पूर्वभाग
एप्रिलच्या पहिल्या सोमवारी पहाटे मुंबईत ऊर्जा बाजारतज्ज्ञ आरव देशमुख जागतिक तेलबाजारातील विचित्र हालचाली पाहतो आणि तीन वेगवेगळ्या देशांत घडलेल्या लहान घटनांमागे एकच गूढ पॅटर्न असल्याचा संशय घेतो.
त्याच वेळी सिंगापूरमध्ये पत्रकार माया सेन हिला गुप्त ईमेलमधून “APRIL_KEY” नावाची फाइल मिळते; ती उघडल्यावर जगभर भीती निर्माण करून नफा कमावण्याच्या कटाची माहिती समोर येते.
त्या फाइलमध्ये “PHASE ONE ACTIVE” असा संदेश दिसताच तिला योजना सुरू झाल्याची खात्री पटते आणि ती तातडीने आरवला फोन करते.
दरम्यान युरोपच्या आल्प्समधील एकांत घरात राहणारा डॅनियल क्रॉस जुनी “EMBER PROTOCOL” फाइल उघडतो आणि हे सर्व त्याच जुन्या धोकादायक योजनेचे पुनरागमन असल्याचे ओळखतो.
भूतकाळातील गुपिते, बाजारातील भीती आणि नव्या पिढीसमोर उभा ठाकलेला जागतिक कट या तिन्ही धाग्यांना जोडणारा केंद्रबिंदू म्हणजे आरव ठरतो.
*****************************************************************************************************************
भाग २ : निळा ट्रंक
मुंबईत रात्रीचे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे झाली होती. शहर अजूनही पूर्ण झोपलं नव्हतं. रस्त्यांवर गाड्यांची ये-जा सुरू होती, उशिराच्या लोकल्स अजून धावत होत्या, समुद्रकिनाऱ्याजवळचे रस्ते दिव्यांच्या रेषांनी उजळले होते, आणि उंच इमारतींच्या खिडक्यांतून अजूनही असंख्य आयुष्यं जागी असल्याचे संकेत दिसत होते.
पण आरवच्या घरात वेळ जणू मंदावला होता. बाहेरचं शहर आपल्या लयीत धावत होतं, पण आतल्या हवेत एक वेगळीच स्थिरता पसरली होती. भिंतींवर पडणाऱ्या मंद प्रकाशछटा, बंद खिडक्यांमागचा दूरचा वाहतुकीचा आवाज, आणि हॉलमधल्या एसीचा एकसुरी गूं गूं आवाज या सगळ्यांनी घराला जणू एखाद्या प्रतीक्षागृहासारखं रूप दिलं होतं.
हॉलमधल्या मोठ्या स्क्रीनवर अजूनही बाजाराचे शेवटचे आकडे चमकत होते. दिवसभराचा व्यापार संपला होता, पण परिणाम अजून सुरू होते. सकाळपासून सुरू झालेली अस्थिरता रात्रीपर्यंत ओसरली नव्हती आणि सोशल sentiment feeds वर भीतीचा सूर वाढत होता.
स्क्रीनच्या कोपऱ्यातून सतत अपडेट्स सरकत होत्या supply concern, shipping delays, regional exposure, risk-off sentiment. शब्द वेगवेगळे होतेण; पण अर्थ एकच होता, कोणीतरी खेळ सुरू केला होता, आणि बाकीचं जग त्यावर प्रतिक्रिया देत होतं.
आरव खिडकीपाशी उभा राहून समुद्राकडे पाहत होता. काळोखात समुद्र पूर्ण दिसत नव्हता, पण दूरवर काही जहाजांचे दिवे हलताना दिसत होते. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा मंद आवाज काचांमधून आत झिरपत होता. शहराच्या दिव्यांखाली पाणी काळ्या धातूसारखं चमकत होतं.
दिवसभरात आलेल्या दोन अज्ञात कॉल्सपैकी पहिल्या कॉलवरील स्त्रीचा आवाज अजूनही कानात घुमत होता. शांत, तातडीचा, आणि सरळ मुद्द्यावर येणारा.
हे नेहमीचं शेअर मार्केट नाही. या वाक्यात इशारा होता.
दुसरा कॉल त्याने उचलला नव्हता. फोन वाजत राहिला, स्क्रीनवर अनोळखी नंबर चमकत राहिला, आणि त्याने तो जाऊ दिला. त्या क्षणी त्याला वाटलं होतं उद्या बघू. पण आता त्याला वाटत होतं कि तो कॉल उचलायला हवा होता.
त्या दोन्ही कॉल्सनंतर त्याच्या मनात एक विसरलेला विचार पुन्हा जिवंत झाला होता. अनेक वर्षं जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेला.
वडील. दुष्यन्त देशमुख.
त्यांच्या मृत्यूनंतर घरात आणलेलं सामान. जुनी पुस्तके, काही कपडे, फाईल्स, फोटो फ्रेम्स आणि काही वस्तू ज्यांना कुणी हात लावला नव्हता. त्यात एक वस्तू विशेष होती.
स्टोअररूममध्ये वर्षानुवर्षे पडलेला निळा ट्रंक.
