एखादी गझल ऐकल्यावर ती मनाला इतकं वेड लावते हे मी माझ्या खरंतर नकळत्या किंवा अडनाडी वयात अनुभवलं. आठवीत असेन जेव्हा मी ही गझल पहिल्यांदाच मुंबईत ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवर एका नवोदित गायिकेच्या (जसपिंदर नरूला) तोंडून ऐकली. तेंव्हा किती शब्द कळले, किती अर्थ समजला अलाहिदा, पण मनात घर केलं या गझलने इतकं नक्की! कोकणात तेंव्हा टीव्ही वगैरे अजून आले नव्हते त्यामुळे त्यानंतर बरेच महिने मला ती गझल परत ऐकता नाही आली! आत्ता सारखं गुगलवर जाऊन शोधून काढून ऐकणं ही तेंव्हा कविकल्पना म्हणून सुद्धा मान्य झाली नसती. नंतर कधीतरी कळलं की गझलकार आहेत अहमद फराज आणि मूळ गायक मेहेंदी हसन!(यातील दोन शेर मूळ गझलकाराचे नाहीत पण मेहदी हसन यांनी ते गायले आहेत)
नंतर ऐन तारूण्यात कॉलेजमध्ये असताना ती गझल नीट समजून स्वतः सादर करायची संधी मिळाली, तेव्हापासून ती अजूनच जवळची झाली. शब्दनशब्द मनात जणू रूतून बसला. वय वाढत गेलं आणि जेव्हाजेव्हा नात्यातली गुंतागुंत, तळमळ, वेदना जास्तच जाणवू लागली तेव्हातेव्हा ही गझल आठवू लागली. इथे गझलकार असफल प्रेमातील असुरक्षिततेचा कसा स्वीकार करतोय, वेदनादायी असलं तरी प्रेमिकेशी असलेलं नातं त्याला कसं अमूल्य वाटतंय हे उमगू लागलं. दोघांमधलं नातं, संवाद दुःख देणारा असला तरी तिच्या अनुपस्थितीपेक्षा, दुराव्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे ही त्याची प्रामाणिक भावना, आर्त साद मनाला स्पर्शून गेली.
माझ्या शब्दात, मला कळलेली "रंजिशही सही"
(इथे काही उर्दू शब्दांचे अर्थही देत आहे)
रंजिशही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिरसे मुझे छोड के जाने के लिए आ
( रंजिश: नाखूशी, नाराजी, मतभेद)
नाराजीने, नाखुशीने आलीस .. परत एकदा मनाची दुखती रग छेडायला आलीस तरी चालेल, पण ये ग आता
परत मला एकटं सोडून/टाकून जाण्यासाठी तरी ये(अजूनपर्यंत तू मला पूर्णपणे सोडू शकली नाहीयेस, अजूनही बंध तुटले नाहीयेत), पण ये ना
१. माना की मुहोब्बत का छिपाना है मुहोब्बत
चुपकेसे किसी रोज जताने के लिए
प्रेम लपवणं हेच प्रेमाचं खरं लक्षण असेल कदाचित, म्हणून तू मनातलं प्रेम उघड करत नाहीस. पण कधीतरी गपचूप आपण दोघंच असताना ते व्यक्त करण्यासाठी ये ना
२. पहलेसे मरासिम न सही, फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ
(मरासिम: नातं/रिश्ता, आत्मीयता
रस्म-ओ-रह-ए-दुनिया: समाजाचे/जगाचे रितीरिवाज)
मान्य आहे की पहिल्यासारखं आता काही नाही राहीलं... ना आपलं प्रेमभरं नातं, ना भेटीगाठी ना सभोवतालची परिस्थिती...पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं
तरीपण एक औपचारिकता, समाजातील एक रीत पाळण्यासाठी का होईना, ये ना परत एकदा... कदाचित अजूनही लोकांना आपल्याला पूर्वीसारखं एकत्र पहायला आवडेलही!
३. किसकिसको बताएंगे जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ
(जुदाई: वेगळं होणं, अनुपस्थिती
सबब: कारणं)
कोणाकोणाला, का आणि कशाला सांगायचं काय बिनसलं आपल्यात, का आपण वेगळे झालो ते!
