डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे.

Submitted by सुबोध खरे on 20 December, 2025 - 00:14

डिंक

डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे.

हा एक चर्चेचा विषय आहे

सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे.

पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या.

आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे.

या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण "मूल हवे" हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते.

कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो.

अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो.

ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते.

येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही.

परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत.

(अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही)

लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत.

बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो.

बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते.

परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे.

कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती.

परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे.

आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली

१) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला.

२) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही

३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते.

४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते.

५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे.

६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती.

हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले.

त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले.

तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले.

एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते.

परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले.

काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले.

हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही.

तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भक्ती धन्यवाद, इतके बोल्ड करून कोट केल्याबद्दल Happy

आणि हो, तुम्ही म्हणालात त्याला सुद्धा अनुमोदन.

काही जणांच्या आयुष्यात ध्येय आणि महत्वकांक्षा वेगळ्या असतात. त्यात मुलांच्या संगोपनासाठी स्थान/वेळ नसतो. किंवा काहीना आवडच नसते. हे सगळे आपापल्या जागी बरोबर असतात.

मला फक्त हा आयुष्यातील एक मोठा निर्णय घेणाऱ्यांना सावध करायचे होते की आज जसे तुमचे आयुष्य आहेत तसेच कायम नसेल तर विचार करून निर्णय घ्या इतकेच.

बाकी मुले तुमच्या आयुष्यात काय घेऊन येतात हे मूल झाल्याशिवाय समजत नाही.
मी स्वतः एकाच मुलावर (मुलीवर) थांबणार होतो. पण बायको आणि इतर घरचे यांचे मत आणि इच्छा लक्षात घेऊन दुसरा चान्स घेतला आणि त्यानंतर मला जाणवले की माझा एकावर थांबायचा निर्णय किती चुकीचा होता.

पैशासाठी/ करियर साठी मूल नको हा निर्णय नंतर चुकीचा वाटू लागलेली अनेक उदाहरणे आहेत. कारण पैसे नंतर सुद्धा मिळू शकतो. परंतु एकदा वय निघून गेलं कि मग मूल होणं हे तितकं कठीण आणि दुरापास्त होऊन जातं. सुदैवाने वैद्यकीय शास्त्र जितके प्रगत होते आहे त्याने उशिरा सुद्धा मुले होण्याची शक्यता वाढत आहे.

सध्या माझ्या कडे दोन गरोदर स्त्रिया सोनोग्राफी साठी येत आहेत ज्यांचं वय ५० आहे.आणि तिसरी नुकतीच बाळंत होऊ एक सुदृढ मुलाला तिने जन्म दिला आहे.

अर्थात तिघीना मूल होत नव्हतं आणि बरेसचे उपचार करून शेवटी कृत्रिम गर्भधारणेने( IVF) झालं आहे. दोघींच्या मनात एक मोठी भीती होती कि जसं वय वाढतं तसं मुलात व्यंग असण्याची शक्यता वाढत जाते. हि शक्यता ५० पटीने वाढते.

आता सांख्यिकी म्हणजे काय तर आपले डोके बर्फात त्याहेवले आणि पाय भट्टीत ठेवले तारसरासरी तापमान २३ अंश असल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटते.

मी त्याना व्यवस्थित विश्लेषण करून सांगितलं. २१ व्या वर्षी मूल विकलांग असण्याची शक्यता दोन हजारात एक आहे तर पन्नासाव्या वर्षी हीच शक्यता ४० मध्ये १ आहे. म्हणजेच मूल विकलांग असण्याची शक्यता ५० पट आहे. पण याचा अर्थही असा आहे कि १००० पैकी २५ मुलं विकलांग असतील. म्हणजेच ९७५ मुलं अव्यंग असतील किंवा तुमचा मूल अव्यंग असण्याची शक्यता ९७.५ % आहे.

तेंव्हा आपल्याला मूल हवंच कि नको हा निर्णय प्रथम घ्यायचा. आणि एकदा मूल हवं ठरवलं कि गरोदरपणात सर्व चाचण्या करून घ्यायच्या पण त्यात मूळ जर विकलांग असेल तर धीर ठेवून गर्भपाताची तयारी ठेवायची. असेही ९७.५% मुलं अव्यंगच असतील.

तिन्ही स्त्रियांच्या सर्वच चाचण्या उत्तम निघाल्या. एकीने मातृत्वाचा आनंद मिळवला असू इतर दोघी आता त्याच मार्गावर आहेत.

