सचिननामा-६: Ten do, ten don't

Submitted by फारएण्ड on 1 February, 2026 - 00:07

३१ जानेवारीला फेसबुक फीडमधे १९९९ च्या चेन्नई मॅच बद्दल बर्‍याच क्लिप्स व माहिती आली आणि त्यामुळे तेव्हाच्या बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. कॅलेंडर मधे पाहिले तर त्या दिवशी रविवार होता. पण आम्हाला गुरूवारी सुट्टी असल्याने आम्ही ऑफिसात होतो. भारताला २७१ करायचे होते. तेव्हा पाकचा प्रचंड धाक होता. त्यामुळे मॅच जिंकायची शक्यता कमीच होती. जिंकण्याची सवय नसलेल्या संघांना अचानक जिंकण्याची संधी आली की काय करायचे कळत नाही असे भारताचे तेव्हा खूप वेळा व्हायचे. पण दुपारपर्यंत भारत २०० च्या जवळ पोहोचला आहे आणि सचिन अजून खेळत आहे वगैरे स्कोअरवरून लक्षात आले होते. मग आम्ही ऑफिसच्या जवळ राहणार्‍या एका मित्राच्या घरी जाउन मॅच लावली आणि संपेपर्यंत पाहिली होती.

क्रिकेटरसिकांना वर्षानुवर्षे लक्षात राहिलेली ही मॅच आहे.

पाक विरूद्ध आपण टेस्ट मॅच दहा वर्षांनी खेळत होतो. जबरदस्त हाईप झालेला, प्रचंड प्रेशर. पाक पूर्ण ताकदीने उतरलेले, तर तेव्हाची भारतीय टीम पूर्ण ताकद म्हणजे जे काही म्हणता येइल, तेवढ्याने. त्यावेळेस आपली बोलिंगही भेदक नसे. एखादा त्या दिवशी जम बसलेला बॅट्समन १००-१५० सहज मारून जात असे. या मॅच मधे असेच झाले. एरव्ही लो स्कोअरिंग असलेल्या मॅच मधे आफ्रिदीने अचानक धुलाई करून बराच स्कोअर करून ठेवला, व भारताला चौथ्या डावात २७० चे टारगेट आले. समोर ऐन भरातले अक्रम- व पाचव्या दिवशीच्या पिचवरचा सकलैन, आणि सपोर्ट ला अगदी भरात नसला तरीही बराच जोरदार असलेला वकार युनूस. आणि त्याहीपेक्षा भारतावर सदोदित असलेला तो "मनोवैज्ञानिक दबाव"!

मुळात चेन्नई मधे सचिनचा खेळ सहसा चांगला होत असे. त्याबद्दल मी इथे स्वतंत्र लिहीलेले आहे आणि तो या डावात अतिशय फॉर्ममधे दिसत होता. त्याचे यातले शतक हे मॅच प्रेशर, समोरच्या बोलिंगचा दर्जा तर सोडाच पण बॅटिंगच्या दर्जाच्या दृष्टीने सुद्धा त्याच्या टॉप शतकांमधले आहे. सुरूवातीला विकेट्स पडल्यावर सचिन आणि मोंगियाची भागीदारी जमली. पण शेवटी शेवटी सचिनची पाठ दुखू लागली व बहुधा त्यामुळे विजय समोर आलेला असताना लौकर संपवायच्या नादात तो आउट झाला. तेव्हा आपल्याला अजून १७ रन्सची गरज होती. त्याच्या थोडे आधी मोंगिया आउट झाला होता. सचिन खेळपट्टीवर असताना सुनील जोशीच्या खेळीत प्रचंड आत्मविश्वास होता. त्याने सक्लैनला एक सिक्सही मारली होती. पण सचिन आउट झाल्या झाल्या सुनील जोशीची बॉडी लँग्वेजच बदलली. तो ही लगेच आउट झाला. उरलेले दोनही लगेच परतले आणि आपण १२ रन्सही ही मॅच हरलो.

