दरवर्षी एप्रिल महीना आला की आंब्यांचे वेध लागतात, मे अखेरीस पावसाचे, ऑगस्टमध्ये गणपती तसे डिसेंबर, जानेवारी आला की आम्हाला ट्रेकचे वेध लागतात. ( निबंधाची सुरुवात वाटते आहे ना ? )
तसेच ह्याही वर्षी, कुठे जायचं ? हा विचार सुरु झाला.
माझ्या मनात दोन जागा होत्या, पण त्यातल्या एकाची एकच बॅच होती, जी कोणास ठाऊक कधी फुल झाली होती आणि दुसर्याची तारीख जमेल असं वाटत नव्हतं.
मग माझ्या लिस्टमध्ये असलेले ट्रेक्स, त्याच्या उपलब्ध तारखा, त्यातल्या मला जमू शकतील अश्या तारखा ह्या सगळ्यांचा लसावि, मसावि काढून केदारताल नक्की केला.
केदारताल हा हिमालयाच्या गढवाल भागात आहे. हा ट्रेक गंगोत्रीहून सुरु होतो. ( आणि संपतोही तिथेच ). हा तलाव केदारगंगा नदीचे उगमस्थान आहे, जी भागिरथी नदीची मुख्य उपनदी आहे. भागिरथी पुढे गंगेला जाऊन मिळते. ही भागिरथी गौमुख येथे उगम पावते. गौमुख तपोवन हाही गंगोत्रीहून सुरु होणारा ट्रेक आहे.
साधारण मे च्या मध्यावर ट्रेकींग सिझन सुरु होतो तो सप्टेंबरपर्यंत चालतो. आताशी वर्षभर लहानसहान ट्रेक्स सुरुच असतात पण मुख्य ट्रेक्स ह्या दरम्यान असतात.
प्रत्येक ट्रेक, त्याभागातलं हवामानावर अवलंबून असतो, जसे की केदारतालच्या चारच तारखा आहेत. मे मध्ये एक बॅच, जूनमध्ये एक आणि मग डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये दोन.
त्यातली मे ची बॅच जमणारी होती. जूनमध्ये पावसाची शक्यता आणि ऑक्टोबर मध्ये जमेल की नाही ह्याची कल्पना नसल्याने मे ची बॅच फायनल केली.
महेश ने ( नवरा ) हा ट्रेक मागच्या वर्षी केलाय आणि केदार ( लेक ) नुकताच नविन नोकरीत जॉइन झाल्याने ते दोघेही येणार नव्हते. जुन्या ट्रेकींग ग्रुपमध्ये विचारलं तर ५ जण तयार झाले, पण नंतर ते सगळे वेगवेगळ्या कारणाने गळले. आणि मी एकटीच उरले
तरी अजून बुकींग करावं असं वाटेना. एप्रिलच्या पहील्या आठवड्यात सहज बघितलं तर मे बॅचमधल्या फक्त ७ जागा शिल्लक होत्या. मग जागं होऊन बुकींग करुन टाकलं. कधी कधी मोठा ग्रुप येतो आणि ब्लॉक बुकींग होतं
मग फ्लाईट्सx बघितल्या. पुण्याहून देहराडूनला जायला यायला अगदी सोयीस्कर फ्लाईट्स आहेत. फक्त येतांना मी शनिवारी येणार होते. शनिवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पुण्याचा एअरपोर्ट सिव्हिल विमानांसाठी बंद असतो त्यामुळे त्यादिवशीसाठी जरा खटपट करावी लागली. देहराडूनहून मुंबईला जाऊन कॅबने यावं की वंदे भारत पकडून दिल्लीला जाऊन विमानाने यावं इथपर्यंत सगळे पर्याय बघितले. शोधाशोध केल्यावर दुपारी १ ची दिल्ली आणि तिथून मग सहा वाजताची पुणे फ्लाईट बुक केली. प्रवासात पूर्ण दिवस जाणार होता पण इलाज नव्हता.
मग राहीली हॉटेल्स. ह्याआधी तिकडून चार वेळा ट्रेक्स केल्याने जातांनाचं आणि येतांनाचं हॉटेल फिक्स आहे. त्याचीही बुकींग्ज यथावकाश करुन टाकली.
आता तयारी. हा ट्रेक मी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या ट्रेक्समध्ये कमी ऊंचीचा होता. पण तरी तो डिफीकल्ट कॅटेगरीततला होता म्हणून हलक्यात घेऊन चालणार नव्हतं. अर्थात हिमालयातला कोणताच ट्रेक, चला करुन येऊ किंवा इतके वेळा गेलो आहोत तर नो प्रॉब्लेम असं करुन चालत नाही. तिथली चॅलेंजेस वेगळी असतात.
ह्यावेळी मी माझ्या नेहमीच्या रुटीनवर भिस्त ठेवली. ३ दिवस रनिंग, ३ दिवस जीम. ते मात्र अगदी नियमीत सुरु ठेवलं. ३/४ वेळा सिंहगडावर जाऊन आले.
शेवटी खरेदी. नव्याने घेण्यासारखं काहीच नव्हतं. फक्त रेनकोट घ्यावा का हा विचार करत होते. पाँचो घालून उतरणं थोडं त्रासदायक होतं . तो पायघोळ असतो, पायात येतो. डिकेथलॉनमध्ये चक्कर मारली पण एप्रिलमध्ये रेनकोट कुठले दिसायला ! ऑनलाईन होते पण हो ना करता करता नाहीच घेतला.
शुज मात्र पुढल्या वेळी घ्यायला हवेत.
जायचा दिवस आला.
ह्यावेळी मी सामानाचा फाफटपसारा शक्य तितका कमी ठेवला होता. तरी गरजेच्या वस्तू न्याव्याच लागतात. खायला ड्रायफ्रुट्सना काट मारुन, ( फक्त थोडे काजू आणि मनुका घेतल्या, त्या मला आवडतात म्हणून ) योगाबार घेतले आणि लाँग रन्सना मी खाते त्या जेल्स घेतल्या.
