मी पाहिलेली लैंगिक अल्पसंख्यांकांची पॉंडिचेरी

Submitted by सोनू. on 21 September, 2025 - 10:04

पॉंडिचेरीमधे मी ज्या रेस्टॉरंट मधे काम करायचे ते मालक, म्हणजे माझे घरमालक - पीचया, स्वतः गे होते. तिथल्या फ्रेंच भागात सर्व प्रकारचे लैंगिक संबंधं समाजमान्य आहेत पण आजूबाजूलाही तसा कमी "तिरस्कार" पाहण्यात आला. तिरस्कार म्हणतेय कारण रेस्टॉरंटमधे येणाऱ्या काही भारतीय लोकांची तशी भावना दिसली होती. माझं काम रेस्टॉरंट मधे आलेल्या लोकांशी गप्पा मारणं हे असल्याने बऱ्याच लोकांशी मी दिलखुलास गप्पा मारत होते. तिथे काहींनी मला "हा माणूस गे आहे, इथे तुला काही त्रास होऊ शकतो मग इथे का राहातेस" असं विचारलं होतं. एका मुलीला बॉस गे असल्याने त्रास होईल असं तुम्ही म्हणताय यात नेमकं काय लॉजिक आहे यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं.

रेस्टॉरंटमधे सर्व जेंडरच्या लोकांना safe space असल्यासारखं वाटायचं. व्हॅलेन्टाईन डे, वाढदिवस, पहिल्या भेटीची ॲनिवर्सरी वगैरे आम्ही साजरी करायला मदत करायचो. या ऑर्डरी देणारे कधी भारतीय जोडीदारही असायचे. हातात हात घेऊन बसणं, किस करणं असं PDA इतक्या सहजपणे भारतात मी तिथेच प्रथम बघितलं. बाकी फक्त बागा नी समुद्रकिनाऱ्यावर लपून छपून, किंवा मग माझ्या ऑफिस आणि घर या चक्रात माझं कधी लक्ष गेलं नसेल.

रेस्टॉरंटमधे यात सगळ्या जेंडरचे लोक असायचे. हातात हात घेऊन "त्या"च्या खांद्यावर डोकं ठेऊन बसलेला "तो", "ति"ने दिलेली भेटवस्तू पाहून आनंदाने चित्कारत तिच्या ओठांचं चुंबन घेणारी "ती", साड्या नेसलेल्या, दाढीमिश्या काढून काढून हिरवट झालेला चेहेरा असलेल्या मुलींची बडबड हे सगळं अधूनमधून दिसायचं. आमच्या रेस्टॉरंटमधे अगदी क्वचितच कोणी तिरस्कारप्रिय लोक दिसायचे, पण दिसायचे मात्र!

एक मूळचा पॉंडिचेरीचा तमिळ मुलगा जो आता फ्रांसमधे स्थायिक झालाय, त्याचा पार्टनर फ्रांसमधला फ्रेंच आहे. पार्टनर खूप लवी डवी प्रकारचा आहे, हातात हात घालून फिरणं, जवळ घेणं वगैरे आवडणारा, टिपीकल फ्रेंच मुलगा. भारतात आमचं रेस्टॉरंट सोडून बाहेर कुठे हे सगळं करू शकत नाही म्हणून खूप कमी वेळा भारतात येतो म्हणे. मी एकदा फक्त व्हिडीओ कॉलवर बोलले होते त्याच्याशी. यावेळी फ्रान्समधे त्यांच्या घरी गेले होते तेव्हा खूप मजा आली होती त्याच्याबरोबर.

