उस सिक्सर की गूंज!

Submitted by फारएण्ड on 5 March, 2013 - 05:11

पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी...

गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही! काही तुरळक अपवाद वगळता १९८५ पर्यंत फारसे काही इंटरेस्टिंग नव्हते.

आधी मुळात १९८३ मधे वर्ल्ड कप जिंकेपर्यंत कोणी वन डे पाहातच नव्हते (आणि दूरदर्शनही दाखवत नव्हते, लोकांना काडीचा इंटरेस्ट नसलेल्या इतर अनेक गोष्टी होत्या त्यांना दाखवायला :)). टेस्ट्स सोडा, पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमधेही ज्यांची रेकॉर्ड्स धरली जात नसत (अजूनही नाहीत) असे हे सामने, त्याची वेगळी रेकॉर्ड्स नंतर ठेवली जातील असे कोणाला वाटलेही नसेल. भारत-पाक काही सामने झाले पण कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. ८३ नंतर लोक जागे झाले. मग प्रत्येक कसोटी दौर्‍यात ३-४ वनडे ही होऊ लागले. आत्तासारखे बोलर्सना जखडून टाकणारे नियम नसल्याने लोक २२५-२३० धावा करत. ५ चे अ‍ॅव्हरेज म्हणजे एकदम सेफ!

त्यात भारत पाक म्हणजे एकदम तुल्यबळ! कारण दोन्हीही संघ तितकेच वाईट होते. अनेक ढेरपोटे, आरामशीर खेळणारे खेळाडू, अफाट क्षेत्ररक्षण कौशल्य, "एकवेळ जिंकलो नाहीतरी चालेल, पण हरता कामा नये" या मनोवृत्तीतून खेळलेल्या डिफेन्सिव्ह मॅचेस वगैरे त्यामुळे बघायलाही मजा येत नसे. ऑस्ट्रेलियाने डेनिस लिलीच्या बोलिंगवर ९ खेळाडून स्लिप मधे लावले ते आक्रमकतेमुळे. आपण कपिलच्या किंवा पाक ने इम्रानच्या वेळेस असे ७-८ लावले असते तर ते कोणीच दुसरीकडे फिल्डिंग करायला तयार नसल्याने असते Happy

पण १९८५ मधला ऑस्ट्रेलियातील बेन्सन अॅण्ड हेजेस कप आला, आणि मॅचेस चे कव्हरेज किती सुंदर असू शकते हे दिसले. तेव्हा मॅचेस पाहिलेल्यांना पहाटे उठून ५ वाजल्यापासून अतिशय स्पष्ट व सुंदर प्रक्षेपणात भारताने मिळवलेले विजय आठवत असतील. वर्ल्ड कप फायनल प्रमाणे महत्त्व आलेल्या त्या मॅच मधे भारताने पाक ला दणदणीत हरवले, लगेच शारजा मधे फक्त १२५ रन्स जिंकायला हवे असताना पाकला ८७ मधे उखडून मॅच जिंकली. असे एक दोन लक्षात राहण्यासारखे सामने सोडले तर विशेष काही नव्हते.

मात्र शारजामधे झालेल्या मॅचेसच्या लोकप्रियतेमुळे तेथे अजून स्पर्धा भरवल्या जाऊ लागल्या. त्यातीलच एक- एप्रिल १९८६ ची ऑस्ट्रेलेशिया कप स्पर्धेची फायनल.

अजून ती मॅच आठवत आहे. आपण मारलेल्या २४५ तेव्हाच्या जमान्यात बर्‍यापैकी होत्या. त्याला उत्तर देताना पाकी गडबडले होते आणि आस्किंग रेट नेहमीच जास्त होता. पण नेहमीप्रमाणे मियाँदाद आउट होत नव्हता. तो आपल्याविरूद्ध तेव्हा चांगला खेळत असे हे खरे पण त्यात तेव्हाचे आपले कॅप्टन्स त्याला तसाच ठेवून दुसरीकडचे लोक आउट करायच्या मागे लागत (१९९२ च्या वर्ल्ड कप मॅच मधे मियाँदाद सहज रन आउट होउ शकत असताना- बहुधा तो पोहोचला असेल हे गृहीत धरून- किरण मोरेने खाली सलीम मलिकला आउट करायचा प्रयत्न केलेला खालच्या लिन्कमधे दिसेल, ). त्यामुळे त्याला बराच मोकळा सोडला जाई.

