ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ३
आरव देशमुख काळोखात पाऊल टाकत होता, आता तो केवळ एक मूक प्रेक्षक उरला नव्हता, तर त्याने प्रत्यक्ष रणांगणात प्रवेश केला होता. समीर नायरवर विश्वास ठेवायचा की नाही? हा संभ्रम अजूनही कायम होता. पण एक सत्य आता सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ होतं ते म्हणजे आरवचं नाव यंत्रणेच्या लेखी नोंदवलं गेलं होतं. आता तो शिकारी नव्हता, तर स्वत: एक 'टार्गेट' बनला होता.
माया सेनच्या हाती असे काही पुरावे लागले होते, ज्याने तिला या जीवघेण्या खेळाच्या केंद्रस्थानी आणून सोडलं होतं. तिच्या दरवाजाबाहेर घिरट्या घालणाऱ्या त्या सावल्या केवळ धमक्या नव्हत्या; तर शत्रू तिच्या उंबरठ्यापर्यंत पोहचल्याची ती स्पष्ट पावती होती.
डॅनियल क्रॉस आपला काळोखी भूतकाळ झटकून पुन्हा मैदानात उतरला होता. त्याच्यासाठी ही केवळ जुन्या चुकांची पुनरावृत्ती नव्हती, तर त्या चुका सुधारण्याची ही शेवटची संधी होती.
तीन वेगळी शहरे, तीन वेगळ्या व्यक्ती आणि तीन वेगवेगळ्या हालचाली... वरवर पाहता या घटना स्वतंत्र वाटत असल्या, तरी प्रत्यक्षात त्या एकाच मोठ्या आणि भयानक योजनेचे विखुरलेले दुवे होते. खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ४ - पाठलाग
आरव सर्विस जिन्यातून खाली उतरत होता. घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सोपा नव्हता, पण जिन्यात शिरल्यानंतर परत फिरण्याचा पर्याय संपला होता.
तेविसाव्या मजल्याच्या वळणावर तो थांबला. वरच्या दिशेने लिफ्टचं दार उघडल्याचा आवाज आला. मग बुटांचा आवाज आणि त्याच्या दारावर टकटक झाली.
आरवच्या छातीत धडधड वाढली. ते त्याच्या मजल्यावर पोहोचले होते. समीरचं वाक्य पुन्हा कानात घुमलं, “मुख्य लिफ्ट वापरू नकोस.”
तो झपाट्याने खाली उतरू लागला. आता सावध हालचाल पुरेशी नव्हती. वेग हवा होता.
पायऱ्या उतरता उतरता त्याचा श्वास जड होऊ लागला. एकसारख्या काँक्रीटच्या पायऱ्या , वळणामागून वळण, मजल्यामागून मजला. आरव पंचवीस मजले पायी उतरून घामाघूम झाला होता. शर्ट पाठीला चिकटला होता. कपाळावरून घाम ओघळत होता. त्याला श्वास घेणं जड झालं होतं. छाती वेगाने वरखाली होत होती. बंद हवेत प्रत्येक श्वास उष्ण वाटत होता. पायात गोळे आल्यासारखे झाले. मांड्या दुखत होत्या. पोटऱ्यांमध्ये ताण चढला होता. पायऱ्यांची पुनरावृत्ती शरीरावर हल्ल्यासारखी वाटत होती. पण वर थांबलेले लोक या वेदनेपेक्षा जास्त धोकादायक होते.
तळमजल्यावर पोहोचल्यावर तो काही क्षण भिंतीला हात लावून उभा राहिला. श्वास स्थिर करण्याचा प्रयत्न केला. कान अजूनही सावध होते. वरून काही आवाज येतोय का, हे तो ऐकत होता.
सर्विस एक्सिटचा दरवाजा अर्धवट उघडाच होता. जुन्या बिजागऱ्या असलेलं ते दार पूर्ण लागत नव्हतं. फटीतून बाहेरचा काळोख दिसत होता. बाहेर इमारतीच्या मागची गल्ली अंधारात बुडाली होती.
