सफर ताडोबा अभयारण्याची

Submitted by सौ.रेवती सप्रे on 24 November, 2025 - 08:43

सातवीत शिकणारा राहुलला यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीची खूप उत्सुकतेने वाट बघत होता. कारणही तसंच होतं म्हणा! यंदा दिवाळीच्या भाऊबीजेला तो त्याच्या आईबाबांबरोबर नागपूरजवळच्या, वाघांसाठी प्रसिध्द असलेल्या ताडोबा जंगलातील अभयारण्यात सफारीसाठी जाणार होता. त्याची आत्या नागपूरला रहात होती. आत्याचे कुटुंबपण ताडोबाला येणार होते त्यामुळे यंदाची भाऊबीज अगदी वेगळी आणि मजेची जाणार होती. शिवाय राहुलच्या बाबांनी घेतलेल्या नवीन कारमधून, नव्यानेच बनलेल्या मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गावरून ते ताडोबासाठीचा प्रवास जाणार होते त्यामुळे राहुल प्रवासासाठी आणखीनच उल्हसित झाला होता.
भाऊबीजेच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार होऊन ते सकाळी साडेसहाला त्यांच्या ठाण्यातील घरातून प्रवासाला निघाले. स्वत:च्या गाडीतूनच जायचे म्हणून त्याच्या आईने सगळ्यांसाठी भरपूर खाऊ घेतला होता. दिवाळीचा फराळ सोबत तर होताच शिवाय त्याच्या आत्येबहिणीला आवडणारे पदार्थ, चिक्की, वेफर्स, खाकरा, मोहनथाळ, काजुकतली असा आणखी कितीतरी खाऊ सोबत होता त्यामुळे राहुल एकदम खूष होता.
ठाणे ते ताडोबा अंतर सुमारे ८७० किमी आहे. गाडीने वाटेत थांबत थांबत ताडोबाला पोचण्यासाठी किमान ११ ते १३ तास लागणार होते म्हणूनच त्यांनी लवकर उठून प्रवासाला सुरूवात केली होती.
समृध्दी महामार्गावरून प्रवास सुरू केल्यावर तो सहापदरी (सहालेन) - नागपूरहून येण्यासाठी तीन व मुंबईहून जाण्यासाठी तीन असा सहा लेनचा भव्य रस्ता पाहून राहुल हरखून गेला. एवढया मोठया रस्त्यावरून त्यांची गाडी वेगाने पळत होती तरी गाडीचा वेग जाणवत नव्हता.
वाटेत दोन तीन ठिकाणी नाश्ता आणि जेवणासाठी थांबून त्यांनी सोबत आणलेल्या चविष्ट पदार्थांवर ताव मारला, मात्र पुणे मुंबई हायवेवर असलेल्या शानदार फूड मॉलसारखे फूडमॉल समृध्दी महामार्गावर नसल्यामुळे राहुल जरा हिरमुसला.
संध्याकाळी पावणेसहाच्या सुमाराला ते ताडोबा येथील त्यांनी आधीच बुकिंग करून ठेवलेल्या रिसॉर्ट्मध्ये पोहोचले. तिथे आत्याचे कुटुंब त्यांची वाटच पहात होते. गोल आकारात उभ्या केलेल्या, कॉटेज सारख्या दिसणाऱ्या, जेमतेम दहा बारा खोल्या असलेले रिसॉर्ट फारच सुंदर होते. मधल्या भागात सुंदर बाग होती आणि त्या बागेत कौलारू पत्रे घालून गोलाकार शेड बनवण्यात आली होती आणि त्याखाली टेबल खुर्च्या ठेवून चहासाठी बसण्याची सोय केली होती. संध्याकाळच्या वेळी सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत गरमागरम मसाला चहा आणि खमंग फराळाचा आस्वाद घेतला तेव्हा राहुलचा आणि त्याच्या आईबाबांचा प्रवासाचा शीण केव्हाच पळाला. मनसोक्त गप्पा मारून झाल्यावर सगळे जण थोडावेळ आपापल्या खोल्यांमध्ये आरामासाठी गेले. या खोल्या पण फार सुरेख होत्या. प्रत्येक खोलीला बाहेर छोटासा व्हरांडा होता आणि आलिशान असलेल्या या खोल्यांमध्ये आल्यावर तंबूमध्ये आल्यासारखे वाटत होते. रात्री नऊ वाजता रिसॉर्टमधले साधेच पण अतिशय रूचकर जेवण जेवल्यानंतर सगळ्यांनी रिसॉर्टच्या आवारांत फेरी मारली. नुकतीच अमावस्या झाल्यामुळे सगळीकडे दाट अंधार होता. मात्र वरती आभाळ चांदण्यांनी लखलखत होते. इथल्या सर्व रिसॉर्टमध्ये बाहेरचे दिवे अतिशय मंद ठेवले असतात कारण उजेड पाहून वाघ आत शिरायची भिती असते. थोडयावेळ फिरल्यावर सगळ्यांचेच डोळे मिटायला लागले. मऊ मऊ पांघरूणात ताडोबा जंगल सफर कशी असेल याची दृष्ये डोळ्यासमोर आणताना राहुलला गाढ झोप लागली आणि जाग आली ती वेगवेगळ्य़ा पक्ष्यांच्या किलबिलाटाने! त्याने डोळे उघडून पाहिले तर आईबाबा खोलीत नव्हते. तो झटकन खोलीच्या बाहेर गेला तेव्हा आत्या, काका आणि त्याचे आईबाबा व्हरांड्यात चहा पित बसले होते.