या मॅच मधे शेवटच्या ओव्हरपर्यंत मागे मागे राहून सुद्धा मियाँदाद खेळत राहिला आणि पळून रन्स काढत राहिला. ११६ मधले तब्बल ८६ रन्स त्याने पळून काढलेले आहेत! कपिलचे प्लॅनिंग गडबडल्यामुळे शेवटची ओव्हर चेतन शर्माकडे आली आणि शेवटच्या बॉलला ४ रन्स हवे आहेत अशी अवस्था झाली. खरे म्हणजे अगदी त्या ओव्हर पर्यंत भारतच जिंकणार याची खात्री होती, पण शर्मासाहेबांनी तो बॉल फुलटॉस दिला, मियाँदादने तो बाउण्ड्रीबाहेर मारला आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी भारतीय खेळाडूंवर "मनोवैज्ञानिक दबाव" टाकला! Happy

नंतर पुढचा काळ भारत-पाक क्रिकेट म्हणजे 'राजा शिवछत्रपती' मधल्या "तीनशे वर्षांची काळरात्र" वाचताना जसे पुढे अनेक पाने काही सुखद वाचायला मिळणार नाही असे वाटते तसे काहीसे होते. त्या एका सिक्स ने तोपर्यंत असलेला भारत-पाक सामन्यांचा बॅलन्स पार उधळला. त्यानंतर अनेक वर्षे आपण त्यांच्याविरूद्ध जिंकू असे कधीच वाटले नाही. पुढच्या काही सिरीजमधे तर त्यांची अवस्था कितीही अवघड असली तरी कोणीही येउन बॅटी फिरवून किंवा विकेट्स काढून त्यांना जिंकून देई आणि आपले लोक हताश अवस्थेत पाट्या टाकत. मला ८६ च्या दौर्यातील एक मॅच आठवते- ती भारताच्या खिशात असताना सलीम मलिकने उभे आडवे पट्टे फिरवून साधारण ३६ बॉल्स मधे ७२ मारले आणि कोणताही बोलर ते थोपवू शकला नाही - प्रेक्षक आणि फिल्डर्स यात काही फरक नव्हता तेव्हा तेथे. साधारण असेच चालू होते. अपवाद फक्त वर्ल्ड कप मॅचेसचा - तेव्हा जणू वेगळाच संघ पाक विरूद्ध खेळत असे. त्याव्यतिरिक्त एखादा ढाक्यातील १९९८ चा ३१५ चेस करून जिंकलेला विजय व टोरांटो मधले काही सामने सोडले तर भारत पाक मॅचेस बघायला बसणे म्हणजे उगाच दिवस वाया घालवण्यासारखेच होते.

या मॅच नंतर पुढच्या १७ वर्षांत भारताचा पाक विरूद्ध स्कोर २२ विजय व ४४ पराभव. याचा परिणाम कसोटीतही झाला होता. बहुतेक मॅचेस म्हणजे वाघ वि. शेळी असेच सामने!

मग एप्रिल १९८६ च्या त्या षटकारानंतर खूप नवीन खेळाडू आले, जुने निवृत्त झाले तरी ९० च्या दशकात यात फारसा फरक पडला नाही. वासिम अक्रम, वकार, सकलैन मुश्ताक, अकीब जावेद व नंतर शोएब अख्तर... सारखे बोलर्स किंवा सईद अन्वर, आमिर सोहैल, इजाज अहमद, सलीम मलिक, इंझमाम सारखे बॅट्समन... कोणीहे सहज मॅचेस फिरवत असे. २००० पर्यंत आपले लोक त्यांच्याविरूद्ध दबूनच खेळायचे.

त्यानंतर २००० पासून २००३ पर्यंत मधे मॅचेसच झाल्या नाहीत. २००३ ची १ मार्चची लढत सुमारे एक वर्ष आधीपासूनच माहीत होती लोकांना, कारण सचिनच्या म्हणण्यानुसार तो जेथे जाईल तेथे लोक त्याला आठवण करून देत. तोपर्यंत भारताने ३ पैकी ३ वेळेस पाक ला वर्ल्ड कप मधे हरवले होते, यावेळेस काय होणार याची उत्सुकता होती. सुरूवातीला चाचपडणारा आपला संघ या मॅचपर्यंत स्थिरावला होता, तर पाक या मॅचपर्यंत इतर मॅचेस हरल्याने 'हरले तर बाहेर' स्थितीत होता, म्हणजे जास्त डेंजरस, ते "कॉर्नर्ड टायगर्स" वगैरे!

