छोटा पॅकेट बडा धमाका - केदारताल ट्रेक - शेवटचा भाग

Submitted by धनश्री. on 19 June, 2025 - 04:00

या आधीचे भाग -
भाग १ https://www.maayboli.com/node/86852

भाग २ https://www.maayboli.com/node/86856

ट्रेक दिवस ३

केदार खरक ते केदार ताल

अंतर अंदाजे ३ किमी

ऊंची १४,२०० फूट ते १५,५०० फूट आणि परत १४,२०० फूट

आजचा दिवस अगदी प्रसन्न उगवला होता.

साडेसात वाजता सगळे तयार झाले. डबे घेतले. खाऊ घेतला. नेहमीच्या घोषणा वगैरे देऊन निघालो. आजची चाल कठीण नव्हती, पण थकवणारी होती. किंवा कठीण होती पण परवा आणि काल जे चाललो त्यामुळे जाणीव होत नव्हती.

वाट चुकायला नको म्हणून रस्त्यात जागोजागे असे कॅरन्स रचलेले दिसतात

Carans that show way.jpg

आज एकतर पायवाट नव्हती. मोठे मोठे, बोल्डर्स म्हणतात तसे दगड होते रस्त्यात. तेही वेडेवाकडे पसरलेले.

WhatsApp Image 2025-05-31 at 7.07.11 AM.jpeg

काल परवा चालतांना तो लँडस्लाईड झोन सोडल्यास खूप दगड असे रस्त्यात नव्हते. ह्या दगडांवर कधी हात टेकवून, कधी उडी मारुन चढायला लागत होतं. त्यावर बर्फ. चढ. ऊंची चांगलीच गाठली गेली होती, आणि थंडी. अंगात चार लेयर्स असूनही, चालतांनाही चांगलीच थंडी जाणवत होती. थांबल्यावर तर जास्तच.

दम चांगलाच लागला. दोन वाक्यही सलग बोलता येईनात.

तरी चालण्याचा वेग चांगला होता.

साधारण अर्ध्या पाऊण तासानंतर बाकीचे मागे पडले आणि आम्ही चार जण बरेच पुढे आलो. साडेतीन तासांचा वेळ होता पोहोचायला पण आश्चर्यकारक रित्या पावणे दोन तासातच पोहोचलो.

on the way to summit.jpg

केदारतालचं पहीलं दर्शन झालं तो क्षण अगदी अविस्मरणीय आहे.

WhatsApp Image 2025-06-16 at 8.07.48 AM.jpeg

वरचा फोटो समोरुन काढलेला आहे. वरुन काढायचा राहीला.

कदाचित हे एकच समीट असं असेल जिथे उतरुन जावं लागतं.

त्यामुळे त्या सुळक्याच्या टोकाला पोहोचलो आणि खाली तळाशी हिरवं निळं चंदेरी पाणी. हवा स्वच्छ असल्याने काठाशी असलेल्या थलायसागराचं प्रतिबिंब पडलेलं.

reflection of Thalay sagar.jpg

अगदी आ वासला गेला.

मागच्या वर्षी स्पितीमधल्या चंद्रतालचं दर्शन घेतलं होतं. पण हा आजचा अनुभव जास्त भारावणारा होता कारण तिथे वरपर्यंत गाडीत बसून गेलो होतो. हे दृश्य बघायला मात्र मेहनत घेतली होती. म्हणूनच म्हणत असावेत, the best view comes from the hardest climb

मग सावकाश उतरुन खाली गेलो. आणि आधी दहा मिनीटं काहीही न करता बसून राहीले. आम्ही चौघचं तिथे असल्याने ( गाईड वरच थांबला ) पूर्ण शांतता होती.

मग फोटो काढले.

WhatsApp Image 2025-05-31 at 7.10.12 AM.jpegWhatsApp Image 2025-06-19 at 11.59.47 AM.jpeg

आणि पुन्हा एक कोपरा पकडून बसून राहीले.

जपमाळ बरोबर होतीच. नेहमीचे ठरलेले आणि सुचतील तसे जप केले.

एव्हाना सगळे पोहोचले होते. फक्त नीलम नव्हती.

मग ग्रुप फोटो.

