डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे.

Submitted by सुबोध खरे on 20 December, 2025 - 00:14

डिंक

डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे.

हा एक चर्चेचा विषय आहे

सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे.

पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या.

आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे.

या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण "मूल हवे" हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते.

कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो.

अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो.

ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते.

येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही.

परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत.

(अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही)

लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत.

बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो.

बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते.

परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे.

कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती.

परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे.

आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली

१) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला.

२) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही

३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते.

४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते.

५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे.

६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती.

हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले.

त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले.

तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले.

एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते.

परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले.

काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले.

हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही.

तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगला विचारप्रवर्तक लेख. आवडला.

मुल हवे ही उर्मी स्त्रीला जास्त हे सुद्धा पुरुषप्रधान समाजाने ठरवले आहे. जसे तेव्हा रोलवाटप होत गेले तशा धारणा बनत गेल्या, यात चुक बरोबर काही नाही. आईपेक्षा बाबा भारी हे पाहिलेय Happy

त्याच समाजधारणेमुळे आजही मुल नको म्हणणार्‍या स्त्रिला प्रकट किंवा सुप्त टिकेला तोंड द्यावे लागते. प्रकट टिका परवडली पण सुप्त टिका मानसिक त्रास देते.

मला तरी असे वाटते की मुल हवे/नको हा निर्णय स्त्रीने तिच्या पुरुषाशी चर्चा करुन ठरवावा आणि तिच्या मताला प्राधान्य दिले जावे. पुरुषाची मानसिक गुंतवणुक यात असते तर तिची शारिरीक गुंतवणुकही असते. हे लग्नाआधी चर्चिले गेले तर उत्तम.

१.इन्कम हा अगदी गौण प्रश्न/मुद्दा आहे किंवा अजिबात महत्त्वाचा नाही.

२. मूल होत नाही तर आता परिस्थितीनुसार अगतिक झालेली जोडपी आहेत. पण याबद्दल समर्थन देणे किंवा विरोध करणे यांच्या पलिकडे पोहोचतात आणि कशाततरी मन गुंतवतात. पण चर्चा वगैरे? छे. सोडा.
३. अगदी ठरवूनच आपण दोघे कमवूया पण मूलच नको असे ठरवणारी जोडपी असतील तर त्यात चर्चा कसली डोंबलाची करणार आणि इतरांनी कशाकरता करायची?

डिंक का त्याचा चांगला आढावा घेतला आहे.
मला वाटतं, हा विषय आता थोडा जुना झाला आहे. सध्या लग्नच करायची गरज न वाटणे हा विषय पुढे येतो आहे.

कारण "मूल हवे" हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उ.......... हे राम!
साधना आणि एसआरडी यांचे प्रतिसाद स्वयंस्पष्ट आहेत.

माझ्या जवळच्या ओळखीचे एक पंचेचाळीशी पार केलेले जोडपे आहे.
तिशीत लाईफ happening असताना त्यांना मूल नको असे वाटले आणि नंतर मात्र आयुष्य सपक झाल्यावर मूल हवे असे वाटू लागले. पण आता प्रयत्न करून होत नाहीये.

मूल होऊ देणे किंवा नाही आणि किती होऊ देणे हा पूर्णपणे त्या दोघांचा निर्णय असतो. फक्त तो जपून घ्या.

कारण चाळीशीनंतर आपल्याला आयुष्यात काय हवे असेल हे तिशीत नाही समजत. आयुष्य रूटीन आणि म्हणून थोडे कंटाळवाणे झालेले असते. आधीचे छंद त्याच उत्साहाने जोपासावेत अशी ताकद अंगात नसते. आपला मित्रपरिवार ज्याच्या त्याच्या कौटुंबिक आयुष्यात व्यस्त असतो त्यामुळे त्या आघाडीवर सुद्धा आपण एकटे पडलेलो असतो. ऑड Man आऊट झालेलो असतो. एकूणच स्थिती बदललेली असते.

