ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ७ - लॉकर ३१७

Submitted by नितनवे on 13 May, 2026 - 07:53

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ६
पूर्वभाग
बर्लिनमध्ये Black Ember ची जागतिक ऑपरेशन कंट्रोल करणारी गुप्त यंत्रणा सक्रिय झालेली असते. मुंबईत आरव आणि समीर एका अंधाऱ्या गोदामातून बचाव करून शेवटी विनायक राऊत नावाच्या माजी नेव्हल इंटेलिजन्स अधिकाऱ्याकडे पोहोचतात. विनायक पेनड्राइव्हमधील EMBER_ARCHIVE उघडतो आणि दुष्यंत देशमुखने माहिती जाणीवपूर्वक तुकड्यांत विभागून ठेवली होती, हे उघड होतं. K-27 या रिकव्हरी हँडलरचा संदर्भ समोर येताच कबीर अजून जिवंत असण्याची शक्यता निर्माण होते आणि “लॉकर ३१७ फोर्ट” हा पुढचा महत्त्वाचा धागा ठरतो.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ७ - लॉकर ३१७
डॅनियल क्रॉसने इमिग्रेशन पार केलं. पासपोर्टवर शेवटचा शिक्का उमटला.
ऑफिसरने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं, मग स्क्रीनकडे नजर टाकली आणि पुन्हा पासपोर्ट बंद करून त्याच्याकडे सरकवला.
“थँक यू.”
डॅनियलने मान हलवली.
तो ट्रान्झिट कॉरिडॉरमधून पुढे चालू लागला. लांब काचेचा मार्ग. दोन्ही बाजूंना ड्युटी-फ्री दुकानांचा उजेड. हवेत परफ्यूमचा मंद सुगंध पसरला होता. दूरवर बोर्डिंग अनाउन्समेंट्स घुमत होत्या.

MUMBAI - BOARDING IN 42 MINUTES

तो काही क्षण तिथेच थांबला. स्क्रीनवरील निळसर प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता.

डॅनियल काही वेळ बोर्डकडे पाहत राहिला. वीस वर्षांपूर्वी तो अशा विमानतळांवर वेगळ्याच कारणांसाठी फिरायचा. तेव्हा त्याच्याकडे पासपोर्ट जास्त होते. नावे जास्त होती. पण एकूण विवेक कमीच होता.

त्या काळात विमानतळ त्याच्यासाठी केवळ प्रवासाचे टप्पे नसुन ऑपरेशनल झोन्स होते. जिथे भेटी व्हायच्या, गुप्त देवाणघेवाण व्हायची आणि कधी कधी शांतपणे लोकांना बाहेर काढण्याच्या जागा म्हणूनसुद्धा वापर व्हायचा. तेव्हा त्याला वाटायचं की अनामिक राहणं म्हणजे स्वातंत्र्य.

नंतर कळलं खूप नावं असली, की शेवटी स्वतःचं खरं नाव हरवतं.

तो एका कोपऱ्यातल्या कॉफी स्टॉलजवळ थांबला. रांग छोटी होती. झोपाळू कॅशियरने वर पाहिलंसुद्धा नाही. डॅनियलने रोख पैसे दिले आणि कॉफी घेतली.

त्याची नजर सतत काचांवरील, स्टीलच्या खांबांवर, दूरच्या सिक्युरिटी मिरर्समध्ये प्रतिबिंबांमध्ये फिरत होती.

जुनी सवय. कोणी थेट पाठलाग करतंय का, हे शोधण्यापेक्षा व्यावसायिक लोक पुनरावृत्ती शोधतात. तोच चेहरा पुन्हा दिसतो का. तीच चाल कायम ठरावीक अंतर राखते का. कोणी जास्त सामान्य दिसण्याचा प्रयत्न तर करत नाही ना.

त्याने कॉफीचा एक घोट घेतला. कडू चव. आणि एक जुनी आठवण परत आली.

