अयोध्या आणि मोदीभक्ती इत्यादी...

Submitted by वाट्टेल ते on 24 June, 2025 - 17:07

नवरा आणि मुलगा सध्या भारतात आहेत. नवरा आईला घेऊन अयोध्या-वाराणसीला जाणार होता पण त्यांनी प्रवास झेपणार नाही म्हणून बेत रद्द केला. पण नवरा आणि मुलाने स्वतः जायचे ठरवले. यावर अनेकांनी आडून किंवा उघडपणे तुम्ही मोदी भक्त आहात का असे विचारले. या प्रश्नाची मी अपेक्षा केली नव्हती. पण त्यामुळे या प्रश्नाच्या मानसिकतेवर आणि ते तिथे का जात आहेत यावर जरासे चिंतन झाले.

ओळखीत कित्येक जण व्हॅटिकन सिटीला जाऊन आलेत. मला जमले तर पुढील काही वर्षांत camino de santiago ची यात्राही करायची आहे, पण माझा कॅथलिक परंपरेशी काही संबंध आहे असल्याने मी तिथे जात आहे असे कोणाच्याही मनात येणार नाही. इतकेच काय मला तिबेटमधील बुध्दविहार, आणि परवाने मिळाले तर मक्का-मदिना येथेही जायची इच्छा आहे, म्हणून मी बौद्ध किंवा मुसलमान व्हायला निघाले असाही त्याचा अर्थ नाही. अशीच उत्सुकता मला पंढरपूर वारी किंवा नर्मदा परिक्रमा याबद्दलही आहे.

मागे एकदा mont blanc परिसरात भटकंती करीत असताना, आमच्या गाईडने होमी भाभांच्या विमानाचा अपघात झाला ते ठिकाण दाखवले. शाळेच्या पुस्तकात याबद्दल वाचलेले आठवले, पण त्या अनुभवाशी connect होता आले नव्हते. ते बर्फाच्छादित शिखर बघितल्यावर एक विलक्षण धक्का बसला . महाराष्ट्रात गड -किल्ल्यांवर फिरताना शिवाजी महाराज जिथे येऊन गेलेत, तिथे आपण आलो आहोत, ही सुप्त जाणीव आणि त्याचा थरार असतोच. काही दिवसांपूर्वी सुचेता परांजपे यांचे व्याख्यान ऐकत होते. बियास आणि सतलज नदीच्या संगमाशी त्या कशा अपघातानेच पोहोचल्या आणि वेदांतले नदीसूक्त ज्या ठिकाणी रचले गेले तिथे अचानक गेल्याने त्यांना झालेला अपार आनंद याची गोष्ट त्यांनी सांगितली. बाईंचा अनेक वर्षांचा संस्कृत आणि वेदांचा अभ्यास आहे, त्यामुळे तो अनुभव असा अचानक समोर आल्याने , विलक्षण असणार यात संशय नाही.

थोडक्यात हे सगळे पुस्तकात वाचणे ते प्रत्यक्ष अनुभवणे याचा मामला आहे. अयोध्येत देऊळ आता बांधले गेले हे केवळ निमित्त पण अयोध्येला असलेले पुरातन महत्व कायम आहे. मुलाशी बोलत होते तेव्हा तो शरयू नदीकाठी बसलेला. शरयू नदीत रामाने देहत्याग केला हे आठवले. अयोद्धेपेक्षा वाराणसीची उत्सुकता अधिक. ते तिथे फिरत असताना मला बनारस हिंदू विद्यापीठापासून , वेगवेगळे घाट , देवळे याबद्दल वाचलेले आठवत होते. ‘गार्गी अजून जिवंत आहे’ मधली अंत्यसंस्कार करणारी स्त्री आठवली. गंगेचे वर्णन कित्येक पुस्तकांत आहे , काही वाचले, काही ऐकले आहे. त्या गंगेच्या किनारीच ते उभे आहेत आणि त्यांच्याद्वारे मी ही तो अनुभव घेत आहे याने विलक्षण वाटले.

