पाककृती स्पर्धा २: करीब- करीब लाडू - अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 25 August, 2025 - 19:09

करीब- करीब लाडू

सध्या चिकवावर आलेल्या 'करीब करीब सिंगल'च्या दंगलीला आणि इरफानच्या चाहत्यांना समर्पित.

मी खरेच सुक्यामेव्याचे लाडूच करणार होते, त्याचा पुरेसा गवगवाही केला होता पण अचानक मोदकाच्या साच्यात चेचून त्यांचे मोदक ऐनवेळी केले म्हणून 'करीब- करीब लाडू'. Happy

हे लाडू/ मोदक न भाजलेल्या सुक्यामेव्याला दळून करता येतात, सगळेच त्यातल्या त्यात पौष्टिक असल्याने एनर्जी बार सारखे खाता येतील.

पाककृतीचे घटक -
'पाऊंड केक' नावाचा एक केक असतो. त्यात प्रत्येक गोष्ट एक पाऊंड या प्रमाणात असते म्हणजे - एक पाऊंड मैदा, एक पाऊंड लोणी, एक पाऊंड साखर. हो, असेच असल्याने त्याचे नाव 'पाऊंड केक'. आपल्या प्रसादाच्या शिऱ्याचा अमेरिकन भाऊ!

तसेच ह्या लाडूतही प्रत्येकी एक वाटी बदाम, काजू, पिस्ता, साखर ( थोडी कमी) , किसमिस, एक वाटीपेक्षा कमी साजूक तूप, एक अखंड जायफळ अर्धे किसून, (अखंड असेल तर वास तितका उडालेला नसतो व घमघमते) , चिमूटभर केशर (ऐच्छिक)
१. IMG-20250825-WA0019.jpg

असं सगळं मांडून नाही घेतलं तरी चालेल, हे स्पर्धेमुळे लाडात आले आहे. उगा भांडी वाढणार आता !

हे सगळं कच्चंच/ न भाजता, न भिजवता घेतलं आहे. काजू तुकडे आणले कारण नंतर पूडच करायची होती. सगळेच मिक्सर मधून 'घुरकावून' घेतले व टोपात टाकले. त्यातच तूप व पिठीसाखर घालून थोड्याशा पाण्यात भिजवलेले केशर घातले.
२. IMG-20250825-WA0021.jpg

हे सगळं हाताने कालवून पुन्हा मिक्सर मधून काढून घेतलं. मिक्सरच्या उष्णतेने तूप पाघळून मिळून येते. तेवढीच 'चीटिंग' करता येते. आदिमानवाला आगीचा शोध लागल्यानंतर जेवढा झाला असेल तेवढाच आनंद मिक्सरची उष्णता वापरून चीट केल्याचा मला झाला. Happy

३. IMG-20250825-WA0022.jpgIMG-20250825-WA0016.jpg

आता लाडूचेच ठरल्यामुळे लाडू वळून घेतले. काही किसमिस धसमुसळेपणा करत लाडूतून बाहेर येत होते, लाडू बघून झॉम्बीज आठवू नयेत म्हणून फार मोठे किसमिस बाहेर काढून मऊ, लहान व वळणारे तेवढे राहू दिले.
४. IMG-20250825-WA0023.jpg

सगळे लाडू झाल्यावर मला सुचले की हे मोदकाच्या साच्यात घालून वळले तर औचित्यपूर्ण का काय होईल व देखणेही दिसेल. शेवटी रूपावर फार काही अवलंबून असते, नुसतं गुणी राहून उपयोग नाही. पाहून 'तोंपासू' व्हायला हवं. शिवाय तुम्हाला कुठे खाता येणार, तुम्ही रूप बघूनच 'वाह, वाह' म्हणणार, त्यामुळे हे करणं भाग होतं. आता झालेतच मोदक अचानक तर 'मौकेका फायदा' घेऊन 'करीब-करीब लाडू' असं नाव दिलं. तुम्ही सुकामेव्याचे लाडूही म्हणू शकता. लाडू मोडून मी प्रत्यक्ष कृतीही एडिट करून 'धन्य- धन्य' झाले, इथलं लेखन एडिटनं पुरेसे नव्हतं. लाडवाचे येथे पुन्हा- पुन्हा दिसणाऱ्या '१ नवीन' च्या मोहाला बळी पडणाऱ्यासारखे झाले. Happy