मुख्य रस्त्याच्या प्रकाशाचा इथे फक्त थकलेला अंश पोहोचत होता.
कचऱ्याच्या डब्यांचा वास, ओलसर हवा आणि दूरवरून येणारा समुद्राचा मंद गंध मिसळला होता. त्याने आधी बाहेर डोकावून पाहिलं. डावीकडे - उजवीकडे. पार्क केलेल्या गाड्यांच्या सावल्या. रस्ता रिकामा होता.
तो बाहेर पडला. थंड, दमट हवा चेहऱ्यावर आली. दरवाजा अलगद बंद केला.
धातूचा हलका आवाज झाला. आणि त्या आवाजासोबत त्याने वरच्या जगाशी शेवटचा तात्पुरता संबंध तोडला.
तो सरळ मरिन ड्राइव्ह कडे ना जात मागच्या गल्ल्यांतून वळसा घेत चालू लागला. सरळ जाणं म्हणजे अंदाज लावणाऱ्याला मदत करण्यासारखं होतं, अरुंद गल्ल्या, बंद शटरं, ओल्या भिंती, रात्री जागे असलेले भटके कुत्रे , उशिरा माल उतरवणारे हातगाडीवाले, आणि अर्धवट बंद दिवे. त्या जगात तो मिसळत चालत होता.
समीर नायर वर पूर्ण विश्वास ठेवणं अजूनही शक्य नव्हतं. त्याचा इशारा खरा वाटत होता. त्याची भीतीही खरी वाटत होती.पण दबावाखालील माणूस दोन्ही बाजूंनी वापरला जाऊ शकतो.
आणि त्याचं न ऐकणं हि शक्य नव्हतं. कारण समीरकडे सिस्टिम ऍक्सेस होतं. गेट मॉडेल्स बद्दल माहिती होती. क्वेरी लॉग्स बद्दल माहिती होती. आणि त्याने वडिलांचं नाव घेतलं होतं. त्या सगळ्याला दुर्लक्ष करणंही मूर्खपणाचं होतं.
चौकात लागलेले CCTV दिसले, की तो बाजूच्या सावलीतून वळत होता. कधी पार्क केलेल्या व्हॅनच्या आडून. कधी पानटपरीच्या बंद शटरला चिकटून. चालण्याचा वेग बदलत होता.
मरिन ड्राइव्ह मागच्या जुन्या पार्किंग लेन जवळ पोहोचण्याआधी तो एका बंद दुकानाच्या शटरजवळ थांबला. लोखंडी शटरचा रंग उडाला होता . कुलूप गंजलेलं. वरचा बोर्ड अर्धवट तुटलेला. बाजूला रस्त्याच्या दिव्याचा फिकट पिवळा उजेड. आता coordinate बदलण्याआधी काही इनकमिंग संदेश आहेत का हे पाहणं गरजेचं होतं.
त्याने खिशातून जुना कीपॅड मोबाईल बाहेर काढला. लहान स्क्रीन. जाड बटणं. सिम परत घातली. बॅक कव्हर बसवलं. फोन सुरू केला.
फोन काही सेकंद नेटवर्क शोधत राहिला. एक नेटवर्क बार. मग गायब. पुन्हा searching. मग दोन बार.
मग व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर संदेश चमकला. "रांग दिसते तिथे पाहू नकोस. रांग का तयार होते त्याकडे लक्ष दे."
हा डॅनियल क्रॉस होता.
आरवने डोकं वर केलं. पार्किंग लेन काही मीटर पुढे होती. समीर तिथे असू शकतो. सापळाही असू शकतो.
************************************************************************************************************************
त्याच वेळी, सिंगापूरमध्ये पहाटेचे चार वाजण्यास काही मिनिटे बाकी होती.
