
तोही आरसा फुटणार इतक्यात आरश्यात असलेल्या सहकाऱ्याच्या प्रतिबिंबाने पुन्हा एकदा चेहऱ्यावर हलके हास्य आणले. त्या उन्मादाच्या कसोटीत विवेक कायम ठेऊन धैर्य दाखवण्याची आवश्यकता होती. मी ही शांत चित्त ठेऊन प्रवाहासोबत वाहण्याचे ठरवले आणि त्या सहकाऱ्याप्रमाणेच मीही आपल्या चेहऱ्यावर तसेच हास्य आणले. मग त्या सहकाऱ्याने हात उंचावून “हाय” करतो तसा हलवला. मीही ते केले. मग त्या सहकाऱ्याने आरश्याच्या पलीकडून आरश्यावर हात ठेवला. मीही तसा हात आरश्यावर ठेवण्यासाठी उचलला पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हा जर सापळा असेल तर ! पण इथल्या तळघरातील उन्माद बघता हात न ठेवताही मी त्या उन्मादासोबत नष्ट होणार होतो, मग इथे अडकण्यापेक्षा त्या आरश्यावर हात ठेऊन पुढच्या कसोटीचा मार्ग मी पत्करला. ज्या क्षणी मी त्या आरश्यावर हात ठेवला, माझ्या हाताला आरसा न लागता त्या सहकाऱ्याच्या हाताचा स्पर्श झाला, त्याच क्षणी आमच्या हातांच्या स्पर्शातून प्रचंड मोठा रंगाचा झोत पुन्हा एकदा विस्फोटीत झाला आणि पुन्हा एकदा तिथले चित्र बदलले गेले.
आता मी एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी उभा होतो. लांबच लांब हिरवागार गालिचा अंथरलेल्या त्या जमिनीवर मी उभा होतो. गवतांच्या पात्यांचा मऊ स्पर्श माझ्या पायाला जाणवताच मन शांत झालं, जे इतका वेळ उन्मादाच्या वावटळात भिरभिरत होतं. त्या मखमली गवताच्या केवळ स्पर्शानेच मनात एक उल्हासित भावना येऊन गेली. मी दोन पावले पुढे सरकलो.
समोर हिरवा शालू लेऊन दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा होत्या, जणू निसर्गाच्या पदराआड लपून बसलेलं ज्ञानभांडार. आकाश निरभ्र होते. त्या निळ्याशार निरभ्र आकाशात सूर्य कुठेच दिसत नव्हता, पण मन प्रफुल्लित करणारा सुर्यप्रकाश निसर्गाच्या कुशीतून पाझरत होता. हवा थंड होती. कुठूनश्या येणाऱ्या मंद झुळुकीत द्राक्षवेलींचा गंध होता. द्राक्षांपासून बनवलेल्या मद्याचा न विसरता येणारा गंध, पण तो मनाला उत्तेजित न करता, उलट स्वर्गीय शांतीचा अनुभव देत होता. मंद वाहणाऱ्या त्या वाऱ्याच्या झुळुकीत संगीत होते. त्या लयीत तिथल्या पक्ष्यांची ऐकू येणारी किलबिल गाणं गात असल्याचा भास करत होती. कुठल्याश्या एका पर्वतातून खळाळत येणारा काचेहूनही नितळ झरा जणू पक्ष्यांच्या गाण्याला कोरस देत होता.
त्या झऱ्याच्या उजवीकडे द्राक्षवेलींच्या बागा पसरल्या होत्या. प्रत्येक वेलींवर द्राक्षाचे घड लगडले होते. सूर्यप्रकाशात न्हाऊन ती जांभळी द्राक्षे अजूनच तेजस्वी वाटत होती. डाव्या बाजूला अंमळ गर्द वनराई होती. ध्रुवपद आणि अंतरा यांच्या मध्ये येणाऱ्या संगीताच्या तुकड्यासारखी त्यां वनराईतील पानांची सळसळ ऐकू येत होती.
माझ्या उभ्या आयुष्यात मी इतकी नयनरम्य निसर्ग योजना पहिल्यांदाच पाहत होतो. इतका आल्हाददायक अनुभव घेत असताना माझे पाय तिथून हलायला तयार नव्हते. रिकार्डोच्या तळघरातल्या गोंधळामुळे नंतर प्राप्त झालेली ही स्वर्गीय सुंदरता आणखीच सुंदर वाटत होती. निसर्गाच्या या रम्यतेवर विश्वास न बसून मी डोळे उघडझाप करून पाहिले. कारण मला आधी वाटले की रिकार्डोच्या तळघरातून मी नव्या आभासी विश्वात आलोय असे वाटले. पण डोळ्यांची उघडझाप केल्यावर खात्री झाली की आभासी विश्वात नाही पण एका खऱ्याखुऱ्या निसर्गरम्य ठिकाणी आलो होतो.
मी इकडे तिकडे पाहिले, जोसेफ आणि स्मिथचा पत्ता नव्हता. कदाचित मी सर्वात जलद गतीने डायोनिससची कसोटी ओलांडून पुढच्या टप्प्यावर आलो होतो आणि स्मिथ आणि जोसेफ अजूनही त्या कसोटीला तोंड देत असावेत. पण पौराणिक आणि तात्विक ज्ञानसंपदा पाहता जोसेफने ती कसोटी माझ्याही आधी सोडवायला हवी होती. किंवा कदाचित तो माझ्याआधी इथे येऊन थोडा पुढेही निघून गेला असेल. इथल्या परिसरात जोसेफ दिसतोय का ते पाहावे म्हणून हा परिसर धुंडाळायला सुरुवात केली.
पुढच्या बाजूस असलेल्या द्राक्षांच्या वेलींच्या जवळ मी जाऊ लागलो. वेलींना लगडलेली टपोरी द्राक्षे पाहून माझ्या पोटातली भूक खवळली. आम्ही एल्युसिसच्या गावात आल्यापासून काही खाल्लेच नव्हते. एकानंतर एक अश्या कोड्यांच्या दरवाज्यातूज नुसती ये जा करत होतो. आधी कोड्यांच्या उत्साहात आम्हाला तहानभूक जाणवली नाही. पण आता बराच वेळ झाला होता. कदाचित १ दिवस उलटून गेला होता. मी अधाश्यासारखी तिथली काही द्राक्षे तोडून खायला सुरू केली. द्राक्षे पोटात जाताच क्षुधाशमनाने मला जरा बरे वाटले आणि मनाला हुशारी आली. तोच मला लक्षात आले आपल्याकडे आपल्याकडे मोबाईल आहे. त्यात किती वेळ झाला हे नेमके पाहू शकतो. मी मोबाईल काढून पाहिलं पण तो चालू नव्हता. कदाचित त्याची बॅटरी संपून बंद झाला असावा. मी मोबाईल परत बॅगेत ठेऊन झऱ्याकडे वळलो.