“काय राहुल कसं वाटतय? आवडलं का इथे? आत्याने विचारले...
“हो खूपच छान... किती मोकळं आणि हिरवगार आहे इथं, नाहीतर आमच्या ठाण्याला, जिथे पाहू तिथे उंच उंच इमारती आणि मोकळी जागा तर अजिबातच नाही”, राहुल म्हणाला.
“आज दुपारी जेवल्यानंतर दीड वाजता आपल्याला जंगल सफारीला जायचं आहे. दुपारी दोन ते संध्याकाळी सहा ही सफारीची वेळ आहे.उघड्या जीपमधून चार तास जंगलातून फेरफटका मारायचा आहे.” काकांनी म्हटले, तेव्हा राहुलच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
“आई वाघाने जीपवर उडी मारली तर?” छोट्या सावनीने घाबरून विचारले. तेव्हा सगळेच हसले पण राहुलच्या मनांतही तीच शंका होती.
“घाबरायचे कारण नाही कारण वनविभागाने सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था आखूनच या सफारी आयोजित केल्या असतात. तिथे मोबाईल न्यायला परवानगी नसते. जीपमधून कुणालाही खाली उतरायची परवानगी नसते. सफारीच्या दरम्याने, नाश्त्यासाठी एक- दोन अत्यंत सुरक्षित ठिकाणी, दर्शकांसाठी जीप थांबवल्या जातात. तिथे उभे राहून आपण सफारीच्या दरम्यान आपला नाश्ता खाऊ शकतो. जंगलात वाघ जवळपास दिसला तर त्यापासून सुरक्षित अंतर ठेवून जीप उभी केली असते. जीपमध्ये असताना कुणालाही मोठयाने बोलणे, ओरडणे याला मनाई असते. ज्या गोष्टींमुळे वाघ बिथरून अंगावर येईल अशी कोणतीही गोष्ट केली जात नाही”, काकांनी सांगितले तेव्हा राहुलला हायसे वाटले.
पटापट जेवण आटोपून ते सफारीसाठी निघाले. काकांनी म्हटले की ताडोबा जंगलात शिरण्यासाठी चार दिशांनी प्रवेशद्वार(गेट) ठेवली आहेत. बुकिंग करतानाच आपण कुठल्या गेटने आत जायचे ते तिकिटावर लिहिले असते. शक्यतो आपण रहात असलेल्या रिसॉर्टच्या जवळपासचे गेटमधून आपल्याला प्रवेश दिला जातो. “आज आपण खुटवंडा गेटमधून प्रवेश करणार आहोत”, काकांनी म्हटले तेव्हा सगळे जण अतिशय उत्सुक झाले होते. ते गेटपाशी पोचले तेव्हा त्यांच्या आधीच सात-आठ उघड्या जीपमधून लोकं बसलेली होती व त्या जीप सफारीसाठी तयार होत्या.
