ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ३

Submitted by नितनवे on 1 May, 2026 - 02:23

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २

पूर्वभाग
आरव देशमुख वडिलांच्या मृत्यूनंतर वर्षानुवर्षे न उघडलेला निळा ट्रंक उघडतो आणि त्यातून त्याच्या आयुष्याला हादरा देणारं सत्य समोर येतं.
वडील दुष्यन्त देशमुख हे साधे बँकर नसून “ब्लॅक एम्बर” नावाच्या गुप्त संघटनेशी जोडलेले होते. पत्रातून आरवला कळतं की वडिलांचा “अपघात” संशयास्पद असू शकतो, तसेच दुसऱ्या लिफाफ्यातून लॉकरची चावी, micro SD card आणि फोर्टमधील गुप्त लॉकरचा पत्ता मिळतो.
सिंगापूरमध्ये माया सेन ब्लॅक एम्बरच्या योजनांचा सखोल तपास करत असताना तिच्या ऑफिसबाहेर एक अनोळखी व्यक्ती येऊन तिच्या जीवाला धोका असल्याचा इशारा देतो.
युरोपमध्ये डॅनियल क्रॉस भारतातील बंदरांवर पुढचा डाव खेळला जाणार असल्याचे ओळखतो आणि आरवला सावध करणारा संदेश पाठवतो.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ३ - पहिली चाल

मुंबईत रात्रीचे बारा वाजून अकरा मिनिटे झाली होती. शहर अजूनही पूर्ण झोपलं नव्हतं. दूरवर रस्त्यांवरून क्वचित हॉर्नचे आवाज येत होते, समुद्राकडून ओलसर वारा काचांवर आदळत होता, आणि उंच इमारतींच्या काही खिडक्यांत अजूनही दिवे लागलेले होते. पण आरव देशमुखच्या घरात त्या क्षणी वेळ जणू एका छोट्या स्क्रीनवर थांबली होती.

आरव काही क्षण फोनकडे पाहतच उभा राहिला. स्क्रीनवर संदेश अजूनही चमकत होता. निळसर उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. बाकी घर अंधुक होतं. जणू संपूर्ण खोलीत एकच गोष्ट जिवंत होती…तो संदेश.

तुझ्या वडिलांनी मला एकदा वाचवलं होतं. आता माझी पाळी आहे. Port tomorrow. Trust no police. अज्ञात नंबर, परदेशी कोड, वडिलांचा उल्लेख, पोर्टवरील इशारा आणि शेवटी ते चार शब्द Trust no police. त्या शब्दांनी त्याच्या मनात असंख्य शक्यता एकदम जाग्या केल्या. जर हा माणूस खरं बोलत असेल, तर परिस्थिती त्याने कल्पना केली त्यापेक्षा गंभीर होती आणिजर तो खोटं बोलत असेल, तर तो सापळाही असू शकत होता.

दोन्ही शक्यता तितक्याच धोकादायक होत्या.

आरवने पुन्हा एकदा संदेश वाचला. Port tomorrow.

उद्या कोणतं बंदर? कोणती वेळ? काय होणार? उशीर? अपघात? संकटाचा बनाव? की काहीतरी अधिक मोठं?

त्याच्या डोक्यात प्रश्न वेगाने फिरत होते, पण चेहऱ्यावर शांतता उतरली होती. घाबरलेल्या माणसाची पहिली चूक म्हणजे लगेच हालचाल करणं. विचार न करता प्रतिक्रिया देणं. तो ते करणार नव्हता.

त्याने फोन airplane mode वर टाकला. नेटवर्कची चिन्हं गायब झाली. कॉल्स थांबले.

मग त्याने तो टेबलावर ठेवला. स्क्रीन मंद झाली. संदेश काळोखात गेला.

कुणीतरी त्याच्याशी संपर्क साधला होता. म्हणजे कुणीतरी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत होतं. फोन, लोकेशन, सवयी, संपर्क, कदाचित घरही. माहिती मिळवण्याआधी त्याला एक गोष्ट निश्चित करायची होती, ती म्हणजे पुढची चाल तो ठरवेल. दुसरा कुणी नाही.