आनंदात बागडणाऱ्या लहान मुलाप्रमाणे प्रसन्नतेने खळाळात वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी प्यालो. हे पाणीही मी आत्तापर्यंत पिलेल्या पाण्यातले सर्वात गोड पाणी होते. इतके शुद्ध पाणी होते की २-३ घोटातच मी अतिशय तृप्त झालो. माझ्या बॅगेतील रिकाम्या झालेल्या बाटलीत मी त्या झऱ्याचे पाणी भरून घेतले. त्या झऱ्याच्या पाण्याने मी तोंड धुवून घेतले. आता मनाप्रमाणे शरीरालादेखील तरारी आली.
इतक्यात जवळच्या वनराईतून मला “ओ डॅनी ओ डॅनी” अश्या हाका ऐकू आल्या. तिकडे कोण हाका मारतय म्हणून मी उठून त्या दिशेने वळलो. तेवढ्यात त्या वनराईतून धावत धावत धापा टाकत स्मिथ येत होते.
“डॅनी डॅनी… भयानक आहे हे सगळं”, स्मिथ.
स्मिथ घामाने डबडबले होते. डायोनिससची कसोटी त्यांच्यासाठी बहुतेक फार अवघड असावी. मी त्यांना झऱ्याजवळ घेऊन गेलो.
“मि. स्मिथ.. शांत व्हा. दीर्घ श्वास घ्या. या इकडे, तोंड धुवा आणि झऱ्याचे पाणी प्या. तुम्हाला शांत वाटेल.”
मी सांगितल्याप्रमाणे स्मिथ तोंड धुवून, पाणी पिऊन आले तेंव्हा बऱ्यापैकी शांत झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसला तरी घाबरलेपणा होताच. मी स्मिथना झऱ्याजवळ असलेल्या काही दगडाजवळ घेऊन गेलो.
“इथे बसा स्मिथ. पहा हे किती आल्हाददायक वातावरण आहे. इथे पोहचलात म्हणजे तुम्ही डायोनिससची कसोटी पार केली आहे, त्यामुळे आता शांत व्हा आणि सांगा मला काय झालं ते.”
स्मिथनी आपला चेहरा पुसत सांगू लागले, “डॅनी.. मी एका भौमितिक भुलभुलैया मध्ये अडकलो होतो. मला काही मार्ग भूमितीची प्रमेये वापरून सोडवावी लागली, तर काही मार्गात हिम्मत दाखवून. तिथे अजगर होते, अंधार होता. जमीन आणि अंधारलेलं आकाश सोडून बाकी काहीच स्थिर नव्हतं. माझ्या भूमितीच्या आवडीमुळे मी कसाबसा बाहेर पडू शकलो. भयानक कसोटी होती. केवळ आभास देखील इतके भयानक असू शकतात ?”
“हो… आभास हे भयाच्या लाटांवर नाचणारे छायापुत्र असतात. ते सौंदर्याच्या मुखवटाखाली अस्थिरतेचं बीज पेरतात. वास्तव मात्र मूक असतं, पण आश्वासक असतं. त्याच्या शांततेत मनाला आधार मिळतो. आभास गूढतेच्या वावटळीत तुम्हाला खेचतात, आणि कधीही गिळंकृत करू शकतात कारण त्यांना दिशा नसते, फक्त वेग असतो.”
हे कोण बोललं म्हणून मी आणि स्मिथनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. जोसेफ प्रसन्नवदन घेऊन द्राक्षवेलींच्या बाजूने झऱ्याच्या काठावरून चालत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर ज्ञानाचं तेज दिसत होतं. तो आमच्याजवळ येत तो पुढे बोलू लागला.
“तुम्ही जे अनुभवलं, ते केवळ दृश्य नव्हतं,” जोसेफ म्हणाला. “ती एक परीक्षा होती, मनाच्या स्थैर्याची, विवेकाच्या गाभ्याची. आभास हे केवळ दृश्य भ्रम नसतात, ते भावनांचे आकार घेतात. ते तुमच्या आतल्या अस्थिरतेला स्पर्श करतात, आणि तुम्हाला तुमच्याच गूढतेत हरवून टाकतात. म्हणूनच ते भयानक वाटतात. कारण ते तुमचं रूप बदलत नाहीत, ते तुमचं स्वरूप विसरायला लावतात.”
तो थोडा थांबला, झऱ्याकडे पाहून म्हणाला, “वास्तव मात्र बोलत नाही. ते तुमच्यावर काही लादत नाही. ते फक्त असतं, शांत, स्थिर, आणि प्रतीक्षेत. जेव्हा तुम्ही आभासाच्या वावटळीतून बाहेर पडता, तेव्हा वास्तव तुम्हाला पुन्हा स्वतःकडे घेऊन जातं. म्हणूनच, पुढचा मार्ग हा सौंदर्याचा असला तरी, त्यात विवेकाची सावली हवी. कारण सौंदर्यही आभास होऊ शकतं, जर त्यात स्थैर्य नसेल.”
जोसेफला पाहून मी आनंदित झालो. माझ्या अंदाजाप्रमाणे तो आधीच इथे येऊन पोहोचला होता. जोसेफ थोडा बदलला होता. पहिल्या हिफास्टसच्या कसोटीनंतर त्याच्यात झालेला वैचारिक बदल मला जाणवला. त्याचं वाचन दांडगं असल्याने ही प्रगल्भता त्याच्यात आली असावी. काही ठराविक केसेस सोडून माझं त्याच्याशी फारसं बोलणं होत नसे. त्यामुळे मला त्याची ही बाजू कदाचित आधी दिसली नसावी. मला त्याच्या कसोटीच्या अनुभवात रस होता, त्यामुळे त्याला मी विचारले -
“जोसेफ, वा फार छान ! पुन्हा आपण एकत्र आलो. स्मिथच्या कसोटीत जास्तच भयानकता होती. माझी कसोटी थोडीफार कमी भयानक होती. तुझी कसोटी कशी होती ?”
“हाहा”, हलकेच हसून जोसेफ म्हणाला, “तुमचे अनुभव ऐकून मला हे समजलं की डायोनिससची कसोटी मनाच्या स्थिरतेवर अवलंबून होती. स्मिथच्या मनातील अस्थिरता जास्त असल्याने त्यांना जास्त भयावह आभास झाले. तुझ्या गुप्तहेर स्वभावाने तुझी तर्कशक्ती चांगली असल्याने, त्यामानाने तुला कमी भयानक अनुभव आले. पण माझे मन अतिशय स्थिर होते, त्यामुळे मी कोणत्याही कसोटीमध्ये न जाता थेट इकडे आलो.”