आमची स्थिती SITK (Single income Two kids) अशी आहे. पण मुले नसती तर आपली आर्थिक स्थिती चांगली असती आणि आयुष्य जास्त छान असते हा विचार मनात कधी येत नाही. अर्थात हे जनरलाइज नाही करायचे आहे. पण माणसाला सवय असते आपल्या आयुष्याची तुलना इतरांशी करायची. आर्थिक स्थितीची तुलना करून फॅमिली प्लान केल्यामुळे आपण मागे आहोत असे वाटले तर त्याचा फार त्रास होत नसावा. पण एखाद्याला नंतर मूल हवे झाले आणि वेळ गेली असेल तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्याची तुलना एखाद्या चौकोनी कुटुंबाशी केल्यास त्यांना होणारा त्रास जास्त असू शकतो.

त्यामुळे अनुभवी लोकांशी चर्चा करा. त्यांच्या अनुभवी मतांना लक्षात घ्या. कारण भले प्रत्येकाचे आयुष्य आणि आवडनिवड वेगळे असले तरी एकाच समाजात जगताना माणूस म्हणून आपल्या सर्वात काहीतरी समान धागा असतोच.

@ साधना
मुल हवे ही उर्मी स्त्रीला जास्त हे सुद्धा पुरुषप्रधान समाजाने ठरवले आहे.

नाही,

हे जीवशास्त्रीय सत्य आहे.

सस्तन प्राणिमात्रांमध्ये मादीचा प्रजनन काळ कमी असतो पण मादीची शारिरीक गुंतवणूक जास्त असते. त्यामुळे प्रजनन काळात मादीची मातृत्वाची उर्मी (मॅटर्नल ईन्स्टिंक्ट) नरापेक्षा जास्त असते. यामुळेच माजावर आलेल्या माद्यांना नियंत्रित करणे कठीण जाते हे पशुपालन करणारे सर्व लोक तुम्हाला सांगतील.

मानवी आयुष्यात फार तर ४०० स्त्रीबीजे विकसित होऊ शकतात (दर महा एक असे १५ ते ४५ या तीस वर्षात). याउलट पुरुष बीजे ( शुक्राणू) एक मिली वीर्यात ४ कोटी इतके असतात . म्हणजेच पुरुष बीजाच्या तुलनेत स्त्रीबीजे वाया जाण्याचे प्रमाण नगण्य आहे. आणि पुरुष बीजे वाया जाण्याचे प्रमाण अफाट आहे त्यामुळे अब्जावधी तयार होऊनसुद्धा बहुसंख्य फुकट जातात . म्हणूनच पुरुषाचा प्रजनन काळ हा स्त्रीपेक्षा बराच जास्त असतो

याशिवाय शुक्राणू दान करणे सोडले तर पुरुषाची अपत्यातील शारिरीक गुंतवणूक नगण्य आहे.

त्यामुळे प्रजनन काळात मादीची मातृत्वाची उर्मी (मॅटर्नल ईन्स्टिंक्ट) नरापेक्षा जास्त असते. यामुळेच माजावर आलेल्या माद्यांना नियंत्रित करणे कठीण जाते हे पशुपालन करणारे सर्व लोक तुम्हाला सांगतील.>>>>

ओके.

पण बहुतांशी पुनरुत्पादन केले जाते ते वंश पुढे जावा यासाठी - मानवासहित सर्वच प्राणीपक्ष्यांत. ही नैसर्गिक उर्मी आहे.
मुल धारण करण्याची क्षमता मादीत असली तरी नर नसेल
तर ती एकटी काहीच करु शकणार नाह्रे. माणुस सोडुन इतर प्राण्यांमध्ये नर जास्त आकर्षक असतात, मादीने त्यांना निवडावे म्हणुन. काही जातीत नर मिलनकाळात एकापेक्शा जास्त माद्या आकर्षित करुन वंश पुढे न्यायचा प्रयत्न करतात.

मग तरीही मुल व्हायची उर्मी मादीत जास्त असे का?? गर्भधारणेनंतर व मुल लहान असताना त्याच्या रक्षणार्थ ती जास्त आक्रमक होते. पण वंशसातत्य टिकवणे दोघांनाही सारक्गेच महत्वाचे वाटत असावे.

अर्थात माझा अभ्यास नाहीय. तुमची माहिती अभ्यासातुन आलीय याची जाणिव आहे, माझे केवळ मत आहे.

डिंक का त्याचा चांगला आढावा घेतला आहे.
मला वाटतं, हा विषय आता थोडा जुना झाला आहे. सध्या लग्नच करायची गरज न वाटणे हा विषय पुढे येतो आहे. >> अनुमोदन, माझं ही हेच मत आहे.