त्याने समोर पडलेल्या वस्तूंकडे पाहिलं.

SD card हातात घेतलं. बोटांमध्ये धरल्यावर त्याला त्याचं हलकं वजन जाणवलं. इतक्या छोट्या वस्तूला भीतीचं वजन असू शकतं, हे विचित्र होतं.
क्षणभर विचार केला. त्याने ते पुन्हा टेबलावर अलगद ठेवलं.

इतक्या लहान माध्यमात काय असेल हे सांगता येत नव्हतं, camera dump, malware, dead drop, काहीही. अनुभव नसला तरी बुद्धी सांगत होती, लहान वस्तू नेहमी साध्या नसतात. त्या जास्त खोल नियोजनाचा भाग असू शकतात.

मोठ्या ड्राइव्हपासून सुरुवात करणं अधिक योग्य होतं. पेनड्राईव्ह किमान पाहता येईल, वजन कळेल, casing उघडता येईल, कनेक्शन नियंत्रित करता येईल. SD card अनेकदा तात्काळ ऍक्सेस साठी बनवतात. पेनड्राईव्ह अनेकदा साठवणुकीसाठी वापरतात.

त्याने IF_THEY_RETURN पुन्हा उघडलं. स्क्रीनवर तीन फाईल्स दिसत होत्या.
READ.txt
NAMES.enc
WATCH_GATE.mp4

आरवची नजर काही क्षण त्या नावांवर थांबली. या तिन्ही फाईल्स आता साध्या फाईल्स राहिल्या नव्हत्या. एकाने इशारा दिला होता. दुसऱ्याने नावं लपवली होती. तिसऱ्याने मृत माणसाला पुन्हा बोलतं केलं होतं.

त्याने पहिली text file उघडली. काळ्या स्क्रीनवर पांढरी अक्षरं उभी राहिली.

आरव,
हे archive तुझ्यापर्यंत पोहोचणं म्हणजे त्यांनी हालचाल सुरू केली आहे.
कोणतीही प्रणाली सुरक्षित आहे असं गृहित धरू नकोस. ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवशील, त्याची पडताळणी आधी कर. जर पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांमध्ये अनियमित विलंब दिसू लागले तर कंटेनर गेट सिक्वेन्स तपास. हि त्यांची आवडती पहिली चाल आहे.
- बाबा

शेवटची सही स्क्रीनवर शांतपणे चमकत होती.

कंटेनर गेट सिक्वेन्स हा शब्द आता टेक्निकल वाटत नव्हता. तो टॅक्टिकल वाटत होता.

साध्या माणसाला तो लॉजिस्टिक्स क्षेत्रातील तांत्रिक शब्द वाटला असता. एखाद्या पोर्ट ऑपरेशन रिपोर्टमधला कंटाळवाणा शब्द. पण आरवला आता त्यात वेगळाच अर्थ दिसत होता.

गेट कार्यकाल - कोणता ट्रक कधी आत जाईल. कोणता थांबवला जाईल. कोणत्या मार्गिकेवर वर अचानक सुरक्षा तपासणी वाढेल. पाच मिनिटांचा विलंब शंभर वाहनांच्या रांगेत कसा बदलतो, हे ज्यांना माहित असतं त्यांच्यासाठी वेळ हे शस्त्र असतं.

ट्रक वाहतुकीचा ओघ - रांगा फक्त वाहनांच्या नसतात. त्या बाजाराच्या नसांमधील रक्तप्रवाह असतात. एक प्रवेश कोंडी झाली, की वेअर हाउस वेळापत्रक बदलतात. पुढची डीसपॅच थांबते. अंतर्गत वाहतूक उशिरा सुटते. मग दिसायला “सिस्टम चालू” असते, पण प्रत्यक्षात लय मोडलेली असते.