माया सेन केबिनमध्ये उभी होती. काही मिनिटांपूर्वी ती पत्रकार होती. आता ती पुराव्यासोबत अडकलेली साक्षीदार होती. भीती अजून होती, पण तिला दिशा मिळाली होती. काचेबाहेर उभा असलेला अनोळखी पुरुष दारापासून हलला नव्हता. तो अजूनही चौकटीसमोर तसाच उभा होता.
त्याच्यामागे दोन सावल्या जवळ येत होत्या. लांबच्या सेन्सर लाईट्स मधून दोन आकृत्या तुकड्यांत दिसत होत्या. खांदे. चालण्याची लय. एकमेकांना जागा देत पुढे येणारी हालचाल. कार्ड रीडरवर बीप आवाज झाला. तो छोटासा आवाज त्या शांत मजल्यावर धक्क्यासारखा वाटला.
कुणाकडे तरी ऍक्सेस बॅज होतं. म्हणजे हे घुसखोर नव्हते. कुणीतरी अधिकृत प्रवेश वापरत होतं. दार उघडण्याचा अधिकृत मार्ग त्यांच्याकडे होता.
दाराबाहेरील पुरुष आता पटकन आत आला आणि कोटाच्या आतून टेलिस्कोपिक बॅटन बाहेर काढली. लहान धातूची नळी. एका फ्लीकने पूर्ण लांबीची होणारी. आवाज न करता जवळच्या अंतरावर वापरण्यासाठी बनवलेलं साधन.
माया टेबलाजवळ गेली. ती आता थांबून प्रश्न विचारणाऱ्या अवस्थेत नव्हती. encrypted drive, SSD आणि प्रिंटेड नोट्स तिने बॅगेत टाकले.
“तुम्ही कोण?” ती कुजबुजली.
तो प्रश्न नैसर्गिक होता. कुणीतरी तुमच्यासाठी मदतीसाठी उभा राहत असेल, तर नाव जाणून घ्यावंसं वाटतं.
तो न वळताच म्हणाला, "ते आता महत्वाचं नाही" मग दाराच्या चौकटीला टेकून उभा राहिला.
आणि एकावेळी एकच आत शिरेल अशी जागा ठेवली.
“जेव्हा मी सांगेन तेव्हा मागच्या बाहेरील बाजूने आपत्कालीन जिन्याकडे धाव.”
मायाने मागे वळून लाल अक्षरांत चमकणाऱ्या फायर एस्केप कडे पाहिलं.
************************************************************************************************************************
युरोपमध्ये, Ljubljana Airport कडे जाणाऱ्या रस्त्यावर काळी सेडान वेगाने धावत होती.
पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. आकाश करड्या निळ्या रंगात अडकून बसलं होतं. दूरवरच्या टेकड्यांवर धुक्याच्या पातळ रेषा पसरल्या होत्या. महामार्ग जवळजवळ रिकामा होता, आणि त्या रिकामेपणातून ती सेडान स्थिर वेगाने पुढे जात होती.
गाडीच्या आत बंद उष्णता होती. बाहेर थंडी. आत इंजिनचे मंद कंपन, लेदर सीट्सचा वास, आणि स्क्रीनवर सतत बदलणारे आकडे.
डॅनियल क्रॉस मागच्या सीटवर बसला होता. कोट बाजूला टाकलेला. कॉलर सैल. चेहऱ्यावर वयाच्या रेषा होत्या, पण डोळ्यांत झोप नव्हती.
त्याच्या टॅबलेटवर लॉजिस्टिक्स फ्युचर आणि ओव्हर नाईट एनर्जी प्रायसिंग चमकत होतं.
मालवाहतूक दर निर्देशांक. इंधन दरांतील फरक. संरक्षणात्मक विमा व्यवस्था. शिपिंगशी निगडित करार. लाल, हिरवे, पिवळे अंक सतत हलत होते. बहुतेकांना ते आकडे दिसले असते. त्याला विशिष्ट घटनाक्रम दिसत होता .