मोबाईल आला म्हणून पेजर कालबाह्य झाला असे या केसमध्ये नसावे.
लग्न करावे की नाही हा प्रश्न आपल्या जागी.. पण केलेच तर फॅमिली एक्सपांड करावी की नाही हा प्रश्न सुद्धा याच काळाचा आहेच.
कारण लग्नाशिवाय एकत्र राहण्याला सहज मान्यता मिळावी इतके आपण पुढे गेलेले नाही आहोत.

काही सामाजिक प्रश्न, त्यांचे स्वरूप वगैरे काळानुसार बदलतात. उदा. साठ सत्तर वर्षापूर्वी बाप शोभेल अश्या वयाच्या पुरुषाशी अल्प वयीन मुलीचे लावले जाणारे लग्न ( संगीत शारदा ) . ही एक सामाजिक समस्या होती. पण आज हा प्रश्न समाजात नाहीये. त्याच धर्तीवर dink हा विषय पंधरा वीस वर्षापूर्वी ऐरणीवर होता आज नाही असं मला वाटतंय. मुलं होणं अगर जाणीव पूर्वक होऊ न देणं किंवा लग्न करणं ही पुढची बाब आहे. आज मुळात दोघांनी एकत्र राहणंच मुलांना कठीण वाटत आहे

ममो डिन्क कालबाह्य झालाय का माहित नाही पण आजच्या मुलांच्या लग्न विचाराच्या बाबतीत तुझ्याशी सहमत.

माझ्या मुलीच्या पार्टनरबद्दलच्या अपेक्ष:/त्याच्यात अपेक्षित असलेले गुण्/सांसरिक कौशल्ये आणि तिच्यात सध्या असलेले गुण्/ सांसरिक कौशल्ये यांचे व्यस्त प्रमाण पाहता तिचे सिंगल हे स्टेटस तिच्यासाठी सगळ्यात जास्त सुखाचे आहे हेमावैम. तिचेही सध्या तेच मत आहे. एकाचे दोन झाले तर फक्त वाद होणार आणि ते मला बघावे लागणार. त्यापेक्षा चाललेय ते चांगले चाललेय म्हणत मी सुखात आहे Happy

आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो.>>>>100% खरं आहे.याच मुळे नको असतानाही मुल होऊ दिले जाते . नैसर्गिक उर्मी जरी मान्य असली तरी काहींना मुलं नको असं वाटू शकतं त्याची त्यांची अशी कारणं असू शकतात हेच नेमकं लोकांच्या लक्षात येत नाही. मुल नसणं हे फार मोठं काहीतरी आहे आणि त्याशिवाय जगण्याला अर्थ नाही किंवा तुम्ही सेल्फीश आहात ते असं कसं जगू शकतात मुलांशिवाय, इथपर्यंत लोकांची मजल जाते, काही बोलून दाखवतात, काही नाही.

खरंतर मुल जन्माला घालून वाढवणं खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जर घ्यायची नसेल तर मुलं जन्माला न घालणंच योग्य आहे उलट लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा निर्णय योग्यच समजला पाहिजे.

त्यातून मूल होतच नसेल तर दत्तक घेणे हा पर्याय सर्वात चांगला आहे ,ज्यांना खरोखर काही कारणाने मुलं होत नसतील त्यांनी आपली नैसर्गिक उर्मी दाबून टाकण्यापेक्षा एखादं तरी मूल दत्तक घ्यावं . दत्तक मुलं घेणं जरी किचकट आणि वाट पाहायला लावणारं असलं तरी एकदा का मूल आयुष्यात आलं की आयुष्य सुंदर झाल्याची उदाहरणे आहेत. आणि जर का आयुष्याची ध्येयं समाजकार्य किंवा इतर काही असतील तर अनेकांची आयुष्य सुंदर करता स्वतःचं मुल नसलं तरी काही बिघडत नाही.

@ सुबोध खरे
>>"परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे.">>
भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अनेक समस्या टाळण्याच्या दृष्टीने हि नक्कीच सकारात्मक गोष्ट आहे!

@ साधना
>>"मला तरी असे वाटते की मुल हवे/नको हा निर्णय स्त्रीने तिच्या पुरुषाशी चर्चा करुन ठरवावा आणि तिच्या मताला प्राधान्य दिले जावे. पुरुषाची मानसिक गुंतवणुक यात असते तर तिची शारिरीक गुंतवणुकही असते. हे लग्नाआधी चर्चिले गेले तर उत्तम.">>
सहमत आहे!

