काश्मीर सफरनामा - अवंतिपुरा मंदिर, सिंथन टॉप आणि मार्तंड मंदिर

Submitted by pratidnya on 27 October, 2025 - 06:27

भाग पहिला: https://www.maayboli.com/node/87035
भाग दुसरा: https://www.maayboli.com/node/87043
भाग तिसरा: https://www.maayboli.com/node/87056
भाग चौथा: https://www.maayboli.com/node/87065
भाग पाचवा: https://www.maayboli.com/node/87106
भाग सहावा: https://www.maayboli.com/node/87196
भाग सातवा : https://www.maayboli.com/node/87273

आज सकाळी लवकर उठलो. सरोवरात थोडं पक्षीनिरीक्षण करून झाल्यावर नाश्ता केला. काल रात्री एक गडबड झाली होती. सासूबाई आणि मावशींना बेड रनरच्या खाली ठेवलेली पांघरुणे दिसलीच नाहीत. हाऊसबोट पाण्यात असल्याने इथे जास्त थंडी वाजते. तरीही एवढ्या रात्री गौहरला किंवा आम्हाला उठवून उगाच त्रास द्यायला नको म्हणून दोघी थंडीत फक्त स्वेटर घालून कुडकुडत झोपल्या. Sad

20250414-DSC_8718.jpg पहाटे साडेपाच वाजता कुडकुडणाऱ्या थंडीतून बाहेर पाहिले आणि हरी पर्वताच्या मागे मावळतीला जाणारा चंद्र दिसला!

20250414-DSC_8728.jpg सकाळी दिसणारा हरी पर्वत. हा लांबूनच पाहून समाधान मानावे लागले.

20250414-DSC_8729.jpg निगीन सरोवरातील सकाळ एकदम स्वच्छ होती, इतकी की मागे असलेल्या पीरपांजाल पर्वतांवर असलेला बर्फही स्पष्ट दिसत होता.

आज पहलगामला जाणार होतो. आमच्या सहलीचे अजून दोन दिवस उरले होते. बैसरन व्हॅलीला जायला घोडा घ्यावा लागेल म्हणून ते ठिकाण आम्ही आमच्या यादीत ठेवलंच नव्हतं. उरलेलं पहलगाम फिरायला एक दिवस पुरेसा होता. आता अजून एक दिवस उरत होता त्यात करायचं काय म्हणून यासिनने सिंथन टॉपचा पर्याय सुचवलं होता. "ते फारसं परिचित ठिकाण नाही आहे, गेल्या दोन तीन वर्षातच पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येत आहे. फक्त ते दूर आहे म्हणून तिथे जायचे थोडे पैसे जास्त लागतील", असं तो म्हणाला. तसंही आज पहलगामला जाऊन आरामच करणार त्याऐवजी इथे जाऊ असं ठरवून आज सिंथन टॉपला जायचं ठरवलं.

सामानाची आवराआवर केली. गौहरचा निरोप घेतला. हाउसबोटीचे मालक पण बाय बाय करायला आले होते. आम्ही शिकाऱ्यात बसल्यावर त्यांनी जोरात गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला. शिकाऱ्यावाल्याने गेटवर सोडल्यावर त्याची खुशी घेतलीच. गेटजवळ बशीर न्यायला आला होता. आम्ही पांपोर आणि अवंतिपुराला भेट देऊन मग सिंथन टॉपला जाणार होतो. पांपोर हे केशरासाठी आणि बॅट तयार करणाऱ्या कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या बाजूला बरेच कारखाने दिसत होते. बॅटींचे ढीग वाळवण्यासाठी बाहेर रचून ठेवले होते. बरेच पर्यटक इथे थांबून या कारखान्यांना भेट देतात. पण आम्हाला बॅट विकत घ्यायच्या नव्हत्या त्यामुळे बशीरला कारखान्याजवळ गाडी थांबवू नको असं सांगितलं.

केशर मात्र विकत घ्यायचं होतंच. बऱ्याच जणांनी काश्मीरहून येताना आमच्यासाठी घेऊन या असं सांगितलं होतं. सध्या हंगाम नसल्याने ती जांभळी फुलांनी बहरलेली शेती पाहायची हुकली. रस्त्याच्या बाजूला केशरविक्री करणारी बरीच दुकाने होती. अस्सल केशर हवे असल्यास पांपोरमध्येच घ्यावे. श्रीनगरमध्ये शिकाऱ्यात किंवा इतर बऱ्याच ठिकाणी लाल रंगवलेले गवत केशर म्हणून खपवतात.