घबराट सुरू होणे, अंदाज वर्तवणे वाढणे, कुणीतरी आधीच पोजिशन घेणे.
त्याने एक ओळ वाचली.
Western India freight volatility rising.
त्याची नजर काही क्षण त्या शब्दांवर स्थिर राहिली. मग ओठांच्या कोपऱ्यात कडू हसू उमटलं.
तो उपहासाने हसला. कारण त्याला माहित होतं ही प्रतिक्रिया नसून उद्देश होता.
पोर्ट अजून बंद पडले नव्हते. पुरवठा अजून कोसळला नव्हता. पण परसेप्शन आधीच हलला होता.
तो स्वतःशीच म्हणाला, “भीतीचा व्यापार सुरू झाला.”
गाडी पुढे धावत राहिली. स्क्रीनवर आकडे चमकत राहिले.
आणि हजारो किलोमीटर दूर मुंबईमध्ये काही लोक अजूनही समजत होते की ही फक्त वाहतुकीची समस्या आहे.
************************************************************************************************************************
मुंबई .
लेनच्या टोकाला एक काळी टॅक्सी उभी होती. हेडलाईट्स बंद. स्टिअरिंगच्यामागे समीर नायर बसला होता. समीरने आरवला पाहताच हाताने इशारा केला.
“लवकर.”
आरव हलला नाही. टॅक्सी पासून काही अंतर राखून तो उभाच राहिला. रस्त्यावरील प्रकाश त्याच्या खांद्यावर पडत होता, पण चेहरा सावलीत होता.
“हि टॅक्सी कुठून आणलीस?”
समीरने चिडून उत्तर दिलं, “हि वेळ प्रश्न विचारायची नाही. लवकर ये.”
आरवची नजर टॅक्सी च्या सीट्सवर फिरली. टॅक्सीत समीर एकटाच होता, इतर कोणी नव्हतं.
तरीही तो जागेवरच उभा राहिला.
“काय चाललंय मला जरा सांगशील ?”
समीरने आरशामध्ये मागचा रस्ता पाहिला. मग म्हणाला, “आज रात्री पोर्ट सिस्टिम मधून गेट ट्राफिक मॉडेल्स काढले गेले.”
आरवच्या मनात विचार आले. वडिलांचं पत्र, कंटेनर गेट सिक्वेन्स, डॅनियलचा संदेश सर्व काही एकाच ठिकाणी येऊन भिडलं.
“कोणीतरी सकाळी मुद्दामहून ट्रकचे ट्राफिक वाढवणार आहे.”
“कोण?” आरवने विचारलं.
“माहित असतं तर इथे उभा नसतो.” समीरचा आवाज चिडल्यासारखा झाला.
“माझं लॉगिन आयडी त्या query chain मध्ये दिसतंय.”
आरव काही क्षण शांत राहिला. त्याला आता समीर खरं बोलतोय असं वाटत होतं
“मग मला का बोलावलंस?”
समीरने थेट त्याच्याकडे पाहिलं. “कारण तुझे बाबा काहीतरी मागे ठेवून गेलेत.”
आरवच्या डोळ्यांत चमक आली.
समीर पुढे म्हणाला, "दुष्यन्त सरांनी मला आधीच या पॅटर्न बद्दल सांगितले होते."
मग समीर म्हणाला, “मला पुरावा हवा आहे आणि तुझ्याकडे माहिती आहे. आपण दोघांनी आता घाई नाही केली तर सकाळपर्यंत उशीर होईल.”
तेवढ्यात रस्त्याच्या टोकाला दोन मोटारसायकली वळल्या. हेडलाईट्स लेन मध्ये फिरल्या. पांढरा प्रकाश भिंतींवरून घसरत टॅक्सी वर आला. समीरचा चेहरा पांढरा पडला.
त्याने मागचं दार पूर्ण उघडलं. “ चल लवकर आत बस .” तो ओरडला.
मोटारसायकलींचा आवाज वेगाने जवळ येत होता.