आपण लताबाईंच्या पायाशी आहोत. आपल्या हाताला त्यांच्या पावलांचा स्पर्श होत आहे. आणि मग चुकून पृथ्वीतलावर आलेल्या, ज्यातून अलौकिक स्वर बाहेर पडले त्या त्यांच्या गळ्याला स्पर्श करीत आहोत अशी एक अनुभूती मी कल्पनेत घेत असते. आता हे प्रत्यक्ष घडले नाही आणि घडणार नाही पण जे जे काही वाचले आहे, श्रवण केले आहे त्या त्या अनुभवाशी जोडणाऱ्या त्या त्या ठिकाणचा शक्य असेल तिथे सशरीर अनुभव घेणे इतकाच काय तो उद्देश आहे.

आणि आता एक दुसरा मुद्दा. मुलगा जन्मापासून अमेरिकेत, राहणीमान साधे असले तरी शेवटी first world देशांत वाढला. अमेरिका, युरोप, कॅनडा, साऊथ अमेरिका इथे पुष्कळ डोंगर, सृष्टीसौन्दर्य, मनुष्यनिर्मित चमत्कार आणि एक प्रकारचे luxurious आयुष्य त्याने पाहिले आहेच. पण भारत, त्यात उत्तर प्रदेशातील विशेष दाट लोकसंख्या, राहणीमान, जीवनपद्धती, मानसिकता, आव्हाने, अडचणी , सगुण भक्तिमार्गाचा बाजार हे ही त्याने शक्य होईल तेव्हा जरूर पाहिले पाहिजे. तो अमेरिकेत वाढल्याने ‘बाजार’ काय असतो याची त्याला अगदी चांगली कल्पना आहेच. तिथला प्रवास बहुतांशी ट्रेन, लोकल बस, रिक्षा, पायी चालत, लहान ठिकाणी खात-पीत असाच झाला. असा रूट्स पातळीवरचा अनुभव मनुष्य म्हणून त्याला समृद्ध करेल, कारण ते त्याच्या रोजच्या परिचयाचे नाही.

इतके तत्वज्ञान सांगण्याचे कारण अयोध्या आणि वाराणसीला जाणे म्हणजे मोदीभक्ती किंवा भक्तीच्या बाजारात ४ थेंब स्वत:च्या अंगावरही उडवून घेणे इतका सरधोपट , एकांगी विचार सर्वजण करीत नाहीत, काही जण त्यापलीकडे बघत असतात.

तर…. मला गांधी, नेहरू, सावरकर आणि मोदीसुद्धा अनेक कारणांनी आवडतात पण अयोध्या आणि वाराणसीला जाण्याशी त्याचा संबंध नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी पटलं.
मलाही कधी ना कधीतरी वाराणसी, अयोध्या, मथुरा, प्रयाग, पंढरपूर, तुळजापूर आणि अजूनही किती तरी ठिकाणी जायचं आहे आणि त्याचा मोदी किंवा कुठल्याही प्रकारच्या राजकारणाशी संबंध नाही. मी देवभक्त नाही, आस्तिकही नाही. तरीही.

अयोध्येला किंवा कुंभमेळ्याला जे जाणार नाहीत, ते अमुक तमुक असा एक सूर राजकारणी किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांनी लावला होता. तसंच हे.

मायबोलीवर एकांनी अयोध्या , काशी प्रवासाचं नुकतंच वर्णन केलं आहे, त्यांच्या लेखातली भावनाही तुमच्यासारखीच आहे

मला गांधी, नेहरू, सावरकर आणि मोदीसुद्धा अनेक कारणांनी आवडतात>>>> तुम्ही प्रातःस्मरणीय श्री अमितजीना कसे काय विसरलात?

आपण कुणाला स्पष्टीकरणं द्यायला बांधील आहोत का ?
शेरेबाजी मनावर घेण्यासारखं प्रकरण आहे का त्यात ?
पंढरपूर, बद्रीनाथ, केदारनाथ, कुंभमेळा, मथुरा, काशी, जगन्नाथपुरी, रामेश्वरम (पूर्ण द. भारतच) अशी कित्येक हिंदू धार्मिक स्थळं आहेत तिथे गेल्याने कुणीही शेरेबाजी करत नाही. अयोध्येला गेल्यावरच का होते यामागे ही काही कारण असेल.
आपल्याला ते लागू नसेल तर मनावर घेण्यासारखं काहीच नाही त्यात.