मार्गिका रोखणे - एका मार्गिकेवर वर क्रेन निरीक्षण. दुसरीवर कागदपत्र चौकशी. तिसरीवर कर्मचारी तुटवडा. कारणं वैध दिसतात. परिणाम समन्वित असतो.

मंजुरी मिळण्याची नियमित गती - सीमाशुल्क शिक्के, माल यादी मंजुरी, सील तपासणी, अचानक तपासणी. हे सर्व जेव्हा नियमित लयीत चालतं तेव्हा व्यापार दिसत नाही, फक्त घडत राहतो. पण लय मोडली की लोकांना संकट दिसू लागतं.

पुरवठा तोडायचा नाही. कारण पुरवठा तोडला तर सरकारं जागी होतात. मीडिया प्रश्न विचारतो. आकडे झटक्यात दिसतात. तपास सुरू होतो.

थोडे विलंब निर्माण करायचे, वाढलेल्या रांगा दिसू द्यायच्या, सोशल मीडियावर ट्रक्सचे फोटो पसरवायचे आणि “बंदरातील कोंडी” असे मथळे झळकू द्यायचे. त्यातून व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होते, विमा व्यवहारात वाढ होते आणि वायदा बाजारात तीव्र चढउतार निर्माण होते.

मग सत्याची गरज उरत नाही. समज पुरेसं होतं.

आरव बराच वेळ न हलता बसला.

त्याच्या डोळ्यांसमोर बंदर नव्हतं एक विशाल यंत्रणा दिसत होती. हजारो लोक रोज ज्या नियमबद्ध हालचालींवर विश्वास ठेवतात, त्याच हालचाली कुणीतरी हत्यारासारख्या वापरत होतं.

त्याला पहिल्यांदाच जाणवलं काही हल्ले आवाजाने होत नाहीत.

आरव बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिला. ही भविष्यवाणी नव्हती. हा pattern warning होता. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांमध्ये अनियमित विलंब. कंटेनर गेट सिक्वेन्स तपास. पहिली चाल. आरवने दिवसभराच्या घटना मनात पुन्हा मांडल्या.

Shipping delays.
Insurance uptick.
Oil volatility.
Anonymous calls.
Port tomorrow.

सकाळपासून जे घडत होतं, त्यात तो पॅटर्न जुळत होता. त्याने व्हिडिओ फाईल उघडली. स्क्रीनवर वडील दिसले. दुष्यंत देशमुख. थकलेले. पण डोळे अजूनही धारदार. वर्षानुवर्षांनी हरवलेला आवाज पुन्हा समोर आला होता.

आरवचे डोळे पाणावले. त्याने स्क्रीनला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण हात हवेतच थांबला. व्हिडिओ पुढे सरकला.

“मी वेळ कमी असल्यामुळे फक्त उपयुक्त गोष्टी सांगतो.”
“समीर नायर वाईट माणूस नाही.”

आरव ताठ बसला.

समीर नायर. आरवपेक्षा वयाने मोठा, पण नात्याने मित्राहून जवळचा. दुष्यंत देशमुखच्या ओळखीने घरात ये-जा करताना तो आरवच्या आयुष्यात आला आणि कॉलेजपासून त्याचा सल्लागार, विश्वासू व्यक्ती आणि वडीलानंतर आधार बनला. आता तो मुंबई पोर्ट सिक्युरिटी सेलमध्ये वरिष्ठ अधिकारी होता.

“पण दबाव सहन करण्याची त्याची मर्यादा कमी आहे.”
“त्याला विकत घेण्याची गरज नसते. त्याला कोणीतरी धोक्यात आहे असं दाखवणं पुरेसं असतं.”

आरवच्या मनात समीरची पत्नी, मुलगी, त्यांचं हसणं चमकलं.

“त्याच्याकडे पोर्ट ऍक्सेस आहे. म्हणून तो लक्ष्य असू शकतो. शत्रू नाही.”