या सर्व चर्चेत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मूल नको असेल तर का नको हे ठाम विचारावर आधारित असायला हवं. उगाच आता नको किंवा त्याबद्दल भीती संकोच किंवा आपल्याला जमेल कि नाही याची चिंता यामुले पुढे ढकलत राहणे (PROCRASTINATION) असे होऊ नये.

आमची स्थिती SITK (Single income Two kids) अशी आहे. पण मुले नसती तर आपली आर्थिक स्थिती चांगली असती आणि आयुष्य जास्त छान असते हा विचार मनात कधी येत नाही.

तीव्र सहमती.

दोन मुलं आपसात खेळताना बघणे यातील आनंद दुसऱ्या कशानेही येत नाही. मुळात मुलांना आपले आईबाप श्रीमंत आहेत कि गरीब, काळे कि गोरे यामुळे शष्प फरक पडत नाही

आणि

आपल्याला पैसा किती हवा हि एक फार सापेक्ष कल्पना आहे.

पण आयुष्यात आपल्याला पैसा किती आणि केंव्हा हवा आणि त्यासाठी आपण किती वेळ द्यायचा हे ज्याने त्याने ठरवणे आवश्यक आहे.

बाकी मुले तुमच्या आयुष्यात काय घेऊन येतात हे मूल झाल्याशिवाय समजत नाही.

१०० % च नव्हे तर १००० % सहमत

नवीन रिसर्च असा वाचण्यात आला की महिलेचे वय वाढल्याने मुलात व्यंग येते हे चूक आहे. जर त्या वय वाढलेल्या महिलेला तरूण, निर्व्यंग पुरूष जोडीदार असेल तर होणारे मुलात व्यंग असण्याची शक्यता तरूण महिला+ तरूण पुरूष या जोडीसारखीच असते.
परंतु महिलांचे जोडीदार जनरली त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असल्याने मुलात व्यंग येते आणि त्याचे खापर महिलेच्या वाढलेल्या वयावर फोडले जाते. म्हणजे पुरूषाचे वय हा खरा deciding factor आहे. जेव्हा कृत्रिम गर्भधारणा केली जाते तेव्हा पुरूषाचे सर्वात चपळ, निरोगी स्पर्म वापरल्याने वयाने मोठा पुरूष असला तरी फरक पडत नाही.
https://www.varta.org.au/resources/research-and-publications/men-have-bi...

या चर्चेला काही अर्थ नाही. सगळे सब्जेक्टिव आणि व्यक्तिगत निवडीचा मामला आहे. इतर कुणी काय चूक काय बरोबर हे सांगू शकत नाही.
- मुलांना खेळताना बघण्यासारखा दुसरा आनंद नाही >> असे आपण म्हणू शकत नाही, ते तुमचे मत झाले. इतर कुणाला त्यापेक्षा जास्त आनंद करियर ग्रोथ, प्रवास, संगीत, इतर कशानेही होऊच शकतो.
- मुले तुमच्या आयुष्यात काय घेऊन येतात हे मूल झाल्याशिवाय समजत नाही. >> हेही तसेच विधान आहे. चाइल्ड फ्री लाइफस्टाइल चा आनंद काय असतो ते त्या स्टाइल ने जगणार्‍यांनाच माहित, तो मुलाबाळांच्या पसार्‍यात अडकलेल्यांना काय कळणार असे ते लोक म्हणतील Proud
तसंच निसर्गतःच मुले हवीशी होणे, रीप्रॉडक्शन ही अंतःप्रेरणा असणे हेही अर्धे विधान झाले. त्याच निसर्गात अशीही योजना असते - पक्षी , प्राण्यातही हे पहायला मिळते की जेव्हा दुष्काळ, रीसोर्सेस ची कमतरता असते तेव्हा ते कमी पिल्ले जन्माला घालतात. तसेच माणसांनी ठरवणे - की नैसर्गिक संसाधनांची कमतरता असलेल्या भविष्यात मुले जन्माला घालावीशी न वाटणे हेही काही निसर्गाविरुद्ध नाही.

<<<< चाइल्ड फ्री लाइफस्टाइल चा आनंद काय असतो ते त्या स्टाइल ने जगणार्‍यांनाच माहित, तो मुलाबाळांच्या पसार्‍यात अडकलेल्यांना काय कळणार असे ते लोक म्हणतील Proud
>>>>>>>>

लोकांनी ते कशाला म्हणायला पाहिजे. मी स्वतःही ते म्हटलेच आहे की..
दोन्ही बाजू आपापल्या जागी बरोबर आहे असेच मी म्हणत आहे. एखादे वाक्य कोट न करता पूर्ण पोस्ट वाचा ना.

