श्रावण आला...

Submitted by ऋतुराज. on 25 July, 2025 - 13:00

श्रावण आला....

Screenshot_20250725_222755_WhatsApp.jpg

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

बालकवींची ही कविता माहीत नसलेला मराठी माणूस कुणीतरी विरळाच.
चातुर्मासातील आवडता आणि लाडका असा श्रावण महिना आजपासून चालू झाला आहे.
आषाढात चालू झालेल्या वर्षाऋतूने आता उन पावसाचा खेळ खेळायला सुरू केलेला असतो. अर्थात ऋतूंचं गणित आता पारच बिघडलंय म्हणा. पण श्रावणातील श्रावणधारा आणि धरित्रीचं हिरवगार रूप अजूनही तसंच टिकून आहे. श्रावणातील या सुस्नात हिरव्यागार निसर्गाबरोबरच सण, व्रतवैकल्यांची सुद्धा लयलूट असते.
श्रावणी सोमवार आणि शाळेला मिळणारी अर्धी सुट्टी. मंगळागौर, श्रावणी शनिवार. श्रावणातील वारांच्या निरनिराळ्या कहाण्या. त्यांची ती सचित्र कहाण्यांची पुस्तकं. घरातील पूजा. शुक्रवारची जिवतीची पूजा. औक्षण. मिळणारा गूळ चण्यांचा प्रसाद. घरात नैवेद्याचा, चमचमीत पदार्थांचा अन् धूप अगरबत्यांचा घमघमाट...
पंचमीला येणाऱ्या माहेरवाशिणी आणि त्यांची रंगलेली गाणी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, पोळा...असे दणक्यात साजरे केले जाणारे सण. अगदी उत्सवी वातावरण निर्माण होते. ह्या सणांबरोबरच अनेक व्रतवैकल्ये देखील केली जातात.

अशाच श्रावणातील सण, उत्सव, व्रतवैकल्ये, गाणी, कविता, पदार्थ इत्यादी साठीचा हा धागा.

फोटो आंतरजालावरून साभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रज्ञा आहाहा काय मस्त दिवस असणार गं. मंगळागौर वाह!! युनिक उपक्रम होता खरच.

अवांतर -
ते बुलबुलचे गाणे आम्ही सहलीत म्हणत असू. शिवाय 'म्हातार्‍याची शेकोटी, 'हे लालय्यो' - 'अय्यो अय्यो'
मग घोषणा -
'१-२-३-४ - हुजूरपागेचा जयजयकार,
५-६-७-८ - हुजूरपागेची कॉलर ताठ -
९-१०-११-१२ - हुजूरपागेचा आहे दरारा
१३-१४-१५-१६ - हुजूरपागा आमची शाळा Happy

स्वाती >>>> छान पोस्ट. मी कधी गिरगावच्या चाळीचा अनुभव घेतला नाही. एकदम चित्र उभं केलंत डोळ्यापुढे.

हंड्या रीझनेबल उंचीवरच बांधलेल्या असत, त्यात शौर्य वगैरे दाखवण्याचे प्रकार सुदैवाने नसायचे.
>>>
अगदी अगदी. हंडीला सलामी देणे वगैरे प्रकार खूप नंतर सुरु झाले. सलामी म्हटलं की मला खड्या आवाजातलं 'राष्ट्र के लिए सलामी देंगे. परेड सॅल्यूट' एवढंच आठवतं.

कुकातकुका, त्या गाण्यात परवीन बाबी टवका दिसतेय (पँटसारखी साडी नेसली असली तरी). मी पाहिलं नव्हतं आत्तापर्यंत.

भाऊ, चित्र नेहमीप्रमाणे एकदम जोरदार..
सामो, घोषणा भारी. "म्हातार्‍याची शेकोटी" माहीत नाही पण मालाडचा म्हातारा आम्ही म्हणत असू पिकनिकला.

श्रावणाचा उल्लेख असणारी गाणी लिहा..
मला खालील आठवली -
श्रावणात घन निळा बरसला....
झिमझिम झरती श्रावणधारा....
सावन महीना पवन करे सोर...
मेरे नैना सावन भादों फिर भी मेरा मन प्यासा....
पतझड़ सावन, बसंत बहार
एक बरस के मौसम चार..
सावन के झूलों ने मुझ को बुलाया
मैं परदेसी घर वापस आया..

गोकुळाष्टमीची पोस्ट आवडल्याचं कळवणार्‍या सर्वांना धन्यवाद. Happy
फा, हाहा! Happy

आठवणारी गाणी:
अब के बरस भेजो भैया को बाबुल, सावन में लीजो बुलाइके
सुनियो जी अरज म्हारियो बाबुला हमार, सावन आयो घर लै जैहो बाबुला हमार
सावन आये या ना आये जिया जब झूमे सावन है
अब के सजन सावन में आग लगेगी बदन में
आया सावन झूम के
सावन का महीना, पवन करे सोर (शोर नहीं बाबा, सोऽर!)