मला जोसेफच्या बोलण्यात तथ्य वाटले. पण आता पुढे काय हा प्रश्न उभा राहिलाच.
“मग जोसेफ आता पुढे काय करायचं आहे ? आणि ही इतकी नयनरम्य जागा कोणती आहे ?”
“सांगतो सांगतो, आधी माझ्या मागून चला. मला माहिती आहे कुठे जायचं आहे. जाता जाता मी तुम्हाला इथली माहिती देतो.”
जोसेफ त्या झऱ्याच्या काठावरून पुढे चालू लागला. आम्ही दोघेही त्याच्या पाठामागे जात तो सांगत असलेली माहिती ऐकू लागलो.
“तर मी मघाशी म्हणाल्याप्रमाणे थेट इथे पोहोचलो आणि या परिसरात काय आहे ते शोधू लागलो. थोडा वेळ निरीक्षण करून मला लक्षात आले की ही जागा म्हणजे न्यासाचे उपवन आहे. डायोनिससची पवित्र जागा. डायोनिसस हा झ्यूस, एक देवता आणि सेमेल, एक मर्त्य राजकन्या यांचा पुत्र. त्याच्या जन्मानंतर जेंव्हा त्याच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न झाला तेंव्हा झ्यूसने, हर्मस, देवतांचा दूत, त्याच्याकरवी डायोनिससला गुप्तपणे या न्यासाच्या उपवनात पाठवले. इथल्या निसर्गदेवतांनी त्याचे संगोपन केले.”
“पण जोसेफ तू आधी सांगितल्याप्रमाणे, विवाह आणि स्त्रीत्वाची देवता हीरा ही झ्युसची पत्नी होती ना ? मग ही सेमेल कुठून आली ?”, माझ्या मनातील शंका मी बोलून दाखवली.
“हो बरोबर डॅनी, पण प्रेमप्रकरणं तेंव्हाही चालायची. आता फक्त माणसामाणसात चालतात, तेंव्हा ती देवता आणि मानव यांच्यातसुद्धा चालायची. सेमेल ही थिब्स या ग्रीक नगरीची राजकन्या होती. तिचे वडील कॅडमस, थिब्सचे संस्थापक, आणि आई हार्मोनिया, युद्ध आणि सौंदर्याच्या देवतेची कन्या. सेमेल अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि दैवी आकर्षणाने युक्त होती. तिचं रूप आणि तेज इतकं विलक्षण होतं की झ्यूसचं पाहताक्षणीच तिच्यावर प्रेम जडलं. झ्यूसने सेमेलला भेटण्यासाठी मानवी रूप घेतलं, आणि दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं. हे नातं गुप्त होतं, कारण झ्यूस आधीच हीराशी विवाहबद्ध होता. हीरा ही झ्यूसची पत्नी आणि वैवाहिक नात्यांची रक्षक, तिचं स्थान ऑलिम्पसवर अत्यंत प्रतिष्ठित होतं. झ्यूसचं सेमेलशी गुप्त प्रेमप्रकरण जेंव्हा तिला कळलं, आणि तेंव्हा तिच्या ईर्ष्या आणि रागाने तिने सेमेलला फसवण्याचा कट रचला. हीराने वृद्ध स्त्रीचं रूप घेऊन सेमेलला भेट दिली आणि तिच्या मनात झ्यूसबद्दल शंका निर्माण केली. सेमेलने झ्यूसला विनंती केली की तो आपलं दैवी रूप दाखवावं आणि झ्यूसने शपथ घेतल्यामुळे नकार देऊ शकला नाही. झ्यूसने आपलं दैवी तेज प्रकट केलं, आणि ते सेमेल सहन करू शकली नाही, ती जळून मृत झाली. पण त्या वेळी ती गर्भवती होती. झ्यूसने गर्भ वाचवून स्वतःच्या मांडीवर शिवून ठेवला आणि काही काळानंतर डायोनिससचा जन्म झाला. म्हणून डायोनिससला द्विज (दोनदा जन्मलेला) म्हणतात - एकदा मर्त्य मातेकडून, आणि एकदा देवतेच्या शरीरातून.”
“बापरे ! बिचारी सेमेल ! हे फार चमत्कारिक आहे.”, स्मिथनी आश्चर्य व्यक्त केलं.
“डायोनिससचा जन्म गूढ आणि अस्थिर होता. हीराची ईर्ष्या अजूनही जिवंत होती, आणि झ्यूसला माहित होतं की बाल डायोनिससला सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे झ्यूसने त्याला निसर्गदेवतांच्या स्वाधीन केलं. त्यांनी डायोनिससला न्यासाच्या उपवनात लपवून ठेवलं, जिथे तो उन्माद, सौंदर्य, आणि विस्मरण यांचं गूढ शिक्षण घेत होता. या उपवनात डायोनिससने स्वतःचं स्वरूप शोधलं. त्याने मद्यनिर्मितीचं रहस्य उलगडलं, द्राक्षवेलींच्या गूढतेतून. त्याने नाट्य आणि कोरस यांचं तत्त्वज्ञान आत्मसात केलं. इथेच त्याने स्वतःचा मुखवटा तयार केला, जो नंतर त्याच्या भक्तांनी नाट्यरूपात धारण केला, आणि डायोनिसियन रंगमंच जन्माला आला. जिकडे आपण सध्या जात आहोत.”
“ग्रीक पुराण फारच आकर्षक आहे. तुझ्यामुळे जोसेफ मला आता ग्रीक पुराणात रस निर्माण होत आहे. आपण परत आपल्या गावी गेल्यानंतर मी ग्रीक पुराण आणि शास्त्र यासंबंधित माहिती वाचायला सुरू करणार आहे.”, मी उत्साहित होऊन बोललो, “डायोनिसस या देवाची जन्म कहाणी फारच अचंबित करणारी आहे.”
“डायोनिसस इथे केवळ देव नव्हता,” जोसेफ पुढे म्हणाला, “तो इथे शिष्य होता. आणि त्याच्या शिक्षणासाठी इथे इतर ऑलिम्पियन देवतांनीही आपापली ऊर्जा साठवून ठेवली आहे. त्या पर्वतरांगांच्या कुशीत, जिथून धूर वर येतोय - तिथे अपोलोचा संगीतसाठा आहे, जिथे लय आणि विचार एकत्र मिसळतात. त्या झऱ्याच्या पलीकडच्या वनराईत आर्टमिसची सावली आहे - जी शिकारीची नाही, तर स्वतःच्या अंतरंगाची शोध घेणारी आहे.”