घरीही लोक यायचे, जेवायला तर रोजच पाचसहा लोक असायचे, कोणी राहायलाही असायचे गेस्टहाऊस मधे. विचित्र हातवारे करत वावरणारा एक मुलगा होता, आता ती मुलगी झालीय. त्याला पीचया ओरडायचे की सिनेमात ट्रान्स / गे दाखवतात ते बघून तसं वागू नकोस, खरा जसा आहेस तसाच राहा. दुसरी एक, जी काही वर्षांपूर्वी मुलगी झाली होती त्यामुळे तिला तशीच हाक मारली जायची. ती प्राईड मूव्हमेंट मधे सक्रिय होती. दोनच दिवस भेटली, त्यातही आम्ही दोघी एका समारंभाच्या तयारीत खूप व्यग्र होतो त्यामुळे इतर गोष्टी बोलायला नाही मिळाल्या. एक मुलगा जो बाजूच्या सरकारी ऑफिसात काम करायचा पण डबा घेऊन दुपारी आमच्याकडे जेवायला यायचा. त्याने एका ऑपरेशन करून बाई झालेल्या ट्रान्स शी लग्न केलं होतं. आमच्या घरात त्याची बायको कोणाला जास्त आवडायची नाही कारण ती खूप खडूस होती म्हणे! कायकाय सहन करावं लागलं असेल लहानपणापासून म्हणून झाली असेल कदाचित तशी पण मला माझ्या एकदोन भेटीत तरी तशी खडूस वाटली नाही. क्रुजिंग एरियामधे ( गे डेटिंग एरिया) "त्या"चा "बॉयफ्रेंड" फिरत होता हे त्याला कळलं तर काय अवस्था होईल बिचाऱ्याची म्हणून वाईट वाटणारा मुलगा आणि डेटिंग साईटवर "ति"चा "बॉयफ्रेंड" दिसला म्हणून वाईट वाटणारी तिची मैत्रीण यात विशेष फरक केला गेला नव्हता. बायफ्रेंडने नातं तोडलं कारण त्याला दुसरा कोणी आवडला, होतं असं कधीकधी, होतात की लोकांचे ब्रेकअप, तुलाही मिळेल कोणी दुसरा. तिला दुसरीला किस करताना बघितलं पण बाई तुम्ही exclusive राहायचं असं ठरवलं होतात का? घरात ही अशी बोलणी कधीमधी व्हायची पण कुठल्याही मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात व्हावी अशीच होती ती. आपल्या sexual orientation किंवा gender मुळे अशा समस्या आल्यात असं कोणी बोलून दाखवलं नाही.

आणि हे सगळं 377 जायच्या अगोदरचं!

चैत्रात होणारा कूतांडवर् उत्सव बघायला जायचं माझं राहून गेलय. पॉंडिचेरीपासून 80 किलोमीटरवर असणाऱ्या कूवगम गावामधल्या कूतांडवर् देवळात (Shri Koothandavar Temple, Tamilnadu) चैत्रात देशभरातले ट्रान्सजेंडर एकत्र येतात. पंधरा दिवस उत्सव असतो आणि त्यात राज्यसरकार, एनजीओ, काही प्रायोजक यांच्यातर्फे वेगवेगळे कार्यक्रम होतात. ट्रान्सजेंडर लोक विविध कला, नृत्य सादर करतात, सौंदर्यस्पर्धाही होतात. काही लोक प्रेरणा घेण्यासाठी किंवा धैर्य एकवटण्यासाठी येतात की आपण एकटे नाही, नव्हे आपल्यासारखे लाखो आहेत.

हा कूतांडवर् म्हणजे अरवन, म्हणजे अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांचा मुलगा. महाभारत युद्धाच्यावेळी नरबळी द्यायचा होता. अरवन या कामासाठी तयार झाला पण शेवटची इच्छा म्हणून लग्न करायचं म्हणाला. एका रात्रीसाठी कोण लग्न करून मग विधवा बनून राहाणार म्हणून मग कृष्णानेच मोहिनी अवतार घेऊन लग्न केलं. दुसऱ्या दिवशी अरवनाचा बळी दिला गेला. त्याची आठवण म्हणून स्त्री बनलेले, बनू इच्छिणारे, मनातून स्त्री असलेले पुरुष हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अरवन देवाशी लग्न करतात, लग्नाचा चुडा हातात घालतात, गळ्यात तमिळ पद्धतीचं मंगळसूत्र म्हणजे ताली (thaali) बांधतात. रात्रभर नाच गाणी आंनद साजरा करतात. दुसऱ्या दिवशी मात्र स्मशान बनतं तिथे. बळी दिल्याने पती मेल्याचा आक्रोश, फुटलेला चुडा, तुटलेल्या ताल्या, विस्कटलेलं कुंकू! हे सगळं ऐकूनच मला तिथे जावसं वाटलं नाही पण पाहिले 13 दिवस मजा बघायला जायला हवं कधीतरी! कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आलीय. बऱ्याच ट्रान्सना इथे नवीन आयुष्यही मिळतं. तिथे आलेले एनजीओचे लोक बऱ्याच गोष्टींची माहिती करून देतात, सरकारी व खाजगी योजना सांगतात, स्वछता आणि शारिरीक काळजी कशी घ्यावी ते सांगतात. एकूण मजा आणि प्रबोधन, दोन्हींचा छान मिलाप असतो.

