते. एका टेबलावर तर जुने Encrypted Radios अस्ताव्यस्त पडले होते.

आरव तिथेच थबकला. ती जागा एखाद्या कार्यालयापेक्षा सोडून दिलेला गुप्तवार्ता केंद्र अधिक वाटत होती.

वृद्ध तो माणूस शांतपणे म्हणाला, “फोन बंद करा.”

दोघांनीही आपापली उपकरणं बाहेर काढली.

“बॅटरी काढता येत असेल, तर तीही वेगळी करा,” तो पुढे म्हणाला. त्याने एक Metal-lined केस उघडली, ज्याच्या आत Conductive mesh बसवलेली होती. दोघांचेही फोन्स त्या पेटीत ठेवले गेले आणि त्याने झाकण घट्ट बंद केलं.

“आता बोला.”

आरवने थेट प्रश्न केला, “तुम्ही कोण आहात?”

समीरने मध्येच ओळख करून दिली, “विनायक राऊत.” तो क्षणभर थांबला आणि पुढे म्हणाला, “पूर्वी Naval Signals Intelligence मध्ये होते.”

विनायक राऊत यांनी लगेच विषयाला बगल दिली. “काय आणलंय?”

आरवने आपली बॅग उघडली, त्यातून तो पेनड्राइव्ह बाहेर काढला आणि टेबलावर ठेवला.

त्या क्षणी विनायकरावांच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले. पहिल्यांदाच त्यांच्या नजरेत एक सावधपणा आणि गांभीर्य स्पष्टपणे उमटलं होतं.

“हा कुठे मिळाला?” त्यांनी विचारलं.

“माझ्या वडिलांकडून.”

“दुष्यंत देशमुख?”

आरवने शांतपणे होकारार्थी मान हलवली.

खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. खोलीत आता फक्त सर्व्हर फॅन्सचा तो एकसुरी घुमणारा आवाज ऐकू येत होता.

विनायकरावांनी वर्कस्टेशन सुरू केलं. "नेटवर्क नाही," त्यांनी पुष्टी केली. "एक्सटर्नल पोर्ट्स रिस्ट्रिक्टेड... ऑटो-राईट डिसेबल..." ते एकामागून एक सेटिंग्स तपासत होते. त्यांच्या हालचालीत एक प्रकारची सवय आणि जुनी लष्करी शिस्त जाणवत होती. त्या माणसाने आयुष्यभर कधीच 'सिस्टम'वर आंधळा विश्वास ठेवला नव्हता; त्यांचा विश्वास होता तो फक्त 'व्हेरिफिकेशन'वर.

आरवने समीरकडे वळून विचारलं, "तुला यांच्यावर खरोखर विश्वास आहे?"

समीर काही क्षण गप्प राहिला. मग अगदी मंद आवाजात म्हणाला, "मी अजून जिवंत आहे, कारण या जगात अजूनही अशी काही माणसं शिल्लक आहेत जी विकली गेलेली नाहीत."

विनायकरावांनी ड्राईव्ह जोडली. स्क्रीन उजळली आणि त्यावर मोठ्या अक्षरांत उमटलं EMBER_ARCHIVE. त्या एका नावाने खोलीतल्या वातावरणातला ताण अचानक कित्येक पटींनी वाढला.

विनायकरावांनी फाईल्स उघडायला सुरुवात केली. Logs, Fragment indexes, Encrypted containers.

त्यांच्या नजरेचा वेग आता बदलला होता. ते आता फक्त फाईल्स पाहत नव्हते, तर त्यामागचा पॅटर्न ओळखण्याचा प्रयत्न करत होते. काही मिनिटं ते काहीही न बोलता फक्त स्क्रीनकडे एकटक पाहत राहिले.

मग अतिशय शांतपणे उद्गारले, “हे केवळ साधं आर्काइव्ह नाही.”

आरव उत्सुकतेने पुढे झुकला. “म्हणजे नक्की काय आहे?”

विनायकरावांनी स्क्रीनवर काही Linked references दाखवले. तिथे वेगवेगळ्या Timestamps, Duplicate fragment IDs आणि Hidden routing references दिसत होते.

“दुष्यंतने या फाईल्स फक्त लपवल्या नाहीत,” ते क्षणभर थांबले. “त्याने त्याचं माहितीचं विभागीकरण केलंय म्हणजे गरजेप्रमाणे माहिती वेगवेगळ्या स्तरांवर ठेवणं”

स्क्रीनवर आता विखुरलेले संकेत स्पष्ट दिसत होते. जणू काही पूर्ण आर्काइव्हचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते.

