पूर्वभाग
आरव आणि समीर शत्रूच्या पाठलागातून सुटण्यासाठी मुंबईच्या गल्ल्यांतून जिवाच्या आकांताने पळत आहेत. दरम्यान, सिंगापूरमध्ये माया सेन पुराव्यांसह संकटात सापडली आहे, तर डॅनियल क्रॉस या जागतिक कटाचा मागोवा घेण्यासाठी युरोपमधून मुंबईस निघाला आहे. आरवने वडिलांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी संशयास्पद समीरशी हातमिळवणी केली असली, तरी पोलीस आणि गुंडांच्या वेढ्यामुळे त्यांचा हा प्रवास आता जीवघेणा झाला आहे.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ५ - बंदिस्त सत्य
पहिली SUV आता स्पष्ट दिसत होती. काळ्या टिंटेड काचा. दुसरी थोडी उजवीकडे सरकत होती त्यांचा सुटकेचा मार्ग बंद करण्यासाठी.
“धडक मारणार?” आरव ओरडला.
समीरने नजरेतूनच उत्तर दिलं, "हो, जर गरज लागली तर."
दुसरी अजूनही उजवीकडे सरकत होती, त्या निमिषार्धात समीरने टॅक्सी थेट त्या दोन SUVs च्या मध्ये टाकली.
गाड्यांच्या साईड्स घासल्या. धातूवर धातू आदळला. कर्कश आवाज हवेत घुसला. काचेचे तुकडे हवेत उडाले.
विंडस्क्रीनच्या कडेला तडा गेला. साईड मिरर तुटून मागे फेकले गेले. काही तुकडे आरवच्या खांद्यावर आदळले.
टॅक्सी हलली. क्षणभर नियंत्रण सुटल्यासारखं वाटलं. पण समीरने स्टिअरिंग पकडून तिला स्थिर केलं. इंजिन गुरगुरलं. गाडी पुन्हा वेगाने पुढे झेपावली.
दुसरी SUV लगेच मागे वळली. तिने न थांबता लांब वळसा घेतला. मागची मोटारसायकल अजूनही चिकटून होती. आता ती अधिक जवळ आली होती.
पुढे रस्ता उताराला लागला. दिव्यांच्या रेघा लांब सरकत होत्या. खाली उतरताना गाडीचा वेग नैसर्गिकपणे वाढत होता, पण समीर ने एक्सेलेटर सोडून स्टिअरिंग वर नियंत्रण पक्कं ठेवलं.
आणि अचानक त्याने हेडलाईट्स बंद केल्या. टॅक्सी एका क्षणात अंधारात विरली.
"आपल्याला पाहूनच ते पावलं टाकतायत," तो शांतपणे म्हणाला, एकदा का आपण त्यांच्या नजरेआड झालो तर मग मात्र त्यांचा पार गोंधळ उडेल."
टॅक्सी अंधारात घुसली. स्त्यावरचे दिवे एखाद्या जुन्या चित्रपटातील फिल्मसारखे लुकलुकत होते. कधी भयाण अंधार, तर कधी डोळ्यांना दिपवणारा प्रकाश. त्या प्रकाश-सावळ्यांच्या खेळात गाडी जणू लपाछपी खेळत होती; क्षणभर दिसायची आणि पुढच्याच क्षणी अदृश्य व्हायची.
पहिलं वळण... समीरने वेगाचा काटा खाली येऊ दिला नाही.
दुसरं वळण... टायर क्षणभर रस्त्यावरून सरकले, काळजात धस्स झालं, पण पुढच्याच क्षणी त्यांनी पुन्हा रस्ता पकडला.
आणि तिसऱ्या वळणावर कर्रर्रर्र...!
ब्रेक जोरात दाबले गेले. टायरांनी डांबरी रस्त्यावर किंचाळत आपल्या खुणा उमटवल्या. गाडी एका तीव्र झटक्यासह स्थिरावली.
"उतर."
त्याच्या आवाजात आदेश होता. दोघं बाहेर पडले. दरवाज्यांचा आवाज होणार नाही याची काळजी घेत ते अलगद बंद झाले.
