Disclaimer – अस्वीकरण
ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेत उल्लेख केलेली व्यक्तीरेखा, संस्था, आर्थिक हालचाली, गुप्त संघटना, तांत्रिक कारवाया, बाजारातील घडामोडी, राजकीय संकेत, देश, शहरं किंवा घटना यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, संस्था किंवा घडलेल्या प्रसंगाशी थेट संबंध नाही. काही ठिकाणी वास्तव जगातील शहरं, बंदरं, आर्थिक प्रणाली, व्यापारमार्ग, तंत्रज्ञान, बाजाररचना किंवा भू-राजकीय संदर्भ केवळ कथेला वास्तवदर्शी स्वरूप देण्यासाठी वापरलेले आहेत.
या कथेत मांडलेले विचार, संवाद, षड्यंत्र, आर्थिक डावपेच, सायबर कारवाया किंवा तांत्रिक उल्लेख हे साहित्यिक कल्पनारंजनाचा भाग आहेत. त्यांना वास्तव, मार्गदर्शक माहिती किंवा तथ्यात्मक दावा मानू नये.
वाचकांनी ही कथा केवळ मनोरंजन, उत्कंठा आणि साहित्यिक अनुभव म्हणून वाचावी.
************************************************************************************************************************
भाग १ : ठिणगी
एप्रिल महिन्याचा पहिला सोमवार. मुंबई अजून पूर्णपणे जागी झाली नव्हती. पहाटेच्या अंधुक प्रकाशाने शहराच्या कडांना हलकेच स्पर्श करायला सुरुवात केली होती, पण रात्रीची झोप अजूनही रस्त्यांच्या कोपऱ्यांत, बंद दुकानांच्या शटरांवर आणि समुद्राच्या ओलसर वाऱ्यात रेंगाळत होती. अरबी समुद्रावर धूसर धुके पसरले होते. दूरवर जहाजांच्या अस्पष्ट सावल्या दिसत होत्या जणू काही काळ्या कागदावर पांढऱ्या पेन्सिलीने काढलेल्या रेषा.
कुलाबाच्या उंच इमारतींच्या काचांवर उगवत्या सूर्याचा फिकट केशरी रंग उतरू लागला होता. त्या काचा बाहेरून चमकत होत्या, पण आत अजून अंधारच होता. काही मजल्यांवर मात्र दिवे लागले होते.
त्या उंच इमारतींपैकी एका टॉवरच्या पंचविसाव्या मजल्यावर, आपल्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत आरव देशमुख शांत उभा होता. त्याच्या एका हातात ब्लॅक कॉफीचा मग होता, दुसऱ्या हातात मोबाईल. डोळे स्क्रीनवर खिळलेले. एखादा सामान्य माणूस जिथे आकडे पहायचा, आरवला त्यात पॅटर्न दिसत.
तो गेली दहा वर्षे ऊर्जा बाजाराचा अभ्यास करत होता. तेल, गॅस, समुद्री वाहतूक, चलनबदल, युद्ध, निवडणुका, दहशतवादी हल्ले, हवामानात जगात कुठे काय घडलं, तर त्याचा परिणाम कुठल्या कमोडिटीवर किती होईल, याची त्याला सवयीनं जाण आली होती. त्याच्यासाठी बाजार म्हणजे केवळ पैसा नव्हता. तो मानवी भीती, लालसा आणि गुपितांचा आरसा होता.
त्याने स्क्रीनकडे पुन्हा पाहिलं.
'ब्रेंट क्रूड - वर.'
'नॅचरल गॅस - वर.'
'रिफायनिंग कंपन्यांचे शेअर्स - खाली.'
आरवच्या कपाळावर आठी उमटली. तो आत आला. हॉलमधल्या मोठ्या काचेच्या टेबलावर मग ठेवून त्याने दुसऱ्या स्क्रीनवर लाईव्ह चार्ट उघडले. हिरव्या आणि लाल रेषा वेगाने हालत होत्या.