राहुलच्या काकांनी बुकिंग ऑफिसमध्ये जाऊन सफारीचे तिकिट दाखवले तेव्हा त्यांच्यासाठी तयार असलेली जीप व गाईड आले. त्या उघडया जीपमध्ये बसताना राहुलला एकीकडून खूप उत्सुकता वाटत होती तर जंगलातून फिरायचे म्हणून जरा दडपणसुध्दा आले होते. ठीक दोन वाजता बुकिंग ऑफिसपासून सर्व जीपने जंगलात प्रवेश केला. आत शिरल्यावर वेगवेगळ्या जीप, जंगलातील वेगवेगळ्या दिशांना असलेल्या रस्त्यांवरून पुढे गेल्या.
उघडया जीपमधून जाताना सगळ्यांनाच मजा वाटत होती.
जीप पाच-दहा मिनिटे पुढे गेल्यावर जीपमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या गाईडने माहिती सांगणे सुरू केले.
“ताडोबा” हे नाव इथली स्थानिक देवता तारो किंवा तारोबा यांच्यापासून आले आहे. इथल्या गावांत पूर्वी जे आदिवासी रहात ते तारोबाची पूजा करत. अभयारण्य तयार झाल्यानंतर इथल्या आदिवासींना दुसरीकडे रहाण्यास जागा देण्यात आली.
ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले वाघ प्रकल्प क्षेत्र म्हणून ओळखले जाते व ते विदर्भातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 साली झाली. ताडोबा जंगलात अनेक तलाव, ओढे आणि नद्या आहेत – त्यापैकी अंधारी नदी ही मुख्य आहे म्हणून
नंतर 1995 मध्ये या उद्यानात अंधारी वन्यजीव अभयारण्याचा समावेश करण्यात आला आणि त्याला “ताडोबा-अंधारी वाघ अभयारण्य” असे नाव मिळाले. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 625 चौ.कि.मी. आहे

ताडोबा जंगलात सागवान, बांबू आणि तेंदूची दाट झाडे आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघसंख्या येथे आढळते. तसेच येथे बिबट्या, रानगवा, अस्वल, कोल्हा सांबर, चितळ, निलगाय, रानडुक्कर इ. प्राणी देखील मोठ्या प्रमाणात दिसतात.
पक्षीप्रेमींसाठीही हे ठिकाण अतिशय आवडते आहे कारण येथे 200 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.”
गाईडचे बोलणे सगळे जण लक्ष देऊन ऐकत असतानाच, राहुलचे लक्ष जीपच्या जवळ असलेल्या एका मोठया झाडाकडे गेले, “आई ते बघ काय”. राहुलने म्हटले तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्या झाडाकडे गेले. त्या झाडावर एक प्रचंड मोठे कोळ्याचे जाळे दिसले. एक खूप मोठा कोळी आत लटकत होता.
“त्याला जाएंट कोळी म्हणतात कारण तो आकाराने खूप मोठा असतो. कोळ्याची मादी जाळे बनवते आणि ती आकाराने कोळ्यापेक्षा मोठी असते”, गाईड म्हणाला.
आणखी पुढे गेल्यावर त्यांना हरणांचा कळप दिसला. वाकून गवत खात असलेल्या हरणांनी जीपचा आवाज आल्यावर एकदम डोके वर करून जीपकडे पाहिले तेव्हा सगळ्यांना हसू आले पण आपल्या जीपच्या आवाजाचा त्यांना त्रास झाला असावा हे पाहून वाईटही वाटले.
