अयोध्या आणि मोदीभक्ती इत्यादी...

Submitted by वाट्टेल ते on 24 June, 2025 - 17:07

नवरा आणि मुलगा सध्या भारतात आहेत. नवरा आईला घेऊन अयोध्या-वाराणसीला जाणार होता पण त्यांनी प्रवास झेपणार नाही म्हणून बेत रद्द केला. पण नवरा आणि मुलाने स्वतः जायचे ठरवले. यावर अनेकांनी आडून किंवा उघडपणे तुम्ही मोदी भक्त आहात का असे विचारले. या प्रश्नाची मी अपेक्षा केली नव्हती. पण त्यामुळे या प्रश्नाच्या मानसिकतेवर आणि ते तिथे का जात आहेत यावर जरासे चिंतन झाले.

ओळखीत कित्येक जण व्हॅटिकन सिटीला जाऊन आलेत. मला जमले तर पुढील काही वर्षांत camino de santiago ची यात्राही करायची आहे, पण माझा कॅथलिक परंपरेशी काही संबंध आहे असल्याने मी तिथे जात आहे असे कोणाच्याही मनात येणार नाही. इतकेच काय मला तिबेटमधील बुध्दविहार, आणि परवाने मिळाले तर मक्का-मदिना येथेही जायची इच्छा आहे, म्हणून मी बौद्ध किंवा मुसलमान व्हायला निघाले असाही त्याचा अर्थ नाही. अशीच उत्सुकता मला पंढरपूर वारी किंवा नर्मदा परिक्रमा याबद्दलही आहे.

मागे एकदा mont blanc परिसरात भटकंती करीत असताना, आमच्या गाईडने होमी भाभांच्या विमानाचा अपघात झाला ते ठिकाण दाखवले. शाळेच्या पुस्तकात याबद्दल वाचलेले आठवले, पण त्या अनुभवाशी connect होता आले नव्हते. ते बर्फाच्छादित शिखर बघितल्यावर एक विलक्षण धक्का बसला . महाराष्ट्रात गड -किल्ल्यांवर फिरताना शिवाजी महाराज जिथे येऊन गेलेत, तिथे आपण आलो आहोत, ही सुप्त जाणीव आणि त्याचा थरार असतोच. काही दिवसांपूर्वी सुचेता परांजपे यांचे व्याख्यान ऐकत होते. बियास आणि सतलज नदीच्या संगमाशी त्या कशा अपघातानेच पोहोचल्या आणि वेदांतले नदीसूक्त ज्या ठिकाणी रचले गेले तिथे अचानक गेल्याने त्यांना झालेला अपार आनंद याची गोष्ट त्यांनी सांगितली. बाईंचा अनेक वर्षांचा संस्कृत आणि वेदांचा अभ्यास आहे, त्यामुळे तो अनुभव असा अचानक समोर आल्याने , विलक्षण असणार यात संशय नाही.

थोडक्यात हे सगळे पुस्तकात वाचणे ते प्रत्यक्ष अनुभवणे याचा मामला आहे. अयोध्येत देऊळ आता बांधले गेले हे केवळ निमित्त पण अयोध्येला असलेले पुरातन महत्व कायम आहे. मुलाशी बोलत होते तेव्हा तो शरयू नदीकाठी बसलेला. शरयू नदीत रामाने देहत्याग केला हे आठवले. अयोद्धेपेक्षा वाराणसीची उत्सुकता अधिक. ते तिथे फिरत असताना मला बनारस हिंदू विद्यापीठापासून , वेगवेगळे घाट , देवळे याबद्दल वाचलेले आठवत होते. ‘गार्गी अजून जिवंत आहे’ मधली अंत्यसंस्कार करणारी स्त्री आठवली. गंगेचे वर्णन कित्येक पुस्तकांत आहे , काही वाचले, काही ऐकले आहे. त्या गंगेच्या किनारीच ते उभे आहेत आणि त्यांच्याद्वारे मी ही तो अनुभव घेत आहे याने विलक्षण वाटले.

आपण लताबाईंच्या पायाशी आहोत. आपल्या हाताला त्यांच्या पावलांचा स्पर्श होत आहे. आणि मग चुकून पृथ्वीतलावर आलेल्या, ज्यातून अलौकिक स्वर बाहेर पडले त्या त्यांच्या गळ्याला स्पर्श करीत आहोत अशी एक अनुभूती मी कल्पनेत घेत असते. आता हे प्रत्यक्ष घडले नाही आणि घडणार नाही पण जे जे काही वाचले आहे, श्रवण केले आहे त्या त्या अनुभवाशी जोडणाऱ्या त्या त्या ठिकाणचा शक्य असेल तिथे सशरीर अनुभव घेणे इतकाच काय तो उद्देश आहे.

आणि आता एक दुसरा मुद्दा. मुलगा जन्मापासून अमेरिकेत, राहणीमान साधे असले तरी शेवटी first world देशांत वाढला. अमेरिका, युरोप, कॅनडा, साऊथ अमेरिका इथे पुष्कळ डोंगर, सृष्टीसौन्दर्य, मनुष्यनिर्मित चमत्कार आणि एक प्रकारचे luxurious आयुष्य त्याने पाहिले आहेच. पण भारत, त्यात उत्तर प्रदेशातील विशेष दाट लोकसंख्या, राहणीमान, जीवनपद्धती, मानसिकता, आव्हाने, अडचणी , सगुण भक्तिमार्गाचा बाजार हे ही त्याने शक्य होईल तेव्हा जरूर पाहिले पाहिजे. तो अमेरिकेत वाढल्याने ‘बाजार’ काय असतो याची त्याला अगदी चांगली कल्पना आहेच. तिथला प्रवास बहुतांशी ट्रेन, लोकल बस, रिक्षा, पायी चालत, लहान ठिकाणी खात-पीत असाच झाला. असा रूट्स पातळीवरचा अनुभव मनुष्य म्हणून त्याला समृद्ध करेल, कारण ते त्याच्या रोजच्या परिचयाचे नाही.