माझ्यावर रागावली असलीस तर निदान समाजाखातर, लोकांसमोर दिखावा करण्यासाठी तरी ये ना
४. कुछ तो पिंदार-ए-मुहोब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ
(पिन्दार-ए-मुहोब्बत : प्रेमाची प्रतिष्ठा, ईमान
भरम: विश्वास, सन्मान)
माझ्या सच्च्या प्रेमाचा काहीतरी मान राख, प्रत्येक वेळी मीच तुला मनवण्याचे प्रयत्न करतो, कधीतरी तू माझी समजूत काढायला, माझा रुसवा घालवण्यापुरती तरी ये ना
५. इक उम्र से हुँ लज्जत-ए-गिर्या से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझको रूलाने के लिए आ
(लज़्ज़त-ए-गिर्याः रडून मन मोकळं करण्याचं सुख/आनंद
महरूमः वंचित
राहत-ए-जाँः मनाला शांत करणारा, सुटका करणारा)
किती वर्षं झाली मी अश्रू ढाळणं देखील विसरून गेलोय, माझ्या संवेदना जणू गोठून गेल्यात. कदाचित ते दाबून ठेवलेलं दुःख तुला पाहिल्यावर डोळ्यावाटे वाहून तरी जाईल,निदान माझ्या मनावरचं हे ओझं उतरवून मला शांत करण्यासाठी तरी ये ना(हा शेर खरंतर आत्मा आहे या गझलचा असं मला वाटतं. इतर सर्व ठिकाणी गझलकार वेगवेगळ्या कारणासाठी ये अशी गळ घालतोय, पण इथे तो सत्य परिस्थितीचा व स्वतःचा स्वीकार करून मनःशांती मिळवू इच्छितो)
६. अब तक दिल-ए-खुश-फहम को है तुझसे उम्मीदें
ये आखिरी शम्मे भी बुझाने के लिए आ
(दिल-ए-ख़ुश-फ़हम: आशावादी मन, Misconceived optimism )
अजूनही माझं वेडं मन आशा सोडायला
तयार नाही, निदान ही आशेची शेवटची ज्योत मालवण्यासाठी तरी ये ना
७. जैसे तुम्हें आते है न आने के बहाने
ऐसेही किसी रोज़ न जाने के लिए आ
तशी तुला न येण्यासाठी बरीचं कारणं, सबबी सांगता येतात, एक दिवस असं कर की परतून न जाण्यासाठी ये ना!!
-- अभिश्रुती
फार सुंदर!
फार सुंदर!
मी गेल्या वर्षी रूना लैलाच्या आवाजात ही ऐकली. त्याआधी माहिती नव्हती असं नाही, पण नीट ऐकली नसावी कधी. पण ही ऐकल्यावर मात्र ती मनात जाऊन बसली आहे!
सुंदर! भावार्थ चांगला उतरला
सुंदर! भावार्थ चांगला उतरला आहे.
मीही पहिल्यांदा टीव्हीवर रुना लैलाची ऐकली होती.
सुरेख लेख, आवडलाच.
सुरेख लेख, आवडलाच.
सुंदर गझल आहे ती.
सुंदर गझल आहे ती.
लेख सुद्धा छान आहे हा.
सुंदर.
सुंदर.
माझीही फार आवडती गझल आहे ही.
किती उत्कट प्रेम व्यक्त होते त्यातून!
रंजिशही सही दिल ही दुखाने के लिए आ...
सही!

ही गज़ल पहिल्यांदा ऐकली ती
ही गज़ल पहिल्यांदा ऐकली ती मेहदी हसन यांचीच. तेव्हापासूनच मेहदी हसन नावाचं गारुड मनावर बसलं ते कायमचं.
छानच लिहिलंय. आवडलं.
शेवटचे दोन शेर तालिब बागबानपुरी यांचे आहेत.
धन्यवाद दोस्तहो.... मी
धन्यवाद दोस्तहो.... मी माझ्यापरीने गझलचा भावानुवाद करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडला, तुमच्या मनापर्यंत पोचला... अजून काय पाहिजे.
परत एकदा मनापासुन धन्यवाद!
Mala रुना लैला ची अतिशय आवडते
मला रुना लैला ची अतिशय आवडते. सुंदर लेख आहे.
श्रुति खुप छान लिहिलस... काहि
श्रुति खुप छान लिहिलस... काहि कठीण शब्दांचा अर्थ कळला.
हो बरोबर सुनील.... माना कि
हो बरोबर सुनील.... माना कि मुहोब्बत का छिपाना है मुहोब्बत आणि जैसे तुम्हे आते है न आने के बहाने.... हे दोन शेर मूळ गझलमधे नाहीत... ते तालिबचे आहेत, जे मेहेंदी हसन यांनी बरेचदा या गझलगायनात सामील केलेले आहेत... आणि ते चपखल बसतात!