दोन मोटारसायकली लेनमध्ये घुसल्या. हेडलाईट्सचा पांढरा झोत सरळ आरवच्या चेहऱ्यावर आदळला. क्षणभर त्याचे डोळे दिपले. जग पांढरं झालं. लेन , टॅक्सी, समीर सगळं एका तीव्र प्रकाशात विरघळलं.
इंजिनांचा आवाज अरुंद गल्लीत घुमला.
समीर ओरडला “आत बस!”
आरवने आणखी विचार केला नाही. निर्णय घेण्याची वेळ संपली होती. आता हालचालीची वेळ होती. तो मागच्या सीटवर झेपावला. दाराच्या कडेला खांदा आपटला. गुडघा सीटला लागला. बॅग छातीशी दाबली गेली. दार आपटत बंद झालं.
त्याच क्षणी समीरने एक्सिलेटर दाबला. काळी टॅक्सी पुढे झेपावली. टायर रस्त्यावर क्षणभर घसरले, मग पकड घेत पुढे उसळले.
पहिली मोटारसायकल टॅक्सी च्या मागच्या बम्परला स्पर्शून गेली. धातू घासल्याचा किरकिर आवाज झाला. मागे ठिणग्या उडाल्यासारखं चमकलं.
दुसरीने बाजूने घुसण्याचा प्रयत्न केला. रायडरने मोटार सायकल टॅक्सी च्या दरवाजाला समांतर आणली. जणू जागा बंद करून थांबवण्याचा प्रयत्न करत होता .
समीरने स्टिअरिंग झटकन डावीकडे फिरवलं. टॅक्सी लेन मधून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आली. वळण इतकं तीव्र होतं की आरव मागच्या सीटवर फेकला गेला. खिडकीला हात आपटला. पण गाडी लेनच्या सापळ्यातून बाहेर पडली होती.
रात्रीचं शहर अचानक वेगाने समोर आलं. रिकामे चौक. क्वचित धावणाऱ्या गाड्या. एखादा ट्रक . एखादी कॅब . एखादी डिलिव्हरी व्हॅन. बाकी रस्ते अर्धवट मोकळे.
रस्त्यांवरचे दिवे , जाहिरातींचे होर्डिंग्स , सिग्नल्स; सगळे रंग लांब रेघांसारखे पसरत होते. मागे दोन्ही मोटारसायकली चिकटून होत्या. त्यांनी पाठलाग सोडला नव्हता. उलट आता त्यांना जास्त जागा मिळाली होती.
समीरने आरश्यात पाहिलं आणि म्हणाला , "सीटबेल्ट लाव.”
“ही टॅक्सी आहे,” आरव दमलेल्या आवाजात म्हणाला. "मागे सीटबेल्ट नसतात".
“मग घट्ट धर.” समीर.
आरव ने मागच्या काचेतून पाहिलं. दोन्ही रायडर्स काळ्या फुल फेस हेल्मेटमध्ये होते. नंबर प्लेटवर चिखल फासलेला होता. जॅकेट्स साधी, कोणतंही चिन्ह नव्हतं.
“हे कोण आहेत?” आरव ओरडला. इंजिनांचा आवाज, टायरांचे घर्षण, बाहेरचा वारा या सगळ्यावर मात करून बोलावं लागत होतं.
समीरची नजर रस्त्यावरच होती. त्याने आरश्यामध्ये क्षणभर पाहिलं, आणि टॅक्सी उजवीकडे वळवली. मागचा टायर थोडासा घसरला, मग समीरने परत नियंत्रण मिळवले.
समोर सिग्नल लाल होता. रिकामा चौक, चार दिशांना पसरलेले रस्ते, चमकणारा लाल दिवा पण समीरने वेग कमी केला नाही.
“अरे!”
आरवचं वाक्य पूर्ण होण्याआधी टॅक्सी रिकाम्या चौकातून लाल दिवा तोडून गेली.