इतके तत्वज्ञान सांगण्याचे कारण अयोध्या आणि वाराणसीला जाणे म्हणजे मोदीभक्ती किंवा भक्तीच्या बाजारात ४ थेंब स्वत:च्या अंगावरही उडवून घेणे इतका सरधोपट , एकांगी विचार सर्वजण करीत नाहीत, काही जण त्यापलीकडे बघत असतात.

तर…. मला गांधी, नेहरू, सावरकर आणि मोदीसुद्धा अनेक कारणांनी आवडतात पण अयोध्या आणि वाराणसीला जाण्याशी त्याचा संबंध नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विकु - अयोध्येबद्दल आस्था बाळगणारे सगळे मोदीभक्त नाहीत. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने तेथे एक मंदिर व्हायला हवे होते व ते झाले आहे इतकेच आहे. >> :लोलः

अयोध्येबद्दल आस्था बाळगणारे सगळे मोदीभक्त नाहीत.

हे विधान खोटे आहे. मंदीर प्राणप्रतिष्ठेच्या वेळी झालेला उन्माद अजूनही लक्षात आहे. इतका की त्या मंदीरात मूर्ती तरी श्रीरामाची असेल का मोदीजींची अशी साधार भीती मला वाटत होती. वर भरत यांनी दिलेले चित्र पुरेसे बोलके आहे. आणी अयोध्येबद्दल आस्था असणारे पण मोदीभक्त नसणारे जे लोक्स आहेत त्यांनी या उन्मादाबद्दल चकार शब्द काढला नव्हता.

अमेरिकेत एखाद्याने make america great again असे लिहिलेली टोपी घातली किंवा कार वर लिहिले आणी ही माझी आधीपासूनची भावना आहे, ट्रम्प चा संबंध नाही असे म्हणले तरीही आपण समजायचे ते समजतोच !

इतर कोणत्याही धार्मिक स्थळाला जाताना 'मोदीभक्त अहात का ?' हा प्रश्न येत नाही आणे नेमेका इथेच का येतो हाही प्रश्न अनुत्तरित आहे.

ताकाला जाऊन भांडे का लपवावे ?

माझेमन - थँक्स. मनीष- तुला पटले नसेल तर जरूर लिही. वाचायला आवडेल.

जिथे पूजा अर्चा होत नव्हती असे एखादे वादग्रस्त बांधकाम पाडून बांधलेले मंदीर सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने श्रद्धास्थान असू शकते हे माझ्यासाठी नवीन आहे >>> रानभुली, एक गट असा जरूर आहे की त्यांना मशीद जबरदस्तीने पाडून हे बांधले याचाही आनंद आहे. पण सगळे तसे नाहीत. त्यात आता मधे एक दोन पिढ्यांचा काळ गेला आहे. या सगळ्याची गेल्या काही वर्षातील पब्लिक इमेज काय आहे त्याबद्दल मी बोलतोय. सर्वसामान्य लोकांच्या मनात "ते तसे केले म्हणून हे श्रद्धास्थान आहे" असे नाही. श्रद्धास्थान आहे ते "अयोध्येच्या राममंदिरा"बद्दल. जनरल.

तेथे मशीद होती, ती पाडली, त्यानंतर दंगली झाल्या हे आता पब्लिक मेमरीमधून कमी झाले आहे. बाबरी मशीद जेथे होती व आता जेथे मंदिर बांधले आहे - तेथेच रामजन्मभूमी आहे असा लोकांचा समज आहे. असंख्य लोक स्वतः अयोध्येला गेलेले नाहीत. तेथे जर इतर देवळांमधले लोकही (मथुरेप्रमाणे) जन्मभूमीबद्दल क्लेम करत असतील तर त्याची कल्पना लोकांना नाही. त्या ठिकाणचे काही महत्त्व आहे हे पूर्वीही होतेच पण १९८५ (आसपास) पासून सुद्धा नव्याने चर्चेत आले होते.

तर लोकांचा समज आहे म्हणून हे सगळे (जबरदस्तीने मशीद पाडणे, दंगल ई) योग्य झाले असा अर्थ होत नाही. मी तसा दावा करत नाहीये. मी इतकेच म्हणतोय की ही लोकांची भावना, आस्था आहे त्याचा मोदी, भाजप ई शी संबंध नाही. ती त्याच्या आधीपासून आहे.

विकु - तुलना चुकीची आहे. मागा हॅटवाला ट्रम्पवालाच असेल. पण बॉर्डर मोकळ्या सोडू नका म्हणणारा प्रत्येक अमेरिक्न ट्रम्प सपोर्टर नसतो. तसेच तेथे जाउन आल्यावर मोदी है तो मुमकिन है लिहीणारा मोदीभक्त असेल, पण अयोध्येबद्दल आस्था असणारा प्रत्येकजण मोदीभक्त नसतो.