पीचया म्हणायचे की आपल्या लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलायचं नेहमी. लोकांना हे काही वेगळं आहे असं जाणवता कामा नये. जसं शर्टपॅन्ट घालणाऱ्या मुली बघून हल्ली कोणी "काय मुलगी आहे, पॅन्ट घातलीय" असं म्हणत नाही ( काही ठिकाणी अजूनही म्हणतात) तसं साड्या नेसलेले पुरुष बघूनही कोणाला काही वाटणार नाही इतपत बदल झाला पाहीजे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण काही वेगळे आहोत असा बाऊ करून लपून छपून राहाणार नाही. घरी कसं सांगू अशी मुलांना भिती नको वाटायला. बऱ्याच ट्रान्स, गे, लेस्बियन लोकांचे आई वडीलही घरी येत. कधी कोणी "आम्ही किती भोगलय / भोगतोय" असं बोलून नाही दाखवलं. आयडियल सोसायटी म्हणतात ना, तसा आमचा गोतावळा होता.

मलाही विचारलं होतं पिचयांनी, तू रात्री घरी एकटी का येतेस, कोणी मुलगा किंवा मुलगी का नाही सोबतीला आणत? मला खूप हसू आलं होतं, साठ वर्षांच्या माणसाने पस्तिशी उलटलेल्या मुलीला ( बाई, बाई, माहितेय Wink ) असं विचारलं म्हणून. म्हटलं आवडलं तसच कोणी तर आणेन नक्की! मी असेक्शुअल नाही हे माहीत असल्याने ते मला सांगायचे की सेक्स हा इतका सुंदर आनंदं निसर्गाने आपल्याला दिलाय तो केवळ त्याचं पुनरोत्पादनाचं काम चालू राहावं म्हणून नव्हे. ते चालूच राहाणार आहे, बरेच लोक नवीन लोकांना जन्म देणारच आहेत, पण आपल्याला जन्म द्यायची इच्छा नाही किंवा ते काम यापुढे करायचे नाहीय म्हणून आपण या आनंदापासून असेक्शुअल नसताना का वंचित राहायचं. आपण आपली शारीरिक आणि भावनिक काळजी घेऊन आपल्या शारीरिक गरजा आणि इच्छा पूर्ण कराव्यात. ते चित्रकार असल्याने त्यांच्या चित्रातूनही ते असेच व्यक्त होत. त्यांची फ्रांसमधली चित्रप्रदर्शनं तिथल्या लोकांना खूप आवडत. तिथले बरेच लोक भारतात फिरायला आले की पॉंडिचेरीला भेट देऊन पीचयांची चित्र बघत आणि विकत घेत.

पीचया करोनाच्या लाटेत वयाच्या पासष्टव्या वर्षी गेले. त्यांचं रेस्टॉरंट आता त्यांचा एक नातेवाईक चालवतो. अजूनही ती जागा safe place for all genders आहे का ते माहीत नाही. ते घर पडीक आहे. सगळे मित्रमैत्रिणी ठिकठिकाणी पांगले. मी जेव्हा पॉंडिचेरीला जाते तेव्हा बऱ्याच जणांना भेटते. कधी फोनवर, सोशल मिडियावर बोलणं होतं. पण वेगळेपणाबद्दल कधी बोलणं होत नाही.

