पुणेरी पाट्या... नकोश्या

Submitted by किल्लेदार on 6 May, 2026 - 04:30

गेल्या काही दिवसांपासून टेनिस एल्बोच्या दुखण्यानं डोकं वर काढलंय त्यामुळे फारसं आवडत नसतानाही, सकाळी पायी फिरायला जाण्यावाचून व्यायामाचा दुसरा पर्याय नव्हता. पायी फिरायला लागलो आणि एरवी पटकन निसटून जाणारे आजूबाजूचे देखावे आता हळूहळू सरकू लागले अन् आधी कानाडोळा केलेले, जागोजागी लावलेले विद्रूप फलक डोळ्यात चांगलेच खुपायला लागले. यावर अनेकांनी आजवर आक्षेप घेतलाय, वरपर्यंत तक्रारी केल्यात, आंदोलनं केलीत आणि त्यावर मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पोकळ आश्वासनंही दिलीत आणि तरीही विद्रुपीकरण चालूच आहे. मग मी असं काय वेगळं करणार असा आळशी आणि निराशावादी विचार करून बघितला पण डोक्यातून हा सल काही जाईना. त्यात आता रोजच फिरायला जात असल्यामुळे फलकांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढही आता स्वस्थ बसू देत नव्हती. कधी राम नवमी, कधी हनुमान जयंती, कधी आंबेडकर जयंती तर कधी उगाच कुणाचा तरी स्मरणदिवस. बरं ते फलकही कार्यक्रमाच्या २-३ आठवडे आधीपासून लावलेले दिसायचे आणि तो दिवस उलटल्यावर फलक काढायचायी तसदी घेतानाही कुणी दिसत नव्हतं.

१. मग पुणे महानगरपालिकेचं एक ऍप आहे (पीएमसी केअर) असा साक्षात्कार झाला. लगेच फोन मधे टाकून रोज सकाळी फिरायला जायच्या रस्त्यावर असतील नसतील तेवढे फलक ऍप वर टाकू लागलो. आठवडाभर वाट बघितली पण परिणाम शून्य.
२. पालिकेच्या हेल्पलाईन वर कॉल करून माहिती काढली, क्षेत्रीय अधिकाऱ्याला जाऊन भेटलो तर त्यानं त्याच्या समस्यांचा पाढा वाचला, काहीतरी करतो म्हणाला पण तरीही एक दोन किरकोळ फलक काढण्यापलीकडे फारसं काही झालं नाही.
३. सर्व फलकांच्या छायाचित्रांची प्रत लेखी तक्रारीला जोडून नगरसेवकाच्या कार्यालयात गेलो आणि सविस्तर बोलून परत एकदा विनंती केली. (त्या छायाचित्रांमध्ये मुद्दामच त्या नगरसेवकाचा फोटो असलेलंही एक छायाचित्र होतं). आंबेडकर जयंती होईस्तोवर थांबा अशी मला उलट विनंती झाली. जयंती होऊनही फलक तसाच उभा होता आणि रोज सकाळी माझ्याकडे बघून उपरोधानं हसतो आहे असं वाटायचं.
४. गूगल वर बघितलं तर पुणे वाहतूक पोलीसांनी सुद्धा अनधिकृत फलकांविरोधात "धडक" मोहीम हाती घेतली आहे असं समजलं. "पीटीपी" नावाच्या त्यांच्या मोबाईल ऍप मध्ये पण लगेच तक्रार नोंदवली.
५. या सगळ्यात, पीएमसीच्या कार्यालयातल्या “आकाशचिन्ह विभागात” जाऊन "पालिका उपायुक्तांना" लेखी तक्रार (आधी केलेल्या सर्व पाठपुराव्यासकट) देऊन आलो.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम असेल का काय कुणास ठाऊक पण बरेचसे फलक निघालेत. सुदैवानं का दुर्दैवानं म्हणा, काही फलक वाहतुकीस अडथळा होते आणि त्याचे योग्य प्रकारे छायाचित्रण करून ते “पीटीपी” ऍप वर नोंदवले असल्यामुळे कदाचित योग्य तो परिणाम झाला असावा.