फारएण्ड मुद्दा पोहोचला.
तरी पण अयोध्येत अन्य मंदीरं नाहीत हे सुशिक्षितांना ठाऊक नसेल यावर सहजासहजी विश्वास ठेवावासा वाटत नाही. १९९५ च्या पुढे ज्यांचा जन्म आहे, त्यांना दंगलींचा इतिहास माहीत नाही हे नॅचरल आहे. पण यावर इतकी माहिती येत असते कि बस. पण हा मुद्दा बाजूलाच ठेवूयात.
जे साधारण ७० - ८० च्या दशकात किंवा आधी जन्मलेले आहेत, त्यांना अयोध्येतलं देऊळ एकमात्र नाही याची माहिती नाही हे पचायला कठीण आहे. यात माझ्यासारख्यांची गफलत होतेय हे मान्य करूयात.

पण अयोध्येत या आधी लोक गेलेच नाहीत का देवदर्शनाला ? मथुरेत एव्हढी गर्दी असते, मग अयोध्येत पण असणारच. चौधरी टूर्सच्या अयोध्या ट्रीप महाराष्ट्रातून फुल्ल असायच्या. ते लोक कारसेवेसाठी जात नव्हते. जे जाऊन आलेत ते लोक आपल्या नात्यात, ओळखीत माहिती देत नसतील का ?

मग एव्हढ्या प्रदीर्घ काळात अयोध्येला जायला वेळ झाला नाही, त्याच मंदीराला भेट द्यायला जावंसं वाटलं याचंही पब्लिक पर्सेप्शन समजून नको का घ्यायला ?
आम्ही मथुरेला जाऊन आलो. वाराणसी राहून गेलं. आता मथुरेला असाच वाद होऊन त्याच प्रकारे मंदीर उभारल्यावरच एखाद्याला जावंसं वाटलं तर हा ही योगायोगच समजावा. पण लोक त्याचा अर्थ काढतील तर त्यांना दोष द्यायचा हे का ?
मुळात अन्य ठिकाणी कोणते लोक तुम्हाला टोमणे मारतात, का मारतात हे भलत्याच प्लॅटफॉर्मवर सांगितल्यावर त्यावर मत न देणं हे शहाणपणाचं होतं, पण ती वेळ चुकली. कुणाचे कुणाशी कसे संबंध असतात आणि अशा कमेण्टमागे काय भावना असेल ते संबंधितांनाच माहिती.

रानभुली+१
विकु+१
फा, पब्लिक मेमरीमधुन काय कमी झालं आहे हे ठरवणं- हेही प्रत्येकाचं वेगळं असेल, सिलेक्टिव असेल. राममंदिराच्या वेळच्या उन्मादाच्या आठवणी फार वाईट आहेत. मी तरी विसरणार नाही. अख्खं बाळपण व्यापून टाकणारं आमचं एक जुनं राममंदिर आजही माझ्या चिरंतन आठवणींचा आणि विश्वाचा भाग आहे. आता अयोध्या राममंदिराच्या हॉरिबल उन्मादातून राजकीय परिप्रेक्ष्य वेगळं करताच येणार नाही. कुठच्याही रामभक्तावर आता माझा विश्वास राहिलेला नाही. इतर अनेक कारणं, पण मुख्य कारण- भिती वाटेल इतक्या उन्मादाच्या वेळी हे सगळे गप्प होते.

सो कॉल्ड रामभक्त असलेल्या धागाकर्त्याला याच परस्पेक्टिव्हने पहिला प्रश्न विचारला होता. इतर अनेकांनीही तशा अर्थाचे प्रश्न केले आहेत.

तुम्ही रामभक्त म्हणवत असाल आणि राममंदिराचा असा राजकीय वापर आणि सध्या रामनवमी उत्सवाला व इतर उत्सवांना देशभर आलेलं रूप तुम्हांला खटकत नसेल तर तुमच्या रामभक्तीबद्दल प्रश्न पडायला हवेत.

त्या बाळपणीच्या राममंदिराच्या अंगाखांद्यावर किती खेळलो, त्याची गणती नाही. एका बाजूला रामासारखाच वाटणारा थोर पिंपळ, आणि वरच्या मजल्यावर लायब्ररी होती. तिच्या पॅसेजेस मधून चारही बाजूंनी खालचा सभामंड्प दिसायचा. त्याच पॅसेजमध्ये मध्ये आम्ही 'साने गुरुजी कथामाला' अनेक वर्षं चालवली. ते ऐकायला लहानच नव्हे तर मोठेही यायचे. एक रिटायर्ड मुख्याध्यापक साने गुरुजींचा वेष करून यायचे, ती एक निराळीच गंमत.

या परिसराचं वर्णन माझ्या काही कथांमध्ये आपसूकच आलं. त्याशिवाय त्या झाल्याच नसत्या.

आता तिथं थ्री स्टार म्हणता येईल असं भव्य काँक्रीटचं राममंदिर झालं आहे. झालं तेव्हापासून जाणं होत नाही.

अयोध्येला आयुष्यात कधीही जाणार नाही. असंख्य विडिओज बघितलेत. तिथं काय आहे ते नीट कळलं आहे.

>>>>अयोध्येला आयुष्यात कधीही जाणार नाही.
मलाही रस नाही तिथे जाण्यात. पण माझं कारण वेगळं आहे. इतकं झकपक मंदिर खरच उबग आणतं. काळ्या दगडातील सात्विक मूर्ति व शांत देवळेच आवडतात. पुण्यातल्या काळा राम मंदिरात जाईन फार तर. कधी गेले नाहीये.