अशा सेफ स्पेस सगळ्यांसाठी असाव्यात. असतीलही कदाचित बऱ्याच ठिकाणी पण आपण आपल्यासारख्या असलेल्या लोकांच्या गोतावळ्यात राहातो त्यामुळे आपल्याला दिसले / जाणवले नसेल. त्यामुळे पॉंडिचेरीमधे असच असतं असं नाहीय. मी अनुभवलेली पॉंडिचेरी तुम्हाला दिसेल असही सांगता येत नाही. माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणी पॉंडिचेरीला जाऊन आल्या पण त्यांना ही बाजू कधी दिसली नाही. माझ्या काही गे मित्रांना दिसलेली मुंबई मलाही कधी दिसली नव्हती तसच हे. पॉंडिचेरीमधे रहाणारा एक "तिरस्कार" प्रकारातला नव्हे तर "किळस येते" म्हणणारा स्ट्रेट मुलगा जेव्हा आमच्या गोतावळ्यात सामील झाला तेव्हा हळूहळू त्याचं मत बदलत गेलं आणि तो पण सगळ्यांचा लाडका दादा बनला. त्याने त्याच्यासारख्या इतरांचंही मतपरिवर्तन केलं. मी पण जिथे जाते तिथल्या लोकांना माझे हे अनुभव सांगते, यात काही वेगळं वाटण्यासारखं नाही हे आवर्जून सांगते. काहींना पटतं, काही "त्यांचं काय ते असूदे, मला काही वेगळं वाटत नाही, पण माझ्या मुलाने जावई किंवा मुलीने सून आणलेली मला चालणार नाही" असं सांगतात. आपल्याला समाज म्हणून बराच मोठा टप्पा गाठायचाय असं पुस्तकी / वर्तमानपत्री वाक्य उगाच नाही लिहीत कोणी!

पुढच्या पिढीला या गोष्टी समजावून सांगितल्या तर लवकर कळतात, कोणता पगडा नाही मनावर म्हणून असेल. माझ्या सात-आठ वर्षांच्या भाचेकंपनीला माहीत आहे की लग्न म्हणजे फक्त नवरा बायको नव्हे तर नवरा-नवरा आणि बायको-बायकोही असू शकतात. दहा वर्षांच्या भाचीला LGBTQAI म्हणजे काय हे सविस्तरपणे सांगता येतं. ही पिढी पुढे जाऊन सर्वसमावेशक समाज बनवू शकेल. तोपर्यंत इतरांच्या निवडीचा सन्मान करायला स्वतःपासून सुरुवात केली तरी पुरे आहे सध्या तरी!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार छान लिहिलेत.

अनुभवसंपन्न असणं किती मोठं ब्लेसिंग असतं हे असं काही प्रत्यक्ष त्या त्या community त वावरलेल्या, त्यांचाशी संबंध आलेल्या तुमच्यासारख्या empathetic लोकांनी लिहिलं- सांगितलं की समजतं. नाहीतर मनातल्या मनात “troubled souls” या रकान्याखाली त्यांची रवानगी होते अदरवाईज.

अरवनची कथा आणि कूवगम उत्सवाबद्दल ऐकले आहे.

.. इतरांच्या निवडीचा सन्मान करायला स्वतःपासून सुरुवात केली तरी पुरे आहे… 👍

+१

अनिंद्य+१.

अरवनची कथा माहीत नव्हती.

पीचयाच्या रेस्टाँरटसारखा मुंबईत The Voodoo Pub होता.
कलम ३७७ रद्द करण्यासाठीच्या खटल्यात एक पिटिशनर केशव सुरी होते. त्यांच्या ललित हॉटेलमधला kitty su क्लब भिन्न लैंगिकतेच्या लोकांसाठी सुरक्षित जागा आहे.

एक तमिळ मुलगा जो फ्रांसमधे रहाणारा फ्रेंच आहे त्याचा पार्टनर फ्रांसमधला फ्रेंच आहे - म्हणजे तमिळ वंशाचा फ्रान्सचा नागरिक आणि मूळचाच फ्रेंच का?