आणि आमच्यासाठी एक सुखद सरप्राईज, चहा. गाईड्सनी दोन मोठ्ठे थर्मास भरुन चहा आणला होता. वा !!! असं झालं आणि अर्थात त्यांचं खूप कौतुकही वाटलं. ( मागच्या वर्षी महेशला नव्हता मिळाला चहा ! ) चहा घेतला.. बिस्कीटं खाल्ली.

इकडे पोहोचून आम्हाला तासभर होत आला होता. निघायची वेळ झाली.

वर जाऊन पुन्हा फोटो काढले आणि उतरायला सुरुवात केली.

मध्ये एका ठिकाणी नीलम थांबलेली होती. तिच्याबरोबर एक ज्युनियर गाईड होता. तिथेच बसून डबा खाल्ला. डब्यात कोबीची भाजी भरुन रोल्स होते.

मग परत उतरायला सुरुवात केली.

दिड वाजता, साधारण सव्वा तासाने कँपवर पोहोचले. तशीच गवतावर आडवी झाले. मग शुज काढून पावलांना हातानेच थोडं चोळलं. बिचारे चांगलेच थकले असणार.

कँपच्या मागे एक ओहोळ होता त्यात पाय बुडवले. आपण कसं म्हणतो, कळ डोक्यात पोहोचली. अगदी तसंच ( पण इकडे चांगल्या रितीने ) पाण्याचा गारवा पायातून वर चढत डोक्यापर्यंत पोहोचला. बरं बरं वाटलं.

हळू हळू लोक पोहोचत होते. कंटाळा आला होता पण उद्यासाठी थोडी तयारी करुन ठेवली. संपलेला खाऊ भरुन घेतला.

नंतर दोन अडीच तास डायनिंग टेंटमध्ये जमून गप्पा मारल्या, क्लॅप अ‍ॅट सेव्हन, हू अ‍ॅम आय सारखे काहीतरी टिपी गेम्स खेळलो. चहाबरोबर TTH सिग्नेचर सामोसे होते., आणि रात्रीच्या जेवणात गुलाबजाम.

उद्याचं ब्रिफींग झालं. सकाळी आठ वाजता निघायचं होतं. उद्याही पॅक्ड लंच असणार होतं

कालसारखंच लँड स्लाईड झोनपाशी एकत्र जमून पार करायचा होता.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

ट्रेक दिवस चौथा.

केदार खरक ते गंगोत्री.

अंतर अंदाजे १४ किमी

१४,२०० ते १०,२०० फूट उतरणे.

sसकाळी लवकर आवरुन तयार झालो. स्लिपिंग बॅग्ज, मॅट्स आवरुन जमा केल्या. टेंट बंद करुन जमा केले, डबे घेतले, खाऊ घेतला आणि घोषणा देऊन निघालो.

ह्या गडबडीत मी माझं माझं स्ट्रेचिंग मात्र करुन घ्यायचे.

आम्हाला दिलेली हेल्मेट्स आम्ही सॅकला अडकवलेली होती. पहील्या दिवशीच माझ्या लक्षात आलं की उजव्या बाजूला ते अडकवू नये कारण उजवीकडे पहाड होता. हेल्मेट त्यातल्या सुळक्यांमध्ये अडकू शकलं असतं आणि मागे खेचलं जाऊ शकलं असतं.

निघतांना माझ्यापुढे एकजण होते जे आल्यापासून कधीच कोणात मिसळले नाहीत. चालतांना जर आपण मागच्यांपेक्षा सावकाश चालत असू तर बाजूला होऊन त्यांना पुढे जाऊ द्यायचं असतं. असा नियम काही नाहीये, पण उगाच त्यांची वाट का अडवायची ! पण हे ग्रुहस्थ काही कोणाला पुढे जाऊ देत नसत. त्यांना विचारलं की मी जाऊ का तरी काही उत्तरही देत नसत. मग जागा होईल तसं त्यांना ओलांडून पुढे जायचं.

एका वळणावर कडेने त्यांना ओलांडलंच शेवटी.