पण परिस्थिती, आपली आवड, इच्छा, अपेक्षा कायम तशीच राहील याची खात्री नसते म्हणून मुलेच नको हा मोठा निर्णय घेताना विचार करून घ्या इतकेच म्हणत आहे. त्याला चुकीचे ठरवत नाहीच आहे.

निसर्गात प्राणी conscious planning करत नाहीत. माणूस मात्र नैतिक + सांस्कृतिक + वैचारिक घटकांवर निर्णय घेतो.
दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण माणसाने आणलेली वेळ ही नैसर्गिक नाही. माझा प्रतिसाद त्या दृष्टीने होता.

<<<< तसेच माणसांनी ठरवणे - की नैसर्गिक संसाधनांची कमतरता असलेल्या भविष्यात मुले जन्माला घालावीशी न वाटणे हेही काही निसर्गाविरुद्ध नाही.
>>>>>

माणसे नैसर्गिकरित्या असा विचार करत असावेत असे वाटत नाही कारण मनुष्य हा एक स्वार्थी प्राणी आहे. तो त्याचा स्वभाव आहे. जग राहणार की नाही याचा माणूस शून्य विचार करतो. गाड्या चालवतो, विमाने उडवतो, एसी जाळतो, मोबाईल वापरतो, लॅपटॉप बडवतो, इतकी ऊर्जा जाळतो ज्याची मोजदाद नाही. माणसाची विकासाची व्याख्याच जगाच्या मुळावर उठली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने मिळालेल्या सर्व सुखसोयी उपभोगताना नैसर्गिक संसाधने पुढील पिढीला राहतील की नाही याचा वैयक्तिक पातळीवर आपण जराही विचार करत नाही. त्यामुळे असा एखादा माणूस मी मूल जन्माला घालून जगाचा भार वाढवणार नाही असे बोलत असेल तर तो स्वतःलाच फसवत आहे. उगाच आव आणत आहे. चार पैसे आले की छोटी गाडी विकून मोठी गाडी घ्यायची आणि म्हणायचे मी जगाची चिंता करून मूल जन्माला घालत नाहीये इज नॉट पटणेबल! माणूस फक्त आपल्या आजच्या आनंदाचा विचार करतो.

ज्याने येत्या पिढीचा विचार करून जेन्यूइनली स्वतःची लाईफस्टाईल बदलली आहे त्याची गोष्ट मात्र वेगळी.

मा़झा प्रतिसाद पुन्हा लिहीतो. आधीचा प्रतिसाद लिहीपर्यंत टंचाई असेल तर मूल जन्माला न घालणे असा सूर होता.

हा नवा नियम बनतोय असे वाटले. तो कोट न करण्याचे कारण प्रतिसाद वैयक्तिक होऊ न देणे याची खबरदारी होते. पण त्यामुळे त्याचा सूर वेगळा वाटू शकतो. त्यामुळे थोडक्यात पण नेमका पुन्हा खाली देत आहे.

एका वाक्यात सांगायचं तर "जर निसर्गाशी संतुलित नातं ठेवलं असतं, तर मूल परवडत नाही अशी चर्चा उभीच राहिली नसती."
( हे फक्त परवडत नाही या मुद्द्यासाठी आहे). निसर्गाने पुनरूत्पादनाची व्यवस्था केली आहे. ती निसर्गाची योजना आहे. पण नैसर्गिक सर्व गोष्टी माणूस कबूल करतो असे नाही ( हे राहून गेलं).

माणसाची लोकसंख्या अमर्याद वाढवली कारण सुरक्षितता आणि नैसर्गिक संसाधनांचा नाश. त्याने आपली जीवनशैली सुरक्षित आणि नैसर्गिक संसाधनांचा नाश करत सुखसोयीची बनवल्याने त्यासाठी त्याची भूक वाढली. ही भूक भागवण्यासाठी कमाई होईल कि नाही ही शंका म्हणजे कृत्रिम टंचाई आहे. त्या मुळे मूल होऊ न देण्याचा निर्णय नैसर्गिक नाही असे म्हणणे आहे.

