डिंक
डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे.
हा एक चर्चेचा विषय आहे
सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे.
पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या.
आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे.
या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण "मूल हवे" हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते.
कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो.
अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो.
ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते.
येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही.
परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत.
(अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही)
लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत.
बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो.
बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते.
परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे.
कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती.
परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे.
आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली
१) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला.
२) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही
३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते.
४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते.
५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे.
६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती.
हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले.
त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले.
तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले.
एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते.
परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले.
काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले.
हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही.
तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल
आज फक्त माणसालाच मूल जन्माला
आज फक्त माणसालाच मूल जन्माला घालावेसे वाटत नाही >>>>हे चुकीचे गृहितक आहे.
अन्य प्राण्यांमधे मूल जन्माला घालावेसे वाटत नाही हा ही डेटा नाही. त्यामुळे ज्याचा डेटा नाही त्यावर बोलण्यात अर्थ नाही. >>> असा डेटा आहे. सहज उपलब्ध आहे.
बाकी गर्भपात चर्चा या चर्चेत अगदीच इर्रेलेवन्ट आहे.
प्राणी आणि माणूस यांच्यात
प्राणी आणि माणूस यांच्यात निवड आणि प्राकृतिक आपदेमुळे जीव जन्माला न घालण्याचा त्यांच्या डीएनएत असलेला प्रोग्राम हा फरक आहे.
यावर विस्ताराने लिहीणे म्हणजे मोठी फिलॉसॉफिकल पोस्ट होईल. कदाचित गुगल वर मिळून जाईल.
माणूस भौतिक / आर्थिक / बौद्धीक विकासामुळे निवड करतो. हे प्राण्यात शक्य नाही.
निसर्गाची योजना, मानवी बुद्धी
निसर्गाची योजना, मानवी बुद्धी आणि मूल नको ही निवड
निसर्गाची योजना म्हणजे नियम नव्हे, तर स्वाभाविक, पुनरावृत्तीशील व्यवस्था. जन्म–मृत्यू, भूक–तृप्ती, वंशवृद्धी, अन्नसाखळी, आपत्ती .
हे सगळे निसर्गात आदेश म्हणून नाहीत, तर घडत राहणारे नमुने आहेत. जन्माला आलेला मी मरणार नाही अशी निवड करू शकत नाही.
निसर्गाच्या विरोधात जाणे म्हणजे निसर्गाला आव्हान देणे नव्हे, तर निसर्गाच्या मर्यादा न मानणे. इतिहास पाहिला तर लक्षात येते की निसर्गाच्या विपरीत घडवलेले प्रत्येक प्रयोग शेवटी विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहेत. ही गोष्ट माणसालाही लागू आहे.
माणसाने प्रगती केली . निसर्गाने दिलेल्या मूलभूत गोष्टी — अन्न, पाणी, हवा — या सगळ्या जीवमात्रांना मिळतात. पण माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर या सगळ्यावर नियंत्रण मिळवले. अन्नसाठे वाढवले, पाण्याचे स्रोत वळवले, हवामानाशी लढण्याची साधने निर्माण केली. वैद्यकशास्त्रामुळे मृत्यूदर कमी झाला. रोगराई, आपत्ती, अन्नटंचाई, ज्यामुळे निसर्ग जन्म–मृत्यूचे संतुलन राखत असे. त्या अडथळ्यांवर माणसाने मात केली.
याच टप्प्यावर एक विरोधाभास निर्माण झाला.
ज्या बुद्धीमुळे माणसाने जगणे सुसह्य केले, त्याच बुद्धीमुळे त्याला निसर्गाने दिलेला अत्युच्च आनंद, म्हणजे प्रजनन ओझे वाटू लागले.
“मूल परवडत नाही”, “वेळ नाही”, “जबाबदारी नको”, “स्वातंत्र्य कमी होईल” ही कारणे केवळ आर्थिक नसून जीवनशैलीची आहेत. माणूस इतका गुंतला आहे की त्याला जीवन टिकवणाऱ्या प्रक्रियेसाठीच वेळ नाही. ही स्थिती निसर्गाशी जुळवून घेण्याची नसून, निसर्गापासून पलायनाची आहे.
इथे मुद्दा असा नाही की मूल असावेच किंवा नसावेच. मुद्दा असा आहे की निवड करायची वेळच का आली?