कपडेही मोजकेच घेतले. चारच दिवसांचा ट्रेक होता तर एकच जोड घ्यावा असा विचार करत होते पण नंतर अजून एक जोड ठेवला. आणि नंतर बरं झालं तो ठेवला असं झालं.
निघायच्या आठवडाभर आधी पासून वेदर अॅपवर गंगोत्रीचं हवामान बघत होते. तिकडे पाऊस नव्हता. पुण्यात मात्र बर्यापैकी सुरु होता. मग जायचा दिवस जवळ आला तसे तिकडे ढग दिसायला लागले. पाऊस मला नको होता. थंडी वाढते आणि चालणंही कठीण होत जातं.
तिकडे रात्री टेम्परेचर शुन्य किंवा खालीही दिसत होतं. म्हणजे वर वर जाऊ तसं अजून थंड होणार.
जायच्या आधी फिटनेस सर्टीफिकेट घ्यायला डॉक्टरांकडे गेले तेव्हा मला बघूनच त्यांनी, आता कुठे दौरा असं विचारलं. त्यांनाही सवय झालीये.
निघाले तेव्हाही पुण्यात पाऊस होताच. संध्याकाळी साडेपाच वाजता देहराडूनला उतरले तेव्हा छान ऊन होतं. प्रिपेड टॅक्सीचा काऊंटर आता आत बॅगेज बेल्टजवळ शिफ्ट झालाय. सॅक घेतली आणि टॅक्सी बुक केली. बाहेर जाऊन त्यांच्या माणसाकडे रिसीट दिली, त्याने टॅक्सीवाल्याला बोलावले, टॅक्सीजवळ पोहोचले आणि अचानक वाटलं, आपण आपलीच सॅक घेतली ना ? बेल्टवर इतरही सॅक्स दिसल्या होत्या. मी माझ्या सॅकला खुण लाऊन ठेवली आहे, तरी एक कप्पा उघडून चेक केलं आणि निघालो.
हॉटेलवर पोहोचले. हे हॉटेल आमच्या पिक अप पॉइंटच्या,प्रिन्स चौकाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे कितीही लवकरचा पिक अप असला तरी जाता येतं.
दरवेळी ट्रेकच्या आधी एक एक्सेल शीट शेअर केली जाते, ज्यात काही माहिती भरुन द्यायची असते शिवाय त्यातून येणार्या लोकांचा साधारण वयोगट काय आहे , बायका आहेत का, ह्याचा अंदाज येतो .ह्यावेळी सगळं ऑनलाईन वेबसाईटवर लॉग इन करुन शेअर करायचं होतं. नाही म्हणायला एकीने फिटनेस सर्टीफिकीट ग्रुपवरच शेअर केल्याने एक तरी बाई आहे एवढं कळलं होतं. महेश गेला होता त्या बॅचमध्ये सगळे चौदाच्या चौदा पुरुषच होते. अर्थात तसं झालं असतं तरी टेंटमध्ये एकटीने राहण्याची किंवा पुरुषाबरोबर शेअर करण्याची माझी तयारी होतीच. प्रत्येक वेळी थोडच कोणी सोबत मिळणार.
दुसर्या दिवशी शनिवारी सकाळी सहाचा पिक अप होता. देहराडूनहुन गंगोत्रीला जायचं होतं.
ह्याआधी बालीपास करतांना प्रिन्स चौकात गेले होते तेव्हा तिथे फक्त आमचीच बस होती. कारण तो ऑक्टोबर महीना होता, बहुतेक सगळे ट्रेक्स संपले होते आणि एकच बस, काही थोडे लोक हेच चित्र डोक्यात होतं.
ह्यावेळी पोहोचले तर तिथे जत्राच भरलेली. चार मोठ्या बसेस, चार पाच बोलेरो आणि अनेक लोक. मला आधी कळेचना हे काय चाल्लय ते. तिथे गेले. रँडमली दोघांना विचारलं केदारताल का ? ते म्हणाले हर की दुन. आणि मग डोक्यात प्रकाश पडला.
देहराडूनहून गंगोत्रीच्या बाजूला केदारताल, गौमुख तपोवन हे दोन आणि सांकरी साईडला हर की दुन आणि बाली पास हे दोन ट्रेक्स जातात. ही सगळी गर्दी ह्या चारही ट्रेक्सची होती.
पलीकडे एक माणूस हातात कागद घेऊन फिरत होता, त्याच्याकडे जाऊन सांगितलं केदारताल. त्याने अजून एकाकडे पाठवलं. त्याच्याकडे असलेल्या लिस्टमधल्या माझ्या नावावर खूण करुन त्याने, इस बस के पिछे रख दिजीये आपका सामान असं सांगितलं. तिथे काही सॅक्स होत्या. मग बसमध्ये जाऊन एका सीटवर छोटी बॅग ठेवली.
बाहेर येऊन निरीक्षण करत उभी राहीले. लोक इकडे तिकडे फिरत आपापला ग्रुप शोधत होते. जुने ओळखीचे कोणी भेटल्यावर चौकशी करत होते. मधल्या काळात काय केलं, म्हणजे कोणते ट्रेक्स केले ह्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. एक चहलपहल होती. लोकांच्या एकूण हालचालींवरुन ते कोणत्या ट्रेकला जात असतील ह्याचा अंदाज करायला मजा येत होती. तिथे उभी असतांना काही चेहरे दिसले जे काल माझ्याच फ्लाईटमध्ये होते. त्यांनी मला ओळखलं की नाही कोणास ठाऊक !
जरा वेळात ड्रायव्हर आला आणि टपावर चढला. खालून त्याला आमच्या सॅक्स द्यायच्या होत्या. सॅक दिली, ती त्याने नीट ठेवली ते बघितलं आणि मग बसमध्ये जाऊन बसले.