दुष्यंत देशमुख. मुंबई - २००४, पावसाळ्याची रात्र, नरिमन पॉइंटजवळचा बंद ऑफिस फ्लोअर, कागदांनी भरलेली टेबलं. शिपिंग मॅनिफेस्ट्स. इन्शुरन्स रूटिंग शीट्स.
दुष्यंत खिडकीपाशी उभा राहून समुद्राकडे पाहत होता आणि डॅनियल अजूनही स्वतःला हुशार समजत होता.

त्या काळात त्यांना वाटत होतं की ते सिस्टमला नियंत्रित करत आहेत. बाजार हलवत आहेत. लोकांच्या मनात ठरावीक कथानक ढकलत आहेत. पण नंतर त्यांना समजलं कि सिस्टम त्यांनाच वापरत होती. त्याने डोळे मिटले.
डॅनियल क्रॉसने खिशातून एक छोटा दुमडलेला कागद बाहेर काढला.

जुन्या सवयी अजूनही टिकून होत्या. मोबाईलमध्ये नोंदी ठेवणं सोपं होतं. पण कागद कधी कधी जास्त सुरक्षित असतो.

त्यावर काही शब्द लिहिलेले होते JNPT 10:17 Western corridor pressure

त्याने काही क्षण त्या शब्दांकडे पाहिलं. मग कागद पुन्हा दुमडून खिशात ठेवला.

दुष्यंत देशमुखने भविष्य सांगितलं नव्हतं. पण त्याने काही पॅटर्न्स मागे सोडले होते.

लहान संकेत, विचित्र वाटणाऱ्या नोंदी, अर्धवट संदर्भ आणि आता ते पॅटर्न्स पुन्हा दिसू लागले होते.

फोन वापरणं त्याने शक्य तितकं टाळलं होतं. डिजिटल मागोवा कमीत कमी ठेवला होता.

पण पूर्णपणे अदृश्य होणं अशक्य असतं, हे त्याला माहिती होतं.

जग बदललं होतं. प्रत्येक कॅमेरा, तिकीट स्कॅन, हालचाल कुठेतरी नोंदवली जात होती.

तो गर्दीतून पुढे चालू लागला तसे त्याच्या नजरेला एक गोष्ट जाणवली. काही हालचाली पुन्हा दिसत होत्या. सारखे एअरपोर्ट टॅब्लेट्स, सूक्ष्म इअरपीसेस, क्षणभरासाठी होणारे नजर संपर्क. वेगवेगळी माणसं पण त्यांच्यात समन्वय होता.

एकजण कॉफी काउंटरजवळ थांबत होता. दुसरा कॉरिडॉरच्या टोकाला फोनकडे पाहत उभा होता. तिसरा बोर्डिंग स्क्रीनसमोर थांबला होता.

डॅनियलच्या चेहऱ्यावर काहीच बदल झाला नाही. त्याने चालण्याचा मार्ग किंचित बदलला. सरळ गेटकडे न जाता तो एका लांब कॉरिडॉरमधून वळसा घेत पुढे गेला. ड्युटी-फ्री दुकानांच्या रांगांमधून तो सावकाश चालत राहिला. मग काचेतील प्रतिबिंबातून त्याने मागची हालचाल पाहिली. दोन वेगवेगळे प्रवासी दिशा बदलताना दिसले. नैसर्गिक पण थोडे जास्त समन्वित.

एकाने चालण्याचा वेग कमी केला. दुसऱ्याने अचानक दुसऱ्या बाजूचा मार्ग घेतला जणू ते एकमेकांकडे न पाहताही एकाच गोष्टीवर लक्ष ठेवून होते.

डॅनियल शांत राहिला. कारण त्याला एक नियम माहिती होता... जेव्हा surveillance दिसायला लागतं तेव्हा खरी surveillance त्याआधीच सुरू झालेली असते.