धन्यवाद अनिंद्य, सायो, सामो आणि भरत.
अनिंद्य - खरय, त्यांच्यात वावरलेल्या, संबंध आलेल्या लोकांनी लिहीलं तर बरेच कांगोरे कळू शकतील जे त्याशिवाय कळणं कठीण आहे. त्यात बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमधे बिभत्स वर्णन किंवा हसण्यावारी नेल्याने अजून मत कलुषित होऊ शकतं. मॉडर्न फॅमिली सिरीज मधे कॅम आणि मिच हे गे कपल आणि त्यांची मुलं हे इतक्या सहजपणे घेतलय, त्यात हे काही वेगळे लोक आहेत असं दाखवलं नाहीय. त्यांच्यावरचे विनोद हे इतर कपलवर केलेल्या विनोदांसारखेच असतात. अगदी फ्रेंड्स मधे रॉस ची बायको सुझान प्रेग्नन्ट झाल्यावर लेस्बियन बनते पण त्यातली विनोदनिर्मिती सुद्धा बिभत्स वाटत नाही. हेच काही मराठी सिरीयलमधे विनोद म्हणून घेतात तेव्हा " मी काय तुला तसला वाटलो की काय" सारखं बोलताना पाहिलय.

भरत - मुंबईतल्या सेफ प्लेसेस सांगितल्याबद्दल आभार. खरच गरज असते अशा जागांची. बऱ्याचवेळा वाईट नजरा झेलत बसावं लागतं ते इथे होत नाही.
म्हणजे तमिळ वंशाचा फ्रान्सचा नागरिक आणि मूळचाच फ्रेंच का? >> हो, वाक्य बदलते.

फार छान लिहिलं आहे.
अशा निराळ्या सेफ स्पेसेसची ज्या दिवशी आवश्यकता उरणार नाहीत तो सुदिन!

अरवन प्रथेबद्दल कल्पना नव्हती.
अशाच प्रकारच्या Kottankulangara Chamayavilakku या केरळमधल्या वार्षिक उत्सवाबद्दल वाचल्याचं आठवतं.

मी स्वतः अलीकडेच अशाच एका सेफ स्पेसमध्ये झालेल्या ड्रॅग परफॉर्मन्समध्ये भाग घेतला होता. फार हृद्य अनुभव होता तो. लवकरच त्याबद्दल लिहायचा मानस आहे.

धन्यवाद स्वाती, तुमच्याच लेखाला प्रतिसाद देताना तो मोठा होत होता म्हणून वेगळा लेख लिहीला.

केरळचा हा उत्सव वेगळा आहे. यात साडी नेसलेले सगळे स्ट्रेट मुलगे असतात. साडी नेसून गेलं तर देवीचा आशीर्वाद मिळतो आणि मनोकामना ( बरेचदा चांगली बायको मिळावी, लवकर लग्न व्हावं अशी मनोकामना) पूर्ण होते असा समज आहे. एका मित्राचा फोटो त्याने दाखवला होता साडी नेसून तयार होऊन तिथे पूजेला गेल्याचा. अजिबात ओळखता आलं नाही, महासुंदर मुलगी दिसत होता. त्याचे मित्र, आजूबाजूचे लोक आवर्जून जातात.

व्वा, छान लिहिलं आहे.
... इतरांच्या निवडीचा सन्मान करायला स्वतःपासून सुरुवात केली तरी पुरे आहे… +११

छान लिहिले आहे सोनू!

निवडीचा सन्मान करणाऱ्यांनी एक पाऊल पुढे जात सामावून घेणे, सपोर्ट करणे हे सुद्धा जमवायला हवे.
उद्या त्या जागी आपले अपत्य असल्यास काय असा विचार व्हायला हवा. हे काही व्यसन नाही जे आमचे संस्कार चांगले आहेत तर आमच्या घरात बाबा असे काही होणार नाही म्हणायला.

