Blr Litfest,2025 अर्थात बेंगळूरू साहित्य उत्सव, २०२५

Submitted by ब्लू कोलंबसे on 15 December, 2025 - 22:29

एका वर्षापूर्वी आम्ही साहित्य प्रांतात काही कार्यक्रम बेंगळूरू शहरात कुठे होतात, याचा online धांडोळा घेत असताना blr litfest बद्दल समजले. या वर्षी अशाच एका ग्रुपवरील blr litfest बद्दलच्या लिंकवरून पुन्हा एकदा आठवण झाली. रजिस्टर करून ठेवण्याचा पर्याय वेबसाईटवर होता म्हणून ती प्रोसेस पूर्ण केली व विसरून गेलो. पण आजच्या डिजिटल ऑटो पायलट जमान्यात आमचा रजिस्टर केलेला इमेल ते कसे विसरणार? त्या free registrationचा अलार्म मेल बरोबर litfestच्या एकच दिवस आधी इमेलमध्ये अवतरला; माझे सर्व apps notifications off असताना कर्मधर्मसंयोगाने मी तो पाहिला, आणि ' जाऊन पाहूया का', असा विचार भरगच्च मिटींग-कामाच्या दिवसांती आम्ही दोघे करू लागलो.सहज पाहावे म्हणून त्यांच्या वेबसाईटवर ६ व ७ डिसेंबर, २०२५ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे शेड्युल पहिले आणि उडालोच!! इंग्रजी (आणि काही कन्नडा) साहित्य जगतातले 'Who's who' या कार्यक्रमासाठी सत्रांमध्ये खास उपस्थिती लावणार होते. त्या यादीत आम्हाला मात्र 'शशी थरूर', 'वीर दास' व 'सुधा मूर्ती' सोडता इतर कोणाचीच ' नाम ओळख' नव्हती, तरीही बंगलोरातला 'मेंदूला खाद्य देणाऱ्या विचार (Food for Thought)' उपवास वर्षभरानंतर सोडण्याची नामी संधी चालून आली होती.

दोन दिवसासाठी सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत प्रत्येकी ४५ मिनिटांचे भरगच्च, पण कॉर्पोरेट शिस्तीत व आधुनिक जगाची विचारभूक भागवणारा हा उत्सव देखण्या freedom park (जुने ब्रिटीशकालीन जेल) च्या premiseमध्ये आयोजित केलेला पाहून दर्जेदार साहित्याचा पुरस्काराचा योग्य सन्मान झाल्यासारखा वाटला. वेळेचा काटेकोरपणा, विचारविषयांचे प्रचंड वैविध्य (सोबत माहितीपत्रकाचे फोटो जोडले आहेत.) आणि बंगलोरकरांचा उदंड प्रतिसाद हे यावर्षीच्या blr litfestचे मला जाणवलेले काही दाखल घेण्याजोगे विशेष!

'घे घे किती घेशील दो करांनी' अशी अवस्था अशा उत्सवात होणे साहजिकच; त्यात आम्ही सध्याच्या ताज्या इंग्रजीसाहित्य वाचनात अजून' अक्षरशः रांगत' असल्याने दक्षिण- पूर्व भागातील राज्यांशी जवळीक दाखवणारी 'वेंकटरमण-चंद्रशेखर-घोष-राव' अशा आडनावांच्या 'स्पीकर मांदियाळी'त आम्ही सत्रविषयाचा आधार घेत सत्रनिवड केली आणि विचार दान पदरात पडून घेतले. आणखी विचार करते झालो.

बंगलोरच्या मध्यवस्तीतील फ्रीडम पार्कवर, 'विंटरी' काळात 'सूर्यदेव' मेहेरबान असल्याने खऱ्या अर्थाने लोकांच्या उत्साहाला उधाण आलेले. खाणे-पिणे, गप्पा, चर्चा, मतमतांतरे असा चहुबाजूने एखाद्या साहित्यप्रेमीस अनुकूल असा माहोल असल्याने आमच्या तासाभराच्या मेट्रोप्रवासाचे इथे आल्याआल्या सार्थक झाले.

'Why do men fear: Peep into Indian Male mind', 'All Our Loves: On Journeys of Polyamory', 'Should a Country Speak a Single Language?' असे काही सत्र विषयांचे उल्लेख वाचकांना विषयवैविध्याची जाणीव करून देईल. सत्रे व त्यावरील आमच्या चर्चांचे, मतांचे लिखाण इथे करत नाही, कारण त्या सापेक्ष आहेत.

