वाळकाचे लोणचे व इतर तोंडीलावणी

Submitted by वामन राव on 15 June, 2025 - 06:13
वाळकाचे लोणचे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भारतीय अन्न पद्धतीत पोळी, भाकरी किंवा भात (तृणधान्य), त्यासोबत वरण (कडधान्य) आणि भाजी हे मुख्य पदार्थ असतात. त्याशिवाय चटणी, ठेचा, लोणचं, कोशिंबीर असं काहीतरी तोंडी लावणं हेही असतं. ही तोंडीलावणी बहुतेक वेळा वरण-भाजी पेक्षा अधिक चटकदार असतात.

तेलुगु खाद्य संस्कृतीत तोंडीलावणीच्या पदार्थांची रेलचेल आहे.‌ बहुतेक पदार्थांचे स्वरुप हे हिरव्या-लाल मिरच्या , कोणती तरी फळभाजी किंवा पालेभाजी व मसाले यांचे शिजवलेले किंवा कच्चे असे मिश्रण असते.

या भागात आपण मुख्यतः पाहणार आहोत दोसकाया पच्चडी == वाळकाचं लोणचं तसेच इतर तोंडीलावणी.

मराठवाड्यात वाळकं पावसाळा संपता-संपता येऊ लागतात. आंध्र तेलंगणात मात्र वाळकं (पावसाळ्यातले काही दिवस सोडून) वर्षभर मिळतात. पिवळीजर्द, टेनिस बॉल एवढी व मोठी, गोल गरगरीत वाळकं तेलुगु अन्नपूर्णा-बल्लवाचार्यांची अगदी फेवरिट असतात! त्याशिवाय पिवळ्या-तपकिरी-हिरवट डागेल्या रंगाची, लांबट, एकेक किलोची वाळकं आणि काही प्रमाणात लहान-लहान हिरवट शन्न्या याही वापरात येतात. मला स्वतःला पहिल्या प्रकाराची गोल पिवळी वाळके आवडतात.

वाळकांचा मुख्य उपयोग सांबारात घालण्यासाठी आणि हे वाळकाचे लोणचे करण्यासाठी होतो. लग्नकार्य, अन्नप्रसाद, भंडारा अश्या उत्सव प्रसंगी वाळकाचे लोणचे तोंडी लावण्यासाठी हमखास केले जाते.

चला तर मग लागू तयारीला!

साहित्य:

लोणच्यासाठी

  • वाळकं - अर्धा किलो(चिरून तीन-चार वाट्या)
  • तिखट - पाऊण वाटी
  • मोहरी पूड - अर्धी वाटी
  • मीठ - तीन-चार चमचे (चवीनुसार)
  • मेथी पूड - एक चमचा
  • (ऐच्छिक) लिंबू रस - एक

फोडणीसाठी

  • तेल एक वाटी
  • मोहरी एक चमचा
  • जिरे एक चमचा
  • हिंग - अर्धा चमचा
  • लाल मिरच्या - चार पाच (तुकडे करून)
  • कढीपत्ता - दोन तीन काड्या
  • लसूण-अद्रक पेस्ट - एक चमचा
  • हळद - अर्धा चमचा

वाळकंमसाला

क्रमवार पाककृती: 

वाळकं स्वच्छ धुऊन पुसून कोरडे करून घ्या. दोन भागात चिरून, चव पाहून, कडू नाहीत याची खात्री करून घ्या. साली न काढता अगदी लहान लहान (मोठ्या शेंगदाण्याच्या आकारा एवढ्या) फोडी करून घ्या. मधून निघणारा रस व बिया ह्याही कोवळ्या असतील तर आणि आवडत असतील तर घ्या.

एका स्टीलच्या भांड्यात वाळकांच्या फोडी घाला. त्यात तिखट, मोहरी पूड, मेथी पूड, मीठ घालून नीट हलवून एकत्र करून ठेवा.