थोडक्यात तुम्ही बौद्धीक प्रगती करा पण त्याच्या आहारी न जाता तुमच्या प्रगतीच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी म्हणून एखाद दुसरे मॉडेल बनवा. मात्र किमान नैसर्गिक जीवनशैली जगा (हल्ली तिकडेच जग चालले आहे). तर जगण्यासाठी अवास्तव कमाईच्या दबावाखाली जगण्याचा आनंद घेता येणार नाही ही परिस्थिती ओढवणार नाही.

इथे निसर्ग विरूद्ध निवड ही तुलना अनाठायी आहे.

अन्नसाखळीचा उल्लेख केला होता. प्राणी अमर्याद मुलं जन्माला घालतात. पण अन्नसाखळीच्या निसर्गाच्या योजनेमुळे त्यांची संख्या मर्यादीत राहते.
माणसाने ही अन्नसाखळी पण खंडीत केली आहे. जंगलं नष्ट केली, शिकारीमुळे प्राण्यांच्या काही प्रजाती संपल्या, पाणी प्रदूषित करून ठेवलं, जमिनीखालची संसाधने संपवत आणली आणि त्यामुळे पर्यावर धोक्यात आणले. माणसाच्या जन्मापासून जेव्हढे प्रदूषण झाले नाही किंवा पर्यावरणाची हानी झालेली नाही तेव्हढी गेल्या दीडशे वर्षात त्यातही गेल्या साठ वर्षात झाली आहे.

एकच उदाहरण - शिकारी प्राणी भूक लागली तरच शिकार करतात. पण माणूस भूकेसाठी नाही तर जीभेसाठी हिंसा करतो. पार्ट्या करतो त्यात नॉन व्हेज असत. यामुळे शाकाहारी प्राणी पक्षांची कत्तल होते. त्यांची कृत्रिम पैदास केली तर जंगलसंपत्तीवर ताण येतो. संतुलन हा निसर्गाचा पाया आहे. त्या विरोधात जाणारी आपली जीवनशैली आहे.
या विध्वंसक जीवनशैलीत माणसाला आराम मिळतो आणि त्यासाठी प्रचंड पैसा लागतो. हे कृत्रिम, अनैसर्गिक आहे. या अनैसर्गिक जीवनशैलीच्या मागे लागून (आपण, मी सुद्धा) आज मूल नको या स्टेजला येऊन पोहोचलो आहे.

मैत्रेयी +११११
मुलांना वाढताना पाहण्यात आनंद असतो. पण प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असूच शकते. मुलांना योग्य रीतीने वाढवताना द्यावा लागणार वेळ, घ्यावे लागणारे कष्ट हे इतर कशात लावून त्यातून आनंद मिळू शकतो.

एक लेखक आणि मैत्रेयी यांच्या प्रतिसादाचा कॉमन फॅक्टर असेल तर लिहा.
आजच्या जगात मूल नकोसे वाटणे हा ही ऑटो करेक्शनचीच प्रोसेस समजा. समजा आपण नैसर्गिक संतुलन पुन्हा प्रस्थापित केले आणि शक्य तितके निसर्गाशी एकरूप होऊन राहू लागलो तर मूल जन्माला घालावेच असे किती जोडप्यांना वाटेल ?

रोगराई, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मूल दगावणे, प्रतिकूल हवामान अशा संकटांमुळे हा विचार येणार नाही का ?

बापरे, असंबद्द प्रतिसादांची संख्या इतकी वाढत चाललीय की आता धागे वाचणे सोडावे लागेल असे वाटतेय Happy किती प्रतिसाद ओलांडत जायचे Happy

बाकी प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी हे वर आलेले मत माझेही आहे.

ज्याला जसे आवडते तसे जगु द्यावे, जजमेंटल होऊ नये वगैरे उद्योग माणसे करायला लागली तर टाईम्पास कसा करायचा हा प्रश्न पडेल समस्त लोकांना. Happy

यावर बरेच रिसर्च पेपर्स आहेत.
तीन पेपर्सची लिंक इथे देऊन ठेवतो.
https://www.ijcrt.org/papers/IJCRT2508108.pdf The Psychological Condition Of DINK Couples In
The 21st Century: An Interdisciplinary, Global, And Statistical Analysis
https://www.pewresearch.org/short-reads/2025/11/03/dual-income-no-kids-w...
Dual income, no kids: What we know about ‘DINKs’ in the U.S.

https://rjpn.org/ijcspub/papers/IJCSP24B1168.pdf
A Sociological perspective of DINK culture in India