( एव्हाना या वर्षीच्या सर्व सत्रांचे व्हिडियो blr litfestच्या YouTube Channel वरील playlistमध्ये अपलोड झाले असतील. २०१२ पासून आजतयागत बंगळूरू शहरातील विविध ठिकाणी झालेल्या सर्व सत्रांची वर्षवार playlist बनवून ती सध्या blr litfestच्या YouTube Channel वर उपलब्ध आहे. रसिकांनी त्यांचा जरूर आनंद घ्यावा.)

playlist लिंक - https://www.youtube.com/@BlrLitFest1/playlists

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आम्ही प्रवेशद्वारावर पोहोचताच 'May I help You' च्या डेस्कवर नवतरुण स्वयंसेवकांनी हसऱ्या चेहऱ्याने उत्साहात स्वागत केले. त्यांच्या टेबलावर handy multi folded 2 pager Leaflet होते ज्यात सत्रांची नावे, ठिकाण , वेळ, सत्र प्रमुख - संवादक यांची २ दिवसाची माहिती होतीच. सोबत अतिशय मदत करणारा असा आवाराचा नकाशा सत्र ठिकाणांची जागा, इतर महत्त्वाच्या जागा, खाण्याचे ठिकाण, प्रसाधनगृहे ठळकपणे दर्शवत होता. अशा व्यवस्थित माहितीपत्रकामुळे दोनही दिवसाचा कार्यक्रमाची रूपरेषा आम्हा first timer सहभागींसाठी खूपच सोयीची ठरली. (इथे नोंदवावे लागेल, की इंडिगोचा 'आकाशी' गोंधळाचा हा आठवडा असल्याने अंदाजे १५% सत्र प्रमुखांचा इथे येण्याचा कार्यक्रम रद्द झाला, मात्र संयोजक, आयोजकांनी तो अतिशय सहजरित्या आणि मार्मिक हास्य टिप्पण्या करत अपडेटेड कार्यक्रम झोकात पार पाडला.)

जुन्या तुरुंगाच्या प्रवेशद्वारासामोरील अरुंद मार्गिकेने काही वेळ चालत जाताच एक मध्यम उंचीचा Watch Tower (टेहळणी बुरुज) असलेल्या मोठ्या प्रांगणात आम्ही पोचलो. हाच या साहित्यमेळ्याचा केंद्रबिंदू होता. रंगीत वस्त्रधारी आबालवृद्ध रसिक इकडेतिकडे फिरत होते, गप्पा मारण्यासाठी तयार केलेल्या विविधांगी बैठकींचा, झाडाच्या पारांवर रेलत उपयोग करत साहित्य चर्चा करत होते. पूर्वाश्रमीच्या जेलचे आता फ्रीडम पार्क झाल्याने की काय, बरीच मोठ-मोठी देशी झाडे आवारात थंड वाऱ्याच्या संगतीने हा शब्दांचा सोहळा मूकपणे अनुभवत होती, क्वचित आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवत दादही देत होती.

प्रांगणातून चहुबाजूने असलेल्या जुन्या वास्तूंना सत्रांची ठिकाणे (venue) बनवण्याचा कलात्मक विचार मला आवडून गेला. टॉवरच्या डावीकडे एक मोठ्ठा मंडप या लिटफेस्टमधील एका सत्राची जबाबदारी घेत होता, तर बाकी ३ सत्रांची जबाबदारी टॉवरच्या डाव्या कोपऱ्यातील 1)open cell, 2) Left Barrack, 3) Right Barrack अशा नावाच्या जेलमधील जुन्या इमारतींनी स्वीकारली होती. पहिल्या दिवसाअखेर मी blr litfestची website चालली, तर लक्षात आले, की गेल्या १२-१३ वर्षात प्रथमच हा सोहळा मागील काही वर्षांसारखा एखाद्या बंदिस्त ठिकाणी किंवा Hotel campusचे Ground/ premise च्या ऐवजी इथे भरतोय. त्यामुळे मला या ठिकाणाच्या निवडीसाठी नियोजनकर्त्यांचे कौतुक वाटले. कारण तुरुंगासारख्या वास्तूमध्ये मुक्त विचारांचा साहित्यमेळा भरवणे, ही अगदी ठरवून उच्चतम रसिक आयोजनाची साक्ष देणारी कृती होती, असे मला वाटले. सर्व आयोजक टीम व मदतकर्त्या स्वयंसेवकांमधून आमच्यापर्यंत त्यांचा उत्साह व साहित्याची आवड क्षणोक्षणी पोहोचत होती.