लँडस्लाईड झोनजवळ सगळे जमण्यात थोडा वेळ गेला, आरामही मिळाला. मग परवासारखंच तो पार करायचा होता. आज वरुन माती, बारके दगड घरंगळत होते. आज हा भाग ओलांडतांना मला जास्त ताण आला असं वाटलं. का कोणास ठाऊक ! हाही टप्पा ओलांडला. पुन्हा एक लहानसा ब्रेक घेतला आणि पुढची चाल सुरु केली

इथे आता ग्रुप थोडा विस्कळीत झाला. पण रस्ता चुकायची काहीच शक्यता नव्हती कारण एकच एक पायवाट होती. मी माझ्या वेगाने चालले होते आणी तो ही नेहमीपेक्षा जास्त आहे हे जाणवत होतं.

उतरणं मला नेहमीच जड जातं. सिंहगडावरही चढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच उतरायला लागतो कारण पायाचे दोन्ही अंगठे. ट्रेक नंतर दर वेळी ते शुजमध्ये दाबले जाऊन नखं काळीनिळी पडतात आणि पुढच्या महीन्याभरात गळून पडतात. आज मी विचार करत होते की फ्लोटर्स ठेऊन घ्यावेत का. अगदी त्रास झाला तर घालता येतील पण रस्ता खूप अरुंद असल्याने पायाला नीट ग्रिप असायला हवी होती. त्यामुळे फ्लोटर्सचा बेत रद्द केला. पण ह्यावेळी आश्चर्यकारकरित्या आंगठ्यांची टोकं काळी होण्यावरच निभावलं आहे. खरं ह्यावेळचा उतार सरळ उभा उतार होता. प्रत्येक वेळी, आपण चढून आलो तो हाच रस्ता का ह्याच मनातल्या मनात नवल करत होते.

निघाल्यापासून ब्रेक घेऊनही तीन तासात भोज खरक गाठलं. इथून पुढे अधुनमधून सावली असणार होती.

पावणे बारा वाजता सांगितलं की ज्यांना डबा खायचा आहे, त्यांनी तो खावा. बाकीच्यांनी पुढे जायला हरकत नाही. काही जण थांबले. चार पाच जण पुढे निघाले. मला भूक नव्हती पण जायची घाई पण नव्हती. मग असंच चालत राहू, पुढे भूक लागली की थांबू.

रस्त्यात आम्हाला दोन ग्रुप्स वर जातांना दिसले. मग रस्ता कसा आहे, कठीण आहे का, किती वेळ लागतो वगैरे नेहमीची प्रश्नउत्तरे झालीच.

साडेबारा वाजता, आता थांबावं का असा विचार करत असतांना झाडांमधून अचानक खाली लांबवर पत्रे दिसू लागले. म्हणजे गंगोत्री आलंच की. आता खाली जाऊनच डबा खाऊया. तो आनंद साजरा करायला एक चॉकलेट खाल्लं. बरोबर उरलेली ( जी रोज खाऊ म्हणून द्यायचे आणि संपली नव्हती ) ती रस्त्यात मला ओलांडून पुढे जाणार्‍या पोर्टर्सना दिली.

आत्तापर्यंत पायांना काही त्रास होत नव्हता. अशी दहा पंधरा मिनीटे गेली आणि हळू हळू अंगठे ठुसठुसायला लागले. मग वेग अगदी मंदावला. एकच्या दरम्यान बरोबर असलेला गाईड , जो आधी पुढे गेलेल्यांबरोबर होता आणि एका ठिकाणी मागच्यांसाठी थांबला होता तो फोनवर बोलतांना दिसला. मग मी पण फोन काढून बघितला तर रेंज आलेली होती. घरी फोन केला. खाली उतरल्यावर कसं जायचं हे गाईडकडून समजावून घेतलं. सोपं होतं. सरळ रस्ता आणि मग उजवीकडे वळण, मग सरळ सरळ.

पुढे सावकाश उतरत निघाले. आता पावलं टाकणं कठीण होऊ लागलं. येतांना असलेला खडा चढ आता सरळ उतार झाल्याने पावलं कशीही टाकली तरी त्रास होतच होता.

अखेरीस दिड वाजता गंगोत्री नॅशनल पार्कच्या दारात आले. तिथे असलेल्या गार्डला पुन्हा एकदा रस्ता विचारला.