९० च्या दशकात सगळा भार सचिनवरच असे. द्रविड आधारस्तंभ बनायला अजून २-३ वर्षे बाकी होती. Ten do, ten don't असे बॅनर तेव्हा प्रेक्षकांमधे असत (पहिला Ten हा Tendulkar चा शॉर्टफॉर्म म्हणून, दुसरा ten बाकीच्या दहांकरता). सचिनची विकेट पडल्यावर आपली बॅटिंग संपायला वेळ लागत नसे हे तेव्हा खरेच होते. १९९६ च्या वर्ल्ड कप मधे दोन महत्त्वाच्या मॅचेस मधे - ऑस्ट्रेलिया व श्रीलंका (सेमी फायनल) सचिन क्रीजवर होता तोपर्यंत जिंकायची खात्री होती. तो आउट झाल्यावर सगळे फिरले. १९९९ च्या कप मधे सचिनचे वडील गेल्यामुळे त्याला अचानक जावे लागले व त्यानंतरच्या झिंबाब्वेच्या मॅच मधे दिसलेला दिशाहीन भारतीय संघ ही काही उदाहरणे.

पण या मॅच मधे दुसरा एक फॅक्टर होता. ९० च्या दशकात पाकचा आपल्यावर असलेला मेण्टल डॉमिनन्स. १९९२ व १९९६ च्या वर्ल्ड कपची दोन उदाहरणे सोडली तर भारत-पाक मॅचेस बघणे म्हणजे होपलेस प्रकार होता. या चेन्नईच्या मॅच मधे जी लगेच पडझड झाली त्यात तो ही फॅक्टर होता. २००३ पासून ते चित्र पालटू लागले आणि नंतर विराट कोहलीने तर जवळजवळ एकहाती भारताला तो मेण्टल डॉमिनन्स मिळवून दिला.

या प्रभावाचे उलटे उदाहरण म्हणजे या मॅचच्या एक दोन वर्षे आधीची ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेची मॅच. स्कोअर्स बघितले तर या मॅचेस मधे किती साम्य होते याचे आश्चर्य वाटेल. इथे सचिन होता, तर तेथे मार्क वॉ. इथे २७१ चे टार्गेट होते तर तेथे २७०. ऑस्ट्रेलियाची इतकी दयनीय नाही पण पडझड होतच होती. सचिनने मोंगियाबरोबर भागीदारी केली. मार्क वॉ ने मॅथ्यू इलियट आणि बेव्हन बरोबर. या मॅच मधे मार्क वॉ ने ११६ मारले या चेस मधे.

मार्क वॉ म्हणजे बॅटिंगमधला जेम्स बॉण्ड. शतक मारल्यावर सुद्धा शर्टाची इस्त्री बिघडलेली नसेल. 'रीगल', 'मॅजेस्टिक' ही विशेषणे त्याच्या डावांबद्दल कायम ऐकायला मिळत. खडूसपणे खेळताना ते खेळणे चुकूनही प्रेक्षणीय होऊ द्यायचे नाही हा ऑस्ट्रेलियन नियम मोडून तो खेळला. त्याच्या भावाचे कायम जास्त कौतुक झाले पण तो ही कितीतरी महत्त्वाच्या मॅचेस मधे वेळेवर खेळून गेला आहे. आणि मुख्य म्हणजे बॅटिंग व स्लिप मधली फिल्डींग, दोन्हीही अतिशय प्रेक्षणीय. केवळ स्लिप कॅचिंग वर संघात सहज राहू शकेल इतके भारी त्याचे कॅचिंग होते. त्यातून भारत-पाक च्या बाहेरच्या खेळाडूंमधे सहसा न दिसणारे लेग साईफ फ्लिक्स वगैरेही त्याचे अतिशय सुंदर होते. ऑफ साईडचे काही कट्स मारताना होणारी हालचाल त्याच्या एरव्हीच्या रॉयल स्टान्स मधून बाहेर पडून तो कशी काय करायचा याचे नेहमी आश्चर्य वाटायचे.