मी हैदराबाद येथून काही जुनाट
मी हैदराबाद येथून काही जुनाट पुस्तके मिळवली होती त्यात फराज चे पुस्तकही आहे. त्यात तरी हे शेर फराजचे असल्याचे छापले आहे. खरे खोटे माहीत नाही. त्या पुस्तकावर मराठीत बेतलेला एक लेख (जाहिरात म्हणून नव्हे) देत आहे.
https://www.maayboli.com/node/36196
https://ranasafvi.com/ranjish
https://ranasafvi.com/ranjish-hi-sahi-explained/ इथे त्यांनी लिहिलय बघ की दोन शेर तालिबचे आहेत.... खरं खोटं देवजाणे!
ओके ओके
ओके ओके
तालिबची असावी ही गझल. लिंक
तालिबची असावी ही गझल. लिंक मिळाली तर इथे देईन.
पूर्ण गजल (खरी खोटी जी काही असेल)
यूँ भी तिरा एहसान है आने के लिए आ
ऐ दोस्त किसी रोज़ न जाने के लिए आ
हर-चंद नहीं शौक़ को यारा-ए-तमाशा
ख़ुद को न सही मुझ को दिखाने के लिए आ
ये उम्र, ये बरसात, ये भीगी हुइ रातें
इन रातों को अफ़्साना बनाने के लिए आ
जैसे तुझे आते हैं न आने के बहाने
ऐसे ही बहाने से न जाने के लिए आ
माना कि मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
तक़दीर भी मजबूर है, तदबीर भी मजबूर
इस कोहना अक़ीदे को मिटाने के लिए आ
आरिज़ पे शफ़क़, दामन-ए-मिज़्गाँ में सितारे
यूँ इश्क़ की तौक़ीर बढ़ाने के लिए आ
'तालिब' को ये क्या इल्म, करम है कि सितम है
जाने के लिए रूठ, मनाने के लिए आ
- तालिब बाग़पती
Published in
आलमगीर, 1927
रंजिश ही सही दिल ही दुखाने के
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ
कुछ तो मिरे पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ
पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ
किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ
इक 'उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिर्या से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ
अब तक दिल-ए-ख़ुश-फ़ह्म को तुझ से हैं उमीदें
ये आख़िरी शम'एँ भी बुझाने के लिए आ
- अहमद फ़राज़
गुगल ड्राईव मधे सेव्ह केलेले आहे. पण हे जिथून घेतले तिथला सोर्स लिहून ठेवला नव्हता. सापडले कि देईन. (जबाबदारी त्यांची म्हणजे)
रानभुली, धन्यवाद... तालिबची
रानभुली, धन्यवाद... तालिबची पूर्ण गझल दिल्याबद्दल!
सुंदर.
सुंदर.
या लाइव्ह कॉन्सर्ट मधे मेहदी
या लाइव्ह कॉन्सर्ट मधे मेहदी हसन यांनी १२.१६ मि. इथे तालिब बागबानपुरी यांचे दोन नवीन शेर प्रस्तुत करण्याचा उल्लेख केला आहे.
संपूर्ण गज़लच ऐकण्यासारखी आहे. मला वाटतं 'रंजिश ही सही' चं हे सर्वोत्तम सादरीकरण आहे.
सुंदर लिहिलयं.. लेख आवडला..!
सुंदर लिहिलयं..
लेख आवडला..!
लई भारी !!
लई भारी !!
मस्त! पूजा गायतोंडेंचं वर्जन
मस्त! पूजा गायतोंडेंचं वर्जन हि छान आहे. हल्लीच अलि सेठीचं शॉर्टर वर्जनसुद्धा ऐकलं, कोक स्टुडियोवर...
धन्यवाद भाऊ, रुपाली, बेफिकीर,
धन्यवाद भाऊ, रुपाली, बेफिकीर, सुनील, भावना, रानभुली, स्नेहल, छल्ला, भरत, वावे !
सुनील, लाईव्ह कॉन्सर्ट ऐकली... धन्यवाद!
"रंजिश ही सही"..........
"रंजिश ही सही"..........
"रंजिश ही सही" ही अहमद फ़राज़ साहेबांची अतिशय प्रसिद्ध गझल 1972 मधल्या "मोहब्बत" या पाकिस्तानी चित्रपटातील आहे. चित्रपटाच्या प्लॉट्सच्या हिशोबानं ही गझल लिहिली गेली. या नंतर ही गजल मैफिलींमधून प्रचंड लोकप्रिय झाली.
एक प्रियकर आपल्या प्रेयसीला उद्देशून ही गझल म्हणत आहे.