नीट समजावून घेतलं तरी रस्ता चुकणे हा माझा usp आहे. त्याला अनुसरुन इतका सोपा रस्ता मी चुकलेच आणि लगेच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. बरं दिसणारे लोक हे सगळे टुरीस्ट असल्याने विचारुन फायदा नव्हता. तेवढ्यात गंगोत्री पोलीस स्टेशन दिसलं. रस्त्यावरच होतं. इन्स्पेक्टरला देवळाकडे कसं जायचं विचारलं. माझा एकूण अवतार बघून त्याने विचारलं कहासे आये ?

मी - केदारताल ट्रेक करके

तो - एकदम सरसावून बसून, डोंगरांकडे हात दाखवून - वहा उपर ?

मी - हा

तो - ताल तक गये थे ?

मी - हा

तो - जरा आदराने ( किंवा मलाच तसं वाटलं ) बहोत बढीया. मुश्किल है वहा तक जाना.

तो - ऐसा ऐसा जाईये, पाच मिनीटमे पोहोच जाओगे

धन्यवाद देऊन निघाले आणि खरेच दोन मिनीटात पहील्या दिवशी आम्ही जिथे उतरलो होतो त्या बस स्टँडला पोहोचले.

आम्ही उतरलो होतो ते गेस्ट हाऊस मंदीराच्या पलीकडल्या बाजूला होतं. तंद्रीत तिकडे जात होते तर एक जण धावत आला आणि आज तुम्हाला तिकडे रहायचं आहे असं दुसर्‍या एका ठिकाणी हात करुन म्हणाला. ही ही नविन जागा, पुरोहीत गेस्ट हाऊस खरे तर TTH ची ठरलेली आहे, तिथे आम्ही आलो तेव्हा गौमुख तपोवनचा ग्रुप होता त्यामुळे आम्हाला दुसरीकडे उतरवलं.

तिथे पोहोचले. ४/५ जण आधीच आलेले होते. डबा खाल्ला. जरा वेळाने सामान मिळालं, मग सचैल आंघोळ करुन जरा वेळ पडी टाकली.

आज मात्र संध्याकाळची भागिरथीची आरती चुकवणार नव्हते म्हणून अगदी वेळेवर पोहोचले.

त्या सगळ्या वातावरणाचे वाईब्ज वेगळेच असतात. ढोलकं, टाळ वाजवून आरती म्हणणारा गट, मोठ मोठे दिवे, धुप, कापूर, उदबत्त्यांचा सुवास आणि तल्लीन झालेले लोक !

आरती करुन परत आले आणि सामान आवरुन सॅक पॅक केली.

रात्रीच्या जेवणात गोडात जिलबी होती !

जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे प्रत्येकाने थोडे फार बोलणे, निरोप वगैरे पार पडले.

उद्या लवकर, म्हणजे अगदी साडेचार वाजता निघायला हवे असा बस आणि आर्टीगाच्या ड्रायव्हरचा आग्रह होता कारण सध्या रोज रस्ता तास तासभर बंद रहात होता. पण हो ना करता करता सहा वाजता निघायचे ठरलं. मी ह्यावेळी आर्टीगाने जावे असं ठरवलं., कारण लहान गाड्या शक्यतो अडवत नाहीत.

दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास तुरळक जॅम लागणे सोडल्यास आरामात पार पडला, तरी बारा तास लागलेच पोहोचायला.

प्रिन्स चौकात उतरुन, TTH ऑफीसमधून सर्टिफिकीट घेऊन हॉटेलवर गेले. देहराडूनला ट्रेक संपत असेल तर आमचं हे ४ स्टार हॉटेल ठरलं आहे. रात्री एकटीनेच बिअर ( आणि माझं आवडतं क्लब सँडविच ) घेऊन ट्रेक मस्त पार पडल्याचा आनंद साजरा केला

पुढल्या दिवशी दुपारी एक वाजताची दिल्ली आणि सव्वा सहाची पुणे फ्लाईट होती. त्याच दिवशी नेमकं कोणीतरी येणार म्हणून रस्ते बंद / एकमार्ग वाहतूक असल्याने एअरपोर्टला पोहोचायला नेहमी लागतात त्या चाळीस मिनीटांऐवजी सव्वा तास लागला आणि पोहोचे पोहोचेपर्यंत माझा जीव टांगणीला लागला. शेवटी बारा वाजता कशीबशी पोहोचले.

पुढचा प्रवास, पुण्याची फ्लाईट पाऊण तास डिले होणे ह्या व्यतिरीक्त आरामात पार पडला आणि शेवटी रात्री साडेनऊ वाजता घरी पोहोचले !!!