कढईत एक वाटी तेल घाला. गरम झाल्यावर मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर गॅस मंद आचेवर करून जिरे, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे करून घाला. मिनिटभर परतून लसूण-अद्रक पेस्ट घाला. अजून मिनिटभर परतून हिंग घाला. मस्त वास सुटल्यावर हळद घालून गॅस बंद करा.

फोडणी थंड झाल्यावर भांडयातील मिश्रणावर घाला. नीट हलवून एकत्र करा. आंबट चव हवी असेल तर लिंबाचा रस घालून एकत्र करा व किमान तास दोन तास, शक्यतो दहाबारा तास झाकून ठेवा.

चटकदार, चमचमीत, लालजर्द वाळकाचं लोणचं तयार आहे!

कोरड्या, हवाबंद बरणीत घालून फ्रिजमध्ये ठेवा. दोन तीन आठवडे टिकेल.

वाफळता भात आणि हे लोणचं किंवा भात वरण भाजी यासोबत तोंडी लावणी म्हणून वाढा. पोळी भाकरी यांसोबतही खायला उत्तम लागेल.

नक्की करून पहा व इथे फोटो टाका.

फोडी चिरल्या मसाला घातला मसाला कालविलाफोडणीफोडणी घातलीलोणचं तयारया जेवायलाया जेवायला

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

इतर तोंडीलावणी:

गोंगुरा पच्चडी (अंबाडीचा ठेचा):

साहित्य:

  1. चटणीसाठी: एक मोठी जुडी अंबाडीची ताजी पाने स्वच्छ धुवून कोरडी करून, ८-१० लाल मिरच्या, ३-४ हिरव्या मिरच्या, दोन चमचे तेल, एक चमचा उडीदडाळ व चणाडाळ, चार पाकळ्या लसूण, चवीनुसार मीठ
  2. फोडणीसाठी: दोन चमचे तेल, एक मध्यम कांदा चिरून, चार लसूण पाकळ्या, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद, दोन लाल मिरच्या तुकडे करून, एक चमचा उडीदडाळ व चणाडाळ

कृती:
कढईत एक चमचा तेल गरम करून उडीदडाळ, चणाडाळ लाल-हिरव्या मिरच्या परतून घ्या. बाजूला काढून ठेवा. अजून एक चमचा तेल घालून अंबाडीची पाने घालून नीट शिजवून घ्या. बाजूला काढून ठेवा. दोन्ही थंड होऊ द्या.

मिक्सरमध्ये आधी परतलेल्या मिरच्या-डाळी, लसूण, मीठ बारीक वाटून घ्या. मग अंबाडीची शिजविलेली पाने घालून जाडसर चटणी वाटून घ्या.

त्याच कढईत दोन चमचे तेल घालून मोहरी, जिरे, कढीपत्ता, लाल मिरच्या, लसूण घालून परता. कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. हळद व वरील चटणीचे वाटण घालून नीट हलवून दोन मिनिटे परता. थंड झाल्यावर हवाबंद बरणीत घालून फ्रिजमध्ये ठेवा. महिनाभर टिकेल.

वाफळता भात, वरण, भाजी यासोबत तोंडी लावणी म्हणून वाढा. पोळी भाकरी यांसोबतही उत्तम लागेल.

अल्लम पच्चडी (अद्रकाची चटणी):

साहित्य:

  1. चटणीसाठी: अद्रक पाव किलो सोलून, अर्धा इंच आकाराचे तुकडे करून, चिंच पाऊण वाटी, गूळ एक वाटी, तेल, तिखट, मीठ, हळद, मेथीपूड
  2. फोडणीसाठी: तेल मोहरी, लसूण, कढीपत्ता, लाल मिरच्या, हिंग, चणाडाळ, उडीदडाळ

कृती:
चिंच गरम पाण्यात भिजू घाला. कढईत अद्रक थोड्या तेलात ३–४ मिनिटे परतून घ्या. थंड झाल्यावर पाणी न घालता मिक्सरमध्ये एकसारखे वाटून घ्या.चिंचेचा कोळ काढून ते पाणी घाला. लाल तिखट, हळद, गूळ, मेथीपूड घालून थोडेसे फिरवून घ्या. चव बघून पुरेसे मीठ घाला. त्याच कढईत पुन्हा तेल मोहरी, लसूण, कढीपत्ता, लाल मिरच्या, हिंग, चणाडाळ, उडीदडाळ, घालून फोडणी करा. वाटलेली चटणी गरम फोडणीत घालून हलवून एकत्र करून घ्या. थंड झाल्यावर कोरड्या, हवाबंद बरणीत भरून ठेवा. आठवडाभर टिकेल.