आम्ही आळीपाळीने प्रत्येक सत्र-ठिकाणी हजेरी लावली. सर्व सत्रे अटेंड करता येणे हे एखाद्या Cloneधारी व्यक्तीसच शक्य! काही सत्र तज्ञांच्या विचारांच्या थेट प्रेमात पडलो. एखादी चर्चा आपल्याला हवी तशी रंगत नसल्यास उठून बाहेर निवांत जाऊन बसण्याचा पर्याय होताच! अशी प्रेक्षक-वाचक केंद्री व्यवस्था blr litfestने उपलब्ध करून दिली होती. टॉवरच्या मागच्या कोपऱ्यातील घनदाट झादींच्या आडोशाने बालगोपाळांना आवडतील अशा अनोख्या कॉर्नर सत्र ठिकाणांच्या नावांसकट चोखंदळ सत्रकर्त्यांची साहित्यप्रेमी सत्रे होती. टॉवरमागील एक इमारत व त्याचा परसदार cartoon creation, drawing learning अशा अनुभव सत्रांचा होता.

blr litfest 2025.jpg

बालसत्रांच्या पुढचीच एक इमारत प्रौढ व छोट्या सवंगड्यांच्या पुस्तक प्रदर्शन-खरेदीचा आनंद देण्यास सज्ज होती. Food Courtच्या शेजारील एका इमारतीचा खुला तळमजला आपल्या आवडत्या लेखकाची स्वाक्षरी त्याच्याच पुस्तकावर घेण्यासाठी वाचकांसाठी खास Red Carpet रांग व लेखकासाठी आसन व्यवस्था यांसाठी राखीव. शब्द साधना करणाऱ्या लेखकाचा व त्या शब्द साधनेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या वाचकाचा मला हा यथोचित सन्मान वाटला.

आम्ही दुपारी दोन सत्रांमधील पुरेशा वेळेअभावी आम्ही क्विक पोटपूजा केली. भरपूर गर्दीचा अंदाज न आल्याने सर्व फूड stall ची management फजिती झालेली! भली मोठी गर्दी सर्वच counterसाठी होती. तरुणांचा सत्र उपस्थिती उत्साह त्यांना काहीही पोटात ढकलून energize ठेवण्यासाठी तसा पुरेसा होता, त्यामुळेच की काय मध्यमवयीन, वयस्कर लोकांनी ती रांग भरली होती. असो.

मला Watch Towerच्या समोरील left व Right Barrack ही सत्र-ठिकाणांची रचना खूप भावली; कारण साधारण १००+ लोक मावतील अशी ती ब्रिटीशकालीन बरॅक सुरेख रंगवून ती सत्रासाठी खास अनुरूप Dias (व्यासपीठ) करून सजवलेली.सत्रातील विचार ऐकताना बरॅकच्या उघड्या, बिनछताच्या, वयस्क, मोठ्या झाडांच्या फांद्यांनी उन्हाचा तडाखा रोखत तयार केलेल्या नैसर्गिक वातावरणाने वेगळीच रंगत भरली होती. माझ्यातला निसर्गप्रेमी इथे सुखावला.

ओपन सेल हे चढत्या अर्धगोलाकृती बैठकीचे ओपन थिएटर तर सत्रांची खुमारी आणखीनच वाढवणारे ठरले. बैठकीच्या मध्येच उगवलेले मध्यम आकाराचे चाफ्याचे झाड तर प्रेक्षकांच्या Candid Clickमध्ये जागोजागी ठाण मांडून बसलेले असेल, यात मला शंका नाही. माझ्या मनात मात्र त्या चाफ्याचा मंद सुगंध घेत, हिवाळी सोनेरी सकाळी, तिथे बसून ताजे, बंडखोर विचार मनात मुरवणे नेहमीच आठवेल.

मुख्य प्रांगण ते ओपन सेलच्या मार्गावर Reading Nook नावाचा 'ठहराव' खास पुस्तकप्रेमींना रेंगाळण्यासाठी तयार केलेला! पुस्तके, वाचक व साहित्यावर प्रेम करणाऱ्या दिलातूनच मेंदूपर्यंत ही खास कल्पना आली असणार! तिथे देशीविदेशी वाचक खास पर्यावरणपूरक व रंगीबेरंगी बाज, मुडा, सोफ्यांवर पहुडत नुकत्याच घेतलेल्या पुस्तक आस्वादात वा अनेकविध विचार देवाणघेवाणीत गुंग!! वर भरगच्च फोफावलेल्या फ्रीडम पार्कातील बांबू, वड, पिंपळाने छाया धरलेली!

अशी ही प्रौढ व छोट्या वाचकांसाठी आयोजित केलेली ;साहित्य उत्सव मेजवानी' कोणतेही तिकीटमूल्य न आकारता ६-७ डिसेंबर या दोन दिवशी आयोजली होती. ती आजच्या डिजिटल कंटेंटचे प्राबल्य असणाऱ्या काळात मला अमुल्य आनंद देऊन गेली खरी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users