@Srd
>>"१.इन्कम हा अगदी गौण प्रश्न/मुद्दा आहे किंवा अजिबात महत्त्वाचा नाही.'>>
सहमत आहे! मुळात 'चाईल्ड-फ्री लाईफस्टाईल' अंगीकारण्याचा निर्णय घेणे हा आर्थिक किंवा भावनात्मक विषय नसून विचारपूर्वक घेतलेला 'व्यावहारिक' निर्णय असतो!

@ भरत
>>" मला वाटतं, हा विषय आता थोडा जुना झाला आहे..">>
थोडा? आम्ही लग्नापूर्वीच 'चाईल्ड-फ्री लाईफस्टाईल' अंगिकारण्याचा निर्णय घेतल्यालाच आता दोन दशके उलटली आहेत, त्यामुळे हा विषय आता 'थोडा' नाही, 'बराच जुना' झाला आहे असे म्हणायलाही वाव आहे 😀

>>"सध्या लग्नच करायची गरज न वाटणे हा विषय पुढे येतो आहे.">>
+१०००
परंतु हा विषय दोन्ही बाजूंच्या दृष्टिकोनातून भलताच संवेदनशील/स्फोटक असल्याने त्यात 'माँ का लाडल्यांचा' दोष किती आणि 'पापा की परींचा' किती ह्यावर चर्चेपेक्षा वितंडवाद होण्याचीच शक्यता असल्याने बहुतेकांकडून ह्या विषयापासून लांब राहण्यालाच जास्त प्राधान्य दिले जाते 😂

@ ऋन्मेष
>>"कारण चाळीशीनंतर आपल्याला आयुष्यात काय हवे असेल हे तिशीत नाही समजत.">>
तुमचा मुद्दा रास्त आहे पण (आजच्या परिस्थितीत) हे उलटही होऊ शकते, म्हणजे तिशीत असताना आपल्याला जे आयुष्यात हवे असे वाटते ते चाळीशीत नकोसे वाटू शकते.

@ मनीमोहोर
>>"हा विषय पंधरा वीस वर्षापूर्वी ऐरणीवर होता आज नाही असं मला वाटतंय.">>
सहमत आहे!

अर्थात आजच्या परिस्थितीत हा निर्णय घेणे जेवढे सोपे झाले आहे तेवढे ते २० वर्षांपूर्वी सोपे नव्हते. घरची मंडळी, जवळचे नातेवाईक आणि खासमखास समवयस्क मित्र-मैत्रीणींकडून आम्हाला हा निर्णय घेण्यापासून परावृत्त करण्याचा भरपूर प्रयत्न झाला होता, पण त्यावेळी 'तुम्हाला जवाबदारी टाळायची आहे' पासून 'तुमचा हा निर्णय स्वार्थीपणा दर्शवणारा आहे' वगैरे वगैरे म्हणणारी मंडळी पुढे आपल्या अपत्यांचे संगोपन करताना कधी ना कधी मेटाकुटीला येऊन लाक्षणिक वैतागातून किंवा संसारात पूर्णपणे अडकून पडल्याच्या भावनेतून का होईना पण 'त्यावेळी आम्हाला पटला नव्हता पण तुमचा निर्णय योग्यच होता' असे प्रांजळपणे कबूलही करतात हे विशेष!

आणि हो, पूर्वी मी पण 'DINK' हाच काहीसा उद्धट/माजोर्डा वाटणारा शब्द वापरायचो, परंतु नंतर एका समविचारी व्यक्तीकडून 'DINK' ऐवजी 'चाईल्ड-फ्री लाईफस्टाईल' असा सभ्य/सौम्य शब्दप्रयोग वापरणे का व कसे योग्य आहे हे समजले आणि ते मनापासून पटल्याने त्याचाच वापर करत आलो आहे.

आताच्या नावाजलेल्या आणि तरूण नट्या मात्र वेळीच लग्न करून मूल/मुलं होऊ देत आहेत. याचाही विचार व्हावा.

मुलं होणं अगर जाणीव पूर्वक होऊ न देणं किंवा लग्न करणं ही पुढची बाब आहे. आज मुळात दोघांनी एकत्र राहणंच मुलांना कठीण वाटत आहे.>> +100

हल्ली जोडप्यांमधे कुत्रे मांजरी पाळण्याचे प्रमाण वाढलेय.