भिती वाटेल इतक्या उन्मादाच्या वेळी हे सगळे गप्प होते >> सर्वसामान्य माणूस उन्मादाला पाठिंबा अजिबात नसला तरी उन्मादाच्या वेळी कदाचित गप्पच राहील ना? कनफ्रंट करायचे कसब, धीर, ऊर्जा एकवटू न शकलेले लोक गप्प होते म्हणजे त्यांचा पाठिंबा होता, ते छुसं होते असं इथे काही लोक डिवचुन डिवचुन म्हणत रहातात त्यात काही अर्थ तरी आहे का!

मी मोदी विरोधी आहे, नास्तिक आणि अश्रद्ध आहे तरी मला इतका गोंधळ घालून काय आणि कसं मंदिर बांधलं आहे, मशीद कुठे होती, आता काय दिसतं आहे याबद्द्ल फार उत्सुकता आहे आणि जमलं तर आयोध्येला जायला नक्की आवडेल.
वाराणसीला तर जायचंच आहे. तिकडचे घाट इतके रोमँटसाईझ झालेत की ते बघायची ओढच आहे म्हणा ना. बाकी मोदी भक्त करुन प्रश्न विचारले तरी मला काही पडलेली नाही.
आज मोदी आहेत, सध्याची परिस्थिती बघता दुसरं कोणी येण्याची दूरदूर शक्यता नाही. सामान्यमाणूस म्हणून मला आहे त्यात आनंद शोधायला आवडतो. आता आमच्या दक्षिणेला ट्रंप आहे, मी तिकडे सध्यातरी पाऊल टाकणार नाही असं अगदी ठाम ठरवलं आहे, तिकडे निर्माण झालेल्या वस्तू शक्यतो खरेदी करायच्या नाही हे ही ठरवलं आहे. पण किती दिवस? कदाचित अजुन तीन वर्षे निर्धार टिकेल कदाचित नाही. तत्त्व आणि क्षणिक आनंद यांचा सामना आला तर क्षणिक आनंद कधी तरी वरचढ ठरणारच. तत्त्वांची पायमल्ली करायची माझी एक मर्यादा आहे. आणि ती मला मान्य आहे. हेकटपणे तत्त्वांना चिकटून मला रहायचे नाही.
आनंद... परस्युट ऑफ हॅपिनेस पुढे सगळं तुच्छ आहे.
भारतात आता मोदी आहेत तर ते बदलणे सध्या शक्य नसेल तर त्यातून प्रत्येक मोदी विरोधकाची वाट काढायची पद्धत निराळी असेल.
त्याचप्रमाणे तेव्हा उन्मादाला कदाचित पाठिंबा असला तरी ३० वर्षांनंतर पाठिंबाच असेल हे मानणे, तेव्हा का नाही केलं म्हणणे यात ही काही फार अर्थ नाही. मी बाबरी पाडली तेव्हा मी १० वर्षांचा होतो. आमच्या व्यायामशाळेतील एक सर कट्टर संघी होते, ते कारसेवेला गेलेले. आजुबाजूला घेट्टो वातावरण होतं. जे होतंय हे उत्तम आहे, बरी अद्दल घडली. गोध्रा नंतरही हे भयानक आहे, पण.... असेच विचार आजूबाजूला ऐकलेले. तेव्हा १६-१७ वर्षांचा असेन. अक्कल न्हवती.
द्वारका आणि मधुरा यात कृष्ण कुठे जन्मला... तो तर कारागृहात जन्मला ना? मंदिरात कसा जन्म होईल त्याचा. बरं कारागृहाच्या डोक्यावर मंदिर बांधलं धरुन चाललं तरी तिकडे त्याचं एक मंदिर आहेत का हजार मला अजिबात माहिती नाही. कधी गेलोच नाही. मुळात कृष्ण असा एक कोणी व्यक्ती होता हा अनेक होते इथ पासून मला काही माहित नाही. देव धर्म हा पोटापाण्याचा उद्योग असल्याने असतील पाच पन्नास मंदिरं.

फारच काहीतरी विस्कळीत लिहिलंय. पण जाऊदे आता.

धाग्याला काही अर्थ नाही, पण धागा पळणार हे माहीत होते.
ललित लेखनात असला तरी कोतबो धागा आहे आणि कोतबो पळणे ही माबोची परंपरा आहे.

जो काही टोमणा मारलाय तसे टोमणे, आणि या विरुद्ध राम मंदिरात जाणार माही म्हटल्यावरही येणारे टोमणे ते ट्रोलिंग इथे एवढे कॉमन आहे हे माहीत नसल्याने काढलेला कोतबो असे मला धागा वाचला तेव्हा वाटले आणि अजूनही तसेच वाटते आहे.
आता राम मंदिरात जाणारे सगळेच मोदी भक्त असतील का? अर्थात नाही.
आणि न जाणारे खरे हिंदु नाहीतच, अस्तिन के साप वगैरे आहेत का? अर्थात नाही.

दोन्ही बाजूंनी आणि विशेषतः दुसऱ्या बाजुने राजकारणी ते कोणी बाबा-बुवा उघडपणे मंचावरून टोमणे मारत असताना एका बाजूने नात्यातील/ओळखीतील कोणी तुलनेत सौम्य टोमणा मारला त्यावर एवढे स्पष्टीकरण एका वेगळ्याच मंचावर देणे म्हणजे इथे काय होत आहे याची अजिबात माहिती नसणे हे दिसुन येत नाही का?
तसे लेखिकेस निदर्शनास आणुन द्यायला हवे.