>>जर विकलांग असेल तर धीर ठेवून गर्भपाताची तयारी ठेवायची. >>
अमेरीकेत बर्‍याच राज्यांत गर्भपाताचा पर्यायच उरला नाहीये त्यामुळे त्या फ्रंटवर जे काही होईल ते झेलायची मनाची तयारी करुनच चान्स असे झाले आहे. यात बाळ केवळ काही तास जगेल, खूप काँप्लीकेशन्स असलेले बाळ किती वर्षे जगेल माहित नाही, डाऊन सिंड्रोम असलेले बाळ आयुष्यभर सांभाळायचे वगैरे काहीही असू शकते. केवळ काही तास जगेल अशा बाळाच्या जन्माशी रिलेटेड भावनिक ट्रॉमा, शारीरिक ट्रॉमा आणि आर्थिक संकट हे लग्नाच्या नात्याचीच परीक्षा घेणारे ठरतेय. बाकी केसेस त्याहून तणावाच्या. सगळे नॉर्मल म्हणताना दुर्दैवाने मिसकॅरीएज झाले तर काय, योग्य आरोग्य सेवा कशी मिळेल याबाबत दर राज्यातले कायदे आणि यासंबंधीचा गोंधळ, त्यातून योग्य सेवा मिळायला होणारा विलंब- गंभीर परीणाम वगैरे बरेच काही घडत आहे. actively miscarrying पण आज उपलब्ध असलेल्या उच्च तंत्रज्ञानामुळे fetal cardiac activity जाणवतेय तर सेवा नाकारली जावू शकते किंवा जीवावर बेतेपर्यंत थांबा असे होते. सेल्फ मॅनेज्ड अ‍ॅबॉर्शन म्हणून पेशंटलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे/ तसे होण्याची शक्यता आणि जोडीला त्यात डॉक्टरांनाही ओढण्याची शक्यता वगैरे सगळे इतके भयावह झाले आहे की एवढ्या सगळ्या त्रासापेक्षा नको ती प्रेग्नंसी असे तरुण जोडप्याला विशेषत: स्त्रीला वाटूच शकते. यातून DINK जोडपी वाढतील का हे काळच सांगेल.

गर्भपाताचा वरील मुद्दा या धाग्यावर अगदीच अप्रस्तुत आहे असं वाटतंय मला तरी. जोडप्यांना मुले का होत नाहीत/का नको आहेत हा मूळ मुद्दा आहे. त्याची कारणे :
१. करिअरमध्ये अडथळा म्हणून सध्या नको/कधीच नको.
२. परवडत नाही म्हणून सध्या नको/कधीच नको.
३. पृथ्वीवर/समाजात भार नको म्हणून मुले नकोत.
यापैकी एक वा अधिक कारणांमुळे जोडपी मुले होणे टाळत असतील.

जाता जाता: (अवांतर होत आहे पण तरीही. गर्भपात करणे आता अशक्य झाले आहे आणि त्यामुळे जगबुडी होणार आहे, असा बऱ्याचदा जो आव आणला जातो, त्याबद्दल अधिक माहिती)
<< अमेरीकेत बर्‍याच राज्यांत गर्भपाताचा पर्यायच उरला नाहीये >> मूल नको असेल तर अमेरिकेत प्रत्येक राज्यात Safe Haven law अस्तित्वात आहे. नवीन जन्माला आलेले मूल नको असेल तर जवळच्या पोलिस स्टेशन, फायर स्टेशन किंवा चर्चमध्ये देता येते आणि ही गोष्ट क्रिमिनल ठरत नाही. The child becomes a ward of the state. All fifty states, the District of Columbia, and Puerto Rico have enacted such statutes.