“विचित्र आहे...” तो स्वतःशीच म्हणाला.
साधारणपणे अशी हालचाल काही कारणांशिवाय होत नाही. मोठं युद्ध पेटलं असेल, एखाद्या देशावर निर्बंध बसले असतील, ओपेकने उत्पादन कपात जाहीर केली असेल, समुद्री मार्ग बंद झाले असतील किंवा एखाद्या हुकूमशहाने रात्रीत निर्णय घेतला असेल तरच असं घडतं. पण आज तसं काहीच नव्हतं. किमान वरवर तरी.
त्याने बातम्यांचा फीड स्क्रोल करायला सुरुवात केली.
''Breaking News:'' मध्यपूर्वेतील एका छोट्या रिफायनरीत आग.
''Update:'' ऑस्ट्रेलियातील प्रक्रिया युनिट तात्पुरते बंद.
''Alert:'' युरोपातील तेल टर्मिनलमध्ये तांत्रिक बिघाड.
तीन बातम्या. तीन देश. तीन वेगवेगळे टाईमझोन आणि सगळं एका रात्रीत घडलेलं.
आरव खुर्चीत बसला. त्याने कॉफीचा एक घोट घेतला, पण चव लक्षातही आली नाही. “योगायोग?” तो पुटपुटला. त्याच्या डोक्यात आधीच गणित सुरू झालं होतं. मध्यपूर्वेतील छोट्या रिफायनरीला आग लागली, म्हणजे जागतिक बाजारावर थेट फारसा परिणाम होणार नव्हता. ऑस्ट्रेलियातील युनिट बंद झालं, तरी पुरवठा थोडासा वरखाली होईल. युरोपातील टर्मिनलचा तांत्रिक बिघाडही काही तासांत सुटू शकतो. मग बाजार एवढा अस्वस्थ का? तेलाच्या तातडीच्या किंमतींमध्ये मोठी उडी नव्हती, पण futures contracts, shipping insurance rates आणि volatility निर्देशांक वर जात होते. याचा अर्थ बाजाराला तात्काळ तुटवड्याची नव्हे, तर येणाऱ्या अनिश्चिततेची भीती वाटत होती.
आरव रिटेल ट्रेडर नव्हता. तो काही मोठ्या निधीगटांना ऊर्जा जोखीम, समुद्री पुरवठा आणि geopolitical संकेतांवर सल्ला देत असे. त्यामुळे त्याच्याकडे सार्वजनिक माहितीपेक्षा वेगळे डेटा फीड्स उपलब्ध होते. आरवने लॅपटॉप उघडला. त्याने स्वतःच्या खाजगी डेटाबेसमध्ये मागच्या चोवीस तासांत झालेल्या सायबर अलर्ट्स, शिपिंग डिले, विमा दर, उपग्रह प्रतिमा, आणि बंदरांवरील हालचाली तपासायला सुरुवात केली.
त्याच्या डाव्या स्क्रीनवर जगाचा नकाशा उघडला. लाल ठिपके चमकू लागले.
अबुधाबी.
फ्रेमंटल.
रॉटरडॅम.
आरवची नजर थबकली. तीनही घटनांच्या आधीच्या चार तासांत, त्या परिसरात काही सेकंदांसाठी स्थानिक industrial telemetry, port routing signals आणि emergency communication frequencies मध्ये सूक्ष्म व्यत्यय नोंदवला गेला होता. इतका सूक्ष्म, की सामान्य प्रणालीने तो “noise” म्हणून दुर्लक्ष केला असता. पण आरवने नाही. तो खुर्चीत मागे रेलला. छातीत कुठेतरी हलकी धडधड सुरू झाली. आग, बिघाड, बंद युनिट... घटना वेगळ्या होत्या पण पॅटर्न एकच होता.
