घर - दिशा की निर्णय?

Posted
2 months ago
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

घर घेताना तुम्ही जास्त महत्त्व कशाला देता ?
दिशा? वास्तु? अंकशास्त्र? की बजेट, लोकेशन आणि योग्य वेळ?

परवा एका फेसबुक ग्रुपवर घराबद्दलची एक पोस्ट पाहिली. घर त्यांना आवडलं होतं. पण पोस्टमध्ये सविस्तर माहिती होती. दरवाजा कोणत्या दिशेला, स्वयंपाकघर कोणत्या दिशेला, कोणता मजला, कोणती बाजू… आणि शेवटी प्रश्न होता, हे घर घ्यावं की नको?

मला प्रश्न पडला , आपण घर घेतो ते राहण्यासाठी की गणित जुळवण्यासाठी?

मी त्या पोस्टवर माझं साधंच मत लिहिलं ..
जर एरिया (स्क्वेअर फूट), लोकेशन, बजेट, पसंतीचा मजला आणि बँकेकडून मिळणारं कर्ज… हे सगळं मनासारखं जुळत असेल, तर अजून काय पाहायचं? दगड-माती तुमचं काय बिघडवणार? घर हे माणसांनी आणि त्यांच्या प्रेमाने साकार होतं. सुख तिथेच नांदतं.

अर्थात, हे माझे वैयक्तिक विचार आहेत.

पण खरंच आपण कधी कधी देव, निसर्ग, दिशा, ग्रह-तारे यांना आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेशी जोडतो.
या विश्वात कोट्यावधी लोक असताना, कोण काय विचार करतोय यावरून कोणाला काय शिक्षा किंवा बक्षीस मिळेल हे आपण इतक्या खात्रीने मानावं का?

वास्तुशास्त्राबद्दलही मला असंच वाटतं.
ज्यांचा त्यावर विश्वास आहे, त्यांना त्यातून मानसिक समाधान मिळत असेल. ते नक्कीच महत्त्वाचं आहे. मी त्याला विरोध करत नाही.
पण प्रश्न असा आहे की आपण ते किती खोल समजून घेतो?
पुणे-मुंबईसारख्या शहरांत प्रत्येक नियम काटेकोर पाळणं खरंच शक्य असतं का? खास करून मोठ्या मोठ्या इमारतीत. की आपण फक्त वरवरच्या माहितीतून स्वतःचं समाधान करून घेतो?

मी घर घेताना माझ्यासमोर एकच ध्येय होतं ते म्हणजे “मला घर घ्यायचं आहे.”

2009 साली, माझ्या बजेटच्या थोडं वर जाऊन, पण सुरक्षित आणि योग्य परिसरात मी घर घेतलं.
दूरवर स्वस्त पर्याय होते, पण तिथली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मला योग्य वाटली नाही.
त्या वेळी माझ्यासाठी दिशा नव्हे, सुरक्षितता महत्त्वाची होती. शुभ मुहूर्तापेक्षा स्थैर्य महत्त्वाचं होतं.

त्याच काळात माझा एक सहकारी घर शोधत होता. त्याच्याकडे तब्बल 40 लाख रुपये हातात तयार होते.
पण अटी मात्र संपत नव्हत्या.. हा बिल्डर नको, त्या एरियाच्या पुढे जायचं नाही, उंच मजला नको, फ्लॅट नंबरची अमुक बेरीज नको, या दिशेला दरवाजा नको, त्या दिशेला स्वयंपाकघर नको…

आणि तो निर्णय पुढे ढकलत राहिला.

माझ्याच सोसायटीत जो फ्लॅट 37 लाखांना मिळत होता, तसाच फ्लॅट त्याने काही वर्षांनी माझ्याच आसपासच्या एरियात 92 लाखांना घेतला.

मग प्रश्न पडतो की आपण अति विचारामुळे सुरक्षित निर्णय चुकवतो का ?
परफेक्ट शोधताना योग्य वेळ हातातून निसटून जाते का?

आजकाल घर घेणं-विकणं तुलनेने सोपं झालं आहे.
गरज बदलली तर घर बदलता येतं.
पण योग्य वेळी घेतलेला निर्णय बदलता येत नाही.

दूसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे घर खरंच भिंतींनी बनतं का?
की समंजसपणा, जिव्हाळा, एकमेकांची काळजी आणि समजूतदारपणाने?

अनेक मतं ऐकली की गोंधळ वाढतो. म्हणूनच कदाचित म्हण प्रचलित झाली असेल..
“ऐकावे जनाचे, करावे मनाचे.”

माझ्या मते, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हाच खरा शुभ मुहूर्त.

पण तुमचं काय मत आहे?

घर घेताना तुम्ही काय पहाता?
वास्तु की व्यवहार? दिशा की निर्णय? की दोन्हींचा समतोल?
*****************************************************************************************************

home.jpg

विषय: 
प्रकार: 

घर हा फार मोठा निर्णय
आर्थिक परीणाम दूरगामी
म्हणून खूप विचार करून घेत असतील लोकं
Btw
Choice करायला खूप वाव असेल तरीही उशीर होईल असे वाटतेय.
बजेट लिमिटेड असेल आणि घर घेणे नक्की असेल तर मजला, घर नंबर ह्यात compromise होईल.
एरिया लोकेशन फक्त बघितले जाईल,
त्यातही आपल्या बजेट मध्ये मोजक्या ठिकाणी घर मिळत असेल तर प्रॉब्लेम ऑफ many होणार नाही आणि निर्णय लवकर होईल.

1. सुरक्षितता
2. क्षेत्र फळ आणि रचना - हॉल प्रशस्त + डायनिंग ची जागा, टेरेस, बेडरूम एका बाजूला, किचन च्या रेषेत टॉयलेट ब्लॉक नको. उजेड आणि हवा भरपूर यावी.
3. पहिला मजला ( हा निर्णय चुकला. कारण यापूर्वी मल्टी स्टोरिड बिल्डिंग मधे राहिलो नव्हतो.) पहिल्या मजल्याचे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत.
4. जी गोष्ट हातात नाही पण महत्वाची - शेजार.
5. लोकेशन. - एकदम हायवेला नको. पण हायवेपासून जास्त अंतर नको. तसेच सर्विस रोडवर खेटून नको. असंच मिळालं. नसतं मिळालं तर दूर गेलो असतो. पण गोंगाट टाळला असता.
6. सर्वात शेवटी आणि तडजोड योग्य - Amenities

तडजोड महत्त्वाची.

फ्लॅट मध्ये कधीही परफेक्ट 100परसेंट दिशा वास्तू वगैरे मिळत नाहीत त्यातल्या त्यात जर काही गोष्टी मिळाल्या जसे देवघर ईशान्येला पूर्व पश्चिम दारं तर चांगलं.
त्याहीपेक्षा जवळपास सोयी आणि हवा उजेड छान असणारं घर मिळालं तर जास्त विचार करत बसू नये. मला तर कधी कधी वाटतं घर मुळातच इतक्या नशिबाने आणि मेहनतीने मिळत त्यात उगाच कमीपणा शोधण्यापेक्षा जे घ्याल ते लाभेल या atitude ने घेतलं तर लाभतंच. नाहीतर काहींना आयुष्य जातं डोक्यावर स्वतःच्या हक्काचं छप्पर घेण्यात. तर काहींना तेही नशिबात नसतं.

एक लेखक पहिल्या मजल्यावर घर घेणं हा खरंच एक चुकीचा निर्णय ठरू शकतं. खास करून पुणे मुंबई सारख्या शहरात. मी स्वत: लहानपणापासून खूप उंच नाही पण चौथ्या मजल्यावर राहिलेली आहे, जी तिथली सर्वात उंच इमारत होती. आणि आमच्या घरी प्रचंड वारा, उजेड, ऊन सर्व काही यायचं. बर्ड व्ह्यू ची इतकी सवय होती त्यामुळे स्वत:चे घर काहीही झाले तरी उंच इमारतीत आणि शेवटून दुसऱ्या मजल्यावर घ्यायचे पक्के होते. आधी कोर्नर फ्लॅट बुक केला होता. दहाव्या मजल्यावर कारण इमारत अकरा मजली. मग काय मनात आलं माहिती नाही, कॉर्नर चा रद्द करून त्याच्या अलिकडचा बुक केला. मला काही केल्या बाल्कनी बेडरूमला हवी होती बास. बाकी कोणतेही निकष मी ठेवले नव्हते.