एक क्षण सगळं संथ झाल्यासारखं वाटलं. सिग्नलचा लाल प्रकाश विंडशिल्डवर चमकला. टायरांनी रंगवलेल्या पट्टया कापल्या.
डावीकडून येणारा एक डिलिव्हरी ट्रक जोरात ब्रेक दाबत थांबला. चाकांचा कर्कश आणि हॉर्नचा प्रचंड आवाज रात्रीला चिरून गेला.
राग, भीती, इशारा सगळं त्या आवाजात जाणवलं.
मोटारसायकलींनीही चौक कापला. एकाने ट्रकच्या नाकासमोरून कट मारला. दुसरीने मागून झेप घेतली. दोघांचाही वेग जवळजवळ तसाच राहिला.
टॅक्सी पुढच्या अंधाऱ्या रस्त्याकडे झेपावली. मुंबईच्या रात्रीतला हा पाठलाग आता अपघाताने थांबणार नव्हता.
टॅक्सी आता समुद्रकाठच्या रुंद रस्त्यावर आली. डावीकडे काळा समुद्र पसरला होता. उजवीकडे इमारतींची रांग.
रस्ता जवळजवळ रिकामा. याचा अर्थ आता पाठलाग करणाऱ्यांना मोकळं मैदान मिळालं होतं.
पहिली मोटारसायकल डावीकडून जवळ आली. रायडरने एका हाताने हॅन्डल पकडलं आणि दुसऱ्या हाताने जॅकेट मध्ये हात घातला.
आरवचा श्वास अडखळला.
“समीर!”
समीरने आरश्यात पाहिलं. क्षणाचाही विलंब न करता त्याने टॅक्सीला अचानक ब्रेक मारला. मोटारसायकलचा अंदाज चुकला. ती टॅक्सीच्या पुढे निघून गेली.
रायडरचा तोल गेला.बाईक घसरली.
धडाम!
लोखंड डांबरावर घासत गेलं. ठिणग्या उडाल्या. रायडर रस्त्यावर फेकला गेला.
दुसऱ्या बाईकने झटकन बाजू घेतली.
“तू वेडा आहेस का?” आरव ओरडला.
त्याच्या आवाजात राग होता, पण त्याहून जास्त धक्का. काही सेकंदांपूर्वी तो घरात होता. आता तो लाल सिग्नल तोडून धावणाऱ्या टॅक्सी मध्ये बसला होता आणि काही लोक त्याचा पाठलाग करत होते.
"मला आता अक्कल आलीय." समीरचे उत्तर तुटक होतं. पण त्यात कबुली होती.
टॅक्सी पुन्हा वेगाने पुढे निघाली.
आरवने मागे पाहिलं. पहिली मोटारसायकल दिसत नव्हती. ती चौकात अडली होती का, ट्रक जवळ मंदावली होती का, की जाणीवपूर्वक वेगळ्या रस्त्याने गेली होती हे समजत नव्हतं.
पण दुसरी मोटारसायकल अजूनही मागे होती.
“पहिली कुठे गेली?” आरवने विचारलं.
समीरने आरश्यामध्ये पाहिलं. चेहरा आणखी ताणला गेला. “माहित नाही.”
टॅक्सी पुढच्या फ्लायओव्हरकडे झेपावली. मागचा एकटा प्रकाश सावलीसारखा चिकटून होता. रायडरने अंतर राखलं होतं जणू त्याच्याकडे अदृश्य दोरी होती आणि टॅक्सी त्या दोरीच्या टोकाला बांधलेली होती.
तो सरळ मागे न येता कधी डावीकडे, कधी उजवीकडे सरकत होता. कधी लेन बदलून साईड मिररच्या बाहेर जात होता. कधी पुन्हा हेडलाईट दिसेल इतका मध्यभागी येत होता. कधी पार्क केलेल्या गाड्यांच्या आड झाकला जात होता.
समीरने आरशात पाहिलं आणि म्हणाला, "हा आपल्याला ट्रॅक करतोय."