प्रज्ञा बरीच माहिती मिळाली, रत्नागिरीत छान उत्सव. शिळासप्तमी आमच्याकडे नसायची. ती माहिती आवडली.

गुजराथी लोकांची कधी असते, तेव्हा आम्ही शेजारी ठक्कर भाभीनकडे आदल्या दिवशी मदतीला जायचो, त्यांना चार मुलंच, ठक्कर पप्पा आम्हा चाळीतल्या मुलींना मुलींप्रमाणे वागवायचे, त्यांना स्वतःला मुलगी नसल्याचं वाईट वाटायचं. आम्ही मुली मदतीला जायचो त्यांच्याकडे विशिष्ट काही असेल तेव्हा त्यामुळे आदल्या दिवशी आम्ही कडक पुऱ्या लाटायला मदत करायचो, गेलो किंवा नाही गेलो तरी शिळासप्तमीला आमच्या घरी भाभी खाऊ पाठवायच्याच. पुऱ्या, मोहनथाळ हे अगदी आठवतंय.

चूल पेटवतच नाहीत त्या दिवशी त्यांच्याकडे, मग आई चहा नेऊन द्यायची.

आमच्याकडे शिळ्या पोळीची फोपो, भाताचा फोभा वगैरे असलं की शिळासप्तमी साजरी झाले म्हणायचे. तेव्हा काही पेशल करतात वगैरे मला आज कळतंय. Lol

आमितव Lol बरोबर . सेम आमच्याकडे.

भरत धन्यवाद. श्रावणातच असते म्हणजे, योग्य लिहिलं मी श्रावण धाग्यातच गुजराथी शिळासातमबद्दल.

भाऊकाका व्यंगचित्र सॉलिड मस्त, आधीच्या पोस्टमध्ये दाद द्यायची राहून गेली.

सावन बरसे तरसे दिल

हाय हाय ये मजबुरी

दीवाना हुआ बादल, सावन की घटा छायी

अब के सजन सावन में

मोहोब्बत बरसा देना तू, सावन आया है

मस्तच पोस्टी.
मला आठवतंय तसं पिठोरी अमावस्या नसून श्रावणातल्या शुक्रवारीच करायचे औक्षण आणि "अतीत कोण/ सर्वातीत कोण हा" कदाचित अपभ्रंश असेल पण तेच होते. परमात्मा कृष्ण सर्वातीत मानला तर तेच सेन्सही करतेय. Happy

आमच्याकडे घरासमोरील कृष्णमंदिरासमोर दहीहंडी वगैरे होतीच. पण जन्माष्टमीला चिकणमातीचे गोकुळ करायचो व त्याची पूजा व्हायची. मातीचा कृष्ण, पुतना, असूर, पाळण्यातला कृष्ण, बाळांना दगडावर आपटणारा कंस व दगड सगळं. त्या मातीच्या गोकुळात सगळ्यांचे डोळे ज्वारीचे होते. रात्री उंदीर येऊन ज्वारी खाऊन जायचे, दुसऱ्या दिवशी सगळे गोकुळ एकमेकांना डोळे मारत आहेत असे वाटायचे. ठरलेलं होतं.

नागपंचमीला गोदावरी काठी एका उंच झाडाला झोका बांधून किमान पाच झोके घ्यायला तरी सगळे जायचे अशी रीत होती. इतका जबराट आणि उंच झोका मी डिज्नीतही पाहिला नाही. समोरून नदीवर उडतोय असं वाटायचं. नागपंचमीला दिंडी व दूध लाह्या होते शिवाय गारूडी कायम झोपेत आहेत असे वाटणारे साप घेऊन घरोघरी यायचे. मुली मेंदी काढायच्या व बांगड्या भरून घ्यायला जायच्या. ज्या बांगड्या घालायच्या नाहीत त्या क्लिपा, हेडबॅंड, रिबिणी अशा छोटं काहीतरी घ्यायच्या. दर नागपंचमीला आम्ही घरीही वरच्या नाटीला (तुळई) झोका बांधायचो. नंतर पंधरा दिवस तरी किमान ठेवायचा. असं फक्त म्हणायचं, आमच्याकडे वर्षंवर्षं झोके असायचे. मी फक्त भिंतीतल्या खिडकीत नाहीतर झोक्यावरच असायचे. Happy

श्रावण सोमवारी व हरितालिकेला गंगेवरची वाळू आणून शंकराची पिंड करून उपास वगैरे करून मग पूजा करायची पद्धत होती. आई मुलींनी उपासतापास करण्याच्या विरोधात होती. त्यामुळे मी आयुष्यात एकही उपास केला नाही, आजुबाजूला कर्मठ वातावरण असून मला थोडीफार नावं ठेवायचे लोक पण नाहीच करू दिले. मी बाकी सगळ्यात भाग घेतला व सगळं एन्जॉय केलं. Happy आईने मला अशा कशातच अडकू दिले नाही व माझ्या भावजयीला सुद्धा सगळ्या अवडंबरातून मुक्त केले आहे.