तेच माझ्या मैत्रिणीने वारंवार सांगून सुद्धा अगदी एका टाउनशिप मध्ये जिथे रहदारीचा शून्य त्रास आहे तरीही पहिल्या मजल्यावर घर घेतले त्याचे प्रचंड त्रास आहेत. सकाळी सकाळी ऑफिसला जाणारी मंडळी गाडीला किक मारतात. ड्रेनेज पाईप मधून येणारे झुरळ, इमारती साफ करणारे सफाई कामगार मोठे मोठे कचऱ्याचे डबे घासत घेऊन जातात.. शिवाय बाल्कनीत उभे राहून काही बोललं की लगेच खाली ऐकू जाते. रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाने सहज वर बघितले तरी त्याला सहज सगळे कळेल. त्यामुळे काही प्रायव्हसी नाहीच. बाकी धूळ आणि समोर एक अगदी 3 मजली इमारत उभी झाल्याने वह्यू compromise झाला ती गोष्टच निराळी.

हे सगळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स सोडवायचं सोडून लोक अमुक मजला, तमुक बेरीज, ही दिशा, शोधत बसतात. इतके पैसे घालून निव्वळ या गोष्टींमुळे जर सगळंच compromise होणार असेल तर काय उपयोग त्या घराचा?

सिमरन अगदी बरोबर. अगदीच तुमची स्वत:ची जागा असेल तर ठीक. ज्यात तुम्ही हवं तसं घर बांधून घेऊ शकता.
मी लेखात ज्या सहकाऱ्याचा उल्लेख केला आहे, त्याने तर खूप चांगली चांगली मोठी, चांगल्या एरियातली घरे हातची घालवली. कारण निव्वळ एकच कोणत्या तरी एका माणसाला ते फॉलो करतात त्याने सांगितले आहे की तिसऱ्या मजल्याच्या वर घर नाही घ्यायचे, आणि ही लोक ऐकतात त्याचे. त्या माणसामुळेच ही सगळं घडलं. ही घर नाही घ्यायचं म्हटलं की यांनी रद्द केलंच. मग ते घर कितीही चांगलं असो.

ते 92 लाखाचं , मग त्यांचं जुनं घर redevelop झालं ते पण दोन्ही तिसऱ्या मजल्यावरच आहेत.

मुंबईत अणि पुण्यात इराणी restaurants आहेत/होती. अगदी यशस्वीपणे वर्षानुवर्षे धंदा केला. त्याच्या जागा कॉर्नरला मोक्याच्या जागी असायच्या. या जागा त्यांना स्वस्तात मिळायच्या. का? उत्तर वास्तुशास्त्रात आहे. ह्या जागांना व्याग्रमुखी म्हणून हिंदूंचा नकार असायचा. आता वास्तुशास्त्र पाळून फायदा झाला का तोटा????

अरे मी फार फार पूर्वी जेव्हा दणादण धागे काढायचो तेव्हा हा धागा काढणार होतो.
माझ्याकडे एक भलीमोठी चेकलिस्ट होती जेव्हा मी नवीन घर शोधत फिरत होतो .. सापडली तर छापून नाहीतर कधीतरी आठवून शेअर करेन.. आधी त्या प्रकाराला बायको हसायची. पण नंतर कबूल केले की त्यामुळेच आम्हाला दोघांच्या मनासारखे घर मिळाले.

आता वास्तुशास्त्र पाळून फायदा झाला का तोटा????
>>>>>

अर्थात तोटाच झाला. पण या माहितीबद्दल धन्यवाद. मला याची बिलकुल कल्पना नव्हती. पण ही हॉटेल नेहमी कॉर्नरलाच का असतात याचे नेहमी कौतुक आणि अप्रूप वाटायचे. त्यामागचे कारण आज समजले..