आरवने त्याच्याकडे पाहिलं, “म्हणजे? कोठे जातोय आपण?”
समीरने उत्तर दिलं नाही. म्हणजे त्याला सांगायचं नव्हतं किंवा त्यालाच खात्री नव्हती. दोन्ही अस्वस्थ करणारे होते.
टॅक्सी अचानक डावीकडे वळली आणि अरुंद जुन्या रस्त्यात घुसली. वळण इतकं तीव्र होतं की आरव सीटला आपटला. मागच्या काचेतला प्रकाश एका क्षणासाठी हरवला.
दोन्ही बाजूंना बंद दुकाने. लोखंडी शटर्स, वर जुन्या इमारतींच्या गॅलऱ्या, जुन्या अक्षरांचे बोर्ड.
एका कोपऱ्यावर उशिरा चहा पिणारे तीन माणसं दचकून मागे सरकली.
हातात काचेचे ग्लास. उकळत्या चहाची वाफ. रात्रीच्या कंटाळ्यात अचानक घुसलेला वेग.
टॅक्सी वेग कमी न करता पुढे धावत होती. समोरचा रस्ता वाकडा, अरुंद, अडथळ्यांनी भरलेला होता.
मागे एकटा रायडर अजूनही होता आणि आता तो अधिक जवळ वाटत होता
“तू सांगितलं नाहीस,” आरवचा आवाज कठोर झाला, “तुझं लॉगिन त्या query chain मध्ये कसं आलं?”
"त्यांनी माझा टर्मिनल वापरला.” समीरने तुटक उत्तर दिले.
आरवने त्याच्याकडे रोखून पाहिलं.
“कोणी?”
टॅक्सी एका खड्ड्यावरून गेली. दोघे हलले. काही सेकंद समीर काही बोललाच नाही.
मग तो रागीट आवाजात म्हणाला, “माझ्याच जवळचे, ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला.”
आरव काही क्षण शांत राहिला. हे उत्तर त्याला समजलं.
त्याने समीरकडे पाहिलं. हा माणूस कदाचित विकला गेला नव्हता. ह्याचा वापर केला गेला होता.
“कधी?” आरवने विचारलं.
समीरने लगेच उत्तर दिलं नाही.
“तीन दिवसांपूर्वी,” तो शेवटी म्हणाला. “नाईट ऑडिट च्या नावाखाली.”
टॅक्सी पुढच्या वळणाकडे झेपावली. मागे बाइकचा प्रकाश अजून हलत होता.
समोर रस्ता दोन भागात फुटत होता.
एक बाजू रुंद मुख्य मार्गाकडे जात होती. दुसरी अरुंद, जुन्या इमारतींच्या मधून वळणावळणाने आत शिरत होती. काही सेकंदांचा निर्णय, पण चुकीचा मार्ग निवडला तर फरक मोठा होता.
समीरने उजवीकडे गाडी टाकली. गाडी अरुंद रस्त्यात शिरली. मोटारसायकलही मागे वळली.
समीरने अखेर पहिल्यांदा आरवकडे पाहिलं. रस्त्यावरून नजर हटवणं म्हणजे जोखीम होती. पण त्याला हे बोलणं आवश्यक वाटलं.
त्याच्या चेहऱ्यावर घाम होता. डोळ्यांत अनेक दिवस स्वतःपासून लपलेल्या माणसाचा थकवा होता आणि अपराधीपणाही.
“मी एक चूक केली.”
आरवने त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहिलं.
“काय?”
समीरने पुन्हा रस्त्याकडे पाहिलं. आवाज मंद झाला.
“मी तुझ्यावर विश्वास ठेवायला खूप उशिर केला.”
टॅक्सी पुढे धावत राहिली, मागे मोटारसायकलचा प्रकाश अजून चिकटलेला होता.
समोर रस्ता अजून वाकत होता.