इडली, डोसा, उत्तप्पा यांसोबत वाढा. पोळी, भाकरी यांसोबतही उत्तम लागेल.

या फोटोत दिसणारी सर्वात चटकदार रंगाची अल्लम पच्चडी आहे!

अल्लम पच्चडी

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण, चर्चा, अनुभव
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिबूड = मॅशमेलन असं गूगल म्हणतंय.
चिबूड जरा लांबट, मध्यम मोठा पट्टे असलेला असतो. खरबूज गोल, हलक्या नारिंगी रंगाचं (चक्री खरबूज असेल तर हिरवट नारिंगी पट्टेरी) असतं. आकाराने लहान.

छान रेसिपी आणि मस्त फोटोज.
सुरा आवडला.

पिवळी वर हिरव्या रेघा असलेली, सांबार काकडी , मद्रासी काकडी या नावाने इथे मिळते.
पूर्ण पिवळे धम्मक गोल फळ देखील अलीकडे काही वर्षे इथे मिळायला लागले आहे. ते अतिशय गोड असते ( टरबुज सारखे) आणि तुम्ही वर दिलेल्या फोटो सारखेच दिसते. कापल्यावर देखील तसेच असते. त्याला इथले दुकानदार सन मेलन ( sun melon) म्हणतात.

चिबूड वरून खरखरीत आणि आतून रवाळ गोड असते. त्यात पाणी / रस खूपच जास्त असतो. त्याचे असे लोणचे होईल का कल्पना नाही.

चिबूड वरून खरखरीत आणि आतून रवाळ गोड असते. त्यात पाणी / रस खूपच जास्त असतो. >> +१
मुद्दाम उन्हाळ्यात आणला जायचा आमच्याकडे, आणि कापून मीठ-साखर पेरून किंवा वेळ असेल तर तूप-जिर्‍याची फोडणी देऊन दह्यातली कोशिंबीर असं असायचं.
वाळ्कं बघुतली नाहीत असं आता मी माझ्यापुरतं कन्क्लूड करून माझे दोन शब्द संपवते.

छान चर्चा चालली आहे वाळूक, चिबूड, खरबूज या cucumber व melon जातीच्या फळांची!

रच्याक, त्याबद्धल थोडी शोधाशोध केली असता मला तवस हा शब्द दिसला. तो बहुधा कोकणी शब्द आहे. मग मायबोलीवर तवस याला श्रावण काकडी असेही म्हणतात. हा आणि एक पूर्ण पिकलेले वाळूक, (याला कोकणात तवस असेही म्हणतात.) हा असे उल्लेख आढळले.

शेवटी वाळूक ही काकडीसारखी फळभाजी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मराठवाड्यात सहज मिळते. हे किल्लींचे थोडे परिचित विवेचन दिसले.

>>> सांबारकाकडी अ‍ॅक्चुअली दाक्षिणात्य सांबारात खाल्ली आहे त्यामुळे फोटो बघून वाळूक म्हणजे तीच असावी असं मला वाटत होतं.

हो, तीच / तेच / तोच! वाळकाशिवाय सांबार म्हणजे कोकमाशिवाय कोकण!

हो, तीच / तेच / तोच! वाळकाशिवाय सांबार म्हणजे कोकमाशिवाय कोकण!>> बिंगो!
(पण म्हणून आनंदाच्या भरात ती आणून त्याचं लोणचं करायचा उरक मला नाही! Lol ) फोटो मात्र अगदीच लाळगाळू आहेत!