पाक ने पहिल्यांदा बॅटिंग करून २७३ मारल्यावर त्यांच्या कोणीतरी भारताला उद्देशून काहीतरी कॉमेंट मारली आणि ते ऐकल्यावर नंतर बॅटिंग ला जाताना "I am going to get these guys" म्हणून खेळायला गेलेला तेंडुलकर त्यादिवशी शोएबला तीन वर्षांनंतर खेळत होता. त्याअधी त्याने कलकत्यात सचिनला पहिल्या बॉलला काढले होते. तेव्हाच्या एक दोन सिरीज मधे आपले लोक शोएबला भलतेच घाबरून खेळले होते. तेव्हा होत असलेल्या पाठदुखीमुळे सचिनही आक्रमक खेळला नव्हता १९९९-२००० मधे. मात्र या मॅचमधे ते सगळे भरून निघाले. येथे सचिन वेगळ्याच अवतारात होता. पहिल्या दोन तीन ओव्हर्सनंतरच पाकची हवा निघून गेल्याचे दिसू लागले. नंतर सेहवाग व गांगुली लागोपाठ आउट झाल्यावर निर्माण झालेली आशा सचिनने आणखी झोडपून घालवली. पाकला इतके निराश क्वचित पाहिले होते त्याआधी. शोले मधला सुरूवातीचा गब्बर व शेवटी भेदरून ठाकूर कडे बघणारा गब्बर, एवढा फरक.

ही मॅच जिंकण्यात सचिन इतकाच द्रविड-युवराज च्या भागीदारीचाही हात होता हे नक्की. अर्थात सचिन आउट होईपर्यंत पाक टीम मानसिकरीत्या पूर्ण खचली होती हे अगदी दिसत होते. पण तेव्हा अजून १०० रन्स करायचे होते आणि पूर्वी पाकला अशा वेळेस १५-२० रन्स सुद्धा पुरत :).

ही मॅच हरल्यावर पाक स्पर्धेतून बाहेर गेले. या मॅचनंतर शोएबची बद्दलची सगळी भीतीच गेली. सेहवाग पासून इतर सर्व जण त्याला हुकमी मारू लागले. तो पुन्हा भारताविरूद्ध उठून दिसण्याएवढा यशस्वी कधीच झाला नाही. अक्रम व वकार दोघेही निवृत्त झाले. अब्दुल रझ्झाक व सकलैन मुश्ताक- ज्यांनी पूर्वी भारताविरूद्ध एकहाती मॅचेस जिंकून दिल्या होत्या, ते ही नंतर कुचकामी ठरले.

ज्यांनी ८० च्या दशकात भारत पाक मॅचेस पाहिलेल्या असतील त्यांना चांगले लक्षात असेल की "एकवेळ इतर कोणत्याही संघाला आपण त्यांच्या घरी हरवू शकतो पण पाकला कधीच नाही", असेच नेहमी वाटायचे. कधी त्यांचे खेळाडू, कधी अंपायर्स व बहुतेक वेळेस कसलाच किलर इन्स्टिंक्ट न दाखवणारे आपले खेळाडू (या मॅच मधे साधारण २८-२९ मिनीटांमधे श्रीनाथला फोर मारल्यावर त्याची बॉडी लँग्वेज पाहा) यामुळे तेथे जाऊन आपण कधी जिंकू असे वाटलेच नाही. या मॅच नंतर पुढच्याच वर्षी आपण तेथे कसोटी व वन डे मालिका जिंकल्या. आता पाक विरूद्ध मॅच म्हणजे काहीच दडपण दिसत नाही. युवराज, कोहली सारखे लोक तर उद्या एखाद्याने उर्मटपणा केला तर आणखी दुप्पट उर्मटपणा करतील असे आहेत.

८६ मधल्या मियाँदादच्या सिक्सची सचिनच्या २००३ मधल्या सिक्सने तितकीच जोरदार परतफेड केली! एखादी मॅच पूर्ण संघाच्या मनावर किती जोरदार परिणाम करू शकते हे २००१ च्या कोलकत्याच्या मॅचमुळे आपल्याला माहीत आहे, माझ्या मते २००३ ची ही मॅचही तशीच होती!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादी मॅच पूर्ण संघाच्या मनावर किती जोरदार परिणाम करू शकते हे २००१ च्या कोलकत्याच्या मॅचमुळे आपल्याला माहीत आहे, माझ्या मते २००३ ची ही मॅचही तशीच होती! >> +१

त्या मियांदादच्या सिक्सनंतर पाकविरूध्द कुठलीही मॅच आपण कधीही हरू शकतो असेच वाटायचे (आपली आणि पाकिस्तानची टीम अनप्रेडिक्टेबल आहे हे अजून एक कारण).

