आर्त साद ... मला कळलेली रंजिशही सही

Submitted by abhishruti on 18 June, 2025 - 12:47

एखादी गझल ऐकल्यावर ती मनाला इतकं वेड लावते हे मी माझ्या खरंतर नकळत्या किंवा अडनाडी वयात अनुभवलं. आठवीत असेन जेव्हा मी ही गझल पहिल्यांदाच मुंबईत ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवर एका नवोदित गायिकेच्या (जसपिंदर नरूला) तोंडून ऐकली. तेंव्हा किती शब्द कळले, किती अर्थ समजला अलाहिदा, पण मनात घर केलं या गझलने इतकं नक्की! कोकणात तेंव्हा टीव्ही वगैरे अजून आले नव्हते त्यामुळे त्यानंतर बरेच महिने मला ती गझल परत ऐकता नाही आली! आत्ता सारखं गुगलवर जाऊन शोधून काढून ऐकणं ही तेंव्हा कविकल्पना म्हणून सुद्धा मान्य झाली नसती. नंतर कधीतरी कळलं की गझलकार आहेत अहमद फराज आणि मूळ गायक मेहेंदी हसन!(यातील दोन शेर मूळ गझलकाराचे नाहीत पण मेहदी हसन यांनी ते गायले आहेत)
नंतर ऐन तारूण्यात कॉलेजमध्ये असताना ती गझल नीट समजून स्वतः सादर करायची संधी मिळाली, तेव्हापासून ती अजूनच जवळची झाली. शब्दनशब्द मनात जणू रूतून बसला. वय वाढत गेलं आणि जेव्हाजेव्हा नात्यातली गुंतागुंत, तळमळ, वेदना जास्तच जाणवू लागली तेव्हातेव्हा ही गझल आठवू लागली. इथे गझलकार असफल प्रेमातील असुरक्षिततेचा कसा स्वीकार करतोय, वेदनादायी असलं तरी प्रेमिकेशी असलेलं नातं त्याला कसं अमूल्य वाटतंय हे उमगू लागलं. दोघांमधलं नातं, संवाद दुःख देणारा असला तरी तिच्या अनुपस्थितीपेक्षा, दुराव्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे ही त्याची प्रामाणिक भावना, आर्त साद मनाला स्पर्शून गेली.

माझ्या शब्दात, मला कळलेली "रंजिशही सही"
(इथे काही उर्दू शब्दांचे अर्थही देत आहे)

रंजिशही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिरसे मुझे छोड के जाने के लिए आ
( रंजिश: नाखूशी, नाराजी, मतभेद)
नाराजीने, नाखुशीने आलीस .. परत एकदा मनाची दुखती रग छेडायला आलीस तरी चालेल, पण ये ग आता
परत मला एकटं सोडून/टाकून जाण्यासाठी तरी ये(अजूनपर्यंत तू मला पूर्णपणे सोडू शकली नाहीयेस, अजूनही बंध तुटले नाहीयेत), पण ये ना

१. माना की मुहोब्बत का छिपाना है मुहोब्बत
चुपकेसे किसी रोज जताने के लिए

प्रेम लपवणं हेच प्रेमाचं खरं लक्षण असेल कदाचित, म्हणून तू मनातलं प्रेम उघड करत नाहीस. पण कधीतरी गपचूप आपण दोघंच असताना ते व्यक्त करण्यासाठी ये ना

२. पहलेसे मरासिम न सही, फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ
(मरासिम: नातं/रिश्ता, आत्मीयता
रस्म-ओ-रह-ए-दुनिया: समाजाचे/जगाचे रितीरिवाज)
मान्य आहे की पहिल्यासारखं आता काही नाही राहीलं... ना आपलं प्रेमभरं नातं, ना भेटीगाठी ना सभोवतालची परिस्थिती...पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं
तरीपण एक औपचारिकता, समाजातील एक रीत पाळण्यासाठी का होईना, ये ना परत एकदा... कदाचित अजूनही लोकांना आपल्याला पूर्वीसारखं एकत्र पहायला आवडेलही!