आरवच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबर फ्लॅश झाला. नंबर masked relay network मधून रूट झालेला दिसत होता. स्क्रीनवर कोणताही ओळखण्याजोगा कंट्री कोड नव्हता. तो काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. कॉल घ्यावा की न घ्यावा या विचारांत शेवटी कॉल स्वीकारला. समोरून काही सेकंद शांतता. आणि मग एका स्त्रीचा शांत, निर्विकार आवाज.
“मिस्टर देशमुख... तुम्ही जे पाहत आहात, ते नेहमीचं शेअर मार्केट नाही.” आरवचा हात नकळत खुर्चीला घट्ट झाला.
“मग काय आहे?” तो सावधपणे म्हणाला.
“पहिला इशारा.” कॉल कट झाला.
स्क्रीनवर लाल-हिरव्या रेषा हालत होत्या. आरव काही क्षण तसाच बसून राहिला. हा प्रॅन्क कॉल नव्हता.
त्या स्त्रीला त्याचं नाव माहित होतं. तो काय पाहतोय हे माहित होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती घाबरलेली नव्हती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता.
************************************************************************************************************************
त्याच वेळी, सिंगापूरमध्ये सकाळचे आठ वाजून चाळीस मिनिटे झाली होती.
शहर पूर्ण जागं झालं होतं. काचेच्या उंच इमारतींवर सकाळचा सूर्य चमकत होता. खाली रस्त्यांवर टॅक्सी, बस आणि ऑफिसकडे धावणाऱ्या लोकांची लगबग सुरू होती. बंदराच्या दिशेने cranes हलू लागले होते. जगाच्या व्यापाराचा दिवस सुरू झाला होता.
डाउनटाउनमधील Strait Ledger Media Network च्या अठराव्या मजल्यावर माया सेन आपल्या डेस्कवर बसली होती. तिच्या टेबलावर कागदांचा पसारा, दोन रिकामे कॉफी कप, नोटबुक, आणि उघडलेला लॅपटॉप पडला होता. स्क्रीनवर एक अपूर्ण लेख दिसत होता. 'Title Draft: Why Global Energy Markets Are Ignoring the Small Signals' मायाने कप उचलला. कॉफी थंड झाली होती. तिने शेवटचा घोट घेतला आणि कप बाजूला ठेवला.
माया सेन नावाजलेली इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकार होती. राजकीय घोटाळे, समुद्री तस्करी, शेल कंपन्यांमार्फत होणारे आर्थिक गैरव्यवहार, संवेदनशील माहितीची डेटा लीक प्रकरणे आणि सरकारी करारांतील भ्रष्टाचार उघड करत तिने अनेक मोठ्या आणि प्रभावशाली लोकांना अस्वस्थ केले होते. काहींनी तिची स्तुती केली, तर काहींनी तिचा द्वेष केला; परंतु या दोन्ही गोष्टींची तिला फारशी पर्वा नव्हती. तिच्यासाठी सत्य हीच एकमेव महत्त्वाची गोष्ट होती.
तिने inbox refresh केला. एक नवीन मेल समोर आला. No Sender ID
Subject: If you still believe in truth
मायाचा हात थबकला. तिने मेल उघडला. आत फक्त एकच ओळ होती.
Fires are not accidents. Follow April. खाली एक attachment. APRIL_KEY.zip Password Protected
मायाच्या अंगावर काटा आला. काही क्षण ती फक्त पाहत राहिली. पत्रकार म्हणून तिने धमक्या पाहिल्या होत्या. 'You’re being watched.' 'Back off this story.' 'Next time, it won’t be words.'
फसवे मेलही पाहिले होते. फिशिंग लिंक, बनावट डॉक्युमेंट्स, ट्रॅकिंग फाइल्स. पण हा मेल वेगळा वाटत होता. त्यात भीती दाखवण्याचा प्रयत्न नव्हता. त्यात कोणीतरी तिला 'ओळखतं' आहे, अशी भावना होती.