टॅक्सी उभी होती... इंजिनचा मंद आवाज सुरूच होता. समीरने चावी इग्निशनमध्येच सोडली.
आरवची नजर त्याच्यावर स्थिरावली.
"त्यांना गाडी सापडू दे," समीर म्हणाला, "आपण नको."
आता 'टार्गेट'च बदललं होतं. ते आता रिकाम्या गाडीचा पाठलाग करतील, ती तपासतील, डोकं खाजवतील आणि आपला मौल्यवान वेळ तिथेच वाया घालवतील.
समीरने आरवचा हात पकडला.
“इकडे.”
तो रस्त्याच्या बाजूच्या अरुंद गल्लीत वळला.
मागच्या रस्त्यावरून मोटारसायकलचा आवाज वेगाने पुढे गेला. तो थांबला नाही. तो टॅक्सीच्या दिशेने गेला.
समोर एक गोदाम उभं होतं जणू एखादा अवाढव्य सांगाडा. लोखंडी पत्र्यांच्या भिंतींवरचा रंग उडालेला आणि त्यावर गंजलेल्या काळपट रेषा ओघळलेल्या. बाजूलाच एक मोडका फलक वाऱ्याने लोंबत होता, ज्यावरची अक्षरं काळाच्या ओघात पुसली गेली होती.
लोखंडी दरवाजा अर्धवट उघडा होता. वाऱ्याच्या झुळुकीसोबत त्याचा एक केविलवाणा 'चर्र' आवाज येत होता. बाहेरचा फिकट उजेड उंबरठ्यापाशीच थबकला होता, आत फक्त अथांग काळोख होता.
आरव देशमुख तिथेच थांबला. त्याची नजर समीरकडे वळली.
"हे ठिकाण तुला अचानक सुचलंय की आधीच ठरलं होतं?"
समीर नायरने शांतपणे उत्तर दिलं, "हे आधी पाहिलंय मी. जुना स्टोरेज यार्ड आहे. रात्री इकडे चिटपाखरूही नसतं."
समीरच्या हालचालीत एक प्रकारची घाई होती. आरवने पुन्हा त्या अर्धवट उघडलेल्या दरवाज्याकडे पाहिलं. अर्धवट उघडलेला दरवाजा म्हणजे दोनच शक्यता एक तर कुणीतरी आत दबा धरून बसलंय, किंवा कुणीतरी घाईघाईत बाहेर पडलंय.
"हे कुलूपबंद असायला हवं होतं ना?" आरवने अगदी दबल्या आवाजात विचारलं.
समीर क्षणभर थबकला, "तसं असतं साधारण..." तो म्हणाला, "पण..." वाक्य अधुरं सोडूनच तो पुढे सरकला. त्याने हलक्या हाताने दरवाजा ढकलला.
चर्रर्र...
तो कर्कश आवाज त्या रिकाम्या पोकळीत घुमला. दोघंही आत शिरले. आतल्या वातावरणात एक अनामिक गारवा होता. ओलसर माती, जुनं ग्रीस आणि धुळीचा एक संमिश्र दर्प तिथे रेंगाळत होता. छतावरून पाणी टपकण्याचा मंद टप-टप आवाज शांतता भंग करत होता.
आरव जागीच खिळला. "तुला नक्की खात्री आहे ना?"
समीरने आजूबाजूला नजर फिरवली. रिकामे रॅक्स, जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले लाकडी पॅलेट्स आणि एका कोपऱ्यात निपचित पडलेली जुनी फोर्कलिफ्ट... सर्व काही शांत होतं, पण तरीही काहीतरी अस्वस्थ करणारं होतं.
दोघं आत शिरले. समीरने दरवाजा सावकाश ओढला. लोखंडी पत्र्याचा तो करकरणारा आवाज त्याने जणू आपल्या हातांनी दाबून धरला होता.
आतला गारवा अंगावर काटा आणणारा होता. हवेत धूळ आणि कुबट वास रेंगाळत होता. छताच्या एका कोपऱ्यातून टप-टप गळणारं पाणी आणि जुन्या लाकडी पॅलेट्सचा तो विशिष्ट दर्प... या जागेत वेगळीच भावना निर्माण करत होता.
