पुणेरी पाट्या... नकोश्या

Submitted by किल्लेदार on 6 May, 2026 - 04:30

गेल्या काही दिवसांपासून टेनिस एल्बोच्या दुखण्यानं डोकं वर काढलंय त्यामुळे फारसं आवडत नसतानाही, सकाळी पायी फिरायला जाण्यावाचून व्यायामाचा दुसरा पर्याय नव्हता. पायी फिरायला लागलो आणि एरवी पटकन निसटून जाणारे आजूबाजूचे देखावे आता हळूहळू सरकू लागले अन् आधी कानाडोळा केलेले, जागोजागी लावलेले विद्रूप फलक डोळ्यात चांगलेच खुपायला लागले. यावर अनेकांनी आजवर आक्षेप घेतलाय, वरपर्यंत तक्रारी केल्यात, आंदोलनं केलीत आणि त्यावर मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पोकळ आश्वासनंही दिलीत आणि तरीही विद्रुपीकरण चालूच आहे. मग मी असं काय वेगळं करणार असा आळशी आणि निराशावादी विचार करून बघितला पण डोक्यातून हा सल काही जाईना. त्यात आता रोजच फिरायला जात असल्यामुळे फलकांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढही आता स्वस्थ बसू देत नव्हती. कधी राम नवमी, कधी हनुमान जयंती, कधी आंबेडकर जयंती तर कधी उगाच कुणाचा तरी स्मरणदिवस. बरं ते फलकही कार्यक्रमाच्या २-३ आठवडे आधीपासून लावलेले दिसायचे आणि तो दिवस उलटल्यावर फलक काढायचायी तसदी घेतानाही कुणी दिसत नव्हतं.

१. मग पुणे महानगरपालिकेचं एक ऍप आहे (पीएमसी केअर) असा साक्षात्कार झाला. लगेच फोन मधे टाकून रोज सकाळी फिरायला जायच्या रस्त्यावर असतील नसतील तेवढे फलक ऍप वर टाकू लागलो. आठवडाभर वाट बघितली पण परिणाम शून्य.
२. पालिकेच्या हेल्पलाईन वर कॉल करून माहिती काढली, क्षेत्रीय अधिकाऱ्याला जाऊन भेटलो तर त्यानं त्याच्या समस्यांचा पाढा वाचला, काहीतरी करतो म्हणाला पण तरीही एक दोन किरकोळ फलक काढण्यापलीकडे फारसं काही झालं नाही.
३. सर्व फलकांच्या छायाचित्रांची प्रत लेखी तक्रारीला जोडून नगरसेवकाच्या कार्यालयात गेलो आणि सविस्तर बोलून परत एकदा विनंती केली. (त्या छायाचित्रांमध्ये मुद्दामच त्या नगरसेवकाचा फोटो असलेलंही एक छायाचित्र होतं). आंबेडकर जयंती होईस्तोवर थांबा अशी मला उलट विनंती झाली. जयंती होऊनही फलक तसाच उभा होता आणि रोज सकाळी माझ्याकडे बघून उपरोधानं हसतो आहे असं वाटायचं.
४. गूगल वर बघितलं तर पुणे वाहतूक पोलीसांनी सुद्धा अनधिकृत फलकांविरोधात "धडक" मोहीम हाती घेतली आहे असं समजलं. "पीटीपी" नावाच्या त्यांच्या मोबाईल ऍप मध्ये पण लगेच तक्रार नोंदवली.
५. या सगळ्यात, पीएमसीच्या कार्यालयातल्या “आकाशचिन्ह विभागात” जाऊन "पालिका उपायुक्तांना" लेखी तक्रार (आधी केलेल्या सर्व पाठपुराव्यासकट) देऊन आलो.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम असेल का काय कुणास ठाऊक पण बरेचसे फलक निघालेत. सुदैवानं का दुर्दैवानं म्हणा, काही फलक वाहतुकीस अडथळा होते आणि त्याचे योग्य प्रकारे छायाचित्रण करून ते “पीटीपी” ऍप वर नोंदवले असल्यामुळे कदाचित योग्य तो परिणाम झाला असावा.