“जर एखादं लोकेशन कॉम्प्रोमाइज झालं, म्हणजेच उघड झालं...” ते पुढे म्हणाले, “...तर उरलेले तुकडे सुरक्षित राहावेत, अशी ही मांडणी आहे.”

समीरने कपाळावर आठ्या आणत विचारलं, “म्हणजे ही एक Backup system आहे?”

विनायकरावांनी नकारार्थी मान हलवली. “त्यापेक्षाही काहीतरी जास्त भयानक आणि गुंतागुंतीचं...”

ते काही क्षण त्या स्क्रीनकडे पाहत राहिले आणि मग पुटपुटले, “हे Recovery architecture आहे.”

आरवला आश्चर्याचा धक्का बसला. याचा अर्थ, हे आर्काइव्ह कधीच नष्ट होऊ नये अशा बेताने त्याची रचना करण्यात आली होती.

“म्हणजे याच्या अजूनही प्रती आहेत?” आरवने विचारले.

विनायकरावांनी त्याचे सरळ उत्तर दिले नाही. “पण हे आर्काइव्ह कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहावं, अशी त्याची पूर्ण तयारी होती.”

त्यांनी NAMES.enc ही फाईल उघडली. स्क्रीनवर एनक्रिप्टेड ओळखचिन्हे दिसू लागली. काही नोंदी लाल रंगात होत्या, काही करड्या, तर काही पूर्णपणे काळ्या रंगाने पुसून टाकल्यासारख्या.

अचानक, एका लपवलेल्या भागात एक नवीन Marker लुकलुकू लागला. ARCHIVED RECOVERY MARKER FOUND

तिघेही स्तब्ध झाले. आरव लगेच म्हणाला “ही कोणतीही ऑनलाइन घटना नाहीयेना.”

विनायकरावांनी मान हलवली. “नाही,” त्या मार्करकडे पाहत ते म्हणाले, “हा आधीच तयार करून ठेवलेला Recovery reference आहे.”

समीर उत्सुकतेने पुढे झुकला. “म्हणजे नक्की काय?”

“आर्काइव्हचे तुकडे करताना काही भाग जाणीवपूर्वक एकमेकांशी Cross-linked ठेवले गेले आहेत.” विनायकरावांनी एक Timestamp दाखवला. “हा मार्कर जुना आहे, फक्त आतापर्यंत तो लपलेला होता.”

खोलीत पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली. मग स्क्रीनवर एक ओळखचिन्ह झळकलं: K-27. ते पाहताच समीरच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. “के-सीरिज...” तो पुटपुटला.

आरवने विचारलं, “काय?”

समीरने आपली नजर स्क्रीनवरून हटवली नाही. “ब्लॅक एम्बरमध्ये काही अंतर्गत रिकव्हरी हँडलर्सना 'के-सीरिज' कोड दिले जायचे.” तो थांबला आणि पुढे म्हणाला, “जर हा खरोखर तोच K-27 असेल तर...”

आरव शांतपणे म्हणाला, “कबीर?”

समीरने थेट होकार दिला नाही. फक्त म्हणाला, “कदाचित.”

खोलीतला ताण आता शिगेला पोहोचला होता. कारण पहिल्यांदाच त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली होती कबीर गायब झाला नव्हता. कदाचित, तो अजूनही त्यांना आर्काइव्हच्याच कोणत्यातरी रहस्यमय भागाकडे घेऊन जात होता.

आरव देशमुखने समीरकडे पाहिलं. “तुला खात्री आहे?”

समीर नायरने लगेच उत्तर दिलं नाही. तो काही क्षण त्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहिला, जणू तो फक्त तो कोड वाचत नव्हता, तर आपल्या जुन्या स्मृतींची पडताळणी करत होता.

“के-सीरिजचे संदर्भ मी आधी पाहिलेत,” तो धीम्या आवाजात म्हणाला.

आरवने विचारलं, “कुठे?”

“दुष्यंतच्या जुन्या नोट्समध्ये आणि काही इंटरसेप्टेड संदर्भांमध्ये.” तो क्षणभर थांबला. “पूर्ण आराखडा माहीत नाही, पण के-सीरिज म्हणजे 'इंटरनल रिकव्हरी हँडलर्स' असावेत, असा अंदाज होता.”