पूर्वी निसर्ग आपोआप जन्मदर नियंत्रित ठेवत होता . आपत्ती, रोग, अन्नसाखळी यांमुळे. माणसाने हे चक्र उलटे फिरवले. लोकसंख्या वाढवली, जंगलं नष्ट केली, शहरे वसवली, संसाधनांचा भरमसाठ वापर केला. आता निसर्गाऐवजी माणसालाच जन्मदर नियंत्रित करावा लागत आहे. ही जबाबदारी निसर्गाची नव्हे, तर मानवी हस्तक्षेपाची परिणती आहे.
प्राणी आणि माणूस यातला फरक इथे ठळक होतो. प्राणी मूल टाळतो तेव्हा ते परिस्थितीमुळे .
अन्न नाही, धोका आहे, वातावरण प्रतिकूल आहे. माणूस मात्र मूल टाळतो तो आनंदाच्या कल्पनेमुळे. ही निवड जैविक नाही, तर बौद्धिक आहे. आणि म्हणूनच तिचे परिणामही दीर्घकालीन आणि व्यापक असतात.
माणसाच्या आनंदाची व्याख्या बदलली आहे का? कदाचित. पण अधिक नेमकेपणाने सांगायचे तर, आनंद तात्कालिक झाला आहे. स्वातंत्र्य, सोय, उपभोग . हे लगेच मिळणारे आनंद आहेत. संततीचा आनंद मात्र तसा नाही. त्याबरोबर जबाबदारी येते. कर्तव्ये येतात. त्याग, समर्पण येते. त्यामुळे बुद्धी त्याला नाकारते.
नंतर कधी कधी “मूल झाले असते तर बरे झाले असते” असे वाटते, पण तो अनुभवा अंती पश्चात्ताप असतो. पश्चातबुद्धी असते. निर्णयाच्या क्षणी तो दिसत नाही. हे म्हणणे सर्वांना लागू होणार नाही. एक उदाहरण आहे. एव्हढेच म्हणायचे आहे कि माणूस आनंदासाठी जेव्हां म्हणतो तेव्हां त्याचा तो विचार सर्वंकष असतो का ?
नाईलाजाने मूल नको ही कॅटेगरी इथे विचारात घेत नाही.
हा सगळा विचार माणसाला दोष देण्यासाठी नाही, तर प्रश्न विचारण्यासाठी आहे. फिलॉसॉफिकल विचार आहे. प्रत्येक जोडप्याने एव्हढा विचार करावा असे काही म्हणणे नाही. तसे होतही नाही.
माणूस निसर्गावर इतका विजय मिळवू शकतो की शेवटी निसर्गालाच नाकारू लागतो, तेव्हा तो खरोखर प्रगत म्हणायचा का?
की ही प्रगती एका टप्प्यावर स्वतःच्या मुळांपासून तुटण्याची प्रक्रिया ठरते?
उत्तर सध्या स्पष्ट नाही. पण प्रश्न टाळून चालणार नाही.
>>या मूर्ख लोकप्रतिनिधींना
>>या मूर्ख लोकप्रतिनिधींना एकच विचारावेसे वाटते तुम्ही घर बांधायला घेतले आणि ते बांधल्यावर कोसळून पडणार आहे हे माहिती असताना तुम्ही ते बांधलेच पाहिजे असा कायदा करता का? किंवा एखादी कंपनी साफ तोट्यात गेली तरी ती पाच वर्षे चालवलीच पाहिजे असा कायदा करता का?<<
हो आणि हो. अँड दॅट डिपेंड्स. खूप कांप्लिकेटेड प्रकरण आहे, फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणा हवंतर, इट्स ए प्रॉडक्ट ऑफ कॅपिटॅलिस्ट सोसायटि. पण तो या धाग्याचा विषय नाहि..
बाकि, उबोशीं सहमत. अमेरिकेत गर्भपात हा चावुन चोथा झालेला विषय आहे, तरिहि काहि लोक अजुन संभ्रमात का आहेत यावर विचार व्हायला हवा. हा सुद्दा या धाग्याचा विषय नाहि, तेंव्हा आता डिंकाचे लाडू खाउया, थंडित बरे असतात...
कारण जो उपाय/मार्ग/सल्ला
कारण जो उपाय/मार्ग/सल्ला एखाद्या भारतीय जोडप्याला लागू तोच अमेरिकन जोडप्याला गैरलागू असू शकतो.
हि गोष्ट मान्य आहे.
बाकी गर्भपात चर्चा या चर्चेत अगदीच इर्रेलेवन्ट आहे.
