एक अनोळखी कॉल

Submitted by प्रथमेश काटे on 29 July, 2025 - 12:39

एक अनोळखी कॉल

मीनल आज उशिरापर्यंत लॅपटॉपवर, ऑफिसचं काम करत बसली होती. रात्रीचे साधारण अकरा वाजले होते. आसपास पूर्ण शांतता होती. मधेच बाहेर रस्त्यावरून, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता. तिने उत्सुकतेने फोन उचलला.

"हॅलो?" ती म्हणाली.

पलीकडून काही उत्तर आलं नाही. फक्त मंद श्वासोच्छ्वास ऐकू येत होता. मीनल पुन्हा "हॅलो?" म्हणाली, पण पुन्हा तेच. रॉंग नंबर समजून, तिने फोन कट केला.

पण काही क्षणातच पुन्हा कॉल आला. त्याच नंबरवरून. पुन्हा तिने कॉल रिसीव्ह केला‌ ; पण समोरून काहीच उत्तर आलं नाही.

"रॉंग नंबर आहे." समोरच्या व्यक्तीला उद्देशून तिने सांगितले. आणि जरा त्रासिकपणेच कॉल कट करून, मोबाईल सायलेंटवर टाकला.तिच्या मनात विचार आला. हे कोण असेल? आणि बोलत का नाहीये? घरात ती एकटीच असल्यामुळे, क्षणभर तिला जराशी भीतीच वाटली.

थोड्या वेळाने तिने फोन उचलून पाहिलं. तीन मिस्ड कॉल्स होते. त्याच नंबरवरून. आता ती थोडी अस्वस्थ झाली. तिने फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट चेक केली, पण हा नंबर त्यात नव्हता.

काम थांबवून, जरा पाय मोकळे करायला ती हॉलमध्ये . तोच तिला दारावर टकटक ऐकू आली. 'एवढ्या रात्री कोण असेल?' असा विचार करत, तिने key hole मधून डोकावून पाहिलं. कोणीच दिसत नव्हतं. फक्त अंधार. तिला वाटलं की भास झाला असेल.

ती बेडरूममध्ये परतली. त्याचवेळी तिच्या फोनची रिंग पुन्हा वाजू लागली. क्षणभर ती दकलीच. तिने थरथरत्या हातांनी फोन उचलला. पलीकडून तोच भयावह श्वासोच्छ्वास ऐकू आला, पण सोबत एक हळूवार, थंड आवाज ऐकू आला.

"मीनू.. तुझी खूप आठवण येतेय.‌ प्लीज मला भेट ना. आता." शब्दांत गोडवा असला, तरी त्या आवाजात एक थंडगार क्रूरता होती. तो आवाज तिच्या ओळखीचा होता.

"तू..?" तिने किंचाळून विचारलं.

"हो. ये ना. जशी त्या रात्री आली होतीस ; पण तू माझ्याशी असं का वागलीस ? बरं जाऊ दे. तू ये. आणि आज तुला घराबाहेर पडायची ही गरज नाही. मी तुमच्या हॉलमध्येच बसलोय." तो थंड आवाज उद्गारला. आणि पाठोपाठ एक खसखसतं हास्य ऐकू आलं.

"काय ?" तिच्या हातून फोन गळून पडला. धावत ती बाहेर आली. हॉलच्या मध्यभागी, सोफ्याजवळ टेलिफोन होता ; पण आसपास कुणी नव्हतं. तिने रिकाम्या सोफ्यावर हात फिरवला. तोच मागे आवाज आला-

"आलीस तू मिनू ?" मागून आवाज आला. ती झटकन वळाली. समोरचं दृश्य पाहून तिच्या हृदयात धस्स झालं. ती किंचाळली.

तिच्यापुढे एक तरूण, उग्र चेहऱ्याचा पुरूष उभा होता. त्याचा चेहरा, अगदी फिकट होता. डोळ्यांच्या जागी काळ्या खोबणी होत्या. आणि.. त्याच्या पोटात सुरा खुपसलेला होता.
त्या घरातून एक तीव्र स्वरातील किंकाळी बाहेर पडली ; पण क्षणभरातच विरून गेली.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमान पत्रातील बातमी -

रवि रस्तोगी मर्डर केस मधून निर्दोष सुटलेल्या मीनल सिंग यांची, राहत्या घरात पोटात सुरा खुपसून हत्या करण्यात आली.
मीनल सिंग यांच्यावर त्यांचा कॉलेजमधील जुना मित्र, रवि रस्तोगी याचा निर्घृण खून केल्याचा आरोप होता. तर उलटपक्षी रवि रस्तोगी आपल्याला harras करत होता, असं मीनल सिंग यांचं म्हणणं होतं. जे खरं असल्याचं निष्पन्न झालं होतं. पुढे पुराव्यांच्या अभावी मिनल सिंग यांची निर्दोष सुटका झाली होती.

समाप्त
© प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भाई ये स्टोरी शुरू होते ही खतम हो गई.. असे वाटले.
फुलवायला हवी होती.. मालमसाला डिटेल अजून हवे होते..
किंवा असे छोटे असेल तर त्यात ट्विस्ट हवा होता..

थॅंक्यू @सामो आणि @ऋन्मेष सर.

असे छोटे असेल तर त्यात ट्विस्ट हवा होता. >> तिने त्याचा खून केला होता, हाच एक छोटासा ट्विस्ट होता सर.