मुख्य म्हणजे हे जाणून घ्या की - नॉट एव्र्हीवन इस मेड फॉर मॅरेज.
मग मूल होणं फार दूर राहीले.
---------------
सिमरनचा प्रतिसाद फार आवडला. दत्तक घेण्याबद्दल छान मत मांडले आहेस.
---------
चाईल्ड फ्री - हा शब्द सभ्य व प्रगल्भ आहे. आवडला.
-----------
>>>>>>जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो.
हा मुद्दा महत्वाचा आहे.
-----------
>>>>काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही
अपेक्षित शब्द जास्त योग्य होइल का?
-----------------
अवांतर - पण एक जीव आपल्या रक्तामांसात वाढून नंतर स्वतंत्र रीत्या पायावर उभे रहातो.त्याच्या बाळलीला, त्याच्यात आपले प्रतिबिंब - हे आनंददायक मिरॅकल असते Happy
माझ्या ४ महीन्याच्या बाळाला मी एकदा पुण्यात माहेरी होते, घरात कोणी नव्हते, त्या जीवाला मी हृदयाशी धरलं होतं आणि ते अवटार मध्ये कसे कनेक्शन होते २ लाईटस फ्युझ होतात , तसे काहीतरी झालेले. लिटरली इट वॉज अ ब्युटीफुल मोमेन्ट.
तिचा अ‍ॅसेन्डंट, चं रास, नक्षत्र डिट्टो माझ्यासारखी आहे. १००% ऋणानुबंध असतात.

मला प्रयोजन समजलं नाही. प्रत्येकाचा खाजगी निर्णय व्यतिरिक्त त्यात चर्चा काय करणे अपेक्षित आहे?

हा विषय आता थोडा जुना झाला आहे. सध्या लग्नच करायची गरज न वाटणे हा विषय पुढे येतो आहे

लग्नच करायची गरज न वाटणे हा विषय वेगळा आहे. त्यामुळे त्याची चर्चा येथे केलेली नाही.

हा विषय आता थोडा जुना झाला आहे.

तरुण जोडप्यांसाठी हा विषय माझ्यासारख्या साठी च्या जवळ आलेल्यांसाठी हा विषय अजूनही थोडा फार महत्त्वाचा आहे.

कारण तुमच्या मुलांनी मूलच नको म्हटलं तर काय करायचं हे आमच्या पिढी तील बहुसंख्या नि विचारच केलेला नाही असे जाणवते.

बऱ्याच वेळेस मुलींनी आपल्याला मूल हवे का नाही हा विचार केलेला असतो त्या तुलनेत मुलगे हा विचार करतच नाहीत असे दिसून येते. आपला मुलगा लग्नाच्या वयाचा होत असेल किंवा झाला असेल तर त्याला भविष्याबद्दल नक्की काय विचार आहे हे विचारणे आवश्यक आहे. कारण मुलगी मुलच नको म्हणणारी असेल तर मुलाची फार कुचंबणा होताना दिसते. मुलाच्या साठी शारीरिक गुंतवणूक फार नसल्याने त्याबद्दल विचार होत नाही किंवा आपल्या मित्रांशी कोणीही याची चर्चा करत नाही. यातून अनेक जोडप्यांमध्ये वितंडवाद होताना आढळतो आहे.

मुलींच्या बाबतीत मात्र जवळच्या नातेवाईक स्त्रिया आपल्या मुलांच्या बाबतीत येणाऱ्या जबाबदाऱ्यानबद्दल बोलताना ऐकून त्याबद्दल एक तर्हेची भीती बाळगताना दिसतात. यातून मुलं होणं पुढे ढकलणे हे फार जास्त आढळून येते आहे. मुळात आजकाल करियर त्यातून मिळणारे आर्थिक स्वातंत्र्य यामुळे मुली मुळात लग्नच उशिरा करताना दिसतात. मग लग्न झाल्यावर मूल होणे शक्य तितके पुढे ढकलायचा प्रयत्न करतात.

यामुळे माझ्या कडे ३५ च्याच नव्हे तर ४० च्या पुढे गरोदर असणाऱ्या किंवा मूल होण्यासाठी उपचार घेणाऱ्या अनेक मुली सर्रास दिसतात. वंध्यत्व विषयात काम करणाऱ्या माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांना हा अनुभव आता फार कॉमनली यायला लागला आहे.