रानभूली आणि भरत यांनी तोच प्रयत्न केला आहे असे मला वाटते.

आताही तोच उन्माद निर्माण केला जातो. रामनवमीच्या मिरवणुकांपासूनच सुरुवात झाली. त्यात हिंदुत्व पॉप गाणी वाजवली जातात. त्यात धार्मिक अँगल, भक्तिभाव मला तरी दिसत नाही. जब मुल्ले काटे जाएंगे राम राम चिल्लाएंगे अशा घोषणा असतात. हे प्रकार मुद्दाम मशिदी आणि दर्ग्यांसमोर थांबून अधिक प्रमाणात केले जातात. हे मुंबईतही झालेलं आहे.

मलाही जायचे आहे पण सर्व संकुल पुर्ण झालेकी जाईन. मला भक्ती कमी व पाहायची उत्सुकता जास्त आहे. हृषिकेश-वाराणसी—अयोध्या पैकी हृषिकेशला प्रवासातला एक थांबा म्हणुन भेट दिलीय. निवांत पाहायचे आहे.

जगभरातले लोक ज्या जागांकडे खेचले जातात त्या जागांमध्ये काहितरी अद्भुत आहे म्हणुन लोक येतात. मोदी भाजपा त्यांचे विरोधक वगैरे सगळे त्या जागांच्या अद्भुततेपुढे ठिपकेही नाहीयेत. केवळ त्यांची नावे म्हणुन कोणी जात नसेल तर तो खुप काही मिस करतोय असे म्हणेन.

जेरुसलेमबद्दलही माझे हेच मत आहे. या जागामध्ये काही जादु असावी, तिथे जाऊन आपल्याला ती अनुभुती येते का पाहावे. इतकेच आपल्या हातात आहे. मला जेरुसलेम जमणार नाही, आपली उडी भारतापुरतीच.

महाकुंभमेळ्यात गेलेलेही कित्येक केवळ अशा अनुभुतीकरता गेले असतील. १४४ वर्षांनी तिथी आलीय तर त्या सोहळ्याचा आपणही भाग असावे असे वाटले असावे. नाहीतर पाणी सगळे इथुन तिथुन सारखेच.

कित्येक वर्षांनी घडणारे सुर्यग्रहण पाहायला लांबुन प्रवास करुन जाणारेही काहीतरी अद्भुत अनुभव घ्यायलाच जातात ना? त्या दोन मिनिटांनी त्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार असते? पण तो अनुभव चुकवु नये ही धडपड करणारे आहेतच ना?

आजच्या युगात स्वताचे ढोल बडवणे प्रत्येकाला भाग आहेच. भाजपाच्या जागी इतर कोणी असते तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने फायदा उठवला असताच. तरी भाजपाला फायदा झाला नाही याचेही ढोल वाजले की.

महाकुंभला जाणे जमले नाही, निदान अयोध्या वाराणसी तरी जमवावे असे मी ठरवलेय. हे सगळे विचार असतात त्यात मोदी भाजपा कुठेही नसते. तिकडे गेल्यावर सर्व सोयी नीट असतील तर मला सरकार कोणाचे वगैरे क्षुल्लक बाबी आठवणारही नाहीत. खड्ड्यातल्या रस्त्यांवरुन प्रवास घडला तर मात्र शिव्या घालायला सरकार आठवेल.

वर जे जुन्या देवळांबद्दल लिहिलेय त्याच्याशी सहमत. मलाही आता बांधलेली देवळे देवळे वाटत नाहीत. गावातले जिर्णोद्धार करुन टाईल्स लाऊन चकाचक केलेले मंदीरही आपले वाटत नाही.

वादविवाद सगळे माहित आहेत, माबोवरचा रेग्युलर टाईम्पास आहे.

मानव बरोबर आहे. धन्यवाद समजून घेतल्याबद्दल.

उन्माद, इतिहास, भूगोल याच्याशी देणं घेणं नाही. नाही तर इथे पुरातत्व शास्त्री, इतिहास संशोधक यांना पाचारण करावे लागेल. इथे पूर्ण विराम.

काळ्या दगडातील सात्विक मूर्ति व शांत देवळेच आवडता >>> जिथे गर्दी जमते त्या देवळातल्या/ स्थानांतल्या देवपणाचे काय होते याचा चांगलच अनुभव आहे. Crowd has no brain & this fact is no brainer. कोणत्याही प्रसिद्ध मंदिरात फक्त तिथे जायचं असं ठरवून गेल्याला आता तप लोटून गेलयं...घरा सभोवतालच्या परिसरात देखिल क्वचित कधीतरी अशा मंदिरत जातो जिथे तुरळक गर्दी असते, बाहेर हार- नारळा चे दुकानही नसते....बाकी देवळातल्या देवांना बाहेरुनच रामराम करतो. कुणी कितीही आणि काहीही म्हणो, कुठे तरी वीण उसवलीय याची जाणीव कायम होत रहाते.

कोणत्याही धार्मिक स्थळाला जाऊ नये असे आपले माझे गरिबाचे मत आहे. देव आहे असे वाटत असेल तर तो मुख्यतः मनात असणार. देव नाही असे वाटत असेल तर तो कोठेच असणार नाही.