गेल्या आठवड्यात मला दोन तीनदा पीएमसी अधिकाऱ्याचा स्वतःहून फोन आला आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर आता नोंदवलेल्या तक्रारींमधले फलक अतिशय तत्परतेने निघताना मला दिसताहेत त्यामुळं सतत, न कंटाळता पाठपुरावा करत राहिलं तर यंत्रणा काम करते हे बघून बरं वाटतंय. अर्थात अधिकृतपणे नोंदवल्या गेलेल्या गुन्हांचा आकडा फार कमी आहे. किती जणांवर खरोखर दंडात्मक कार्यवाही झाली हे स्पष्ट विचारल्यावर ती माहिती सुद्धा अधिकाऱ्याने गुलदस्त्यातच ठेवली.

असो, हे सगळं करत असतांना वाईट एकाच गोष्टीचं वाटलं आणि ते म्हणजे मी जे करतो आहे ते माझ्या आजूबाजूच्या लोकांना, मित्रांना सांगितल्यावर मला मिळालेले उफराटे प्रतिसाद (ते ऐकून चिडल्यावर मनात त्यावर आलेल्या प्रतिक्रिया ज्या मनातच ठेवाव्या लागल्या). यापैकी एकानेही एक सहस्त्रांश सुद्धा प्रयत्न केला नसेल.
१. निराशावादी - अरे हे सगळे आतून एकमेकांना सामील आहेत. नुसते तोंडाला पानं पुसतात. काही उपयोग नाही. (तुम्ही फक्त बुडाला टिश्यू पेपर पुसा)
२. उपरोधिक - टिपिकल आयटीवाला आहेस. ऍप वापरलं की झालं तुमचं काम (इथे स्वतः च्या कर्तृत्वाचा पत्ता नाही)
३. उपरोधिक - अरे वा पक्का जागरूक पुणेकर आहेस (तू झोपला आहेस त्याचं काय ?)
४. थॅंकलेस - अरे काही दिवसांनी तो फलक तसाही निघालाच असता ( काय बोलणार ?)
५. उपरोधिक - तुला हे सगळं करायला वेळ कसा काय मिळतो ? ( ऑफिस मध्ये “पाट्या” नाही टाकल्या किंवा मोबाईलवर उगाच रिळं नाही फिरवली तर मिळतो ब्व्वा !!!)
६. उपरोधिक - तुला जीवनाचं ध्येय सापडलेलं दिसतं (ध्येय बरीच आहेत. त्यात तुलाही फलकावर लावायचं एक आहे)

त्यामुळं शेंडी तुटो की पारंबी तुटो, निदान माझ्या मॉर्निंग वॉकच्या मार्गावरचे तरी सगळे फलक तुटेस्तोवर हे उद्योग अखंड चालू ठेवायचे असं आत्तातरी ठरवलंय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाठपुरावा केल्याबद्दल व थोडंफार यश आलं त्याबद्दल अभिनंदन! Pmpml त्या बसने प्रवास करते . ज्येष्ठ नागरिक व दिव्यांचा साठी पुढच्या दारासमोरच्या जागा राखीव असणारा त्या इतक्या उंच असतात की ही सोय आहे गैरसोय असा प्रश्न पडतो. Pmpml त्या what's app त्या नंबरवर फोटो सहित तक्रार नोंदवली होती. त्यावर काही उपाय केलेला दिसला नाही. आज फोन केला तर तुम्हाला उत्तर पाठवलंय म्हणाले पण मिळालेलं नाही. पुढच्या दाराने जे.ना व दि. आले की लगेच त्यांना बसता येतं ... तर ही सोयच आहे... विषय संपला.

छान लिहिले आहे. स्तुत्य उपक्रम आहे तुमचा.
लोकांच्या प्रतिक्रिया ही प्रातिनिधिक आहेत.
लोक कधीही कशालाही चांगलं म्हणत नाहीत!

तुम्ही केलेले काम आणि तुम्हाला मिळालेले प्रतिसाद दोन्ही आवडले.