तर या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मॅचमधली गंमत म्हणजे सचिनप्रमाणेच मार्क वॉ ही जिंकायला अगदी कमी रन्स हवे असताना आउट झाला. सचिनची विकेट सातवी, आणि १७ रन्स हवे होते. मार्क वॉची विकेट सहावी आणि तेव्हा १२ रन्स हवे होते.

फरक इतकाच होता की ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधे ऑस्ट्रेलियाचा कायम वरचष्मा राहिला आहे. त्यात त्यांची विजिगिषु वृत्ती. त्यामुळे मार्क वॉ नंतर आणखी दोन विकेट्स जाउन सुद्धा इयान हिली व गिलेस्पीने मॅच जिंकून दिली. याउलट पाकपुढे आपली फे फे उडत असल्याने आपण ते करू शकलो नाही.

या चेन्नईच्या मॅच चे पुढे बरेच पडसाद उमटले. पुढच्या अनेक मॅचेस मधे पाठदुखीमुळे काही शॉट्सवर मर्यादा आल्याने सचिनचा खेळ बदलला. चीकी शॉट्स जास्त आले, खेळ थोडा बचावात्मक झाला. अमिताभचा पिक्चर म्हणून बघायला जावे आणि तो "आलाप" निघावा असे काही वेळा झाले. अगदी या मॅचपर्यंत दिसलेली चाबकासारखी फिरवलेली बॅट नंतर कमी दिसली. यानंतरचा काही काळ त्याची बॅटिंग खूप वेगळी होती. ही दुखापत व नंतरचा टेनिस एल्बो दोन्हीचा त्रास कमी झाल्यावर त्याची बॅटिंग पुन्हा बहरली - पुन्हा ते "V" मधले शॉट्स दिसू लागले. २००७ ते २०११ च्या वर्ल्ड कप्सच्या मधला काळ त्याचा करीयरमधला सर्वात यशस्वी काळ असेल. पण त्यात तो आधीचा तडाखा नव्हता.

मात्र सचिनची चेन्नईमधली घोददौड पुढेही चालूच राहिली. यानंतर दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या त्या फेमस सिरीज मधे त्याने चेन्नईला सुरेख शतक मारले. नंतर पुन्हा २००८ मधे इंग्लंडविरूद्ध चौथ्या डावात शब्दशः मॅच जिंकताना मारले - त्याचा चौकार हा त्याचे शतक व भारताचा विजय दोन्ही मिळवणारा होता. इव्हन करीयरच्या शेवटी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅच मधे चौथ्या डावात तो खेळायला आला तेव्हा १२-१३ रन्स बाकी होते. त्याने लगेच दोन सिक्सेस मारून ती मॅच संपवली.

तसेच २००७ मधे पाक विरूद्ध चौथ्या डावात पुन्हा चांगले खेळून मॅच जिंकून द्यायची संधी त्याला परत मिळाली, आणि यावेळेस त्याने जिंकूनही दिली. दिल्ली टेस्ट मधे २०३ चे टार्गेट असताना ८४/२ वर तो खेळायला आला आणि यावेळेस त्याने नाबाद ५६ मारले आणि आपण मॅच जिंकली.

त्या मॅचची एक आठवण आपल्या मनात कायम आहे पण एकूण पाकविरूद्ध त्याची भरपूर परतफेड नंतर त्याने टेस्ट आणि वन डेज, दोन्हीत केली आहे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! मी कसोटी क्रिकेट सामने टीव्हीवर बघण्याइतकी दर्दी कधीच नव्हते, पण बातम्या आणि वर्तमानपत्रातला स्कोअर बघितला जायचा. ही चेन्नईची तेंडुलकर गेल्यानंतर झालेली पडझड मलाही चांगली लक्षात आहे. पाकिस्तानविरुद्ध होती हे लक्षात नव्हतं.