बाहेरचा कोलाहल आता मंद झाला होता. दूरवर एखाद्या मोटारसायकलचा घरघर आवाज किंवा एसयूव्हीच्या वेग घेण्याचा आवाज कानावर पडायचा आणि मग पुन्हा भयाण शांतता पसरायची. जणू अख्खं शहर सावज शोधण्यासाठी दबा धरून बसलं होतं.
"जास्त आवाज नको," समीरने आरवच्या कानापाशी कुजबुजत सावध केलं. त्याची नजर अजूनही दरवाज्याच्या फटीकडे खिळलेली होती. "आपल्याकडे फक्त काही मिनिटं आहेत. त्यापेक्षा जास्त नाही."
आरवने केवळ मान डोलवली. त्याने आपली बॅग खाली ठेवली. हात किंचित थरथरत होते, पण हालचालींमध्ये अचूकपणा होता. त्याने एक जुनाट लॅपटॉप बाहेर काढला.
"हे मी इंटरनेटला कधीच जोडत नाही," आरव म्हणाला.
"आज तीच खबरदारी आपल्याला वाचवेल," समीरचा डोळा स्क्रीनवर होता.
आरवने पेनड्राईव्ह जोडली. त्या अंधाऱ्या गोदामात युएसबी पोर्टचा तो हलका 'क्लिक' आवाजही स्पष्ट ऐकू आला. स्क्रीन उजळली आणि लिनक्स फॉरेन्सिक इंटरफेसचा निळसर प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला. आरवने पेनड्राईव्ह माउंट केली.
UNKNOWN_MEDIA...
त्यानंतर एक कंटेनर उघडलं EMBER_ARCHIVE.
दोघेही काही क्षण श्वास रोखून स्क्रीनकडे पाहत राहिले. समोर दिसणारा तो कोड केवळ डेटा नव्हता, तर त्यांच्या आयुष्यातल्या या वादळाचं मूळ कारण होतं. आरवने पुढचा फोल्डर उघडला IF THEY RETURN.
त्यात तीन फाईल्स होत्या:
१. READ.txt
२. WATCH_GATE.mp4
३. NAMES.enc
समीर थोडा पुढे झुकला. "नेमकं काय शोधतोय आपण?"
आरवने विचार केला. 'READ' आणि 'WATCH_GATE' त्याने आधीच चाळले होते. त्याची नजर एका फाईलवर स्थिरावली.
"हे..." त्याने कर्सर NAMES.enc वर नेला.
समीरचा श्वास जड झाला. "एनक्रिप्टेड आहे?"
"हो."
"वेळ आहे आपल्याकडे?"
आरवने कान टवकारले. बाहेरच्या रस्त्यावर पुन्हा एकदा टायर घासल्याचा आवाज आला होता.
यावेळी आरव देशमुख क्षणभरही अडखळला नाही. त्याचे बोट सरळ NAMES.enc वर पडले. स्क्रीनवर तातडीने एक प्रॉम्ट चमकला Password required.
तो काही सेकंद शून्यात हरवला. डोळ्यांसमोर वडिलांचं ते पत्र तरळलं... कागदावर पेन्सिलने उमटवलेला तो हलकासा दाब, खुणेच्या त्या रेषा आणि ते अपूर्ण राहिलेलं वाक्य, 'पहिल्यांदा जिवंत राहा. मग लढ.'
त्याने वेगाने कीबोर्डवर बोटं फिरवली LIVEFIRST आणि 'Enter' दाबले. स्क्रीनवर लगेच लाल अक्षरं चमकली Incorrect password.
वेळ हातातून निसटत होता. दुसरा प्रयत्न. STAYALIVE Enter. पुन्हा नकार.
त्याने डोळे मिटले. श्वास नियंत्रित केला. वाक्य पुन्हा मनात मांडलं,”पहिल्यांदा जिवंत राहा... मग लढ.”
या वेळी त्याने हळू, पण अचूक टाईप केलं LIVEFIRSTTHENFIGHT Enter दाबले.