नुसते 'काय खास केले आहे' हे बघायला जाणे हे पर्यटन आहे आणि पर्यटनात राजकारण नसावे या मुद्याशी सहमत आहे.

या मंदिराला जैन मंदिरांना असते तसे एक विचित्र गुजराती पॉलिश्ड फीलिंग आहे. हे मंदीरांच्यामधले चकचकित लीला पैलेस छापाचे हॉटेल ठरावे.

म्हणजे याच्या design मधे कितीही भारतीय एलिमेंट्स असले आणि मंदिर स्थापत्य शास्त्रानुसार कितीही हे स्क्रिप्टला धरून असले तरीही असे विचिर फीलिंग मला येते.

याच कारणस्त्व मला त्या मोठाल्या स्वामी नारायण छाप मंदिरांचे कधीही आकर्षण वाटले नाही. त्यात जर युरोपियन पद्धतीच्या बागा असतील तर ती मंदिरे अजून डोक्यात जातात.

केवळ उत्सुकता म्हणून कधीतरी तो परिसर पाहायची मात्र इच्छा आहे. श्रद्धेचा यात काडीचाही भाग नाही.

उदा. कोल्हापूरच्या अंबाबाई (याचा जैनांनीच जीर्णोद्धार केला आहे कैकदा) मंदिराला, जेजुरीच्या खंडोबाला जसे ऑर्गनिक वलय असते तर या मंदिराबद्दल होईल का?

आता जीर्णोद्धार किंवा मंदिरे बांधण्याचे काम सर्वच राजे लोक करत आले आहेत. मोदी त्याला कसा अपवाद असणार? आपण आजही प्रजाच आहोतना. नागरिक नाही आहोत. कागदोपत्री असू पण तरीही मनातून आपण सब्जेक्टच आहोत.

दुसरी गोष्ट म्हणजे

मला एक बेसिक गोष्ट समजली नाही.

तुळजापूरची भवानी असो किंवा कोल्हापूरची अंबाबाई असोत.

त्या अडल्ट आहेत तरीही त्यांच्या मूर्त्या मात्र खूपच लहान आहेत.

मात्र इथे हा राम बाळ असूनही हा दोन पुरुष उंच आहे. हे लॉजिक काय मला पटले नाही. मूर्ती कमाल लाईफ साईज तरी हवी होती.

हा अप्रोचेबलच वाटत नाही.

आपल्या इकडच्या मंदिरांची दारं वगैरे लहान असतात. थोडे इंटिमेट स्पेस तयार करतात. मात्र असे भव्य दिव्य मंदिर बांधल्याने मात्र सगळी इंटिमसी निघून जाते.

इंग्लंडच्या संसदेत खासदार कसे एकमेकांना खेटून बसलेले असतात. किती लाइव्हली वाटत त्यांचे इंटरॅक्शन्स तिथे. म्हणजे त्या स्पेसचा परिणाम घडत असेलच. की घटना, सरकार हे अप्रोचेबल आहेत. म्युटेबल आहेत. मात्र चायनीज संसद कशी वाटते.

तुमचा जीव दडपूनच जायला पाहिजे असे एक प्रचंड काहीतरी मोठे तुमच्या समोर आहे. आणि त्या प्रचंड मोठ्या गोष्टीचे एक दडपण आणि भीती इतकी आहे की तुम्ही जे काही करत आहात ते चिरडून टाकण्याची पाशवी ताकद त्या स्पेस मधे तयार होत.

हे राम मंदिराचे असे झाले आहे.

>> १४४ वर्षांनी तिथी आलीय <<

असं काहीतरी उगाचच्या उगाच चढवून ठेवायचं. माझ्या एवढ्याश्या आयुष्यात चार कुंभमेळे झाले. कसले नाविन्य आले आहे. हे त्या व्हॉट्सअप मेसेज सारखे आहे. आज १२.१२.१२ तारीख आहे आणि ही बारा हजार बाराशे बारा वर्षातून एकदा येते छापाचा मेसेज.

किंवा भारतीय पालक, "असू दे शेवटचेच लग्न आहे घरातले, परत परत कुठे लग्नं होणार आहेत असे म्हणून प्रत्येक लग्नावर अव्वाच्या सव्वा खर्च करतात ते आठवलं.

१४४ वर्षांनी वगैरे या हाईप ला काहीही अर्थ नाही.

>> तेथे मशीद होती, ती पाडली, त्यानंतर दंगली झाल्या हे आता पब्लिक मेमरीमधून कमी झाले आहे. बाबरी मशीद जेथे होती व आता जेथे मंदिर बांधले आहे - तेथेच रामजन्मभूमी आहे असा लोकांचा समज आहे. असंख्य लोक स्वतः अयोध्येला गेलेले नाहीत. तेथे जर इतर देवळांमधले लोकही (मथुरेप्रमाणे) जन्मभूमीबद्दल क्लेम करत असतील तर त्याची कल्पना लोकांना नाही. त्या ठिकाणचे काही महत्त्व आहे हे पूर्वीही होतेच पण १९८५ (आसपास) पासून सुद्धा नव्याने चर्चेत आले होते.

तर लोकांचा समज आहे म्हणून हे सगळे (जबरदस्तीने मशीद पाडणे, दंगल ई) योग्य झाले असा अर्थ होत नाही. मी तसा दावा करत नाहीये. मी इतकेच म्हणतोय की ही लोकांची भावना, आस्था आहे त्याचा मोदी, भाजप ई शी संबंध नाही. ती त्याच्या आधीपासून आहे.<<

अयोध्येत अशी किती राम मंदिरे आहेत?