डॅनियल पुन्हा मुख्य टर्मिनल मध्ये आला. स्क्रीन्स सतत बदलत होत्या. बोर्डिंग कॉल्स घुमत होते. लोक वेगवेगळ्या दिशांनी वाहत होते.
तो गेटजवळच्या भागात जाऊन बसला. जागा निवडताना त्याने नेहमीचा नियम पाळला; पाठीमागे भिंत, समोर पूर्ण दृश्य.
कोणी मागून येऊ नये आणि प्रत्येक हालचाल नजरेत यावी.

त्याच्या शेजारी एक भारतीय कुटुंब मुलाला शांत बसवण्याचा प्रयत्न करत होतं.
लहान मुलगा अधूनमधून सीटवर उभा राहत होता. आई त्याला परत बसवत होती. वडील बोर्डिंग पासेस सांभाळत होते.
दोन बिझनेस ट्रॅव्हलर्स लॅपटॉप उघडून बसले होते. एका स्क्रीनवर प्रेझेंटेशन चालू होतं. दुसऱ्यावर स्प्रेडशीट.
एक वृद्ध जोडपं बोर्डिंग पास पुन्हा पुन्हा तपासत होतं. गेट नंबर बदलला नाही ना, याची खात्री करत.
सामान्य जग. डॅनियल क्रॉस काही क्षण ते सगळं पाहत राहिला.

लोकांना स्वतःच्या छोट्या चिंता होत्या.
फ्लाइट वेळेवर आहे का. सीट खिडकीजवळ आहे का. मुंबईत पाऊस असेल का.
आणि त्याच वेळी, हजारो किलोमीटर दूर कुणीतरी बंदरं, विमा बाजार आणि पुरवठा साखळ्या हलवण्याची तयारी करत होतं.

Black Ember ची खरी ताकद त्याला पुन्हा आठवली.
ती थेट गोंधळ निर्माण करत नव्हती पण सूक्ष्म अस्थिरता मिसळत होती. इतकी सूक्ष्म , की सुरुवातीला कुणाचं लक्ष जात नाही पण इतकी अचूक, की नंतर खूप मोठे बदल घडून येतात.

गेटवर बोर्डिंग अनाउन्समेंट सुरू झाली.
“Passengers travelling to Mumbai…”

लोक उठू लागले. बॅग्स खांद्यावर गेल्या. रांग हळूहळू तयार झाली.

डॅनियल उठला. बॅग खांद्यावर घेतली. त्याच्या हालचाली अजूनही शांत होत्या. तो बोर्डिंग लाईनमध्ये उभा राहिला.

त्याच्या आजूबाजूला लोक स्वतःच्या जगात व्यस्त होते. कोणी पासपोर्ट शोधत होतं. कोणी शेवटचा मेसेज पाठवत होतं. कोणी ड्युटी-फ्री बॅग सांभाळत होतं.

तेव्हाच त्याच्या शेजारून चालत जाणारा एक मध्यमवयीन माणूस क्षणभर थांबला. त्याने डोकंसुद्धा वळवलं नाही. फक्त मंद आवाजात इंग्रजीत म्हणाला, “Some wars end late.”

तो माणूस पुढे निघून गेला. डॅनियल स्थिर उभा राहिला. त्याच्या उजव्या हाताची पकड बॅगेच्या पट्ट्यावर किंचित घट्ट झाली.

कारण संदेश स्पष्ट होता. हा इशारा नव्हता. ही त्याच्या अस्तित्वाची दखल होती. कोणीतरी त्याला ओळखत होतं. त्याच्या भूतकाळालाही. आणि तो कुठे जात आहे, हेही त्यांना माहिती होतं.