बशीरने गाडी एका दुकानाजवळ थांबवली. दुकानदाराने खऱ्या केशराची ओळख कशी करायची ते सांगितले. त्याचा अस्सल सुगंध कसा ओळखायचा हे दाखवायला केशराने भरलेली बरणी आमच्या नाकाजवळ नेली. त्याचा कडवट असा वास आला. हा केशराचा खरा सुगंध. केशराची काडीसुद्धा वरून खाली निमुळती होत जाते. तसे नसल्यास ते गवताचे पाते समजावे. एकेक, दोन ग्रॅमच्या काही डब्या घेतल्या. केशरचे स्क्रब आणि ड्रायफ्रुटस घेतले जे खरंच चांगल्या प्रतीचे निघाले.

तिथून निघाल्यानंतर बशीरने विचारलं," बिल घेतलं का?' आम्ही विसरलो होतो. मग त्याने एका डबीची किंमत विचारली. आम्ही डबीवरची किंमत बघून सांगितल्यावर तो वैतागला आणि म्हणाला," याच्यापेक्षा शंभर रुपये कमी किंमतीत मिळायला हवं." आम्हाला न विचारता तो पुन्हा गाडी वळवून त्या दुकानात घेऊन गेला. आम्हाला म्हणाला, आधी बिल मागा त्याच्याकडे. बिल मागितल्यावर त्या दुकानदाराने दिल. त्याने खरंच शंभर रुपये कमीच लावले होते. डबीवर किंमत जास्त होती. बाकी काही असो पण फसवणूक होऊ नये म्हणून बशीरने केलेल्या धडपडीचं बरं वाटलं.
तिथून अवंतिपुऱ्याजवळ आलो. अवंतिस्वामी मंदिराजवळ गाडी पोहोचायच्याआधी रस्त्याच्या बाजूला अजून काही अवशेष दिसले. बशीरला गाडी थांबवं म्हणणार त्याच आधी गाडी पटकन पुढे गेली. नंतर गूगलवर शोधलं तर कळलं की ते एक शिवमंदिर होतं. नंतर पुस्तकात वाचलेल्या उल्लेखानुसार अवंतीपूर या नगरीची स्थापना नवव्या शतकात राजा अवंतिवर्मन याने केली होती. काही जुन्या ग्रंथामधून आधीपासूनच इथे एक पवित्र क्षेत्र होते असा उल्लेख आढळतो. अवंतिवर्मनने इथे दोन मंदिरं उभारली आहेत. भगवान विष्णूकरता जे मंदिर उभारले आहे त्याला अवंतिस्वामीचे मंदिर म्हणतात, तर शिवाकरता जे मंदिर उभारले आहे त्याला अवंतीश्वराचे मंदिर म्हणतात. म्हणजे मघाशी वेगाने जाताना जे मंदिर दिसले होते ते अवंतीश्वरचे मंदिर होते तर. आम्हाला सिंथनला निघायला थोडा उशीरच झाला होता म्हणून आम्ही मागे फिरून अवंतीश्वराकडे गेलो नाही. प्रत्येक ठिकाण बघून होतीलच असे नाही.

मंदिराजवळ पोहोचलो तर केसरीची टूर आली होती. त्यांना तिथला गाईड माहिती सांगत होता. आम्हालाही गाईड असल्यास हवाच होता. एक व्यक्ती मंदिराची माहिती सांगू का विचारायला पुढे आली पण तुम्ही ASI चे गाईड आहात का विचारल्यावर त्याने नकार दिला. काहीवेळेला गाईडचा वाईट अनुभव आला असल्याने आम्ही त्याला नाही म्हणून सांगितले.

20250413-IMG_0148.jpg अवंतीस्वामीचे भग्नावस्थेतील मंदिर

20250413-IMG_0145.jpg माहिती फलक

20250413-IMG_0160.jpg20250413-IMG_0162.jpg राजा अवंतिवर्मन??

20250413-IMG_0164.jpg .......

20250413-IMG_0164.jpg......

20250413-IMG_0189.jpg भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे वास्तव

20250413-IMG_0156.jpg .....

20250413-IMG_0159.jpg .....

20250413-IMG_0169.jpg ......