लोकसत्तेच्या शनिवारच्या वास्तुरंग पुरवणीत एक अर्धा पानभर जाहिरात असते. जादूई अहसास. त्या बाई वास्तुशास्त्र , ड्राउजिंग ( पूर्वजन्मातल्या घटनांचा मागोवा घेण्यासाठी) असं काय काय करून लोकांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स सोडवतात. आतापर्यंत आलेल्या जाहिरातींतली एक सोडले तर सगळी उदाहरणे बंगल्यात राहणार्‍या लोकांची होती.
देवघर , किचन ,टॉयलेट, बेडरूमची दिशा , घराजवळ डोंगर बिंगर, पाण्याच साठा अशागोष्टीच चुकल्या की प्रॉब्लेम्स येतात. त्या शक्य तेवढ्या बदलतात मग कसली तरी यंत्रे, नामजपाची मशीन, विशिष्ट देवांच्या, बाबांच्या मूर्ती इ. उपायांनी त्या समस्या दूर होतात.
प्रत्येक लेख वाचताना मला प्रश्न पडतो की फ्लॅट किंवा चाळीत राहणार्‍यांच्या समस्या या मार्गाने दूर होत नाहीत का?

खरंय दक्षिणा.
मला चांगला अकराव्या मजल्यावरचा फ्लॅट मिळत होता. पण लिफ्ट बंद पडली तर या भीतीने नाही घेतला. घरासमोर गार्डन आणि स्विमंग पूल आहे, त्यामुळे उजेड आणि वारा कधीच बंद होणार नाही. जी बिल्डींग समोर येणार आहे तिच्यात आणि माझ्या बिल्डींग मधे २०० मीटर पेक्षा जास्त अंतर असणार आहे.

या आडबाजूला कशाला कोण मरायला घेतंय फ्लॅट म्हणून घेतला. नंतर लोक आले पण स्कीम भरून जाईल असं वाटलं नव्हतं. आता गर्दी झालीय. आमच्याच घराखाली बॅडमिंटन, फटफट्यांचे आवाज ( या शब्दामुळे नेमला प्रॉब्लेम समजतो), रात्री बेरात्री लोक येऊन खाली गप्पा मारत बसतात, हॉर्न वाजवतात. हा वैताग आहे.

खरंय दक्षिणा.
मला चांगला अकराव्या मजल्यावरचा फ्लॅट मिळत होता. पण लिफ्ट बंद पडली तर या भीतीने नाही घेतला. घरासमोर गार्डन आणि स्विमंग पूल आहे, त्यामुळे उजेड आणि वारा कधीच बंद होणार नाही. जी बिल्डींग समोर येणार आहे तिच्यात आणि माझ्या बिल्डींग मधे २०० मीटर पेक्षा जास्त अंतर असणार आहे.

या आडबाजूला कशाला कोण मरायला घेतंय फ्लॅट म्हणून घेतला. नंतर लोक आले पण स्कीम भरून जाईल असं वाटलं नव्हतं. आता गर्दी झालीय. आमच्याच घराखाली बॅडमिंटन, फटफट्यांचे आवाज ( या शब्दामुळे नेमला प्रॉब्लेम समजतो), रात्री बेरात्री लोक येऊन खाली गप्पा मारत बसतात, हॉर्न वाजवतात. हा वैताग आहे.

दक्षिणा तुम्ही अगदी माझाच अनुभव शब्दबद्ध केला आहे. मला अगदी असेच अनुभव येत आहेत आमचा ठाणे घोडबंदर रोड वरील फ्लॅट विक्री बाबतीत. एवढा छान प्रशस्त फ्लॅट आहे,हवा उजेड भरपूर आहे तरीही तुम्ही नमूद केलेली दिशा वास्तू आकड्यांची बेरीज असे सगळं कारणावरून नकार मिळाला आहे दोघा तिघांना कडून. वैताग येतोय सगळ्याचा