मुंबईत त्याच्या पोहोचण्याची वाट कुणीतरी आधीपासून पाहत होतं.
************************************************************************************************************************
सिंगापूर.
सकाळचे साडेनऊ. रात्रभर पडलेल्या पावसानंतर शहर धुतल्यासारखं चमकत होतं. काचेच्या इमारतींवर सूर्यप्रकाशाचे पांढरे तुकडे पडत होते. रस्त्यांवरील वाहतूक पुन्हा नेहमीच्या अचूक लयीत परतली होती. पण माया सेनसाठी वेळ अजूनही मागच्या रात्रीत अडकली होती. ती आणि कबीर आता मरिना परिसरापासून दूर, जुन्या गोदामांच्या भागातल्या एका छोट्या तात्पुरत्या फ्लॅटमध्ये लपले होते. जागा साधी होती. रोख पैशांत खोट्या ओळखीवर भाड्याने घेतलेली.

खोलीतले पडदे पूर्ण बंद होते. टेबलावर दोन लॅपटॉप उघडे होते. एका स्क्रीनवर जहाजवाहतुकीचे अपडेट्स चालू होते. दुसऱ्यावर सांकेतिक फाइल्स उघड्या होत्या. माया अजूनही पूर्णपणे रिलॅक्स नव्हती. ती दरवाज्याजवळच उभी होती कबीरपासून थोडं अंतर ठेवून.

“तू अजूनही मला पूर्ण सत्य सांगितलेलं नाहीस.”

कबीरने लगेच उत्तर दिलं नाही. तो किचनजवळ उभा राहून कॉफी मशीनमध्ये पाणी भरत होता.

“पूर्ण सत्य कोणाकडेच नसतं,” तो शांतपणे म्हणाला.

माया चिडली. “हे उत्तर नाही.”

कबीर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, “मी रिकव्हरी ऑपरेशन्समध्ये होतो.”

मायाची नजर त्याच्यावर स्थिरावली.

“K-series?”

पहिल्यांदाच कबीरच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया उमटली.

“हे नाव तुला कुठून मिळालं?”

"तुझ्या फाइल्समध्ये काही संदर्भ सापडले होते."

कबीरने कॉफी मशीन बंद केली.

तो तिच्याकडे वळला. “संदर्भ किती जुने होते?”

“खूप.”

तो हसला. थकलेलं हसू.

कबीरने टेबलावर पडलेलं पेन उचललं. एका कागदावर तीन ठिपके काढले. “लोकांना वाटतं Black Ember माहिती लपवतं.”

तो शांतपणे म्हणाला, “खरं तर ते माहिती विखुरतात.”

त्याने पहिल्या ठिपक्याकडे बोट दाखवलं. “एक तुकडा पकडला…”
दुसरा ठिपका “…तर बाकी जिवंत राहतात.”
तिसरा “पूर्ण चित्र कधीच एका माणसाकडे नसतं.”

मायाच्या डोक्यात काल रात्रीचे फोल्डर्स चमकले. विमा संरचना. माध्यमांवरील नोंदी. बंदरांचे नमुने. सगळं वेगळं. पण कुठेतरी जोडलेलं.

ती हळू आवाजात म्हणाली, “म्हणजे प्रत्येक जण फक्त तुकडा बघतो…”

कबीरने मान हलवली. “त्यामुळे विश्वासघात उशिरा लक्षात येतो.”

खोलीत काही क्षण शांतता पसरली.

मग माया थेट विचारलं, “आणि तू?”

कबीरची नजर काही क्षण तिच्यापासून दूर गेली.

“मी रिकव्हर करायचो.”

“काय?”

“विखुरलेले भाग.”

तो शांतपणे म्हणाला.

“गुप्तपणे माहिती ठेवण्याची ठिकाणं”

“जाळून टाकलेले archives.”

“Compromised handlers.”

“कधी कधी जास्त माहिती असलेली माणसं.”

मायाच्या अंगावर काटा आला.

“मग तू पळालास का?”

कबीर लगेच बोलला नाही. काही क्षण तो स्थिर उभा राहिला. मग म्हणाला, “कारण एक दिवस मला समजलं…की शेवटी recovery टीमलाच स्वतःची सुटका करावी लागते.

मायाला अर्थ समजायला काही सेकंद लागले. “गरज संपली की संपवले जाणारे.”