ट्रेक करुन आलं की दुसरा दिवस कपडे धुणे, सॅक रिकामी करणे ह्यात जातो आणि मग येतो थकवा. तीन दिवस, मी दिवसरात्र झोपून काढले. इतकी गाढ झोप लागायची ! आठवडा तरी जातोच थकवा पूर्ण जायला. ( ह्याला मी पोस्ट ट्रेक कंटाळा सिंड्रोम म्हणते ) : डोमा:

ही तर झाली ट्रेकची गोष्ट.

हा ट्रेक माझ्यासाठी वेगळा होता, स्पेशल होता, कारण एकटीने केला होता. कामासाठी, नुसतं फिरण्यासाठी एखादा प्रवास एकटीने करणे आणि हिमालयातला ट्रेक एकटीने करणे ह्यात थोडातरी फरक आहे.

चार पाच दिवस जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो, बरोबर अनोळखी लोक, रात्री शांत झोप नाही आणि दिवसा कस लावणारा प्रवास. मी हे दहा दिवस खूप एंजॉय केले. चालतांना, इतरांशी बोलण्याच्या काही वेळा सोडल्यास छान तंद्री लागायची. इतर वेळी हाताशी किंडल होतंच.

एकटी असल्याने एरवी ज्या गोष्टींची मनाशी नीट नोंद केली गेली नसती, ती झाली.

दर वेळी नविन काहीतरी शिकायला मिळतं, ही गोष्ट करायला हवी किंवा टाळायला हवी ह्या नोंदी मनात होत राहतात.

ह्या वेळी, एकरपोर्टवर जातांना, रस्ते बंद असू शकतात ह्या शक्यतेचा आधीच विचार करुन निघावे हे शिकले.

शुज नविन घ्यावे लागतील.

उतरतांना लेसेस थोड्या सैल बांधल्या तर आंगठ्यांना त्रास होतो, पण लगेच नाही. थोडा वेळ सुसह्य होतो.

हा ट्रेक खरं तर आत्तापर्यंत केलेल्या चारही मधला सगळ्यात कमी ऊंचीचा ( altitude ) आहे, तरी मला तो तितकाच चॅलेंजिंग वाटला. खूप समाधानही मिळालं.

बाली पास केल्यावर यमुनोत्रीचं दर्शन झालं तसं इथे गंगोत्रीचं झालं. ( आता देहरादून किंवा निदान उत्तरकाशी ते गंगोत्री ड्रायव्हिंग करायचं आहे. तो रस्ता केवळ अहाहा आहे, आणि आवडतो तसा वळणावळणांचा आहे )

हे सगळं मी जेव्हा लिहीते तेव्हा पुन्हा एकदा ते दिवस जगते. अधुनमधून वाचते तेव्हा परत ते थ्रील अनुभवते. टेंटमध्ये एखाद्या रात्री, अ ती थंडी असतांना, पुन्हा हे असले प्रकार करायचे नाहीत असा एखादा चुकार विचार येतो पण तो तेवढ्यापुरताच.
थोडी गैरसोय अनुभवली की आपली मऊसुत गादी, उशी, उकडलं तर पंखा, थंडी वाजली तर अजून एखादी चादर, अपरात्री शू लागली तर बाहेर पडावं की नाही ह्याचा हजार वेळा विचार न करावा लागणं किंवा टॉयलेट टेंट ऑक्यूपाय असतील तर कधी बाहेर येणार हे लोक ! हा विचार न करावा लागणं ह्या सगळ्या अगदी ' टेकन फॉर ग्रँटेड ' म्हणतो त्या गोष्टी सुद्धा अमुल्य वाटायला लागतात. आणि खडतर वाट पार करुन कँपसाईट दिसली की होम स्विट होम ही भावना वेगळ्या लेव्हलला जाणवते.

( हे सगळं अनुभवायला प्रत्येकाने किमान एक तरी ट्रेक करावाच ! )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
केदारताल फोटोही अफाट सुंदर आहे.
घरी गेलो।की।लॅपटॉप वर बघणार मोठ्या स्क्रीनवर.

उतरतानाचा अनुभव सर्वत्र तसाच.
पायावर लोड येतो.