जाड धातूचा. कोपऱ्यांवर ओरखडे. जुना लॉक. तो ट्रंक घरात आला, एका कोपऱ्यात ठेवला गेला, आणि मग जणू अस्तित्वातूनच गेला. कुणी उघडला नाही. कुणी विचारलं नाही. आरवनेही नाही.
आरवने टेबलावर ठेवलेला फोन हळूच खाली ठेवला. स्क्रीन अजून उजळत होती. मिस्ड कॉल्स, बाजार अपडेट्स, न्यूज अलर्ट्स सगळं तिथे होतं. पण आता त्याचं लक्ष दुसरीकडे वळलं होतं.
त्याने एक दीर्घ श्वास घेतला. मग वळून मागच्या कॉरिडॉरकडे चालू लागला.
स्टोअररूमचा दरवाजा उघडताच बंद हवेतला धूळकट वास त्याच्या चेहऱ्यावर आदळला जणू अनेक वर्षं बंदिस्त ठेवलेली हवा एकदम बाहेर पडली होती.
कागदांचा शिळा गंध हवेत तरंगत होता. जुने वर्तमानपत्रांचे गठ्ठे, फाईल्स, विस्मृतीत गेलेली पत्रं; लोखंडावर साचलेल्या गंजाचा कोरडा, धातूसारखा वास त्या सगळ्यांत मिसळला होता. अनेक वर्षे न हलवलेल्या वस्तूंची एक विशिष्ट शांतता तिथे साचली होती जणू काळ इथे येऊन थांबला होता, आणि बाहेरचं जग पुढे निघून गेलं होतं.
जुन्या सुटकेसेस एका भिंतीला टेकलेल्या होत्या. तुटलेला टेबल फॅन उलटा पडला होता. दिवाळीच्या सजावटीचे बॉक्स रचलेले होते. काही पुस्तकांचे गठ्ठे प्लास्टिकमध्ये बांधलेले होते. कव्हर दिसत नव्हतं, पण आकारावरून ती कायद्याची पुस्तकं, अकाउंट्सच्या फाईल्स, किंवा कदाचित वैयक्तिक डायऱ्या असू शकत होत्या.
एका कोपऱ्यात लोखंडी ट्रंक्सची रांग होती. काही करडे, काही तपकिरी, काहींचे लॉक तुटलेले, काहींच्या वर इतर वस्तू रचलेल्या. त्या सर्व ट्रंक्स एकसारख्या दिसत होत्या.
आरवने मोबाईलची फ्लॅशलाइट सुरू केली.
अंधाराला एक पांढरा शंकूसारखा उजेड चिरत पुढे गेला. हवेत तरंगणारे धुळीचे कण अचानक चमकू लागले. ते जणू लहान काजव्यांसारखे उजेडात नाचत होते. प्रत्येक हालचालीसोबत सावल्या भिंतींवर सरकत होत्या.
क्षणभर त्याची नजर इकडे-तिकडे फिरली. एका बॉक्सवर थांबली. मग एका फॅनवर. मग ट्रंक्सच्या रांगेवर.
आणि मग उजव्या कोपऱ्यात तो दिसला.
निळा ट्रंक. रंग उडालेला. वर्षानुवर्षांच्या वापराने आणि वेळेने त्याची चमक हिसकावून घेतली होती. काही ठिकाणी मूळ निळा रंग दिसत होता, बाकी ठिकाणी धातू बाहेर आला होता.
कडा गंजलेल्या. कोपऱ्यांवर तपकिरी थर चढलेला. लॉकभोवती बारीक गंजाची रेषा. हाताळण्याच्या जागी डाग.
झाकणावर पांढऱ्या रंगाने लिहिलेली अक्षरं जवळजवळ पुसली गेली होती. पण अजूनही ओळखू येत होती.
D.D.
Dushyant Deshmukh.
आरव काही क्षण नुसता उभा राहिला. फ्लॅशलाइटचा उजेड त्या ट्रंकवर स्थिर राहिला. बाकी खोली पुन्हा अंधारात गेली. जणू त्या क्षणी जगात फक्त तो ट्रंक आणि तोच उरले होते.
छातीत धडधड वाढली. कारण त्याच्या समोर फक्त जुनी पेटी नव्हती. ती एका माणसाची उरलेली सावली होती.
वडील गेले तेव्हा तो फक्त एकोणीस वर्षांचा होता. वयाने मोठा झाल्यासारखा दिसत असला, तरी आतून अजूनही आयुष्य समजून घेण्याच्या टप्प्यावरच होता. कॉलेज, मित्र, भविष्यातल्या अस्पष्ट योजना, घरात वडील आहेत ही मनाला स्थैर्य देणारी खात्री इतकंच त्याचं जग होतं. मृत्यू हा इतर लोकांच्या आयुष्यात घडणारा प्रकार वाटत होता. स्वतःच्या दारात तो इतक्या अचानक उभा राहील, याची त्याला कल्पनाही नव्हती.
त्या दिवशी फोन वाजला होता. साधा, नेहमीसारखा. पण तो उचलताच आयुष्य दोन भागांत विभागलं गेलं. फोनच्या आधीचं आणि फोननंतरचं. दुसऱ्या टोकाला पोलिसांचा आवाज होता. अधिकृत, मोजून बोलणारा, भावना लपवलेला. काही प्रश्न विचारले गेले. नावाची खात्री केली गेली. आणि मग त्याला ताबडतोब येण्यास सांगितलं गेलं.