रानभुली -
शेरेबाजीबद्दल म्हणायचे तर अमेरिकेत राहून भारतात आल्यावर so called धार्मिक स्थळांना ( अयोध्याच असे नाही, कुठेही ) भेट देण्यावरून, धार्मिक समारंभ करण्यावरून अक्कल काढणारे शेरे वेळोवेळी कानावर पडतात. ते मनावर घेत नाहीच व स्पष्टीकरण देण्यासही बांधील नाही. एकदा अयोध्या-वाराणसीला जाण्यामुळे आता कायम एका विशिष्ट गटात टाकले जाईल. त्याचप्रकारे मोदींच्या ४ गोष्टींना विरोध म्हणजे संपूर्ण मोदींना कायमचे मोडीत काढलेले आहे असेही समजायचे कारण नाही. अयोध्येला जाणे आणि मोदीसमर्थक असणे दोन वेगळया गोष्टी आहेत इतके साधे आहे. उगीच समर्थन म्हणून चलो अयोध्या नाहीये, हे सांगण्याचा यत्न होता.

मलाही जगप्रसिद्ध जेरुसलेम, आयोध्या हे बघायला/ अनुभवायला आवडेल .
आत्ता पर्यन्त इस्तानबुलची ब्लु मॉस्क, हरिद्वारची गंगाजीकी आरती पाहिली आहे, वेगळच काहीतरी वातावरण असते .

आडून किंवा उघडपणे तुम्ही मोदी भक्त आहात का असे विचारले
>>>
अयोध्या, काशी, राम, भक्ती इत्यादी गोष्टींवर मोदींची वैयक्तिक मालकी आहे का- असं तुम्ही आडून किंवा उघडपणे या लोकांना विचारलं का?

माफ करा तुमचा आयडी बघून नवीन असाल असं वाटलं होतं. पण तुम्ही प्राचीन आहात.
शीर्षक वाचून लेख वाचावासा वाटत नव्हता, वाचल्यावर प्रतिसाद द्यावासा वाटत नव्हता, प्रतिसाद दिल्यानंतर पुन्हा रिप्लाय बघायचा नव्हता आणि बघितल्यावर पुन्हा प्रतिसाद द्यायचा नव्हता. Lol
हे सगळं का केलं हे माझं मलाच समजत नाही.

माझा प्रतिसाद अवघड नाही समजायला. अयोध्या प्रकरण देशात गाजलं नसतं तर कुणीही आडून किंवा उघड विचारलं नसतं. त्यामुळे ते फार मनाला लावून घ्यायची गरज नव्हती, किंवा ते अनुभव प्रसिद्ध करायची गरज नव्हती असं माझं मत. तुम्हाला स्वातंत्र्य आहे हे मान्य आहे.
जेरूसलेम मधे जर त्यांची पवित्र वास्तू पाडून मशीद बांधली आणि जेरूसलेम बघायला कुणी मुस्लीम व्यक्ती जाऊ लागला तर त्याने आधी काय पाहिलंय याचा डेटा कशाला कोण बघेल ? तो स्वाभाविकपणे आडून /उघड शंका विचारेलच ना ?

तो योगायोग असेल तर त्या मुस्लीम व्यक्तीने मनाला लावून घ्यायची गरज नाही. पण त्या सुप्त हेतूनेच जाणार असेल आणि उघड होऊ नये असे वाटत नसेल, तर अशा प्रश्नाने तो कदाचित अस्वस्थ होऊ शकेल.

कोणाला काही स्पष्टीकरण द्यायची गरज नसते.

जसे धर्म आपल्या घरात ठेवा असे लोकांना सांगावे लागते तसे आपले राजकीय कल आपल्या घरी ठेवा असे लोकांना सांगावेसे वाटते.

सोमिवर असो किंवा प्रत्यक्ष आयुष्यात, एखाद्या राजकीय पक्षाची तळी उचलणाऱ्या लोकांपासून मी दूरच राहतो.

कारण हल्ली सारे राजकारणच सडले आहे. कोणाला काही तत्वेच उरली नाहीत. अशा लोकांचे झेंडे नाचवणारे विचार मग नकोसे वाटतात.

एक पक्ष आहे कट्टर धर्माभिमानी तर एक सेक्युलर.
आणि दोघे आपल्या तत्वांबाबत ढोंगी.
विकास विकास नुसते बोंबलत राहतात दोघे. करत कोणी नाही.

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना,
छोडो बेकार की बातों को और हो आओ अयोध्या

---

भावनांची मांडणी आवडली, सहमत आहे.