एक माबो बकेटलिस्ट केली पाहिजे. कोठे जावे, काय खावे, काय बघावे आणि हे सगळे कोणाच्या मदतीने करावे! Proud

>>> कोणी नोटीस केलंय की नाही ? पण फोटोतली सुरी छानच दिसते
>>> सुरी आहे का सुरा, जबरी आहे.
>>> माझंही लक्षं त्या सुऱ्या कडे गेलं. देखणा सुरा आहे.

धन्स्! शेवटी फोटोंचे चीज झाले म्हणायचे! तो cleaver knife माझा आवडता आहे आणि तो आमच्या घरात फक्त मीच वापरतो. अहोंना तो वापरण्याची परवानगी नाही आणि अहोंच्या सुऱ्या वापरण्याची मला परवानगी नाही!

>>> धार ही छान असेल असं वाटतय.

मला माझ्या चाकू-सुऱ्या अगदी धारदार हव्या असतात. प्रत्येक वेळी धार लावून घेतो.

>>> एक माबो बकेटलिस्ट केली पाहिजे. कोठे जावे, काय खावे, काय बघावे आणि हे सगळे कोणाच्या मदतीने करावे!

+१०८

>>> धागा हळूहळू जवस-फ्लॅक्स सीड्स किंवा फरसबी-श्रावणघेवड्याकडे चाललाय का

धाग्यावर तवस आलं आहेच, जवसही येईल! Lol

तवस जवस चिबुड सगळे मजेशीर आहेत. all time favourites.. नेहमी फसतात लोक. यांना जर कळले की माबोकर लोक यांना कसे मिस करतात आणि कसे न चुकता चुकीच्या नावाने हाक मारतात तर ते एकाच वेळी अभिमानाने फुगतील आणि दु:खाने खिन्न होतील. विषेशतः चिबुड.. तो अभिमानाने इतका फुगेल की फाटकन फुटेल नेहमीसारखा आणि कोकणाबाहेरचे जग पाहायचे त्याचे स्वप्न तिथेच विरघळुन जाईल; दु:खी मनाने तो स्वतःच्या फुटलेक्या तुकड्यांवर साखर पेरीत प्लेटीत जाऊन बसेल.

Happy

चिबुड कोकणात काकडीच्या एका जातीला म्हणतात, खरबुजाला खरबूजच म्हणतात आमच्याकडे (काहीजण चिबुड म्हणतात, पण आम्ही काकडीच्या एका जातीला चिबुड म्हणतो) आणि तवस जरा मोठी जाडी लांब काकडी असते तिला म्हणतात, ज्याचे पातोळे करतात.

आता माझं असं सरसकट कोकण म्हणणं खरं चुकीचं आहे, कोकणात आमच्याकडे म्हणायला हवं कारण रायगड जिल्ह्यातील नेरळ कर्जत भागात खरबुजाला चिबुड म्हणतात, असं माहितेय.

आता माझं असं सरसकट कोकण म्हणणं खरं चुकीचं आहे Happy हुश्श! धन्यवाद अन्जूताई! कोकणातही भरपूर विविधता आहे शब्दांमध्ये आणि वस्तू/पदार्थांच्या नावांमध्ये. पण सरसकट 'कोकणात' म्हटलं जातं सर्रास. 'कोकणात आमच्याकडे' (हे तालुक्याच्या पातळीवर वेगवेगळं असू शकतं सहज) हे म्हणणं जास्त बरोबर आहे.
रच्याकने, मला चिबूड खाऊन कित्येक वर्षं झाली, लहानपणी तरी ते फारसं आवडायचं नाही, कदाचित 'चिबूड' नावामुळे असेल. पण ते खरबूज प्रकारातलं असायचं, मात्र जास्त लडबडीत. बहुतेक वर प्रज्ञाने लिहिलंय तेच असावं. (माझा श्रीवर्धन तालुका!) आता लक्षात नाही, पण कुठल्याशा पुस्तकात 'चिबडासारखे' गाल की काही तरी वर्णन होतं. ते वाचून मला कसंतरी झालेलं आठवतंय Lol
पाककृती आणि फोटो सुंदर!