माया खुर्चीत मागे सरकली. तिने स्क्रीनकडे रोखून पाहिलं. “कोण आहेस तू...” ती पुटपुटली.
तिने ताबडतोब मेल हेडर उघडण्याचा प्रयत्न केला. पण तिथे काहीच सापडलं नाही. हेडर्स जाणीवपूर्वक करप्ट केलेले होते. रूटिंग चैन अनेक रिले सर्व्हर्स मधून फिरवलेली होती. मूळ स्रोत लपवण्यात आला होता.
मायाने तत्काळ आजूबाजूला नजर फिरवली. न्यूजरूम गजबजलेलं होतं,कुणी फोनवर मोठ्याने बोलत होतं, कुणी कीबोर्डवर वेगाने टायपिंग करत होतं, कुणी स्क्रीनकडे खिळून ताज्या अपडेट्स पाहत होतं, तर कुणी संपादकाच्या टेबलाकडे धावत जात होतं.
वरच्या मोठ्या स्क्रीनवर लाल पट्ट्यांत सतत Breaking News चमकत होत्या. कॉफीचा वास, पावलांचे आवाज, तातडीचे आदेश, आणि सतत वाजणाऱ्या नोटिफिकेशन्सनी वातावरण भरून गेलं होतं.
पण अचानक तिला प्रत्येक चेहरा संशयास्पद वाटू लागला. तिने एक क्षणही न दवडता समोरचा मुख्य लॅपटॉप नेटवर्कवरून वेगळा केला. स्क्रीनच्या कोपऱ्यातील कनेक्शन चिन्ह बंद झालं. तिने वाय-फाय डिसेबल केलं, LAN केबल अलगद काढली, आणि मशीन बाजूला सरकवलं. हालचाली शांत होत्या, पण त्यात तातडी होती. जणू हा सराव तिने आधी केला होता.
मग तिने टेबलाच्या खालच्या ड्रॉवरचं लॉक उघडलं. आत फाईल्स, जुने नोटपॅड्स, काही केबल्स यांच्या मागे एक छोटं, काळ्या रंगाचं मशीन ठेवलेलं होतं. साधं दिसणारं, कोणतंही कंपनीचं चिन्ह नसलेलं, बाहेरून अगदी सामान्य. पण ते तिचं ऑफलाइन मशीन होतं. नेटवर्कपासून पूर्णपणे वेगळं, फक्त संवेदनशील माहिती पाहण्यासाठी ठेवलेलं.
तिने ते बाहेर काढलं, झटक्यात सुरू केलं, आणि मेलमधून आलेलं attachment एन्क्रिप्टेड ड्राइव्हद्वारे त्यावर ट्रान्सफर केलं. स्क्रीनवर काही सेकंद फिरणारं चिन्ह दिसत राहिलं. प्रत्येक सेकंद लांब वाटत होता. फाईल उघडण्याचा प्रयत्न करताच पासवर्ड विंडो समोर आली. पांढऱ्या चौकटीत एकच शब्द चमकत होता-Enter Password. मायाने ओठ चावले. डोक्यात शक्यता धावू लागल्या. तिने पहिला अंदाज टाईप केला.
April2026
एंटर.
चूक.
तिने लगेच दुसरा प्रयत्न केला.
TruthFirst
पुन्हा नकार.
तिसरा.
FollowApril
स्क्रीनवर पुन्हा तोच संदेश उमटला-Incorrect Password.
तिच्या कपाळावर घामाचा बारीक थेंब आला. तिने डोळे मिटून खोल श्वास घेतला आणि मेलमधली पहिली ओळ पुन्हा वाचली. Fires are not accidents.
ती काही क्षण त्या शब्दांकडे पाहत राहिली. Fires. Not accidents. ठिणगी. राख. नियोजन.