कोणीहे सहज मॅचेस फिरवत असे >> यात अंपायर्सही आले Wink

लोकांना काडीचा इंटरेस्ट नसलेल्या इतर अनेक गोष्टी होत्या त्यांना दाखवायला>>> Rofl

आपण कपिलच्या किंवा पाक ने इम्रानच्या वेळेस असे ७-८ लावले असते तर ते कोणीच दुसरीकडे फिल्डिंग करायला तयार नसल्याने असते>>> Lol

खास फारेन्ड स्टाइल कॉमेन्टस आहेत ह्या Happy

त्या वर्ल्ड कपला लाइव्ह बघत नव्हतो.
पण ओफिसमधुन घरी परत जाताना रेडिओ मिर्ची वर प्रत्येक गाण्यानंतर तो स्कोर सांगायचा.
एकाकडे रेडीओ होता. शोएब वि सचिन हे मेडियाने पेटवले होते बहुतेक.
पण सचिनने लै धुतला. मेन म्हणजे मानसिक दबाव झुगारुन दिलं.
किंबहुना, सचिन आल्यानंतरच आपण नंबर वन होउ असा कुठेतरी आत्मविश्वास आला. Happy
त्याला बघुन क्रिकेट खेळणारे नवीन पिढीतले लोक मानसिक दबाव झुगारुन देताना त्याचाच कित्ता गिरवतात. Happy

चेतन शर्मा रिटायरमेंट नंतर म्हणे बकर्‍या पाळायचा. त्यातल्या एका बकर्‍याचं नाव त्यानं मियाँदाद ठेवलं होतं म्हणे! Lol

>>ही मॅच जिंकण्यात सचिन इतकाच द्रविड-युवराज च्या भागीदारीचाही हात होता हे नक्की
हे मात्र अगदीच सत्य आहे. कारण सचिन मस्त खेळला तरी आपण विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणलेले आहेत! Proud

सही फारेन्डा. आम्ही ही मॅच पाकी लोकांबरोबर पाहिली होती. त्यामुळे अजून मजा आली!आपली बॅटिंग आल्यावर शारजा आठवत आम्ही फुल्ल टेन्शन मधे आणि सचिन मात्र असला डिटरमाइन्ड दिसला होता बॅटिंग ला अल्यापासून! अक्षरषः कानफटात लावल्यासारखा हाणत होता शोएब ला. शोएब चा चेहरा पार रडावेला, अगदी त्या श्रीनाथ टाइप Happy
ही मॅच नव्हे तर दुसर्‍या दिवशीच्या पेपरातल्या हेडलाइन्स पण आठवतायत! "सचिन ने रावळपिंडी एक्सप्रेस डीरेल केली" इथपासून ते पाक चा युनिफॉर्म दाखवून सर्फ ची कोणाची तरी जाहिरात "धो डाला"

मस्त लिहिले आहे. अ‍ॅज अ क्रिकेटींग शॉट म्हणूनही तो एक अफलातून सिक्सर होता आणि त्या कॉन्टेक्स्ट्मधेतर महानच.
भारत- पाकिस्तान किंवा इंग्लंड-ऑस्ट्रेलिआ या दोन्ही तथाकथित 'पारंपारिक' शत्रूंपेक्षा भारत- ऑसीज दुष्मनी जास्त रंगतदार आणि इन्टेन्स बनली आहे.

जबरी रे ! मस्त लिहिलयस..
भारत-पाक सामने म्हंटले की शारजाला अझरने एकदा ठोकलेले १८ बॉल २५ रन्स ज्यांच्यामुळे आपण ३०५ रन्स केल्या होत्या ते, जडेजा आणि रॉबीन सिंगने १९९६च्या वर्ल्डकपमध्ये बंगलोरला शेवटच्या तीन ओव्हरमध्ये ठोकलेल्या ५१ रन्स आणि त्याच मॅचमधली सोहेल आणि प्रसादची खुन्नस ह्या गोष्टी लगेच आठवतात.

बाकी पाकचे इतरवेळी समान्य वाटणारे काही खेळाडू आपल्या विरुद्ध अगदी वाघ असायचे अकिब जावेद, अझर मेहेमुद, अब्दुल रझाक, सलिम मलिक, इजाज अहमद, रमिझ राजा ही नावं ठळक आठवतात.

>>>पण १९८५ मधला ऑस्ट्रेलियातील बेन्सन अॅण्ड हेजेस कप आला, आणि मॅचेस चे कव्हरेज किती सुंदर असू शकते हे दिसले. तेव्हा मॅचेस पाहिलेल्यांना पहाटे उठून ५ वाजल्यापासून अतिशय स्पष्ट व सुंदर प्रक्षेपणात भारताने मिळवलेले विजय आठवत असतील. वर्ल्ड कप फायनल प्रमाणे महत्त्व आलेल्या त्या मॅच मधे भारताने पाक ला दणदणीत हरवले, लगेच शारजा मधे फक्त १२५ रन्स जिंकायला हवे असताना पाकला ८७ मधे उखडून मॅच जिंकली. असे एक दोन लक्षात राहण्यासारखे सामने सोडले तर विशेष काही नव्हते.<<< सहमत आहे.

लेख व त्यातील गंमतीजमतीयुक्त भाग छानच आहे. पण दोन षटकारांची तुलना अगदीच भाबडी आहे.