या चित्रपटातील नायिका तमन्ना (जेबा) चित्रपटातील नायकावर शीराजवर (मोहम्मद अली) खूप प्रेम करत असते, एक दिवस सगळं धाडस एकवटून ती शीराजजवळ आपलं त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करते. शीराजलाही तमन्नाबद्दल एक वेगळीच ओढ, जवळीक आणि आपुलकी वाटत असते; तरीही तो तमन्नाच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही. यांनतर काही दिवसातच शीराजचं लग्न ठरतं आणि त्याचवेळी तमन्नाचं लग्न एका दारुड्याशी होतं; पण लग्नाच्याच रात्री तिच्या नवऱ्याची एका वारांगनेच्या घरी हत्या होते आणि तमन्ना लग्न होऊनही अविवाहित असल्यासारखीच उरते.
दरम्यान शीराज आणि तमन्नामध्ये खूप दुरावा येतो. खरं तर जवळ असताना एखाद्या व्यक्तीचं असणं आपण इतकं गृहीत धरतो की तिचं खरं मूल्यच आपल्या लक्षात येत नाही पण तीच व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूर जाते तेव्हा मात्र मन सैरभैर होतं.. असंच काहीसं शीराजचंही होतं.. तमन्नापासून वेगळं झाल्यावर शीराजला आपण तमन्नावर जीवापाड प्रेम करत असल्याची जाणीव होते, म्हणून शीराज आपलं ठरलेलं लग्न मोडून तमन्नाकडे परततो, तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतो, तमन्नाच्या कठोरपणाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही उलट तो मनानं तमन्नाच्या अधिकच जवळ जातो.
तमन्ना इतकी दुखावली गेली आहे की; आता शिराजला भेटणंच काय पण त्याला बघण्याचीही तिची ईच्छा उरली नाही. एव्हाना शीराजही तमन्नाला भेटण्यासाठी आतुर झालाय, तिच्यावरचं त्याचं प्रेम त्याला खूप अस्वस्थ करतंय आणि अशा या अतिशय हृदयद्रावक परिस्थीतीत 'रंजीश ही सही' ही गझल शीराज; प्रेमात शुष्क झालेल्या आपल्या तमन्नासाठी म्हणतो आहे.
ही गझल जगप्रसिद्ध गझल गायक "मेहदी हसन" यांनी गायलेल्या श्रेष्ठ गझलांपैकी एक आहे.
हिची चाल "यमन कल्याण" रागात बांधली आहे.
मेहदी हसन यांनी ही गझल अक्षरशः अतिशय जीव ओतून गायली आहे. ही ऐकताना गझल प्रेमीच काय पण ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी साठलेल्या भावना उसळून वर आल्याशिवाय राहत नाहीत.
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ;
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ...
रंजीश म्हणजे दुःख, मनमुटाव, दुरावा, नाराजी...
मला माहित आहे की आपल्यात खूप दुरावा आला आहे, माझ्यावर तू नाराज आहेस, मला तुझ्यापासून लांब जाऊन खूप त्रास होतोय, आपल्या एका भेटीसाठी मी आसुसलो आहे; प्रेमानं नाही पण मला दुखावण्यासाठी, तुझ्या मनात असलेला माझ्याबद्दलचा राग व्यक्त करण्यासाठी तरी निदान भेट..
अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदे
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ..
खुशफ़हम म्हणजे गोड गैरसमजात असलेलं हृदय..
माझ्या गोड गैर समजात राहणाऱ्या मनाला अजूनही तू भेटशील अशी आशा आहे ; आता ही शेवटची उरली सुरली आशा संपवून टाकण्यासाठी तरी भेट गं..
इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरियां से भी महरूम
ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ..
लज्ज़त-ए-गिरिया म्हणजे अश्रूंची चव न चाखलेला..
मी आत्ता दुःखानं इतका व्याकुळ झालोय की रडल्यावर माझा जीव थोडा तरी शांत होईल पण मी इतका कमनशिबी आहे की या अश्रूंची गोडी देखील मला चाखता येत नाही; आजवर या आनंदापासूनही मी वंचित राहिलो आहे; पण आता मला रडण्याचा भरभरून आनंद घ्यायचा आहे,
प्रिये; निदान रडवण्यासाठी तरी मला भेट..
कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ..
पिन्दार-ए-मोहब्बत म्हणजे प्रेमाचा गर्व
मला माझ्या प्रेमाचा खूप अभिमान वाटतो; तो पोकळ का असेना पण माझा तो भ्रम तसाच राहूदे, माझ्या प्रेमाच्या या पोकळ अभिमानची तरी लाज राख आणि
कधी तरी तू$$$ मला मनवण्यासाठी ये (प्रत्येक वेळी मीच का यायचं?)
माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ..
