छोटा पॅकेट बडा धमका - केदारताल ट्रेक -दुसरा आणि तिसरा दिवस

Submitted by धनश्री. on 18 June, 2025 - 04:20

या आधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/86852

ट्रेक दिवस २

भोज खरक ते केदार खरक

अंतर अंदाजे ५ किमी

ऊंची : १२,८०० फूट ते १४,२०० फूट

सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच साडेचारला जाग आली. बाहेर थोडं फटफटलं होतं. लोक उठून गर्दी करायच्या आत टॉयलेट टेंटच काम आटोपून घेतलं. जमेल तसे दात घासले आणि बाहेरच बसून राहीले.

कँप हळू हळू जागा होत होता.

WhatsApp Image 2025-05-31 at 7.06.08 AM.jpeg

( हा पहाटे सव्वा पाचचा फोटो आहे )

ह्या मुक्कामात खूप वेळा चढ उतार करावा लागला कारण सपाट अशी जागाच नव्हती.

काल गंगोत्रीहून निघाल्यापासून पहील्यांदाच अशी एवढी सलग जागा दिसली. इथून पुढे थोड्या चढावर एक पठार होतं पण तिथे कँप करत नाहीत कारण पाणी. इथेही पाण्यासाठी कालच्या पुलापर्यंत जायला लागत होतं. आम्हाला नाही, सपोर्ट स्टाफला. पोर्टर्स त्या मोडक्या पत्र्याखाली असलेल्या खोलीत झोपले.

ब्रेफाला पॅनकेक्स, पोहे आणि ओट्स होते.

आवरुन सगळे जमले.

आजपासून झाडं असणार नव्हती म्हणून सावलीही नाही. सगळीकडे कातळ, रुक्ष भाग.

आज नीलमला सगळ्यांच्या पुढे चालायचं होतं.

आज अंतर कमी असलं तरी हायलाईट होता लँडस्लाइड झोन. तो सगळ्या ग्रुपने एकत्र पार करायचा होता. त्यामुळे ती येईपर्यंत पुढे जाता येणारच नव्हतं. ती सावकाश दर १५/२० पावलांवर थांबत चालत होती. मागे काही जणांची इनडायरेक्ट कुरकुर सुरु झाली.

हे नेहमीचं आहे. प्रत्येक वेळी किमान ३/४ जण असे असतात की जे सतत घाईत असतात. आता पुढे जाऊन काय फरक पडणार होता ? थाबावं लागणार होतंच ना.

bharhal.jpg

उतारावर भरहल दिसत आहेत

सावकाश तासाभराने त्या भागात पोहोचलो. थोडा ब्रेक घेऊन सगळ्यांना गोळा केलं. हेल्मेट्स घालायला सांगितली. सुचना दिल्या.

सगळ्यांनी रांगेत चालायचं

दोन जणांमध्ये थोडी गॅप ठेवायची.

कान डोळे उघडे ठेवा.

गाईड्सच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. सुचना आल्या तर तंतोतंत पाळा.

पाणी वगैरे काय खायचं प्यायचं आहे ते आत्ताच करुन घ्या. मध्ये अजिबात म्हणजे अजिबात थांबायचं नाही. फोटो बिटो काढणं तर दुरच.

पुढचा साधारण अर्ध्या तासाचा भाग मुख्य लँड स्लाईड झोन होता. बारीक बारीक वाळू घरंगळतांना दिसत होतीच. वर ऊंचावर इथले भरहल हे प्राणी फिरत असतात., त्यांच्यामुळे दगड खाली येतात.

दगड खूप प्रमाणात येत असतील तर हा भाग सरळ ओलांडण्या ऐवजी, डावीकडे उतार उतरुन नदीकडे जायचं, ती ओलांडून मग सरळ जायचं आणि उजवीकडे पुढे पुन्हा चढ चढून मुळ रस्त्यावर यावं लागतं.

आज तशी गरज दिसत नव्हती.

चालायला सुरुवात केली. हा भाग नक्की कसे चाललो, काय केलं हे कोणालाच धड आठवत नाही कारण विचार करण्याएवढा वेळच नव्हता. रस्ताही सरळ नव्हता. चढ, उतार, मोठा चढ, वेडावाकडा, सरळ उभा असे सगळे प्रकार होते.