एकंदरीत अशी शंका येते की आयोध्या हीपण वाराणसी किंवा अगदी अमरनाथ किंवा वैष्णोदेवी सारखी पवित्र व पूजनीय जागा आहे, याचा हिंदूंना विसर पडला आहे बहुतेक . नाहीतर या जागी भेट देण्याला राजकीय संदर्भ लावायची गरज वाटली नसती .
थोडक्यात काय तर चारशे वर्षे ती वास्तू भग्न ठेवून खरोखरच हिंदू अस्मिता खच्चीकरण्याची चाल यशस्वी झाली.
ता क ही टिपणी राजकीय नाही तर मानसशास्त्रीयम्हणून लिहिली आहे

मी अमेरिकेतून भारतात सुटीवर जाणार आहे व (गोंदवले, शेगाव, पंढरपूर, तिरुपती, काशी, तुळजापूर, अयोध्या पैकी एक ) ला जाणार आहे असे कुणाला सांगितले तर ते कोणत्या ठिकाणासाठी 'मोदीभक्त अहात का?' असे विचारतील ?

मी नवीन कार खरेदी केली व त्यावर (ओंम, श्री गणेशाय नमः, गण गण गणात बोते, 'भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, तुळजाभावानीची कृपा, आईचा आशिर्वाद, 'देखो मगर प्यार से', 'जय श्रीराम' पैकी एक ) असे लिहिले तर ते कोणत्या वाक्यासाठी 'मोदीभक्त अहात का?' असे विचारतील ?

महाराष्ट्रात कुठेतरी 'गोरक्षकांनी' म्हातार्‍या मुसलमानाला पिशवीत बीफ असल्याच्या संशयाने मारहाण केली व त्याला ( 'जय श्रीराम', 'श्री गणेशाय नमः', ' नर्मदे हर', 'पांडुरंग पांडुरंग' पैकी एक) घोषणा द्यायला भाग पाडले असे वाचले तर कोणती घोषणा plausible वाटेल ?

मी अमेरिकेत इग्रजीत भाषण केले व शेवटी (Let us bring glory to America, Let us make America a better place, Let us make America Eco freindly, Let us make America great again) पैकी एक वाक्य बोललो तर कोणत्या वाक्याला 'ट्रंप भक्त अहात का ?' असे विचारतील ?

'गर्व से कहो हम मोदीभक्त हैं' असे सांगायला काय हरकत आहे ?

मी अमेरिकेत इग्रजीत भाषण केले व शेवटी (Let us bring glory to America, Let us make America a better place, Let us make America Eco freindly, Let us make America great again) पैकी एक वाक्य बोललो तर कोणत्या वाक्याला 'ट्रंप भक्त अहात का ?'

>>>>>

विकु, तुम्ही यातले एकही वाक्य बोलला नाहीत तरी आम्हाला माहिती आहे की तुम्ही ट्रम्पभक्त आहात Proud

कोणत्या वाक्यासाठी 'मोदीभक्त अहात का?' असे विचारतील ?
>>
उद्या घरात पूजा केली तरी मोदीभक्त आहात का असे विचारतील असे आता वाटू लागले आहे. या यात्रेची अजून एक परिणीती म्हणजे,
नातेवाईक, ओळखीचे २ गटांत विभागलेले आहेत. मुलगा एकूण नको त्या मार्गाला लागतो की काय या संशयाने India after Gandhi हे रामचंद्र गुहांचे आणि असत्यमेव जयते हे अभिजीत जोग यांचे अशी २ जाडजूड पुस्तके २ परस्परविरोधी गटांकडून मुलाला मिळाली आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड न देता पुस्तके दिली असतील तर चांगलं आहे की! ठरवेल तो त्याला काय वाटेल ते.
विकु Lol
टवणेसर Proud

हे जनरलायझेशन हल्ली फार झालय. केस जिंकून बाकी तयारी करून जेव्हा ऊद्घाटनाची वेळ आली तेव्हा मोदी पंतप्रधान होते आणी भाजप सत्तेत होती हा योगायोग झाला. जर असे नसते अर रामजन्मभूमी न्यायाने कदाचित तत्कालीन पंतप्रधान किंवा तत्सम अधिकारी व्यक्तीला बोलावले असते.
मोदी यायच्या आधी भाजप स्थापन व्हायच्या आधीपासून मंदिर तिथे होतेच की .
तर खिजवून विचारण्याची काही गरज नाही

काहीही !
गेल्या वर्षीच्या भारत भेटीत अक्कलकोट, नरसोबाची वाडी, गोंदवले, हरिपूर , मळखेड अशा अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली. एकानेही 'मोदीभक्त अहात का? ' असा प्रश्न विचारला नाही. आडून आडूनही नाही.