सगळे लोक जमले. ड्रायव्हर आणि को ऑर्डीनेटरने चार चार वेळा केदारताल जा रहे हो ना ? असं सगळ्यांना विचारून सात वाजता बस निघाली.
देहराडूनहुन मसुरीकडे जाणारा रस्ता मला फार आवडतो. शहरीच भाग आहे पण सकाळी सकाळी खूप छान दिसतो. आज आम्ही मसुरी बायपास करणार होतो.
बस मसुरी बायपासला लागणार इतक्यात ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर असलेली मुलगी अचानक तिच्या शेजारी बसलेल्याला काहीतरी विचारु लागली आणि ड्रायव्हरला थांबा थांबा म्हणायला लागली. झालं असं की सॅक बसच्यामागे ठेऊन ती पाणी आणायला गेली आणि येऊन बसमध्ये बसली. आपली सॅक आपण वर चढवायला द्यायची असते हे तिच्या गावीही नव्हतं. तिला वाटलं की ड्रायव्हर स्वतःहून ठेवतो. मग निदान ठेवली की नाही हे तरी बघावं ! तिची सॅक तिकडेच राहिली. मग ड्रायव्हरने फोन केला. नशिबाने तिकडे अजून लोक होते आणि आमच्या रुटवर येणारी एक आर्टीगा अजून निघत होती. त्यांनी ती घेतली आणि ह्या फोनाफोनीत १५/२० मिनीटे जाऊन आम्ही निघालो.
पुढे ब्रेकफास्टला थांबलो तिथे तिला ती मिळाली. तोवर ती मुलगी अगदी निवांत होती. मी तिच्याजागी असते असते तर तोवर डोकं कामातून गेलं असतं.हे सगळं होतांना मला सारखा संशय येऊ लागला की मी वर चढवायला दिली ती माझीच सॅक होती ना ! आता बघता येण्याचीही शक्यता नव्हती.
ब्रेकफास्टच्या वेळी इतरांशी ज्या काही थोड्या गप्पा झाल्या त्यात बाकीच्या लोकांनाही असाच संशय येतोय हे ऐकून तेवढंच बरं वाटलं.
रस्ता पूर्ण वळणावळणांचा आहे. पण खूप छान आहे. म्हणजे बाहेर बघत रहावं अशी हिरवीगार दृष्यं आणि रस्ता नीट मेन्टेन केलेला आहे. संपूर्ण २४० किमीच्या रस्त्यावर फक्त एक टोल आहे. तरीही रस्ता इतका मख्खन म्हणावा असा आहे.
गुगल मॅपच्या हिशोबाने ८ तास लागणार होते. शिवाय जेवणखाण धरुन ९/९.३० म्हणजे उशीरात उशीरा पाच साडेपाच पर्यंत पोहोचलो असतो.
सध्या त्या भागात चारधाम यात्रा सुरु आहे आणि गंगोत्री हे तर महत्त्वाचं ठिकाण.
तिकडे लहान लहान गाड्यांबरोबरच मोठमोठ्या टुरीस्ट बसेस भरुन भाविक येतात. रस्ते खूप अरुंद. काही ठिकाणी जेमतेम एक गाडी एकावेळी जाईल एवढे. मग दोन्ही बाजूने वाहतुक थांबवून एक एक बाजू सोडतात.
त्यामुळे उत्तरकाशीपासून ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली. तिथेच पाऊण एक तास थांबवलं. पुढे एका ठिकाणी अजून तासभर आणि मग १० मिनीटे, १५ मिनीटे असे थांबत थांबत पाच ऐवजी रात्री आठ वाजता गंगोत्रीला पोहोचलो. १३ तास लागले.
अगदी उतरता उतरता जॅकेट अडकवून घेतलं. हवेत मस्त गारवा होता.
बस गंगोत्रीच्या बर्यापैकी बाहेर थांबवतात. ड्रायव्हरने पोलीसांना सांगितलं की आत टुरीस्ट नाही, ट्रेकर्स आहेत तेव्हा बस थोडी अजून पुढे नेता आली. आणि शेवटी उतरलो. देवस्थानात असतं तसं वातावरण होतं. दुतर्फा फोटो, जपमाळा, प्रसाद आणि मुख्य म्हणजे भागिरथीचं पाणी भरुन घ्यायला अगदी अंगठ्याएवढ्या आकाराचे ते पाच पाच लिटर एवढे मोठे कॅन्स, बाटल्या विकणारी दुकाने. ते बघत, थबकत थबकत चालणारे घोळके. मध्येच जिलबी, गुलाबजाम, पॅटीस विकणारी टिचकीभर हॉटेल्स, आणि रात्रीपुरता मुक्काम करता येईल इथपासून ते रिव्हर व्ह्यू वगैरे नावाची हॉटेल्स.
इथून १० वगैरे मिनीटे चालत गेस्ट हाऊसवर पोहोचलो. मंदीराच्या पलीकडच्या काठाला. मध्ये दोन्ही बाजू जोडणारा छोटासा पूल.
गेस्ट हाऊस छानच होतं. नविन होतं. टेंट तुम्ही कोणाबरोबरही शेअर करा. गेस्ट हाऊस मध्ये मुली आणि पुरुष अशी विभागणी होते. ट्रिपल/ चार शेअरींग अश्या खोल्या असतात. आम्हाला ट्रिपल शेअरींग खोली मिळाली त्यात ती सॅक विसरलेली मुलगी सृष्टी आणि बँगलोर गँगमधली नमिता माझ्या बरोबर होत्या.
जेवणात पनीर, दाल, पोळ्या भात आणि खीर होती.