गेल्या आठवड्यात मला दोन तीनदा पीएमसी अधिकाऱ्याचा स्वतःहून फोन आला आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर आता नोंदवलेल्या तक्रारींमधले फलक अतिशय तत्परतेने निघताना मला दिसताहेत त्यामुळं सतत, न कंटाळता पाठपुरावा करत राहिलं तर यंत्रणा काम करते हे बघून बरं वाटतंय. अर्थात अधिकृतपणे नोंदवल्या गेलेल्या गुन्हांचा आकडा फार कमी आहे. किती जणांवर खरोखर दंडात्मक कार्यवाही झाली हे स्पष्ट विचारल्यावर ती माहिती सुद्धा अधिकाऱ्याने गुलदस्त्यातच ठेवली.

असो, हे सगळं करत असतांना वाईट एकाच गोष्टीचं वाटलं आणि ते म्हणजे मी जे करतो आहे ते माझ्या आजूबाजूच्या लोकांना, मित्रांना सांगितल्यावर मला मिळालेले उफराटे प्रतिसाद (ते ऐकून चिडल्यावर मनात त्यावर आलेल्या प्रतिक्रिया ज्या मनातच ठेवाव्या लागल्या). यापैकी एकानेही एक सहस्त्रांश सुद्धा प्रयत्न केला नसेल.
१. निराशावादी - अरे हे सगळे आतून एकमेकांना सामील आहेत. नुसते तोंडाला पानं पुसतात. काही उपयोग नाही. (तुम्ही फक्त बुडाला टिश्यू पेपर पुसा)
२. उपरोधिक - टिपिकल आयटीवाला आहेस. ऍप वापरलं की झालं तुमचं काम (इथे स्वतः च्या कर्तृत्वाचा पत्ता नाही)
३. उपरोधिक - अरे वा पक्का जागरूक पुणेकर आहेस (तू झोपला आहेस त्याचं काय ?)
४. थॅंकलेस - अरे काही दिवसांनी तो फलक तसाही निघालाच असता ( काय बोलणार ?)
५. उपरोधिक - तुला हे सगळं करायला वेळ कसा काय मिळतो ? ( ऑफिस मध्ये “पाट्या” नाही टाकल्या किंवा मोबाईलवर उगाच रिळं नाही फिरवली तर मिळतो ब्व्वा !!!)
६. उपरोधिक - तुला जीवनाचं ध्येय सापडलेलं दिसतं (ध्येय बरीच आहेत. त्यात तुलाही फलकावर लावायचं एक आहे)

त्यामुळं शेंडी तुटो की पारंबी तुटो, निदान माझ्या मॉर्निंग वॉकच्या मार्गावरचे तरी सगळे फलक तुटेस्तोवर हे उद्योग अखंड चालू ठेवायचे असं आत्तातरी ठरवलंय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिंद्य - खरंय पण हा प्रश्न आपल्या देशातल्या अनेक मूलभूत प्रश्नांचा प्रतिनिधी आहे. अखंड प्रयत्न करत राहिलं तरच सुटेल कधीतरी. अजून तरी आशावादी आहे. उम्मीद पे दुनिया कायम है !!!