असं नाही. गर्भपातावर सरसकट बंदी मुळे त्या राज्यात किंवा देशात स्त्रियांची कामेच्छा कमी झाल्याचे ठोस पुरावे आहेत.
anti-abortion laws can contribute to reduced libido in women, primarily as an indirect effect of the associated psychological distress, anxiety, and depression.
While the immediate impact of abortion laws is on legal and physical access to care, the resulting emotional and mental health consequences can manifest as changes in sexual function, including reduced sexual desire (libido).
यामुळे मूल "सध्या नको" अशी मनोवृत्ती तयार होते आणि जसा काळ जातो तशी मूल होण्यामुळे करियर मध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे किंवा येणाऱ्या जबाबदारीमुळे किंवा 'जे चाललंय ते छान आहे' ( WHY ROCK THE BOAT) हा विचार प्रबळ होऊ शकतो.
हे दोन्ही मुद्दे मूळ प्रश्नाच्या उपशाखा आहेत. पण असंबद्ध नाहीत.
आपले वंश सातत्य राहिले पाहिजे
आपले वंश सातत्य राहिले पाहिजे हि जीवांची मूळ उर्मी ( instinct) आहे. आपल्या सारखा दुसरा जीव जन्माला घालणे हि मुळात सजीव आणि निर्जीव यात फरक करणारा एक महत्त्व पूर्ण मुद्दा आहे.
असं असलं तरी मानवाने वैचारिक प्रगल्भतेने नैसर्गिक उर्मीत विविध बदल घडवून आणलेले आहेत यात संततिनियमन हा एक महत्त्वाचा बदल आहे..
संततिनियमनाची साधने स्त्रियांच्या मुक्तीच्या मार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. संततिनियमना शिवाय सामान्य स्त्रियांची चूल आणि मूल यातून सुटका अशक्य होती.
याचा पुढचा टप्पा म्हणजे ज्या स्त्रीला मूल हवेच हि आंतरिक उर्मी नाही किंवा अत्यंत कमी आहे त्या स्त्रीला तशाच विचाराचा साथीदार मिळाला तर आपल्याला मूल हवेच हा आग्रहच राहत नाही. त्यामुलर त्यात संपूर्णपणे अनैसर्गिक असे काही नाही.
रानकुत्रे , लांडगे इ कळपात राहणारे प्राणी यांच्यात फक्त सर्वात सशक्त जोडपं ( अल्फा मेल आणि फिमेल) हे पुरुत्पादन करतात आणि कळपातील इतर सदस्य त्या पिल्लांच्या संगोपनात सर्वतोपरी मदत करतात.
म्हणजे आपले अपत्य असावेच हा निसर्गातही आग्रह असतोच असे नव्हे.
रानकुत्रे , लांडगे >> बरोबर.
रानकुत्रे , लांडगे >> बरोबर.
मधमाशांमधेही कामगार माशा पुनरुत्पादन करत नाहीत. पण इथे आनंदासाठी निवड हा मुद्दा लागू होत नाही (असं वाटतं).
रानकुत्रे, लांडगे, सिंह वगैरे कळपात राहणाऱ्या प्राण्यांचं उदाहरण बरोबर आहे. बहुतेक वेळा फक्त अल्फा जोडपंच प्रजनन करतं आणि बाकीचे कळपातील सदस्य पिल्लांच्या संगोपनात मदत करतात. पण इथून “म्हणजे निसर्गातही सगळ्यांनाच मूल हवं असतं असं नाही” असा थेट निष्कर्ष काढणं थोडं घाईचं ठरतं.
कारण प्राण्यांमध्ये इतरांना “मूल नको” असं वाटतं असं नाही. त्यांच्याकडे तसा विचारच नसतो. अल्फा जोडीच्या उपस्थितीत इतर सदस्यांचं प्रजनन हार्मोनल आणि सामाजिक कारणांमुळे थांबतं. म्हणजे तिथे निवड नाही, परिस्थिती आहे. कळप टिकवण्यासाठी आणि पिल्लं जगवण्यासाठी निसर्गानं अशी रचना केलेली आहे. इतर सदस्य स्वतःची पिल्लं नसली तरी वंश टिकवण्यासाठी पूर्ण योगदान देतात.
माणसातली स्थिती वेगळी आहे. माणूस मूल होऊ शकत असताना नको असा विचार करून निर्णय घेतो. हा निर्णय जैविक नाही, तर वैचारिक आहे. वेळ नाही, खर्च परवडत नाही, जबाबदारी नको, स्वातंत्र्य कमी होईल . ही सगळी कारणं जीवनशैलीशी आणि आनंदाच्या कल्पनेशी जोडलेली आहेत. इथे माझं मूल होऊ नये ही परिस्थिती नसून मला मूल नको ही निवड आहे. (आजच्या परिस्थितीत या सर्व निर्णयांचा आदर आहे. त्या विरोधात तक्रार नाही).