जवळपासचे ओळखीतले लोकं नकारात्मक प्रतिसाद देत असावेत कारण सकारात्मक दिला तर उद्या हा माणूस आपल्याकडून सुद्धा या कामात सहकार्याची अपेक्षा ठेवेल ही त्यांना भिती असावी. कारण हे काम त्यांना करायचे नसावे Happy

छान. इनिशिएटिव्ह आवडली. Happy
कुणाला सांगितलंत तर असेच प्रतिसाद येणार. कारण मी कसा महान, आणि त्यांनी एकशतांश ही प्रयत्न केला नाही असं तुमच्या मनात आहे. सांगताना ते वर्तनात ही दिसलं असेल. हा थँकलेस जॉब आहे, म्हणजे तुम्ही म्हणता तसं ते आपोआप होणारच होतं त्या अर्थी नाही, तर खरंच हा थँकलेस आहे. तुम्हाला कोणीही कधीही धन्यवाद देणार नाही. तुम्हाला ते मनापासून वाटतं तर तुम्ही करत रहा. मी कसा महान सांगाल तर असेच प्रतिसाद येणार. शांतपणे सातत्याने केलंत तर लोक होतीलही सामिल, कदाचित नाही ही होणार. तुम्हाला झेपेल तोवर करा. मजा येत असेल तर करा. मजा यायची थांबली की बंद करा. यात सुधारणा होणे शक्य नाही मानूनच करा. कारण ती झाली तर बोनस अशीच परिस्थिती आहे.

Madan Hunkare - ठीक आहे. दिलं अभय तुमच्या फलकाला Happy

मंजूताई - खरंय. मला बरेच खेटे घ्यावे लागले. पोतंभर दळून पसाभर मिळतं पण ठीकंय.

शर्मिला, स्वानंदी१, अंजली, मनमोहन, मानव पृथ्वीकर, अन्जू, ललिता-प्रीति - धन्यवाद. पण हे करावं लागतंय याचंच दुःख आहे.

ऋन्मेऽऽष - माझा छुपा अजेंडा ओळखला तुम्ही Happy

अमितव - हा इनिशिएटिव्ह घेण्यामागे आणि तो लोकांना प्रत्यक्ष किंवा लेखातून सांगण्यामागे माझे हेतू अगदी स्पष्ट होते (त्यातला एक ऋन्मेष यांनी ओळखला Happy ). या गोष्टीला किंवा ती करतांना स्वतःला महान समजणं किंवा तसं दर्शवणं म्हणजे खरोखर हास्यास्पद आहे. (मुळात माझ्यासारख्या महान व्यक्तीकडून सेवा करून घ्यायला अशी लोकं पात्र नाहीत या मताचा मी आहे Happy Happy )

हे करण्यामागे स्वार्थी हेतू हा की सकाळी रस्त्यावरनं फिरायला जाताना (मला तरी) ओंगळ फलक आणि त्यावरचे त्याहून ओंगळ चेहरे दिसू नयेत. हे आटोक्यात आणणारी यंत्रणा अस्तित्वात असेल तर तिचा शक्य तितका फायदा घ्यायचा. हे करतांना मजा कशी येणार. नको त्या ठिकाणी उगीचच आपली ऊर्जा वाया जाते म्हंटल्यावर चिडचिडच जास्त होते. पण रोज सकाळी वैताग करण्यापेक्षा थोडा वेळ काढून यावर उपाय काय करता येईल याचा विचार आणि कृती केली.

हे लोकांना सांगण्यामागचा हेतूही अगदी स्पष्ट होता (मी तो बोलूनही दाखवला) आणि तो म्हणजे तुम्हीही ऍप टाका आणि चालता बोलता इतर ठिकाणी जसे फोटो काढता तसे या ऍपवरूनही काढा पण तेवढंही कुणाला करायचं नसतं. पण ठीक आहे कुणाला यामुळे फारसा फरक पडत नसेल तर उगाच स्वतःची ऊर्जा आणि वेळ नका घालवू. पण "यापैकी एकानेही एक सहस्त्रांश सुद्धा प्रयत्न केला नसेल" हा विचार दर्पोक्ती नसून स्वतः काहीही न करता दुसऱ्याला फक्त टोचून उपरोधिक बोलणाऱ्यांसाठी मनात येणारी स्वाभाविक प्रतिक्रिया होती.

पण तुकाराम सांगून गेले आहेत ते पाळावं...
लोक विनोदे चेष्टा करिती ॥ त्याचा खेद न मानी चित्तीं ॥

सुधारणा होणे शक्य नाही असं मानून काम करण्याशी मी फारसा सहमत नाही कारण स्वतःचाच हुरूप कमी होतो. शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर लोकांच्या ऐकीव आणि वाचिव अनुभवांवरून परिस्थिती बदलू शकत नाही असा निष्कर्ष न काढता, ज्या गोष्टीसाठी आपण आतून आग्रही आहोत त्याकरता स्वतःसाठी म्हणूनच प्रत्यक्ष प्रयत्न करून बघणे.