अरे वाह मस्त लेख.
सगळ्या चांगल्या वाईट आठवणी डोळ्यासमोर आल्या.

तेव्हा सगळेच क्रिकेट लाईव्ह बघितलेले आहे. हा सामना सुद्धा. पण चटका लावणाऱ्या पराभवाच्या आठवणीने मन खट्टू न होता सामना लाईव्ह बघितला हे आज भाग्यच वाटते.

हरलेले सामने हायलाईट बघायची इच्छा होत नाही पण यातली सचिनची खेळी जरूर बघावी. गोलंदाजी तशीच दर्जेदार असेल तेव्हाच चांगली फलंदाजी दिसते. ज्यांनी तेव्हा क्रिकेट पाहिले आहे त्यांनाच ठाऊक सकलेन मुश्ताक काय चीज होता. अर्थात मायबोलीवर बरीच जनता जुनीजाणतीच असेल म्हणा Happy

त्या सामन्यात सचिन बाद झाल्यावर देखील वासिम अक्रम सोबत इतर पाक खेळाडूंच्या चेहऱ्यावर सामना जिंकू याची आशा दिसत नव्हती. पण आपले शेपूट तेव्हा नेहमी दगा द्यायचे. म्हणून ती श्रीनाथ कुंबळे यांनी काढलेली मॅच वर्ल्ड फेमस झाली कारण ती सणसणीत अपवाद होती. गंमत म्हणजे त्या सामन्यात देखील त्या आधी सचिनच एकटा खेळला होता हे कमी जणांना आठवत असेल. कारण ते नेहमीचे होते.

लेखातले इतर सामने सुद्धा पाहिले आहेत. ते सचिनने सलग दोन सिक्स मारून जिंकून दिलेले सुद्धा पण तेव्हा सचिन मावळला होता.

ऑस्ट्रेलिया आफ्रिका सिमिलर सामना मात्र आठवत नाही. चेक करायला हवा कदाचित पाहिलाही असेन. त्याकाळात या ऑस्ट्रेलिया आफ्रिका संघात कमाल चुरशीचे सामने झालेत. आपले सामने असल्यासारखे त्यांचे सामने बॉल टू बॉल लाईव्ह बघायला मजा यायची.

पण त्या निमित्ताने मार्क वॉ ची आठवण निघाली हे छान झाले. त्याचा एफर्टलेस एलिगन्स आवडायचाच. तीच सहजता आणि शॉट खेळायला भरपूर वेळ असणे ही त्याची क्वालिटी आज रोहीत शर्मामध्ये दिसते म्हणून तो सध्याचा आवडीचा खेळाडू आहे. फरक इतकाच की रोहीत Hitman आहे आणि मार्क वॉ ची मनगटी नजाकत आपल्या अझर लक्ष्मण कॅटेगरी मधली होती. कदाचित त्यामुळेच एका भारतीय खेळाडूचा खेळ बघत आहे वाटून आपलेपणा वाटायचा. तो आवडायचे हे देखील एक कारण असावे. याउलट त्याचा भाऊ मुंबईच्या भाषेत खडूस खेळाडू होता. आवडायचा बिलकुल नाही पण आदर वाटायचा.

छान आढावा घेतला आहे. मस्त लेख.
त्या वेळी लहान बालक असल्याने आणि घरी टिव्ही नसल्याने काही माहितीच नाही.

मस्त लिहिले आहे. यातील खूप गोष्टी आठवतात आणि मॅचेसही पाहिलेल्या आहेत. खास करून ९६ चे वर्ल्ड कप आवडीने पाहिले आहे.
आलाप Lol

“ मार्क वॉ म्हणजे बॅटिंगमधला जेम्स बॉण्ड. शतक मारल्यावर सुद्धा शर्टाची इस्त्री बिघडलेली नसेल. ” - क्या बात हैं फा!! खास ‘फा’ टच.

