अमलताश

Submitted by अमुक on 21 November, 2025 - 06:04

बऱ्याच दिवसांपासून पहायचा म्हणून नोंद करून ठेवलेल्या या अनुभूतीला आज मुहूर्त सापडला. उरकून टाकायच्या कामांच्या यादीत टाकण्यापेक्षा, निवांतपणे रसपरिपोष करायचा ठरवले त्याचे चीज झाले असे वाटले. मराठी चित्रपट या आपत्तीच्या मी सहसा वाटेस जात नाही कारण तेथे पाहिजे जातीचे! माझ्या या धारणेस मराठी सिनेजगताने फारच मनावर घेऊन मला माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सहसा भाग पाडले नाही. नाही म्हणायला जब्बार पटेल, अमोल पालेकर, निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी अशा काही मातब्बर मंडळींनी मला थेटरात खेचून नेले खरे, पण त्यांना अपवाद म्हणून जमेस धरून माझ्या मूलभूत धास्तीस फारसा फरक पडला नाही. शिवाय जगभरातील उत्तमोत्तम कलाकृती पाहता येणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलने वर्षानुवर्षे आमचे फिल्म रसास्वादन अधिकच समृद्ध केल्याने दिवसेंदिवस अधिकच सरधोपट, उथळ, बाष्कळ, बटबटीत, प्रचारकी आणि म्हणून असह्य होत चाललेल्या मराठी चित्रपटांकडून मला शून्य अपेक्षा असतांनां 'अमलताश'ने खूपच आनंदी (आय मीन सुखद!) धक्का दिला... अगदी सतीश राजवाडेच्या 'प्रेमाची गोष्ट' सारखा

तीन महत्वाच्या गोष्टी या निमित्ताने निदर्शनास आल्या - १. सोशल मीडियाने कितीही आव आणला तरी वृत्तपत्रांना निदान महाराष्ट्रात तरी पर्याय नाही. बहुतेकांनी लोकसत्ता मधला राहुलचा लेख वाचल्यामुळे युटूयबवर येऊन अमलताश बघितल्याच्या उल्लेख केलाय. २. नेहमीच्या(च) प्रथितयश(?) निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गायक, संगीतकार यांच्या युतीपेक्षा वेगळे जातिवंत, खानदानी कलाकार किती फ्रेश वाटू शकतात आणि कमाल करू शकतात याचा आनंद अवर्णनीय. चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक सुहास देसले हा आमच्या धुळ्याचा असल्याने वाढीव कौतुक आणि विशेष अभिमान. ३. कथा, कल्पना, निर्मिती, सादरीकरण आणि प्रदर्शन या सगळ्यांत केलेल्या अभिनव प्रयोगाने थिएटर, मल्टिप्लेक्स यांच्याबरोबरच ओटीटीची मुजोरी देखील मोडून काढता येऊ शकते आणि त्या निमित्ताने काही उत्तम, दर्जेदार, सकस, अर्थपूर्ण आणि म्हणून अभिजात असे काही करता येऊ शकते या शक्यतेने उमेद वाढून भविष्य खूपच आशादायक वाटते.

सगळ्यांनी हा तरल अनुभव निवांतपणे नक्कीच घ्यावा आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाच्या प्रमाणात, मल्टिप्लेक्समधल्या तिकीट आणि पार्किंग राहू दे, निव्वळ पाणी आणि पॉपकॉर्नच्या जीएसटीसह किमतीस स्मरून, यथाशक्ती योगदान करावे... तरच अशा प्रयोगांना बळ मिळेल आणि प्रेक्षकांना क्वालिटी कन्टेन्ट! सुहास, राहुल आणि संपूर्ण अमलताश टीमला मनापासून शुभेच्छा... निरंतर!

शुभम भवतु !

(१० महिन्यांपूर्वी अमलताशच्या युट्युब व्हिडीओवर प्रकाशित माझा अभिप्राय)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वरील चर्चेत एक चांगला मुद्दा सापडला.

चित्रपट एखाद्या शहरात घडतो तर त्या चित्रपटाने त्या शहरातील बहुतांश लोकांना रिलेट होणाऱ्या आणि पटणाऱ्या गोष्टीच दाखवाव्यात हा हट्ट असावा की नसावा?

