घर - दिशा की निर्णय?

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

घर घेताना तुम्ही जास्त महत्त्व कशाला देता ?
दिशा? वास्तु? अंकशास्त्र? की बजेट, लोकेशन आणि योग्य वेळ?

परवा एका फेसबुक ग्रुपवर घराबद्दलची एक पोस्ट पाहिली. घर त्यांना आवडलं होतं. पण पोस्टमध्ये सविस्तर माहिती होती. दरवाजा कोणत्या दिशेला, स्वयंपाकघर कोणत्या दिशेला, कोणता मजला, कोणती बाजू… आणि शेवटी प्रश्न होता, हे घर घ्यावं की नको?

मला प्रश्न पडला , आपण घर घेतो ते राहण्यासाठी की गणित जुळवण्यासाठी?

मी त्या पोस्टवर माझं साधंच मत लिहिलं ..
जर एरिया (स्क्वेअर फूट), लोकेशन, बजेट, पसंतीचा मजला आणि बँकेकडून मिळणारं कर्ज… हे सगळं मनासारखं जुळत असेल, तर अजून काय पाहायचं? दगड-माती तुमचं काय बिघडवणार? घर हे माणसांनी आणि त्यांच्या प्रेमाने साकार होतं. सुख तिथेच नांदतं.

अर्थात, हे माझे वैयक्तिक विचार आहेत.

पण खरंच आपण कधी कधी देव, निसर्ग, दिशा, ग्रह-तारे यांना आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेशी जोडतो.
या विश्वात कोट्यावधी लोक असताना, कोण काय विचार करतोय यावरून कोणाला काय शिक्षा किंवा बक्षीस मिळेल हे आपण इतक्या खात्रीने मानावं का?

वास्तुशास्त्राबद्दलही मला असंच वाटतं.
ज्यांचा त्यावर विश्वास आहे, त्यांना त्यातून मानसिक समाधान मिळत असेल. ते नक्कीच महत्त्वाचं आहे. मी त्याला विरोध करत नाही.
पण प्रश्न असा आहे की आपण ते किती खोल समजून घेतो?
पुणे-मुंबईसारख्या शहरांत प्रत्येक नियम काटेकोर पाळणं खरंच शक्य असतं का? खास करून मोठ्या मोठ्या इमारतीत. की आपण फक्त वरवरच्या माहितीतून स्वतःचं समाधान करून घेतो?

मी घर घेताना माझ्यासमोर एकच ध्येय होतं ते म्हणजे “मला घर घ्यायचं आहे.”

2009 साली, माझ्या बजेटच्या थोडं वर जाऊन, पण सुरक्षित आणि योग्य परिसरात मी घर घेतलं.
दूरवर स्वस्त पर्याय होते, पण तिथली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मला योग्य वाटली नाही.
त्या वेळी माझ्यासाठी दिशा नव्हे, सुरक्षितता महत्त्वाची होती. शुभ मुहूर्तापेक्षा स्थैर्य महत्त्वाचं होतं.

त्याच काळात माझा एक सहकारी घर शोधत होता. त्याच्याकडे तब्बल 40 लाख रुपये हातात तयार होते.
पण अटी मात्र संपत नव्हत्या.. हा बिल्डर नको, त्या एरियाच्या पुढे जायचं नाही, उंच मजला नको, फ्लॅट नंबरची अमुक बेरीज नको, या दिशेला दरवाजा नको, त्या दिशेला स्वयंपाकघर नको…

आणि तो निर्णय पुढे ढकलत राहिला.

माझ्याच सोसायटीत जो फ्लॅट 37 लाखांना मिळत होता, तसाच फ्लॅट त्याने काही वर्षांनी माझ्याच आसपासच्या एरियात 92 लाखांना घेतला.

मग प्रश्न पडतो की आपण अति विचारामुळे सुरक्षित निर्णय चुकवतो का ?
परफेक्ट शोधताना योग्य वेळ हातातून निसटून जाते का?