हा विषय मुलांनी लग्नाच्या अगोदर स्पष्टपणे आपसात चर्चा करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने वैयक्तिक स्वातंत्र्य याचा काही वेळेस अतिरेक झालेला दिसतो. त्यामुळे आई वडील मुलांशी लग्न या विषयात बोलले तरी पुढे मूल हवे कि नाही हे लग्न करणाऱ्या जोडप्यानी आपसात स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे हे ते बोलू शकत नाहीत.

जसे जोडप्यांनी आपल्या आर्थिक बाबींबद्दल विचार विमर्श केलेला असतो त्याचा एक चतुर्थांश सुद्धा विचार मुलांबाबत केलेला आढळत नाही.

पूर्वी मुलं लग्न करणार म्हणजे त्यांना मूल होणारच हे गृहीत असे. आता काळ बदललेला आहे तेंव्हा या गोष्टी लग्नाच्या अगोदर जोडप्यांनी बोलणं आवश्यक आहे. हि चर्चा आईवडिलांशी झालेली नसली तरी लग्न करणाऱ्या मूलगा आणि मुलीत होणे आवश्यक आहे.

जर कुणाला मूल नको असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे समजून मी कधीच, काहीच मत प्रदर्शन करत नाही. लग्न करायचे की नाही, का लग्न न करता live-in मध्ये रहायचे, लग्न करायचे तर भिन्नलिंगीसोबत करायचे की समलिंगीसोबत करायचे, मूल होऊ द्यायचे का नाही, मूल होत नसेल आणि हवे असेल तर IVF करायचे की दत्तक घ्यायचे हे माझ्या मते खाजगी प्रश्न आहेत. To each his/her own. (स्वतः:च्या मुलांशी बोलणेसुद्धा मला प्रशस्त वाटत नाही आणि तसेही त्यांना हवे तेच ते करणार, मग आपण नाक खुपसायचे कशाला असा विचार मनात येतो).

हा विषय मुलांनी लग्नाच्या अगोदर स्पष्टपणे आपसात चर्चा करणे आवश्यक आहे. >> सहमत

मला मात्र व्यक्तिशः माझ्या मुलांमुळे खूप आनंद मिळाला आहे, त्यामुळे त्याबद्दल मी खूप समाधानी आहे हे म्हणू शकतो.

स्वतः:च्या मुलांशी बोलणेसुद्धा मला प्रशस्त वाटत नाही आणि तसेही त्यांना हवे तेच ते करणार, मग आपण नाक खुपसायचे कशाला असा विचार मनात येतो

माझ्या स्वतःच्या मुलाने हा विषय त्याच्या होणाऱ्या बायकोशी बोललेला नव्हता. चार वर्षे फिरत होते तरी. शेवटी बाप म्हणून मी त्याला याबद्दल स्पष्ट विचारले तेंव्हा त्याने तिच्याशी चर्चा केली तेंव्हा आपल्याला मूल नको असे तिचे मत होते आणि हे मत तिने स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा सांगितले नव्हते. त्यानंतर त्यांनी याबद्दल चर्चा केली कर्ण हा मुद्दा माझ्या मुलाच्या बाबतीत nonnegotiable होता. अर्थात असे तिचे मत भीतीपोटी आलेले होते. पण नंतर तिचा विचार बदलला.

माझ्या मुला शी आणि मुलीशी चर्चा करताना त्यांच्या पिढीत हे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहेत हे जाणवले आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कल्पना फार टोकाच्या असल्याने बहुतेक मुलांनी याबद्दल आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीचं नव्हे तर आईबापांशी सुद्धा चर्चा केलेले नव्हती.

आपण लिहिले आहे तसेच अनेक आई बाप या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कल्पने मुले मुलांशी बोलण्यात संकोच करत आहेत हे स्पष्टपणे जाणवते.

स्वातंत्र्य म्हणजे विषय सुद्धा न काढणे हे नव्हे तर त्यांना निर्णय घेण्यासाठी मदत करणारे आणि पूर्ण विचारांती निर्णय घेतला असल्यास त्याला समर्थन देणे हे आहे .

दुर्दैवाने अतिशय अनुभवी आणि आर्थिक संपन्न असणारे आईबाप सुद्धा आपल्या मुलांच्या आर्थिक बाबीबद्द्ल विषय सुद्धा न काढताना सर्रास दिसतात.

तुम्ही मुलांना आपल्या अनुभवाचा फायदा देऊ शकणार नसाल तर तुमचे अनुभव काय कामाचे

माझ्या स्वतःच्या मुलाने हा विषय त्याच्या होणाऱ्या बायकोशी बोललेला नव्हता. चार वर्षे फिरत होते तरी,>> माफ करा पण हे खरेच न पटण्यासारखे आहे. बाकी जो जे वांछील..

