पॉंडिचेरीमधे मी ज्या रेस्टॉरंट मधे काम करायचे ते मालक, म्हणजे माझे घरमालक - पीचया, स्वतः गे होते. तिथल्या फ्रेंच भागात सर्व प्रकारचे लैंगिक संबंधं समाजमान्य आहेत पण आजूबाजूलाही तसा कमी "तिरस्कार" पाहण्यात आला. तिरस्कार म्हणतेय कारण रेस्टॉरंटमधे येणाऱ्या काही भारतीय लोकांची तशी भावना दिसली होती. माझं काम रेस्टॉरंट मधे आलेल्या लोकांशी गप्पा मारणं हे असल्याने बऱ्याच लोकांशी मी दिलखुलास गप्पा मारत होते. तिथे काहींनी मला "हा माणूस गे आहे, इथे तुला काही त्रास होऊ शकतो मग इथे का राहातेस" असं विचारलं होतं. एका मुलीला बॉस गे असल्याने त्रास होईल असं तुम्ही म्हणताय यात नेमकं काय लॉजिक आहे यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं.
रेस्टॉरंटमधे सर्व जेंडरच्या लोकांना safe space असल्यासारखं वाटायचं. व्हॅलेन्टाईन डे, वाढदिवस, पहिल्या भेटीची ॲनिवर्सरी वगैरे आम्ही साजरी करायला मदत करायचो. या ऑर्डरी देणारे कधी भारतीय जोडीदारही असायचे. हातात हात घेऊन बसणं, किस करणं असं PDA इतक्या सहजपणे भारतात मी तिथेच प्रथम बघितलं. बाकी फक्त बागा नी समुद्रकिनाऱ्यावर लपून छपून, किंवा मग माझ्या ऑफिस आणि घर या चक्रात माझं कधी लक्ष गेलं नसेल.
रेस्टॉरंटमधे यात सगळ्या जेंडरचे लोक असायचे. हातात हात घेऊन "त्या"च्या खांद्यावर डोकं ठेऊन बसलेला "तो", "ति"ने दिलेली भेटवस्तू पाहून आनंदाने चित्कारत तिच्या ओठांचं चुंबन घेणारी "ती", साड्या नेसलेल्या, दाढीमिश्या काढून काढून हिरवट झालेला चेहेरा असलेल्या मुलींची बडबड हे सगळं अधूनमधून दिसायचं. आमच्या रेस्टॉरंटमधे अगदी क्वचितच कोणी तिरस्कारप्रिय लोक दिसायचे, पण दिसायचे मात्र!
एक मूळचा पॉंडिचेरीचा तमिळ मुलगा जो आता फ्रांसमधे स्थायिक झालाय, त्याचा पार्टनर फ्रांसमधला फ्रेंच आहे. पार्टनर खूप लवी डवी प्रकारचा आहे, हातात हात घालून फिरणं, जवळ घेणं वगैरे आवडणारा, टिपीकल फ्रेंच मुलगा. भारतात आमचं रेस्टॉरंट सोडून बाहेर कुठे हे सगळं करू शकत नाही म्हणून खूप कमी वेळा भारतात येतो म्हणे. मी एकदा फक्त व्हिडीओ कॉलवर बोलले होते त्याच्याशी. यावेळी फ्रान्समधे त्यांच्या घरी गेले होते तेव्हा खूप मजा आली होती त्याच्याबरोबर.
घरीही लोक यायचे, जेवायला तर रोजच पाचसहा लोक असायचे, कोणी राहायलाही असायचे गेस्टहाऊस मधे. विचित्र हातवारे करत वावरणारा एक मुलगा होता, आता ती मुलगी झालीय. त्याला पीचया ओरडायचे की सिनेमात ट्रान्स / गे दाखवतात ते बघून तसं वागू नकोस, खरा जसा आहेस तसाच राहा. दुसरी एक, जी काही वर्षांपूर्वी मुलगी झाली होती त्यामुळे तिला तशीच हाक मारली जायची. ती प्राईड मूव्हमेंट मधे सक्रिय होती. दोनच दिवस भेटली, त्यातही आम्ही दोघी एका समारंभाच्या तयारीत खूप व्यग्र होतो त्यामुळे इतर गोष्टी बोलायला नाही मिळाल्या. एक मुलगा जो बाजूच्या सरकारी ऑफिसात काम करायचा पण डबा घेऊन दुपारी आमच्याकडे जेवायला यायचा. त्याने एका ऑपरेशन करून बाई झालेल्या ट्रान्स शी लग्न केलं होतं. आमच्या घरात त्याची बायको कोणाला जास्त आवडायची नाही कारण ती खूप खडूस होती म्हणे! कायकाय सहन करावं लागलं असेल लहानपणापासून म्हणून झाली असेल कदाचित तशी पण मला माझ्या एकदोन भेटीत तरी तशी खडूस वाटली नाही. क्रुजिंग एरियामधे ( गे डेटिंग एरिया) "त्या"चा "बॉयफ्रेंड" फिरत होता हे त्याला कळलं तर काय अवस्था होईल बिचाऱ्याची म्हणून वाईट वाटणारा मुलगा आणि डेटिंग साईटवर "ति"चा "बॉयफ्रेंड" दिसला म्हणून वाईट वाटणारी तिची मैत्रीण यात विशेष फरक केला गेला नव्हता. बायफ्रेंडने नातं तोडलं कारण त्याला दुसरा कोणी आवडला, होतं असं कधीकधी, होतात की लोकांचे ब्रेकअप, तुलाही मिळेल कोणी दुसरा. तिला दुसरीला किस करताना बघितलं पण बाई तुम्ही exclusive राहायचं असं ठरवलं होतात का? घरात ही अशी बोलणी कधीमधी व्हायची पण कुठल्याही मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात व्हावी अशीच होती ती. आपल्या sexual orientation किंवा gender मुळे अशा समस्या आल्यात असं कोणी बोलून दाखवलं नाही.