अप्रतिम फोटो केदार तालचा.
सुंदरच झाला ट्रेक! किती शिकायला मिळते... एकट्याने ट्रेव्हल केले की!
<<जपमाळ बरोबर होतीच. नेहमीचे ठरलेले आणि सुचतील तसे जप केले.<< हे खुप आवडले. एवढ्या गडबडीत हे करुन घेतलेत. काय सुन्दर दृश्य आणि वातावरण असेल तेव्हा. Happy

वा! मस्त अनुभव! मला गढवाल भागाची चारधाम यात्रा किंवा चोपता या ट्रेक शिवाय फार माहिती नव्हती. तुमच्यामुळे नवीन माहिती कळाली. केदारतालचा फोटो अप्रतिम!

मस्त अनुभव आणि लिखाण...
इतर प्रवासवर्णापेक्षा ट्रेकचे वर्णन वाचायला नेहमीच मजा येते

वर्णन आणि फोटोंमुळे एकूण या भटकंतीची चांगली कल्पना आली.
जीएमवीएन किती रुपये घेतात आणि कुठून कुठे आणि परत असा आराखडा असतो? किंवा कोणत्या साईटवर माहिती/ नोंदणी असते?

पोर्टरचे काम भारीच आहे. शिवाय आचारी वगैरे लोक भटकंती पार पाडताहेत.

सगळ्यांचे आभार.

जीएमवीएन किती रुपये घेतात आणि कुठून कुठे आणि परत असा आराखडा असतो? किंवा कोणत्या साईटवर माहिती/ नोंदणी असते? <<<>>> टि टि एच का ? त्यांची वेबसाईट आहे https://trekthehimalayas.com/

सगळ्यांचे आभार.

जीएमवीएन किती रुपये घेतात आणि कुठून कुठे आणि परत असा आराखडा असतो? किंवा कोणत्या साईटवर माहिती/ नोंदणी असते? <<<>>> टि टि एच का ? त्यांची वेबसाईट आहे https://trekthehimalayas.com/

खूप छान अनुभव, एकट्याने प्रवास करताना बरेच छान अनुभव येतात, तुम्ही राहिलेल्या हॉटेल्स चे नाव हि सांगितले तर नंतर जाणार्यांना उपयोगी होईल, शक्यतो एकटीनेच जाणाऱ्या लेडीज साठी. सोलो ट्रॅव्हल करताना राहायला चांगली जागा मिळणे खास करून सेफ हि खूप आवश्यक असते.
तुमचा अनुभव वाचल्यावर आता जमणार नाही पण जमेल तेंव्हा जायला खूप आवडेल.

खूप सुंदर झाली मालिका. फोटोंतच इतका सुंदर दिसतोय ताल तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल.

धन्यवाद.

तुम्ही राहिलेल्या हॉटेल्स चे नाव हि सांगितले तर नंतर जाणार्यांना उपयोगी होईल, <<>>> जातांना सिद्धार्थ रेसीडेन्सी, येतांना le amritam

फोटोंतच इतका सुंदर दिसतोय ताल तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल.<<>>> हो माधव. तो वर्णनापलीकडे सुरेख आहे. त्याहीपेक्षा आयुष्यातली सगळी घाई गडबड त्याच्या पाण्यात विसर्जीत करावी इतकी नितांत शांतता आहे तिथे.

चंद्रताल हे एक टुरीस्ट लोकेशन झालंय, जायला सोपं असल्याने. हा मात्र असाच राहील.. रहावा.

ओहहह. अद्भुत!!! अप्रतिम फोटो! सुंदर ट्रेक आणि वर्णन. हिमालयाचे फोटो बघून खूप वाईट वाटतं! होमसिक व्हायला होतं!

खूपच छान अनुभव, एकटीने केल्याबद्दल अभिनंदन. फोटो तर अप्रतिम आहेत, लेखनही प्रांजळ ! Happy एका दमात वाचून काढली ही मालिका.

ट्रेक करण्या इतकंच ट्रेकिंग चे लेख वाचायला मजा येते. तुम्ही लिहिलं पण छान आहे. हिमालयातील ट्रेक एकदा केला की परत परत जावं असं वाटतंच. पुढील ट्रेक आणि लेखासाठी शुभेच्छा!