एकदा मला माझ्या बायकोने हा प्रश्न विचारला होता. LGBTQ बद्दल तुझे काय मत आहे? उद्या आपल्या मुलांपैकी कोणी असं निघाले तर तुझा काय स्टॅन्ड राहील? सपोर्ट करशील की विरोध की दोन्ही न करता तुमचे तुम्ही बघून घ्या म्हणशील...

जिथे मुलांना आई-वडिलांच्या आणि घरच्यांच्या सपोर्टची सर्वात जास्त गरज असेल तिथे त्यांनाच असे प्रश्न पडत असतील तर कसे चालेल.

म्हणून एकदा का आपला स्वतःचा मेंटल ब्लॉक गेला की जिथे सपोर्टची गरज आढळेल तिथे आपण तो द्यायला हवा असे मला वाटते.

यावर माझे काही किस्से आहेत. लिहेन कधीतरी सवडीने...

चांगला लेख.

अरवन बद्दल काहीच माहिती नव्हतं. महाभारतात पुढच्या पिढीचे खूप कोवळे जीव या ना त्या कारणाने मारले गेले, त्यापैकी घटोत्कच, अभिमन्यू, उपपांडव वगैरे बद्दल दाखवलं, तसं अरवनबद्दल दाखवलेलं आठवत नाहीये (कदाचित दाखवलंही असेल पण अजिबात आठवत नाहीये). उपेक्षित राहिला.

सुरेख आणि समृद्ध करणारा लेख आहे. आमच्या जवळच्या नात्यात एक गे मॅरेज झालेय काही वर्षांपूर्वी. दोघी सुखात आहेत. सुरवातीला जड गेलं सर्वांना पण आता काहीही वाटत नाही. दोन बाळंही झाली आहेत. पण त्या अमेरिकत आहेत, ते लग्न नुसतेच गे नसून आधी स्ट्रेट असलेली, लग्नापासून दोन मुले असलेली डिवोर्सी स्त्री आणि दुसरी सिंगल स्त्री, व्हाईट - देशी, कॅथलिक - हिंदू - इंटररेशियल , इंटररिलिजन -इतकी वेगळी पार्श्वभूमी होती. सगळंच वेगळं होतं. बरेच नातलग आले होते लग्नाला. म्हाताऱ्या- कोताऱ्यांनी पण हळूहळू घेतलं समजून. तेव्हापासून माझ्या उरल्यासुरल्या जजमेंट्सही गेल्या. सगळ्यांना त्यांना आवडेल तसं, आनंद वाटेल तसं राहायचा हक्क आहे इतकी बेसिक गोष्ट आहे, कुणीकुणाला 'स्विकारायची' गरज नाही.

धन्यवाद ऋतुराज, ऋन्मेष, अन्जू, अस्मिता.
अस्मिता. , हा अनुभव इथे लिहिलात ते छान केलत.
जोपर्यंत आपल्या समोर, जवळ, ओळखीच्या लोकांत, ओळखीच्या लोकांच्या ओळखीत काही गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत आपल्याला जास्त विचार करायची गरज पडत नाही. म्हणूनच आपण असे आपापले अनुभव इतरांना सांगावेत.

खरं आहे. ओळखीच्या लोकांत, ओळखीच्या लोकांच्या ओळखीत या विषयावर प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आधी स्ट्रेट होतो, आयुष्यात काहीतरी कमतरता होती, मन मारून जगत होतो, याचा साक्षात्कार होईल. तेसुद्धा कदाचित या अनुभवांसाठी उद्युक्त होतील, मग त्यांची भीड चेपली जाईल आणि मग ते लग्न पण करतील. लैंगिक गरज ही खाजगी गोष्ट आहे आणि सगळ्यांना आवडेल तसं, आनंद वाटेल तसं राहायचा हक्क आहे.

नेहेमी प्रमाणे रुळलेल्या वाटेबाहेर जाऊन घेतलेल्या अनुभवांवरचा लेख!