तो पुढे म्हणाला, “ज्याला जितकी जास्त माहिती तितकी त्याची जगण्याची शाश्वती कमी.”

खोलीत अचानक हलका vibration चा आवाज घुमला. दोघेही सावध झाले. टेबलावर पडलेला छोटा burner handset थरथरत होता.

मायाने स्क्रीनकडे पाहिलं. एका कोपऱ्यात masked relay code चमकत होता.

कबीरचा चेहरा लगेच गंभीर झाला. “उचलू नकोस.”

माया थांबली. “का?”

कबीर पुढे आला. “हा साधा कॉल नाही. हा डिवाइस अजून चालू आहे का ते तपासण्याचा जुना मार्ग आहे.”

कबीरने पडद्याच्या फटीतून खाली पाहिलं. रस्त्याच्या पलीकडे एक पांढरी मालवाहू व्हॅन उभी होती. साधी, कोणताही लोगो नाही.

पण कबीरची नजर तिच्यावरच स्थिर राहिली. “ती पंधरा मिनिटांपासून हललेली नाही.”

माया खिडकीजवळ आली.

“तुला खात्री आहे?”

“नाही.” कबीरने सरळ उत्तर दिलं. “पण असे योगायोग कमी असतात.”

त्याने अजून एक गोष्ट दाखवली. व्हॅनचं इंजिन अजून चालू होतं. ड्रायव्हर बाहेर आला नव्हता.

कोणतीही माल उतरवण्याची हालचाल नव्हती.

कबीर शांतपणे म्हणाला, “हे Black Ember चे मुख्य लोक नसतात.”

“मग?”

“बाहेरून भाड्याने घेतलेले नजर ठेवणारे स्थानिक.”

मायाच्या पोटात गोळा आला.

टेबलावरचा burner पुन्हा एकदा vibrate झाला.

या वेळी कबीरने लगेच हँडसेट उचलला, बॅटरी बाहेर काढली, सिम वेगळी केली.

दोन्ही वेगळ्या दिशांना ठेवले मग तो शांतपणे म्हणाला, “जर हा फक्त presence check असेल…”

तो खिडकीबाहेर पाहत राहिला.

“…तर आता ते पुढची प्रतिक्रिया पाहतील.”
************************************************************************************************************************
मुंबई.

सकाळ आता पूर्ण जागी झाली होती.

फोर्ट परिसरात ऑफिसची गर्दी वाढायला सुरुवात झाली होती. फुटपाथवर चहाचे स्टॉल धुराने भरले होते. डिलिव्हरी व्हॅन अरुंद रस्त्यांमध्ये अडकत होत्या. जुन्या दगडी इमारतींवर सकाळचा प्रकाश पडत होता.

आणि त्या सगळ्याच्या मध्ये आरवच्या खिशातली काळी चावी सतत जाणवत होती.

विनायकरावांच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यापासून तिघंही कमी बोलत होते. समीर गाडी चालवत होता. आरव मागे बसला होता. फोन वेगळे ठेवलेले.

समीरने मागच्या आरश्यात पाहिलं. त्याची नजर क्षणभर स्थिर झाली. सकाळपासून तिसऱ्यांदा ती गडद राखाडी स्कोडा काही अंतरावर दिसत होती.

आरवने सहज मागे पाहण्याचा प्रयत्न केला. समीरने लगेच थांबवलं. “सरळ मागे बघू नकोस.”

आरव सावध झाला. गाडीच्या आत काही क्षण ताणलेली शांतता पसरली.

विनायकरावांनी बाजूच्या काचेतील रिफ्लेक्शन मधून निरीक्षण केलं. ते थेट मागे पाहत नव्हते. त्यांची नजर रिफ्लेक्शनवरून पॅटर्न पकडत होती.

“Professional surveillance नाही.”

समीरने हलक्या आवाजात विचारलं, “मग?”

विनायकराव शांतपणे म्हणाले, “किंवा खालच्या स्तरावरचे नजर ठेवणारे लोक…किंवा फक्त confirmation team.”