अचानक तिच्या मनात एक शब्द चमकला. तिने हळूच टाईप केलं-EMBER
एंटर दाबताच स्क्रीन क्षणभर काळी झाली. मग फाईल उघडली.
मायाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. डोळ्यांतील आत्मविश्वास एका क्षणात धक्क्यात बदलला. तिला अपेक्षा होती की आत कदाचित spreadsheet, आकडे, व्यवहारांची यादी, काही गुप्त ट्रान्झॅक्शन्स असतील. पण स्क्रीनवर ते नव्हतं.
ती एक archive होती. व्यवस्थित विभागलेली, क्रमांक लावलेली, अनेक फोल्डर्समध्ये विभागलेली. प्रत्येक फोल्डरचं नाव व्यावसायिक पद्धतीत व्यवस्थित लिहिलेलं.
Insurance pre-positions
Shell accounts
Port delay templates
Media sentiment notes
तिच्या हातांची बोटं थंड पडली. हे केवळ पुरावे नव्हते. योजना होती... आधीच मांडलेली. कोणती घटना घडल्यावर कोणता विमा सक्रिय होईल, पैसा कुठल्या बनावट खात्यांतून फिरवला जाईल, बंदरांमध्ये विलंब कसा निर्माण करायचा, माध्यमांमध्ये लोकमत कोणत्या दिशेने ढकलायचं हे सगळं आधीपासून लिहिलेलं होतं.
मग तिची नजर वरच्या एका ओळीवर स्थिरावली.
PHASE ONE ACTIVE
मायाचा श्वास अडखळला. छाती धडधडू लागली म्हणजे हे भूतकाळ नव्हतं. योजना सुरू झाली होती. आत्ताच.
तिने ताबडतोब फोन उचलला. हात किंचित थरथरत होते. स्क्रीन अनलॉक करताच एक नंबर आधीच तयार ठेवलेला दिसला. तो तिने महिन्यांपूर्वी सेव्ह केला होता-एक संभाव्य स्रोत म्हणून, कदाचित कधीच न लागणारा संपर्क म्हणून.
भारत.
मुंबई.
Aarav Deshmukh.
तिने क्षणाचाही विलंब न करता कॉल लावला. रिंग वाजू लागली. आणि त्या प्रत्येक रिंगसोबत मायाला जाणवत होतं की वेळ त्यांच्या विरोधात धावत होती.
************************************************************************************************************************
युरोपच्या आल्प्स पर्वतरांगांतील एका डोंगराळ प्रदेशात सकाळ अजून हळूहळू पसरत होती. रात्र पूर्णपणे सरली नव्हती आणि दिवस अजून पूर्ण उजाडला नव्हता. आकाश फिकट निळ्या आणि करड्या छटांमध्ये अडकून बसलं होतं. दऱ्याखोऱ्यांत दाट धुके साचलं होतं जणू पांढऱ्या धुराचे विशाल थर जमिनीवर विसावले होते. त्या धुक्यातून झाडांची टोकं कधीकधी बाहेर डोकावत होती आणि पुन्हा अदृश्य होत होती.
दूरवर बर्फाच्छादित शिखरांवर पहिल्या सूर्यकिरणांचा हलका स्पर्श होत होता. त्या शुभ्र माथ्यांवर सोनेरी प्रकाश अलगद पसरत होता, पण तो देखावा जितका सुंदर, तितकीच हवेतली थंडी निर्दयी होती. श्वास घेताना छातीत बर्फासारखी धार जाणवत होती. त्वचेवर स्पर्श होताच हवा चावल्यासारखी भासत होती. सकाळचा प्रकाश आला होता, पण उब अजून दूर होती.