सचिनचा षटकार - एक क्लासिक क्रिकेटिंग शॉट! सहसा थर्ड मॅनला सिक्स मारली जायची नाही तेव्हा अतिशय परिणामकारकपणे मारलेली सिक्स! शोएबच्याच वेगाला दिशा देऊन मारलेली सिक्स! डीप थर्ड मॅनला फिल्डर होता, कॅचही जाऊ शकला असता अश्या ठिकाणी मारलेली सिक्स! सचिन आऊट झाला असता तर आपल्या सगळे खेळाडू मानसिक पायजम्याच्या नाड्या धरून पळत सुटले असते अशी अवस्था! एक इतका प्रभावी षटकार की ग्रेटेस्स्ट सिक्स ऑफ द इयर हा पुरस्कार सचिनला शोएबच्या हस्तेच देण्यात आला. माध्यमांनी 'शोएब विरुद्ध सचिन' असे एक काल्पनिक युद्ध मॅचच्या आधीच अतीप्रमाणात रंगवलेले असल्याने त्या मोमेंटला सचिन विजयी झाला यामुळे भारतीयांच्या मनावर तो षटकार कायमचा कोरला गेला. सलग दोन चौकार आणि नंतर हा षटकार आल्यामुळे शोएबची गोलंदाजीच बंद करण्यात आली (जी पाक कर्णधाराने केलेली पहिली चूक ठरली कारण मनोबल कमी झाले). सचिन बादही होऊ शकला असता इतका तो फटका बेजबाबदार होता खरे तर! सचिन प्रेमाखातर आणि त्याला क्रिकेटचा गॉड मानण्यात धन्यता मानून त्या षटकारावर आज आपण प्रेम करत असलो तरीही सत्य हेच आहे की तो फटका थोडा जरी आत राहिला असता तरी एक कॅच होऊ शकला असता. आणि तो फटका आत राहू नये किंवा राहावा यावर सचिनचे त्या क्षणी नेमके काहीही नियंत्रण नव्हते. या षटकाराने मॅच फिरली वगैरे नाही. हा षटकार पहिल्या तीन एक षटकांतच मारला गेला. सचिनच्या ९८ धावांमुळे मात्र मॅच फिरली. पण तरीही तो बाद झाला तेव्हा पुन्हा आपण हरू शकू अशी अवस्था होतीच.

मियाँदादचा षटकार - अशक्यप्राय विजय साकारणारा षटकार! ज्या काळात कसोटी क्रिकेटमधील 'सेटल व्हा आणि पेशंटली खेळा' मानसिकता प्रभावी होती त्या काळात जिंकण्याची जिगर दाखवणारा षटकार. हुकुमी षटकार. फटका मारल्यानंतर त्याच क्षणी मियाँदादने केलेला जल्लोष हेच दाखवत होता की चेंडू सीमापार जात आहे की नाही याबद्दल त्याच्या स्वतःच्या मनात काहीही शंका नव्हती. सामन्याचा शेवटचा चेंडू होता. चौकार किंवा षटकार गेला नसता तर पाकचा पराभव अटळ होता. त्या चेंडूनंतर सामना वाचवण्याची एकही संधी त्यांच्याकडे उरलेली नव्हती.

जावेद मियाँदाद जरी पाकडा असला आणि आपला शत्रू असला तरीही या दोन षटकारांमध्ये काहीही तुलना नाही. मियाँदादचा षटकार निर्विवाद श्रेष्ठ होता. त्याची परतफेड आपण अजून करू शकलेलो नाही आहोत.

मात्र, निव्वळ एक क्रिकेटिंग शॉट या दृष्टिकोनातून पाहिले तर सचिनचा षटकार सरस ठरेल हे खरे!

-'बेफिकीर'!