नंतर अजून एक आयडिया आली, हे तयार मोदक मफिन लायनरमधे ठेवून अजून 'प्रो' दिसतील. पण त्यासाठी ओव्हन खालच्या ड्रॉवरच्या महासागरातील मफिन लायनर शोधले, दुसरं काहीबाही सापडत जुनाट, चपटे झालेले मोठ्या मफिनच्या आकाराचे लायनर सापडून मोदक 'अंगापेक्षा पोंगा' दिसू लागला. ड्रेस कसा फिटिंगचा हवा, उठून दिसतो. त्यामुळे तेही रद्द. Happy फॅशन सेन्स म्हणजे फॅशन सेन्स!
५. IMG-20250825-WA0024.jpg

नंतर सगळे एकेक करत लाडू फोडून, दाबून मोदकाच्या साच्यात दाबून भरले व एकेक मोदक केले.
६. IMG-20250825-WA0017.jpg

मोदकाची बहिण करंजी आणि करंजीचा भाऊ मोदक- असं आई म्हणायची, ती परंपराच होती आणि बहिण-भाऊ क्यूट वाटतात म्हणून एक छोटीशी करंजी केली. शिवाय भावाला लहानपणी छळून आयुष्यासाठी व जगासाठी 'तयार' करणारी एक तरी बहिण हवीच. मान आहे तो ! Happy

७. IMG-20250825-WA0014.jpg

८. IMG-20250825-WA0018.jpg

ही पाककृती खूप चवदार व जवळजवळ डिंकाच्या लाडू सारखी वाटते. मी कधी सुकं खोबरं किंवा खारकेची पूड घातली नाही मी हे अगदी असेच करते. पिस्ते हवेतच. भाजून घेतल्याने चव बदलते, चुकूनही ते रोस्टेड सॉल्टेड नट्स वापरू नका.

मागच्या वर्षीच्या 'तो बोल मंद हळवासा'चा आज वाढदिवस आहे, तुम्हाला तो अजूनही आठवतोय म्हणून त्याच्यासोबत एक फोटो. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या ! Wink

१०. IMG-20250825-WA0028.jpg

हे सगळं जॅझ म्युझिक ऐकत करा व झाल्यावर पोटभरेपर्यंत खा नाही तर माझी प्रवेशिका बाद व्हायची. जबरदस्तीने भरवतेय! Happy

सर्व माबोकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया ! Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं !
पण इतक्या लवकर झाली सुद्धा सुरु स्पर्धा ?

मस्त! मोदक आणि लेखन दोन्ही आवडलं Happy
मोदक जास्त छान दिसत आहेत. लाडू आपल्या माणिकपैंजणांच्या रांगेतले दिसत आहेत. Wink

करीब करीब लाडू Proud
छान दिसत आहेत पण पोटभरीचे होणे अवघड आहे .. कारण यंदाच्या गणपतीतील पहिलाच पदार्थ असल्याने सर्वांची पोटे रिकामेच असणार Happy

^^^खालच्या ड्रॉवरच्या महासागरातील मफिन लायनर शोधले, दुसरं काहीबाही सापडत जुनाट, चपटे झालेले मोठ्या मफिनच्या आकाराचे लायनर ^^^^
हे वाचताना कोकोनट मदतीचा आणि त्यामुळे त्याला मिळालेल्या पप्पीचा उल्लेख शोधत होते..
तो सापडला नाही.
पाकृ परत एडिट कर.
कोकोनटशिवाय तुझे लेखन फाऊल धरले जाईल.

आता उरलेली पाकृ वाचते

व्वा सुंदर! तसे मोदक हे मूळचे लाडूच होते (मोदक हे कुठल्याही आनंददायी/गोड पदार्थाला जेनरिक नाव आहे वगैरे) असं चिनुक्स किंवा तत्सम कुणाच्यातरी धाग्यावर नुकतंच वाचलं. तेव्हा करीब करीब नाही, लाडूच आहेत खरोखर.

Happy धमाल आणि गोड अभिप्रायां बद्द्ल आभारी आहे मित्रमैत्रिणींनो!
हर्पा, हो. मोदक म्हणजे लाडूच. Happy
स्वाती, सॅन्टाला दुदू आणि कुकी ठेवतात तसं मोदक आणि दुदू. Happy

धनवन्ती, कोकोनट म्हणालाच होता धनवन्ती मावशीने विचारले तर खिडकीतून बाहेर बघत मोदकांची राखण करत होतो असं सांग. पार्वती स्नानाला जाते तेव्हा गणपती नाही का राखण करत तसेच. आणि पाप्या देऊनच गेला म्हणून साखर एक वाटीपेक्षा कमी घालूनही गोड झाले मोदक. हे बघ. Happy
IMG-20250827-WA0001.jpg
हा लेख त्यानेच लिहिला व मागची आवराआवर सुद्धा त्यानेच केली. मागच्या वर्षी सारखा 'पपी' राहिला नाही समजदार झाला आहे. Happy

Pages