स्क्रीन काळी झाली. व्हिडिओ संपला. आरव बराच वेळ शांत बसला. Compromised म्हणजे traitor नसतो. हा फरक फार मोठा होता.
आरवने स्क्रीनकडे पुन्हा पाहिलं. आता समीरवर संशय घेण्यापेक्षा त्याला समजून घेणं जास्त महत्त्वाचं होतं.

घड्याळात रात्रीचे १:४६ हे डिजिटल अंक शांत चमकत होते, पण आरवला ते जणू उलटगणतीसारखे वाटत होते. काही मिनिटांपूर्वी माहिती गोळा करणं महत्त्वाचं होतं. आता निर्णय घेणं महत्त्वाचं झालं होतं. वेळ निघून गेला होता. पत्र वाचणं, archive उघडणं, व्हिडिओ पाहणं, अर्थ जोडणं या सगळ्यात रात्र पुढे सरकली होती.

त्याने पर्सनल फोनकडे पाहिलं. टेबलावर शांत पडलेलं ते डिवाइस अचानक धोकादायक वाटलं. Convenience machine. Smart. Connected. Trackable. त्यावरून कॉल करणं म्हणजे स्वतःच लोकेशन देणं.

त्याने ड्रॉवरमधून जुना कीपॅड हँडसेट बाहेर काढला. काळसर प्लास्टिक बॉडी. छोटा स्क्रीन. मोठी बटणं. इंटरनेट नाही. स्मार्ट फीचर्स नाहीत आणि म्हणूनच उपयोगी. प्रपेड सिम घातली. बॅक कव्हर बसवलं. बॅटरी क्लिक झाली. पावर बटन दाबताच जुनाट boot tone खोलीत घुमला.
फोन सुरू केला. समीरचा नंबर manually डायल केला.

रिंग. दुसरी रिंग. तिसरी.

प्रत्येक रिंगसोबत आरवचा श्वास नियंत्रित होत गेला. आता घाबरण्यापेक्षा ऐकणं महत्त्वाचं होतं. कॉल उचलला गेला.

समीर नायरचा आवाज आला. झोपाळू नव्हता. ताणलेला होता. “हॅलो?” आवाजात जागेपणा होता. जणू तो आधीपासूनच फोनजवळ होता.

आरव म्हणाला, “मी आहे.”

क्षणभर शांतता. ओळख. गणित. भीती. त्या एका विरामात तिन्ही घडलं.

मग समीर म्हणाला, “हा नंबर कुठून मिळाला?”

आरवने उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, “उद्याच्या gate operations बद्दल बोलायचं आहे.”

दुसऱ्या बाजूला काही क्षण नि:शब्दता पसरली. त्या शांततेत नकार नव्हता. प्रतिक्रिया होती. म्हणजे शब्द बरोबर लागले होते.

मग समीर अतिशय मंद आवाजात म्हणाला, “तू कुठे आहेस?”

“घरी.”

“खिडक्यांपासून दूर हो.”

आरवचा श्वास अडखळला. तो नकळत बाजूला सरकला. मोठ्या काचेच्या खिडक्या अचानक view नसून vulnerability वाटू लागल्या.

“का?”

समीर लगेच म्हणाला,“तुझं नाव एका restricted query log मध्ये दिसलं आहे.”

आरव गोठला. साधारण धमकी देणारा “restricted query log” असं बोलत नाही. ही आतल्या प्रणालीची भाषा होती. म्हणजे समीरकडे ऍक्सेस आहे. किंवा ऍक्सेस असलेल्या कुणीतरी त्याला इशारा दिला आहे.

समीर पुढे म्हणाला, “फोनवर जास्त बोलू शकत नाही.” पार्श्वभूमीत हलका metallic आवाज आला. barrier? car door? industrial gate?
“ताबडतोब बाहेर पड.”
“मुख्य लिफ्ट वापरू नकोस.”
“Service exit वापर.”

आरव ताठ झाला. समीरला घराची रचना माहित होती. तो अनेकदा इथे आला होता. Kitchen passage, service corridor, utility stairs त्याने आधी पाहिलेलं. पण याचाच दुसरा अर्थही होता जर समीर compromised असेल, तर तो आरवला थेट सापळ्यात नेत होता.
आरवच्या मनात वडिलांची ओळ चमकली “ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवशील, त्याची पडताळणी आधी कर.”