म्हणून प्राण्यांच्या उदाहरणावरून माणसाच्या मूल नको या निर्णयाचं जस्टीफिकेशन करणं फारसं योग्य दिसत नाही. प्राणी प्रजनन टाळतो तो कळपासाठी, वंशासाठी. (खरे तर कळपाच्या नियमासाठी). माणूस प्रजनन टाळतो तो स्वतःच्या सोयीसाठी. हा फरक लहान नाही.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की प्राण्यांच्या कळपात कोणी मूल जन्माला घालो अथवा न घालो, वंश टिकेल याची खात्री असते. माणसाच्या बाबतीत मात्र मोठ्या प्रमाणावर मूल नको ही निवड केली गेली तर ती (खात्री) डळमळीत होते.
थोडक्यात सांगायचं तर कळपाचे नियम असतात.
निसर्गात सगळ्यांनीच मूल जन्माला घालावं असा आग्रह नसतो, पण कोणी तरी जन्माला घालेल ही व्यवस्था असते.
माणसाची निवड मात्र हीच व्यवस्था प्रश्नांकित करते.
इतकाच फरक लक्षात घेतला, तर प्राणी–मानव तुलना कुठे थांबवायची ते स्पष्ट होतं.
प्राणी प्रजनन टाळतो तो
प्राणी प्रजनन टाळतो तो कळपासाठी, वंशासाठी. (खरे तर कळपाच्या नियमासाठी). माणूस प्रजनन टाळतो तो स्वतःच्या सोयीसाठी.
नक्कीच म्हणून ते चूकच ठरते असे नाही.
प्रथिनांची कमतरता निर्माण झाली प्राण्यातच नव्हे तर मानवात सुद्धा जननदर वाढतो हे वंशसातत्य टिकवण्यासाठी होते.
कळपातील इतर प्राणि जर आपले वंश सातत्य टिकणार हे माहिती असल्याने पुनरुत्पत्ती करत नाहीत तर तसेच काही मानव करत असतील तर त्यात गैर काय?
मग ते नैसर्गिक असो कि मानवाच्या वैचारिक प्रगल्भतेमुळे असो
नक्कीच म्हणून ते चूकच ठरते
नक्कीच म्हणून ते चूकच ठरते असे नाही. >> ते चूक हा मुद्दा नाही.
कळपातील इतर प्राणि जर आपले वंश सातत्य टिकणार हे माहिती असल्याने पुनरुत्पत्ती करत नाहीत तर तसेच काही मानव करत असतील तर त्यात गैर काय? >> कळपात जे फिट असतील त्यांची दादागिरी असते. कळपाचा हा नियम निसर्गाने बनवला आहे.
माणूस आपल्या राजासाठी मूल जन्माला घालत नाही असे नाही.
प्रगल्भतेचा मुद्दा डिबेटचा आहे. मानवाने निसर्गाचा नाश करत ही परिस्थिती येऊ दिली याला प्रगल्भला म्हणायचं का ?
थांबतो.
. माणसाची लोकसंख्या जशी वाढली
. माणसाची लोकसंख्या जशी वाढली तशी त्याने स्वतःच नियंत्रणातही आणली.
लोकसंख्या का वाढली? तर अधिक अन्न उत्पन्न करता येऊ लागल्याने उपासमारी टळली. वैद्यकीय आणि इतर विज्ञानविषयक संशोधनामुळे आयुर्मान वाढले. प्रसूती दरम्यान होणार्या तसंच अर्भकांच्या मृत्यूचं आणि पुढे रोगराईमुळे होणार्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीय घटलं. मग माणसाने जननदर आटोक्यात ठेवायचे उपायही शोधले. त्यासाठी लैंगिक सुखापासून वंचित राहायची गरज राहिली नाही. (हे खूप आधीपासून होत होतं, असं वाचलं आहे, पण आता ते सोपं झालं ). मृत्यूदर जितक्या झपाट्याने घटले, त्या तुलनेत जन्मदर घटायला वेळ लागला, त्यामुळे लोकसंख्या वाढली. पण आता युरोपातल्या काही देशांत , जपानमध्ये जन्मदर इतके घटले आहेत की तिथे लोकसंख्याही घटू लागली आहे.