३. किसकिसको बताएंगे जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ
(जुदाई: वेगळं होणं, अनुपस्थिती
सबब: कारणं)
कोणाकोणाला, का आणि कशाला सांगायचं काय बिनसलं आपल्यात, का आपण वेगळे झालो ते!
माझ्यावर रागावली असलीस तर निदान समाजाखातर, लोकांसमोर दिखावा करण्यासाठी तरी ये ना

४. कुछ तो पिंदार-ए-मुहोब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ
(पिन्दार-ए-मुहोब्बत : प्रेमाची प्रतिष्ठा, ईमान
भरम: विश्वास, सन्मान)

माझ्या सच्च्या प्रेमाचा काहीतरी मान राख, प्रत्येक वेळी मीच तुला मनवण्याचे प्रयत्न करतो, कधीतरी तू माझी समजूत काढायला, माझा रुसवा घालवण्यापुरती तरी ये ना

५. इक उम्र से हुँ लज्जत-ए-गिर्या से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझको रूलाने के लिए आ
(लज़्ज़त-ए-गिर्याः रडून मन मोकळं करण्याचं सुख/आनंद
महरूमः वंचित
राहत-ए-जाँः मनाला शांत करणारा, सुटका करणारा)

किती वर्षं झाली मी अश्रू ढाळणं देखील विसरून गेलोय, माझ्या संवेदना जणू गोठून गेल्यात. कदाचित ते दाबून ठेवलेलं दुःख तुला पाहिल्यावर डोळ्यावाटे वाहून तरी जाईल,निदान माझ्या मनावरचं हे ओझं उतरवून मला शांत करण्यासाठी तरी ये ना(हा शेर खरंतर आत्मा आहे या गझलचा असं मला वाटतं. इतर सर्व ठिकाणी गझलकार वेगवेगळ्या कारणासाठी ये अशी गळ घालतोय, पण इथे तो सत्य परिस्थितीचा व स्वतःचा स्वीकार करून मनःशांती मिळवू इच्छितो)

६. अब तक दिल-ए-खुश-फहम को है तुझसे उम्मीदें
ये आखिरी शम्मे भी बुझाने के लिए आ
(दिल-ए-ख़ुश-फ़हम: आशावादी मन, Misconceived optimism )

अजूनही माझं वेडं मन आशा सोडायला
तयार नाही, निदान ही आशेची शेवटची ज्योत मालवण्यासाठी तरी ये ना

७. जैसे तुम्हें आते है न आने के बहाने
ऐसेही किसी रोज़ न जाने के लिए आ

तशी तुला न येण्यासाठी बरीचं कारणं, सबबी सांगता येतात, एक दिवस असं कर की परतून न जाण्यासाठी ये ना!!

-- अभिश्रुती

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सही लिहिले आहे
पिता यांनी शेअर केलेली पोस्ट सुद्धा छान आहे.. अजून उलगडली

धन्यवाद ऋन्मेष!
अजून एक पण गझल फार आवडते...
गुलाम अलींनी गायलेली... फासले ऐसे भी होंगे, ये कभी सोचा न था

फिर कभी.... मूड बन जायेगा तो लिखुँगी

छान लिहिलंय.

>>> हा शेर खरंतर आत्मा आहे या गझलचा असं मला वाटतं.
अगदी! Happy

फक्त मेदी हसन नाव आहे त्यांचं, 'मेहेंदी' नव्हे - तेवढं बदलता का?

चांगला लेख!

रुना लैलाच्या आवाजात ही गझल प्रथम ऐकली.त्यावेळी काळा पांढरा t.v होता.त्यावेळी या गझलने केलेले गारुड अजूनही शाबूत आहे.
Tiता यांनी लिहिल्याप्रमाणे पाकिस्तानी सिनेमातील ही गाणे मेहदी हसन यांच्या आवाजात नंतर ऐकले.खूप सुंदर आहे.
त्यानंतर अशा भोसले,अनुराधा पौडवाल आणि अरिजित सिंग यांनी गायलेली ही गझल ऐकली.अशा भोसलेंचे गायन आवडले नाही.याउलट अनुराधा पौडवाल यांचे गाणे आवडले,पण त्यांचे शब्दोच्चार सदोष वाटले. अरिजितनेही चांगले म्हटले आहे.

मेहदी हसन यांची ही गझल मला दुसर्‍या क्र. वरती आवडाते. पहीला क्र - आवारगी.
तुम्ही चांगले लिहीलेले आहे.

Pages