आज मुळात दोघांनी एकत्र राहणंच मुलांना कठीण वाटत आहे
>>>>>

किती जण लग्न करतात आणि किती वेगळा पर्याय शोधतात याचे आकडे कुठे उपलब्ध आहेत का बघायला हवेत. अगदी आपण एका ठराविक शहरातील ठराविक वर्गाबद्दल बोलत असलो तरीही.. म्हणजे आपल्या ओळखीच्या लोकातही आठ दहा जण असे दिसले तरी शेकडो लग्न करणारे आणि निभावणारे सुद्धा आपल्याच ओळखीत आहेत जे आपण मोजत नसू.. लग्न करणाऱ्यांची संख्या आजही जास्तच असेल. त्यामुळे पुढे मुलांचा प्रश्न कालबाह्य झाला नाही इतकेच.

आयला आम्हाला किमान चार मुलं पाहिजेत राव. पहिले मूल पुढे ढकलून खूप घाण चूक केली त्याचा प्रचंड पश्चाताप होतो.

पहिले मूल पुढे ढकलून >>> हो, असे होते. पहिले मूल लेट केले की दुसऱ्याला स्कोप राहत नाही बरेचदा. तर काही जण एकच अपत्य बस म्हणून एकावर थांबतात. अर्थात हा सुद्धा ज्याचा त्याचा निर्णय आहे. पण मुलाला सख्या भावंडांचे सुख मिळत नाही. मी एकुलता एक आहे. मला एक सख्खी बहीण असायला हवी होती असे आयुष्यभर वाटत आले आहे.

माझ्या मुला शी आणि मुलीशी चर्चा करताना त्यांच्या पिढीत हे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहेत हे जाणवले आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कल्पना फार टोकाच्या असल्याने >>> हे बहुतेक मागच्या पिढिला पुढच्या पिढिबद्दल वाटत आले आहे नविन काहिच नाही.
एखादया पुर्ण जनरेशन जरी ठरवले की मुल होउ द्द्यायचे नाहि तरी जगाच्या लोकसख्येत काहि फरक पडणार नाही आणी पडला तरी जसे अनेक रिव्ह्योल्युशन झाले आहेत तसच आहे हे.
पुर्वी आणी आत्ताच्या जनरेशनने मुलाच सन्गोपन करण यात खर्चाचा पार्ट यात मेजर फरक आहे..मुल वाढवण इज एक्सपेन्सिव्ह थिन्ग.
खुप वैयक्तिक निर्णय आहे हा, कोणत शिक्षण घ्याव, कोण लाइफ पार्टनर , कोणता जॉब, कुठे राहाव इतकाच.

डिंक वगैरे काहीही नवीन विषय नाही.
अगदी ४० -४५ वर्षापुर्वी सुद्धा जवळच्या नात्यात, ओळखीत होती जोडपी. अर्थात दोन्ही नोकरी/व्यवसाय करणारी.
आणि हे सर्व प्रश्ण त्या जोडप्यांवरच सोडावे. कोणाची सामाजिक, आर्थिक, मानसिक,भावनिक गरज हि त्यांनाच माहिती असते.
उलट बरेच आहे, आजकालची जोडपी खोल चर्चा करतात लग्न करावे की नाही? मूल असावे की नाही.
आजकाल एग फ्रींजिंग पण सोय आहे. त्यामुळे बरे आहे.

>>माझ्या स्वतःच्या मुलाने हा विषय त्याच्या होणाऱ्या बायकोशी बोललेला नव्हता. चार वर्षे फिरत होते तरी,<<
ह्यात बरेच जोडपी आहेत माझ्या पाहण्यात तरी. मुळात त्यांच्य सुरुवातीचे नात्याचे विश्व वेगळेच असते. आणि काही जण इतका खोल विचार किंवा प्लँनिंग करणारे नसतात.

<<<<<< तुमचा मुद्दा रास्त आहे पण (आजच्या परिस्थितीत) हे उलटही होऊ शकते >>>>>

हो, विचार बदल दोन्ही बाजूनी होऊ शकतो.
पण तिशीत मूल हवे असे वाटणे आणि चाळीशीत नको असे वाटणे याची शक्यता कमी वाटते. त्याच्या उलट होण्याची शक्यता जास्त वाटते.

Pages