याला सामाजिक (यात आर्थिक कारणेही आली) परिस्थितीही कारण ठरली. दुसर्या महायुद्धानंतर स्त्रियांचे कामासाठी घराबाहेर पडणे वाढले. समाजव्यवस्थेत व कुटुंबात मुलांना जन्म देणं व त्यांचे संगोपन हे त्यांचे मुख्य कार्य राहिले नाही.
जगण्यावरचे समाजाचे नियमबंध सैल झाले. माणूस आत्मकेंद्रित होऊ लागला. संयुक्त कुटुंबाकडून विभक्त कुटुंब, शहरीकरण यांचाही जननदर कमी होण्यात वाटा आहे.
--
LGBTQ+ लोकांना अपत्ये नको असतात हे कोणी ठरवेल? त्यांनाही अपत्य जन्माला घालायची, त्यांचे संगोपन करायची तितकीच असोशी असते. प्रेम कोणावर जडावं याबाबत ते वेगळे आहेत म्हणजे सगळ्याच बाबतीत वेगळे आहेत, असे नव्हे. त्यांनाही कुटुंब म्हणून राहायला आवडू शकते.
यातले अनेक जण IVF, surrogacy , दत्तक इ. प्रकारे अपत्यसुख मिळवतात. रिकी मार्टिनला चार मुले आहेत. मॅट बोमरला तीन मुले आहेत.
--
अपत्याची ओढ स्त्रीला अधिक असते , पुरुषाला कमी ही समाजमान्यता कायद्यावरही आरूढ झाली आहे. भारतात एकट्या पुरुषाला सरोगसीने अपत्यप्राप्ती करणे कठीण आहे. या नियमाविरोधात लोक न्यायालयात गेले आहेत.
एकट्या पुरुषाला मूल दत्तक घेण्यासाठीही न्यायालयीन लढे द्यावे लागले आहेत. जैविक मातापित्यांनी त्याग केलेल्या स्पेशल अपत्याला आदित्य तिवारी या तरुणाने न्यायालयीन लढा देऊन दत्तक घेतले.
सेक्स करणे आणि मुलांना वाढवणे
सेक्स करणे आणि मुलांना वाढवणे या दोन्ही नैसर्गिकरित्या आनंददायी प्रक्रियाच आहेत. तसे नसते तर माणसाचा वंश केव्हाच संपुष्टात आला असता.
पण आज लोकांना जास्त मुले नको आहेत किंवा मुलेच नको आहेत कारण त्यांचा सांभाळ करणे अवघड प्रकरण झाले आहे. निसर्गाची चिंता वगैरे ढोंगी कारणे आहेत.
पूर्वी पुरुष कमवायचा आणि स्त्रिया चूल मूल सांभाळायच्या.
दोघांतील एक पूर्णवेळ या कामासाठी देत असल्याने आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्याने मुलांचा सांभाळ करणे सोपे व्हायचे.
आज दोघेही जर कमवायला बाहेर पडत असतील, आजी आजोबा सोबत नसतील, तर मुलांचा सांभाळ कोण करणार यावरून वाद होणार, त्यापेक्षा नकोच ते वादाचे कारण म्हणत कित्येक जोडपी याकडे वळत असतील.
त्यामुळे जिथे दोघातील फक्त एकच व्यक्ती करिअर करत आहे, पैसे कमावत आहे आणि दुसरी घर सांभाळत आहे अशी सर्वसाधारण मध्यमवर्गीय जोडपी सुद्धा मुलांना नाही म्हणत आहे का हे बघायला हवे.
आणखी एक गोष्ट म्हणजे, आज काल वाढते स्ट्रेस, हेक्टीक लाईफ आणि चुकीची आहार पद्धती यामुळे कित्येकांना मूल होत नाही. मुळातच माणसाची प्रजनन शक्ती कमी होत आहे. पण त्यातील काही जणांना ते सांगायला कमीपणा वाटतो. हल्ली याचे प्रमाण वाढल्याने नॉर्मल झाले आहे पण जेव्हा याची सुरुवात झाली होती तेव्हा कमीपणा वाटत असावा. अशी जोडपी मग गपचूप प्रयत्न करून थकल्यावर आम्हाला मुळात मूलच नको आहे, आम्हाला आमची लाईफ जगायची आहे अशी कारणे देणे शक्य आहे. आणि अशा केसेस मध्ये आम्ही बघा मुलांशिवाय किती खुश आहोत हे सोशल मीडियावर आपली लाईफ पोस्ट करून आणखीन दाखवले जात असेल. त्यामुळे त्याचा आणखी ईतर जोडप्यांवर influence सुद्धा होत असेल.
