चोराची आक्रांतवाडीतला उपक्रम

Submitted by एक लेखक on 10 December, 2025 - 08:51

चोराची आक्रांतवाडीतल्या नव्या पिढीकडे आता मोबाईल आले होते. तरी त्यांचा डीएनए काही बदललेला नव्हता.

पुण्या मुंबईत काही खुट्टं झालं कि आपलं गाव मागं राहू नये ही इच्छा तशी स्वाभाविकच होती.
कालच हाणबा मगरनं पिल्लू सोडून दिलं होतं.
हाणबानं जयसिंगराव देशमुखांच्या वाड्यावर जायला सुरूवात केल्यापासनं आपल्याला गावात मान मिळतोय असं त्याला वाटत होतं. म्हणून माझा उल्लेख आता हाणबा असं न करता हनुमंतराव असा करावा असं तो ज्याला त्याला सांगत सुटला होता.

काही तरी करून आख्ख्या गावाचं लक्ष वेधून घ्यावं आणि मग देशमुखांनी पाठीवर हात फिरवून भले शाब्बास म्हणावं एव्हढीच त्याची इच्छा.
या इच्छेपायी त्यानं गावात रक्तदान शिबीर, श्रमदान शिबीर, स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम राबवले होते. पण कुणी कुत्रं सुद्धा तिकडं फिरकत नव्हतं. हे असंच चालू राहिलं तर एक दिवस वाड्यावर पण जायची चोरी होईल. त्याचं मन त्याला सांगत होतं.

अशाच निराश अवस्थेत बसला असताना त्यानं फेसबुकवर अचानक एक ट्रेण्ड पाहिला.
"शांतता पुणेकर रांगत आहेत "

"च्या मायला या पुणेकरांच्या ! असलं काय तरी डोकॅलिटी काढतात. लैच जंक्शान आयडिया हाय "

त्यानं मग ही माहिती पारावर दिली. पारावर आता नवीन पिढी बसत होती.
रामचंद्र सुतार अर्थात राम्या सुतारानं विचारलं
"पण पुणेकर कशापायी रांगाय लागलं म्हणायचं ?"
तसा हाणबा विचारात पडला. या राम्याला चांभार चौकशाच फार. आता पुणेकर रांगायला लागले म्हणजे काय तरी कारण असंलच की.
आपल्याला सगळंच कशाला माहीत असायला पाहीजे असा विचार त्याच्या मनात आला. त्याला राम्याबाचा रागच आला होता.
पण आता कार्यकर्ता असल्यानं तसं न बोलता तो म्हणाला

"हितंच तर आपन माती खातो का न्हाई ? मला सांन्गा अजून आपला गाव कुटं हाय हे सुदीक कुनाला माहित नाही , काय ?"
यावर सर्वांनी "खरं हाय" या अर्थानं माना डोलावल्या.
त्यावर " का न्हाई ?" हा उपप्रश्न त्यानं जोडला.
यावर चमत्कारी चंद्यानं "आम्हाला काय माहित ?" असं भसकन उत्तर दिलं.
"हे असं असतंय. म्हनुन आपल्या गावाला मान न्हाई. गावाला मान पायजे का नको ?"
"तर ! मान तर पायजेच कि "
" पन मान कशाला पायजे ?"
" म्हंजी मान ताठ ठिवुन तालुक्याच्या बाजारात जाता येतंय "
काळू बोंबाटे म्हणाला. तालुक्याला याचं काय काम होतं सगळ्यांना माहीत होतं. बाजारात जाऊन सुकट, बोंबीलवाल्या रखमेच्या ठेल्यावर उडायचं हे याचं काम.
हाणबानं आता स्पेशल आवाज काढत सांगितलं.
"गावाला मान असला कि मुख्यमंत्री बी इकडंच येत असतोय, मोठी मोठी मानसं इकडं येत असतात"
" असं ? पन मान कसा मिळायचा ?"
" अंग अशी . मान पान पायजेल तर कायतरी जंक्शान आयडिया काढायला नगं ?"
" पन अशी आयडिया कोन सांगनार ?"
" मगापासनं मग काय सांगतोय ? पुन्यातल्या लोकांनी आज लै भारी उपक्रम केलाय न्हवं का ?"
" त्यो रांगायचा ?"
" तर काय "
"पन त्यानी मान कसा मिळनार ?"
"आरं मर्दांनु, पुनेकर म्हण्जे एक नंबर डोकॅलिटी. त्यांनी ट्रेण्ड चालवलाय "शांतता पुणेकर रांगत आहेत" अन या ट्रेण्डला आख्ख्या देशभरात लोकंफॉलो करून राहिलीत "
" आत्ता !"
" मग दहा हज्जार शेअर, ६६.८७ एम लाईक्स अन कमेन्टी तर इच्चारूच नका"
" बाबौ "
"मंग काय म्हनता ?"
आता चौघांच्या नजरेत चमक आली.