जेवण झाल्यावर देहराडूनला राहणार्या कुसुम आणि नीलमबरोबर मंदीरात जाऊन आले. मंदिर बंद व्हायची वेळ झाली होती म्हणून अजिबात गर्दी नव्हती. गाभार्यात उभे राहून छान दर्शन झाले. एरवी गर्दीत एखादा सेकंद जेमतेम मिळतो. त्यात मुर्ती कुठे आहे हे शोधेपर्यंत बाहेर पडावं लागतं
रात्री झोप मात्र लागली नाही. थंडी होती आणि गाद्यांवरचं ( गाद्या कसल्या मॅट्रेस ) प्लॅस्टिकही काढलेलं नसल्याने अंगाखाली काहीतरी विचित्रच जाणवत होतं.
उद्याही मुक्काम इथेच.
गंगोत्री १०,२०० फुटांवर आहे. अॅक्लमटायजेशन म्हणून इथे एक मुक्काम असतो. त्यामुळे घाई काही नव्हती.
दुसरा दिवस - गंगोत्री.
सकाळी ७ वाजता चहा ब्रेकफास्ट आणि ८.३० ला ब्रिफींग होतं.
लवकर, नेहमीच्या वेळेला जाग आली. जरावेळ पडून राहीले आणि मग आटोपून बाहेर येऊन बसले.
ब्रेफाला उपमा आणि इडली चटणी सांबार होतं.
ब्रिफींगच्या आधी आमची फिटनेस सर्टीफिकेट्स, सेल्फ डिक्लरेशन, फोटो वगैरे गोळा केले. आत्ताही सॅक विसरणार्या सृष्टीला लक्षात आलं की तिने मेडीकल आणि सेल्फ डिक्लरेशन, फोटो काहीच आणलं नाहीये. सॉफ्ट कॉपी आधी दिलेल्या होत्या पण हार्ड कॉपीज आणायच्या होत्या. खरं तर ग्रुपवर चार पाच दिवस आधीपासून ह्याबद्दलचे मेसेज येत होते. आमचा ट्रेक लिडर सुधांशू जरा वैतागला. मग प्रिंट काढायची सोय करुया म्हणाला.
आधी सगळ्यांची ओळख. नावं, कुठून आलेत, कोणकोणते ट्रेक्स केलेत वगैरे विचारुन झाल्यावर त्याने ट्रेकची साधारण माहिती दिली. काय करायचं, काय नाही हे सांगितलं.
एव्हाना हवा ढगाळ झाली होती. गारवा प्रचंड वाढला होता. एकाच जागी बराच वेळ बसल्याने हुडहुडी भरली होती. वेदर अॅपवर आज पाऊस दिसत होता. वरती काय असेल ह्याचा काहीच अंदाज नव्हता. खाली पाऊस तर वरही असणारच.
बोलणं झाल्यावर आम्हाला दोन ज्युनिअर गाईड्सबरोबर जवळची सूर्य कुंड, गौरी कुंड अश्या जागा बघायला पाठवलं. तिथून आल्यावर मग जिथे हवं तिथे जा, पण सांगून जा आणि जेवणाच्या वेळेला हजर रहा असं सांगितलं.
परत येईपर्यंत थेंब थेंब पडायला लागलेच. गारवाही वाढला. जेवायला वेळ होता. खोलीत येऊन जरा पडले ते गाढ झोपच लागली. जेमतेम २० मिनीटं पण बरं वाटलं
जेवणात कढी चावल. जेवण तळमजल्यावर खोल्यांच्या बाहेर पॅसेजमध्ये होतं. खूप थंडी होती त्यात गरमागरम कढी चावल खायला बरं वाटत होतं.
पलीकडच्या काठाला दर्शनासाठी मोठ्ठीच्या मोठी रांग लागली होती. लोक भागिरथीत आंघोळ करत होते. लाईफ गार्ड्स ओरडून ओरडून सांगत होते, पाण्यात जास्त उतरु नका तरी लोकांची धक्काबुक्की सुरुच होती. तिकडे पाण्याला कसला जबरदस्त फोर्स आहे. जरा पाय घसरला तर झालंच.
जेवण झाल्यावर सामान जरा आवरलं. सॅक पॅक करतांना नीटच भरली होती तरी उगाच थोडं सामान इकडे तिकडे केलं
मी सामान अॅडजेस्ट करत असतांना ( सॅक विसरणार्या ) सॄष्टीला आठवलं की तिनी रेनकोट आणलाच नाहीये. मग ताडकन उठून ती लोकल मार्केटमध्ये गेली. ही तिची पहिली फेरी. मग दिवसभर रेनकोट, थर्मास, नी कॅप ( मी पण नेली नव्हती, नको आणूस सांगूनही ती ऐकेना ), तिची जुजबी औषधं, आणि मुख्य म्हणजे डबा अश्या अनेक गोष्टी आणायला तिनी अनेक फेर्या केल्या. काय काय आणायचं ह्याची यादी खूप आधी दिली होती, शिवाय ग्रुपवर पोस्ट केली होती, तिनी बरेच लहान लहान ट्रेक्स केले होते तरी बॅग भरतांना काय केलं कोणास ठाऊक.
शिवाय ती नक्की कोणत्या ट्रेकला जाते आहे हे घरी सांगितलं नव्हतं. ' गंगोत्री ' एवढंच सांगून आली होती. हा एवढा कठीण ट्रेक आहे, सांगायला नको का तर म्हणाली की घर मै पता चलता तो बंद करके रखते !! वाईट वाटलं पण पुढल्या वेळी कोणालातरी सांगून ये, एखादा मित्र/मैत्रीण, नात्यात कोणीतरी. कोणालातरी माहिती हवी ना !
दुपारी झोप काढायचा प्रयत्न केला. चहा झाल्यावर बँगलोर ग्रुपबरोबर आमच्या गेस्टहाऊसच्या मागे, जरा ऊंचावर असलेल्या राधा कृष्णाच्या देवळात गेले. इतकं सुरेख देऊळ होतं. ही तिन मुले ( २मुलं, तिसरी नमिता ) केदारपेक्षा ४/५ वर्षंचं मोठी होती. बहुतेक सगळेच ह्या वयोगटातले होते. फक्त देहराडूनहुन आलेल्या दोघी मैत्रीणी, आणि अजून दोन जण साधारण माझ्याच वयाचे होते.