गाडी पुढे सरकत राहिली. स्कोडा काही अंतर राखून होती कायम त्यांच्या मागेच.

“त्यांना माहित आहे आपण कुठे चाललोय?” आरवने मंद आवाजात विचारलं.

समीरने लगेच उत्तर दिलं नाही.

विनायकराव म्हणाले, “कदाचित नाही.”

ते रिफ्लेक्शन कडे पाहतच पुढे म्हणाले, “पण त्यांना हे माहित आहे कि आपण काहीतरी शोधायला चाललोय.”

मुंबईच्या जुन्या भागात शिरताच रस्ते अरुंद व्हायला लागले. समीरने गाडी फोर्ब्स लेनमध्ये वळवली.

स्कोडा अजूनही मागे होती पण आता तिने वेग कमी केला.

जणू डेस्टिनेशन निश्चित झालं होतं.

समोर दगडी इमारत उभी होती. जुन्या काळातल्या जाड भिंती, उंच कमानी, अर्धवट काळवंडलेला दगड. दरवाज्याजवळ फिकट ब्रास प्लेट चमकत होती.
Heritage Safety Lockers and Deposit Storage Co.

आरवची नजर त्या प्लेट वर स्थिर राहिली. त्याच्या खिशातली काळी चावी अचानक जड वाटू लागली.

ते आत गेले. जाड लाकडी दरवाजा मागे हलक्या आवाजात बंद झाला. जुने मार्बल फ्लोरिंग काळाच्या ओघात झिजलेलं, पण अजून मजबूत.
आरव पुढे आला. Vault मधली थंड हवा अजून दाट झाली होती.

समीर आणि विनायकराव काही बोलले नाहीत. सगळ्यांचं लक्ष त्या छोट्या लॉकवर स्थिर झालं होतं. आरवने चावी लॉकमध्ये घातली. ती बरोबर बसली, त्याने चावी हळूच फिरवली.

क्लिक. जुन्या mechanism चा आवाज धातूमधून पसरला. लॉकर हलकासा सैल झाला आरवने तो बाहेर ओढला. जुन्या रेल्सवरून सरकताना धातूचा मंद आवाज झाला. तिघेही काही क्षण शांत उभे राहिले.

जणू त्यांना आत आर्काइव्ह ड्राइव्ह्स, कागदपत्रं, नावं आणि गुपितं दिसतील अशी अपेक्षा होती. पण आत फक्त तीन गोष्टी होत्या.

एक दुमडलेला कागदी नकाशा, एक जुने काट्यांचं मनगटी घड्याळ आणि एक सीलबंद लिफाफा.

समीरच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला.

“बस्स?”

त्याच्या आवाजात निराशेपेक्षा गोंधळ जास्त होतं. इतक्या वर्षांच्या गुप्ततेनंतर हे?

विनायकराव मात्र शांतपणे पाहत होते. “Validation layer…” ते पुटपुटले.

आरवने लिफाफा उघडला जुन्या कागदाचा वास हवेत पसरला. आत एक छोटा कागद होता.

त्यावर टायपिंग केलेले शब्द होते IF RECOVERY HANDLERS ARE ACTIVE, DO NOT TRUST THE FIRST LOCATION.

समीरने लगेच विचारलं, “Recovery handlers म्हणजे K-series?”

विनायकरावांनी थेट उत्तर दिलं नाही.

“कदाचित.”

ते अजूनही नकाशाकडे पाहत होते.

आरव देशमुखने नकाशा उघडला. तो साधा खूण केलेला नकाशा नव्हता. त्यावर कोणत्याही पर्यटन खुणा नव्हत्या. कोणत्याही उघड टिपण्या नव्हत्या.