आणि त्या रात्री पारावर योजना शिजली.

दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच हाणबाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या घरातल्या बाया झाडू खराटे घेऊन रस्त्यात उभ्या राहिल्या होत्या. जे कोण येईल त्याला अडवत होत्या,
गंगी आली तर तिला अडवायला जिजीला पुढं केलं.
जिजीनं गंगीला टेचात विचारलं " ए गंगे, जास्त शहाणी झाली का ?"
" का गं जिजी काय झालं ? "
" वाचलं नाय का ग्रुपवर ?"
" काय ?"
" म्हंजी वाचलं न्हाई म्हन की"
" तेच तर म्हंतीय ना मी"
" आ गं शहानी. आख्ख्या गावानं वाचलं अन तूच लै मोठ्ठी लागून गेली का ? आणू का घरावर मोर्चा "
यावर गंगी घाबरली " काय चुकलं तर सांभाळुन घ्या. काय झालं "
" अंग अश्शी, हे बघ आज सगळ्यानी कुटं बी जाताना रांगत जायचंय "
"पण का ?"
" आ त्ता ! आज गावात उपक्रम आहे "शांतता ! चोराची आक्रांतवाडीकर रांगत आहेत "
" ह्ये काय म्हनायचं "
" गप बस. पुन्यातल्या लोकांनी काल रांगून दाखवलं. आता आपन पन मागं राह्यचं नाय, काय ?"
" पन हे कशाला म्हंते मी ?"
"म्हंजी गं , आगं आज आपन रांगलो का नाय तर अग मुख्यमंत्री गावाला येनार "
" काय सांगती, आन काय साडीवाटप करनार ?"
" आगं कायतरी मोठ्ठा इचार कर की "
" गावाला मेट्रो सुरू व्हनार "
" कोन म्हनलं ?"
" ह्येच कि हानबा "
" त्यो मुडदा व्हय , त्येचं काय ऐकायचं "
यावर जिजीनं गंगीचा हात पिरगळला. मग गंगीनं विव्हळत सांगितलं.
" आता रांगत जाऊन दळन कसं आणु "
" ते काय माहित नाहि "

गावात दिवसभर हाच धडाका चालू होता.
जे येईल त्याला रांगायला भाग पाडलं जात होतं.
सकाळची एसटी आली. त्यातून दिल्लीवरून शिवशंकर जोशाचं पोरगं आलं. तर त्याला पन सामान पाठीवर ठेवून रांगायला लावलं.
रांगून रांगून गावाचं ढोपर अन गुडघे कामातून गेले होते.

गाव रांगत होतं अन हानबाचे कार्यकर्ते व्हिडीओ काढन्यात अन फेसबुकवर टाकन्यात बिझी होते.
फेसबुकवर नुसता कल्ला झाला होता.

"शांतता चोराची आक्रांतवाडीकर रांगत आहेत" हा ट्रेण्ड जोरात चालू होता.
हानबाला लैच भारी वाटलं.

कुणीतरी आपली गुजराथी वाहिनीला टॅग केलं होतं.

दुपारून हानबाला देशमुखांचा फोन आला.
" हानबा लका आरं काय चालवलंय गावात ?"
' आबा ! आपन पुन्याच्या जोडीला गाव आनायचा उपक्रम राबवलाय "
" लका ! इच्चारता येत न्हाय वय ? आता मला टिव्ही वाल्यांचा फोन आलाय, काय सांन्गू ?"

हानबाच्या तर अंगावर पोतंभर मांस चढलं.
"आबा त्येन्ना सांगा कॅमरा घेऊन गावात या तर सांनग्तो "

आता आबा पन वैतागले.
" तुज्या आयला तुज्या हानब्या ! आरं आधी मला माहीत नको व्हय काय भानगड हाय ती ? वाड्यावर ये दोन मिन्टात"

आता हानबाला काळजी वाटायला लागली. तरी पण एकीकडं आशा होतीच कि एकदा का आबा खूश झालं कि मग ग्रामपंचायतीला उभं करनारच,

आबांनी त्याला दारात पाय घरात पाय असतानाच फैलावर घ्यायला सुरूवात केली.
" तुला रं कुनी सान्गितले न्सते उद्योग ?"
मग हानबानं सर्वांना सांन्गितलेली स्टोरी परत पहिल्यापासनं सांन्गितली.

यावर आबा खूश व्हायच्या ऐवजी अजून भडकले.
"आरं येड्या भोकाच्या ! आख्खा महाराष्ट्र मजा घेतोय. लका ते मीम का काय करत सुटलेत. लाज आनली लका गावाला "
"आवं आबा काल पुन्यातल्या लोकांनी केला ना कार्यक्रम "

" कार्यक्रम त्यांनी आपला केलाय. च्यायला पुन्याची लोकंच लै वस्ताद "
आता हानबाच्या पोटात खड्डा पडला.
" आबा, पन काय झालं ?"
"काय झालं ?"
हानबा काहीच न समजल्यासारखा प्रश्नचिन्हासारखा उभा.