ग्रुपमध्ये एकूण १९ जण होतो. त्यातल्या बहुतेक सगळ्यांशीच मस्त ओळखी झाल्या. चेन्नईहून तिन मित्र आले होते, ते मात्र फारसे कोणात मिसळले नाहीत. एक तर त्यांना हिंदी धड येत नव्हती., आणि ओळखी करुन घेण्याची फार हौसही दिसली नाही.
पुन्हा एकदा गंगेच्या देवळात जाऊन आले.
गंगोत्रीला संध्याकाळी आधी काठावर भागिरथीची आरती होते आणि मग मंदिरात गंगेची. आरत्यांच्या वेळा लक्षात ठेवण्यात माझी गडबड झाली त्यामुळे भागिरथीची आरती चुकली. फार चुकचुकल्यासारखं वाटलं पण परत येतांना एक संध्याकाळ परत इथे असणार होती तेव्हा जाता आलं असतं.
मला पल्स ह्या गोळ्या चालतांना चघळायला फार आवडतात. त्या घेतल्या होत्या पण उत्तरकाशीच्या ट्रॅफिक जॅममध्ये बसमधून उतरले तेव्हा तिथे रस्त्याच्या कडेला काम करणार्या लोकांची मुलं खेळत होती, त्यांना वाटून टाकल्या. त्या घ्याच्या म्हणून मार्केटमध्ये चक्कर मारली तर नाहीच मिळाल्या.
परत आल्यावर जेवण. जेवणात आलू मटर, दाल, पोळ्या भात आणि गाजराचा हलवा होता.
मग आम्हाला हेल्मेट्स वाटली आणि लायनर्स ( किंवा वॉर्मर्स ). ते स्लिपिंग बॅगच्या आत घालायचे असतात. मऊ उबदार कापडाचे असतात. ते खरं तर कँपसाईटवर वाटतात आणि दुसर्या दिवशी सकाळी परत द्यायची. पण इथे सामान पोर्टर्स बरोबर जाणार असल्याने ती आधीच देऊन टाकली.
ह्या ट्रेकसाठी घोडे/ म्यूल्स नेत नाहीत. रस्ते खूप अरुंद आहेत आणि लँड स्लायडींग झोन आहे म्हणून.
सगळं सामान बहुतांशी नेपाळहून आलेले पोर्टर्स वाहून नेतात. त्यामुळे ऑफलोडींग चार्जेस इतर ट्रेक्सपेक्षा जास्त आहेत.
मला स्पाँडिलोसीस असल्याने मानेवर ताण येईल असं काहीही करता येत नाही, अगदी प्लँक्स सारखे व्यायामही एक मिनीटापेक्षा जास्त करता येत नाही त्यामुळे मी मोठी सॅक नेहमी ऑफलोडींगला देते.
उद्या सहा वाजता चहा, सातला ब्रेफा आणि आठ वाजता निघायचं.
रात्री पुन्हा थंडीचा जोर वाढला पण आकाश मोकळं होतं. नशिबाने पावसाचं चिन्ह नव्हतं .
रात्री दहा वाजायला आले तरी सृष्टीचा पत्ता नव्हता. काहीतरी आणायला ती परत मार्केटमध्ये गेली होती. शेवटी ग्रुपमधून तिचा नंबर शोधला आणि फोन केला. मॅडम परत आल्या पण आल्या आल्या लक्षात आलं की कोणत्यातरी दुकानात चष्मा विसरली आहे, पुन्हा गेली. ट्रेकला निघेपर्यंत तिने डबा, थर्मास, रेनकोट, नी कॅप, जुजबी औषधं आणि कोणास ठाऊक काय काय विकत घेतलं !
झोप लागेना तेव्हा उठून सॅकमध्ये नीट बसवलेला वॉर्मर काढला, रजईच्या आत घेऊन झोपले तेव्हा कुठे मस्त, शांत झोप लागली. आणि ते गरजेचं होतं. उद्यापासून सलग, शांत झोप येण्याची शक्यता कमी होती.
उद्यापासून ट्रेक सुरु.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ट्रेक दिवस 1
गंगोत्री ते भोज खरक
अंतर अंदाजे 9 किमी
ऊंची : १०,2०० ते १२,८०० फूट
सकाळी नेहमीच्या सवयीने लवकर जाग आली. काल आंघोळीला कोमट पाणी मिळाल्याने आज आंघोळीला दांडी मारायची असं ठरवलं होतं. पण ब्रश करतांना लक्षात आलं की चांगलं कडकडीत पाणी येतं आहे, मग दांडी मारायचा प्लॅन कॅन्सल केला.
ज्यांच्या सॅक्स ऑफलोडींगला होत्या, त्यांनी त्या साडेसहावाजता तयार ठेवायच्या होत्या. पोर्टर्स आधी निघतात म्हणून.
सगळं आटोपून, ब्रेफा करुन सगळे तयार झाले. बर्यापैकी वेळेवर आले सगळे.
ब्रेफाला बटाट्याचे पराठे आणि पोहे होते. मोठा टप्पा असल्याने आज पॅक्ड लंच होतं.
हेल्मेट घातलं आहे, ते फोटोपुरतं. आज गरज पडणार नाहीये. आज अजून दोन नविन गाईड्स आले, ते दोघे, लीड गाईड सुधांशू आणि अजून एक जरा ज्युनियर गाईड असे चार जण.
थोडं स्ट्रेचिंग करुन घेतलं.
आणि हर हर महादेव, जय गंगे, गणपती बाप्पा मोरया वगैरे म्हणून आम्ही निघालो.
हवा मस्त स्वच्छ होती. सुखद गारवा होता.