आम्ही पुढे चालत गेल्यावर दूरवर एक बाग दिसली. तिकडे काही फुलं उमललेली होती. त्यांचा रंग न सांगता येण्यासारखा होता. जोसेफ म्हणाला, “ती अथेनाची जागा आहे. इथे विचार फुलतात, ते पण शब्दांशिवाय. पुढे एके ठिकाणी, डायोनिससच्या रंगमंचापासून थोडाच दूर एक दगडी वर्तुळ आहे, हीराचे वर्तुळ. जरी ती विरोधात होती, तरी शेवटी सावत्र का असेना पण डायोनिसस तिचा पुत्रच. तिच्या भावनिक स्मृतींचं ते वर्तुळ आहे, जिथे ईर्ष्या आणि प्रेम एकत्र विसावतात.”
त्या क्षणी मला जाणवलं, हे उपवन म्हणजे देवतांच्या स्मृतींचं साठवणगृह आहे. इथे प्रत्येक झाड, प्रत्येक वेली, आणि प्रत्येक झरा म्हणजे एक देवतेचा अनुभव. आणि आम्ही त्या अनुभवांतून चालत होतो - जणू काळाच्या पलीकडच्या रंगमंचावर.
द्राक्षांच्या वेली पार करून आम्ही पुढे येऊन पोहोचलो आणि जोसेफच्या मागे येऊन थांबलो. समोर एक विस्तीर्ण मैदान होते. त्या मैदानाच्या सभोवताली हलकी वनराई आणि त्यांच्या पलीकडे मोठ्या पर्वतरांगा होत्या. आमच्या डाव्या बाजूने अजूनही तो खळाळणारा झरा वाहात होताच. या झऱ्याचा उगम कुठे असावा याबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं.
मैदानाच्या मध्यभागी काहीतरी वेगळं दिसत होतं. कमरेपर्यंत उंच एक वर्तुळाकार लाकडी चबुतरा. पण जरा विस्तृत. त्यावर जायला समोरच्या बाजूस काही पायऱ्या होत्या. त्यावर चार बाजूंना चार लाकडी स्तंभ होते, द्राक्षाच्या वेलीनी विणलेले नक्षीकाम असलेले. प्रत्येक स्तंभावर काही चिन्हे कोरलेली होती. काही ग्रीक अक्षरे, काही भावनात्मक प्रतिके आणि काही पूर्णतः अपरिचित.
“हाच तो डायोनिसस रंगमंच. इथेच त्याने ज्ञानाचा मुखवटा तयार केला आणि आपल्या अनुयायांना जमवून त्याचे ज्ञान दिले.”, जोसेफने माहिती दिली.
आम्ही त्या पायऱ्या चढून रंगमंचावर पोहोचलो. त्या रंगमंचावर केंद्रस्थानी एक वर्तुळ कोरलेले होते. त्या वर्तुळाच्या परिघावर एक ग्रीक संदेश कोरला होता.
Ὁ κόσμος εἶναι σκηνή.
संपूर्ण जग हे एक रंगमंच आहे.
“जोसेफ, इथे आपला पुढचा रस्ता कसा शोधायचा ?”, मी कुतूहलाने विचारले.
“मी जेंव्हा तुमच्या सर्वांच्या आधी न्यासाच्या उपवनात येऊन पोहोचलो, त्यावेळी मी या परिसराची पाहणी केली. मी या रंगमंचाच्या सभोवताली फिरून काही मार्गदर्शक मिळते का ते पाहिलं. पण मला काहीच मिळालं नाही. त्या स्तंभांवरच्या काही ओळी वाचून मला इथे अथेना, अपोलो आणि आर्टेमिस यांच्या पर्वतातल्या ऊर्जास्थानांबद्दल कळलं. पण ती इथून बरीच दूर आहेत पर्वतांच्या कुशीत. अथेनची बाग सोडून, जी आपल्याला इथे येताना दिसली होती. त्यामानाने सर्वात जवळ म्हणजे मैदानाच्या पलीकडच्या वनातील हिराचे भावनात्मक वर्तुळ. पण ही सगळी उर्जास्थाने आहेत डायोनिससचे संगोपन करताना बनवण्यात आलेली, त्यामुळे तिकडे काही पुढचा मार्ग असेल असे मला वाटत नाही. डॅनी, एकदा तू तुझ्या गुप्तहेर नजरेने हा रंगमंच पाहशील का ? कदाचित माझ्या नजरेतून सुटलेले तुला सापडेल.”
जोसेफच्या प्रस्तावानुसार आम्ही तिघेही पुन्हा तो रंगमंच तपासू लागलो. प्रत्येक स्तंभाच्या जवळ जाऊन मी ते स्तंभ निरखून पाहिले. ग्रीक प्रतीके, काही ग्रीक ओळी आणि द्राक्षवेलींची नक्षी सोडून काहीच नव्हते. स्मिथदेखील रंगमंचावर निरीक्षण करत होते पण त्यांना काही विशेष मिळाले असे वाटत नव्हते. तरी ते बराच वेळ त्या केंद्रस्थानी असलेल्या वर्तुळाजवळ घुटमळत होते.
“जोसेफ इथे काहीच मिळत नाहीये. नक्कीच हीच जागा आहे का आपल्या पुढच्या प्रवासासाठीची ?”, मी जोसेफला विचारले.
“हो डॅनी. मी इथला बराच परिसर पालथा घातला आहे. माझ्या निरीक्षणात आपल्या ग्रीक देवतांची चिन्हांकित जागा फक्त हीच आहे. बाकी ठिकाणी केवळ निसर्ग आणि रम्यता आहे. त्यामुळे मला वाटते याच रंगमंचावर आपला मार्ग आहे.”
“पण जोसेफ तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे आपण शोधूनही काही मिळत नाहीये”, स्मिथनी आता संभाषणात उडी घेतली, “हे चार स्तंभ आणि हे मधले वर्तुळ सोडून इथे काहीच नाही. या वर्तुळाच्या परिघावर लिहिलेला संदेश मला वाटते अर्धाच आहे. कारण हा वर्तुळाच्या फक्त एक चतुर्थांश रेखेवर लिहिला आहे. मी इथली जागा पुसून, धूळ झटकून पहिली पण त्याखाली काही नाही मिळाले. आपण या वर्तुळात काही बारकावे शोधूयात का ?”