जिथे हे वाद नव्हते उदा. वृंदावन तिथे किती कृष्ण मंदिरे आहेत.

आणि तिथल्या प्रत्येक मंदिराचे काहीतरी वेगळेच आहे. त्यांच्यात जणू स्पर्धाच चाललेल्या असतात.

मात्र काही ठिकाणी उलटे असते. उदा. पुरीला एकच जगन्नाथ मंदिर आहे आणि इतर लहान मंदिरे ही त्याखाली दडून जातात. असे कृष्णाच्या इतर ठिकाणचे नाही.

आता हे मंदिर त्याच्या विवक्षित इतिहासामुळेच मोठे होणार आहे. समजा असे काही झालेच नसते, तर अयोध्येला देखील वृंदावनच्या मंदिरांसारखेच झाले असते.

पब्लिक मेमरीतून डिटेल्स जातील पण मंदिर मात्र कायच्या काय फेमस होऊन बसले आहे

इंग्लंडच्या संसदेत खासदार कसे एकमेकांना खेटून बसलेले असतात. किती लाइव्हली वाटत त्यांचे इंटरॅक्शन्स तिथे. म्हणजे त्या स्पेसचा परिणाम घडत असेलच.
>>>>
आपल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीना कल्पना आहे का लाईव्हली इंटरॅक्शन्स आणि इंटिमेट स्पेसेसची?

वेलमध्ये उतरणे, अध्यक्षांचा राजदंड पळवणे, आपल्याला पसंत नसलेले विधेयक फाडून उधळणे, मिरचीची पूड उधळणे (हे बहुतेक तेलंगण राज्याच्या निर्मितीवेळी आंध्रच्या विधानसभेत झाले), कामकाज चालू असताना मोबाईलवर पॉर्न बघणे, विधानसभेत सदस्याला कानाखाली मारणे वगैरे पराक्रम करण्यात आणि आपापली न्यूसन्स व्हॅल्यू दाखवली म्हणजे आपण कित्ती परिणामकारक विरोध/प्रतिकार केला असे दाखवण्यात बिझी असतात.

अगदी अभ्यासू म्हणवणारे लोकप्रतिनिधी विरोध दर्शवायला म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणि सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालतात आणि संसद/विधानसभा गोंधळ घालून बंद पाडतात किंवा सभात्याग करून विरोध करतात. एखाद्या महत्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण मत मांडून विरोध करणे किती जणांना जमते?

यांना जवळजवळ बसवले तर कपडे फाडतील एकमेकांचे आणि तो राजदंड डोक्यात घालतील.

या लोकांना किमान ५ महत्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण मत मांडले नाही तर पुढच्यावेळी तिकीट मिळणार नाही अशी सोय केली पाहिजे.

यांना जवळजवळ बसवले तर कपडे फाडतील एकमेकांचे आणि तो राजदंड डोक्यात घालतील. >> Lol खरं आहे.
किमान ५ महत्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण मत मांडले नाही तर पुढच्यावेळी तिकीट मिळणार नाही अशी सोय केली पाहिजे.>> +१.

हायला! मग प्रग्या सिंग ठाकुर, कंगना रानावत , नितेश राणे , पडळकर यांनी कुठे जायचं? यांच्या जोडीला आता उज्ज्वल निकम यांचं नाव घ्या.
---

राममंदिर उद्घाटनाच्या वेळी आणि त्याही आधीपासून हिंदूंच्या सणांच्या निमित्ताने जो उन्माद दिसतो, त्यावरची शांतता मंजूऽऽऽऽऽळ आहे. म्हणजे तेव्हाच्या उन्मादाच्या वेळी आम्ही नव्हतो , पण आताच्या उन्मादात काही खटकत नाही, असं म्हणायला हरकत नसावी.

अमित, सर्वसामान्य माणूस अक्चुअली काहीही न करता उन्मादाला कसा पाठिंबा देऊ शकतो, याची उदाहरणं देण्यासाठी नवी चर्चा आणि नवा बाफ काढावा लागेल. काहीही करण्याच्या शक्तीत आणि शक्यतेत नसलेला हा सर्वसामान्य माणूस एखाद्या केसमध्ये कसा 'वागतो' हे पाहणं मनोरंजक असतं. करायचं काहीच नसलं तरी सोयीस्कर 'वागता' येतं, हे मान्य आहे की नाही? एक्झॅक्टली याच गोष्टीचा फायदा आपले नेते-पुढारी घेतात- हे बरोबर आहे की नाही?

तथाकथित रामभक्तांवर नाही तसा 'पब्लिक मेमरी'वरही माझा विश्वास नाही. ती आजकालच हायजॅक केली जाते असंही नाही. अनेक शतकांपासून हेच चाललं आहे. आपल्याला गुलाम असण्याचा अधिकार जितका जुना आहे तितकाच अर्थात बिनडोक असण्याचाही अधिकार जुनाच आहे.

रॉय आणि भरत आणि इतर काही हे वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने सांगत आहेत. मला कदाचित नीट सांगता येत नसेल.