साधारण ५/१० मिनीटे चालल्यावर आम्ही पोहोचलो गंगोत्री नॅशनल पार्कच्या दारात. तिथे सगळ्यांना एकत्र करुन ड्यूटीवर असलेल्या गार्डने सुचना दिल्या.
ह्या पार्क मध्ये स्नो लेपर्डसारखे प्राणी आहेत पण ते क्वचित दिसतात. सहजपणे दिसतात ते भरल किंवा ब्ल्यू शीप्स. त्यांना मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यांना त्रास देऊ नका, कचरा करु नका, शांतता राखा, दारु सिगरेट ओढू नका, ग्रुप सोडून जाऊ नका वगैरे.
तिथून खरा ट्रेक सुरु.
महेशकडून ऐकलं होतं की चालायला सुरुवात केल्या केल्या चढ सुरु होतो तो शेवटपर्यंत आहे.
म्हणजे बघा ना. गंगोत्री आहे १०,२०० फुटांवर. आम्ही ३ दिवसात जाणार होतो १५,५०० फुटांपर्यंत. आणि ते एकूण अंतर आहे साधारण १६ किमी. म्हणजे दर किमीला साधारण ३०० फुटांची चढाई. आणि ती ही दगड, माती, खडक अश्या रस्त्यावरुन. चढ असणारच !
आणि तो तसा होता.
आधी साधारण २० मिनीटं जरा बांधलेला असावा असं वाटावं असा रस्ता होता,
ह्या संपूर्ण रस्त्याची गंमत म्हणजे फार कमी वेळा असे भाग आहेत जिथे तुम्ही दोघे, तिघे एकत्र चालू शकता. बाकी सगळीकडे एक रांग करुनच चालावे लागते. काही ठिकाणी मागच्याला पुढे जाऊ द्यायचे असेल तर डोंगराला चिकटून उभे राहील्याशिवाय पर्याय नाही.
पोर्टर्स जायचे तेव्हा तर बरेचदा डोंगर उतारावर चढून बसलो.
अगदी डबा खातांनाही आम्ही एका रांगेत बसून खाल्ला.
सुरुवातीला बरीच अरुंद पायवाट होती. डाव्या हाताला सरळ उभा टोकदार पहाड आणि उजवीकडे शंभर एक फुट सरळ दरीत खळाळत वाहणारी केदारगंगा. नजर हटी, दुर्घटना घटी ह्या वाक्याला अगदी साजेसा रस्ता. त्यात काही ठिकाणी डोंगराचा भाग पायवाटेवर आल्याने त्याखालून वाकून, गुडघे टेकून पार करावा लागला. काळजाचा ठोका जरा चुकलाच तिथे.
हा जो वरचा फोटो आहे, त्यात अगदी उजवीकडे डोंगराचा ताशीव भाग आहे आणि फोटोच्या मध्यभागी पायवाट दिसते आहे, डावीकडे दरी.
साधारण असाच रस्ता होता.
ह्या दिवसाच्या चालण्याबद्दल फार काही लिहीण्यासारखं नाहीये. आम्ही फक्त चालत होतो. सगळ्या ग्रुपचा साधारण वेग सारखाच होता. अगदी पुढच्या आणि शेवटच्या व्यक्तित २० एक मिनीटांचं अंतर होतं. अपवाद फक्त नीलमचा.
नीलम देहराडूनची होती. ती आणि तिची मैत्रीण कुसूम दोघी आल्या होत्या. कुसूमला ट्रेकींगचा बर्यापैकी अनुभव होता. लहानलहान असेल ८/९ ट्रेक्स तिनी केले होते. नीलमनी फक्त ब्रम्हताल केला होता. आधी लक्षात आलं नाही पण ती फार म्हणजे फार मागे पडली. त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला १५/२० मिनीटे थांबवून ठेवलं. आजच्या रस्त्यावर बरीच झाडं, त्यातली बरीच भूर्जपत्राची असल्याने बर्यापैकी भागात सावली होती. सावलीत थांबलं की थंडी वाजायची की मग ऊन्हात जाऊन बसायचं, मग उकडायचं की पुन्हा सावलीत सरकायचं.
थांबावं लागत असल्याने बरेच जण अस्वस्थ झाले.
चालतांनाही एखाद्या स्पर्धेत चालतो आहोत की काय असं वाटायला लागलं होतं, काही जण सतत पुढे जायच्या घाईत. थांबवलं तरी त्यांचा जीव वरखाली होईल. तासभर आधी पोहोचून काय करणार होते ?
साडेबारा वाजता डबा खाल्ला. डब्यात भेंडीची भाजी आणि पोळ्या होत्या. भाजी चविष्ट होती पण ट्रेकला डब्यात म्हणून योग्य नाही वाटली.
किती अंतर झालं आहे, काही अंदाज नव्हता. अजून किती वेळ हे गाईडला विचारायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं त्यामुळे उशीरात उशीरा चार पर्यंत तरी पोहोचूच असं मी मनाशी ठरवून टाकलं होतं.
चढ बराच असला तरी मला तो ठिकठाक वाटत होता. म्हणजे एकतर माझी तयारी चांगली झाली आहे किंवा अजून खरा चढ आलाच नाहीये !
ह्या फोटोत, कडेच्या गुलाबी फुलांच्या बाजूला दगडाखाली मीच आहे. अश्या शिळांखालून वाकून, प्रसंगी हातही टेकवून रांगत जावं लागत होतं
क्वचित असं मोकळं पठारही लागे
आजच्या चालण्याचं हायलाईट होतं स्पायडर वॉल. साधारण २/३०० मीटरची ही दगडी भिंत, तिच्यावर कोळ्याप्रमाणे चिकटून चालत पार करावी लागते.
थोडी धाकधुक होतीच.