एक क्षण सुन्न शांतता पसरली. काहीच घडलं नाही. मग अचानक स्क्रीनवरची दृश्यं बदलली. फाईल उघडली खरी, पण ती अपेक्षेपेक्षा वेगळी होती. आरवच्या ओठांतून हलकेच शब्द बाहेर पडले, "लेयर वन..."
त्याचा आवाज शांत होता, पण त्या शांततेत एक अनामिक दडपण होतं. "याच्या आत अजून कितीतरी लेयर्स आहेत."
समीर नायर आता पूर्णपणे स्क्रीनकडे झुकला होता. गोदामाबाहेरचं जग, तो पाठलाग, तो धोका हे सगळं काही त्या क्षणी विरून गेलं. दोघांची नजर त्या स्क्रीनवर खिळली होती. ती समोर आलेली यादी म्हणजे काही सुटसुटीत डेटाबेस नव्हता. ती एक अर्धवट राहिलेली फाईल होती.
काही नावं पूर्ण अक्षरांत लिहिलेली होती, तर काहींची फक्त आद्याक्षरं. काही ठिकाणी फक्त अनाकलनीय कोड्स होते. अनेक नोंदी अर्धवट सुटलेल्या... जणू कुणीतरी वर्षानुवर्षं हा शोध घेत गेलं होतं आणि ते कार्य पूर्णत्वास नेण्याआधीच नियतीने त्याला थांबवलं होतं.
स्क्रीनवर आता तीन स्पष्ट विभाग उजळले होते. ती केवळ एक नावांची यादी आता एका महाकाय षड्यंत्राची 'रचना' वाटत होती.
१. ACTIVE OPERATORS
कोडनेम्स, देश आणि त्यांच्या भूमिका. जणू बुद्धिबळाच्या पटावरचे ते मोहरे होते; जे दिसत होते, हालचालही करत होते, पण खरी खेळी पडद्यामागून नेमकी कोण खेळतंय, हे मात्र गुलदस्त्यातच होतं.
२. CONTROL NODES
कॉर्पोरेट जाळी, मीडिया लिंक्स आणि शेल कंपन्यांच्या राऊटिंग चेन्स. इथे खेळ प्रत्यक्ष दिसत नव्हता तर इथे खेळ 'चालवला' जात होता. पैशांचे अदृश्य मार्ग, अफवांची पेरणी आणि निर्णयांचे रिमोट कंट्रोल्स इथेच एकवटले होते.
३. COMPROMISED ASSETS
इथे खरी नावं होती. ही ती माणसं होती ज्यांना वाटत होतं की ते 'सिस्टम'चा एक महत्त्वाचा भाग आहेत पण प्रत्यक्षात त्यांना केवळ कुणाच्या तरी व्यवस्थेसाठी वापरलं जात होतं.
आरव देशमुखची बोटं स्क्रोल करत राहिली. जसजसा तो खाली जात होता, तसतसा त्याच्या बोटांचा वेग मंदावत गेला. आणि मग तो अचानक थांबला. स्क्रीनवर एका ओळीवर त्याची नजर थिजली.
SAMIR NAIR - PORT SECURITY / MUMBAI - STATUS: COMPROMISED
समीर नायरचा श्वास जणू छातीतच अडकला. "हे..." तो कसाबसा पुटपुटला, "हे काहीतरी चुकीचं आहे."
तो स्क्रीनच्या अगदी जवळ झुकला. जणू जवळून पाहिल्यावर ती अक्षरं स्वतःहून बदलतील. त्याचा मेंदू वेगाने स्पष्टीकरणं शोधू लागला, "हे ऑडिट चेन असू शकतं... किंवा केवळ एक्सेस लॉग्स..." तो स्वतःलाच समजावू पाहत होता. कारण जे समोर दिसत होतं, त्याचा स्वीकार करणं कल्पनेपेक्षा जास्त कठीण होतं.
आरव मात्र शांत होता. त्याची नजर स्थिर होती.
समीरने पुन्हा त्या नावाकडे पाहिलं. नाव तिथेच होतं न बदललेलं, न हललेलं. त्याच्या चेहऱ्यावरचा आतापर्यंतचा आत्मविश्वास एखाद्या काचेसारखा तडा जाऊन कोसळू लागला.