>>गर्भपाताचा वरील मुद्दा या धाग्यावर अगदीच अप्रस्तुत आहे असं वाटतंय मला तरी. >>
तुमच्या मताचा आदर आहे. मात्र मूल होवू देणे- न देणे, कधी होवू देणे, व्यंग असलेला गर्भ वाढवायचा की नाही हे जे स्वातंत्र्य आहे ते, एकूणच स्त्रीची रिपॉडक्टिव हेल्थ आणि त्यावर घाला आल्यास होणारे दूरगामी परीणाम आणि डिंक हे सगळे एकमेकाशी निगडीत आहेत. डिंकच्या बाबतीत सर्व काळजी घेवून अनप्लॅन्ड प्रेग्नंसी आल्यास काय हा प्रश्न उरतोच. वर आयव्हीएफ बद्दल धागाकर्त्यानेच लिहीले आहे आणि त्यात गर्भपाताचा मुद्दा आला म्हणून अमेरीकेतली त्याबाबतची परीस्थिती मांडली.
मी स्वतः पुरती प्रो लाईफ आहे. मात्र ते मी दुसर्‍यावर लादू इच्छित नाही. काही निर्णय हे ती व्यक्ती आणि तिचे डॉक्टर यांच्याच हातात हवेत यावर मी ठाम आहे.
>>मूल नको असेल तर अमेरिकेत प्रत्येक राज्यात Safe Haven law अस्तित्वात आहे.>> हा लॉ मला माहित आहे पण त्याला खूप लहान विंडो आहे. इथे बर्‍याच रुरल एरीआत ना जवळ फायर स्टेशन आहे ना पोलीस स्टेशन. सेफ हेवन बॉक्सेस तर बर्‍याच ठिकाणी नाहीच आहेत, थोडक्यात खाजगीपण नाही, समाजाचे दडपण आले. दुसरे असे की आधीच्या ९ महिन्यांचे काय आणि पोस्ट प्रेग्नंसीने बदललेल्या देहाचे काय हा प्रश्न उरतोच. प्री आणि पोस्ट पार्टम डिप्रेशन आणि इतर आरोग्याशी रिलेटेड समस्यांबद्दल तर मी बोललेही नाही.
मी आव आणत नाहीये. कायद्यांच्या घोळामुळे डॉकने obgy practice बंद केली आणि आता मूल जन्माला घालणे तर सोडाच त्या आधी रेग्युलर प्रीनेटल केअरसाठी देखील १०० मैलाच्या परीसरात सेवा उपलब्ध नाही अशी वेळ आलेय.

अमेरीकेत बर्‍याच राज्यांत गर्भपाताचा पर्यायच उरला नाहीये.

सध्या अमेरिकेतील याबद्दलची स्थिती भयावह आहे.

त्यातून तेथील काही राज्यातील अतिहुशार लोकप्रतिनिधी परमेश्वराच्याही वरताण निघाले आहेत . उदा

In 2019, Ohio lawmakers introduced a bill that included a provision requiring doctors to attempt to "reimplant" an ectopic pregnancy into the uterus or face "abortion murder" charges. The bill was widely condemned by the medical community, as reimplantation of an ectopic pregnancy is a medically impossible procedure that does not exist.

Medical professionals, including the American College of Obstetricians and Gynecologists (ACOG), stated that an ectopic pregnancy cannot be moved and is never a viable pregnancy. An ectopic pregnancy occurs when a fertilized egg implants outside the uterus, most commonly in the fallopian tube, which is a life-threatening condition for the pregnant person. The only medical treatment is to terminate the non-viable pregnancy to save the patient's life.

The proposed legislation, House Bill 413, was never passed into law. It died in the House after referral to a committee in November 2019. The idea was also included in an earlier Ohio bill that year (House Bill 182), which also did not pass.

सुदैवाने या विधेयकाचा कायदा पास झाला नाही. अन्यथा ओहायो राज्यातील अनेक स्त्रीरोग तज्ञांनी तेथून दुसऱ्या राज्यात स्थलांन्तर करण्याचे बेत केले होते.
बाकी अनेक राज्यात काहीही झालं तरी गर्भपात करायचा नाही असे विचित्र कायदे पास झालेले आहेत. त्यात मेंदू नसणे ( ANENCEPHALY) किंवा असे भयंकर व्यंग असलेली मुले जी जन्मल्याबरोबर लगेच किंवा काही तासात मृत्यु पावणार आहेत अशा स्थितीत सुद्धा गर्भपाताला बंदी आहे.

या मूर्ख लोकप्रतिनिधींना एकच विचारावेसे वाटते तुम्ही घर बांधायला घेतले आणि ते बांधल्यावर कोसळून पडणार आहे हे माहिती असताना तुम्ही ते बांधलेच पाहिजे असा कायदा करता का? किंवा एखादी कंपनी साफ तोट्यात गेली तरी ती पाच वर्षे चालवलीच पाहिजे असा कायदा करता का?