चांगला किल्ला लढवित आहात किल्लेदार.
असे खूप जणांनी प्रयत्न केले तर सिस्टीम थोडा तरी रिस्पॉन्स देईल.

धनवन्ती - बरोबर आहे. पण इतरांकडून अपेक्षा करणं काही खरं नाही. आपल्याकडून जितकं होईल तितकं करायचं.

नवीन Submitted by किल्लेदार on 7 May, 2026 - 08:47> ही पोस्ट पण आवडली. खरं आहे. लोक जेव्हा याबद्दल बोलत असतात तेव्हा खडे फोडण्याचा एक विषय एवढंच. गॉसिपची भूक असते तशी आपली कुणाच्या नावे खडे फोडण्याचही भूक असावी. काय हे कार्पोरेशन वाले, काय हे पीएमटीवाले काय हे ट्रकवाले इत्यादि. तेव्हा खरंच काहीतरी त्याबाबत आपण स्वतः करायचं! या कल्पनेचे सुद्धा आश्चर्य वाटू शकते.
सगळ्यांनी नाही तरी काही (५%?- १०%?) लोकांनी जरी असं आपण यासाठी काहीतरी योग्य ते करू छोटे पाऊल घेत तरी फरक पडावा.
आणि <<लोक विनोदे चेष्टा करिती ॥ त्याचा खेद न मानी चित्तीं ॥>> हे ही अगदी बरोबर.

किल्लेदार, छान काम करत आहात.
नुकतेच माझ्याही मनात हेच आले होते की शहर सुशोभनासाठी भरमसाठ पैसा खर्च करायची गरज नाही. फक्त हे असले बॅनर लावायचे बंद केले तरी शहरांच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल.

पीपल ट्राय देअर बेस्ट टु मेक अ कॉन्वर्सेशन. दर वेळेला जमतेच असे नाही. कट स्लॅक फॉर देम.
मला त्यातील संभाषणात काहीच वावगे दिसले नाही.
-------------------
तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.
चेहरे किंवा लोकांकरता मी 'ओंगळ' हा शब्द कधीच वापरणार नाही. बट दॅट्स मी. हां अनॉइंग हा शब्द आहे.

उपाशी बोका - धन्यवाद
मानव पृथ्वीकर - अगदी बरोबर,खडे फोडण्याची अगदी भूक जरी नसली तरी एक विरंगुळा म्हणून बघतात लोकं
मंजूताई - धन्यवाद
ऋतुराज - फक्त पसारा आवरला तरीही घर सुंदरच दिसतं ना.
सामो - लिहितांना तेवढ्या इंटेसिटी ने भावना व्यक्त होत नाहीत. खवचटपणा समजायला प्रत्यक्ष संभाषण ऐकायला हवं. "ओंगळ चेहरे" लिहितांना मलाही खटकतं पण त्या चेहऱ्यांमागच्या भावना आणि माज यांचा अनुभव आहे त्यामुळे तसं विशेषण वापरतांना स्वतःला माफ करून टाकलं.

>>>>>>सामो - लिहितांना तेवढ्या इंटेसिटी ने भावना व्यक्त होत नाहीत. खवचटपणा समजायला प्रत्यक्ष संभाषण ऐकायला हवं. "ओंगळ चेहरे" लिहितांना मलाही खटकतं पण त्या च त्यामुळे तसं विशेषण वापरतांना स्वतःला माफ करून टाकलं.
मेक्स सेन्स.

>>>>>त्या चेहऱ्यांमागच्या भावना आणि माज यांचा अनुभव आहे
होय असू शकते.

अतिशय स्तुत्य उपक्रम.

सुरू करून इतके दिवस पाठपुरावा केलात हे खूप महत्त्वाचे कार्य झाले. असेच चालू राहू द्या. शुभेच्छा _/\_

किल्लेदार,

आपली शहरं आधीच पुरेशी विद्रूप करून झालेली आहेत, त्यात अजून हे फलक नकोच आहेत.

असे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे फार थकवणारे असते, exhausting and overwhelming. तरी तुम्हीं चिकाटीने प्रश्न तडीस लावताय याचं कौतुक आहे.