"किंवा..." त्याचा आवाज आता पूर्णपणे खचला होता, "किंवा त्यांनी माझा वापर आधीच सुरू केला आहे... आणि मला त्याचा पत्ताही लागला नाही."
त्या वाक्यात भीतीपेक्षाही एक भयंकर जाणीव जास्त होती. गोदामातली हवा जड झाली. आजूबाजूचा अंधार अधिक दाट आणि गुदमरवणारा वाटू लागला. बाहेरचे दूरचे आवाजही आता पूर्णपणे थंडावले होते.
तितक्यात आरव म्हणाला, "कॉम्प्रमाईज्ड म्हणजे ट्रेटर नव्हे."
समीरने चमकून त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यांत एका अगतिक कृतज्ञतेची भावना उमटली. कारण आरवच्या त्या एका वाक्याने त्याला पूर्णपणे दोषमुक्त केलं नसलं, तरी किमान स्वतःच्या अस्तित्वासाठी पुन्हा लढण्याची एक छोटीशी संधी मिळवून दिली होती.
"मग?" समीर नायरने विचारलं, त्याच्या आवाजात अजूनही त्या धक्क्याची धार होती.
आरव देशमुखने पुन्हा एकदा त्या स्क्रीनकडे पाहिलं. त्या यादीत केवळ भीती नव्हती किंवा केवळ पुरावा नव्हता; त्यात त्यांच्या पुढच्या प्रवासाची दिशा दडलेली होती.
"मग याचा अर्थ असा की आपण अजूनही या खेळात शाबूत आहोत," तो शांतपणे म्हणाला.
या साध्या वाक्याचा अर्थ अतिशय खोल होता...सगळं काही संपलेलं नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शत्रूला वाटतंय तितकं सगळं अजून उघडही झालेलं नाही.
तेवढ्यात बाहेर कुठेतरी लोखंडी ओरखड्याचा आवाज घुमला. कुणीतरी लोखंडी दरवाजा सावकाश, पण ताकदीने बाजूला ओढत होतं. गोदामाच्या शांततेत तो 'ओढल्यासारखा' आवाज एखाद्या धोक्याच्या सूचनेसारखा घुमला. कुणीतरी बाहेर होतं... आणि ते आत येण्याचा प्रयत्न करत होतं.
************************************************************************************************************************
सिंगापूर.
मायाने मागे वळून लाल अक्षरांत चमकणाऱ्या फायर एस्केप कडे पाहिलं.
आणि वळून म्हणाली, “मला तुझं नाव कळल्याशिवाय मी इथून नाही जाणार.”
“कबीर...कबीर नाव आहे माझं.” तो बॅटन हातात असलेला पुरुष म्हणाला.
तेवढ्यात केबिनमध्ये कार्ड-लॉकचा तो कोरडा ‘क्लिक’ आवाज घुमला… आणि वेळ जणू एका क्षणासाठी थांबली.
दरवाजा अर्धा उघडताच दोन सावल्या विजेसारख्या आत सरकल्या.
पण कबीर तयार होता.
पहिलाच माणूस सरळ त्याच्यावर झेपावला. वार थेट चेहऱ्यावर येत होता पण कबीरचा हात आधीच हवेत होता. त्याने तो वार मध्येच अडवला. टेबलावरची कागदं हवेत उडाली, लॅपटॉप घसरत जमिनीवर आदळला, खुर्ची उलटली त्या छोट्याशा केबिनमध्ये क्षणार्धात रणांगण तयार झालं.
दुसरा माणूस थांबला नाही. तो पूर्ण वेगाने पुढे झेपावला
पण कबीरने एक सेकंदही वाया घालवला नाही.
त्याने पहिल्याला शरीराच्या जोरावर बाजूला ढकललं… आणि त्याच लयीमध्ये फिरत बॅटन उचलून दुसऱ्याच्या खांद्यावर पूर्ण ताकदीने आपटला.
खट्ठ!
तो बोथट, हाडात शिरणारा आवाज केबिनमध्ये घुमला.