डोंगराच्या उतारावर, मुख्य रस्त्यापासून बऱ्यापैकी दूर, झाडांच्या आड एक एकाकी लाकडी घर उभं होतं. त्या घराकडे जाणारी अरुंद वाट बर्फ आणि चिखलाच्या थरांनी अर्धी झाकली गेली होती. कुणी तिथे सहज पोहोचू नये, अशीच जणू त्या जागेची रचना होती. घराची बांधणी जुनी होती; जाड लाकडी फळ्या, वर्षानुवर्षांच्या थंडी-पावसाने गडद झालेल्या भिंती, आणि अरुंद खिडक्या ज्यांतून बाहेर पाहता येत होतं, पण आत डोकावणं कठीण होतं.
छपरावर बर्फाचा पातळ थर पडलेला होता. चिमणीतून निघणारा मंद धूर सरळ वर न जाता थंड हवेत वाकडा होत धुक्यात मिसळत होता. त्या धुरात जळक्या लाकडाचा वास होता जुना, उबदार, पण एकाकी. बाहेरून ते घर साधं दिसत होतं. एखाद्या शेतकऱ्याचं, किंवा जगापासून दूर शांतता शोधणाऱ्या वृद्धाचं.
पण आतलं चित्र वेगळंच होतं. प्रत्येक वस्तू नीट मांडलेली होती. भिंतीलगत ठेवलेली पुस्तकं उंचीनुसार रचलेली. टेबलावर ठेवलेले कागद अचूक कोनात ठेवलेले. शेल्फवरील डबे एकाच रेषेत. स्वयंपाकघरात सुरी, कप, भांडी ठरावीक जागी. खिडक्यांचे पडदे समान अंतरावर ओढलेले. जमिनीवर धुळीचा कणही नाही. सगळं अतिशय शिस्तबद्ध आणि काटेकोर.
स्वयंपाकघर आणि बैठक एकत्र असलेल्या खोलीत, खिडकीजवळच्या खुर्चीत डॅनियल क्रॉस बसला होता. त्याच्या समोर टेबलावर गरम चहाचा कप होता, पण त्याला बऱ्याच वेळापासून स्पर्शही केला नव्हता. त्याच्या हातात छोटा encrypted receiver होता आणि त्याच्या स्क्रीनवर तीन alerts चमकत होते.
Refinery Fire
Terminal Fault
Process Halt
डॅनियलच्या बोटांची पकड घट्ट झाली.
“नाही...” तो पुटपुटला.
त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. डोळे खोल गेलेले. दाढीचे केस पांढरे झालेले. वय साठ ओलांडलेलं, पण शरीर अजूनही ताठ.
तो हळूच उठला. काही क्षण तो तसाच उभा राहिला जणू स्वतःला तयार करत होता. मग तो खोलीच्या कोपऱ्यातल्या जुन्या कपाटाजवळ गेला. कपाट साधं दिसत होतं, पण त्याने खालचा कप्पा उघडताना तीन वेगवेगळे लॉक उघडले. पहिला साधा किल्लीचा. दुसरा फिरत्या क्रमांकाचा. तिसरा लपवलेला स्लाइड लॅच.
कप्प्याच्या तळाशी काही ब्लँकेट्स, एक लोखंडी पेटी, आणि त्याखाली एक सपाट फाइल ठेवलेली होती. डॅनियलने ती अलगद बाहेर काढली. जुनं काळसर कव्हर. कडा झिजलेल्या. आणि मध्यभागी काळ्या शाईत मोठ्या अक्षरांत लिहिलेलं ''EMBER PROTOCOL'' त्याचे हात किंचित थरथरत होते.
तो पुन्हा खुर्चीत बसला. फाइल मांडीवर ठेवली. बराच वेळ त्याने ती उघडली नाही. फक्त कव्हरकडे पाहत राहिला. जणू ते कागदावरचे शब्द नव्हते तर भूतकाळातून परत आलेल्या जखमेचे ठसे होते.
“देवा...” तो पुटपुटला. “त्यांनी हे पुन्हा सुरू केलं.”