शेवटी एक बारका चढ चढून गेल्यावर काही अंतरावर तुटके पत्रे दिसले. हाच आजचा मुक्काम, भोजखरक. एक वाजला होता. हा मुक्काम तर लवकर आलो म्हणत स्पायडर वॉलपाशी पोहोचलो आणि तळाशी एक लहानसा पुल दिसला.
गेल्यावर्षी इकडे दरड कोसळल्याने स्पायडर वॉलच्या पायाशी पुल बांधला आहे. ५/६ पावलांचाच आहे , डुगडुगता आहे. ते बघून थोडं हुश्श झालं पण थोडं वाईटही वाटलं. ती भिंत पार करता यायला हवी होती.
अर्थात वरुन घसरत खाली उतरुन, पुल ओलांडून पुन्हा वर चढून जायची कसरत होतीच.
एकावेळी एकानेच घसरत यायचं., त्याने पुल ओलांडल्याशिवाय मागच्याने यायचं नाही.
पुल ओलांडला, चढ चढला आणि ते पत्रे गायब ! इतकं दु:ख झालं. वाळवंटात मृगजळ दिसतं, इथे मला कँपसाईट दिसली होती. चार पावले पुढे जाऊन वळले आणि पुन्हा ते पत्रे दिसले.
आधी आलेले काही पोर्टर्स तिथे बसले होते. इतकं बरं वाटलं की पोहोचलो.
अगदी आधी पोहोचलेल्या तीन जणात मी होते ह्याचा ( नाही म्हणटलं तरी ) थोडी कॉलर टाईट करावी वाटली. एक वाजून चाळीस मिनीते झाली होती. निघाल्यापासून ५ तास.
पण तरी एकंदरीत ती जागा पाहता, इकडे इतके टेंट कसे बसवणार हा प्रश्न पडला. आम्ही १९ जण होतो, म्हणजे आमचेच १० टेंट. किचन, डायनिंग आणि इतर स्टाफ ह्यांचे किमान ४/५ असे १५ टेंत तिथे मावणं अशक्य होतं.
थोडी जागा होती तिथे पसरलो. जरा वेळात सगळे जमले. स्ट्रेचिंग झालं आणि टेंट लावायला सुरुवात झाली. मदतीला आलात तर आमचं काम सोपं होईल, नाही आलात तरी आम्ही करुच असं सांगितलेलं असतं. मदत करावी. त्यांचं काम खरंच सोपं आणि लवकर होतं, आपली हालचाल होते त्यामुळे एकदम थंडी भरत नाही आणि टेंट लवकर मिळतो हा बोनस. तशी मदत करायला उठले तेव्हा सृष्टी पण आली. मग आम्ही टेंट शेअर करायचा ठरवला.
ह्यावेळचे टेंट लावायला सोपे होते. तारा ओवून क्लिप्सने घट्ट करायचे. पटकन लागला.
सामान आत टाकलं. कपडे बदलले. थर्मल लगेच घालून घेतले. चार नंतर हवा पटकन बदलते, थंडी वाढते. शिवाय हालचाल कमी झाल्याने अजून जाणवते. थर्मल लगेच घातलेले चांगले.
नीलम शेवटी ३ वाजता पोहोचली. फार दमली होती.
४ वाजता चहा आणि पकोडे झाले.
सुधांशूने तिथल्या थोडक्या जागेत काही खेळ घेतले. तासभर गेला. खूप मजा आली.
मग मुलींबरोबर मी जवळचा चढ चढून थोड्या ऊंचावर जाऊन बसले. इतकी शांतता होती. गार वारा. नजर जाईल तिथवर झाडं. बरं वाटलं.
वरुन दिसणारा भोज खरक कँप
साडेसहाला पल्स आणि ऑक्सीजन चेक केला. माझा हार्ट रेट ८२ आणि ऑक्सीजन ९८ आला. ऊंचावरच्या मानाने छानच.
जेवायला आधी हॉट अॅन्ड सावर सूप होतं. जरा तिखट होतं. मग कोफ्ते, दाल आणि गोडात खीर !
थंडी वाढली होती. जमेल तितक्या जागेत अर्धा तास फेर्या मारल्या. कोमट पाणी देत होते, ते घेतलं आणि झोपायला गेले.
रात्री अजिबात म्हणजे अजिबात झोप लागली नाही किंवा लागली असेल तरी तुकड्या तुकड्यात लागली. थंडी मात्र सहन करता आली.
आज गंमत अशी झाली की भुवनेश्वरहून आलेले एक शिक्षक होते, येतांना काही भाग बसून, घसरत पार करावा लागला होता, तर त्यांची पँट मागून सीटवर फाटली. ते पाहून एक नक्की केलं की टिशर्ट एकच असला तरी चालेल, पँट नाही.
उद्या सकाळी ६.३० ला चहा, ७.३० ला ब्रेफा आणि ८ ला निघायचं.
केदारताल हा मी केलेला चौथा
केदारताल हा मी केलेला चौथा हाय आल्टीट्यूड ट्रेक. हा धागा त्याबद्दल.
स्पेस दिली तरी फोटो एकास एक जोडून येत आहेत. कारण कळत नाहीये.
मजा येतेय वाचायला. पुढचा भाग
मजा येतेय वाचायला. पुढचा भाग लवकर टाका.
उत्तम वर्णन.
उत्तम वर्णन.
माझा मित्र यंदा इंडियाहाइक्सबरोबर केदारताल करणार होता. 18 मेची बॅच होती. पण तो आमच्याबरोबर त्याच दिवसांमध्ये तपोवनला आला.
आपण कदाचित एकाच वेळी तिकडे असू. तुम्ही उभ्या आहात, त्याच्या वर नमामि गंगे गेस्ट हाऊस आहे. तिथे आम्ही राहिलो. बिरला निकेतनच्या शेजारी.
छान लिहिताय
छान लिहिताय
फोटोही छान
गंगोत्री जवळ फार गर्दी दिसली
वाचतेय!पुढचे भाग लवकर येउ
वाचतेय!पुढचे भाग लवकर येउ द्यात!