तुम्ही लिहिलेला शेवटचा परिच्छेद खरा आहे. जेव्हा हे सामान्य होईल तेव्हा समलैंगिक व इतर अल्पसंख्यांच्या परस्परांतील संबंधांबद्दलची घृणा, कुतुहल, वेगळेपण सगळेच संपून जाईल. जेव्हा लैंगिक अल्पसंख्यकांना सहजपणे समाजात वावरता येईल तेव्हा समाजातील इतर सर्वांनादेखील त्यांच्या असण्याची सवय होईल. हे परस्परपूरक आहे. माझ्या लहानपणी या विषयावर ना लिहिले जात होते, ना बोलले जात होते, ना वाचनात येत होते. जेव्हा गे पुरुषांशी ओळख / मैत्री झाली, गप्पा टप्पा, ट्रिप झाल्या, कामाच्या ठिकाणी संबंध आले तेव्हा आपोआपच ते काही वेगळे नाहीत हे समजत गेले. त्यासाठी मूळची थोडी लिबरल मानसिकता हवी.
सिनेमा/वेब सिरीज मधून लैंगिक अल्पसंख्यकांचे यथार्थ दर्शन झाले तर बहुसंख्य समाजाला ते हितकारक ठरेल.
पुर्वी प्रबोधनाचे काम साहित्यातून होत होते. लैंगिक अल्पसंख्य विषयांवर मात्र मराठी साहित्यात क्वचितच काही उल्लेखनीय लिहिले गेले आहे. मराठी साहित्यात श्री ना पेंडसेंच्या ऑक्टोपस या कादंबरीत गे संबंधांचा उल्लेख येतो. नंतर कोबाल्ट ब्लु या कुंडलकरांच्या कादंबरीत. बहुतेक कविता महाजनांच्या भिन्न किंवा ब्र मध्येही आहे - पण मी त्या कादंबर्‍या वाचलेल्या नाहीत.
सिनेमा, पुस्तके याचा उल्लेख अश्यासाठी केला की त्यातून सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते.

एक उदाहरण. माझे वडिल काही फार लिबरल (डाव्या) विचाराचे म्हणता येणार नाहीत. त्यांचा सांस्कॄतिक संबंध तसा उजव्या चळवळीशीच जास्त. त्यांनी कोबाल्ट ब्लु कादंबरी वाचून हे टिपण लिहिले होते. ते गेल्यावर मला हाती लागलेल्या वह्यात मला ते मिळाले. त्यांच्या मनात असलेल्या समलैंगिक संबंधांबाबत असलेल्या समजुतींना थोडी तरी कलाटणी नक्कीच या कादंबरी मुळे मिळाली असेल. ते इथे देण्याचा उद्देश हा की एखादी कलाकृती वाचक/प्रेक्षकाला विचार प्रवृत्त करू शकते.
म्हणून विकृती न दाखवता योग्य ते दर्शन कलाप्रकारांतून होणे गरजेचे आहे.

cobaltblue1.jpgcobaltblue2.jpg

धन्यवाद रानभुली.

उपाशी बोका - तुमचे स्वाती आंबोळे यांच्या लेखांवरचे प्रतिसाद वाचले होते. तुमची मतं अजूनही तशीच असतील तर तुमचा हा प्रतिसाद उपहासात्मक आहे असं समजून माझ्याकडून पास. मतं बदलली असतील तर - "आयुष्यात काहीतरी कमतरता होती, मन मारून जगत होतो" हे "जाणवलं" असेल तर त्या व्यक्तींचा बदल नक्कीच स्वागतार्ह.

टवणे सर,
छान प्रतिसाद. आपण जेव्हा आपल्या नेहमीच्या ओळखीच्या वातावरणापासून थोडं बाजूला जातो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि समजतात.
तुमच्या वडिलांचे टिपणही छानच. मला वाचल्यासारखं वाटतय हे पुस्तक.

टवणे सर, तुमच्या वडिलांचं टिपण वाचून मला ते पुस्तक थोडं अधिक कळलं.