बलात्कारातुन जर गरोदर पण आले तरी गर्भपाताला परवानगी नाही असे आचरट कायदे सुद्धा काही राज्यात आहेत. जर जवळच्या नातेवाईकाने बलात्कार केला तर त्या स्त्रीने कुठे जायचे? येथे तुम्ही असंही म्हणू शकत नाही कि यात त्या स्त्रीनेच बलात्काराला आमंत्रण दिले. ( काही हलकट लोक असा अविर्भाव आणतात कि उत्तान कपडे घालून स्त्रीनेच बलात्काराला आमंत्रण दिले)

ज्या बाबतीत स्त्रीची काहीही चूक नाही अशा स्थितीत एखाद्या गुन्हेगाराचे मूल नऊ महिने आपल्या पोटात वाढवायची इतकी अमानुष शिक्षा त्या स्त्रीला का दिली जावी इतका मूलभूत विचार सुद्धा हे हुशार लोकप्रतिनिधी करू शकत नाही? आणि अगदी हे मूल तुम्ही अनाथाश्रमात दिले/ राष्ट्र्राने वाढवले म्हणजे आईची भावनिक गुंतवणूक संपली का? वर त्या मुलाच्या भावनिक स्थितीबद्दल काय?

याहून आचरट पण म्हणजे काही राज्ये आईचा जीव धोक्यात असेल तरी गर्भपाताला परवानगी देत नाहीत.

या सर्व विचित्र स्थिती मुळे अमेरिकेत अनेक स्त्रीरोग तज्ज्ञांनी आपला प्रसूती व्यवसाय बंद केला आहे किंवा दुसऱ्या राज्यात स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत.

अशा स्थितीमुळे अनेक जोडपी दोलायमान स्थितीत आहे की मूल होऊ द्यावे कि नाही. गर्भधारणा झाली आणि एकाची बदली झाली किंवा नोकरी गेली किंवा H१B व्हिसाची गडबड झाली तर काय हि टांगती तलवार कायम राहते. शिवाय सर्व काळजी घेऊनही गर्भधारणा झाली तर नक्की काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न तेथील जोडप्यानं आहेच. कारण कोणतंही संतती नियमनाचे साधन हे १०० % सुरक्षित नाही.

आधीच्या ९ महिन्यांचे काय आणि पोस्ट प्रेग्नंसीने बदललेल्या देहाचे काय हा प्रश्न उरतोच. प्री आणि पोस्ट पार्टम डिप्रेशन आणि इतर आरोग्याशी रिलेटेड समस्यांबद्दल तर मी बोललेही नाही.
"तीव्र सहमती"

यामुळेच अमेरिकेत सध्या जोडप्यांची स्थिती विचित्र झालेली आहे.

नवीन जन्माला आलेले मूल नको असेल तर जवळच्या पोलिस स्टेशन, फायर स्टेशन किंवा चर्चमध्ये देता येते आणि ही गोष्ट क्रिमिनल ठरत नाही.
>>>>
नवीन जन्म झालेले मुल देता येईलही पण ते वाढलेली नखे किंवा केस कापून टाकण्याइतके साधे सोपे आहे का? मुळात मुलाला पोटात वाढवताना आणि जन्म देताना काही शारीरिक, मानसिक तयारी असावी का नाही? आणि ते बाईच्याच शरीरात वाढत असल्याने आणि फक्त तिच्याच (बापाच्या किंवा असले कायदे करणाऱ्या लोकांच्या नाही) जीवाला धोका असल्याने तिच्या मताला काही किंमत आहे की नाही हा प्रश्न आहे.

आर्यलँडमध्ये मुल पोटात असताना प्रचंड कॉम्प्लिकेशन्स झाल्यामुळे त्याची डेंटिस्ट आई सांगत असूनही कायद्यापायी तिचा गर्भपात केला नाही आणि सेप्टीसिमिया होऊन ती बाई दगावली ही केस माहिती असेलच. तसेच लैंगिक हिंसेच्या बळी ठरलेल्या बायका मुलींनी त्यातून गर्भधारणा झाली तर ते मुल मनाविरुद्ध कॅरी करायचे का? त्यांच्या मनाचा काही विचार आहे की नाही?

गर्भपाताचा विषय येताच अपेक्षेप्रमाणे धागा घसरला आहे. माझ्यामते गर्भपाताबद्दल चर्चा करायची असेल तर DINK चर्चेव्यतिरिक्त वेगळा धागा काढणे योग्य ठरेल.

यामुळेच अमेरिकेत सध्या जोडप्यांची स्थिती विचित्र झालेली आहे. >> गर्भपाताची सोय नाही अथवा गर्भपात करणे खूप कठीण आहे, म्हणून DINK जोडपी मुले होऊ देत नाहीत, असे काही मत असेल तर चालू द्या.