पुढची आठवण तुटक होती. रस्ता. वेगाने धावणारी गाडी. मनात नाकारण्याचा प्रयत्न. कदाचित काहीतरी गैरसमज असेल. कदाचित जखमी असतील. कदाचित ठीक असतील.
मग हॉस्पिटलचा कॉरिडॉर. पांढऱ्या ट्यूबलाइट्सचा कठोर प्रकाश. निर्जंतुकीकरणाच्या औषधांचा वास. दूरवर स्ट्रेचरच्या चाकांचा आवाज. भिंतीलगत बसलेली अनोळखी माणसं. कुणाचं रडणं. कुणाची शांत प्रतीक्षा. त्या सगळ्या गर्दीत तो स्वतःला परका वाटत उभा होता.
नातेवाईकांचे गंभीर चेहरे त्याला आधी दिसले. कुणी नजरेला नजर देत नव्हतं. कुणी खांद्यावर हात ठेवत होतं. कुणी काही बोलण्याआधीच त्याला सगळं समजलं होतं. कारण काही सत्य शब्दांच्या आधी चेहऱ्यांवर दिसतं.
“अपघात झाला...” हे दोन शब्द.
इतके छोटे. इतके सोपे. पण त्या दोन शब्दांनी त्याच्या आयुष्याचा पाया हलवला होता.
मग अंत्यसंस्कार. धूर. मंत्र. जळत्या लाकडाचा वास. लोकांच्या ओठांवर सहानुभूतीचे तेच वाक्य. “धीर धर.” “वेळ सर्व भरून काढते.” “देवाची इच्छा.” अशा शब्दांनी आयुष्यात अचानक निर्माण झालेली पोकळी भरून निघत नाही, हे त्याला तेव्हाच कळलं होतं.
मग विमा कागदपत्रं आली. सही करायची ठिकाणं. पॉलिसी नंबर. दावे. रकमांचे आकडे. मृत्यूचा आर्थिक अर्थ.
मग मालमत्तेचे दस्तऐवज. घर, खाते, नावे, वारस, कायदेशीर प्रक्रिया. एखादा माणूस नाहीसा झाला की त्याच्या मागे कागदांची एक दुनिया उभी राहते. जिथे भावना नसतात, फक्त स्वाक्षऱ्या असतात.
मग सांत्वन करणारी माणसं. पहिल्या काही दिवसांत घर भरलेलं होतं. चहा पिणारे नातेवाईक. मंद आवाजात बोलणारे लोक. आठवणी सांगणारे मित्र. कोपऱ्यात रडणाऱ्या महिला. कुणी मदतीची ऑफर देत होतं, कुणी सल्ला देत होतं, कुणी शांत बसून फक्त उपस्थित राहत होतं.
त्या गोंधळात हे सगळं सामान घरात आलं. ऑफिसमधून आणलेल्या पेट्या. कपडे. फाईल्स. बॅग्स. काही बंद पाकिटं. प्रवासाच्या वस्तू आणि तो निळा ट्रंक.
सगळं घरात ठेवलं गेलं. “नंतर बघू” म्हणून. आणि नंतर तसंच राहिलं.
सुरुवातीच्या दिवसांत काही वस्तू वरवर तपासल्या गेल्या होत्या. आवश्यक कागदपत्रं शोधली गेली. बँकेचे पेपर्स, विमा, ओळखपत्रं, काही फोटो, काही पावत्या. जे तातडीचं होतं ते बाहेर काढलं गेलं.
पण खोलवर कोणी हात घातला नव्हता.
आरव ट्रंकसमोर बसला. जमिनीवर गुडघे टेकवत तो काही क्षण नुसता त्या जुन्या पेटीकडे पाहत राहिला. मोबाईलच्या फ्लॅशलाइटचा उजेड ट्रंकच्या खरचटलेल्या पृष्ठभागावर पडत होता. सावल्या हलत होत्या, आणि त्या हलत्या उजेडात ट्रंक जणू एखाद्या शांत प्राण्यासारखा वाटत होता…वर्षानुवर्षं काहीतरी आपल्या आत दडवून बसलेला.
त्याने झाकणाला हात लावला.
कुलूप नव्हतं. फक्त जुनी अडकलेली कडी. बाहेरून साधी, पण हट्टी. बराच काळ न हलवल्याने घट्ट बसलेली.
त्याने हलका जोर लावला. ती हलली नाही.
आरवने जबडा घट्ट केला. दुसऱ्यांदा त्याने दोन्ही हातांनी पकडून दाब दिला. लोखंडात ताण भरल्यासारखा आवाज झाला. एक क्षण काहीच घडलं नाही. मग चर्रकन् कडी सुटली.
तो आवाज लहान होता, पण त्या शांत स्टोअररूममध्ये तो अनपेक्षितपणे मोठा वाटला. जणू एखादं जुनं दार आतून उघडलं गेलं होतं.
त्याने सावधपणे झाकण वर उचललं.