*रूंद भिंतीत ओटा असलेल्या खिडक्या असतात. फ्रेंच विंडो सारखं काहीतरी. दहीहंडी काय किंवा गंगेकाठचा झोका काय - आयुष्याची दोरी बळकट गटात यायचे. काही सेफ्टी नाही काही नाही.

आमच्याकडेही अतिउल्हास असायचा सणांचा. शिवाय गोदावरी नदीला गंगाच म्हणतात. येथे मला दरवेळी वेगळं लिहावं लागतं.

आईने मला हरतालिका करशील का विचारलं, मी हो म्हणाले, मी पहिलीपासून करते, बाबा विरोधात होते याच्या पण तेव्हा मला मजा वाटलेली करताना, फार काही समजायचं नाही. आई हरतालिका चहा, फळं यावर करायची पण बाबांनी तिला बजावलं की तिच्यासाठी फराळाचे करायचं. मी मस्त उपासाचे पदार्थ खाऊन करायचे, शेजारच्या जोशीकाकूही मला फराळाचे पाठवायच्या.

लहान बहिणीवेळी मात्र मी आईला सांगितलं की तिला समजायला लागल्यावर तिचा कल असेल तरच उपास करूदे, चौथी पाचवीत गेल्यावर विचार, बहीण म्हणाली मला नाही करायचा उपास. तिने कधीच केला नाही, अजूनही करत नाही.

अस्मिता तुझ्या आईचं कौतुक वाटलं.

नागपंचमीला गोदावरी काठी एका उंच झाडाला झोका बांधून किमान पाच झोके घ्यायला तरी सगळे जायचे >>> हेच का ते सावन के झुले? Happy

आई मुलींनी उपासतापास करण्याच्या विरोधात होती. त्यामुळे मी आयुष्यात एकही उपास केला नाही >>> डिट्टो! आपल्या आया अश्या आहेत हे खरंच आपलं भाग्य आहे.

मीही उपासाचे नाश्त्याला खाऊन मग जेवायचे. Happy
अन्जूताई Happy

अगदी रमड. सेम पिंच. दोनदा झाले आहे आपले. Happy
ते सावन के झुलेच असावेत, नागाचा काय संबंध माहिती नाही.

येडं लागलं टाईपच येडे होते. येथे एवढ्यातेवढ्याला हेल्मेट घालतात ते बघून टडोपा व्हायचे आधी. Happy

माझ्या कानात येड लागलं.... वाजू लागलं >>> Happy झुला 'सैराट झालं जी' गाण्यात पण आहे. मंजुळेला आवडत असेल.

सेम पिंच. दोनदा झाले आहे आपले >>> येस! Happy

छान आहेत सगळ्या आठवणी. आघाडा आणणे हे काम मला मिळत असे. क्रांतिवीर चापेकरांच्या वाड्यात आघाडा मुबलक येई, तिथून पानामागे पांढरे ठिपके आहेत ना हे बघून तो आणत असू. बाकी श्रावणी सोमवार अर्धी शाळा सेम. आमच्याकडे बहुत करून गोडसर मटकी आणि अळू हेच असे सोमवार सोडायला. जिवती कागद पण टांगला जाई. पुण्यात दहीहंडी चे अजिबात जास्त प्रस्थ नव्हते. फक्त बाबू गेनुची उंच असे आणि तिथे गर्दी होत असे. दहा पंधरा फुटी तरी डी जे भिंती असत.
गाणी - फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले,
नागपंचुमीच्या सना (दोघी)

असा रंगारी श्रावण

असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखीतो

कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत
जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत

नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी
रिमझिम पहाळीचं, गाणं बोलतो झाडांशी

वेण्या गुंफितो वेलीच्या, वेली लाजल्या लाजल्या
पानाफुलांचे पातळ थेंबाथेंबानी सजल्या

झुले पोरींना झूलाया असे टांगतो झाडाला
देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला

पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा
दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा

पावसाचे घर कसं लख्ख उन्हात बांधतो
खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो

इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो
रंगबिरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो

असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो

- ऐश्वर्य पाटेकर

आला आषाढ-श्रावण - बा.सी.मर्ढेकर

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

काल श्रावण अमावस्या/ पिठोरी अमावस्या झाली.
पोळा, मातृदिन.
पिठोरी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात हे लक्षात आले.
काही जणांकडे समईची पूजा करतात.
श्रावण संपला आणि भाद्रपद मासारंभ झाला.
आता आतुरता आगमनाची.......

इवली इवली ही कारंजी, उडती ज्यांतुन हिरव्या धारा;
हिरवे शिंपण अंगावरती, रंग उजळतो त्यांतुन न्यारा

त्या रंगाची हिरवी भाषा, अजाण मी मज मुळि न कळे तर;
तरंगतो परि मनोमनावर त्या रंगाचा तवंग सुंदर....!!
- इंदिरा संत

श्रावणमास आगमनाच्या शुभेच्छा!!

Pages