त्यावर मालवाहतुकीचे मार्ग दाखवलेले होते.
इंधन वळवण्याचे बाण.
तपासणी टाळण्यासाठीचे पर्यायी मार्ग.
पर्यायी वाहतूक साखळ्या.
काही मार्ग लाल रंगात चिन्हांकित केलेले होते. काही निळ्या शाईत. काही पेन्सिलने केलेल्या टिपांमध्ये. काही ठिकाणी दुष्यंत देशमुखच्या हस्ताक्षरात छोट्या नोंदी दिसत होत्या.

Short delays create wider confidence movement. Inspection pressure spreads faster than shortage.

पण एका corridor वर वारंवार खुणा करण्यात आल्या होत्या. Western Fuel Diversion

आरवच्या डोक्यात अचानक बातमी चमकली. Rajasthan refinery fire. ती बातमी काही दिवसांपूर्वी सगळीकडे झळकली होती. औद्योगिक अपघात म्हणून पसरवलेली.

समीरचा चेहरा बदलला. “नाही…”

त्याच्या आवाजात भीती होती.

विनायकरावांनी नकाशा हातात घेतला. काही सेकंद निरीक्षण केलं. त्याची नजर बाणांवरून फिरत होती. ती मार्ग एकमेकांशी जोडत होती.
आणि त्यामागचा हेतू वाचत होती.

मग शांतपणे म्हणाला, “हे रिफायनरीबद्दल नाही.”

त्यांनी रूटिंगच्या बाणांकडे बोट दाखवलं.

“हे घटनेनंतरच्या हालचालींबद्दल आहे.”

आरव देशमुख पुढे झुकला.

“म्हणजे?”

“जर एखादी रिफायनरी तात्पुरती मंदावली…”

विनायकराव म्हणाले , “…तर इंधनाची हालचाल पर्यायी मार्गांकडे वळते.”

त्यांनी नकाशावर काही routes दाखवले.

बंदरं.
साठवण डेपो.
विमा तपासणी बिंदू.
रेल्वे ट्रान्सफर कॉरिडॉर्स.

“विलंब एका जागी होत नाही.”

“तो लाटेसारखा पसरत जातो.”

त्यांचा आवाज आता इशाऱ्यासारखा वाटत होता.

आरवने लिफाफ्यातली दुसरी चिठ्ठी बाहेर काढली.

त्यावर फक्त काही शब्द लिहिलेले होते.

THE FIRE WAS NEVER THE OBJECTIVE. THE REDIRECTION WAS.

खोलीत पूर्ण शांतता पसरली. Vault मधल्या थंड हवेत आता वेगळाच ताण होता.

समीरच्या डोक्यात चित्रं जुळायला लागली होती.

रिफायनरीला आग. तपासणीत होणारे विलंब. पर्यायी मार्गांकडे वळवलेली वाहतूक. बंदरांमधील कोंडी. विमा दरांतील अचानक वाढ. बाजारातील तीव्र चढउतार.

ही वेगवेगळी घडलेली स्वतंत्र प्रकरणं नव्हती. ही नियंत्रित पद्धतीने घडवून आणलेली प्रतिक्रिया होती.

घटना महत्त्वाची नव्हती. घटनेनंतर लोक कसे वागतात हे महत्त्वाचं होतं.

आरवने घड्याळ हातात घेतलं. जुनी स्टीलची बॉडी, ओरखडे आणि थांबलेली वेळ १०:१७

समीरने विचारलं, “घड्याळ का ठेवलंय?”

विनायकरावांनी ते हातात घेतलं. मागची बाजू पाहिली. त्याच्या चेहऱ्यावर हलकासा बदल उमटला.

ते म्हणाले, "हे फक्त घड्याळ नाही.”

त्यांनी मागची कोरीव अक्षरं दाखवली. TIDE WINDOW - 10:17

आरवच्या अंगावर काटा आला. “Time marker…”

विनायकरावांनी मान हलवली. “दुष्यंत पुरावे लपवत नव्हता.” ते शांतपणे म्हणाले, “तो काही विशिष्ट लोकांची दिशाभूल करत होता.

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पहिला मी.

छान आहे हा पण भाग. थोडे मोठे भाग येउ द्या.