जुन्या कपड्यांचा, कागदांचा, आणि बंदिस्त वर्षांचा वास एकदम बाहेर आला. आरवने एकेक वस्तू बाजूला काढायला सुरुवात केली. हालचाली हळू होत्या. घाई नव्हती, पण आतुरता होती.
खाली काही फाइल्स होत्या. किनारी झिजलेल्या. काही वर्तमानपत्रांचे गठ्ठे दोरीने बांधलेले होते. एका बाजूला मोडका फिल्म कॅमेरा पडला होता; जुन्या काळातील, वजनदार, आता निष्प्राण. त्याच्या शेजारी जुना लेदर बेल्ट, ज्यावर चामड्याच्या भेगा स्पष्ट दिसत होत्या. काही पावत्या, प्रवासाच्या चिठ्ठ्या, किरकोळ बिलं, आणि विसरलेल्या दिवसांचे छोटे पुरावे तिथे विखुरलेले होते.
सगळ्या वस्तू बाहेर काढल्यानंतर तळाशी हात फिरवताच त्याला धातूची एक पातळ पट्टी सैल वाटली. त्याने ती वर उचलली. खाली दोन जाड पिवळसर लिफाफे नीट ठेवलेले होते. धूळही कमी. म्हणजे ते मुद्दाम जपून लपवले गेले होते. कुणाच्या हाताला सहज लागू नयेत म्हणून.
तो थांबला. फ्लॅशलाइटचा उजेड स्थिर झाला. छातीत धडधड पुन्हा वाढली.
पहिल्या लिफाफ्यावर हस्ताक्षरात लिहिलं होतं.
आरवसाठी. जोपर्यंत गरज भासत नाही, तोपर्यंत उघडू नये.
त्याचा हात थरथरला.
ते वडिलांचंच हस्ताक्षर होतं. अक्षरांची ती ओळख त्याने बालपणी वहीत पाहिली होती, वाढदिवसाच्या कार्डांवर पाहिली होती, घरच्या नोट्सवर पाहिली होती.
क्षणभर त्याला स्टोअररूम दिसेनाशी झाली. फक्त ते शब्द दिसत राहिले. गरज भासत नाही. म्हणजे वडिलांना ठाऊक होतं की असा दिवस येऊ शकतो.
दुसरा लिफाफा अधिक जाड होता. आत कागद नव्हते कदाचित फोटो, डिस्क किंवा आणखी कसले पुरावे असतील. त्यावर नाव नव्हतं. फक्त दोन अक्षरं.
B.E.
आरव काही क्षण नुसता त्या अक्षरांकडे पाहत राहिला.
त्याने पहिला लिफाफा उघडला.
कागदाचा जुना गंध हवेत पसरला. लिफाफ्याच्या कडा काळजीपूर्वक उघडल्या गेल्या होत्या, जणू आतलं काहीही फाटू नये म्हणून त्याने नकळत हात हलके ठेवले होते. आत एकच पत्र होतं. दुमडलेलं. पिवळसर झालेलं. आरवने ते अलगद बाहेर काढलं.
कागद उघडताना त्याच्या बोटांना किंचित कंप जाणवत होता. अक्षरं दिसताच त्याच्या छातीत काहीतरी हललं. तेच परिचित हस्ताक्षर. रेखीव. प्रत्येक अक्षर जणू विचार करून लिहिलेलं.
तो जमिनीवरच बसला. मोबाईलची फ्लॅशलाइट एका बॉक्सवर टेकवून पत्रावर वळवली. उजेड स्थिर झाला. स्टोअररूमचा अंधार मागे सरकला. आता फक्त तो, ते पत्र, आणि अनेक वर्षांनंतर पुन्हा बोलणारे वडील उरले होते.
त्याने वाचायला सुरुवात केली.
आरव,
पहिल्याच शब्दाने त्याचा घसा कोरडा पडला. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्याला त्या आवाजात हाक मारत होतं.
जर तू हे पत्र वाचत असशील, तर दोनपैकी एक गोष्ट घडली आहे.
आरवचे डोळे ओळीवर स्थिरावले.
एकतर मी जिवंत नाही.
किंवा त्यांनी पुन्हा सुरुवात केली आहे.
त्याच्या पाठीवरून थंड शिरशिरी गेली. त्यांनी म्हणजे कोणी?
त्याने पुढची ओळ वाचली.
तुला माझ्याबद्दल अनेक गोष्टी माहित नाहीत. मला त्ते जाणूनबुजून लपवावं लागलं कारण मला तुला सुरक्षित ठेवायचं होतं.
आरवने नकळत डोळे मिटले. बालपणातील आठवणी क्षणभर चमकून गेल्या. शांत, मितभाषी वडील. उशिरा घरी येणारे. काही प्रश्न टाळणारे. प्रवासाबद्दल अस्पष्ट उत्तरं देणारे. त्यावेळी ते अंतर वाटायचं. माझ्या सुरक्षेसाठी होतं का?
मी बँकर नव्हतो. मी सल्लागारही नव्हतो.
तो श्वास रोखून पुढे झुकला.
मी अशा लोकांसाठी काम केलं, ज्यांना लोकांना अप्रत्यक्ष भीती दाखवून नफा कमावता येत होता.