स्मिथचा प्रस्ताव तर्कपूर्ण असला तरी त्या वर्तुळाला देखील काही खाच, कळ वा तत्सम काही योजना नव्हती. त्यामुळे काय करायचे या प्रश्नात आम्ही तिघेही अडकलो. जोसेफ हताश होऊन त्या खांबाला हाताने टेकून म्हणाला,
“मला वाटते की आपण डायोनिससच्या स्तुतिकाव्यांनी त्याला प्रसन्न करावे आणि -
जोसेफ बोलायचं थांबला. त्याच्या हाताला काहीसा थंड प्रवाह जाणवला. त्याने वळून त्या थंड जाणीव झालेल्या स्तंभाकडे पाहिले. त्याच्या स्पर्शाने कदाचित, त्या स्तंभावरील चिन्हे जांभळ्या प्रकाशात चमकू लागली आणि विणलेल्या वेली खालून वरच्या दिशेने जळत जाऊन स्तंभाच्या माथ्यावर असलेल्या रिकाम्या जागेत आता मद्याचा प्याला तयार झाला आणि एखाद्या मशालीसारखा जळू लागला.
ते पाहून कुतूहल आणि उत्साहाने मी ज्या स्तंभाजवळ उभा होतो, तिथल्या चिन्हांना स्पर्श केला. पण काहीच घडले नाही. मी स्मिथना बोलवून त्यांना स्पर्श करायला सांगितला, पण पुन्हा तेच ! काहीच घडले नाही. कदाचित जोसेफच्या स्पर्शात ती ताकद असावी, किंवा काहितरी अनाकलनीय. जोसेफ आणि स्मिथ माझ्याकडे पाहू लागले. मी जोसेफला माझ्याजवळ बोलावले आणि या स्तंभाला स्पर्श करायला सांगितले.
आश्चर्य ! डायोनिससच्या रंगमंचावरील चिन्हांकित स्तंभांनी ज्ञानाचा स्पर्श ओळखला. जोसेफच्या स्पर्शाने हाही स्तंभ प्रज्वलित झाला.
“जोसेफ, तुझ्या स्पर्शात अशी काय जादू आहे ? माझ्या आणि स्मिथच्या स्पर्शाने जे होत नाहीये आणि तुझ्या स्पर्शाने झाले. काय आहे हे अनाकलनीय ?”
“मला वाटते डॅनी, इथे देखील मनाची स्थिरता कामी येत आहे. तुमच्या दोघांच्या मानाने माझे चित्त अतिशय स्थिर आहे. जरी मलादेखील तुमच्यासारखेच कुतूहल आणि ज्ञानाची भूक आहे पण मी त्या भावनांना शांततेत वाट करून देतो. स्मिथ त्यांच्या मनातील भयामुळे अस्थिर आहेत आणि तू गुप्तहेरीमुळे चंचल आहेस.”
मला जोसेफचे बोलणे मनोमन पटले. मी त्याला बाकीच्या स्तंभांना स्पर्शून यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितले. जेंव्हा चारही स्तंभ प्रज्वलित झाले तेंव्हा रंगमंचावर हलकी कंपने जाणवली.
“डॅनी, जोसेफ इकडे या, हे पहा.”, स्मिथनी आम्हाला खुणावत केंद्रस्थानी वर्तुळ होते त्या जागी बोलावले, “मी म्हणालो होतो या ओळी अपूर्ण आहेत.”
वर्तुळाच्या परिघावर पुढची ओळ उमटली होती.
Ὁ κόσμος εἶναι σκηνή.
καὶ ὁ θεατὴς γίνεται πρόσωπον.संपूर्ण जग हे एक रंगमंच आहे,
प्रेक्षक हेच त्यातील पात्र आहे.
आता त्या वर्तुळाच्या मध्यभागी एक मद्याच्या प्याल्याचे चिन्ह बनले होते. मी पुन्हा एकदा जोसेफला त्या मद्याच्या प्याल्याच्या चिन्हाला स्पर्श करून कार्यान्वित करण्यास सांगितले. जोसेफने त्या चिन्हाला स्पर्श करताच तो लाकडी रंगमंच पुन्हा कंपन करीत हालू लागला. केंद्रातील मद्यप्याल्याचे चिन्ह गायब होऊन, त्या भागातून आमच्या छातीपर्यंतच्या उंचीचे स्तंभसमान मेज वरती आले. त्या वर्तुळाकृती मेजावर ३ मद्यप्याले ठेवलेले होते. रिकामे !
आता परिघावरती तिसरी ओळ उमटली.
Ὁ κόσμος εἶναι σκηνή.
καὶ ὁ θεατὴς γίνεται πρόσωπον.
ἐν τῷ σκεύει ἐκχέεται τὸ καθαρὸν ἀληθές ὅλον.संपूर्ण जग हे एक रंगमंच आहे.
प्रेक्षक हेच त्यातील पात्र आहे.
पात्रात शुद्धतेचे ओतून सत्य सारे
“जोसेफ महाराज”, जोसेफच्या ज्ञानमय मार्गदर्शनाची प्रतिक्षा न करता मी बोललो, “कदाचित यावेळी मला पुढची कृती माहीत आहे. हे शुद्धतेचे सत्य बहुतेक मला कळले आहे.”
जोसेफ आश्चर्यचकित होऊन पण कौतुकाने मी काय सांगतो याची वाट पाहू लागला.
“मी जेंव्हा या उपवनात आलो तेंव्हा डायोनिससच्या कसोटीने आलेला थकवा दूर करण्यासाठी मी या झऱ्याचे पाणी प्यायलो. जोसेफ तुला देवाशप्पथ सांगतो, इतकं शुद्ध पाणी मी आजवरच्या आयुष्यात कधीच नाही प्यायलं. त्या पाण्याने मनाला जे समाधान मिळाले, त्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. कदाचित या ओळीत लिहिलेले शुद्धतेचे सत्य हेच पाणी असावे जे आपल्याला या रिकाम्या प्याल्यांत भरायचे आहे.”
“कमालच डॅनी ! या असल्या अनाकलनीय केसमध्ये गुप्तहेराला डोकं चालवायच्या संधी खूप कमी येतात. तू त्यात कमालच केलीस.”
“तुझ्या आवडीच्या क्षेत्रातील केस आहे, तुला इथे जास्त माहिती आहे, म्हणून मला टोमणा मारतोयस जोसेफ ?”
“नाही रे मित्रा ! खरोखरीच कौतुक करतोय मी. इथे खरंच सगळं बुद्धीबाहेरील आहे आणि तुमची बुद्धीजीवी गुप्तहेरांची पोटे वास्तवाच्या निकषांवर भरतात. इथे आभासांच्या राज्यात तुझे तर्क हे खरंच कौतुकास्पद आहेत. असो, जा जाऊन झऱ्यातील पाणी घेऊन ये.”