मुलाला पुस्तकं मिळालीत हे फारच मोठं भाग्य.

परस्परविरोधी गटांकडून मुलाला मिळाली आहेत.
>>>
हे आणखीच भारी आहे. असं नशीब सगळ्यांचं नसतं. अशी पुस्तकं मिळणारा मुलगाही भाग्यवान आणि बुद्धिमान. (हे सरकॅस्टिकली नाहीय)

नको त्या मार्गाला>>> हे दोन्हींपैकी कुठच्या पुस्तकाबद्दल आहे, आणि हे मत तुमचं आहे की मुलाचं आहे? मुलाची कॉमेंट इथं टाकली तरी चालेल. आय अ‍ॅम क्युरियस.

अशी (जाडजूड) पुस्तकं मुलाला मिळतात म्हटल्यावर मला आता मुलाच्या मतांबद्दल जास्त उत्सुकता आहे.

अमेरिका हा फर्स्ट वर्ल्ड देश (खरेतर हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे भांडवलवाद, साम्यवाद आणि अलिप्त यांच्या आधारावर आहेत) आहे हे जरा अंमळच झाले. (यातले फर्स्ट वर्ल्ड म्हणजे लेखिकेच्या मनातले अतिप्रगत पहिल्या रांगेतला देश आहे हे गृहीत धरून)

सजिरा - "नको त्या मार्गाला" हे त्या पुस्तके देणार्‍या दोन्ही गटांचे (विरूद्ध विचारधारेबद्दल) मत आहे असे मी इंटरप्रिट केले.

हे आणखीच भारी आहे. असं नशीब सगळ्यांचं नसतं. अशी पुस्तकं मिळणारा मुलगाही भाग्यवान आणि बुद्धिमान. >>> हे खरेच चांगले आहे. दुसरे मी वाचलेले नाही पण इण्डिया आफ्टर गांधी हे नक्कीच वाचण्यासारखे आहे.

विकु - अयोध्येबद्दल आस्था बाळगणारे सगळे मोदीभक्त नाहीत. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने तेथे एक मंदिर व्हायला हवे होते व ते झाले आहे इतकेच आहे. लोकांना तेथे, व वाराणसीलाही जाण्यात प्रचंड इंटरेस्ट आहे (मलाही आहे). भाजपने त्याचा फायदा घेतला पण तो इंटरेस्ट मुळात पब्लिकमधे आहे आणि त्याचा मोदीभक्त असण्याशी संब्म्ध नाही. १९९२ पासून जे काय झाले, त्याचे इतर ठिकाणी काय परिणाम झाले हे आता पब्लिक मेमरीमधून नाहीसे झाले आहे.

अमेरिका फर्स्ट वर्ल्ड नाही? हे कधी बदलले?