भारत आणि अमेरिका असेही दोन वेगळे धागे हवेत या विषयावर. कारण अमेरिकेच्या समस्या, तिथले कायदे कानून, कल्चर, कुटुंबसंस्था, सगळे वेगळेच आहे. इथे ज्या सभासदांना त्याची कल्पना नाही ते रिलेट करूच शकत नाहीत. यातून मुद्द्याचा गोंधळ उडू शकतो. कारण जो उपाय/मार्ग/सल्ला एखाद्या भारतीय जोडप्याला लागू तोच अमेरिकन जोडप्याला गैरलागू असू शकतो.

>>> भारत आणि अमेरिका असेही दोन वेगळे धागे हवेत या विषयावर. कारण अमेरिकेच्या समस्या, तिथले कायदे कानून, कल्चर, कुटुंबसंस्था, सगळे वेगळेच आहे. इथे ज्या सभासदांना त्याची कल्पना नाही ते रिलेट करूच शकत नाहीत. यातून मुद्द्याचा गोंधळ उडू शकतो. कारण जो उपाय/मार्ग/सल्ला एखाद्या भारतीय जोडप्याला लागू तोच अमेरिकन जोडप्याला गैरलागू असू शकतो.<<<
+१

वंश सातत्य ही निसर्गाने सर्व प्राणिमात्राला दिलेली आदिम प्रेरणा आहे. प्रत्येक प्राणी आपला वंश पुढे चालावा ह्या साठी धडपडताना दिसतो. Survival, Growth आणि Reproduction हे जीवाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत.

मानवाने बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर प्राणिमात्रांवर आक्रमण करून स्वतःची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढवली आहे. त्यामुळे समतोल साधण्यासाठी निसर्गाने DINK, Non-heterosexual orientations असलेले LGBTQIA+ (नोट : त्यांना विरोध नाही, चर्चेच्या ओघात उल्लेख केला आहे), प्रजनांनासंबंधीत समस्या (कमी स्पर्म काऊंट इत्यादी) ह्या बाबी उद्युक्त केल्या असतील काय?

माणसाच्या पिल्लाला सर्वार्थाने सक्षम होण्यासाठी जवळपास २० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागतो. माणूस मोठा लबाड आणि स्वार्थी असल्याने त्याने ही जबाबदारी स्वीकारलीच नसती त्यामुळे की काय निसर्गाने कामक्रीडेबरोबर आनंदाची अनुभूती जोडून दिली आहे. किमान आनंद मिळवण्यासाठी तरी माणूस कामक्रीडा करेल आणि त्याचे बाय-प्रॉडक्ट् म्हणून मुले जन्माला येतील अशी निसर्गाची योजना असावी असे वाटते.

माणूस मोठा लबाड आणि स्वार्थी असल्याने त्याने ही जबाबदारी स्वीकारलीच नसती >> ऑ!! सगळं मुसळ केरात! इथे बहुतेक लोक मुलं वाढवण्यात आनंद आहे, ते बर्डन/ लोढणे नाही सांगत आहेत. ते आता कामक्रीडेतील आनंदासाठी सांगत आहेत का?

निसर्ग एलजीबीटीक्यू निर्माण करायला काही देव वगैरे नाही. की हे काही हल्ली आलेलं नवं फॅड वगैरे नाही. लोकसंख्या वाढीवर हिट्रो सेक्ष्युअल व्यतिरिक्त लैंगिक व्यवहार हे उत्तर/ natural सिलेक्शन वगैरे काही आहे हे तर अचाट आहे.

मूळ निसर्गाची योजना काय आहे हे सांगणे कुणाला असंबद्ध वाटतेय तर कुणाला निर्सगाची योजना नाही तर आज माणूस जे करतोय ती स्वाभाबिक प्रेरणा वाटतेय.

आपण इथपर्यंत कसे येऊन ठेपलो हे सांगणे म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखे का वाटतेय ? जुन्या काळात कुणा कुणाला मूल जन्माला घालावेसे वाटले नसेल, पण तसा डेटा आपल्याकडे नाहीच. अन्य प्राण्यांमधे मूल जन्माला घालावेसे वाटत नाही हा ही डेटा नाही. त्यामुळे ज्याचा डेटा नाही त्यावर बोलण्यात अर्थ नाही.

आज फक्त माणसालाच मूल जन्माला घालावेसे वाटत नाही याचं काय कारण असावं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न जर आउट ऑफ सिलॅबस असेल तर या सिलॅबसमधे मी नापासच.

Pages