“घेऊन कशाला यायचं, हे काय माझ्याजवळ आहे की. मी चांगलं बाटली म्हरून घेतलं आहे.”, असे म्हणत मी माझ्या बॅगेतून बाटली काढून त्यातील पाणी त्या सर्व रिकाम्या प्याल्यांत भरले.
जोसेफने पुन्हा एकदा कौतुकाने माझ्याकडे नजर टाकत भुवया उंचावल्या.
जसे मी प्याले झऱ्याच्या शुद्ध पाण्याने भरले, तोच त्या प्याल्यांच्या तळाशी काही बुडबुडे येऊन ते पाणी जांभळ्या लालसर रंगात बदलले. पुन्हा एकदा आम्हाला रंगमंचावर कंपने जाणवू लागली आणि मंचाच्या खालच्या लाकडांतून फिकट जांभळा धूर येऊन समोरच्या बाजूस चांगली २ पुरुषभर उंच लाकडाची भिंत उभी राहिली. त्या भिंतीवर काही चित्रे रंगवलेली होती. एके ठिकाणी हर्मसने बाल डायोनिससला न्यासाच्या वनदेवतांना सोपवतानाचे चित्र होते. त्याच्यामागे हातात आपला विजेचा लोळ घेऊन झ्युस आणि त्याच्या शेजारी रागावलेल्या हीराचे चित्र होते. दुसऱ्या बाजूस तरुण डायोनिसस मद्य बनवतानाचे चित्र होते. वरच्या बाजूस अपोलो, आर्टेमिस, हर्मस, अथेना यांचे मुखवटे आणि चिन्हे होती तर खालच्या बाजूस प्रेक्षक वर्गाची एक स्कंधरेषांची सावली संपूर्ण भिंत डावीकडून उजवीकडे व्यापून टाकत होती. त्या भिंतीच्या अगदी मधोमध एक जुनाट ग्रीक शैलीतील दरवाजाचे चित्र होते, ज्यावर मद्याचे प्याले, द्राक्षाचे घड, काही भावनात्मक नाट्य मुखवटे, आनंद, दुःख, चिंता, उत्साह अश्या भावना दर्शवणारे, आणि काही ग्रीक अक्षरे अशीच मिश्र चिन्हे होती. दरवाजाच्या वरच्या बाजूस ज्ञानगर्भ सभामंडपातील सिंहासनावरची तीच अक्षरे होती.
उत्सवात त्याच्या जल्लोष खास,
उन्मादाच्या गर्दीत मद्याचा वास,
एकच प्याला अन् घडे वास्तवाचा भास !
“ते पहा, ओळी पूर्ण झाल्या.”, स्मिथ त्या वर्तुळाच्या परिघावरची पूर्ण झालेली ओळ दाखवत पुढे आले.
Ὁ κόσμος εἶναι σκηνή.
καὶ ὁ θεατὴς γίνεται πρόσωπον.
ἐν τῷ σκεύει ἐκχέεται τὸ καθαρὸν ἀληθές ὅλον.
ἐν τῷ ἐνδύματι ὁ δρόμος πέραν τοῦ συναισθήματος ὑπάρχει.संपूर्ण जग हे एक रंगमंच आहे.
प्रेक्षक हेच त्यातील पात्र आहे.
पात्रात शुद्धतेचे ओतून सत्य सारे
अस्तरात भावनेच्या पुढचा मार्ग आहे.
“आता काय ?”, स्मिथनी जोसेफकडे पाहत विचारले.
“आता हे भावनेचे अस्तर शोधावे लागेल, जे तुमच्या आमच्या आत आहे.”, जोसेफ उत्तरला.
“म्हणजे ?”, काहीसं गोंधळून मी विचारलं.
“म्हणजे थोड्या वेळापूर्वी जेंव्हा तू या प्याल्यात झऱ्याचं पाणी ओतत होतास, तेंव्हा मी विचार करत होतो की या ओळींचा नक्की अर्थ काय. पण तू पाणी ओतल्यावर ही भिंत इथे उभी झाली आणि चौथी ओळ उमटून परिघावरचा संदेश पूर्ण झाला. हा पूर्ण झालेला संदेश आणि दरवाज्यावर लिहिलेल्या ओळी वाचल्यावर माझ्या लक्षात आले की मी जो विचार केला होता तो बरोबर होता. तू तिसऱ्या ओळीतल्या पात्राला भांडे असा अर्थ लावला, जो अर्धा बरोबर होता. पण त्याच बरोबर पात्र म्हणजे नाटकातले पात्र असा अर्थ वरच्या ओळीत होता. तोच अर्थ जर आपण पुढे लावला तर ‘पात्रात शुद्धतेचे ओतून सत्य सारे’ याचा अर्थ असा होतो की आपण इथे प्रेक्षक होतो, आणि स्तंभ कार्यान्वित करून आपण पात्र बनलो डायोनिससच्या रंगमंचावरचे. आता त्या पात्रांत शुद्धतेचे सत्य ओतायचे आहे, म्हणजे आपल्याला हे लालसर जांभळे जे काही पेय आहे ते आपल्याला प्यावे लागणार आहे, तसे लिहिलेच आहे ‘एकच प्याला अन् घडे वास्तवाचा भास’ आणि त्यानंतर येणाऱ्या परिस्थितीतून किंवा भासातून हे भावनांचे अस्तर उलगडायचे आहे.”
“म्हणजे आणखीन एक डायोनिससची कसोटी !”, एक हताश सुस्कारा सोडत स्मिथ म्हणाले.
“यावेळी चित्त शांत ठेवा, स्मिथ. कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्याही वेळी मला कल्पना नाही या कसोटीमध्ये काय असणार याची. त्यामुळे पुन्हा एकदा मार्ग जर वेगळे झाले तर आपापल्या धैर्याने पुढे जावे लागणार आहे.”
“होय जोसेफ, यावेळी मी मन शांत ठेवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करेन.”, स्मिथनी तयारी दर्शवली खरी पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंताच जास्त दिसत होती.
मी तयार होतो जे काही होईल त्यासाठी. मी त्या स्तंभांच्या जवळ गेलो. जोसेफ आणि स्मिथ देखील माझ्या जवळ आले. तिघांनी एक एक मद्यप्याले हातात घेतले. आम्ही तिघेही ते पेय पिणार इतक्यात त्या प्याल्यावर भावमुद्रा उमटल्या. माझ्या प्याल्यावर आनंदी मुद्रा होती, स्मिथच्या चिंताग्रस्त आणि जोसेफच्या प्याल्यावर ध्यानस्थ मुद्रा होती.