आता दोघेही फक्त पळत होते आणि त्याचबरोबर उशिरा का होईना, एकाच बाजूला उभे राहू लागले होते.
तेवढ्यात समोर पोलीस बॅरिकेड दिसलं. अरुंद रस्ता अचानक उजळला. मधोमध पिवळे अडथळे उभे होते. परावर्तित पट्टे हेडलाईट्स मध्ये चमकत होते. दोन्ही बाजूंना ट्राफिक कोन्स टाकलेले.
रस्त्याच्या मध्ये पिवळे अडथळे. दोन फ्लॅशिंग लाईट्स, निळा आणि लाल प्रकाश डांबरावर फिरत होता. भिंतींवर, शटर्सवर, टॅक्सीच्या बॉनेटवर रंग बदलत होते.
आणि एक पोलीस जीप उभी होती, आरवला एक आशेचा किरण दिसला.
“थांब! मदत...”
वाक्य पूर्ण होण्याआधी समीर ओरडला, “नाही!”
त्याच्या आवाजात भीती होती आणि खात्रीही.
त्याने टॅक्सी ब्रेक न मारता बाजूच्या सर्व्हिस लेनमध्ये घातली. स्टिअरिंग झटकन डावीकडे वळलं. टॅक्सी कोनच्या कडेला घासत सर्व्हिस लेनमध्ये शिरली. सस्पेन्शन हललं. आरव सीटला आपटला. बॅरिकेड मागे राहिलं.
आरव अवाक झाला.
“तू वेडा झालायस का? पोलीस होते!”
समीरचा आवाज थंड झाला. तो आता ओरडत नव्हता. जणू भावनांसाठी वेळच उरला नव्हता.
"ते पोलीस होते याबद्दल मला शंका आहे."
“आपण येतोय हे त्यांना आधीच माहित असल्यासारखं ते उभे होते.”
आरव शांत झाला.
मागची मोटारसायकल अजूनही पाठलाग करत होती. पण आता आणखी एक गोष्ट बदलली होती. समोरून येणाऱ्या रस्त्यावर दूर दोन पांढऱ्या SUVs वळताना दिसत होत्या. त्यांचे हेडलाईट्स एकामागून एक वळणातून बाहेर आले. त्या सरळ त्यांच्या दिशेने येत होत्या.
समीरने स्टिअरिंग घट्ट पकडलं. त्याच्या हातांवरील नसा स्पष्ट दिसत होत्या. डोळे एका क्षणात मार्गाचा अंदाज घेत होते; साईड गॅप , फुटपाथ, रिव्हर्ससाठी अंतर, इम्पॅक्ट अँगल.
आरवने मागे पाहिलं. एक बाईक मागे, समोर दोन SUVs, मध्ये अरुंद रस्ता…बाहेर पडायला जागा नव्हती. टॅक्सीचा वेग कमी झाला नाही, पण वेळ मंदावल्यासारखा वाटला. आरवच्या कानात स्वतःचा श्वास मोठा ऐकू येऊ लागला.
पहिली SUV आता स्पष्ट दिसत होती. काळ्या टिंटेड काचा. दुसरी थोडी उजवीकडे सरकत होती त्यांचा सुटकेचा मार्ग बंद करण्यासाठी.
“धडक मारणार?” आरव ओरडला.
समीरने नजरेतूनच उत्तर दिलं, "हो, जर गरज लागली तर."
थरारक....
थरारक....
मस्त.....थरारक........
मस्त.....थरारक........
थरारक कथानक
थरारक कथानक
थरारक
थरारक
भारी चालू आहे कथानक ...
भारी चालू आहे कथानक ... वाचायला मजा येते आहे
मस्त मजा येतेय नितीन सर. आज
मस्त मजा येतेय नितीन सर. आज झोपू नका, उद्या नवीन भाग येऊदे.
धन्यवाद धनवन्ती, सामी,
धन्यवाद धनवन्ती, सामी, झकासराव, ekujadhav, अश्विनी११, Sharadg!