आजकाल घर घेणं-विकणं तुलनेने सोपं झालं आहे.
गरज बदलली तर घर बदलता येतं.
पण योग्य वेळी घेतलेला निर्णय बदलता येत नाही.

दूसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे घर खरंच भिंतींनी बनतं का?
की समंजसपणा, जिव्हाळा, एकमेकांची काळजी आणि समजूतदारपणाने?

अनेक मतं ऐकली की गोंधळ वाढतो. म्हणूनच कदाचित म्हण प्रचलित झाली असेल..
“ऐकावे जनाचे, करावे मनाचे.”

माझ्या मते, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हाच खरा शुभ मुहूर्त.

पण तुमचं काय मत आहे?

घर घेताना तुम्ही काय पहाता?
वास्तु की व्यवहार? दिशा की निर्णय? की दोन्हींचा समतोल?
*****************************************************************************************************

home.jpg

विषय: 
प्रकार: 

अहो एले मोठ्या शहरात वीज गेली तरीही लिफ्टला पॉवर बॅक अप असतो , ती लगेच सुरु होते . फक्त मोठा बिघाड झाला तर लिफ्ट बंद राहू शकते , त्यातही मोठ्या इमारतींमध्ये एकाच वेळी अनेक उद्वाहने असतात . त्यामुळे खूप मोठा खोळंबा कधीच होत नाही .

आमच्या विल्डींग मधे वीज गेली कि माणूस अडकून बसतो. बॅक अप साठी डिझेल आणायला कुणी जात नाही कारण पंपाबर देत नाहीत म्हणे.
त्या निमित्ताने वरच्या मजल्यावरच्या लोकांना वेगवेगळे स्कील्स डेव्हलप करता येतात हा फायदाच आहे कि.

छान विषय.
1. सुरक्षितता
2. क्षेत्र फळ आणि रचना - हॉल प्रशस्त + डायनिंग ची जागा, टेरेस, बेडरूम एका बाजूला, किचन च्या रेषेत टॉयलेट ब्लॉक नको. उजेड आणि हवा भरपूर यावी.
3. पहिला मजला ( हा निर्णय चुकला. कारण यापूर्वी मल्टी स्टोरिड बिल्डिंग मधे राहिलो नव्हतो.) पहिल्या मजल्याचे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत.
4. जी गोष्ट हातात नाही पण महत्वाची - शेजार.
5. लोकेशन. - एकदम हायवेला नको. पण हायवेपासून जास्त अंतर नको. तसेच सर्विस रोडवर खेटून नको. असंच मिळालं. नसतं मिळालं तर दूर गेलो असतो. पण गोंगाट टाळला असता.
6. सर्वात शेवटी आणि तडजोड योग्य - Amenities>>>>>
ह्या सगळ्याला मम.
आमचे घर पहिल्या मजल्यावर आहे. वर सांगितलेल्या आवाजात आणखी एक भर. आमच्या बेडरूमच्या खाली पाण्याची टाकी आहे त्यातून रोज रात्री मोटरने पाणी वरच्या टाकीत चढवतात. रात्रीच्या शांततेत त्या मोटरचा एक सूक्ष्म बॅकग्राऊंड आवाज येतो. (जो बहुतेक फक्त मलाच येतो) त्यामुळे त्याकडे लक्ष जाते आणि झोप येत नाही. तसेच आमचे घर अगदी कॉर्नरला आहे. दोन रस्त्यांवरच्या सणांच्या, लग्नाच्या, कार्यक्रमांच्या मिरवणुका आल्यावर आवाजाने नको होतं. अनंत चतुर्दशीला तर डॉल्बीच्या आवाजाने काचा हादरतात. आम्हाला घरात बोलायचे झाले तर अगदी एकमेकांच्या कानाजवळ जाऊन बोलावे लागते.

Pages