“पहा मी म्हणाल्याप्रमाणे तुमच्या भावनांचे प्रतिबिंब या प्याल्यावर उमटले आहे.”, जोसेफ त्या मुद्रा आम्हाला दाखवत म्हणाला.
मी पिण्याआधी त्या लालसर जांभळ्या पेयाचा वास घेऊन पाहिला. मला तो मद्यासारखा वाटला. कदाचित द्राक्षापासून बनवलेली वाइन असावी. जोसेफने तोपर्यंत ते पेय प्यायला सुरुवात केली होती. ते पिऊन झाल्यावर त्याचा चेहरा त्रासिक झाला. त्याला कसला तरी त्रास होत असावा. त्याने डोकं धरलं आणि ओरडायला लागला. स्मिथ घाबरून त्याच्याकडे पाहू लागले.
“जोसेफ.. जोसेफ.. काय होतय तुला !”, मी काळजीने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा काहितरी अनाकलनीय झाले होते आणि मला माझे पाय उचलता येईनात, जणू काही ते लाकडी रंगमंचावर घट्ट रुतून बसलेत. अचानक जोसेफ हसू लागला, आणि आता त्याचा त्रासिक चेहरा जाऊन एक ध्यानस्थ छटा त्याच्या चेहऱ्यावर आली. आता तो नाटकातल्यासारखे हातवारे करू लागला.
“ओ डायोनिसस, उन्मादाच्या देवा, आभासाच्या गर्तेतून वास्तवाच्या शिखरावर जाण्याची संधी दे.”
एवढे बोलून तो आमच्याकडे वळला, तसाच डोळे मिटून ध्यानस्थ मुद्रेने. आमच्याकडे चेहरा करत तो म्हणाला, “माझ्याकडे नुसते पाहत बसू नका, माझ्यामागे म्हणा”, आणि पुन्हा एकदा त्याने डायोनिससची प्रार्थना म्हणली.
स्मिथनी माझ्याकडे पाहिलं. मी डोळ्यानेच त्यांना होकारार्थी सूचना केली त्याच्यामागे त्या ओळी म्हणण्याची. पण हे काय !!! आमच्या घश्यातून आवाजच फुटेना. स्मिथदेखील काहितरी बोलायचा प्रयत्न करताना दिसत होते पण त्यांच्याही घशातून आवाज बाहेर येत नव्हता. माझ्या घशाला एका सेकंदासाठी कोरड पडल्यासारखे झाले. आमच्या हातात ते न प्यालेले पेय तसेच होते. मी तीन घोटात ते पेय गटकले. दोन सेकंद काहीच झाले नाही. हातानेच मी स्मिथना इशारा केला पेय पिण्याचा. पण मला कल्पना नाही आली त्यांनी पेय घेतले का नाही याची. कारण पुढच्याच क्षणाला माझं डोकं प्रचंड गरगरायला लागलं. मी देखील जोसेफ प्रमाणे डोक्याला हात लावला, आणि होणाऱ्या वेदनेमुळे घट्ट दाबून धरलं. मी डोळे बंद केले, आणि गुडघ्यावर बसून डोकं दाबू लागलो. ती डोक्यातील गरगर कमी व्हायची नाव घेत नव्हती.
काय होत आहे ? काय करावे ? हा विचार करत असतानाच माझ्या सुप्तावस्थेतील मेंदूने मला आठवण करून दिली, डायोनिससच्या भासांची, आणि पाठोपाठ रिकार्डोच्या तळघरातल्या गोंधळाची. मी स्वतःला समजावलं ही गरगर देखील एक प्रकारचा भास आहे आणि स्थिरविवेक ठेऊन शांतपणे स्वस्थ बस. डोक्यात प्रचंड गरगर चालू असताना चित्त शांत करणे मोठ्या जिकिरीचे काम होते. पण मोठ्या मुश्किलीने काहीच मिनिटात ते मला प्राप्त करता आले. आता गरगर पूर्णपणे थांबली होती. मी डोळे उघडून पाहिले. जोसेफ आणि स्मिथ समोरच त्यांच्या जागी उभे होते पण खाली रंगमंच नव्हता. एका प्रसन्न सकाळच्या प्रहरी मी कुठल्यातरी गवतावर उभा होतो. समोरच्या पर्वतरांगांतून सूर्य डोकावत होता. पक्षी आकाशात भ्रमंती करत होते. जवळच्या वनराईतून पुन्हा तशीच पानांची सळसळ ऐकू येत होती. पुन्हा एकदा मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात मी उभा होतो.
“जोसेफ”, आता माझ्या गळ्यातून आवाज फुटला, “अरे मला बोलताच येत नव्हते. मगाशी तू प्रार्थना म्हणायला सांगितलीस तेंव्हा गळ्यातून आवाजाच फुटत नव्हता.”
“अच्छा !”, शांतपणे धीरगंभीर आवाजात जोसेफ म्हणाला, “मला वाटले की तू मूकाभिनय करतोयस.”
जोसेफच्या आवाजात एक प्रकारची गंभीरता होती, जणू एखाद्या संताने उपदेश द्यावा, अश्या सुरात तो बोलत होता.
“जोसेफ असा संतांसारखा काय बोलतोयस ! हे कसले नवे सोंग!”
“सोंग नाही डॅनी, नाट्य म्हण ! आपण डायोनिससच्या रंगमंचावर आहोत. अभिनय हीच आपल्या मार्गातली पुढची पायरी आहे.”, पुन्हा तोच धीरगंभीर आवाज.
“रंगमंच ! आपण एका नयनरम्य निसर्गात आहोत. तो पहा किती आल्हाददायक सुर्योदय आहे, त्याचा अनुभव घे.”
क्षणभर जोसेफची मुद्रा त्रासिक झाल्यासारखी वाटली, पण लगेचच ध्यानस्थ हावभाव आणून जोसेफ म्हणाला,
“अच्छा अशी कसोटी आहे तर !”, एक दीर्घ श्वास घेऊन जोसेफ संथ लयीत बोलू लागला, “इथे भासांच्या दुनियेला वास्तवाचे टाके आहेत. या आभासी दुनियेत तू मी आणि स्मिथ हे स्थिर बिंदू आहोत आणि प्रत्येकासाठी त्यांचं एक वेगळं विश्व समोर दृश्यमान आहे. त्या भासाला आपल्याला भावनांच्या अस्तराने छेदून पुढे जायचं आहे.”
“संत जोसेफ महाराज, सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजेल असे बोला.”, मी थोडासा गोंधळून जाऊन बोललो.