इथे कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे नाही, किंवा कोणाला बघा तुम्ही कसे चुकलात म्हणायचे नाहीये, पण निसर्गाच्या पलीकडे विचार करता आपण एकूणच जी आयुष्य जगण्याची शैली बदलली आहे तिचा विचार करता हे जाणवले.
माझ्यामते, निसर्गाच्या नियमात राहून साधू तोच खरा विकास आणि नैसर्गिक प्रेरणेने जगू त्यातच खरे सुख समाधान
ऋन्मेष+`१ बरेचसे पटले.
ऋन्मेष+`१
बरेचसे पटले.
चूल आणि मूल हा मुद्दा इथे का
चूल आणि मूल हा मुद्दा इथे का आला ?
कारण अलिकडे पुरोगामी असण्याचे काही चेक्स टिकमार्क करावे मस्ट झाले आहे. स्त्री मुक्ती , चूल मूल यापासून मूल होऊ न देण्याची पाळी का आली ही चर्चा वेगळी काढता येत नाही का ?
चूल आणि मूल हे डिसायडिंग असेल तर मूलच जन्माला न घालण्याऐवजी पुरूषालाही जबाबदारी घ्यायला लावावी. चळवळ त्या अंगाने न्यावी. हा आग्रह नाही, सक्ती नाही. सूचना आहे.
जन्मदर कमी होत असेल तर ते चांगलेच आहे. पण व्यापक हित ध्यानात ठेवून मूल होऊ दिले जात नाही हे पटत नाही. यावर इथे थांबतो.
चूल आणि मूल हा मुद्दा इथे का
<<< चूल आणि मूल हा मुद्दा इथे का आला?
>>>>>>>
कारण तो अपत्याच्या संख्येशी थेट संबंध राखतो. उगाच नाकारण्यात काय अर्थ आहे.
<<<<<< चूल आणि मूल हे डिसायडिंग असेल तर मूलच जन्माला न घालण्याऐवजी पुरूषालाही जबाबदारी घ्यायला लावावी.
>>>>
अर्थात, पण हा ज्या त्या जोडप्याचा वैयक्तिक निर्णय आहे. म्हणजे दोघांनी मिळून जबाबदारी घ्यायची किंवा कोणीच घेऊच नये हे त्यांचे ते ठरवतील. आपण कशाला लोकांच्या संसारात ढवळाढवळ करायची.
असो, हा मुद्दा अनेक कारणांपैकी एक कारण आहे. अजूनही काही कारणे चर्चेत आली आहेतच.
डिंकाचे लाडु फस्त झाले वाटतं,
डिंकाचे लाडु फस्त झाले वाटतं, अजुन पुरेशी थंडी सुरु सुद्धा नाही झाली.
जराशी गंमत करतेय..
आज लोकांना जास्त मुले नको
आज लोकांना जास्त मुले नको आहेत किंवा मुलेच नको आहेत कारण त्यांचा सांभाळ करणे अवघड प्रकरण झाले आहे.
पुरुष आणि स्त्रिया यांचे शिक्षण होऊ लागले तसे त्यांना मुलांसाठी काय काय करता येते तेही माहिती होऊ लागले. यामुळे आपण किती उत्तम पालक बनणे आवश्यक आहे याची मर्यादा पूर्वीपेक्षा कितीतरी वाढली आहे.
मुलांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी काय काय करावे लागते याची माहिती सुद्धा अनेक पालकांना आंतरजालावर सहज उपलब्ध झाली आहे.
पण यामुळे आजच्या नवीन पिढीच्या शर्यतीच्या जगातील( HYPERCOMPETITIVE WORLD ) मुलांना आदर्श पालकत्व किती कठीण आहे याची चिंता सुद्धा वाढली आहे. या मुळे आपण पालक म्हणून कमी पडू याची कायम चिंता वाटत राहिल्यामुळे त्यापेक्षा मुलंच नको अशी मनोवृत्ती वाढीस लागली आहे.
दोन पिढ्या मागे गेल्यास एकतर भारंभार मुले होती आणि कित्येक वेळेस बापाला मूल नक्की कोणत्या इयत्तेत आहे हेही माहित नसे.
वर "आम्ही काय कुणाचे खातो अमुचा राम आम्हाला देतो" हि वृत्ती होती.
