दिवाळी त्यांचीही...!

Submitted by छन्दिफन्दि on 14 October, 2025 - 20:30

दिवाळी त्यांचीही.,.

दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली, सगळीकडे एकच उत्साह संचारलेला- दिवे, पणत्या, रोषणाईचे सामान, भरजरी, रंगीबिरंगी कपडे, नानाविविध मिठाया ह्यांनी सजेलेली दुकाने आणि त्यात करंजीत सारण दाबून भरावे तशी खचाखच भरलेली माणसे!

त्या उत्साही वातावरणातही दिवसेंदिवर हिची बेचैनी, हृदयातील धडधड वाढत चाललेली.
आज तर कळस झाला होता, पोटातला गोळा इतका मोठा झालेला, डोकं तर फुटतंय की काय असंच वाटायला लागलेलं.
कारणही तसचं होतं,
आज पगाराचा आणि (अर्थात) बोनसचा दिवस..
मात्र तिच्या नाही तर तिच्या घरातल्या सर्व मदतनिसांच्या…!

***

"काय गं, आत्ता कोण आल होत तुमच्याकडे..?" शेजारच्या चित्रे वहिनींनी हटकले.
"ओह, त्या आमच्या पूर्वीच्या घरातल्या शांतामावशी, ते आजींच.."

" काही नाही गं, बाकी दिवाळीच्या दिवशी बरोबर येणार आठवणीने... दिवाळी-पोस्त वसूल करायला"
कसंनुस हसत ती त्यांच्याकडे बघतच बसली. काही क्षणांआधीचा प्रसंग डोळ्यांसमोर तरळला…

सकाळी अचानक शांताबाई दत्त म्हणून हजर झाल्या.
आल्यासरशी भिंतीला टेकून, एक पाय गुडघ्याशी घेऊन बसल्या.
काहीच न सुचून पटकन तिने आलेला फराळ समोर केला.
तशी म्हणाल्या,"नको नको ही ती वेळ नाही. काल फणसे वहिनींकडून कळलं.. कळल्यावर राहवेना म्हणून लगेच सकाळच्याला तुम्हाला भेटायला आले."

पाच मिनिटं तशाच बसल्या. मग उठल्या आणि जायला निघाल्या.
तशी तिने हलकेच एक पन्नासची नोट पुढे केली.
"मावशी, जाताना रिक्षाने जा."
"आता नको काही. जशी आले तशी जाईन. आजींचं कळलं म्हणून आले, भारी जीव त्यांचा चिंगीवर..
काळजी घ्या.. येते मी."
आणि तिला काही कळायच्या आत घराबाहेरही पडल्या.

**

छोट्याला गेटबाहेर उभ राहायला सांगून ती पाच किलोंची अनारशांची पिशवी घेऊन आदबशीरपणे "श्रद्धा" बंगल्याच्या पायऱ्या चढून उघड्या दारातून आत गेली.
"बरं झालं ग बाई वेळेत आलीस. तुझी वाटच पहात होते.. तुझे जिभेवर विरघळणारे अनारसे, त्याशिवाय कसली दिवाळी. ठेव टेबलावर."
ती जराशी घुटमळली.
"अग आता तिन्ही सांजेला, दिवाळीच्या दिवशी कसे बाई पैसे देऊ तुला. आज दिवेलागणीला बरी लक्ष्मीला घरातून जावून देईन मी. उद्या सकाळी छोटुला दे पाठवून."

जड अंत:करणानं ती बाहेर पडली, बंगल्यातल्या त्या झगमगत्या रोषणाईतून, गेटबाहेर अंधारात उभ्या असणाऱ्या छोटुकडे.

आजतरी नवीन कपडे आणि फटाके घ्यायला मिळतील ह्या आशेवर, इतर मुलांबरोबर बाहेर खेळायला न जाता दिवसभर आईला ऑर्डर पूर्ण करायला मदत करणारा छोटू आणि त्याचे लकाकणारे डोळे, त्या आसवांच्या पडद्याआडून धूसर होत गेले.

-Prerana Kulkarni

#शशक #Diwali #दिवाळी #अलक #लघुकथा

***

गेल्यावर्षी लिहिलेल्या या तीन लघुकथा किंवा शशक-
आहे रे गटाने नाही रे गटाला कुठलेही किंतू परंतु न ठेवता थोडी emapathy दाखवली तर त्यांचीही दिवाळी आनंदाची होईल अशाच काहीशा सूक्ष्म विचारावर आधारित.

तुम्हाला ही दिवाळी आनंदाची जावो आणि तुमच्यामुळे अशाच एखाद्या घरी दिवाळीचा आनंद लाभो!

PC : AI generated

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार हृदयस्पर्शी लिहीले आहेस. >>> _/\_

३ समांतर धागे गुंफलेत ना गं? >> तसं वाटतंय ??
माझ्या डोक्यात त्या तीन वेगवेगळ्या स्वतंत्र होत्या.

तेच तर म्हणतेय मी. ३ भिन्न उदाहारणे आहेत. समांतर पण भिन्न. >>> हा हा .. मला आधी कळलं नाही.. my bad Sad
गुंफले शब्दामुळे मी गोंधळले ..बरोबर आहे त्यांचा सामायिक बिंदू - आहे रे गटाने नाही रे गटाला कुठलेही किंतू परंतु न ठेवता थोडी emapathy दाखवली तर त्यांचीही दिवाळी आनंदाची होईल हा आहे.

शशक हा प्रकार मला कॅपसुल सारखा वाटतो.

म्हणजे गोष्ट / त्याचा फिलही मिळतो आणि खूप मोठ ही नसतं. कधी कधी एकदम एक्स्प्रेसो सारखा छोटा पण कडक अनुभवही घेता/ देता येतो. Happy

Just a thought Happy