मला सामना वृत्तपत्रातर्फे बक्षिस म्हणुन हा सामना मिळाला होता.. अगोदर भारत - इंग्लंड सामना (नेहरा फेम) ठरला होता, पण visa लांबल्यामुळे भारत पाक सामना दिला.. कालच पाहील्या सारखी ही मॅच व्यवस्थित आठवतेय.. १ मार्च २००३ -- शिवरात्रीचा दिवस.. सकाळी हॉटेल मध्ये veg म्ध्ये काय असे विचारले तर potato, tomato आणि beans असे उत्तर मिळाले.. टोमॅटोची puree असेल असा विचार करुन किचनला गेलो.. तर त्याने अगोदरच्या व्यक्तिला ज्या hot plate वर बिफ गरम करुन दिले होते त्यावरच माझे टोमॅटोचे दोन large slice गरम करुन दिले.. शिव शिव.. सेंच्युरियन वर तर क्रिकेटचा कुंभमेळा असल्यासारखी गर्दी होती.. सुदैवाने मला दुसर्‍या rowत जागा मिळाली होती.. सचिन प्रक्टिससाठी आला आणि प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयघोष सुरु केला.. मग तो बापडा परत गेला.. आपण पहीलेच षटक १० चेंडुंचे टाकले.. पाकड्यांनी व्यवस्थित सुरुवात करत धावफलक हलता ठेवला होता.. आप्ल्याला २७४ चे टार्गेट मिळाले.. ह्या मॅचपर्यंत आपण एव्हढ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता.. ब्रेक मध्ये काहीतरी खाउन घ्यावे म्हणुन बाहेर आलो.. स्नॅक कॉर्नरला तोबा गर्दी होती.. आणि अचानक संचारबंदी जाहीर व्हावी अश्या प्रकारे सर्व जण पांगले.. कारण आतम्ध्ये सचिनने धडाका उडवीला होता.. शोएबने पहील्याच षटकानंतर गोलंदाजी थांबीवली.. तब्बल १८ धावा सचिनने चोप्ल्या.. माझ्या पुढील रांगेत नाना आनि त्याचा मुलगा मल्हार बसले होते.. मल्हारने लगेच एक पोस्टर बनवीले.. rawalpindi express derailed नंतर अवघ्या ५ षटकांत भारताच्या ५० धावा लागल्या.. ६वे षटक मात्र अडचणीचे गेले सेहवाग आणि नंतर पहिल्याच चेंडुवर गांगुली बाद झाला.. आपल्या ५७ धावा असताना रझ्झाक कडुन सचिनला जिवदान मिळाले आणि त्यावर विश्वास नबसुन वासिम अक्र्म जोरात ओरडला "तुझे पता है की तुने किसका कॅच छोडा है" नंतर मात्र कैफ व सचिनने जास्त पडझड होवु दिली नाही.. crampमुळे सचिन बेजार झाला होता म्हणुन सेहवाग runner बनुन आला.. सचिन शतकाच्या समिप आला होता.. माझ्या बाजुच्या डिस्प्ले स्क्रिनवर त्याचा शतकी फोटो घेण्यासात्।इ मी सज्ज झालो आणि तो दुर्दैवाने बाद झाला.. अजुन १०० धावा हव्या होत्या मात्र युवराज आणि द्रवीडने विजयाला गवसणी घातली.. आणि शिवरात्रीला जगभर दिवाळी साजरी झाली.. आफ्रिकेत देखिल सर्वत्र भारताचे झेंडे घेवुन रस्ते housefull झाले होते..

मस्तच रे! 'तो' सचिन पुन्हा कधी दिसतोय याची ऊत्सुकता आहे(च).

बाकी मियांदाद चा 'तो' षटकार ही जर वाघाची डरकाळी असेल तर सचिन चा 'तो' षटकार म्हणजे ऊधळेल्या घोड्याच्या पेकाटात सणसणीत हाणलेला चाबूक होता!

Happy मजा आली वाचताना अमोल.

मियांदादच्या सिक्सरची भिती माझ्या मते त्या मॅचमधले मुख्य खेळाडू गेल्यावर कमी होत गेली होती. गांगुली आल्यापासून तर तो effect जवळजवळ गायब झाला होता. अक्रम भरात असताना शारजामधे काही मॅचेस त्याने एक हाती काढल्याही होत्या पण overall we were way more competitive. मला आठवते कि ह बदल सुरू झाला ढाक्क्याच्या त्या ३०५ च्या चेस नंतर. तिथे पण सचिनने साकलेनला धुवून सुरूवात करून दिली होती. गंगू नि ऱोबिन सिंग ने नंतर मोमेंटम कायम ठेवला.

मियांदादच्या शेवटच्या सिक्स सारखाच सिक्स (कि फोर) मारून राजेश चौहान ने शेवटून चौथ्या चेंडूवर मॅच काढली होती ९७ मधे ती आठवतेय का ? कराची पूर्णपणे pin drop silence mode मधे गेले होते.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64562.html

जावेद मियाँदाद जरी पाकडा असला आणि आपला शत्रू असला तरीही या दोन षटकारांमध्ये काहीही तुलना नाही. मियाँदादचा षटकार निर्विवाद श्रेष्ठ होता. त्याची परतफेड आपण अजून करू शकलेलो नाही आहोत. >> हे फारसे पटत नाही. अमोल चा मुद्दा दोन्हींचा तुलना करायचा असला तरी परतफेडीचा नसून psychological dominance चा आहे. ही World Cup match होती त्यामूळे अधिक दबाव होता. जे सचिनच्या शॉटबद्दल म्हणताय तेच इथेहि लागू होतेच. शेवटचाच चेंडू होता, ४ धावा हव्या होत्या, त्यामूळे मारावा लागणारच होता. जर चेंडू खरच एखाद इंच खाली राहता तर यॉर्कर झाला असतात वगैरे. त्यामूळे ह्या जर तर ला काही अर्थ नाही. मियाँदाद ने शेवटचा बॉलमधे शर्मा ला योग्य तर्‍हेने read केले नि सचिनने शोअब ला हेच फक्त खरे आहे.