आरवच्या हाताची पकड कागदावर घट्ट झाली. शब्द समजत होते, पण त्यांचा अर्थ अजून खोलवर उतरत होता.
त्यांचं नाव अधिकृतपणे कुठेच नाही.
आतील नाव Black Ember
त्याला आठवलं आज दिवसभर स्क्रीनवर जळणाऱ्या टाक्या, तेलाचे दर, भीती, आणि अनोळखी कॉल्स.
त्याने पुढे वाचलं.
त्यांची पद्धत साधी होती. घटना निर्माण करू नका. घटनांचा आभास निर्माण करा. बाजार स्वतः उरलेलं काम करतो.
मी उशिरा समजलो की मी नोकरी करत नव्हतो. मी गुन्हा करत होतो.
ही ओळ वाचताना त्याच्या छातीत कळ उठली. त्याच्या वडिलांनी हे एकट्यानं किती काळ पेललं असेल?
मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला जाऊ दिलं नाही.
आरवचे डोळे पत्रावरून वर गेले. अंधाऱ्या स्टोअररूमकडे तो काही क्षण पाहत राहिला. अपघात झाला... हे दोन शब्द अचानक वेगळे वाटू लागले.
त्याने पुन्हा वाचायला सुरुवात केली.
जर त्यांनी पुन्हा सुरुवात केली असेल, तर दुसरा लिफाफा उघड.
त्याची नजर बाजूला ठेवलेल्या जाड लिफाफ्याकडे गेली. B.E.
पण लक्षात ठेव कुणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस. विशेषतः जे स्वतःला मदतनीस म्हणवतील त्यांच्यावर. पहिल्यांदा जिवंत राहा. मग लढ.
त्याला आजचे दोन्ही कॉल्स आठवले. एक स्त्री. एक मिस्ड कॉल.
पत्रातील पुढची ओळ वाचताना त्याचा श्वास पुन्हा अडकला.
आणि जर डॅनियल क्रॉस अजून जिवंत असेल तर त्याला शोध. तो पापी आहे.
पण उपयोगी पडणारा पापी.
आरवच्या मनात अनोळखी नाव घुमलं डॅनियल क्रॉस. कोण? मित्र? शत्रू? साक्षीदार?
-- बाबा
आरवच्या डोळ्यांत पाणी दाटलं. सुरुवातीला फक्त ओलावा. मग धूसर होत जाणारी अक्षरं. मग पापण्यांच्या कडांवर साचलेले थेंब. त्याने ते पुसायचा प्रयत्नही केला नाही.
राग, धक्का आणि शून्यता तिन्ही एकत्र उभे राहिले.
राग कारण त्याच्यापासून इतकं मोठं सत्य लपवलं गेलं होतं. त्याच्या आयुष्याचा पाया खोट्या गोष्टींवर उभा ठेवला गेला होता. वडील कोण होते, काय करत होते, कशात अडकले होते यापैकी काहीच त्याला माहित नव्हतं. त्याला वाचवण्यासाठी असेल, पण तरीही त्याला अंधारात ठेवलं गेलं होतं.
धक्का कारण मृत माणूस अचानक नव्याने जिवंत झाला होता. आठवणींमध्ये असलेले शांत, कमी बोलणारे वडील आता वेगळ्या रूपात समोर उभे होते. ते फक्त वडील नव्हते. ते एका गुप्त खेळाचा भाग होते. एका संघटनेचे साक्षीदार. कदाचित गुन्हेगार. कदाचित पश्चात्ताप करणारे. कदाचित दोन्ही.
आणि शून्यता कारण आता नेमकं काय वाटावं हेच समजत नव्हतं. दुःख करावं की प्रश्न विचारावेत? त्यांना माफ करावं की दोष द्यावा? त्यांची आठवण धरून ठेवावी की नव्याने तपासावी? आतापर्यंत जपलेली प्रत्येक आठवण अचानक संशयास्पद वाटू लागली होती.
त्याने पत्राकडे पुन्हा पाहिलं. शेवटची सही तिथेच होती -- बाबा.
इतकं साधं. इतकं ओळखीचं. आणि आता तितकंच अपरिचित.
आरवने खोल श्वास घ्यायचा प्रयत्न केला, पण छाती जड झाली होती. डोळ्यांतलं पाणी अखेर गालावरून ओघळलं.
त्याने दुसरा लिफाफा उघडला.
पहिल्यापेक्षा तो जड होता, आणि कागदापेक्षा अधिक काहीतरी आत असल्याची जाणीव हातातच होत होती. कडा काळजीपूर्वक सीलबंद केल्या गेल्या होत्या.
आरवने तो अलगद फाडला. आतून प्लास्टिकचा हलका खरखरीत आवाज आला.
आत sealed anti-static pouch होती. गुळगुळीत, इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वापरतात तशी. त्यावर कोणतंही नाव नव्हतं. कोणतीही खूण नव्हती. फक्त काळजीपूर्वक बंद केलेली.
त्याने ती उघडली. आत एक काळी चावी होती. साधी दिसणारी, तिच्या धातूवर कोणतंही ब्रँडिंग नव्हतं. डोक्याजवळ छोटा क्रमांक कोरलेला होता. ती एखाद्या जुन्या लॉकरची, बँक डिपॉझिट बॉक्सची, किंवा खासगी सुरक्षित कप्प्याची वाटत होती.