साजिरा - PMC Care हे पुणे महानगरपालिकेचं ऍप आहे. तुमच्या मोबाईल मध्ये टाकून घ्या. काही माहिती हवी असेल तर व्यनि करा.
खरं बघितलं तर होर्डिंग्स लावणारी मूठभर लोकं संख्या, शिक्षण, पैसा आणि एकंदरीत बुद्धी या सगळ्यांमध्ये कमी आहेत पण सुसंस्कृत लोकं संघटित नसल्यामुळे आणि त्यांच्या लेट गो अटीट्युड मुळे अशा गोष्टी सहज फोफावतात.
होर्डिंग्सचा प्रश्न प्रातिनिधिक आहे. वाहतुकीच्या कुठल्याच नियमाचं पालन नं करणं, चौकात कुठल्याही फालतू कारणासाठी DJ लावून धांगडधिंगा करणं, कुठेही कचरा करणं आणि थुंकणं अश्या अनंत समस्या आहेत. तुम्ही आवाजाच्या आकर्षणाचं म्हणालात तसं उगाच हॉर्न वाजवणं ही सुद्धा एक विकृतीच आहे. एकदा ट्रॅफिकमध्ये माझ्या मागच्या गाडीवरची एक स्त्री उगाच कर्कश्श हॉर्न वाजवत होती तेव्हा वैतागून "व्हाय आर यू सो हॉर्नी!!!" असं जिभेवर आलेलं वाक्य मी सभ्यपणे गिळलं.
भूतान सारखा लहानसा देश प्राथमिक शिक्षणावर बराच पैसा खर्च करतो कारण ज्ञानाइतकीच "मूल्य"ही महत्वाची आणि ती लहानपणापासूनच भिनवावी लागतात. सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंकृत होण्यावर जरा तरी भर दिला तर परिस्थिती नक्कीच सुधारेल पण त्यासाठी आमूलाग्र बदलाची गरज आहे.

अमितव - स्वतःहून फ्लेक्स काढून टाकणं माझ्याही मनात आलं होतं पण ते तेवढं सोपं नाही. खुद्द पालिकेच्या सरकारी अधिकाऱ्याला सुद्धा पोलीस बॅक-अप लागतो कधीकधी कारण फ्लेक्स लावणारी लोकं तद्दन मूर्ख पण माजलेली असतात. लोकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा हे तर अगदी मान्य पण तो दोन पातळ्यांवर हवा. एक म्हणजे "प्रिव्हेंटिव्ह" आणि दुसरा "करेक्टिव्ह". "प्रिव्हेंटिव्ह" - मध्ये सरकारी यंत्रणांचा वाटा जास्त महत्वाचा, जसं दंडात्मक कार्यवाही. दंडच इतके कंबर मोडणारे हवेत की कायदा मोडायला कुणी धजावू नये. कायदा मोडला जातोय हे टिपण्यात लोकांचा सक्रिय सहभाग हवा. दुसरा म्हणजे "करेक्टिव्ह" जो सुद्धा आवश्यक आहे पण माझ्या मते कमी प्रभावी. जसं लोकांनी मिळून कचरा साफ करणे वगैरे मोहिमा. खरं तर यंत्रणेला जागृत करणे, दबाव टाळणे ही सुद्धा एक मोहीमच आहे असं मला वाटतं.

प्राजक्ता कागदे - मी मयूर कॉलनी मध्ये राहतो. तिथे कुठला मंच कार्यरत आहे? नक्की सहभागी होईन.

राज अज्ञानी - कुठलंही मसल फ्लेक्सींग न करता फ्लेक्स विरोधात काम करतोय. जास्तीत जास्त पडद्यामागे राहून. आपली भीती वाजवी आहे पण पूर्णपणे निष्क्रिय न राहता कायद्याच्या चौकटीत राहून बेबी स्टेप्स घेत राहायच्या.

मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाचे ओझे सांभाळत एवढी समाजसेवा केल्याबद्दल अभिनंदन ! किल्लेदारांच्या पाठपुराव्यामुळे फलक निघाल्याने कोथरूड भागाचे सौन्दर्य वाढले आहे. आपणांस शाबासकी देण्यासाठी महापालिका एक सत्कार समारंभ आयोजित करीत आहे असे आमच्या (अनधिकृत) सूत्रांद्वारे समजले. किल्लेदारांचा हातात सोन्याचा मोबाईल घेतलेला फोटो AI द्वारे बनवला आहे. "बघतोस काय रागानं, फोटो टाकलाय वाघानं", ''किल्लेदारांशी वाकडं, नदीवर लाकडं" असे फलक लवकरच झळकतील. कार्यक्रमाच्या दिवशी स्पीकरच्या भिंती लावून कर्कश्य आवाजात "फ़लक तक चल साथ मेरे" गाणे वाजवण्यात येणार आहे. तसेच "कर्म करीत राहा, फल(का)ची अपेक्षा करू नका" असे सुविचार देखील सर्वत्र लावले जाणार आहे Wink

Pages