इथून पुढे सिंथन टॉप. लांबचा पल्ला! एवढ्या लांबच्या प्रवासात शांभवी अगदी गुणी बाळासारखी शांत राहिली. दोन अडीच तासांनी गाडी दाकसुम गावात पोहोचली. इथे बर्फ आहे म्हटल्यावर ओव्हरकोट, हातमोजे भाड्याने देणारी दुकाने उभी राहिली होती. आम्ही पहिल्याच दुकानावर गाडी थांबवली. एक म्हातारा ते दुकान चालवत होता. आम्हा सर्वांच्या मापाचे कपडे दिल्यावर त्याने लवकर पुढे जायला सांगितलं. आता तासाभराने गेट बंद होतील, त्याआधी पोहोचा असं म्हणाला. गाडी हळूहळू चढणीच्या रस्त्याने पुढे जायला लागली. सुरुवातीला बाजूला बारीक रेषेसारखा बर्फ दिसायला लागला व नंतर बर्फाचे मोठे ढिगारे दिसायला लागले. काही वेळाने तर फक्त बर्फ. तीन चार दिवसांपूर्वीच ही जागा पर्यटनासाठी खुली झालीय असे कळले. वाटेत रस्त्यावरचा बर्फ काढणाऱ्या बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. एके ठिकाणी खूप पर्यटक होते. पण बशीरने तिथे गाडी न थांबवता कुणाची तरी ओळख काढून, परवानगी घेउन आम्हाला अजून बराच पुढे घेऊन गेला. शेवटी त्याने गाडी अशा ठिकाणी थांबवली जिथे आमच्याखेरीज फक्त एकच पर्यटकांची गाडी होती. आम्हाला बर्फाचा आनंद गर्दीशिवाय घेता यावा यासाठी ही बशीरचा खटाटोप. दोन्ही आज्यांना बर्फावरून चालायची भीती वाटत होती. पण पहिल्यांदाच बर्फ पाहूनच दोघीही खुश झाल्या होत्या. इथे कालच बर्फवृष्टी झाली असल्याने बर्फ बऱ्यापैकी मऊ होता. आम्ही इथे पोहोचेपर्यंत शांभवी झोपून गेली होती. तिला फोटोपुरतं गाडीबाहेर काढलं. मस्तपैकी फॅमिली फोटो घेतला. स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितलं बाळाला इथली थंडी सोसवणार नाही. तिला आज्यांसोबत गाडीतच बसू देत.

बर्फाचे काही लॅण्डस्केप्स

20250413-IMG_0210.jpg .......

20250413-IMG_0233.jpg.......

20250413-IMG_0242.jpg .......

20250413-IMG_0252.jpg .......

20250413-IMG_0279.jpg .......

20250414-DSC_8766.jpg.......

20250414-IMG_0298.jpg ......

20250414-IMG_0309.jpg......

20250413-IMG_0281.jpg बर्फातली जांभळी सावली

इतक्या दिवसांत बशीरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच मनापासून आनंद पाहत होतो. बर्फावर बराच वेळ फिरून, फोटो काढून झाल्यावर जवळच एका तंबूत चहा, कॉफी, मॅगी ऑम्लेटची वगैरेची सोय होती, तिथे बशीरसोबत आम्ही तिथे चहा घेतला. आम्हाला आयुष्यात पहिल्यांदा बर्फ बघून जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त बशीरच बर्फ बघून खुश झाला होता. बऱ्यापैकी बर्फ अनुभवून झाल्यावर आम्ही परत जायला निघणार तर बशीर म्हणाला, "जरा थांबा हा. मी जरा बर्फावरून घसरगुंडी करून येतो." काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये बक्सा अभयारण्यात गेलो होतो तेव्हाची गोष्ट आठवली. तिथे प्रत्येक संध्याकाळी हत्तीचा कळप --- नदीचं कोरडं पात्र ओलांडून जात असे. आम्ही जेवढे दिवस होतो तेवढे दिवस पाहिलं की हत्ती दिसल्यावर आम्हा पर्यटकांपेक्षा गावकरीच हत्ती बघून एक्ससाईटेड व्हायचे. हाथी आये हाथी आये ओरडत अक्खा गाव गोळा व्हायचा. एकदा एक गावकरी हत्ती बघायला माझी दुर्बीण मागून घेऊन गेला होता. म्हणाला की रोज देखते है इन्हे. फिर भी मन नही भरता. वास्तविक हत्तीच्या हल्ल्यात दरवर्षी गावात लोक मृत्युमुखी पडत असत. तरीही त्यांचा हत्तीवर राग नव्हता.

WhatsApp Image 2025-10-27 at 3.54.08 PM.jpeg बशीर आणि आम्ही

मनसोक्त बर्फात खेळून झाल्यावर बशीर परत आला. म्हणाला इथे यायचं म्हणजे माझी मॅट आणली पाहिजे होती. त्यातून मस्त घसरगुंडी खेळता येते इथे. आम्ही याला इथे आणलं होतं की तो आम्हाला घेऊन आला होता काही कळेना. असो. आम्हाला खाली गर्दीत न थांबवता एवढ्या छान जागी आणल्याबद्दल बशीरला धन्यवाद दिले. वाटेत थंडीचे कपडे भाड्याने दिलेल्या दुकानाजवळ थांबलो. त्याला कपडे आणि बूट परत दिले. त्याने भाड्याचे जेवढे पैसे सांगितले त्यात दोन थंडीचे ओव्हरकोट नक्कीच विकत घेता आले असते. बशीरने मध्यस्थी करून त्याला पैसे थोडे कमी करायला सांगितले. म्हातारा तसा सौम्यपणे बोलत होता पण बशीर म्हणाला की भडकल्यावर इथली माणसं कचाकचा भांडतात.