तसा हट्ट केल्यास तो चित्रपट बनवण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ठरेल का?

म्हणजे बघा, कुठल्याही चित्रपटाचे शूटिंग अवकाशात किंवा समुद्रात जाऊन होणार नाही. ते जमिनीवर कुठल्या ना कुठल्या शहरात/गावात होणार. जर मूळ कथेचा ती कुठे घडते याच्याशी काही संबंध नसेल तर जिथे चित्रपटाचे शूटिंग करणे दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला सोयीचे पडेल अशी जागा निवडली जात असेल. तर तिथल्या लोकांनी चित्रपटाच्या कथेत आमच्या शहराच्या संस्कृतीला साजेसे बदल करावे असा हट्ट धरला पाहिजे का?

स्वाती२ , अजूनही तुम्हांला फाडफाड स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यावसं वाटत नाहीए का? >> Lol

मी माबोवर मराठीत स्वान्त सुखाय गप्पा मारायला येते. आभासी जगात नो कपाळबडवंती! Happy

ऋन्मेषजींनी एकट्याने सर्वांची धुलाई केली आहे.
खूप प्रगल्भ प्रतिसाद. लगे रहो.
पिक्चर पाहिलेला नाही. पण वाचून कल्पना आली.

>>तर तिथल्या लोकांनी चित्रपटाच्या कथेत आमच्या शहराच्या संस्कृतीला साजेसे बदल करावे असा हट्ट धरला पाहिजे का?>>
च्च! चित्रपटात, संहितेत ते शहर, गाव काय म्हणून आहे त्या नुसार सगळे असणार ना! नुसतेच एक आटपाट नगर म्हणून असेल तर वेगळे असेल , अमुकच शहर/ गाव/ वस्तीचा विशिष्ठ भाग तर वेगळे. त्यातही पुन्हा कथानकात त्याचे स्थान काय? ते देखील एखाद्या पात्राप्रमाणे असेल तर कसे हाताळाले आहे? अगदी राजधानीचे शहर म्हटले तरी १९७० चे दिल्ली वेगळे आणि २०२५ चे दिल्ली वेगळे. काळानुसार मानसिकता, भाषा बदलते. घर कुणाचे त्या नुसारही बदलते. कथानकाची गरज असेल तर हे सर्व पात्रांच्या वावरातून सुसंगत दिसायला हवे. आता डोके गहाण टाकून करमणूक असा प्रकार असेल तर प्रश्नच नाही पण तसे नाही असे म्हणणे असेल तर मग विसंगती खटकणार.

चित्रपटात, संहितेत ते शहर, गाव काय म्हणून आहे त्या नुसार सगळे असणार ना! नुसतेच एक आटपाट नगर म्हणून असेल तर वेगळे असेल
>>>>>>>>>>>>

Exactly!
इथे आपण सेम लाईनवर आहोत.
या चित्रपटाचे शूटिंग पेठेत, पेठेव्यतिरीक्त इतर पुण्यात, मुंबईत, नाशिक किंवा नागपूर अश्या महाराष्ट्रातील कुठल्याही प्रमुख शहरात झाले असते तरी कथेत काही बदल करायची गरज नव्हती असे मला वाटते.

गाव दाखवले असते तर येस, काही संदर्भ बदलले असते. पण मग ते गाव सुद्धा महाराष्ट्रातले कुठलेही असते तरी ते बदललेले संदर्भ चालले असते.

चित्रपट ग्लोबल पब्लिकसाठी बनवला जातो. जर एखादे गाव किंवा शहर त्या कथेतील कॅरेक्टर नसेल तर ते प्रगत शहर आहे की गाव इतकेच पुरते.

राहुल देशपांडे मराठीतला शाहरूख खान आहे.>> कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अपमान!!! एक लेखक कुठचे हो तुम्ही ?? Biggrin

राहुल देशपांडे आणि शाहरुख खान हे दोघेही आपापल्या ठिकाणी एव्हरेस्ट आहेत. त्यांचा अपमान म्हणजे सूर्यावर थुंकणे आहे.
अमलताश सारख्या वेगवेगळ्या भूमिका शाहरूख खान करू शकतो. उदाहरणार्थ चक दे, स्वदेश, रब ने बना दी जोडी, फॅन, रावन इ.
अशा वेळी तो रिस्क घेतो.