May your tribe grow. 👍

भारी आहात तुम्ही. शुभेच्छा.

पुणं आता भयानक झालं आहे. आफ्रिकेतल्या काही गरीब देशांतही यापेक्षा चांगली व्यवस्था आणि शिस्त आहे, असं युट्यूबवर जाऊन जाणवलं. इतक्या लाख लोकांनी एकत्र, एकाच ठिकाणी आणि कमी क्षेत्रफळात राहायचं तर काहीतरी बेसिक नियम आणि शिस्त पाहिजे, काहीतरी कोड पाहिजे हे कुणाच्याच गावी नाही.

याचं रुट कॉज शोधलं तर लक्षात येतं, या ग्रहावर नेहेमी असत आलेलं आहे, त्याप्रमाणे आपणच गुन्हेगार आहोत. आपल्याला कचरा खुपत नाही, function at() { [native code] }इक्रमणे खुपत नाहीत, बेशिस्त खुपत नाही, सार्वजनिक ठिकाणांवरचा function at() { [native code] }इआवाज खुपत नाही, रात्री बारा एक दोन वाजता भयानक आवाजात फुटलेले फटाके खुपत नाहीत, आपल्या हेरिटेजेसचं विद्रुपीकरण खुपत नाही, इतकंच काय- पण सार्वजनिक ठिकाणी आपल्यावर किंवा आपल्यावर अचानक कुणी घाण टाकली, कुणी थुंकलं, तरी तेही आपल्याला फारसं खुपत नाही.

एखाद्या मोठ्या चौकात कमीत कमी डझनभर फ्लेक्सेस असतात. आणखी मोठ्या चौकांत आणखी काही डझन. यांवर १२-१४ वर्षांपासून ते आमदार खासदारांपर्यंतची चित्रे असतात. मुलांची चित्रं इतकी फोटोशॉप केली जातात की की ती बघता क्षणीच मळमळ व्हावी. हे रांगेत मंदलेले कार्यकर्ते नक्की काय कार्य करतात, ते कधीही कुणालाही कळत नाही. फ्लेक्सवर फोटो आल्याने खुष होणारे पालकही असतील. पण हा मश्रुमकट केलेला, हिरो दिसायचा प्रयत्न करणारा मुलगा घरात पाण्याचा ग्लास अहे उचलुन कधी ठेवत नाही. आई दुसर्‍यांची धुणीभांडी करते, तिला अभिमान वाटतो, आणि यालाही.

ही फ्लेक्सवरची पोरं वाटेल ते करतात. त्यांना निराळं आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मिळू नये अशी व्यवस्था राजकारणी आणि स्थानिक मॉब मेनेजर्स सतत करत असतात. स्थानिक मॉब मॅनेजर्स हे कुणीही असु शकतात. नगरसेवक, गल्लीदादा, जिमचे मालक, वाईन शॉपचे मालक, बिल्डर, गुंठाबहाद्दर, जमीनदार, कुठच्याही क्षेत्रातला इंफ्ल्युएंसर- अगदी कुणीही- ज्याच्या हातात काही पॉवर आहे, किंवा काहीही आहे.

हे लोक शहराचं डिसिप्लिन, अ‍ॅस्थेटिक्स, कायदा आणि सुव्यवस्था, वातावरण, वाहतुक, सिस्टिम- सगळं सगळं बिघडवतात. ते बिघडवू शकतात, हे ते अभिमानाने जाहीर सांगतात. जरा वरची स्टेज असेल, तर त्यांचे चेले अभिमानाने छाती फुगवुन सांगतात. सगळ्या शहरात फक्त या लोकांचा आणि यांनी निर्माण केलेल्या आवाजांची दाटी झाली आहे, गोंगाट आहे. हे सारं रोज अनेक समस्यांचं जू मानेवर घेऊन कामावर जाणार्‍या लाखो लोकांना सहन करावं लागतं. यांतले नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोक आपली आवाज करण्याची लायकी किंवा ऐपत नाही म्हणून गप्प बसतात, पर्यायी रस्ता काढतात, किंवा हार मानून मागे जातात.

हे शहर एकेकाळी सुंदर ल्;अँडस्केप होतं. आता या शहराचं आरोग्य धोक्यात आहे. केव्हाही काहीही होऊ शकतं. या शहराचं साऊंडस्केप हॉरिबल झालेलं आहे. तसं आपल्या सार्‍याच गाव-शहर-खेड्यांचं तसं झालं आहे, पण या शहरावर मनापासून प्रेम करत आलो, त्यामुळे हे जरा जास्त फील होतं.