आणखी पुढे गेल्यावर त्यांना सांबर, रानगवा यासारखे प्राणी आणि टिटवी, रानकोंबडी व इतर कितीतरी सुंदर पक्षी दिसले. एव्हाना साडेपाच वाजत आले होते पण अद्यापि वाघाची चाहूल कुठेही लागली नव्हती. सफारी सहा वाजता संपणार होती तेव्हा त्यांची जीप परत बुकिंग ऑफिसपाशी जाणार होती. वाघ न दिसल्यामुळे सगळे हिरमुसले होते तेवढयात गाईडला काहीतरी दिसले. मातीच्या रस्त्यावर वाघाच्या पावलाचे ताजे ठसे उमटलेले दिसत होते. ते पाहून गाईड म्हणाला “वाघ नुकताच इथून गेला असावा आणि तो आसपास कुठेतरी नक्कीच असणार आपण थोडयावेळ इथे थांबून वाट पाहू”. त्याने पुढे बोलायला सुरूवात केली, “प्रत्येक वाघ जंगलातल्या एका विशिष्ट भागातच रहातो, त्या भागाला त्या वाघाचा प्रदेश म्हणतात (जशी भटकी कुत्री विशिष्ट भागात रहातात). पिल्लं झाल्यावर, ती पिल्लं वाघीण म्हणजे त्यांच्या आईबरोबर रहातात आणि वाघ लांब जाऊन एकटा रहातो. ही पिल्लंही आईबरोबर तीन चार वर्षे रहातात आणि मोठी झाली की आपापला प्रदेश शोधून आईपासून वेगळी होतात. शिकार केली की वाघ शक्यतो ताजी शिकार खात नाही. ते मांस शिळे झाले किंवा दोन तीन दिवसांनी कुजले की मग खातो कारण त्याला ते पचवणे सोपे जाते”. सगळे जण मोठया उत्सुकतेने ही माहिती ऐकत होते. एव्हाना अंधार होत आला होता. आजूबाजूच्या गर्द झाडीमुळे तो आणखीच गडद वाटत होता. पंधरा-वीस मिनिटे वाट पाहूनही वाघ दिसण्याचे काही चिन्ह दिसले नाही तेव्हा गाईड म्हणाला आता आपल्याला परत जावं लागणार. पावसाळ्यात जंगलाच्या आतमध्ये खूप ठिकाणी पाणी व दलदल तयार होते त्यामुळे वाघांना पाणी पिण्यासाठी नदीवर /तलावावर यायची गरज भासत नाही. शिवाय दाट झाडीमुळे वाघ कुठे लपले आहेत ते ही कळून येत नाही म्हणून पावसाळ्यानंतर या काळांत वाघ दिसतातच असे नाही पण उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडूपे वाळलेली असतात, त्यामुळे वाघ चटकन नजरेला पडू शकतात आणि उन्हाळ्यात नदी, तलावाशिवाय इतर कुठेही पाणी नसते त्यामुळे वाघ हमखास बघायला मिळतोच.”
हे आपल्याला आधी माहित असते तर? हा प्रश्न सगळ्यांच्या मनांत आला. मात्र उद्या सकाळी ते आणखी एक जंगल सफारी करणार होते त्यामध्ये वाघ दिसू शकेल असे वाटून निराश न होता ते रिसॉर्टवर परत आले. उद्याची सफारी सकाळी सहा वाजताची होती त्यामुळे सगळ्यांना लवकर उठून पावणेसहापर्यंत जीपच्या पिक-अप पॉईंटवर पोचायचे होते. जेवताना सगळ्यांच्या जंगलाबद्द्लच गप्पा सुरू होत्या. जंगलात फिरण्याचा एक नवीन रोमांचकारी अनुभव मिळाल्यामुळे सगळे जण खूष होते. सकाळच्या सफारीमध्ये वाघ बघायला मिळाला आहे अशी स्वप्नं डोळ्यासमोर आणत सगळे जण झोपून गेले.
सकाळी पावणेसहाच्या सुमाराला ते “मोहार्ली” नावाच्या प्रवेशद्वाराशी पोचले. आज त्यांच्या सफारीची सुरूवात या गेटपासून सुरू होणार होती. त्या गेटपाशी पोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कारण मोहार्ली गेटचा परिसर अतिशय सुंदर आहे व परिसरातील वास्तूंचे बांधकाम अत्यंत सुबक देखणे आणि आधुनिक शैलीतले आहे. तिथे पोचल्यावर एखाद्या छोटयाश्या सुबक विमानतळावर आल्यासारखे त्यांना वाटले.
सकाळच्या सफारीला सुरूवात झाली तेव्हा गाईडने सांगितले की “महाराष्ट्रात वाघांची संख्या सुमारे 350 आहे आणि ताडोबाच्या जंगलात त्यातील सुमारे 115 वाघ आढळतात. या जंगलाचे दोन मुख्य भाग केले आहेत. जंगलाचा आतील दाट झाडीचा मध्यभाग म्हणजे कोअर एरिआ, वाघ मुख्यत: याच भागात रहातात. दुसरा म्हणजे बफर एरिआ, जो कोअर एरिआच्या बाह्य कक्षेत असतो आणि तिथे मानवी वस्तीपण आढळते. ताडोबाच्या या कोअर भागात साधारणतः15 वाघ आहेत व 40 किमीच्या या भागांत प्रवाश्यांना सफारीसाठी नेले जाते. मोहार्ली गेट हे ताडोबा-अंधारी वाघ अभयारण्याच्या (TATR) च्या कोअर झोनसाठी सर्वात प्रसिद्ध आहे कारण इथल्या भागांत अनेकदा वाघाचे चित्तथरारक दर्शन होते. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच आनंद झाला. आजतरी वाघ बघायला मिळालाच पाहिजे असे सगळ्यांना मनापासून वाटत होते.