त्याने फाइल उघडली. जुनी, अधिकृत शिक्के काढून टाकलेली प्रत. काही पाने मूळ, काही त्याने स्वतः टाईप करून ठेवलेली. खाली एक नकाशा होता. जगाचा. त्यावर अनेक ऊर्जा केंद्रे, बंदरे, रिफायनरीज, समुद्री मार्ग, गॅस हब्स लाल बिंदूंनी चिन्हांकित केलेले होते. काही ठिकाणी हस्ताक्षरात टिपण्या होत्या.
Trigger through fear, not destruction.
Three minor fires create one major panic.
Markets move faster than armies.
Profit hides motive.
त्याने दुसरं पान उलटलं. ऑपरेशनच्या टप्प्यांची यादी होती.
Phase 1 – Coincidence लहान, असंबद्ध घटना.
Phase 2 – Contagion बाजारातील घबराट, विमा दर वाढ, पुरवठा साखळीवर ताण.
Phase 3 – Response सरकारी हस्तक्षेप, आपत्कालीन करार, खासगी नफा.
डॅनियलचा श्वास जड झाला. काही क्षणांपूर्वीपर्यंत स्थिर दिसणारा त्याचा चेहरा अचानक ताणला गेला. कपाळावरच्या रेषा खोल झाल्या. डोळ्यांत जुन्या आठवणींची सावली उतरली. खोलीत अजूनही सकाळची थंड शांतता होती, पण त्याच्या आत मात्र भूतकाळाने दार तोडून प्रवेश केला होता.
त्याने टेबलाच्या खालच्या कप्प्याकडे हात नेला. तिथे अनेक वर्षांपासून न उघडलेला एक लहान धातूचा डबा ठेवलेला होता. कुलूप नव्हतं, पण त्यावर वेळेची धूळ बसली होती. डॅनियलने तो उघडला. आत काळ्या कापडात गुंडाळलेला एक जुना फोन ठेवलेला होता. जाडसर. साधा. स्मार्टफोनच्या युगात विसरला गेलेला. पण काही वस्तू जुन्या होत नाहीत त्या फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात.
त्याने फोन बाहेर काढला. अंगठ्याने स्क्रीनवरून धूळ पुसली. बटण दाबताच काही क्षण काहीच घडलं नाही. मग अचानक मंद प्रकाश चमकला. जुना स्टार्टअप टोन खोलीत घुमला. त्या आवाजाने जणू वर्षानुवर्षं बंद ठेवलेली एखादी पेटी उघडली.
फोन सुरू होईपर्यंत डॅनियल शांत उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अधीरता नव्हती, पण तीव्रता होती. जणू हा फक्त फोन नव्हता हा निर्णय होता.
होम स्क्रीन उजळताच त्याने संपर्क यादी उघडली. बोटं अजूनही अचूक, सवयीची, थरथर न करणारी होती. तो थेट एका नावाकडे गेला. एक नंबर असा होता, जो त्याने कधी डिलिट केला नव्हता. अनेक देश बदलले, सरकारं बदलली, चलनं बदलली, चेहरे बदलले पण तो नंबर कायम राहिला होता.
भारत.
Aarav Deshmukh.
नंबर स्क्रीनवर चमकत राहिला. डॅनियल काही क्षण नुसता त्या स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेत कठोरपणा नव्हता एक जुना थकवा होता. कदाचित अपराधीपणाही.
मग त्याने अतिशय हळू आवाजात म्हटलं,“दुष्यंत... आशा आहे तुझा मुलगा तुझ्यासारखा हट्टी असेल.”
त्याने अंगठा हळूहळू पुढे नेला. हालचाल इतकी संथ होती की जणू वेळच मंदावली होती. स्क्रीनवर चमकणारे हिरवे कॉल बटन त्याच्या बोटांच्या सावलीत अर्धा झाकला गेला.
एक क्षण. फक्त एक क्षण. पण त्या क्षणात वर्षानुवर्षं दडलेलं ओझं होतं. न उच्चारलेली नावं, न पाठवलेले इशारे, अपूर्ण राहिलेली वचनं, आणि योग्य वेळेची वाट पाहत थांबलेलं सत्य.