लंबक एका टोकापासून दुसरीकडे जाताना दिसतो आहे
मुलांना वाढवण्याची कॉस्ट
मुलांना वाढवण्याची कॉस्ट जसजशी वाढत जाते, तशी अपत्यांची संख्या घटत जाते. शिक्षणावरचा खर्चच किती भराभर वाढत गेलाय. स्त्री अर्थार्जन करू लागली तशी अपत्य जन्म आणि संगोपन यासाठी ती अर्थार्जनापासून दूर राहिली की बुडालेलं उत्पन्न ही तिची opportunity cost.
तोच प्रवाह पुढे वाहत राहून शून्य अपत्यापर्यंत येतो आहे. आता career मध्ये set back ही एक opportunity cost.
दुसरं - शिक्षणाचं प्रमाण वाढत गेलं तसं लग्नाचं वय वाढत गेलं. मग मूल जन्माला घालण्याआधी आर्थिक स्थैर्य हवं. मग अपत्यजन्म आणखी पुढे.
जुन्या काळात अमुक वय झालं की लग्न, मग मूल या गोष्टी फार विचार न करता बाय डिफॉल्ट होत. फार तर किती मुलं याबाबत विचार होई.
यात काही चूक किंवा बरोबर असं मत नाही. हे कसं घडत गेलं, त्याबद्दलचं निरीक्षण आहे. ( माझंच असं नव्हे. याबद्दल लेखन झालेलं आहे. घटत्या जननदराचे व लोकसंख्याबदलाचे अर्थशास्त्रीय सिद्धांत आहेत. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. ते माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करतं.
मुलांना आदर्श पालकत्व किती
मुलांना आदर्श पालकत्व किती कठीण आहे याची चिंता सुद्धा वाढली आहे. या मुळे आपण पालक म्हणून कमी पडू याची कायम चिंता वाटत राहिल्यामुळे त्यापेक्षा मुलंच नको अशी मनोवृत्ती वाढीस लागली आहे.
शिक्षणाचं प्रमाण वाढत गेलं तसं लग्नाचं वय वाढत गेलं. मग मूल जन्माला घालण्याआधी आर्थिक स्थैर्य हवं. मग अपत्यजन्म आणखी पुढे.
>>> १००+
धाग्याचं शीर्षक पाहिलं तर या
धाग्याचं शीर्षक पाहिलं तर या विषयावर सुबोध खरे यांना अपेक्षित असलेली चर्चा व्हावी. इतर गोष्टी अवांतर असल्या तरी अनाठायी नाहीत. या चर्चेच्या निमित्ताने खोलवर विचार झाला तर बरेच.
आज लोकसंख्या कमी होणे हे प्राधान्याचे काम आहे. पूर्वी दहा दहा मुलं होत पण जगण्याचं प्रमाण कमी होतं. भरमसाठ मुलं होत त्या काळातही लोकसंख्या अनियंत्रित नव्हती. ती वाढली ती जन्मदर वाढल्याने आणि मृत्यूदर घटल्याने. स्वस्त / मोफत आरोग्यसेवेमुळे हे घडले.
आज आरोग्यसेवा परवडण्यासारखी नाही. आयुष्याची कमाई गंभीर आजारावर खर्ची पडते. एकूणच खर्च वाढले आहेत. पण यावर वेगळी डिबेट होईल कारण ही अर्थव्यवस्था भांडवली आहे. तिच्यामुळे जगणे अशक्य झाले आहे. पण यामुळे लोकसंख्या कमी होत जाईल असे अंदाज आहेत. कदाचित हे क्रूर वाटेल. म्हणूनच हा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. तो असा एखाद्या प्रतिसादात निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही.
सध्या तरी दोघे कमावते आणि नो मूल यावर वाचायला आवडेल.
चीनमधे एक मूल कायद्या ने लोकसंख्या वाढीचा दर घटला तरी एकल मुलांवर किती दुष्परिणाम झाले तो अभ्यासाचा विषय होता. तसेच हे ही.
जी मंडळी चाईल्ड फ्री
जी मंडळी चाईल्ड फ्री लाईफस्टाईल मनापासून जगू इच्छितात त्यांच्या बाबतीत काहीच प्रश्न नाही पण बरीच मंडळी ही अमुक या अडचणी आहेत म्हणून अपत्याबाबतीत कुंपणावर अशी आहेत. कामाच्या ठिकाणी फॅमिली फ्रेंडली पॉलीसीज आणि कामासाठी जाण्या येण्याचा वेळ/ दगदग यावर उपाय योजना या दोन मुद्द्यावर काम झाल्यास हे जे कुंपणावर आहेत त्यांच्याबाबतीत एक तरी अपत्य हवे या निर्णयाप्रत जाणे सोपे होईल का?