पायाशी सुटे दगड. एरवी अश्या दगडांवरुन चालतांना आपण अंदाज घेत चालतो. इथे तो प्रश्नच नव्हता. फक्त चालायचं.

मान खाली घालून पुढच्याला फॉलो करत, पण अंतर ठेऊन. आत्ता लिहीतांना लक्षात येतंय की संपूर्ण प्रवासात सरळ, समोर बघून फार कमी वेळा चालले असेन. आम्ही सगळेच. खाली मान घालून चालण्याशिवाय पर्यायच नव्हता.

रस्त्यात मध्येच एक मोठा कातळ आला. रस्ता पूर्ण अडवून.

माझ्या पुढे मोक्षीत, त्याच्या पुढे नमिता होते, त्या दोघांनी त्या कातळाला धरुन, उतारावर एक पाऊल टाकून तो पार केला. मी ही तेच केलं असतं पण मोक्षीतला पुढे जाऊ द्यायला अर्धा सेकंद थांबले आणि माझा चालण्याचा रिदम तुटला आणि आता हा कसा ओलांडू असा गोंधळ निर्माण झाला. उतारावरुन जायची हिंमत नव्हती कारण पाय घसरला तर संपलंच. थांबून विचार करण्याइतका वेळ नव्हता. मग सरळ वॉकींग स्टिक वर ठेवली आणि कातळावर हात टेकून, हातांवर पूर्ण शरीर उचललं, एक पाऊल वर टेकवुन पलीकडे उतरले. आणि गेलं वर्षभर पहाटे लवकर उठून जीम मध्ये जाऊन गाळलेल्या घामाचं सार्थक झालं. कातळ माझ्या छातीएवढ्या ऊंचीवर होता पण तो इतक्या सहजपणे पार करता आला. अगदी असंच बाली पासलाही नामा रिज ओलांडतांना झालं होतं. फक्त तेव्हाचा दगड जेमतेम गुडघ्यांपर्यंत येणारा असल्याने ते आजपेक्षा फारच सोपं वाटलं.

माझ्यामागे असण्यार्‍या उरलेल्या सोळाही जणांना तो वर चढून पार करता आला नाही. मी काही फार ग्रेट वगैरे केलं नाही, उलट कठीण मार्ग निवडला, पण जमलं.

असेच अर्धा तास चालून पलीकडे पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. परत जातांनाही हे दिव्य पार पाडायचं आहे पण ते तेव्हा बघू. रोज सकाळी आम्हाला एक बिस्कीटाचा एक छोटा पॅक, एक चॉकलेट, ज्यूसचा टेट्रा पॅक देत. पोटात भुकेने म्हणा, हुश्श झाल्याने म्हणा खड्डा पडला होता त्यामुळे त्यातलं पारले जी मी पहील्यांदा एका बैठकीत फस्त केलं.

साधारण असा रस्ता होता. फारसे फोटो कोणाकडे नाहीयेत.

landsliding.jpg

आणि

tough climb.jpg

आणि

IMG_2671.jpg

अजून कँपसाईट यायची होती.

ह्या सगळ्यात आमचे पोर्टर्स मात्र किलो किलो सामान घेऊन येत होते.

WhatsApp Image 2025-06-15 at 10.41.13 AM.jpeg

इथून पुढचा उरलेला रस्ता मात्र कठीण होता. संपता संपत नव्हता. प्रत्येक वळणावर वाटे, आता दिसेल मोकळी जागा, पण ते वळण येतच नव्हतं.

tought climb 2.jpg

डावीकडे थलायसागर डोकावतो आहे

शेवटी अजून दिड तास चालून एकदाचं एक मोकळं पठार दिसलं आणि जीवात जीव आला.

campsite.jpg

तिथे अक्षरशः पसरलो.

मग सुरु झालं टेंट लावणं. सृष्टी आणि मी, आमचा टेंट लावला. त्यात सेटमध्ये मोठ्ठे खिळे असतात, ते दोरीत अडकवून जमिनीत पक्के करायचे, त्या जीवावर टेंट जागेवर राहतो. आमच्या सेटमध्ये एकच खिळा होता. आम्हाला मदत करणारा म्हणाला, थांबा मी बघतो. तो गेला, आम्हीही स्लिपींग बॅग्ज, मॅट्स आणायला गेलो.