जबरद्स्त दमछाक करणारा ट्रेक दिसतोय. फोटो पाहुन धडकीच भरली.
वा वर्णन वाचून इतका अवघड
वा वर्णन वाचून इतका अवघड ट्रेक तुम्ही सहज करताय हे भारी वाटले! पुढील लेखनास शुभेच्छा!
वा… मस्त मस्त लिहिलेय… मीच
वा… मस्त मस्त लिहिलेय… मीच आहे तिथे असे वाटले. फक्त कठिण जागी चालणे भितीदायक वाटति, तिथे मला उचलुन पुढे न्या कोणीतरी
फोटोंना १, २ असे नंबर देऊन खाली जागा सोडली तर चिकटणार नाहीत.
भारी वर्णन.
भारी वर्णन.
रॉक्स ओव्हरहँग आणि कॅम्पसाइटचे फोटो आवडले.
फोटोंना १, २ असे नंबर देऊन खाली जागा सोडली तर चिकटणार नाहीत. >>> हो.
किंवा नुसता एक-एक डॉट दिला तरी पुरेल.
मस्त वर्णन. अवघडच वाटतो आहे
मस्त वर्णन. अवघडच वाटतो आहे हा ट्रेक. वाचतानाच दम लागला.
फोटो जोडून येण्याबद्दल वर साधना आणि ललिता-प्रीती यांनी उपाय सांगितलाच आहे.
जर फोटो नंतरच्या ओळीत एखाद्या छोट्या वाक्यात त्याबद्दल लिहिलं तर फोटो वेगवेगळेही येतील आणि वाचणार्याही कळेल फोटोबद्दल असं मला वाटतं.
तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंच्या दुव्यामधलेच शब्द लिहिलेत फोटोखाली. तुम्ही अजून छान माहिती लिहू शकाल नक्की.
अरुंद रस्ता
चिंचोळा चढ
सर्वात अरुंद भाग
धन्यवाद. ट्रेक अवघड होता खरा
धन्यवाद. ट्रेक अवघड होता खरा.
साधना, ललिता आणि सुनील, थॅन्क्स. पुढच्या भागात जमलं आहे.
चिनुक्स, आम्हीही नमामी गंगेमध्येच होतो. फक्त आमची बॅच २३ मे ची होती, आम्ही निघालो आणि तुम्ही परत आला असाल.
तपोवन मलाही करायचा आहे.
गंगोत्री जवळ फार गर्दी दिसली <<>>>> प्रचंड गर्दी होती. धक्काबुक्कीच सुरु होती. रात्री मंदीर बंद होतांना गेले तर छान निवांत दर्शन होते.
आम्ही १८ मे ते २१ मे ट्रेक
आम्ही १८ मे ते २१ मे ट्रेक केला. २२ तारखेला विश्रांती घेतली. २३ तारखेला सकाळी गंगोत्रीहून निघालो. ही माझी गंगोत्रीची सातवी का आठवी ट्रिप होती.
नमामि गंगे नवीन आहे. याच वर्षी सुरू झालं. आम्ही पूर्वी बिरला निकेतनमध्ये राहत असू. तिथे शैलेश सेमवाल, जे आता नमामि गंगेचे मालक आहेत, व्यवस्थापक होते. बिरला निकेतन बंद झाल्यावर सेमवालांनी नमामि गंगे बांधलं. ते आणि दीपक आता उत्तम परिचयाचे आहेत. दीपकनं पार्किंगच्या दारात चहा आणि चाउमिनचा स्टॉल लावला आहे. व्होल्टेज कमीजास्त झाल्यामुळे गरम पाणी नेहमीच असतं, असं नाही. पुन्हा गेलात तर दीपकच्या हातची लेंगड्याची भाजी नक्की खा.
तपोवनला जरूर जा. सुंदर आहे.
मस्त वर्णन केले आहे...
मस्त वर्णन केले आहे...
अन्यथा इतके वाचतानाच दमछाक झाली असती
वा, मस्त वर्णन !!
वा, मस्त वर्णन !!
पुढचे भाग वाचायची उत्सुकता आहे. गढवाल भागात जायचं आहे एकदा. आत्तापर्यंत दोन्ही तीन्ही वेळेला मी कुमाऊंलाच गेलो.
मस्त!
मस्त!
२३ तारखेला सकाळी गंगोत्रीहून
सगळ्यांचे आभार.
२३ तारखेला सकाळी गंगोत्रीहून निघालो. <<>>>> मग आम्ही २४ ला गंगोत्रीला पोहोचलो.
नमामि गंगे नवीन आहे. याच वर्षी सुरू झालं <<>>> हो, सगळंच नविन होतं.
पुन्हा गेलात तर दीपकच्या हातची लेंगड्याची भाजी नक्की खा. <<>>> नक्की. नक्की लक्षात ठेवेन.
आत्तापर्यंत दोन्ही तीन्ही वेळेला मी कुमाऊंलाच गेलो. <<>>> आणि माझ्या लक्षात आलं की मी एकदाही गेलेले नाहीये. माझे चारापैकी दोन ट्रेक्स गढवालमध्येच झालेत.
पुढचा भाग - https://www.maayboli.com/node/86856
सुंदर वर्णन केलं आहे. कुठल्या
सुंदर वर्णन केलं आहे. कुठल्या ग्रूपबरोबर केला होता हा ट्रेक?
सुंदर वर्णन केलं आहे. कुठल्या
सुंदर वर्णन केलं आहे. कुठल्या ग्रूपबरोबर केला होता हा ट्रेक? <<<>>> धन्यवाद. ट्रेक द हिमालयाज.
सुरेख वर्णन केलं आहे, एकदम
सुरेख वर्णन केलं आहे, एकदम ओघवतं. अवघड आहे ट्रेक खरेच. फोटोही मस्त.