तिच्या शेजारी एक micro SD card होतं. इतकं छोटं, पण त्यात किती माहिती मावू शकते याची कल्पना त्याला होती.
त्याखाली लाल शाईत लिहिलेली एक नोट होती. हस्ताक्षर घाईतलं, पण ओळखीचं.
Heritage safety lockers, Locker 317 – Forbes Street, Fort.
आरवच्या डोळ्यांत चमक उठली. फोर्ट म्हणजे दक्षिण मुंबईचा जुना व्यापारी भाग. जुन्या इमारती, बँका, वकीलांची कार्यालयं, ट्रस्ट बिल्डिंग्ज, लपलेल्या तिजोर्या, आणि अनेक दशकांची गुपितं जपणाऱ्या भिंती.
त्याच्या छातीत धडधड पुन्हा वाढली.
हे सगळं वर्षानुवर्षांपूर्वी ठेवलेलं होतं. म्हणजे वडिलांना ठाऊक होतं कधीतरी हा क्षण येईल. कधीतरी कुणीतरी पुन्हा हालचाल करेल.
तेवढ्यात हॉलमधला फोन जोरात वाजला. आरव दचकला. त्याने डोकं वर केलं.
फोन पुन्हा वाजला.
तोच masked international नंबर. स्क्रीन न दिसताही त्याला जाणवलं... तोच. आज दिवसभर पाठलाग करणारा. एक मिस्ड कॉल. मग पुन्हा. आता पुन्हा.
आरव काही क्षण स्थिर बसला. हातात चावी. बाजूला micro SD card. समोर उघडलेला ट्रंक.
रिंग थांबली. स्टोअररूममध्ये पुन्हा शांतता परतली. मग पुन्हा सुरू झाली. दुसरी रिंग. अधिक तीव्र. अधिक हट्टी.
त्याच्या पाठीवर थंड शिरशिरी गेली.
ती थांबली. आणि तिसऱ्यांदा फोन वाजला.
आरव झटकन उठला. गुडघ्याला ट्रंक लागला, पण तो थांबला नाही. चावी आणि कार्ड त्याने मुठीत घट्ट पकडलं. स्टोअररूमचं दार ढकलून तो बाहेर धावला.
*****************************************************************************************************************
त्याच वेळी, सिंगापूरमध्ये रात्रीचे दोन वाजून एकोणीस मिनिटे झाली होती. शहर अजून जागं होतं, पण आता त्याचा आवाज मंदावला होता. दिवसभराच्या धावपळीने थकलेलं, तरी अजूनही झोपायला तयार नसलेलं.
डाउनटाउनमधील बहुतेक कार्यालयांचे दिवे बंद झाले होते. उंच काचेच्या इमारती काळ्या आरशांसारख्या उभ्या होत्या. त्यांच्या भिंतींवर पावसाच्या हलक्या रेघा चमकत होत्या. पाण्याचे थेंब निऑन उजेड पकडत खाली सरकत होते. खाली रस्त्यावर क्वचित एखादी टॅक्सी शांतपणे सरकत होती. दूरवरच्या सिग्नल्सचे रंग रिकाम्या चौकांवर बदलत होते. शहराचा वेग कमी झाला होता, पण थांबला नव्हता.
Strait Ledger Media Networkच्या अठराव्या मजल्यावर मात्र अजून प्रकाश होता. संपूर्ण इमारतीत मोजक्या खिडक्यांत उजेड दिसत होता, आणि त्यापैकी एक उजेड मायाच्या विभागातून बाहेर पडत होता.
Maya Sen अजूनही ऑफिसमध्ये होती. दिवसभराच्या ताणानंतरही तिच्या डोळ्यांत झोप नव्हती. सकाळी attachment उघडताच तिला काही प्राथमिक headings दिसल्या होत्या Insurance, Ports, Media. एवढंच पाहून तिने तातडीचा इशारा दिला होता. तिच्या पत्रकार वृत्तीला इतकंच पुरेसं होतं काहीतरी मोठं, समन्वित, आणि धोकादायक सुरू आहे.
पण आता, संपूर्ण मजला रिकामा झाल्यावर, एसीच्या सततच्या मंद आवाजाशिवाय बाकी सर्व शांत झाल्यावर, ती त्या archive मध्ये पहिल्यांदाच खोलवर उतरली होती. दिवसभर तिने फक्त वरचा थर पाहिला होता. आता ती मुळापर्यंत जात होती.
तिने मुख्य नेटवर्क बंद केलं होतं. सर्व्हर लिंक डिस्कनेक्ट केलेली. ऑफिसचे कम्युनिकेशन चॅनेल्स बंद ठेवलेले. फोन एअरप्लेन मोडवर होता. कोणताही कॉल नाही. कोणतीही ट्रेसिंगची संधी नाही.
समोर एक ऑफलाइन मशीन चालू होतं. जुनं, आवाज न करणारे, नेटवर्क कार्ड काढलेलं.
encrypted drive clone होत होती. प्रोग्रेस बार हळूहळू पुढे सरकत होता. प्रत्येक टक्क्याबरोबर तिच्या मनातला ताण वाढत होता.