आणि हे सगळं 377 जायच्या अगोदरचं!
चैत्रात होणारा कूतांडवर् उत्सव बघायला जायचं माझं राहून गेलय. पॉंडिचेरीपासून 80 किलोमीटरवर असणाऱ्या कूवगम गावामधल्या कूतांडवर् देवळात (Shri Koothandavar Temple, Tamilnadu) चैत्रात देशभरातले ट्रान्सजेंडर एकत्र येतात. पंधरा दिवस उत्सव असतो आणि त्यात राज्यसरकार, एनजीओ, काही प्रायोजक यांच्यातर्फे वेगवेगळे कार्यक्रम होतात. ट्रान्सजेंडर लोक विविध कला, नृत्य सादर करतात, सौंदर्यस्पर्धाही होतात. काही लोक प्रेरणा घेण्यासाठी किंवा धैर्य एकवटण्यासाठी येतात की आपण एकटे नाही, नव्हे आपल्यासारखे लाखो आहेत.
हा कूतांडवर् म्हणजे अरवन, म्हणजे अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांचा मुलगा. महाभारत युद्धाच्यावेळी नरबळी द्यायचा होता. अरवन या कामासाठी तयार झाला पण शेवटची इच्छा म्हणून लग्न करायचं म्हणाला. एका रात्रीसाठी कोण लग्न करून मग विधवा बनून राहाणार म्हणून मग कृष्णानेच मोहिनी अवतार घेऊन लग्न केलं. दुसऱ्या दिवशी अरवनाचा बळी दिला गेला. त्याची आठवण म्हणून स्त्री बनलेले, बनू इच्छिणारे, मनातून स्त्री असलेले पुरुष हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अरवन देवाशी लग्न करतात, लग्नाचा चुडा हातात घालतात, गळ्यात तमिळ पद्धतीचं मंगळसूत्र म्हणजे ताली (thaali) बांधतात. रात्रभर नाच गाणी आंनद साजरा करतात. दुसऱ्या दिवशी मात्र स्मशान बनतं तिथे. बळी दिल्याने पती मेल्याचा आक्रोश, फुटलेला चुडा, तुटलेल्या ताल्या, विस्कटलेलं कुंकू! हे सगळं ऐकूनच मला तिथे जावसं वाटलं नाही पण पाहिले 13 दिवस मजा बघायला जायला हवं कधीतरी! कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आलीय. बऱ्याच ट्रान्सना इथे नवीन आयुष्यही मिळतं. तिथे आलेले एनजीओचे लोक बऱ्याच गोष्टींची माहिती करून देतात, सरकारी व खाजगी योजना सांगतात, स्वछता आणि शारिरीक काळजी कशी घ्यावी ते सांगतात. एकूण मजा आणि प्रबोधन, दोन्हींचा छान मिलाप असतो.
पीचया म्हणायचे की आपल्या लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलायचं नेहमी. लोकांना हे काही वेगळं आहे असं जाणवता कामा नये. जसं शर्टपॅन्ट घालणाऱ्या मुली बघून हल्ली कोणी "काय मुलगी आहे, पॅन्ट घातलीय" असं म्हणत नाही ( काही ठिकाणी अजूनही म्हणतात) तसं साड्या नेसलेले पुरुष बघूनही कोणाला काही वाटणार नाही इतपत बदल झाला पाहीजे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण काही वेगळे आहोत असा बाऊ करून लपून छपून राहाणार नाही. घरी कसं सांगू अशी मुलांना भिती नको वाटायला. बऱ्याच ट्रान्स, गे, लेस्बियन लोकांचे आई वडीलही घरी येत. कधी कोणी "आम्ही किती भोगलय / भोगतोय" असं बोलून नाही दाखवलं. आयडियल सोसायटी म्हणतात ना, तसा आमचा गोतावळा होता.