पहिल्या मजल्यावरच्या आवाजाच्या तोट्यांशी सहमत. जोडीला सकाळी शाळेला जाणाऱ्या मुलांची गाडीची वाट पाहताना खूप आवाज होतो. मुलांपेक्षा त्यांच्या आया मोठ्याने गप्पा ठोकत उभ्या राहतात याचा जास्त त्रास होतो. प्रवासाला गेलेले रात्री अपरात्री परत येतात. त्यांच्या गाड्यांच्या आवाजाने हमखास झोपमोड होते. कधीकधी गाड्यांचे चोरीचे अलार्म वाजतात. मालक निवांत येऊन बंद करेपर्यंत तो आवाज सहन करावा लागतो. काही गाड्यांच्या रिवर्स अलार्म चा आवाज पण मोठा असतो. त्याचाही त्रास होतो. घरात नवीन बाळ आले तेंव्हा त्याची सारखी झोपमोड व्हायला लागली. मग खिडक्या साऊंड प्रूफ करून घेतल्या. आणि व्हाईट नॉइज चे मशीन आणले.
पूर्वी लिफ्ट नसलेल्या तीन मजली इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. कधीकधी पाणी सुद्धा खालून कळश्यांतून भरून वर न्यावे लागे. त्याची भीती बसल्याने पहिल्या मजल्याच्या वर जाण्याचे धाडस झाले नाही.

>माझ्या मते, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हाच खरा शुभ मुहूर्त.
लाखाचं बोललात. हे फक्त घरांबद्द्लच नाही तर आयुष्यातल्या आणखी एका मोठ्या निर्णयाबद्दलही म्हणता येईल. काही वेळा आयुष्याचा जोडीदार आवडला तरी पत्रिका जमत नाही म्हणून लग्न टाळणारे अजूनही आहेत . त्यांची संख्या कमी होत आहे किंवा नकार देण्यासाठी पत्रिकेचे कारण , ही वेगळी गोष्ट.
नशीब "कर्मशास्त्र" नावाचं पुस्तक अजून ऐकलं नाही. नाहीतर कामाचा पत्ता आणि त्यातले आकडे शुभ नाहीत, मेष राशीचा साहेब हा मेषपात्रच असणार, असल्या कारणांसाठी चालून आलेली नोकरी नाकारली हे ही पहावे लागले असते. अजूनतरी पगाराचा आकडा सध्यापेक्षा जास्त असेल तर तो शुभ असतो अशी समजूत आहे हे बरे आहे.

खरंय दक्षिणा.
मला चांगला अकराव्या मजल्यावरचा फ्लॅट मिळत होता. पण लिफ्ट बंद पडली तर या भीतीने नाही घेतला. >> ही भिती वास्तविक आहे पण आता मोठ्या मोठ्या इमारती आणि त्यांच्या मेंटेनन्स टीम या सक्षम असतात, आणि खूप कुटुंब रहात असल्या कारणाने कोणाचे अडू नये म्हणून योग्य ते proactive मेजर्स आधीच उपलब्ध असतात. बॅक अप / amc वगैरे.

इराणी कॅफे आणि वास्तुशास्त्र हे पटलं नाही.
नावातच इराणी आहे. भारतीय वास्तुशास्त्राच्या ज्युरीस्डिक्शन मधे ते येत नाहीत. इराणी असतं तर नक्कीच. पण ते इराणमधे.
फेंगशुई आधी फक्त चिनी लोकांवर परिणाम करायचे पण आता भारतीय लोकांवर पण करते. म्हणजे मान्यता दिली कि ते लागू होतं.
जसं गावचे उग्र देव कोंबडं बकरं कापले नाही कि भयंकर आपत्ती आणायचे. पण त्यांनी कधी मुघल, आदिलशहा, इंग्रज यांना त्रास दिला नाही. त्यांच्या अधिकारक्षेत्रात ते येतच नव्हते.

एक लेखक - इराणी वास्तुशास्त्र नव्हते बघत. व्याघ्रमुखी जागांना मागणी नव्हती. त्यामुळे त्या स्वस्तात मिळत. कोपऱ्यावरची जागा मोक्याची हे वास्तुशास्त्रात नाही. ह्या जागा घेण्याचा दुहेरी फायदा इराण्यांनी करून घेतला.

माझा मुलगा रहेजा कॉर्प मध्ये स्थापत्य अभियंता आहे. मोठ्या जागा भाड्याने देणे( लिजिंग) या विभागात आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये एका मोठ्या कंपनीला मोठी जागा/ अख्खी इमारत भाड्याने हवी होती. २५ कोटी रुपये महिना.

पण त्या कंपनीच्या वास्तू तज्ज्ञाने सांगितले कि दोन बाजूनी पाणी असणारी वस्तू अशुभ आहे.