वाटेत जाताजाता जंगलाच्या एका बाजूला थोड्या थोड्या अंतरावर आठ-दहा फूट उंचीचे दगडी खांब उभे असलेले दिसून येत होते. त्याबद्दल विचारले असताना गाईडने सांगितले की,
“चंद्रपूर, ज्याचे पूर्वीचे नाव चांदा होते, तो परिसर गोंड राजांच्या बल्लाळ वंशाच्या राज्याचा भाग होता. या गोंड राज्याने १४व्या ते १८व्या शतकादरम्यान चंद्रपूरवर राज्य केले.
हा राजा बरेचदा जवळपासच्या देवळांमध्ये देवदर्शनासाठी आणि आसपासच्या प्रदेशात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत असे. या खांबांच्या वरच्या बाजूला धातूच्या रिंग लावलेल्या असत व त्या रिंगमधून एका खांबावरून दुसऱ्या खांबाकडे जाणारा लांबलचक दोरखंड घातलेला असे आणि त्यावर घंटा लावलेली असे. राजा येत असल्याची वर्दी मंदिरातल्या पुजाऱ्यांना मिळावी तसेच इतर लोकांनाही राजा येत असल्याचे कळावे यासाठी हे खांब बांधलेले होते. असे म्हणतात की संध्याकाळ नंतर, वाट दिसावी म्हणून हत्ती किंवा घोड्यावर बसून या खांबांवर पेटते दिवेसुध्दा ठेवले जात.”
एव्हाना सफारी सुरू होऊन दीड तास होऊन गेला होता मात्र अजूनही आजही वाघाचा मागमूसही दिसत नव्हता.सकाळची वेळ असूनही जंगलात विलक्षण शांतता होती. मात्र हवेत सुखद गारठा होता आणि त्या थंड हवेतून हिरव्यागार जंगलात फिरताना मजा येत होती. जीप ड्रायव्हरने आता जंगलातल्या आतल्या पायवाटेने जीप न्यायला सुरूवात केली कारण आतल्या भागात कदाचित वाघाचे दर्शन होऊ शकले असते. त्या कच्च्या पायवाटेवरून जीपने प्रवास सुरू केला तेव्हा रस्त्यावरील खड्डे, मधेच उतार मधेच चढाव असणाऱ्या रस्त्यावरून धक्के खात जाताना, सगळ्य़ांनीच सीटला घट्ट धरून ठेवले होते. पाच -सहा किमी आत जाऊनही वाघ दिसेल अशी शक्यता वाटेना तेव्हा जीप ड्रायव्हरने पुन्हा मुख्य रस्त्याला लागणाऱ्या रस्त्याच्या दिशेने गाडी वळवली आणि पुन्हा एकदा धक्के खात, कसेबसे घट्ट पकडून ते जंगलातल्या मुख्य रस्त्यावर परत आले तेव्हा त्यांना समोरच्या बाजूने, सुमारे अर्धा किमीच्या अंतरावर सात- आठ जीप हळूहळू येताना दिसल्या आणि ते समोर पहातच राहिले कारण... त्या जीपच्या पुढून एक वाघ एखाद्या राजासारखा, डौलाने चालत त्यांच्याच जीपच्या दिशेने पुढे येत होता. सगळेजण एकदम स्तब्ध झाले. मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पाहू लागले. श्वास रोखून एकटक सगळे जण त्या वाघाकडेच पहात होते.. त्यांची जीप आणि वाघ यांच्यामध्ये काहीही अडथळा नसल्याने त्यांना अगदी स्पष्टपणे वाघ दिसत होता. काय त्याचे रूबाबदारपणे चालणे, काय त्याचे देखणे रूप! सिनेमातला एखादा हिरो बाहेर कुठे अचानक दिसला की त्याला पहाताना जसा आनंद होतो तसाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून सगळे जण शांत बसले होते. जीपही तिथेच थांबवली होती. गाईडने वाघाला लांबून ओळखले आणि सांगितले की, “या जंगलातील छोटी तारा नावाची जी वाघीण आहे, तिची ही मुलगी”! आता ती तीन-चार वर्षांची झाली असेल म्हणून ती आईपासून दूर होऊन स्वत:ला रहाण्यासाठी वेगळी जागा शोधण्य़ासाठी इथे फिरत असावी.” तीन चार वर्षांची वाघाची ती बछडी इतकी मोठी दिसत होती ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्या बछडीने एका झाडाजवळ जाऊन ओरखडे काढले आणि तिथे शू केली तेव्हा गाईडने सांगितले, “ही बछडी आता आईपासून दूर होऊन वेगळी रहाणार. वाघ आपण शोधलेली जागालक्षांत रहावी आणि त्या प्रदेशात इतर वाघांनी येऊ नये यासाठी त्या परिसरातील एखाद्या झाडावर नखाने ओरखडे करतात आणि तिथे मूत्र विसर्जन करतात, म्हणजे ती जागा त्यांना नंतर ओळखता येते.”