मला मान्य आहे की, असलेलं प्रेम लपवणं, हा ही प्रेमाचाच एक भाग आहे पण प्रेम पूर्णपणे लपवलं, ते कधी व्यक्तच नाही केलं तर ते आहे हे तरी कसं कळणार..
कधी तरी, हळूच, ते व्यक्त करण्यासाठी मला भेट..
जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ..
जसे तुझ्याकडे मला न भेटण्याचे अनेक बहाणे आहेत; तसेच बहाणे मला भेटण्यासाठी ही कधी बनव; मला भेटण्याचं असंच एखादं कारण शोध आणि कधीच परतून न जाण्यासाठी मला भेट..
पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ..
मरासिम म्हणजे संबंध..
आता आपलं नातं पाहिल्यासारखं राहिलं नाही, मला भेटायची तुझी ईच्छाही उरली नाही; हे जरी खरं असलं तरी भेटत राहणं ही जगाची रीत आहे, जग राहाटी आहे निदान एक शिष्टाचार म्हणून तरी मला भेट..
किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ..
आपण का वेगळे झालो याची कोणा कोणाला मी काय काय कारणं सांगू ;
तूझा माझ्यावरचा राग मला मान्य आहे पण निदान या दहा तोंडानी विचारणाऱ्या जगाला "उत्तर" म्हणून तरी मला भेट गं..
~ मृणाल घोळे मापुस्कर
तिता - पार्श्वभूमी कळल्यावर
तिता - पार्श्वभूमी कळल्यावर अधिकच खोलवर जाणवतोय अर्थ! भारी!
तिता - छान निरूपण.
तिता - छान निरूपण.
सकाळी जुना सोर्स शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडला नाही. पण ही एक सुंदर वेबसाईट मिळाली. इथे गझल दिली आहे. हिंदी, इंग्रजी, उर्दू मधे वाचता येते. इंग्लीश पर्याय घेतला तर प्रत्येक शेराचा अर्थ दिला जातो. हिंदी (देवनागरी) मधे कठीण शब्दावर क्लिक केल्यावर अर्थ मिळतो.
व्हिडीओच्या सिम्बल वर क्लिक केल्यावर ही गझल गायलेल्या अनेकांचे दुवे मिळतात. एकाच ठिकाणी ही चांगली सोय आहे.
https://www.rekhta.org/ghazals/ranjish-hii-sahii-dil-hii-dukhaane-ke-liy...
फरीदा खानम आणि रफाकत अली खान यांच्या चाली समर्पक वाटतात.
रूना लैलाचं रेकॉर्डिंग सुस्पष्ट , अंदाज रोमँटीक आहे.
वाह तिता!
वाह तिता!
धन्यवाद तिता!
धन्यवाद तिता!
गेल्यावेळी एका गायकाने अजून एक शेर add केला होता
युँ तो जमाने ने मुझे बदनाम किया है
तू भी कोई इल्जाम लगाने के लिए आ...
छान लेख. ही गझल मी सर्वात
छान लेख. ही गझल मी सर्वात पहिल्यांदा दूरदर्शनवर रुना लैलाच्या आवाजात ऐकली होती. त्यामुळे तिच्या आवाजातीलच आवडते - खूप खूप आवडते. तिता यांनी दिलेल्या लेखामुळे पार्श्वभूमी अजूनच स्पष्ट झाली.
आशाजींच्या आवाजात ऐकून झालं.
आशाजींच्या आवाजात ऐकून झालं. शब्दांच्या उच्चारातून त्याचा भाव पोहोचवला आहे. या बाबतीत दोन्ही मंगेशकर भगिनींना सॅल्युट.
पण ही चाल पारंपरिक गजलेची वाटत नाही. (असा काही नियम नाही हे लक्षात आहे). वाद्यवृंद पण मिसमॅच वाटला. गजलेचं रूप बदलण्याचा प्रयत्न आहे. त्याला अनुमोदन. पण उदासीनता / व्याकुळता जाणवत नाही या चालीत. जे काही पोहोचलं ते निव्वळ आशाजींमुळे.
मेहंदी हसन यांनी गायलेली गजल ऐकायची राहिलीय. .
अभिसृष्टी (अभिनव आयडी आहे), तुम्ही ही गजल इथे दिलीत, निरूपण केलं, त्यावर माहिती पूर्ण प्रतिसाद आले. त्यामुळेच वेळ खूप सुंदर गेला. क्वालिटी टाईम वाटला. तुमच्या या धाग्यामुळं वेगवेगळ्या गायकांना ऐकता आलं.
अजून काय पाहिजे?
आभार.
धन्यवाद मनापासून
धन्यवाद मनापासून
अभिश्रुती आहे माझा आयडी!
Pages