समीर पुढे म्हणाला,“सात मिनिटांत भेट.”

“कुठे?”

“मरीन ड्राइव्ह मागच्या जुन्या पार्किंग लेन मध्ये.” क्षणभर थांबून तो दबक्या आवाजात म्हणाला, “मी जास्त बोलू शकत नाही, माझी लाईन मॉनिटर होतेय.”

कॉल कट झाला. आरव फोनकडे पाहत राहिला. आता प्रश्न समीरवर विश्वास ठेवायचा की नाही हा नव्हता. प्रश्न होता तो खोटं बोलत असेल तरी बाहेर पडणं जास्त सुरक्षित आहे का?

आरव काही क्षण स्थिर उभा राहिला.

फोन शांत झाला होता. घरात पुन्हा निःशब्दता पसरली होती. पण त्याच्या डोक्यात आवाजांची गर्दी होती. समीरचा इशारा, वडिलांचं पत्र, डॅनियलचा संदेश, स्वतःच्या शंकेचा आवाज. विश्वास ठेवायचा? की पळायचं? दोन्ही धोकादायक होतं.

जर समीर खरं बोलत असेल, तर घरात थांबणं मूर्खपणाचं होतं. जर समीर compromised असेल, तर बाहेर पडणं सापळ्यात चालणं होतं. म्हणजे निवड सुरक्षिततेत आणि धोक्यात नव्हती. निवड दोन धोक्यांमधली होती.

त्याने निर्णय घेतला.

विचार थांबवले. हालचाल सुरू केली.

तो परत टेबलाजवळ गेला. एकदा निर्णय घेतला की शरीर मनापेक्षा आधी काम करू लागतं. त्यने लॅपटॉपवर encrypted volume बंद केली. mounted container cleanly unmount झाला. स्क्रीनवर लहान कन्फर्मेशन दिसलं आणि archive पुन्हा अदृश्य झालं. आताच उघडलेलं सत्य काही सेकंदांत पुन्हा बंद झालं होतं.

सेशन ट्रेसेस कमी ठेवणं आवश्यक होतं. त्याने फॉरेन्सिक मोड सस्पेंड केला. मशीन पूर्ण बंद केलं नाही. shutdown logs, abrupt termination artifacts, write events अनावश्यक चिन्हं टाळणं अधिक योग्य होतं. स्क्रीन काळी झाली. फॅन मंदावला. खोलीत पुन्हा शांतता परतली.

त्याने पेनड्राईव्ह उचलली आणि खिशात टाकली. आता त्यांच्या दृष्टीने ती साधी storage नव्हती, ती वारसा होती. त्यात फाईल्सपेक्षा जास्त काही होतं. वडिलांनी जपून ठेवलेलं सत्य. नावं. patterns. unfinished warnings. ती हरवणं म्हणजे पुन्हा अंधारात जाणं होतं.

micro SD card घेतलं. इतकं छोटं माध्यम, पण कदाचित सर्वात मौल्यवान. एखादा पूर्ण operation map, access dumps, surveillance cache, किंवा मृत माणसाचा शेवटचा पुरावा त्या नखाएवढ्या तुकड्यात दडलेला असू शकत होता.

काळी चावी घेतली.धातूचा तो लहान तुकडा हातात जड वाटत होता. कारण वजन लोखंडाचं नव्हतं लॉकर 317 चं होतं. फोर्टमधल्या कुठल्यातरी बंद कप्प्यात अजून एक रहस्य त्याची वाट पाहत होतं.

त्याने बॅग उघडली. रोख पैसे टाकले कारण कार्ड्स ट्रेस होऊ शकतात. पाकीट घेतलं. ओळखपत्र ठेवलं. छोटा टॉर्च टाकला.
मुख्य फोन चार्जिंगला लावला. काळी स्क्रीन काही क्षणांनी उजळली. बॅटरीचे चिन्ह दिसलं. लोकेशन ऑनच ठेवली. नोटिफिकेशन स्क्रीनवर वर दिसतील अशी सेटिंग ठेवली. जणू तो अजून घरात आहे.