ती रिस्क मराठीत राहुल देशपांडे घेतो. गायक म्हणून तो ग्रेट आहे.
दोघेही डाऊन टू अर्थ आहेत. नम्र आहेत. गर्व नाही. कुटुंबवत्सल आहेत.

आर्किटेक्चरच्या तिसऱ्या वर्षाला पुण्यात रूमवर एकटाच राहत असतांना, खिडकीशी लागून ठेवलेल्या बेडच्या वर फळीवरील गणपतीला उदबत्ती लावून 'शुभम करोति' म्हणत दार लावून बाहेर गेलो आणि रात्र मित्रांबरोबर बाहेर घालवून पहाटे परतलो तर चौथ्या मजल्यावरील रूमच्या खिडकीतून धूर येतांना दिसला. धावत जिने चढत वर पोहोचलो आणि दार उघडले तर आत कोंडलेल्या धुराच्या पडद्यामुळे काही दिसेना. दोन्ही दारं आणि चारही खिडक्या उघडल्यावर काही वेळाने धुराचा पडदा हटला आणि राखेचा ढिगारा नजरेस पडला. उदबत्तीचे जळते टोक खाली गादीवर पडल्याने आतल्या कापसाच्या बोळ्यांनी पेट घेऊन ते रात्रभर धुमसत राहिले होते. गादीसह बेड जळून खाक झाला या नुकसानीचे दु:ख आत झिरपेपर्यंत आठवले... फायनल सबमिशनसाठी महिनाभर खपून बनवलेले गावाचे मॉडेल आणि प्रेमपत्रांची पिशवी बेड खाली ठेवली होती... सुन्न! पुढचे काही दिवस कशाचेच भान नव्हते. अशा तऱ्हेने एका सुसंस्काराच्या भोळसट सवयीने अनेक वर्षांच्या स्वप्नांची, प्रयत्नांची, शब्दरुपी भावनांची काही तासात राखरांगोळी झाली...

त्यांनंतरचे अनेक दिवस जी मनोवस्था, जे फिलिंग होते तसे आज अनेक वर्षांनी पुन्हा जाणवतेय. मी इथला 'रेग्युलर' नसल्याने, मी सुरु केलेल्या धाग्यावर इतके काही घडून गेले याची मला गंधवार्ताही नाही. पण त्या निमित्ताने, माझ्या १०+२+३ आणि त्यांनतर असंख्य छोटेमोठे कोर्सेस या समग्र प्रवासात जेवढे शिक्षण झाले नसेल तेवढे प्रबोधन या सगळ्या कॉमेंट्स वाचून झाले आणि क्रॅश कोर्स मागणाऱ्याला थेट विद्यावाचस्पतीचे ज्ञान दिल्याने 'दुबळी माझी झोळी...' अशी अवस्था झाली. त्यासाठी सर्वच संवाद-सहभागींचे मनापासून आभार! साऱ्याच कॉमेंट्सला प्रतिसादणे शक्य नाही म्हणून सर्वांच्या मताचा आदर... सहमती नव्हे; ती तशी इथे अपेक्षितही नाही असे दिसते... असो. शिकू आनंदे...!

>>ऋन्मेषजींनी एकट्याने सर्वांची धुलाई केली आहे.<< +१
अरे तो तेल लावलेला पैलवान आहे, माबोवरचा. इथल्या लिंबूटिंबूंना आरामात धोबीपछाड घालतो..

एनीवे, अमलताश मला आवडला. मूल जन्माला घालणं (आउट ऑफ वेडलॉक) या मागचा विचार लक्षात घेण्याऐवजी ते मूळात कंसिव कसं झालं यावरची पॉइंटलेस चर्चा फक्त माबोवरंच होउ शकते. हा हा...


@ पुणे आणि पेठ

माधुरी दीक्षितच्या मिसेस देशपांडे वर सुद्धा सेम पोस्ट फिरत आहे
पुणे शहरात एका ब्राह्मण कुटुंबात असे घडत नाही. नागेश कुकुनूर यांनी त्या समाजाची बदनामी केली आहे. स्वतःच्या समाजाबद्दल असे का नाही दाखवले?

Pages