सगळे जण भान विसरून वाघाच्या प्रत्येक हालचालीकडे बघत होते, त्याचे देखणे रूप डोळ्य़ात साठवत होते... तितक्यात मागून वनविभाग अधिकाऱ्यांची जीप आली आणि त्यांनी म्ह्टल, आता तुमची जीप वळवून परत न्या, मागे कितीतरी जीप थांबल्या आहेत त्यांनाही वाघ पहायचा आहे. अधिकाऱ्यांचे बोलणे ऐकून ड्रायव्हरने जीप वळवली आणि परतीच्या रस्त्यावर नेली. परतताना सुध्दा सगळे जण मागे वळून पुन्हा पुन्हा त्या बछडीकडे बघत होते. तिचा निरोप घेऊच नये असं वाटत होत सगळ्यांना !लांबवर पोचल्यावर जेव्हा ती बछडी दिसेनाशी झाली तेव्हा राहुलने म्हटले, बाय बाय....पण आम्ही पुन्हा नक्की येऊ तुला भेटायला !”
परतीच्या वाटेवर कोणीच बोलत नव्हते, वाघ जवळून पहायच्या विलक्षण अनुभवाचे क्षण, ते मनाने पुन्हा पुन्हा अनुभवत होते. सकाळी लवकर उठून सफारीला आल्यामुळे सगळ्यांच्या रिकाम्या पोटात कावळे ओरडत होते पण मन मात्र सफारीची सहल सार्थकी लागल्याने आनंदाने भरून गेले होते.
सफारीची हद्द संपताना पोचताना माकडांचा एक कळप जीपसमोरून पळत गेला आणि त्यांनी झाडांवर उडया मारल्या ते पाहून राहुलला खूप मजा वाटली.सफारीच्या हद्दीतून बाहेर आल्यावर गाईडने एका विश्रांतीसाठी झाडांभोवती कट्टे तयार करून बनवलेल्या एका सुंदर ठिकाणी जीप थांबावायला सांगितली.तिथे बसून सगळ्यांनी सोबत आणलेला नाश्ता खाल्ला आणि बरोबर दहा वाजता ते परत मोहार्ली गेटवर परत आले.या गेटच्या आवारात रतन टाटा यांच्या नावावर असलेले एक छोटेसे म्युझिअम आहे ,त्यात त्यांना वाघांसंबंधीची पूर्ण माहिती वाचायला मिळाली. वाघाचे निरनिराळ्या प्रकारचे ओरडणे कसे असते आणि त्याचा अर्थ काय असतो हे ही त्यांना समजले शिवाय वाघाचा एक मोठा सांगाडा आणि वाघाची कातडीही त्यांनी तिथे पाहिली.
“आई आपण उन्हाळ्यात परत यायचं हं ,जंगल सफारीला ,मला वाघ पुन्हा पुन्हा पहायचा आहे,”राहुलने म्हटले तेव्हा सगळ्यांनाच हसू आले कारण असा अनुभव परत घ्यायला सगळ्यांनाच आवडणार होते.
ताडॊबाहून परत येताना कधी एकदा ठाण्याला पोहोचतो असे राहुलला झाले होते कारण त्याला ताडोबाच्या सहलीचे वर्णन आपल्या मित्रमंडळींना ऐकवायची घाई झाली होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users