दोन पिढ्यांमधला एक क्षण. एका पिढीने चुका केल्या होत्या, सौदे केले होते, गुपितं जपली होती, आणि काही गोष्टी वेळेच्या हवाली केल्या होत्या. दुसरी पिढी त्या निर्णयांच्या सावलीत मोठी झाली होती. अनभिज्ञ, पण परिणाम भोगत. त्या दोन पिढ्यांना जोडणारा दुवा आता त्या छोट्याशा स्क्रीनवर थरथरत उभा होता.
भूतकाळ आणि वर्तमान यांच्यामधला एक क्षण. एका बाजूला बंद खोल्या, गुप्त बैठका, पैशासाठी केलेले व्यवहार, भीतीवर उभे केलेले डाव, आणि हरवलेले चेहरे होते. दुसऱ्या बाजूला अजूनही सत्याचा अंदाज नसलेला तरुण, वेगाने बदलणारं जग, आणि सुरू झालेला नवा खेळ होता.
डॅनियलच्या डोळ्यांत क्षणभर संकोच चमकून गेला. मग त्याने कॉल बटन दाबलं. स्क्रीन उजळली. संपर्क जोडण्याचा आवाज आला. खोलीतील शांततेत पहिली रिंग घुमली.
आणि त्या एका रिंगसोबत अनेक वर्षं गप्प बसलेला भूतकाळ पुन्हा जागा झाला.
शब्द सूची
Industrial telemetry – औद्योगिक यंत्रे, सेन्सर्स आणि प्रक्रियांमधील माहिती दूरस्थ पद्धतीने गोळा करून पाठवणारी प्रणाली.
Port routing signals – नेटवर्कमधील डेटा विशिष्ट पोर्ट व मार्गांद्वारे पुढे नेण्यासाठी वापरले जाणारे संकेत.
Masked relay network – मूळ स्रोत किंवा गंतव्य लपवून मधल्या नोड्समार्फत डेटा पाठवणारे नेटवर्क.
Relay servers – डेटा, ईमेल किंवा विनंत्या पुढे पाठवणारे मध्यस्थ सर्व्हर.
Encrypted receiver – सुरक्षितपणे कूटबद्ध संदेश स्वीकारून उलगडू शकणारे उपकरण.
छान सुरवात. लहान घटनाही
छान सुरवात. लहान घटनाही जागतिक परिणाम घडवू शकतात हि स्टोरी लाईन इंटरेस्टिंग आहे .
लाल रेषा सारखी नक्कीच हि कथा सुद्धा रंगत जाणार आहे.
पुढे काय होईल याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत .
खुप इंटरेस्टिंग आणि
खुप इंटरेस्टिंग आणि प्रॉमिसिंग सुरुवात आहे. वाचायला सुरुवात केल्यावर एकदम पकड घेतली कथेने. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
अरे व्वा, नवीन कथा आली पण...
अरे व्वा, नवीन कथा आली पण...
मोठा भाग आणि इतक्या इंटरेस्टिंग थीमवर..
मायबोली सतत चेक करण्यासाठी अजून एक निमित्त.
धन्यवाद.
वातावरण निर्मिती चांगली झालीय
वातावरण निर्मिती चांगली झालीय
डीटेलिंग टॉप क्लास.
डीटेलिंग टॉप क्लास.
ब्लॅक एम्बर शीर्षक विशेष.
ही कथा पूर्ण वाचणार.
मस्त सुरुवात
मस्त सुरुवात
सुंदर लिहिता तुम्ही.
सुंदर लिहिता तुम्ही.
धन्यवाद सामी, पर्णीका,
धन्यवाद सामी, पर्णीका, धनवन्ती, झकासराव, अनिंद्य, किल्ली, sneha1!