लेख छान जमलाय. क्रिकेट (बघण्याच्या) इतिहासातल्या ज्या ‘अभिमन्यू’ जखमा आहेत, त्यातली ही एक. गंमत म्हणजे त्यातल्या बर्याच आठवणीत सचिन हा लसावि आहे.

सुंदर आढावा !!!
मला वाटतं, खऱ्याखुऱ्या फास्ट गोलंदाजीवर फलंदाजी करण्याचा सराव आपल्याला न मिळणे, हे पाकचा आपल्यावर दबाव असण्याचे मुख्य कारण असावे. आपल्याकडे बऱ्यापैकी फास्ट गोलंदाज तयार होवू लागले तसा पाकचा दबाव कमी होत गेला असावा. अर्थात, हा एक अंदाज.
(रच्याकने, ' सायकॉलॉजी ' हा शब्द इंग्लिशमध्ये ' मानसिक ' व ' मानसशास्त्र ( मनोविज्ञान ) ' या दोन्हीसाठी वापरतात. पण क्रिकेटमध्ये ' मानसिक दबाव ' ऐवजी ' मनोवैज्ञानिक दबाव " कां रूढ झालं हे एक कोडंच आहे ! )
'

सचिनची कला म्हणजे जे कमी महत्वाचे सामने आहेत त्यात खेळायचं आणि महत्वाच्या सामन्यात नांगी टाकायची.

“पण क्रिकेटमध्ये ' मानसिक दबाव ' ऐवजी ' मनोवैज्ञानिक दबाव " कां रूढ झालं हे एक कोडंच आहे” - मला वाटतं ते हिंदी इंटू मराठी आहे, भाऊ. हिंदीतला (उच्चारी) मनोवैग्यानिक दबाव मराठीत मनोवैज्ञानिक दबाव होऊन आलाय. मराठीत खरं तर मानसिक ताण संयुक्तिक आहे.

मस्त लेख फा! मजा आली वाचायला. Happy
पाकच्या मेन्टल डॉमिनन्स बद्दल अगदी सहमत. फार होपलेस (परफेक्ट शब्द वापरलास) वाटायचं.

भारत पाकिस्तानसोबत शारजाहमध्ये जास्त हरायचा.
तिथला हेड टू हेड रेकॉर्ड शोधायला हवा. कोणाला माहीत असेल तर द्या.
पण तिथे फिक्सिंग बेटिंग असले गैर प्रकार बरेच चालायचे. त्यामुळे त्या खराब रेकॉर्ड मागे हे सुद्धा एक कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यात काही फिक्सर कमी नव्हते.
पुढे याच कारणासाठी आपण तिथे खेळणे बंद सुद्धा केले होते.

तिथे शुक्रवारी सुट्टी असल्याने भारत पाक सामने शुक्रवारी व्हायचे. आपण ते हरल्यावर आमच्याकडे म्हणायचे की त्यांचा अल्लाह त्यांच्यासोबत असतो म्हणून ते शुक्रवारी जिंकतात. तेव्हा ते खरेही वाटायचे. आणि कधी चुकून एकदा आपण जिंकलो तर म्हणायचे आपल्याकडे सुद्धा एक मुसलमान (अझर) आहे.

मस्त!
ही मॅच अनेकदा डोळ्याखालून गेल्याची शक्यता आहे कारण आमच्या घरात भाऊ क्रिकेट वेडा असल्याने कधीही कुठलीही जुनीपानी किंवा live मॅचचे highlights समरी दहा पंधरा वेळा तरी बघण्यात येते इतक्या सतत टिव्ही वर मॅचेस चालू असतात पण मला जास्त आठवत नाही याबाबतीत पण सचिनच्या मॅचेस बघायला आवडतात.

बाय द वे चष्मा ना घालता मला धाग्याचं शीर्षक सचिनमामा do,s &don't (पिळगावकर) असं दिसतंय Proud