दुसरे म्हणजे मुलगा-मुलगी भेद न करता सर्व प्रकारची लाईफ स्किल्स शिकवणे, १८ वर्षाचे मूल हे शैक्षणीक खर्च अणि बेसीक जगण्याचा खर्च सोडल्यास इतर बाबतीत स्वावलंबी असेल यावर भर देणे. कारण कार्यालयात फॅमिली फ्रेंडली पॉलिसी असल्या तरी पुन्हा त्यांचा वापर करत स्त्रीयांनी वर्क लाईफ बॅलन्सचे बघावे ही अपेक्षा आणि पुरुषांनी पारंपारीक भूमिकेतून 'मदत करतो' म्हणायचे तर फार काही साध्य होणार नाही. फॅमिली फ्रेंडली म्हणताना जे एकटे आहेत त्यांच्यावरही अन्याय होवू नये. किंबहूना या बाबतीत स्त्री-पुरुष दोघांच्याही मानसिकतेवर काम होण्याची गरज आहे, कळत-नकळत रुजलेले पूर्वग्रह पुसायची गरज आहे.
माझे निरीक्षण - वयानुरुप लाईफ स्किल्स शिकवली नाहीत तर पुढे एकदम खूप चढाचा लर्निंग कर्व येतो आणि तरुण मुलं मुली गोंधळून जातात , एकंदरीतच 'घर चालवणे' या कडे नकारात्मक दृष्टीने बघतात. ९वी ते १२ वी ही वर्ष अभ्यासासाठी महत्वाची असली तरी हीच वर्षे लाईफ स्किल्स शिकण्यासाठीही तितकीच महत्वाची. अभ्यास संभाळून वयानुरुप घरातली थोडी जबाबदारी अशी सुरुवातीपासून सवय लावली तर २२-२३ वर्षापर्यंत शरीराला आणि मनाला एक प्रकारची शिस्त लागलेली असते. वेळ आणि इतर रिसोर्सेस मॅनेज कसे करावे याचे ठोकताळे बर्यापैकी बसलेले असतात. घर चालवण्याशी संबंधीत कामे आऊटसोर्स करता आली तर ठीकच पण ते शक्य नसेल तर गडबडून जाणे/अडणे होणार नाही इतपत तयारी हवी. कार्यालयीन जबाबदारी आणि घर चालवणे याची सांगड घालत जोडप्यातील दोन्ही व्यक्ती एकमेकांना 'लीन ऑन मी' म्हणू शकत असतील तर लग्न-कुटुंब यातून येणार्या जबाबदारीचा बाऊ वाटत नाही.
या धाग्यावर खालील गोष्टी
या धाग्यावर खालील गोष्टी स्पष्ट होतील ही अपेक्षा होती / आहे.
(वंध्यत्व सोडून)
१. मूल नको या निष्कर्षाला येण्यात ट्रेण्डसचा प्रभाव किती ?
२. स्त्री वैतागून असा निर्णय घेण्याची शक्यता - प्रमाण किती ?
३. मूल नको असा निर्णय घेतलेल्या जोडप्यांना मागाहून मूल हवं होतं असं वाटण्याची शक्यता किती ? असं वाटत असेल तर त्यालाकिती काळ जातो ?
असे सर्व्हेज झालेले आहेत का ?
स्वाती अगदी योग्य लिहिलेस.
स्वाती अगदी योग्य लिहिलेस. खुपच पटले.
स्वाती उत्तम विश्लेषण.
स्वाती उत्तम विश्लेषण.
स्वाती अगदी योग्य लिहिलेस.
स्वाती अगदी योग्य लिहिलेस. खुपच पटले.>>> +१
घर चालवायची जबाबदारी दोघांनी
घर चालवायची जबाबदारी दोघांनी उचलणे आणि त्यासाठी गरजेचे स्कील दोघात असणे हा चांगला मुद्दा आहे. त्याबाबत खात्री नसेल तर राहू दे मग मूलच हा विचार उचल खाऊ शकतोच.
जेव्हा एखाद्या पुरुषाला हे जमत नाही कारण कोणी शिकवलेच नसते, पण तो स्त्रीपुरूष समानता जपणारा असतो. अश्यावेळी तो मी सुद्धा करत नाही आणि तू सुद्धा करू नकोस असा समानतेचा स्टँड घेण्याची शक्यता राहते. आणि या नादात मूल राहते.
Pages