माणूस संतुलन गमावून मागे फेकला गेला आणि भिंतीवर जोरात आदळला. त्याच्या तोंडातून दबलेली किंकाळी बाहेर पडला.
क्षणभरासाठी सगळं थांबलं.
पण कबीरला माहित होतं हा शेवट नाही, ही फक्त सुरुवात आहे.
तो ओरडला, “पळ!”
त्या एका शब्दात आदेश होता, तातडी होती… आणि वेळ संपत चालल्याची जाणीव होती.
माया सेन एक क्षणही न दवडता उठली. ती वीजेसारखी वळली आणि फायर स्टेअर्सच्या दिशेने धावली. तिच्या मागोमाग कबीर धावला.
"तू नक्की कोण आहेस?" धापा टाकत मायाने विचारलं.
कबीरच्या पायांचा आवाज पायऱ्यांवर घुमत होता. तो काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, "ज्यावर तू चुकूनही विश्वास ठेवू नये, असा माणूस."
पार्किंगमधून कार बाहेर पडली आणि त्या वेगवान शांततेत फक्त इंजिनची घरघर आणि रस्त्यावरचे सरकणारे दिवे सोबतीला होते. मा्याचा श्वास अजूनही धपापत होता, पण डोक्यात विचारांचं चक्र थांबायला तयार नव्हतं.
तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला, “तू नक्की कोण आहेस?”
कबीरची नजर समोरच्या रस्त्यावर खिळलेली होती. स्टिअरिंगवरची त्याची पकड जराही ढिली झाली नव्हती. काही क्षणांनंतर तो अगदी धीम्या आवाजात म्हणाला, “कबीर... बाकी नावं कामाप्रमाणे बदलत राहतात.”
मायाने त्याला पारखण्याचा प्रयत्न केला. “तू नक्की आहेस कोण? सिक्युरिटी? इंटेलिजन्स? की...“
“ना मी सिक्युरिटी आहे, ना कोणता हिरो,” कबीरने तिचं वाक्य मध्येच तोडलं. त्याच्या आवाजात एक प्रकारचा खोलवर रुतलेला थकवा होता. “मी केवळ त्या सिस्टीमचा एक भाग होतो.”
माया सावध झाली. “कुठल्या सिस्टीमचा?”
कबीरच्या ओठांवर एक कोरडं हसू उमटलं त्यात कोणताही जिवंतपणा नव्हता.
“ज्या सिस्टीमविरुद्ध तू तुझी स्टोरी लिहायला निघाली आहेस, त्याच सिस्टीमचा.”
कार काही वेळ शांततेत धावत राहिली. मा्याने पुढचा प्रश्न टाकला, “म्हणजे तुला त्या ‘आर्काइव्ह’बद्दल आधीपासूनच ठाऊक होतं?”
“हो.”
“कितपत माहिती होतं तुला?”
कबीरने काही क्षण विचार केला आणि मग म्हणाला, “माया, हे केवळ लीक नाही हे एक ब्लूप्रिंट आहे.”
मा्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. “ब्लूप्रिंट? म्हणजे नेमकं काय?”
“जे भविष्यात घडणार आहे, त्याची रंगीत तालीम आधीच लिहून ठेवलीय,” कबीर थोडा पुढे झुकला, त्याचा आवाज आता अजूनच गूढ झाला होता.
गाडीच्या आतली शांतता आता अधिक जड झाली.
मायाने हळू आवाजात विचारलं, “मग... मग तू आता माझी मदत का करतोयस?”
कबीरने डावीकडे एक वळण घेतलं. समोर क्षितिजावर पहाटेचा तो फिकट उजेड आता स्पष्ट होऊ लागला होता.
“कारण,” कबीर म्हणाला, “ज्या विनाशाच्या गोष्टी मी सुरू करायला मदत केली...त्याची भरपाई करायची आहे
************************************************************************************************************************
मुंबईच्या त्या पडक्या गोदामात वेळ जणू थिजली होती.