परत येताना मार्तंड मंदिराजवळ गाडी थांबवणार होतो. या मंदिराबाबतचा माझ्या काही मित्रांचा असा अनुभव होता की इथले बरेच ड्रायव्हर किंवा गाईड तुम्हाला मुद्दाम मार्तंड मंदिरात घेऊन जात नाहीत. आम्हाला काश्मीरमधली जुनी मंदिरं पाहायची होती. बशीरला काही दिवसांपूर्वी त्याबद्दल सांगितल्यावर त्याला आश्चर्य वाटलं होतं. "आपको नारनाग या अवंतिपुरा क्यूँ जाना हैं. वहा पे तो कुछ भी नही हैं." त्याच्या चेहेऱ्यावर खरंच आश्चर्य वाटल्याचे भाव होते. त्याला कदाचित असं वाटलं होतं की पडक्या मंदिरात हे लोक पूजा कशी काय करतील. यावेळी तो स्वतः म्हणाला," आपको पसंद हैं ना पुराने मंदिर. आपको ये मार्तंड टेम्पल बहोत पसंद आयेगा. एकदम बढिया हैं."
सातव्या आठव्या शतकात राजा ललितादित्य याने हे मंदिर उभारले होते. सिकंदर शाह मिरीने इथल्या भागाचे इस्लामीकरण करण्याच्या धुंदीत या मंदिराची नासधूस केली. मूळ मंदिर फारच भव्य होते. मंदिराभोवती असणाऱ्या ८४ स्तंभांच्या अवशेष व रांगा ओळखू येतात. या स्तंभांवर आठवड्याच्या सात दिवसांचे राशीचक्र किंवा देवीदेवतांच्या खुणा आढळून येतात.

बॉलीवूडमधल्या बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. यातले बरेच चित्रपट मी पाहिले नसल्याने मला इथे ती माहिती सांगता येणार नाही. फक्त मार्तंड मंदिराबाबत मी वाचलेली माहीती अशी की हैदर चित्रपटातील एक दृश्य या मंदिराजवळ चित्रीत करण्यात आले होते. त्यात या मंदिराचा उल्लेख शैतान की गुफा असा करून काश्मिरी पंडितांची नाराजी ओढवून घेतली होती. नंतर ते दृश्य चित्रपटातून वगळण्यात आले. पण स्थानिक मुस्लिम लोक अवंतिपुरा, मार्तंड वगैरे मंदिरांचा उल्लेख ' शैतान की गुफा' असाच करतात.

मंदिरात सैनिक तैनात होते. एका सैनिकाने शांभवीला बंदुकीला हात लावायला दिला आणि त्याच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्याला म्हणाला, "आता माझी लेकही एवढीच मोठी झाली असणार."

मंदिराचा स्थानिक लोकांनी पिकनिक स्पॉट आणि सेल्फी पॉईंट करून टाकला होता.

20250414-IMG_0382.jpg मार्तंड मंदिर

20250414-IMG_0313.jpg माहिती फलक

20250414-IMG_0337.jpg उध्वस्त स्तंभ

20250414-IMG_0342.jpg ......

20250414-IMG_0355.jpg ......

20250414-IMG_0358.jpg ......

20250414-IMG_0361.jpg .....

20250414-IMG_0363.jpg ......

20250414-IMG_0364.jpg ......

20250414-IMG_0374.jpg मंदिरातले जल व्यवस्थापन

20250414-IMG_0377.jpg शिवलिंग???

20250414-IMG_0382_0.jpg......

20250414-IMG_0383.jpg .....

आज रात्रीचा मुक्काम पहलगाम हिल रिसॉर्टमध्ये होती. आम्ही पोहोचलो तेव्हा बराच अंधार पडला होता. बशीरला थोडे पॆसे दिले. त्याने मागितले नव्हतेच. तुझी झोपायची सोय कुठेतरी चांगल्या ठिकाणी करून घे असं सांगितलं. तो हो म्हणाला. सकाळी घ्यायला येतो सांगून निघून गेला. हे हॉटेल चांगलं होतं. खास करून बेड गरम करायची इलेक्ट्रिकल सिस्टिम होती ती सासूबाई आणि मावशीला खूप आवडली. आज रात्री त्या थंडीने अजिबात कुडकुडणार नव्हत्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा सिंथन टॉपला गेला होतात तुम्ही! फार कुणी जात नाही पण खूपच छान ठिकाण आहे. जाताना भृंगी व्हॅलीही फारच सुंदर दिसते.
वाटेत कोकरनाग गार्डन नाही का केलं?

फोटो खूपच छान.

फार छान भटकंती सुरुय
हटके ठिकाणी आवर्जून गेलात
बर्फात बशीर मधलं।लहान मूल जागे झाले असणार Happy