त्या न्यायाने अख्खा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच अशुभ आहे.

पण कंपनीचा वरिष्ठ संचालक स्पष्ट्पणे म्हणाला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स नको. तुमच्याकडे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सोडून दुसरी जागा आहे का?

त्यांना ऐरोलीची माइंड स्पेस ची जागा दाखवली गेली.

जेव्हा मला गोरेगावला म्हाडाचा फ्लॅट अलॉट झाला D-1901 तेव्हा मला थोडे भीती वाटली.. बापरे 19 वा मजला.. D विंग..S V रोड रस्ता एक कोपरा.. आणि लिफ्ट बंद पडली तर ! एक्सचेंज करून घेऊया का ? ते देतात कि नाही ते माहित नाही. आणि आता राहायला गेल्यावर कळले.. प्रत्येक विंग ला दोन लिफ्ट आहेत.. 8 व्या आणि 15 व्या मजल्यावर B C D ला जोडणारा ऱेफुजी एरिया आहे. दिवसा लाइट लावायची गरज नाही.. आणि 80% वास्तुशास्त्राप्रमाणे आहे.. विंग रस्त्यावर असल्यामुळे दुसरी सोसायटी रस्त्याच्या पार पलीकडे.. हॉल आणि बेडरूम, किचन.. मोठ्या मोठ्या खिडक्या. त्यामुळे प्रकाश आणि ऊन पण भरपूर आहे त्यामुळे बाल्कनी गार्डेनिंग करायला हरकत नाही. आणि 19 वा मजल्यावर असल्यामुळे.. एक ऍम्ब्युलन्स सोडली तर कोणाचे आवाज येत नाहीत. पहिल्या मजल्यावर च्या मेंबर ने सांगितले तेव्हा मला कळले .. की रात्री भटके कुत्रे भुंकून भुंकून झोपू देत नाहीत.. रात्री गाडयांचे वगैरे खूप आवाज येतात. मला फारसे विचार न करता जे घर नशिबाने मिळाले तेच स्वस्त आणि मस्त मिळाले.

माझे घर मुलुंड येथे विसाव्या मजल्यावर आहे. तेथे खालचे इतर आवाज येत नाहीत

परंतु खाली असलेल्या गवाणपाडा गावठाणात सतत कुणाची तरी हळद, बारसं, लग्न चालू असतं. त्यामुळे वेळी अवेळी बोंम्बल्या ( लाऊड स्पीकर) चा भयानक कानठळ्या बसणारा आवाज येत असतो.

गणेशोत्सव, माघी गणपती सारख्या वेळेस रिक्षावर बोंम्बल्या ( लाऊड स्पीकर) लावलेला असतो आणि पुढे फक्त चार माणसे नाचत असतात.

याला कंटाळून मी संपूर्ण घराला साऊंड प्रूफिंग करून घेतलं आहे.( खर्च चार लाख रुपये) त्याने आवाज पूर्ण कमी झाला नाही तरी बराच सुसह्य असतो.

बाकी आतापर्यंत मी राहण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून घेतलेली घरे किंवा माझा किंवा पत्नीचा दवाखाना याचे वास्तू शास्त्र काही पाहिलेले नाही.

आपले कर्म उत्तम असले तर आपले आयुष्य सुखाने जाते यावर माझा विश्वास आहे.

माझ्याकडे ते विचारायला येणाऱ्या माणसांना मी एकच सांगतो कि दारूचे दुकान खाजणात काढा ते चालतेच.

बाकी ज्याचा विश्वास/ श्रद्धा आहे त्याने ते करावे. कारण शेवटी माणसाचे जीवन हे विश्वासावर/ श्रद्धेवरच चालते.

माझे कर्म उत्तम असले तर माझं आयुष्य व्यवस्थित जाईल हि माझी श्रद्धा/ विश्वासच आहे असेही म्हणता येईल.

श्रवु , अभिनंदन.
लिफ्ट बंद पडल्याच ( व्ज गेल्यावर) तर बाल्कनीतून दोरखंडावरून चढण्या उतरण्याची सवय असू द्यावी. इमर्जन्सीला बरं पडेल ते.

Pages