मलाही विचारलं होतं पिचयांनी, तू रात्री घरी एकटी का येतेस, कोणी मुलगा किंवा मुलगी का नाही सोबतीला आणत? मला खूप हसू आलं होतं, साठ वर्षांच्या माणसाने पस्तिशी उलटलेल्या मुलीला ( बाई, बाई, माहितेय
) असं विचारलं म्हणून. म्हटलं आवडलं तसच कोणी तर आणेन नक्की! मी असेक्शुअल नाही हे माहीत असल्याने ते मला सांगायचे की सेक्स हा इतका सुंदर आनंदं निसर्गाने आपल्याला दिलाय तो केवळ त्याचं पुनरोत्पादनाचं काम चालू राहावं म्हणून नव्हे. ते चालूच राहाणार आहे, बरेच लोक नवीन लोकांना जन्म देणारच आहेत, पण आपल्याला जन्म द्यायची इच्छा नाही किंवा ते काम यापुढे करायचे नाहीय म्हणून आपण या आनंदापासून असेक्शुअल नसताना का वंचित राहायचं. आपण आपली शारीरिक आणि भावनिक काळजी घेऊन आपल्या शारीरिक गरजा आणि इच्छा पूर्ण कराव्यात. ते चित्रकार असल्याने त्यांच्या चित्रातूनही ते असेच व्यक्त होत. त्यांची फ्रांसमधली चित्रप्रदर्शनं तिथल्या लोकांना खूप आवडत. तिथले बरेच लोक भारतात फिरायला आले की पॉंडिचेरीला भेट देऊन पीचयांची चित्र बघत आणि विकत घेत.
पीचया करोनाच्या लाटेत वयाच्या पासष्टव्या वर्षी गेले. त्यांचं रेस्टॉरंट आता त्यांचा एक नातेवाईक चालवतो. अजूनही ती जागा safe place for all genders आहे का ते माहीत नाही. ते घर पडीक आहे. सगळे मित्रमैत्रिणी ठिकठिकाणी पांगले. मी जेव्हा पॉंडिचेरीला जाते तेव्हा बऱ्याच जणांना भेटते. कधी फोनवर, सोशल मिडियावर बोलणं होतं. पण वेगळेपणाबद्दल कधी बोलणं होत नाही.
अशा सेफ स्पेस सगळ्यांसाठी असाव्यात. असतीलही कदाचित बऱ्याच ठिकाणी पण आपण आपल्यासारख्या असलेल्या लोकांच्या गोतावळ्यात राहातो त्यामुळे आपल्याला दिसले / जाणवले नसेल. त्यामुळे पॉंडिचेरीमधे असच असतं असं नाहीय. मी अनुभवलेली पॉंडिचेरी तुम्हाला दिसेल असही सांगता येत नाही. माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणी पॉंडिचेरीला जाऊन आल्या पण त्यांना ही बाजू कधी दिसली नाही. माझ्या काही गे मित्रांना दिसलेली मुंबई मलाही कधी दिसली नव्हती तसच हे. पॉंडिचेरीमधे रहाणारा एक "तिरस्कार" प्रकारातला नव्हे तर "किळस येते" म्हणणारा स्ट्रेट मुलगा जेव्हा आमच्या गोतावळ्यात सामील झाला तेव्हा हळूहळू त्याचं मत बदलत गेलं आणि तो पण सगळ्यांचा लाडका दादा बनला. त्याने त्याच्यासारख्या इतरांचंही मतपरिवर्तन केलं. मी पण जिथे जाते तिथल्या लोकांना माझे हे अनुभव सांगते, यात काही वेगळं वाटण्यासारखं नाही हे आवर्जून सांगते. काहींना पटतं, काही "त्यांचं काय ते असूदे, मला काही वेगळं वाटत नाही, पण माझ्या मुलाने जावई किंवा मुलीने सून आणलेली मला चालणार नाही" असं सांगतात. आपल्याला समाज म्हणून बराच मोठा टप्पा गाठायचाय असं पुस्तकी / वर्तमानपत्री वाक्य उगाच नाही लिहीत कोणी!
पुढच्या पिढीला या गोष्टी समजावून सांगितल्या तर लवकर कळतात, कोणता पगडा नाही मनावर म्हणून असेल. माझ्या सात-आठ वर्षांच्या भाचेकंपनीला माहीत आहे की लग्न म्हणजे फक्त नवरा बायको नव्हे तर नवरा-नवरा आणि बायको-बायकोही असू शकतात. दहा वर्षांच्या भाचीला LGBTQAI म्हणजे काय हे सविस्तरपणे सांगता येतं. ही पिढी पुढे जाऊन सर्वसमावेशक समाज बनवू शकेल. तोपर्यंत इतरांच्या निवडीचा सन्मान करायला स्वतःपासून सुरुवात केली तरी पुरे आहे सध्या तरी!
मी नुकतीच मुझे रंग दे ही यु
मी नुकतीच मुझे रंग दे ही यु ट्यूबवरची सिरीज पाहायला सुरुवात केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=dAjY3ojsQmk
Pages