विनायक राऊतांच्या भुवया उंचावल्या. “रिकव्हरी हँडलर्स?”

समीरने होकारार्थी मान हलवली. “जर एखादं ऑपरेशन फसलं... किंवा एखादा महत्त्वाचा मोहरा गायब झाला... तर हे लोक विखुरलेले तुकडे एकत्र करायचे.” त्याचा आवाज आता आणखीनच खोल गेला होता. “डेड ड्रॉप्स... राउटिंग चेन्स... फॉलबॅक आयडेंटिटीज. जे सामान्यांना दिसत नाही, ते हे लोक पाहायचे.”

आरव शांतपणे हे सगळं ऐकत होता. “म्हणजे ते ब्लॅक एम्बरचेच लोक होते?”

समीर क्षणभर शांत राहिला. “हो,” तो थांबला आणि पुढे म्हणाला, “पण त्यांच्यावर कधीच पूर्ण विश्वास ठेवला जायचा नाही.”

विनायकराव हलक्या आवाजात पुटपुटले, “टू मच एक्स्पोजर.”

समीरने मान डोलवली. “रिकव्हरी टीम्सना इतर टीम्सपेक्षा जास्त मार्ग माहीत असतात, जास्त कनेक्शन समजतात. अशा लोकांना कोणतीही सिस्टम फार काळ सहन करत नाही.”

अचानक आरवला एक गोष्ट स्पष्ट झाली, कबीर पळत नव्हता, तो फक्त टिकून राहण्याची धडपड करत होता.

विनायकरावांनी दुसरी विंडो उघडली. “हे बघा.”

स्क्रीनवर आता विखुरलेले राउटिंग संदर्भ दिसू लागले. काही अपूर्ण होते, काही जाणीवपूर्वक बिघडवलेले, तर काही ओळींमध्ये विसंगत अक्षरं मिसळलेली होती. पण एका संदर्भाची पुनरावृत्ती वारंवार होत होती: लॉकर ३१७ फोर्ट.

आरवचा श्वास काही क्षणांसाठी रोखला गेला. त्याने आपल्या खिशातून ती काळी चावी बाहेर काढली आणि टेबलावर ठेवली. धातूचा एक सूक्ष्म आवाज झाला.

समीरने त्याच्याकडे रोखून पाहिलं. “तू हे आधी का नाही सांगितलंस?”

“मला खात्री नव्हती,” आरवचा आवाज शांत होता. “मला आधी पडताळणी करायची होती.”

विनायकरावांचा चेहरा अधिकच गंभीर झाला. ते काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले, “वारंवार येणारे संदर्भ म्हणजे नेहमीच अंतिम ठिकाण असतं असं नाही.”

“मग?”

“तो एक Validation marker असू शकतो.”

समीरच्या कपाळावर आठ्या उमटल्या. “म्हणजे नक्की काय?”

विनायकरावांनी राउटिंग ट्री मोठे केले. अनेक विखुरलेले नोड्स स्क्रीनवर जोडले गेले. काही बंद रस्ते होते, काही लूप्स, तर काही लपलेल्या शाखा. “रिकव्हरी चेन्स फक्त माहिती लपवण्यासाठी नसतात,” ते थांबले आणि पुढे म्हणाले, “योग्य माणूस योग्य ठिकाणी पोहोचतोय का, हे तपासण्यासाठी त्यांची रचना केलेली असते.”

खोलीत पुन्हा शांतता पसरली. आरवने विचारलं, “म्हणजे लॉकर ३१७ मध्ये डेटा नसेल?”

विनायकरावांनी थेट होकार दिला नाही. “तिथे मूळ आर्काइव्ह नसण्याची शक्यताच जास्त आहे.”

समीर आता पूर्णपणे पुढे झुकला. “मग तिथे काय असेल?”

विनायकराव काही क्षण खोल विचारात गढले आणि मग म्हणाले, “दिशा.”

त्या एका शब्दाने खोलीत पुन्हा शांतता पसरली. कारण 'दिशा' मिळणं म्हणजे उत्तर मिळणं नव्हतं, तर ते पुढच्या दरवाजापर्यंत पोहोचणं होतं. आरवने नकळत ती चावी घट्ट पकडली. त्याला अचानक जाणीव झाली त्याचे वडील फक्त माहिती लपवत नव्हते, तर एक अशी व्यवस्था लावत होते की केवळ योग्य व्यक्तीच शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकेल.

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users