क्रिकेटचं तंत्र/मंत्र काही कळत नाही, पण हे लिहिलेलं आवडलं. Happy

मियाँदादची सिक्सर लेजन्डरी झाली होती तेव्हा हे चांगलं आठवतंय. इतकं, की नटराज पेन्सिल्सची एक जाहिरात लागायची (ये मॅच की आखरी गेंद .. और ये लगा सिक्सर - नटराज फिर चँपियन!) त्यातला तो नटराज म्हणजे मियाँदादच अशी माझी बरीच वर्षं खात्री होती. Happy

जावेद चा षटकार आठवतो............मग तुम्हाला हृषीकेश कानिटकर चा षटकार का नाही आठवत...तो सुध्दा शेवटच्या बॉलवरच मारलेला..तेव्हा तर ५ रन्स (बहुदा) हव्या होत्या..मुख्य म्हणजे पाकिस्तान विरुध्द एका नवख्या मुलाने कानफाडात येउन मारावी असा मारलेला

उदयन, मलापण लेख वाचताना "आता कानिटकर येईल, मग येईल" असं झालं होतं. कानिटकरचा तो सिक्सर मारल्यावर आम्ही घरामधे जे काही ओरडलो होतो, ते पाहून आजूबाजूच्या घरातले लोक "काय झालं" म्हणून विचारत आले होते Happy

फारेण्ड, लेख मस्त. खासकरून नुसत्या खेळाचा नव्हे तर त्यामागच्या सायकॉलॉजिकल वॉरचा जो विचार केला आहेस, ते जास्त आवडलं.

माझ्यामते सचिनची हि सिक्स एफर्टलेस आहे, कानफडात वगैरे नसुन जाता-जाता शोएबला मारलेला टप्पु (टपली) वाटतो. सचिनने बर्‍याच खणखणीत सिक्स मारल्या आहेत - ऑन साइड्ला...

मस्त लेख लिहिलाय
कारण सचिन मस्त खेळला तरी आपण विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणलेले आहेत! फिदीफिदी
>>>+१

जबरी लेख....

मला सचिनने ओलोंगाच्या एका षटकात घातलेला धुमाकूळ आठवला. आधीच्या मॅचमधे सचिनला पहिल्याच ओव्हरला बाद केल्यावर ओलोंगाने न भूतो न भविष्यती असं सेलेब्रेशन मैदानात केलं होतं..... त्याच्या दुसर्‍याच मॅचमध्ये सचिनने ओलोंगा ला असा काही चोपला की यंव रे यंव....

http://www.youtube.com/watch?v=-UqdrrGVMDY

अमोल, सही लिहीलं आहेस. मजा आली

माझ्यामते मियांदादच्या सिक्सची परतफेड मात्र राजेश चौहानने पाकिस्तानमध्येच केली होती.

Rajesh Chauhan's six helped India to win over Pak in an ODI at Karachi Oct 1997

लोकहो, धन्यवाद. बाकी प्रतिक्रिया नंतर देतो, पण माझ्या आठवणीप्रमाणे कानिटकर ने फोर मारली होती, सिक्स नव्हे. आणि वरती असामीने म्हंटल्याप्रमाणे ही त्या शॉट्सची तुलना नाही, त्यांच्या परिणामांची आहे.

खरंच, सचिन च्या त्या षटकाराने, भारत - पाकिस्तान सामन्यांमधला भारताकडून असलेला दबाव / भिती वगैरे कायमचं काढून टाकले. sheer psychological dominance effect चा विचार करता त्या षटकाराचं महत्व खूप मोठं आहे.

सचिन चा शॉट ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क होती. शॉर्ट, वाईड, फास्ट, शोल्डर हाईट च्या बॉल ला सचिनने शास्त्री च्या भाषेत 'slash it hard' केलं होतं. सचिन ने सुरुवतीलाच शोएब ची हवा काढून घेण्यासाठी केलेला तो प्रहार होता. मियांदाद चा शॉट त्या मॅच च्या संदर्भात आणी नंतरही effective ठरला, पण त्या वेळी त्याला बॅट फिरवण्याव्यतिरीक्त काही पर्याय नव्हता. तो बॉल कसाही असता, तरी मियांदाद ला बॅट फिरवावीच लागणार होती.