"भोसडीच्या ती चितळेच्या दुकानापुढची रांग होती . तिथं लिवलं व्हतं "कृपया रांगेत यावे "
हानबानं फक्त मान डोलावली. तिचा अर्थ समजलं असाही होत होता अन नाही समजलं असाही होत होता.
" मान काय हलवतु बैलासारका. कुनीतरी रांगेवरच्या वरच्या दांडीवर च्युईंगम लावलं "
तरी हानबाला कळंना.
" बिकाडोक्याच्या , त्यामुळं पाटी झाली कृपया रांगत या "
आता हानबा हसत सुटला.
" लका येडीच हाईत ही पुन्याची मानसं "
" येडे ते न्हाईत. त्या पाटीवरनं ते दिवसभर मजा घेत बसले होते कि "शांतता पुणेकर रांगत आहेत"
आता हानबा गप बसला.
"आन भोसडीच्या, कसली चवकशी न्हाई, कुनाला इच्चारायचं न्हाई आन आख्ख्या गावाला रांगायला लावलंय "

हानबाला आता मोठीच चूक झाल्याचं कळून आलं.
पन आता टीव्हीवाले आलेच तर काय करायचं ?

मग आबाच म्हनले
" जा आता ते सगळं वाय झेड गिरी थांबव. अन टिव्हीवाल्यांच्या पुढ्यात येऊ नगं , काय ?"
"न्हाई येत "
" अन आलाच तर मग तंगडं तोडून ठेवीन "

हानबा खालच्या मानेनं चावडीवर आला. हे चालू केलेलं थांबवा म्हनताना जिवावर आलं होतं.
पण तंगडं वाचवायचं तर नाईलाज होता.

गावात पण हानबाची चर्चा होती.

टिव्हीवाले आणि गेले पण.
व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर संध्याकाळी टिव्ही वर जयसिंगराव आबांना बघा असा मेसेज आला.

संध्याकाळी सर्वांनी आपली गुजराथी चॅनल लावला.

जयसिंगराव पवार शुद्ध मराठीत बोलत होते. गावातल्या लिमयानं आधी पाठ करून घेतलं असणार.
" देशाची लोकसंख्या वाढली आहे. दर सेकंदाला १२७ लहान बाळं जन्माला येत आहेत. मला सांगा , जर हे असंच चालू राहीलं, तर या नवजात बाळांना आपण काय भविष्य देणार आहे ? त्यांना खायला काय देणार ? रोजगार काय देणार ? शिक्षण काय देणार ? रहायलाजागा कुठून देणार ? आणि म्हणून या ठिकाणी आपण या समस्येकडं लक्ष वेधून घेण्यासाठी हा उपक्रम राबवला होता. "

या त्यांच्या वक्तव्यावर मग मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या आणि लगेचच पॅनल डिस्कशन होतं.

त्यात लोकसंख्येचा विस्फोट आणि चोराची आक्रांतवाडीचा उपक्रम असं शीर्षक दिलेलं होतं.
थोड्याच वेळात चर्चा चार बायका आणि दहा पोरं यांच्यावर गेली. आम्ही एकच लग्न करणार आणि हे चार चार लग्न करून लोकसंख्या वाढवत राहणार. म्हणूनच ही परिस्थिती आली. अशानं एक दिवस हा देश शांतताप्रेमी लोकांचा देश होईल. इथं लवकरच त्यांचा कायदा लागू होईल.
यावर मग एकच गदरोळ सुरू झाला.

हिरव्या उपरण्याने भगव्याची गचांडी धरली. ते सोडवायला इंजिनचं उपरणं आलं तर धनुष्यबाणानं त्याच्या पाठीत लाथ हाणली. मग इंजिन काय गप बसतंय. त्यानी खुर्ची उचलून बाणावर हाणली तर त्याचं धनुष्य वाकलं.
आणि मग जो गोंधळ झाला त्याचं नाव एकच.

हे सगळं टिव्हीवर बघत असताना देशमुखांचा फोन खणखणला .

फोन ठेवल्यावर आबा खुशीत आले होते. कारभारनीकडं बघून म्हणाले

"अगं ऐकती का ? आता आपण प्रदेशाध्यक्ष झालो आणि तू प्रदेशाध्यक्षीन !"
आणि गावात वार्‍यासारखी ही बातमी पसरली.

समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.
दमा किंवा व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांचा प्रभाव जाणवतो.
फुल्यांच्या शब्दांचा मोह टाळला असता तर छानच.