श्रद्धा असणे चुकीचे नाही. इव्हन नास्तिक किंवा डोळस श्रद्धा असणारे सुद्धा धार्मिक स्थळांना भेटी देतात.
धार्मिक स्थळ कोणत्या कारणा साठी प्रसिद्ध असते ?
जागृत किंवा प्राचीन देवस्थान / मंदीर, जागृत नसले तरी हजारो / शेकडो वर्षांची परंपरा असते.
महाराष्ट्रात ज्योतिबा, खंडोबा, अंबाबाई, भवानीमाता अशी देवस्थानं आहेत ती मंदीरं शेकडो वर्षांपासून उभी आहेत. पंढरपूरचं मंदीर शेकडो वर्षे उभे आहे.
बद्रीनाथचं मंदीर किमान हजार वर्षे वर्षे जुनं आहे. थंडीत पहाटे पाचला दर्शन घेतलं आहे. मथुरेला कृष्ण जन्म झाला असं सांगणारे शेकडो आखाडे आहेत. तिथे उतरल्यापासून पंड्ये मागे लागतात कि आमचंच मंदीर हे खरं कृष्णजन्मस्थान आहे. सर्वसामान्य माणूस कुठल्याही एका मंदीरात जाऊन माथा टेकून येतो. त्याच्या दृष्टीने आपण मथुरेत आहोत आणि तिथे कृष्णाचं मंदीर होतं एव्हढं पुरेसं आहे. नेमका कुठे कृष्णजन्म झाला हे तपासणे हे त्याचे उद्दीष्ट नसते.
अयोध्येला नवीन मंदीर बांधण्याआधी श्रद्धाळू जातच होते ना ? ती मंदीरं मंदीरं नाहीत का ? त्यातले जे सर्वात प्राचीन आहे त्याची अवस्था पाहता त्याचा जीर्णोद्धार व्हायला हवा होता.
जिथे पूजा अर्चा होत नव्हती असे एखादे वादग्रस्त बांधकाम पाडून बांधलेले मंदीर सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने श्रद्धास्थान असू शकते हे माझ्यासाठी नवीन आहे. ही राजकीय श्रद्धा बाळगल्यास पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी, शनी शिंगणापूर, ज्योतिबा, बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ इ. ठिकाणी असलेल्या प्राचीन देवस्थानात जायच्या ऐवजी एखादी वास्तू पाडून बांधलेल्या भव्य देवस्थानात गेल्यासच श्रद्धा आहे हे सिद्ध होईल.

अयोध्येबद्दल आस्था बाळगणारे सगळे मोदीभक्त नाहीत.
भाजपने त्याचा फायदा घेतला पण तो इंटरेस्ट मुळात पब्लिकमधे आहे आणि त्याचा मोदीभक्त असण्याशी संब्म्ध नाही
>> You nailed it फा

सर्वसामान्य माणूस कुठल्याही एका मंदीरात जाऊन माथा टेकून येतो. त्याच्या दृष्टीने आपण मथुरेत आहोत आणि तिथे कृष्णाचं मंदीर होतं एव्हढं पुरेसं आहे. नेमका कुठे कृष्णजन्म झाला हे तपासणे हे त्याचे उद्दीष्ट नसते.
>>>>

काहींना तसं वाटू शकतं. पण सर्वच सामान्य माणसांना धार्मिक स्थळांचा नाश/ॲप्रोप्रिएशनबद्दल किंवा एखाद्या स्थानविशेषाबद्दल आस्था नव्हती/नाही असं मानणं जरा धाडसाचं होईल रानभुली.

प्राचीन/अर्वाचीन इतिहासात सर्व धर्मांत याची शेकडो उदाहरणं आहेत. शिवरायांनी खास करवून घेतलेला सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार हा एक नमुना. तसंच आया सोफिया चर्च/मशिद, अल् अक्सा मशिद व प्रांगण यांवर नेमका हक्क कुणाचा याबद्दल आजही वाद रंगले नसते.

या भावनांचा राजकिय वापर करून घेतला गेला यांत शंका नाही.

ओके माझे मन. रिस्पेक्ट योर व्ह्यू.
पण सहमत नाही. मथुरेला जाऊन आलेल्यांना हा अनुभव येतोच.
वादग्रस्त जागा हेच मूळ कृष्णजन्माचे स्थान आहे असे मथुरेत मानत नाहीत. उलट इथे असलेले हजारो आखाडे हेच मूळ आहेत असेच अहमहिकेने सांगतात आणि प्रत्येक ठिकाणी भाविक असतात.
अ‍ॅक्च्युअली इथे येणार्‍या बसशी आखाड्यांचा टाय अप असतो.

वाचली विपु.
कोर्टात असणारा वाद हा हादग्रस्त जागा कुठल्या धर्मियांची आहे हा आहे. निर्विवाद पणे हजारो आखाड्यातून तीच एकमेव जागा कृष्णजन्मभूमी असयाचा नाही. त्यामुळं मथुरा आणि अयोध्या या ठिकाणी अन्य आखाड्यात गेल्यास रामजन्मभूमीला जाऊन आल्याचा दावा खोडता येत नाही. कारण ते आखाडे सुद्धा हिंदू धर्मियांचेच आहेत आणि कदाचित जास्त प्राचीन आहेत.

वादग्रस्त जागेवर मंदीर होतं हे सिद्ध होणं आणि हीच एकमेव जागा खरी रामजन्मभूमीची आहे हे सिद्ध होणं यात फरक आहे असं मला तरी वाटतं.

Pages