सहसा, त्या सामन्याविषयी लिहीताना / बोलताना, द्रविड-युवराज partnership ला तितकसं महत्व दिलं जात नाही. पण कैफ च्या खेळीइतकीच ती भागिदारी देखिल महत्वाची होती. नंतर दिनेश मोंगिया (हाय! :() आणी tail-enders होते. एक विकेट जरी पडली असती, तरी मॅच फिरली असती. (सगळ्या बॉलर्स च्या ओवर्स शिल्लक होत्या).

रच्याकने, कानिटकर ने षटकार नाही, चौकार मारला होता. Happy

छानच लिहीलय. फोकस आहे तो त्या सिक्सरमुळे झालेल्या मानसिक दबावावर. आवडला लेख.

पाकचा एक ऑल टाईम ग्रेट कथ्थकली गूगली बॉलर होता. त्यानेही भारताविरुद्ध शेवटच्या बॉलवर सिक्सर मारल्याचे आठवतेय. ( त्या सामन्यात मियांदाद व्यवस्थापक होता आणि तिथून तो ओव्हर रिअ‍ॅक्ट होत होता).

बेस्ट लिखाण !

१० वर्षं झालीत...! अगदी काल-परवा पाहिल्यासारखी लख्ख आठवतेय ही मॅच.. Happy

छान शैलीदार फलंदाजी पहावी तसं वाटलं लेख वाचताना!
स्पीनच्या विरुद्ध [ against the spin] फटके मारणं, स्लिपच्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून जाईल असा फटका/टपली मारणं, रिव्हर्स फटका इत्यादी गोष्टी पूर्वी निषिद्ध समजल्या जात व वरच्या प्रतिच्या सामन्यांत तर कुणी तसा प्रयत्न करणंही पापच समजलं गेलं असतं. आज कसोटी सामन्यातही थर्डमॅनच्या दिशेनेच काय तर स्क्वेअर पाँईंट व कव्हर पाँईंटलाही षटकार मारले जातात. वरील सर्व फटके सफाईने व विश्वासपूर्वक खेळून त्या फटक्याना प्रतिष्ठा मिळवून देण्यात सचिनचा सिंहाचा वाटा आहे; मला वाटतं सचिनच्या 'त्या' षटकाराचं महत्व या दृष्टीने कांहीसं ऐतिहासिकच असावं. मियांदादचा षटकार हें मात्र भारतासाठीं खरंखुरं कानफटात मारणंच होतं आणि भारत-पाक सामने होत रहातील तोंवर तरी तो फटका विसरला जाणं केवळ अशक्य आहे ! त्या षटकाराचं भावनिक महत्व दोन्ही देशांसाठी पराकोटीचंच आहे !
[ मला आतांच्या एक खेळाडूने सांगितलं कीं आतां बॅट बनवण्याच्या तंत्रात इतकी प्रगति झाली आहे कीं सध्यां बर्‍याच फलंदाजाना आपण विनासायास षटकार मारताना पहातो त्याचं बरचसं श्रेय त्यांच्या अतिशय किंमती बॅटसना जातं; खरं खोटं देव जाणे ! ]

अप्रतिम लेख, सकाळीसकाळी मजा आली वाचायला.
भारत-पाकिस्तानच्या सर्वात कटू आठवणी शारजाच्या सामन्यात भरल्या असाव्यात, तसेच शुक्रवारी आपण त्यांच्याशी हरायचोच हरायचो. ८०-९० च्या दशकातील तो काळ खरेच भारत-पाक सामना बघणे नकोसे वाटायचे असे लाजिरवाणे हरायचो. पाकिस्तानी खेळाडूंची जिद्द मानायला हवी हा तेव्हाचा ठरलेला डायलॉग. पण आपण त्यांच्याबरोबर पुचाट खेळायचो याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. उलट सुलट बरेच लिहिता येईळ इथे. बर्‍याच आठवणी जागवल्या या लेखाने. माझा सर्वात आवडता खेळाडू दादा गांगुली याने टोरेंटोमध्ये पाकिस्तानची लावलेली वाट निव्वळ अविस्मरणीय. मात्र सचिनच्या त्या इनिंगने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची लावलेली वाट हा खरेच एक टर्निग पॉईंट होता कारण भारतीय क्रिकेट रसिक जगात कोणावर जळत असतील तर ते पाकी वेगवान गोलंदाजांवर. पुढे द्रविड आणि युवराजच्या भागीदारीचा उल्लेखही योग्यच. ती देखील तितकीच महत्वाची, कारण तिथे घाण केली असती आणि रडतखडत जिंकलो असतो तर त्या सामन्याचा तितका इंम्पॅक्ट राहिला नसता. आज २०-२० च्या जमान्यात मात्र आक्रमकता हाच सर्वात मोठा गुण झाल्याने सगळी परिमाणेच बदलली आहेत. त्यामुळे युवराज-कोहली सारख्यांच्या उद्धटपणाबद्दल केलेली टिप्पणीदेखील योग्यच.

Pages