मराठी नाटकांमध्ये भिन्न लैंगिकतेच्या व्यक्तिरेखा किंवा घटना / कथासूत्रे इतर साहित्यापेक्षा अधिक आली असावीत. आता पटकन आठवत नाहीएत.
उंबरठा चित्रपटात सुषमा देशपांडे यांनी एक व्यक्तिरेखा रंगवली आहे.
नुकताच साबर बोंडं हा एका गे पुरुषाच्या कथेवर बेतलेला चित्रपट प्रकाशित झाला आहे.

सोनू, जेव्हा जमेल तेव्हा चिनूक्सचा ‘वेगळेपण सामावताना’ हा लेख वाचा. १२,१३ वर्षांपूर्वी त्याने इथेच लिहिला होता आणि धुंवाधार चर्चा झाली होती त्या बीबीवर.

>>> लैंगिक गरज ही खाजगी गोष्ट आहे
हे थोडंसं दिशाभूल करणारं विधान आहे. साध्या भाषेत अनेकदा हीच प्रतिक्रिया 'काय ते तुमच्या घरात/शयनघरात करा, आम्हाला सांगू नका' अशा भाषेत येते.

एक तर ही गरज फक्त लैंगिकच / शरीरसुखापुरतीच नसते. त्यात भावनिक अनुबंधही अनुस्यूत असतो. पण अशी गरज ही लपून चोरून भागवावी लागणं दुर्दैवी असतं.
चोरून हे एकांतात या अर्थी म्हटलेलं नाही. स्ट्रेट प्रेमप्रकरणांत/लग्नांत भावनिक आणि शरीरसंबंध एकांतातच होत असले तरी ते अध्याहृत, नव्हे अपेक्षितच असतात. (लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत 'शरीरसंबंध योजिला आहे' असं स्वच्छ म्हणण्याइतके!)
तसं या संबंधाच्या बाबतीत होतंच असं नाही. आईवडिलांनी घराबाहेर काढलं, सोसायट्यांनी 'आम्हाला नकोत बुवा तसले लोक शेजारात' असं म्हणून जागा द्यायचं नाकारलं तर यांनी तो हक्काचा एकांत कुठे शोधायचा? का बरं त्यांना तो मिळू नये?
त्याहून वाईट असतं ते त्यांना 'आम्हाला समाजात राहायचं आहे' म्हणत कुटुंबियांनी तसे संबंध नाकारून भिन्नलिंगी व्यक्तीशी विवाहबद्ध होण्याची सक्ती करणं. यात एक नाही तर दोन, कदाचित तीन आयुष्यं वाया जातात!

छान लिहिलं आहे. बहुसंख्य लोकांपेक्षा कुठल्याही प्रकाराने वेगळे असणाऱ्यांचा त्यांच्या गुणदोषांसकट समाजात स्वीकार - जितक्या प्रमाणात बहुसंख्य लोक आपापसात करतात तितका तरी - झाला पाहिजे. पण त्यासाठी संवेदनशील समाजमन असेल तेव्हाच सर्वांना स्वतःच्या जुन्या समजुती बाजूला ठेवून त्रयस्थपणे विचार करायला जमेल. खूप मोठी प्रक्रिया आहे ही, पण हळूहळू त्या दिशेने वाटचाल होते आहे.

खूप छान विषय

बडोद्यात एक "गजरा कॅफे" नावाने बरेचसे मराठी पदार्थ देणारा कॅफे आहे
हा कॅफे "श्री महाराणी चिमणाबाई स्त्री उद्योगालय(१९१४ ची संस्था)" ह्या Heritage property मध्ये चालवला जातो
वैशिष्ट्य असे की हा LGBTQ Community कडून चालवला जातो
"LGBTQ FRIENDLY" असे about मध्ये लिहिले आहे

https://share.google/Tp7b2YWn05C9D8NKB

पुष्पा टू या चित्रपटात अल्लू अर्जुन एका देवळात स्त्री वेशात नृत्य करतो असा सीन आहे. त्यावेळेस त्या गावची मोठी जत्रा दाखवली आहे व तेथील सर्व पुरुष स्त्री वेशात दाखवलेले आहेत.
लेखात सांगितलेले मंदिर व त्यातील उत्सव तोच आहे का