>>> लहानपणी तरी ते फारसं आवडायचं नाही, कदाचित 'चिबूड' नावामुळे असेल.

हं. चिबूड हा शब्द मला नवीन आहे तरीही, "आंबा" म्हटलं की गोड-रसाळ-हवीहवीशी अशी जी भावना मनात निर्माण होते ती भावना कदाचित "चिबूड" म्हटल्यावर निर्माण होणार नाही.

हो वावे माझ्या माहेरच्या संगमेश्वर तालुक्यात आणि सासरच्या देवगड तालुक्यातील शब्दांतही फरक आहे, माहेरी ज्याला अंगण म्हणतात त्याला सासरी खळे. माहेरी ओटी म्हणतात त्याला सासरी ओसरी. तवस, चिबुड मात्र सेम दोन्हीकडे.

असो थांबते, अवांतर फार होतंय माझ्याकडून.

विश्वकोशातून
खरबूज : (चिबूड; हिं. काचरा; गु. चिबडू, शक्कर टेटी; क. कळंगिड; सं. मधुपाक, कर्कटी; इं. मस्क मेलॉन, स्वीट मेलॉन;
विविध आकार व रंगाप्रमाणे प्रकार ओळखले जातात. साल नरम अगर कठीण, रेषांचे नक्षीकाम असलेली अगर गुळगुळीत; मृदुफळ गोलसर (१०–१२ सेंमी.) फळातील गर नारिंगी किंवा हिरवा, स्वादिष्ट, पिठूळ आणि मधुर वासाचा असतो. फूट व टरकाकडी हे खरबुजाचेच प्रकार आहेत.

धागा हळूहळू जवस-फ्लॅक्स सीड्स किंवा फरसबी-श्रावणघेवड्याकडे चाललाय का >>>> हंगाश्शी! ते तसंच दिसतंय. Biggrin

मस्त फोटो रेसिपी. लोणचं म्हटलं की तोंपासू असणारच पण हे फोटो फारच आकर्षक आहेत. वाळकं शब्द पहिल्यांदाच ऐकला. चिबुडासारखी दिसतायत पण दोन्ही वेगळी फळं असावीत. वाळकं आंबट आहेत असं वामनराव म्हणतायत. चिबुड आंबट नसतं. ही नुसती खातात का?

तो सुरा चायनीज रेसिपी व्हिडिओत दिसतो. माझ्याकडेही आहे.

तवस जरा मोठी जाडी लांब काकडी असते तिला म्हणतात, ज्याचे पातोळे करतात. >>> धोंडस करतात ना? इथे आगरबाजारात जे चैतन्य नावाचं अप्रतिम नॉनव्हेज मिळणारं रेस्टॉरंट आहे त्यांच्याकडे धोंडस असतं. फार मस्त लागतं.

घ्या! जवस, तवस, धोंडस ....... अजून येऊ द्या.

>>> फूट व टरकाकडी हे खरबुजाचेच प्रकार आहेत

फूट म्हणजे काय?

मराठवाड्यात ही अशी टरकाकडी विशेषतः उन्हाळ्यात मिळते. तुम्ही जी टरकाकडी म्हणताय ती अशीच असते का?

टरकाकडी

त्याच शूटमधले इतर फोटू -

टरकाकडी व चिवडाटरकाकडी व चिवडाटरकाकडी व चिवडाटरकाकडीटरकाकडी

>>> जवस, तवस, धोंडस ....... अजून येऊ द्या.

धोंडस म्हणजे काय?

- वामन<space>राव

मला ती सूरी खूप आवडली..एकदम प्रो आहे.. उगाच ते न बघितलेले हसून दिलरुबा वैगरे आठवले..
चित्रापासून कृती पर्यंत सगळेच प्रो आहे.. एखादा ब्लॉग काढा आता तुम्ही.
मिरची कुठली वापरता.. त्या प्लेटमध्ये दिसतेय ती घाटी मिरची आहे ना.. लवंगी पेक्षा थोडी कमी तिखट असते.. रंग सुंदर आला आहे.. असा रंग काश्मिरी मिरची किंवा बेडगी ला येतो ना..