“डॅनी तू परत मूकाभिनय करतोयस ! मला तू बोललेला एकही शब्द ऐकू आला नाही. फक्त ओठ हललेले दिसत आहेत. आणि गोंधळलेली मुद्रा”
मी पुन्हा गोंधळून गेलो. पुन्हा एकदा डोक्यात गरगर सुरू होतेय असे वाटले. लगेच मी मनाला शांत केले, आणि दीर्घ श्वास घेतला. त्या श्वासातच मला उत्तर सापडले. लागलीच मी हसून जोसेफला पुन्हा एकदा म्हणालो,
“संत जोसेफ महाराज, सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजेल असे बोला.”
जोसेफ हसलेला दिसला पण त्याचा आवाज नाही आला. मला मिळालेल्या उत्तराची पडताळणी झाली आणि माझ्या विचारांना दिशा मिळाली.
“जोसेफ, मला हे कोडं समजलंय. आपल्या प्याल्यांवरती ज्या मुद्रा उमटल्या होत्या त्यांचा मुद्राभिनय करत आपण जे बोलू ते एकमेकांना ऐकू येते आहे. जर आपण चेहऱ्यावरची छटा जरी बदलली, तरी समोरच्याला फक्त मूकाभिनय दिसतो. त्यामुळे तुला हे असे संतांसारखे आणि मला लहान मुलासारखे हसत बोलावे लागणार आहे.”
“पुन्हा एकदा कमाल केलीस डॅनी ! पण आता हेच त्या स्मिथंना सांग जरा. ते मघापासून त्यांच्या कसोटीला उगाच धैर्य दाखवून सामना करत आहेत.”
आम्ही स्मिथकडे पाहिले. मोठ्या धैर्याने छाती पुढे काढून ते उभे होते आणि मूकाभिनय करून आमच्याकडे पाहत होते. कदाचित आमचे बोलणे त्यांना ऐकू गेले नसावे म्हणून मी पुन्हा काही गोष्टी स्मिथना समजाऊन सांगू लागलो, तोच माझ्याकडे हाताने थांब असा इशारा करत ते गुडघ्यावर बसले आणि वरच्या दिशेने हात जोडून रडल्यासारखे करू लागले. आता आम्हाला त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि त्यातील विनवणी पण ऐकू आली, “नको नको वाचवा मला”
पुढच्याच क्षणाला स्मिथ उठून उभे राहिले, चेहऱ्यावरील दुःखी मुद्रा न बदलता आणि रडक्या आवाजात बोलू लागले,
“मी ऐकलं तुमचं बोलणं. इथल्याही कसोटीत माझ्या अंधार आहे. ज्वालामुखीच्या आगीशेजारी मी उभा आहे, आणि इकडे सुद्धा पुन्हा अजगर आहेत.”, आणखीच रडून ते म्हणाले, “मी आधीच्या कसोटीप्रमाणे घाबरून न जाता धैर्याने तोंड देण्याचा प्रयत्न करत होतो पण मला त्या आगीचे चटके बसत होते आणि अजगर मला दंश करण्याचा प्रयत्न करत होता. पण तुमचे बोलणे मी ऐकले आणि घाबरल्याचा अभिनय करताच अजगरही पळून गेला, ज्वालामुखीही शांत झाला.”
त्यांचे बोलणे रडक्या आवाजात ऐकून मला जरा विचित्र वाटत होते. जोसेफ आपला शांत संत मुद्रेने स्मिथकडे पाहत होता. आम्हा दोघांकडे हात करून तो निर्विकारपणे बोलला,
“चला ! आता आपल्याला कसोटीची कल्पना आली आहे. हा शेवटचा टप्पा आता पार करूया. मी, डायोनिससच्या स्तुतीचे एक डिथरँबस म्हणतो, तुम्ही दोघांनी एकत्र माझ्या मागे पुनःउच्चारण करा. आणि कोरस दिल्यासारखे एकत्र म्हणा.”
जोसेफ म्हणू लागला -
“ओ डायोनिसस, उन्मादाच्या देवा, आभासाच्या गर्तेतून वास्तवाच्या शिखरावर जाण्याची संधी दे.”
आम्ही दोघांनी त्याच्यामागून त्याच ओळींच उच्चारण केलं. एक हसरा आवाज आणि एक रडका आवाज एकत्र स्तुतीगायन करताना ऐकून फारच विचित्र वाटत होतं. पण हेच तर आभासाच्या विश्वातलं गमक होतं. जे दिसतं तसं नसतं, म्हणूनच मानव सत्यापासून दूर दूर जात राहिला आहे. जोसेफने पुढच्या ओळी म्हणायला सुरुवात केली आणि आम्ही दोघांनी त्या विचित्र एकीने पुनरुच्चारित केल्या.
“तुझ्या वेलींमध्ये गुंफलेली आहे माझी स्मृती, आणि तुझ्या प्याल्यात विरघळलेली आहे माझी भूमिका.”
“जीवनाच्या मुखवट्यांतून मी जे काही सादर केलं, ते तुझ्या नजरेतूनच सत्य ठरलं.”
“माझ्या आभासी अस्तित्वाला तू दे शुद्धतेचं पात्र, जिथे भावनांचा उन्माद म्हणजेच आत्म्याचा मार्ग आहे.”
“माझ्या अभिनयाच्या अस्तरात लपलेली आहे ती दिशा — जी तुझ्या प्रकाशातच उलगडते.”
“हे देवा, मला दाखव तो मार्ग जिथे मुखवटा गळून पडतो, आणि आत्मा स्वतःचं रूप ओळखतो.”
“तुझ्या रंगमंचावरच मला सापडो ते अंतिम सत्य.”
माझा आणि स्मिथचा कोरस पूर्ण होताच काही क्षण मन विचलित करणारी एक अस्वस्थ शांतता पसरली.
…आणि पुढच्याच क्षणाला माझ्यासाठी आकाशातील सूर्याचा, स्मिथसाठी ज्वालामुखीचा आणि जोसेफसाठी रंगमंचावरील जमिनीचा कान बंद करणारा आवाज होत प्रचंड मोठा विस्फोट झाला..
क्रमशः
खूप छान सुरू आहे कथा..
खूप छान सुरू आहे कथा..
ग्रीक मायथॉलॉजी वर आधारलेली मराठी कादंबरी मी तर प्रथमच वाचते आहे.
कल्पनाविश्व अद्भुत आहे तुमचे.
लिहित रहा.
धन्यवाद धनवंती !! १२
धन्यवाद धनवंती !! १२ वर्षापूर्वी डोक्यात आलेली कल्पना आहे ही आत्ता कागदावर उतरवतोय
तुमच्या अश्या प्रतिक्रियांनी अजूनच भारी वाटते आणि काहीतरी अद्भुत लिहिण्याचे बळ येते ! खूप खूप मनापासून आभार ! _/\_