जर कुणी वरवरची तपासणी करत असेल, तर त्यांना घरात चार्जिंगवर ठेवलेला प्रेडिक्टेबल टार्गेट दिसेल. फोन हलत नाही, म्हणून माणूसही हलला नाही अशी सोपी चूक लोक करतात.

जुना कीपॅड फोन बंद करून सिम वेगळी खिशात ठेवली. Device आणि identity वेगळे. दोन्ही एकत्र ठेवायचे नाहीत हा नियम त्याने वर्षांपूर्वी एका थ्रिलर कथेत वाचलेला होता.

बॅग खांद्यावर टाकली. मग तो किचनमध्ये गेला. घरातली सर्वांत साधी जागा अनेकदा सर्वांत उपयोगी एक्झिट लपवते. त्याने Service door उघडलं. अरुंद जिना खाली जात होता.

काँक्रेटच्या पायऱ्या. लोखंडी रेलिंग. Emergency bulb चा फिकट पिवळा प्रकाश वरच्या कोपऱ्यात लटकत होता. तो स्थिर नव्हता; हलकासा थरथरत होता. जणू प्रत्येक क्षणी विझेल अशी शंका वाटावी असा. त्या मंद प्रकाशाने जिन्यात पूर्ण उजेड होत नव्हता फक्त अंधाराला आकार मिळत होता. सावल्या भिंतींवर ताणल्या जात होत्या, पायऱ्यांच्या कोपऱ्यांत काळेपणा साचला होता.

वरच्या पॉलिश्ड अपार्टमेंटच्या उलट, हा भाग इमारतीचा विसरलेला सांगाडा वाटत होता. वर सुगंधी हवा, नियंत्रित तापमान, smooth flooring, art pieces, muted lighting आणि आराम होता. इथे फक्त रचना होती; भिंती, जिना, पाइप्स, वायरिंग, भार सांभाळणारा कच्चा ढाचा. वरचं जग सजलेलं होतं; खालचं जग खरं होतं.

अंधार. तो फक्त प्रकाशाचा अभाव नव्हता. तो जागेच्या प्रत्येक कोपऱ्यात साठलेला होता. पायऱ्यांखालच्या रिकाम्या जागेत, वळणांआड, बंद दरवाज्यांच्या फटीत. जणू ही जागा दिवसाच्याही वेळी पूर्ण जागी होत नसेल.

ओलसर भिंती. सिमेंटवर ओलाचे गडद पट्टे उतरलेले होते. काही ठिकाणी रंग फुगून निघाला होता. हात फिरवला तर बोटांवर थंड ओल येईल असं वाटत होतं. भिंतींना जुन्या पावसांची, गळक्या पाइपांची आणि दुर्लक्षाची स्मृती चिकटलेली होती.

पाण्याचे जुने डाग, सिमेंटवर आलेल्या भेगा, बंद हवेचा वास. त्या भेगा काही सूक्ष्म होत्या, काही खोल. जणू इमारतीने वर्षानुवर्षं भार पेलताना शरीरावर रेषा कमावल्या होत्या. हवेत धूळ, ओल, लोखंड, आणि स्थिरतेचा एकत्रित वास होता.

खाली कुठेतरी पाण्याचा आवाज येत होता. टप... टप... मग हलकासा प्रवाह.कदाचित leaking pipe. कदाचित drain line. कदाचित जुन्या टाकीचा overflow. पण त्या आवाजाने जागा जिवंत वाटत होती. जणू अंधारात कुणीतरी श्वास घेत आहे.