'गया वो जमाना' अशातलं हे लिहिलेलं नाही. मी म्हणालो ना, अजुनही प्रेम करतो या शहरावर. गटारं, कचरा-घाण, बेशिस्त, विद्रुप फ्लेक्स, function at() { [native code] }इक्रमण, बेमुर्वतखोरी, बेफिकेरी- हे सारं नीट रोज बघतो मनापासून.

पीटीपी अ‍ॅप भारी आहे. तिथल्या तक्रारींची दखल कोण कुठवर घेतं ते मात्र माहिती नाही. पीएमसी अजुन काय बघितलं नाही.

बायदवे, आपल्याला आवाजांचं इतकं आकर्षण का आहे, यावर आपल्यातल्या कुणी काही विचार करून आणि काही लिहून वगैरे ठेवलं आहे का..

शिडीवर चढून आपणच हे रात्री काढून टाकले तर?
आमच्या इथे स्प्रिंग आला की साधरण सगळ्या नेबरहुडात रस्ते, आजुबाजूच्या मोकळ्या जागा ज्यात कचरा/ इतर वस्तू उडालेल्या असतात त्या स्वच्छ करणे अशा स्वयंसेवक मोहिमा निघतात. सिटी गारबेज बॅग्स, ग्लव्ज देते किंवा आपण आपले घेऊन लोक ही येतात. असे स्थानिक लोकांनी आपापल्या गल्लीची जबाबदारी घेतली की क्राऊड मोमेंटने ते स्केल होईल. इतक्या मोठ्या शहरांत सिटीकडून पोस्टर वगैरे काढणे या अपेक्षा अनाठायी आहेत. मोदींनी झाडू घेऊन फोटो ऑप केलं वगैरे ठीक आहे, पण ही अशी कामं यंत्रणेला जागृत करुन होणे कितपत शक्य आहे असे तुम्हाला वाटते? लोकांनी सक्रिय आणि सतत काम केले तरच शक्य आहे.
या सगळ्याला नागरिकच जबाबदार आहेत. प्रशानसन, राजकारणी वगैरे फारसे जबाबदार नाहीत. नागरिकच जागरुक नसेल आणि फक्त मी कर दिला म्हणजे माझं काम संपले करणार असेल तर हे असेच नाही का होणार?

किल्लेदार तुभ्ही कुठे राहता ? त्या भागातला नागरिक मंच जाअऑईन करा. मी स्वतः कर्वेनगर नागरिक मंचात काम करते. फ्लेक्स आणी बाकी समस्या आहेत त्यावर सतत आम्ही मनपा अधिकारी आणी नगरसेवक यांना पाठपुरावा करून काम करून घेतो
तुम्ही जे करताय ते अतिशय ऊत्तम आहे. शहर आपले आहे तर त्याला नीटनेटके करण्यात आपला सुधा सहभाग असलाच पाहिजे

उत्तम कार्य. कौतुकास्पद आहे. शुभेच्छा.

पण व्यवहार म्हणून काही गोष्टींपासून लांब राहत असाल तर उत्तम. काही वर्षांपूर्वी राजकीय बॅनर्सच्या विरोधात काम करणार्‍या कुणाला तरी घरात घुसून मारहाण झालेली आठवणीत आहे. सध्या सर्वत्र असे बॅनर्स दिसतात. पौड फाटा फ्लायओव्हर ला तर दोन्हीकडून सध्याचे खासदार महापौर असल्यापासून बॅनर्स लागलेले असतात. त्या आधीही असायचे. अपघातात गेलेल्या नेत्यांचे त्या आधी होर्डिंग्ज असायचे. डोळ्यात भरण्याइतके असतात. तक्रार करताना मोबाईल फोन नंबर, पत्ता द्यावा लागतो. अशा होर्डिंग्जच्या विरोधात केली तर फोनवरून मंत्र, श्लोक ऐकवण्याची खात्रीच.
https://www.thebridgechronicle.com/news/kothruds-aesthetic-and-traffic-d...
(हा नमुना जालावरून साभार)

Picture1.jpgPicture1_0.jpg

Pages

नवीन प्रतिसाद लिहा