@प्रज्ञा९ काकडीच्या किसाच्या तिखट दशम्या आई करते. पण काकडीच्या किसाचा गोड पदार्थ बहुतेक खाण्यात आला नाही. धोंडस करून पाहीन.

@श्रवू फोटोवरून कल्पना आली.

>>> मिरची कुठली वापरता..

प्लेटमध्ये तोडून ठेवलेली गुंटुर मिरचीची एक जात आहे ती फोडणीत घालतात. खूप तिखट नसते, आकाराने थोडी मोठी असते, आणि वाळल्यावर चपटी होते.

निजामाबादला मिरची, हळद वगैरे मिळते. उन्हाळ्यात तिथून घेतो आणि गावाकडे जाऊन दळून घेतो. रोजच्या स्वयंपाकात ते तिखट घालतो. लोणचे-चटण्या यांत मात्र Three Mango हेच तिखट घालतो. रंग खूप सुंदर येतो. तिखटपणाही ८०% तीव्रता असते. प्लेटमधले तिखट तेच आहे.

गावी धोंडास म्हणतात आणि त्याला टोपातले हा अजुन एक शब्द आहे? हा आंबोलीत वापरात नाही फारसा पण घाट उतरुन कोकणात गेले की तिथे टोपातले हा शब्द वापरतात. माझी मोठी मामी सावंतवाडी - चराठ्याची. ती नेहमी म्हणायची टोपातले केले. मी सुरबातीला कंफ्युज्ड. टोपातले काय ?? नाव काय पदार्थाचे?? मग कळले टोपातले हेच नाव आणि हे म्हणजेच धोंडस.

काकडी व गुळ एकत्र शिजत असताना स्वर्गिय सुवास सुटतो.

अंजु, बरोबर. मीही कधी कोकणात अमुकतमुक असे करतात असे म्हणत नाही कारण आम्बोलीत जे करतात ते घाट उतरुन खाली गेले की बदलते. इथे १२ मैलांवर भाषाही बदलते तर् बाकीचे काय घेऊन बसलात…

366475000.jpg मंगलोर वाळकं / काकडी..
आमच्याकडे त्या काकडीच्या बिया वाटून.. गाळून घेउन .. ताक घालून.. मस्तपैकी फोडणी घालून कढी करतात.. भातावर घेतात किंवा अशीच पितात..

८०% म्हणजे मला म्हणायचे होते की १००% तिखट नसते, थोडे कमी तिखट असते!

अवांतर: कोकणाच्या तुलनेत मराठवाड्यात पदार्थांतील तिखटाचे प्रमाण अधिक असावे असे वाटते.

---

>>> त्या काकडीच्या बिया वाटून.. गाळून घेउन .. ताक घालून.. मस्तपैकी फोडणी घालून कढी करतात..

हा प्रकार इंटरेस्टिंग् दिसतोय.

किती त्या बेचव चिबडाची चर्चा! Happy

माझ्या माहितीतले चिबूड हे सालावर रेषा असलेले फळ असते. ते पिकले तरी 'गुळचट' या पलिकडे गोड बनत नाही. परंतू मैलभराच्या टापूत आपण पिकल्याची दवंडी फिरवते - आपल्या विचीत्र वासाने.

@भरत, विश्वकोशात निषेध नोंदवता येतो का? चिबडाच्या 'गोडूस आंबूस' वासाला त्यांनी चक्क 'मधुर वास' म्हटले हे अतीच झाले Happy त्या वर्गातली बरीच फळे कापून फ्रीजमध्ये ठेवली की फ्रिजमधे असलेले दही आपोआप स्टिंकी योगर्ट (त्याला फ्लेवर्ड योगर्ट म्हणणे शक्य नाही) बनते.

Pages