त्याने मागे एकदा घराकडे पाहिलं. वरच्या दारातून अजूनही मंद उजेड बाहेर पडत होता. आत सुरक्षिततेचा भास होता; चार्जिंगला लावलेला फोन, नीट मांडलेलं फर्निचर, उघडलेला ट्रंक, आणि काही तासांपूर्वीपर्यंतचं त्याचं सामान्य आयुष्य पण आता प्रत्येक पायरीसोबत तो एका अशा जगात जात होता, जिथे वडील फक्त वडील नव्हते, मित्र फक्त मित्र नव्हते, आणि रात्र फक्त रात्र नव्हती.

त्याच वेळी, सिंगापूरमध्ये माया सेन केबिनमध्ये स्तब्ध बसली होती. काचेबाहेर उभ्या अनोळखी पुरुषाने कॉरिडॉरच्या टोकाला उमटलेल्या दोन नव्या सावल्यांकडे मान वळवली. म्हणजे तो एकटा नव्हता.

आणि युरोपमध्ये डॅनियल क्रॉस विमानतळाकडे निघाला होता.

शब्द सूची

  • Dead Drop - दोन व्यक्तींनी एकमेकांना प्रत्यक्ष न भेटता माहिती, वस्तू, कागदपत्रे किंवा संदेश गुप्तपणे ठराविक ठिकाणी ठेवून देवाणघेवाण करण्याची पद्धत.
  • Air-gapped Machine - अशी संगणक प्रणाली किंवा मशीन जी इंटरनेट, बाह्य नेटवर्क किंवा इतर संगणकांपासून पूर्णपणे वेगळी ठेवलेली असते, जेणेकरून बाहेरून थेट प्रवेश होऊ नये.
  • hash scan - प्रत्येक file ला एक डिजिटल fingerprint असतो (hash). तो तपासून file बदलली आहे का, मूळ आहे का, duplicate आहे का हे पाहणे म्हणजे Hash Scan.
  • Deadman Stash - एखाद्या व्यक्तीने अत्यंत महत्त्वाची, गुप्त किंवा धोकादायक माहिती, वस्तू, कागदपत्रे किंवा डिजिटल डेटा अशा ठिकाणी लपवून ठेवणे की, जर त्या व्यक्तीला काही अपघात, अटक, गायब होणे किंवा मृत्यू झाला, तर ती माहिती नंतर बाहेर येईल किंवा सुरक्षित हातात पोहोचेल.
  • Layered Decoy - शत्रू, प्रतिस्पर्धी किंवा निरीक्षकाला गोंधळवण्यासाठी एकाच वेळी अनेक स्तरांमध्ये बनावट संकेत, खोटी हालचाल किंवा दिशाभूल करणारी व्यवस्था उभी करणे. यात खरा उद्देश लपवला जातो आणि बाहेरून वेगवेगळ्या खोट्या गोष्टी दिसतील अशी रचना केली जाते.
  • metadata - मुख्य data वेगळा असतो, आणि त्या data विषयी माहिती वेगळी असते. त्या पूरक माहितीला Metadata म्हणतात. उदा. फोटो हा data आहे; फोटो कधी काढला, कुठे काढला, कोणत्या camera ने काढला हे metadata आहे.
  • abrupt termination artifacts - जेव्हा system नीट shutdown न होता अचानक थांबते, crash होते, disconnect होते किंवा force close होते, तेव्हा त्यामागे काही चिन्हे राहतात. त्या चिन्हांना Abrupt Termination Artifacts म्हणतात.

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम.
पण यात समीरचा उल्लेख अचानक आल्यासारखा वाटतोव. मधला एखादा परिच्छेद राहिला आहे का? Names list फाईलचा काही उल्लेख नाही

@punekarp, एवढ्या बारकाईने वाचताय त्याबद्दल तुमचं कौतुक आणि चूक दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद. समीरच्या संदर्भात परिच्छेद राहिला होता तो आता टाकला आहे. Names list फाइल्सचा उल्लेख पुढल्या काही भागांत होईल.

मला पण समीरचा जुना उल्लेख / रेफरेन्स वाचल्याचे आठवत नाही.
बाकी कथा एकदम हटके...
टेक्निकल टर्म्सचे डिटेल दिलेत हे उत्तम.