समीर अजूनही त्या लॅपटॉपच्या निळसर स्क्रीनकडे पाहत होता. डोळ्यांसमोर तो एकच शब्द वारंवार आदळत होता - COMPROMISED. त्यामागचं कोणतंही स्पष्टीकरण समोर येत नव्हतं. तो शब्द तिथून हलणार नव्हता, कारण तो आता समीरच्या नशिबाचा भाग झाला होता.
बाहेरून पावलांचा मंद आवाज आला.
समीर आरवच्या कानापाशी कुजबुजला, “जर मी खरंच ‘कॉम्प्रमाईज्ड’ असेन, तर पुढचे निर्णय तूच घे.” त्या एका वाक्यात भीती तर होतीच, पण त्याहून जास्त स्वतःवरची जबाबदारी दुसऱ्यावर झटकण्याचा एक अगतिक प्रयत्न होता.
आरव मात्र शांत होता. त्याची नजर स्क्रीनवरच्या त्या तीन विभागांवर फिरत होती:
ACTIVE OPERATORS.
CONTROL NODES.
COMPROMISED ASSETS.
त्याच्यासाठी ती केवळ नावांची यादी नव्हती, तर या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा तो एक नकाशा होता.
तो संथपणे समीरकडे वळला. “नाही,” आरवचा आवाज गोदामातल्या त्या थंडीसारखाच स्थिर होता. “आता जे काही होईल, ते आपण दोघं मिळून ठरवणार.”
त्या क्षणी दोघांची नजर एकमेकांना भिडली. त्या नजरेत पूर्ण विश्वास नव्हता, पण एक अटळ सत्य मात्र स्पष्ट होतं, त्या दोघांनाही एकमेकांशिवाय गत्यंतर नव्हतं.
तेवढ्यात, दरवाज्यापाशी ती सावली थांबली. फटीतून आत येणारा फिकट प्रकाश त्या सावलीने अडवला गेला.
समीरने भयाने एक पाऊल मागे घेतलं, तर आरवने आपल्या बॅगची पट्टी घट्ट आवळून धरली जणू त्या बॅगेत दडलेलं रहस्यच आता त्यांचा शेवट ठरणार होतं.
हा भाग ही छान झाला आहे. लवकर
हा भाग ही छान झाला आहे. लवकर पुढचाही भार येउ द्या.
कथा वेगानं पुढे सरकते आहे.
कथा वेगानं पुढे सरकते आहे. उत्कंठा वाढतेय.
पण असा विचार मनात येतोय की पूर्ण झाल्यावरच वाचावी. कारण मग लिंक तुटणार नाही. म्हणजे कथेतले वेगवान प्रसंग अन् सलग वाचताना येणारा अनुभव यांची लय जुळेल.
नाही तर कथेतला कालावधी तासा-दीड तासांचा आणि भाग तीन, तेही पाच-सहा दिवसांच्या अवधीत. हे अडखळल्यासारखं होतंय!
लेखक महोदय, ही तुमच्या लेखनगतीवर टिका नाही. कृपया गैरसमज नकोत. मी फक्त वाचनाची तंद्री लागावी याची सोय बघतोय.
कसली भारी चालली आहे कथा..
कसली भारी चालली आहे कथा..
हॉलिवूड सिनेमा बघतेय असे वाटतेय.
टॉम क्रुझ = आरव..
मनापासून धन्यवाद ekujadhav,
मनापासून धन्यवाद ekujadhav, Abuva आणि धनवन्ती!
@Abuva जेव्हा कथानकाचा कालावधी कमी आणि घटनांचा वेग जास्त असतो तेव्हा मध्ये काही दिवसांचं अंतर पडलं की ती तंद्री थोडी तुटल्यासारखी वाटणं स्वाभाविक आहे.
आणि अजिबात गैरसमज नाही झाला. उलट तुम्ही इतकं समरस होऊन वाचताय, हेच भारी वाटलं.
तुम्ही म्हणता तसं, पूर्ण झाल्यावर एकसंध वाचण्यात वेगळीच थ्रिल असते. पण भागागणिक वाट पाहण्यातली उत्सुकताही खूप मजेशीर असते!
तरीही, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं वाचा.
छान सुरुय
छान सुरुय
छान चालली आहे .....
छान चालली आहे .....