जोरदार वारा सुटलेला होता आणि दोनच मिनीटात आमचा टेंट उडून गेला. गेला म्हणजे तब्बल अर्धा वगैरे किमी उडत होता. मध्ये असलेल्या टेंट्सवरुन उडत चालला आणि त्याच्यामागे तिथली तमाम जनता धावत होती. शेवटी कसंबसं त्याला पकडलं, त्यात तीन चार दगड ठेवले आणि आम्हाला दुसरा टेंट दिला. गंमत म्हणजे तो ही उडाला, पण पटकन पकडला गेला.

फायनली सामान सेट करुन, कपडे बदलून मी जरा पाठ टेकली. आज शरीराबरोबर मनावरही ताण पडल्याचं जाणवत होतं.

Screenshot 2025-06-15 111414.jpg

टेंट्स लागले. खाली भोज खरकला जागेची जेवढी टंचाई होती, तेवढं इकडे, होल वावर इज आवर असं दृष्य होतं.

ह्या ट्रेकला मोठ्या ट्रेकींग कंपन्या आपापसात तारखा अ‍ॅडजेस्ट करुन घेतात कारण अरुंद रस्ते असल्याने गर्दी होऊन चालत नाही, शिवाय मुक्काम करायला तेवढी जागाही नाही.

दोन वाजले होते, जेवण अजून तयार होत होतं. आज फार उशीर झाला. जेवणात दाल चावल खाऊन जरा आराम केला.

जेवणानंतर सृष्टीला अस्वस्थ वाटायला लागलं. मी परत जाते, मला इकडे नाही थांबायचं असं म्हणायला लागली. मी सुधांशूला बोलावून आणलं. त्याने तिचा ऑक्सीजन वगैरे पाहीला आणि तिला आराम करायला सांगितला पण टेंटमध्ये झोपायला मनाई केली.

संध्याकाळी सुधांशूने पुन्हा चायनीज व्हिस्पर, फायर इन द माऊंटन असे खेळ घेतले. मजा आली, वेळही गेला. मग नेहमीची तपासणी. माझा ऑक्सीजन ९४ आणि पल्स ८९. आज १०० खाली मीच एकटी होते.

त्यानंतर उद्याचं ब्रिफींग. उद्याचा दिवस महत्त्वाचा.

उद्या सकाळी साडेसातला निघायचं होतं. उद्याचाही कँप इथेच असल्याने आवराआवरी करण्याची गरज नव्हती.

उद्या फ्लिसही घाला आणि पायात जाडसर पँट.

माझ्याकडची ट्रेंकींग पँट जाड वगैरे नाहीये त्यामुळे थर्मल घालायला सांगितली. चालतांना थर्मल घालून चालण्याने नंतर नंतर वाट लागते ह्याचा अनुभव बाली पासच्या वेळेस घेतला होता म्हणून आतून थर्मल घालण्यात मी जरा साशंक होते. गरज पडली तर आणि जर उकडलं तर उपर बहोत बडे पत्थर है, कोई प्रोब्लेम नही आयेगा असंही म्हणाला.

उद्याचा कट ऑफ वेळ होता ११. अकरा वाजता जो जिथे असेल तो तिथून परत फिरेल असंही सांगितलं

उद्याही पॅक्ड लंच. आज जेवणात चायनीज होतं आणि गोडात कस्टर्ड.

मोकळी जागा भरपूर असल्याने जरा वेळ फेर्‍या मारून, गरम पाणी घेऊन झोपायला गेले.

एव्हाना सृष्टीला बरं वाटू लागलं होतं. तिला, रात्री गरज पडली तर हाक मार सांगून झोपले.

झोप तुकड्यांमध्ये लागली पण सकाळी बरंच फ्रेश वाटत होतं.IMG_2680.jpg

Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यांचे आभार.
तुम्ही एकदम पट्टीच्या ट्रेकर दिसताय <<>>> पट्टीची ट्रेकर कसली !!! प्रयत्न करते एवढंच. ट्रेकींग मला मनापासून आवडतं.

पुढचा भाग - https://www.maayboli.com/node/86859

शेवटचे दोन फोटो अप्रतिम आले आहेत. अजून मुक्कामी पोहचायचं आहे पण ते दोन फोटो बघताना "तुमची मेहनत वसूल" असं वाटलं.