बेफिकिर, तुमच्या 'पर्यटन' या शब्दाच्या आधी 'धार्मिक' हा शब्द जोडा, आणि पुन्हा वाचून बघा. स्वतःलाच फसवण्याचा खेळ फार गोड असतो. तो अंतापर्यंतही खेळता येतो. शेवटी 'किसको क्या मिला, ये मुकद्दर की बात है' हे असतंच असतं.

करायचं काहीच नसलं तरी सोयीस्कर 'वागता' येतं, हे मान्य आहे की नाही?>>> आणि किमना स्टेटस- शको मेंटेन केला तरी ती निष्क्रियता देखील कुणा ना कुणाच्या सोईचीचं असते.

आपल्याला गुलाम असण्याचा अधिकार जितका जुना आहे तितकाच अर्थात बिनडोक असण्याचाही अधिकार जुनाच आहे.>>>
IMG_20250722_123832_404.jpg

करायचं काहीच नसलं तरी सोयीस्कर 'वागता' येतं, हे मान्य आहे की नाही? एक्झॅक्टली याच गोष्टीचा फायदा आपले नेते-पुढारी घेतात- हे बरोबर आहे की नाही? >> हो. समजलं आणि नजरे समोर उदाहरणं ही आली अनेक.

फार्स विथ द डिफरन्स, इथे कोणीतरी तुम्ही आंधळे आहात का असं विचारल्याबद्दल कांगावा सुरू आहे असं वाटतंय.

मला जे म्हणायचंय ते पोचलं असेलच. पण आणखी फोडून सांगतो.

रामाला राजकारणासाठी वापरणं खटकत नाही. फायदा करून घेतला म्हणून सहज मान्य करता येतं.

पूर्वी हिंदूचे सण श्रद्धा आणि उत्साहाने साजरे होत. आता द्वेष , बेभानपणा आणि बीभत्सपणाने साजरे होतात. ते खटकत नाही.

आणि तरीही रामावर आमची श्रद्धा आहे. अयोध्येची पौराणिक महती . इ.इ. गुर्‍हाळ

यावरून आणखी एक आठवलं.

मुंबई भाजपने मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक अशी अयोध्या स्पेशल ट्रेनची सोय केली. यासाठी प्रवाशांची नोंदणी पक्षाच्या स्थानिक शाखांनी केली.

भाजपने दर लोकसभा मतदारसंघातून ६००० लोकांना अयोध्यावारी घडवायचं लक्ष्य ठेवलं होतं. रेल्वे आणि भाजपचा संयुक्त उपक्रम. यासाठी रेल्वे मंत्रालयाने सवलतीच्या दरात आस्था स्पेशल ट्रेन्स चालवल्या .

यांच्याच सरकारने कोविड लॉकडाउनदरम्यान लाखो लोकांना शेकडो हजारो किलोमीटर अंतर अगदी पायी जायला भाग पाडलं. खूप आरडाओरडा झाल्यावर ट्रेन्स दिल्या, त्यांना तिकिटं लावली. तिकिटांचे पैसे काही राज्यांतल्या विरोधी पक्षांच्या सरकारांनी भरले.
विरोधी पक्षांनी बसेसची सोय करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यात भाजप सरकारांनी खोडा घातला.

गेल्या वर्षीचे फोटो पाहताना या धाग्याची आठवण झाली.
गेल्या वर्षी उद्घाटन झाल्यानंतर एक दोन महिन्यात दीघा इथल्या जगन्नाथ धाम मंदीरात आम्ही सगळे गेलो होतो.
कळवण्यास आनंद वाटतो कि मंदीर अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि देखणं आहे. जयपूरच्या गुलाबी दगडात (नाव काय त्याचं ?) केलेलं बांधकाम, बसण्यासाठी भरपूर जागा, बलरामाची दुर्मिळ मूर्ती आणि विलक्षण स्वच्छता.

हे देऊळ जगन्नाथ पुरीच्या सुप्रसिद्ध जगन्नाथ धाम मंदीराची प्रतिकृती आहे. जगन्नाथ पुरीची गर्दी आपल्याला माहितीच आहे. इथे तेव्हढी गर्दी नाही. धक्काबुक्की नाही. रमणीय असं मंदीर आहे. धार्मिक पर्यटनासाठी function at() { [native code] }इशय सुंदर स्थान. जगन्नाथ पुरीला जायचं होतं पण आता ती तहान भागली. तरीही तिथल्या मंदीराचं महत्व आहेच. ओरिसा बघायला जाईन तेव्हां कधी तरी भेट देईन. चुंबकीय क्षेत्रवालं कोनार्क मंदीर पण बघायचंच आहे.

पण दीघा हे गावच निसर्गसुंदर आहे. बीचेस पण देखणे आहेत. बघण्यासारखी खूप स्थळं आहेत ज्यासाठी वेळ काढावा लागतो. एक दिवस म्हटलं कि फक्त मंदीरच बघून होईल. चालून चालून पाय दुखले तरी बघून होत नाही एव्हढे प्रशस्त आहे.
इथे एक रोपवे आहे ( नाही गेलो)
एक शिवमंदीर आहे. हे ही खूप सुंदर आणि रचना युनिक आहे.
मरीन अ‍ॅक्वेरीयम आहे ( राहिलं हे ही).
वंडर लँड आहे, सायन्स पार्क आहे ( हे पण राहिलंच).
अमरावती पार्क आहे. दीघा वॉल (गेट) आहे. गेट वे ऑफ दीघा म्हणतात त्याला.
दोन तीन मार्केट आहेत.
नक्की भेट द्या.

Pages