स्क्रीनवर फोल्डर्स उघडे होते.
Insurance Pre-Positions
Shell Accounts
Port Delay Templates
Media Sentiment Notes
हे पुरावे नव्हते. ही योजना होती.
घटना घडल्यानंतर जमा केलेले दस्तऐवज नव्हते; घटना घडण्याआधी तयार केलेले नकाशे होते. कोणती घटना घडल्यावर कोणता विमा सक्रिय होईल, पैसा कुठून कुठे जाईल, बंदरांमध्ये विलंब कसा निर्माण करायचा, लोकमत कोणत्या दिशेने ढकलायचं हे सगळं आधीच लिहिलेलं होतं.
म्हणजे संकट घडत नव्हतं. संकट व्यवस्थापित केलं जात होतं.
तिने पुढची फाइल उघडली.
BLACK EMBER
तिचा श्वास क्षणभर अडकला.
खाली उपशीर्षक होतं
Behavioral Energy Realignment
शब्द कॉर्पोरेट वाटत होते. सभ्य. धोरणात्मक. पण त्या सभ्य शब्दांच्या आड काहीतरी लपलेलं होतं.
तिने पुढची स्लाईड उघडली.
Supply need not fall. Only confidence must fall.
माया खुर्चीत मागे टेकली.
त्या एका वाक्याने तिला सगळ्याचा अर्थ जुळून आला. दिवसभराच्या बातम्या, जहाजांचे विलंब, आगीचे व्हिडिओ, विमा निर्देशांक, सोशल मीडियावर पसरलेली भीती, तज्ञांच्या चर्चा आणि बाजारातील धक्का.
तेल कमी पडण्याची गरज नव्हती, लोकांना तसं वाटणं पुरेसं होतं. जर लोक घाबरले, तर कंपन्या साठा वाढवतील. कंपन्यानी साठा वाढवला, तर दर वाढतील. जर दर वाढले, तर बाजार हादरेल. आणि जर बाजार हादरला, तर कुणीतरी आधीच बक्कळ नफा कमावलेला असेल.
मायाने स्क्रीनकडे पुन्हा पाहिलं. तिला आता समजलं होतं ही कथा ऊर्जा क्षेत्राची नव्हती. ही कथा मानवी मनाची होती. आणि कुणीतरी जगाच्या भीतीत गुंतवणूक करत होतं.
तेवढ्यात कॉरिडॉरमध्ये पावलांचा मंद आवाज आला. दोन पावल्यानंतर आवाज थांबला, पुन्हा पावलांचा आवाज.
रात्रीच्या त्या जवळजवळ रिकाम्या मजल्यावर प्रत्येक पाऊल अनैसर्गिकपणे स्पष्ट ऐकू येत होतं. दिवसभर गजबजलेल्या जागेत असे आवाज मिसळून गेले असते. पण आता शांततेने त्यांना अधिक धार दिली होती. जणू कोणीतरी मुद्दाम हळू चालत होतं. ठरवून.
माया सेन ताठ बसली. खुर्चीच्या पाठीला टेकलेलं शरीर एका क्षणात सावध झालं. श्वास हलका झाला. कान अधिक जागे झाले. मेलमधलं वाक्य तिच्या डोक्यात पुन्हा घुमलं.
Trust no one in your building.
तिने लगेच स्क्रीन brightness कमी केली. उजेड मंद झाला. खोलीतील प्रकाश कमी होताच काचेत तिचं प्रतिबिंब अस्पष्ट झालं. लॅपटॉप अर्धवट बंद केलं, जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्याला आत काय सुरू आहे हे दिसू नये.
मग तिने ड्रॉवर उघडला. आत स्टेशनरी, नोटपॅड्स, काही केबल्स, आणि एक छोटा paper-cutter होता. तिने तो हातात घेतला.
कॉरिडॉरमधील sensor light लागली. दरवाज्याच्या खालच्या फटीतून प्रकाशाची रेघ आत आली. मग काचेवर एक सावली थांबली.
उंच व्यक्ती. एकटी.
दरवाज्यावर तीन वेळा टकटक करण्यात आलं. बाहेरून शांत पुरुषी आवाज आला. “मिस सेन... जर तुम्ही फाइल उघडली असेल, तर तुमच्याकडे फार वेळ नाही.”
मायाच्या बोटांनी paper-cutter घट्ट पकडलं. हाताला घाम आला होता. घशात कोरडेपणा जाणवत होता. तिने उत्तर दिलं नाही.
आवाज पुन्हा आला. यावेळी तितकाच शांत. “मी आत येऊन तुम्हाला काही सांगितले, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.”
क्षणभर शांतता पसरली. कॉरिडॉरमधला प्रकाश स्थिर राहिला. सावली हलली नाही. मायाचं हृदय जोरात धडधडत होतं. प्रश्न डोक्यात वेगाने धावत होते, तो कोण? पाठवलेला माणूस? मदतनीस? धमकी? सापळा?
“पण मी आता निघून गेलो, तर तुम्ही सकाळपर्यंत जिवंत राहणार नाही.”
माया काही क्षण न हलता बसली. दरवाज्याच्या काचेवरची सावली अजूनही तिथेच होती.
*****************************************************************************************************************
युरोपमध्ये संध्याकाळचे आठ वाजून एकोणीस मिनिटे झाली होती. दिवस मावळून गेला होता, पण पर्वतांच्या माथ्यांवर अजूनही शेवटचा करडा प्रकाश रेंगाळत होता. दऱ्यांमध्ये सावल्या दाटल्या होत्या, आणि थंड हवा लाकडी भिंतींवर सतत हलका दाब देत होती.
आल्प्समधील त्या एकाकी लाकडी घरात डॅनियल विचार करत बसला होता. खोलीत उब होती, पण वातावरणात बेचैनी होती. अनेक वर्षं गुपितं जपलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर आज पुन्हा जुनं तणावाचं सावट उतरलं होतं.
टेबलावर नकाशे पसरले होते. काही कागदी, काही प्रिंटआउट्स, काहींवर हाताने केलेल्या नोंदी. समुद्री मार्ग, रेल्वे क्रॉसिंग्स, ट्रक कॉरिडॉर्स, कंटेनर प्रवाह, विमा झोन, खासगी गोदामं सगळं एका मोठ्या चित्रात जोडलेलं.
भारतातील चार बंदरांभोवती लाल गोल काढलेले होते. देशातील महत्त्वाचे कंटेनर चेक पॉइंट्स.
Mumbai
Kandla Port
Mundra Port
Jawaharlal Nehru Port
डॅनियलची नजर एका बंदरावरून दुसऱ्यावर फिरत होती. तो फक्त ठिकाणं पाहत नव्हता. तो वेळ पाहत होता. किती तासांचा उशीर. किती कंटेनर अडकतील. किती विमा दावे वाढतील. किती बातम्या बनतील.
तो पुटपुटला, “त्यांना फक्त उशीर करायचा आहे. स्फोट नाही.”
त्याच्या आवाजात खात्री होती. कारण त्याने हे आधी पाहिलं होतं. जुने डाव नवे चेहरे घेऊन परत खेळले जातात.
त्याने बाजूला ठेवलेली जुनी फाइल उघडली. कडा झिजलेल्या, कागद पिवळसर झालेले. काही नियम कधीच कालबाह्य होत नाहीत.
वर लिहिलं होतं,
Operational Rule 7:
Visible destruction invites law. Invisible delay invites profit.
डॅनियलच्या ओठांवर कडवट हास्य उमटलं. होय. आग लावली तर सरकारं जागी होतात. पण फक्त माल अडकला, कागद थांबले, सिस्टम मंदावली तर लोक कारण शोधत बसतात, आणि तोपर्यंत कुणीतरी पैसे कमावून निघून गेलेला असतो.
त्याने फोन हातात घेतला. जुना, सुरक्षित, मर्यादित संपर्कांसाठी ठेवलेला फोन. स्क्रीनवर एक नाव चमकत होतं.
Aarav Deshmukh
काही क्षण तो स्क्रीनकडे पाहत राहिला. जणू त्या नावामागे दुसरं नाव त्याला दिसत होतं - Dushyant Deshmukh.
मग त्याने संदेश टाईप केला.
तुझ्या वडिलांनी मला एकदा वाचवलं होतं. आता माझी पाळी आहे. Port tomorrow. Trust no police.
तो थांबला. अंगठा send वर स्थिर राहिला. त्याने काही क्षण विचार केला. मग संदेश पाठवला.
डॅनियल उठला आणि खिडकीपाशी गेला. बाहेर अंधार दाटला होता. दूरवर बर्फाळ उतारांवर चंद्रप्रकाश पडत होता. वाऱ्याने पाइनच्या झाडांना हलकं हलवलं.
तो मंद आवाजात म्हणाला, “आता बघूया, दुष्यंतचा मुलगा नुसताच हुशार आहे, की धाडसीसुद्धा”
तुम्ही मायबोलीच्या वाचकांची "
तुम्ही मायबोलीच्या वाचकांची " पुढचा भाग कधी येणार / येणार का की येणारच नाही ?????" या प्रतिक्षेची सवय घालवता आहात
खूप भारी कथानक...
अतिशय वेगळा विषय...
आपल्या दारापर्यंत येऊन पण अदृश्य राहणारा विषय...
मस्त, लगेच दुसरी मालिका .....
मस्त, लगेच दुसरी मालिका ..... . लागोपाठ दोन्ही भाग वाचून काढले. माझ्यासाठी विषय वेगळा आहे !! पण नवीन माहिती मिळते आहे.
धनवंती, खरे आहे . पुढील भागाच्या प्रतिक्षेत लिहायची वेळच येत नाहीये.
मस्त झालाय हाही भाग
मस्त झालाय हाही भाग
सातत्याने भाग टाकतायकौतुकास्पद आहे
मस्त झालेत दोन्ही भाग
मस्त झालेत दोन्ही भाग
मस्त चालली आहे कथामाला. पुढचा
मस्त चालली आहे कथामाला. पुढचा भाग कधी येणार?
धन्यवाद धनवन्ती, अश्विनी११,
धन्यवाद धनवन्ती, अश्विनी११, किल्ली, अमीदीप आणि Sharadg!